आयआयटी कानपूरचा एक प्रशंसनीय उपक्रम

Submitted by राघोभरारी on 8 May, 2019 - 11:33

परवाच कायप्पा वर मेसेज आला...IIT कानपुर ने भारतीय धर्म आणि तत्वज्ञान विषयी माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे. यामध्ये रामायण, रामचरितमानस, भगवद्गीता, उद्धवगीता,अष्टावक्रगीता, ब्रह्मसूत्रे, पतंजली योगसूत्रे, उपनिषदे, वेदांत अश्या सर्वांची उत्तम माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही माहिती ११ वेगवेगळ्या भाषांमध्ये देण्यात आलेली आहे. मुख्य ग्रंथ जसे रामायण, गीता, उपनिषदे यांच्या भाषांतराबरोबर जाणकारांच्या टीकादेखील उपलब्ध आहेत.
उपक्रमाविषयी ते लिहितात:
What we wish to do is to:
1. Create a repository of Indian philosophical texts on the Internet, and to make these freely available to whoever is interested.
2. Create tools as well as a process that will make the putting up of such texts on the web simple.
3. Explore the different ways in which the content can be presented, in order to enhance the study of these texts

आधुनिक युगात संस्कृती जोपासण्याचा आयआयटी कानपूरचा हा उपक्रम नक्कीच स्त्युत्य आहे...जिज्ञासूंनी याचा जरूर लाभ घ्यावा

https://www.gitasupersite.iitk.ac.in/

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

राघोभरारी, तुमच्या अनेक मुद्द्यांशी सहमत नाही. शिक्षणपद्धतीपासून धर्म दूरच राहिलेला बरा आहे ---> भारतीय तत्वज्ञानाचा एका विशिष्ट धर्माशी संबंध जोडणे अयोग्य आहे. हे ज्ञान आपला सांस्कृतिक वारसा आहे व धर्म ही संकल्पना नावारूपाला येण्याआधीपासून हे ज्ञान अस्तिस्त्वात आहे. या तत्वज्ञानात अश्या अनेक बाबी आहेत ज्या संपूर्ण धर्मनिरपेक्ष आहेत (उदा योग). त्यामुळे याकडे एका विशिष्ट धर्माचे ज्ञान म्हणून पाहणे अत्यंत चुकीचे आहे. परंतु आत्तापर्यंत केवळ हेच होत आल्यामुळे बहुसंख्य लोकांना या ज्ञानाबद्दल काहीच माहिती नाही किंवा योग्य वयात त्याची ओळख झाली नसल्याने पुढेही जाणून घ्यायची इच्छा राहत नाही. आणि म्हणूनच हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी त्याची ओळख शालेय जीवनात करून देण्यात मला काहीच गैर वाटत नाही.

परवाच कायप्पा वर मेसेज आला...IIT कानपुर ने भारतीय धर्म आणि तत्वज्ञान विषयी माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे. यामध्ये रामायण, रामचरितमानस, भगवद्गीता, उद्धवगीता,अष्टावक्रगीता, ब्रह्मसूत्रे, पतंजली योगसूत्रे, उपनिषदे, वेदांत अश्या सर्वांची उत्तम माहिती उपलब्ध आहे.

खूप चांगला उपक्रम सुरू आहे
आपले प्राचीन संस्कृती कशी होती,विविध ग्रंधात असलेली माहिती त्या मधून सहज उपलब्ध होईल.
आणि त्या काळी लोक जीवनाकडे कसे बघाय चे हे सुधा माहीत पडेल
त्या काळी असलेली माहिती आताच्या माहिती शी जुळवून बघता येईल .
ह्यात धार्मिक काही नाही प्राचीन भारताचा अभ्यास करणे धार्मिक असू शकत नाही .
आणि हे सुधा सत्य आहे युरोपियन देश प्राचीन भारतीय संस्कृती वर अभ्यास करतात आणि त्यात त्यांना कुठे धार्मिकता दिसत नाही
आपली सर्व प्राचीन ग्रंध देशाची संपत्ती आहे.

