नाचणी - वाळकाचे पौष्टिक थालीपिठ

Submitted by किल्ली on 9 May, 2019 - 05:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 किसलेले वाळूक/वाळूख - (वाळूक नसेल तर मध्यम आकाराची किसलेली काकडी २ )
[वाळूक ही काकडीसारखी फळभाजी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मराठवाड्यात सहज मिळते. पुण्यात कधी दिसले नाही. ह्याची चव जराशी आंबूस असते. बाकी गुणधर्म काकडीसारखे असतात. बिया वाळवून नंतर सोलून खातात. वाळकाचे लोणचे, कोशिंबीर असे विविध पदार्थ करता येतात. उपासाला चालते.
वाळूक किसण्यासाठी त्याचे मधोमध चिरून ८ भाग करावेत. बिया कढून टाकाव्यात. फोडीच्या मागच्या भागाला किसणीवर धरून किसावे. साल शिल्लक राहते व गर किसला जातो. ह्या पद्धतीने काकडी, दुधी सुद्धा किसता येतो.]
IMG-20190509-WA0002.jpg

नाचणीचे पीठ - दिड वाटी
ज्वारीचे पीठ - २ वाट्या
चणाडाळीचे पीठ - १ वाटी
गव्हाचे पीठ - १/२ वाटी (ऐच्छिक)

ओवा - चिमूटभर, चवीनुसार
तीळ - चिमूटभर, चवीनुसार
जिरे - चिमूटभर, चवीनुसार
हळद - चिमूटभर, चवीनुसार
लाल तिखट किंवा चिरलेली हिरवी मिरची - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
ठेचलेल्या लसणाच्या ५-६ पाकळ्या
कढीपत्ता - वाळवून चुरडलेला - अर्धी मूठ
उभा चिरलेला कांदा १ (ऐच्छिक)

तेल - कडेने सोडण्यासाठी आणि थापण्यासाठी (ग्रीसिंग )
पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

१. सर्व पीठे एकत्र करावी.
२. पिठात चवीचे साहित्य घालून चांगले मिसळावे.
३. त्यात किसलेले वाळूक/काकडी घालून चांगले मिक्स करून घ्यावे. ताजी आणि रसदार फळभाजी असेल तर नंतर पीठ मळून घेण्यास पाणी कमी लागते आणि चव चांगली येते.
४. बेताने थोडे थोडे पाणी टाकत पीठ मळून गोळा बनवावा. थालीपिठ थापता आले इतपत consistency असावी.
५. जाड बुडाच्या पॅनला (नॉन स्टिक असेल तर उत्तम ) थोडे तेल लावावे
६. मळलेल्या पिठाचा गोळा हातावर चांगला गोल करून थोडासा पसरवून घ्यावा. हा चपटा गोळा पॅनला आतल्या बाजूने गोलाकार थापून घ्यावा. हाताला थोडेसे तेल लावावे म्हणजे पीठ चिकटणार नाही.
७. पॅन वर झाकण ठेवून मोठ्या आचेवर थालीपिठे उलट सुलट भाजून घ्यावीत.

प्रकाशचित्रे:

थापलेले थालीपीठः
IMG-20190509-WA0003.jpg

भाजुन तयारः
IMG-20190509-WA0001.jpg

येथे आधी झालेली थालिपीठावरची चर्चा आहे :
https://www.maayboli.com/node/67053

वाढणी/प्रमाण: 
५-६ थलीपीठे होतील
अधिक टिपा: 

- गरम गरम असताना घट्ट ताज्या दह्याबरोबर थालीपिठाचा आस्वाद घ्यावा.
- ही थालीपिठे पोटभरीची आहेत, थोडी हेवी होतात. त्यामुळे कमी पचनशक्ती असलेल्या लोकांनी जरा जपून खा!
- थालीपीठाला थापून झाल्यानंतर ५-६ छिद्रे पाडून त्यात आणि कडेने तेल सोडल्यास चव आणखी खुलते

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग, आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे पाकृ.
थालिपीठ जरा कोरडे दिसतेय का शेवटच्या फोटोत? आणि दही?
वाळकाचा फोटो भारी दिसतोय. पण हे कुठे मिळणार आता?

धन्यवाद शाली Happy
तेल कमी लावते मी त्यामुळे कोरडे वाटत असेल.. व्यवस्थित प्लेटिंग करून फोटो काढणे कधी जमणार काय माहिती, खायची घाई नुसती.. नांदेड ला मिळेल वाळूक, मला टिकडूनच मिळालंय Proud

थालीपीठ लावतानाच अगोदर कोथिंबीर आणि पुदीना बारीक चिरुन टाकायचा मग त्यावर थालपीठ लावायचे. भारी लागते आणि दिसतेही छान.

छान

त्या पिवळ्या वालकाला फूट म्हणतात ना ?

छान पाकृ.
कढीपत्ता - वाळवून चुरडलेला - अर्धी मूठ>>>> हे कधी केले नव्हते.कढीलिंब चिरून टाकायचे.आता असे करून पहायला हवे.

धन्यवाद BLACKCAT, देवकी Happy
वाळवून चुरडलेला कढीपत्ता कशातही छान लागतो, निवडून खाणाऱ्यांना कळतही नाही Happy

थालिपिठ जरा झाकण ठेऊन वाफ आणून शिजलं की मग झाकण काढून, वरून जरास्सं तेल सोडून खमंग होईतोवर ठेवावं. त्यानं ते कमी तेलात असूनही चामट आणि कोरडं होत नाही .

अरे वा नवी थालीपीठ रेसिपी. थालीपीठ खातानाच वाचतेय पण भाजणीचं.
अशा रेसिपी आयत्या हातात मिळाल्या तर आणखीन मस्त लागतात ना. Wink

मस्त दिसतंय थालिपीठ. इथल्या इंग्रो मधे दोसाकाय नावाने मिळतात काकडया त्या अशाच असतात दिसायला. त्या आणून ट्राय करेन.

अरे वा . बरेच दिवसानी पिकलेली काकडी बघायला मिळाली. छान रेसीपी.
दोसाकाय आणि ह्या काकड्या दिसायला एकसारख्या दिसतात. पण खुप फरक होईल चवित आणि स्ट्रक्चर मध्ये. दोसाकाय मऊ असत नाही एवढे. त्या ऐअवजी मोठ्या काकड्या इथे मिळतात त्या चवीला जवळ जातील. (डार्क ग्रीन असतात त्या. जास्त बीयावाल्या. )
कोल्हापुर कडे याला शेंदाड म्हणतात. हे फुट नव्हे.
तव्यावर थापण्या ऐवजी पातळ चीजक्लॉथ (मलमल कापड) थापते मी. एकदम सोपे जाते तव्यावर घालायला .

आबा, आतापर्यंत वाळकातल्या बिया वाळून कुंडीत रुजल्या असतील. त्यांना कोवळी पानेही आली असतील. आता कसले थालीपिठ? Lol Lol

मस्त दिसतंय!
काकडी घालून थालीपीठ म्हंटल्यावर मला पातोळे च आठवले ..पण हे तसं वेगळं दिसतंय! चव कशी लागते? ..तिखट गोड थोडी काकडी ची असं मिक्स का ? थोडीशी पातोळ्यां सारखी --त्यातल्या काकडीच्या स्वादासारखी लागेल का ? .. ते फारच वेगळं लागतं म्हणा ..तांदुळाचं पीठ,गूळ असल्याने...
इथे मला फूट ,वाळकं, डोसकाय,(हे तर पहिल्यांदाच ऐकतेय मी नाव ) तवस काsss ही मिळणार नाही ..मी साध्या काकडीचं करून बघेन !

आंध्रा तेलंगणा मध्ये दोसकाया म्हणतात पण फोटो मधले गुड मकाइलु सारखे दिसते आहे. ह्याचे सांडगे पण लै भारी होतात. किसून घेउन त्यात तिखट मीठ. जिरे कुटुन व पोहे घालायचे व सांडगे वळून खुट खुटीत वाळवून घ्यायचे. दही भाता बरोबर तळून ऑसम लागतात. टिपिकल आंध्रा व तेलंग णा कडचा पदार्थ आहे. सांडगे व परतलेली तोंडल्याची भाजी बेस्ट काँबो दही भाता बरोबर. आम्ही बरेच वेळा टिफिन आणायचो असला.