टवणे सर यान्चा ८-५-१९ चा १५-५०हा प्रतिसाद पूर्णपणे पटला. हे सर्व विषय आपल्या विद्यापीठांत शिकवले जातात. इन्डॉलॉजी हा विषय अनेक ठिकाणी असतो. भारतीय तत्त्वज्ञान तर सर्वत्र शिकवले जाते. पण भाषा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र अशा 'मानव्य' विषयांकडे अथवा शाखांकडे विद्यार्थांचा कल नसतो. कारण सध्याची प्राथमिकता आणि प्राधान्य हे पैसा मिळवणे असे आहे. पुरेसा पैसा मिळवल्यावर हौस म्हणून लोक हे विषय शिकतात. अलीकडे माध्यमांमधून थोड्याफार संधी उपलब्ध झाल्याने ओघ थोडासा वाढला आहे इतकेच. भाजीभाकरीचा प्रश्न सुटून सर्वत्र साधारण समृद्धी आल्यावर कदाचित लोक इकडे वळतील.
शाळांमधून हिन्दुधर्माची ओळख पुरेशा प्रमाणात होते असे माझे मत आहे. आदिशन्कराचार्य, नागार्जुन, पतन्जली, पाणिनी,चरक, सुश्रुत, आर्यभट,भास्कराचार्य, वेद, वेदान्गे, उपनिषदे,व्भगवद्गीता, वर्णाश्रम, भक्ती आणि वारकरी चळवळी, ज्ञानेश्वरी,रामदास, एकनाथ, तुकाराम्,नामदेव दक्षिणेतील अळवार पंथ यांची तोंडओळख शाळेत झालेली असते. पण विद्यार्थी आणि पालक ह्या विषयांना दुय्यम समजत असल्याने याचा अभ्यास पुरेशा गांभीर्याने केला जात नाही. आणि हे ज्ञान मेंदूत न मुरल्यामुळे पुढे विसरले जाते.

साधारण दोन हजार आणि अधिक वर्षांपूर्वी जेव्हा संस्कृतभाषा बहुसंख्य समाजाची बोलीभाषा उरली नाही तेव्हाच तिचा र्‍हास सुरू झाला. त्यानंतर अनेक शतके अभिजनवाङ्ममय संस्कृतात निर्माण होत राहिले. कारण भाषा ही एखाद्या भूकंप वा त्सुनामीतल्या हानीसारखी एका क्षणात मरण पावत नाही अथवा विकसित होत नाही. शतकानुशतके ही प्रक्रिया चालू असते. पण र्‍हासाला सुरुवात होण्याचा काळ ठरवता येतो. परकीय आक्रमणे आणि इंग्रज यांकडे बोट दाखवून फारसे काही साधणार नाही. भाषेच्या विकासात आणि र्‍हासात बदलत्या परिस्थितीचा मोठा हात असतो. कृषिची सुरुवात, भटकेपणातून स्थिरतेकडे वाटचाल, नागरीकरण, लोह-ताम्रयुग, औद्योगीकरण यामुळे अनेक संकल्पना भाषेत नव्याने शिरल्या ज्या पूर्वी अस्तित्वात नव्हत्या, त्यांची गरजही नव्हती. मग वर्तमान भाषा अपुरी, तोकडी पडू लागते. नवनवीन शब्द भाषेत दांडगाईने घुसतात, जे मूळ भाषेत अर्धबहिष्कृत ठरतात, अशिष्ट ठरतात. हळू हळू हा ओघ इतका वाढतो की मूळ भाषाच बदलून जाते. जहाजाचा एक एक भाग बदलता बदलता मूळ जहाज केवळ नावापुरते उरावे तसा हा प्रकार आहे. प्राकृत आणि अपभ्रंश भाषांची वाढ आणि प्रसार हा असाच आहे. किंबहुना मराठी देखील ज्ञानेश्वरीतील मराठीभाषा आज नाही. निव्वळ मराठी हे नाव राहिले आहे. तेव्हा संस्कृत, पाली, मागधी, अपभ्रंश, हळे कन्नड या सर्वातले ज्ञान/माहिती जतन व्हावी. आज ती वापरातच आणावी असे नव्हे. दुर्गाबाईंनी अनेक बौद्धग्रंथांचे भाषांतर केले हे त्यांचे उपकार आहेत. तसेच उपकार तिबेटी, चिनी, सिंहली भाषांतरकारांचे आहेत. या जुन्या ग्रंथांमुळे संस्कृतीची वाटचाल कळते. इतकेच की हे जुने वाङ्मय वाचून चाकाचा शोध नव्याने लावण्याचा खटाटोप केला जाऊ नये.