गुडमकाइ लु आंध्रा पद्धतीच्या सांबारात पण घालतात.

मेधावि प्रमाणेच मी थालिपी ठ करते थोडे मॉइस्ट छान लागते. थालिपीठात मी पुदिना नाही घालत. पन उगीच मने दुखावायला नकोत. ज्याचा त्याचा चॉइस. कोथिंबीर मस्त लागते.

आंध्र मधले असू शकेल, कारण नांदेड शहर आंध्र- तेलंगाणा सीमेवर आहे Happy
धन्यवाद अंजली, अमा Happy
अंजली, थालीपीठ आंबट होत नाही, खमंग होते करून बघा रेसिपी, मला नेमकं सांगता येत नाहीये चवीचं वर्णन

नेमकं सांगता येत नाहीये चवीचं वर्णन>> खास ह्याचीच चव आहे. वाळकाची. सांबारात पण कळेल असा फरक पडतो चवीने. व मिळून पण येते.

नांदेडच्या खूप सुना आहेत हैद्राबादेस. पूर्वी ते एकच होते बेरार व डेक्कन

अंजली, थालीपीठ आंबट होत नाही>> आंबट ?! आंबट का होईल ? मी तिखट -गोड लिहिलंय .. तू सवयीने आंबट गोड वाचलंस बहुतेक Lol
खास ह्याचीच चव आहे. वाळकाची>> अर्रर्र .. जाऊदेत मग .. चलो नांदेड करायला पाहिजे
त्या वाळका चा फोटो बघून मला चिबूड आठवतंय सारखं Sad

चिबूड >> मस्क मेलन (muskmelon) (शिवाय याचे बरेच चुलत भाऊ असतात) नावं आणि चवीत बदल. दिसायला थोडे सारखे अशी बरीच फळं दिसतात Lol

खरबूज म्हणतो आम्ही त्याला, ते कच्चे असेल आणि अगोड असेल तर मी किसून घालते थलिपीठात .. थालीपीठ हा खूप flexible पदार्थ आहे त्यामुळे मला तो खूप आवडतो

२ दिवस हा धागा वाचून शेवटी आज मक्याच्या पिठात टॉमेटो, हि.मि,आले वाटून त्यात कांदा,कोथिंबीर्,धणेपूड मिसळून थालीपीठे केली.

थालीपीठ भाजणीच्या पिठात बारीक चिरलेला कोबी, किसलेले गाजर,दुधी,लाल भोपळा हे घालतेच.त्यामुळे सॉफ्ट्नेस येतो.उरलेले वरण वगैरे खपून जाते.अजून चवीसाठी कांदा,कोथिंबीर हे नेहमीचे यशस्वी कलाकार असतातच.
आज मक्याच्या पिठात टॉमेटो, हि.मि,आले वाटून त्यात कांदा,कोथिंबीर्,धणेपूड मिसळून थालीपीठे केली.
काकडी तेवढी घातली नव्हती,कारण काकडीचा एक वास येतो तो मला आवडत नाही.

खरबूज वेगळं. चिबूड वेगळा.>> हो का, माहिती नव्हतं
धन्यवाद प्रज्ञा९ Happy
मक्याच्या पिठात टॉमेटो, हि.मि,आले वाटून त्यात कांदा,कोथिंबीर्,धणेपूड मिसळून थालीपीठे केली.>>> वा वा देवकी, मस्त, फोटो?

माहेरी (औरंगाबाद) गेल्यावर आयतं खाईन... तेल पाहिजे बाई थाल्पीटाला .... काही पदार्थ पारंपारिक पध्दतीनेच करावेत व खावेत व तृप्त व्हावे

आमंत्रणासाठी धन्यवाद किल्ली.
हे आमंत्रण मी राखून ठेवते, यात दालबाटी आणि बालुशाहीचा पण समावेश असेल अशी आशा आहे. Happy
( मला हावरट म्हणू नको प्ली$$$$ज)

Pages