"परकीय आक्रमणे आणि इंग्रज यांकडे बोट दाखवून फारसे काही साधणार नाही" ---> भाषेचा ऱ्हास हि दीर्घकाळी प्रक्रिया असली तरी त्याचा वेळ हा कमीअधिक असतो....परकीय आक्रमणात आणि इंग्रजी राजवटीत त्याचा वेळ सर्वाधिक होता...उदाहरण द्यायचे झाल्यास खिलजीच्या आक्रमणात नालंदा विद्यापीठ पूर्णपणे कोसळले आणि भाषेचे बरेच नुकसान झाले. तिथे उपलब्ध असणारी साधारण ९० कोटी स्क्रिप्ट्स जाळली गेली. सर्व पुस्तकांना जेंव्हा आग लावली तेंव्हा ती महिनाभर अधिक जळत होती...असेही ऐकले आहे हि त्या आगीवर खिलजीचे सैनिक स्वयंपाक शिजवित. अश्या घटना त्याकाळात बऱ्याच झाल्या असतील ज्याची नोंदपण नाही... इंग्रजांनीपण पद्धतशीरपणे आपली पुरातन शिक्षणसंस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला. या काळात झालेला ऱ्हास दुर्लक्षित करता येणासारखा नाही

लेखाचा विषय काय अन वाद काय.
त्याकाळी लोकांची समज ,श्रद्धा काय होते हे जाणून घ्यायचे.
---
इजिप्तची चित्रलिपी वाचणारे लोक आहेत. ममी ठेवलेल्या गुंफांत काय लिहिलं आहे ते वाचून आणि डिएनए वरून कोण आहे ते शोधलं आहे.

लेखाचा विषय काय अन वाद काय.
त्याकाळी लोकांची समज ,श्रद्धा काय होते हे जाणून घ्यायचे.
---
इजिप्तची चित्रलिपी वाचणारे लोक आहेत. ममी ठेवलेल्या गुंफांत काय लिहिलं आहे ते वाचून आणि डिएनए वरून कोण आहे ते शोधलं आहे.

हिरा ह्यांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला आहे. आवडला. संस्कृतच कवटाळून बसणार्यंचे एजेंडे स्पष्ट दिसतात.

राघोभरारी, शालेय अभ्यासक्रमात तोंडओळखच अपेक्षित असते. प्रत्येक मुद्दा, तत्त्वज्ञान, महान व्यक्तींबद्दल तपशीलाने लिहिण्याइतका पुस्तकांचा आणि ते समजण्याइतका विद्यार्थ्यांचा आवाका नसतो. नागार्जुनाचा शून्यसिद्धांत, पुढे धर्मकीर्तीची त्यात भर, शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान, शैव-कौलमत, आगम, सान्ख्यादि तत्त्वज्ञाने, भगवदगीतेतला कर्मज्ञानभक्तिसान्ख्ययोग हे समजण्याची विद्यार्थ्याची कुवत नसते. शास्त्रे,पुराणे, धर्मसिन्धु वगैरे नीती-आचरणग्रन्थ, प्रत्येक उपनिषदातील सार, पुराणातील कथा, दशावतार, प्रत्येक काळखंडातले वाङ्मय, संस्कृती, शास्त्र आणि अनेक अगणित व्यक्ति, घटना, साहित्य इत्यादींचा एक एक वाक्यात उल्लेख करायचा म्हटले तरी किती मोठा ग्रन्थ होईल. एव्हढे मोठे कुषाण साम्राज्य, ज्याला काही लोक पहिले सुवर्णयुग मानतात किंव गुप्तकाल जो सुवर्णयुग म्हणून प्रसिद्ध आहे, अथवा दक्षिणेतला चोल, कलिंग, खारवेल कालखंड, राष्ट्रकूट, वाकाटक, शिलाहार, यादव,चालुक्य, पश्चिमेकडे शक, हर्षवर्धन, अशा मोठमोठ्या घराण्यांना शालेय पुस्तकात किती तपशीलवार प्रतिनिधित्व मिळू शकेल? मध्ययुगातला इतिहास, शिवाय थोडाफार जगाचा इतिहास, वाङ्मय, संस्कृती, धर्म हे सर्व समाविष्ट करायचे असेल तर प्रत्येकाला किती जागा मिळू शकेल? आणि आम्ही मुलांच्या पाठीवर पुस्तकांचे ओझे नको म्हणून आरडाओरडा करायचा. तेव्हा सध्या आहे हे ठीक आहे, नव्हे योग्यच आहे. ज्यांना पुढे अधिक रस निर्माण होईल त्यांच्यासाठी विद्यापीठे आणि ग्रंथांनी भरलेली कपाटे (ज्यांच्यावरची धूळ क्वचितच झटकली जाते,) आहेतच.
ता. क. : नालंदा विद्यापीठातले अनेक ग्रन्थ प्राकृत भाषांतले होते. किंबहुना पाली, जैन प्राकृत ह्या बराच काळ तत्कालीन भारतीय द्वीपकल्पात धर्मभाषा होत्या. कान्हेरी हेसुद्धा एक जागते विद्यापीठ होते आणि अनेक भिक्षु, साधु, सामान्यजन, प्रवासी, साधक, यांनी गजबजलेले होते. एक छोटे शहरच होते. शिलाहारांमुळे (ते शैव होते.)बौद्ध धर्माचा राजाश्रय गेला ह्या आणि इतर कारणांनी कान्हेरीची रया गेली. अध्ययन, पठनाची परंपरा खंडित झाली. तिचे पुनरुज्जीवन बदलत्या काळात होऊ शकले नाही. महाकाय रोमन साम्राज्य संस्कृतीसह लयाला गेले. हूणबर्बरांचा हल्ला हे तात्कालिक कारण. पर्शियामध्ये जबरदस्त वंशसंहार झाला. ऊर्जितावस्था आणि र्‍हास ह्या नैसर्गिक अवस्था आहेत. काही तात्कालिक कारणे असतातच पण केवळ त्यावरच भर न देता साकल्याने विचार करणे जरूरीचे असते.

अत्यंत स्तुत्य उपक्रम, आयआयटी कानपूरचे खूप खूप आभार , राघोभरारी ह्यांनी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ..
कोणी तरी कॉमेंट केली कि आयआयटी ने का केले , ह्या वरून आठवले कि DRDO ने ज्ञानोबा माऊलींच्या रथाचे मॉडिफिकेशन केले होते जेणे करून बैलांना तो रथ वाहून नेणं सोपं जाईल, त्यावरून हि काहींनी असाच वाद घातला होता , सवाल ये नही कि पेहल किसने कि सवाल ये उठाना चाहिये कि पेहले क्यूँ नही कि ? आता आपण स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाले , आपली संस्कृती, आपली भाषा , आपली पूर्वजांनी दिलेली देणगी आणि वारसा ह्याचा अभ्यास करायला काय हरकत आहे , जग हे विज्ञानाची कास धरून पुढे चालेल आहे आणि त्यातली जवळपास २०% हुन जास्त जनता आपण आहोत , आपण कुठल्याच क्षेत्रात कमी पडणार नाही एवढी लोक आहेत आपल्या कडे, त्यातली काही ह्या कामासाठी लावली सरकारने तर काय हरकत आहे. सगळ्याच क्षेत्रात आपण पुढे जाऊ हेच ध्येय भारतीयांनी पहिले पाहिजे मग ते संस्कृत असू नाही तर अजून काही..

नागार्जुनाचा शून्यसिद्धांत, पुढे धर्मकीर्तीची त्यात भर, शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान, शैव-कौलमत, आगम, सान्ख्यादि तत्त्वज्ञाने, भगवदगीतेतला कर्मज्ञानभक्तिसान्ख्ययोग हे समजण्याची विद्यार्थ्याची कुवत नसते. ---> असहमत. शालेय काळ वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत असतो आणि वर लिहिलेले तत्वज्ञान निदान तोंडओळखीपुरते का होईना आकळण्याची क्षमता नक्की असते. ज्या वेळी भारतात गुरुकुल पद्धती होती तेंव्हा हे ज्ञान शिकण्यासाठी वयाच्या ८ व्या वर्षांपासून सुरुवात होत असे. आजही जिथे वेदपठण शिकवले जाते तिथे विद्यार्थी ८-१० व्या वर्षांपासून शिकायला सुरु करतात. सांगण्याचा मुद्दा हा की भारतीय तत्वज्ञानाची निदान ओळख करून घेण्यापुरती क्षमता नक्कीच विकसित झालेली असते. सध्यातरी कोणत्याही पाठ्यपुस्तकातून याची ओळख काय साधी तोंडओळखदेखील करून दिली जात नाही. ज्या वयात मुलांना न्यूटनचे ग्रॅव्हिटी चे law समजतात, आईन्स्टाईन चा सापेक्षतावादाचा सिद्धांत समजतो, शरीरशात्रामध्ये विविध अवयव कसे काम करतात, पृथ्वीचे अंतरंग, ग्रहणे, विविध देश, त्यांच्या चालीरीती, हवामान, पीक हे सर्व समजते तिथे भारतीय तत्वज्ञानाचा पाया कोणता, द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, म्हणजे काय ते कोणी मांडले, पतंजलीच्या योगसूत्राची रूपरेषा काय, ढोबळमानाने वेदांत म्हणजे नेमके काय हे का समजू नये? मलातरी यातले काहीच शाळेत शिकवल्याचे आठवत नाही.

"शास्त्रे,पुराणे, धर्मसिन्धु वगैरे नीती-आचरणग्रन्थ, प्रत्येक उपनिषदातील सार, पुराणातील कथा, दशावतार, प्रत्येक काळखंडातले वाङ्मय, संस्कृती, शास्त्र आणि अनेक अगणित व्यक्ति, घटना, साहित्य इत्यादींचा एक एक वाक्यात उल्लेख करायचा म्हटले तरी किती मोठा ग्रन्थ होईल" --> हे सर्व शाळेत शिकवा असा कोणाचाच आग्रह नाही. हे सर्व शिकायला १ जन्म पण कमी पडेल. मुद्दा एवढाच आहे की इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित यांचा आवाका देखील अतिविशाल असताना शाळेत ज्या पद्धतीने त्याची ओळख करून देण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित केला जातो तसे भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीही करणे नक्कीच शक्य आहे.

"एव्हढे मोठे कुषाण साम्राज्य, ज्याला काही लोक पहिले सुवर्णयुग मानतात किंव गुप्तकाल जो सुवर्णयुग म्हणून प्रसिद्ध आहे, अथवा दक्षिणेतला चोल, कलिंग, खारवेल कालखंड, राष्ट्रकूट, वाकाटक, शिलाहार, यादव,चालुक्य, पश्चिमेकडे शक, हर्षवर्धन, अशा मोठमोठ्या घराण्यांना शालेय पुस्तकात किती तपशीलवार प्रतिनिधित्व मिळू शकेल? मध्ययुगातला इतिहास, शिवाय थोडाफार जगाचा इतिहास, वाङ्मय, संस्कृती, धर्म हे सर्व समाविष्ट करायचे असेल तर प्रत्येकाला किती जागा मिळू शकेल?" --> हा सर्व इतिहासाचा भाग झाला. इथे अप्रस्तुत.

"नालंदा विद्यापीठातले अनेक ग्रन्थ प्राकृत भाषांतले होते. किंबहुना पाली, जैन प्राकृत ह्या बराच काळ तत्कालीन भारतीय द्वीपकल्पात धर्मभाषा होत्या" --> मान्य. पण हे सुद्धा भारतीय संस्कृतीचा एक भागच होते जे परकीय आक्रमणात नष्ट झाले. संस्कृत चे म्हणाल तर अगदी १४ व्या शतकापर्यंत ती बोलीभाषा म्हणून काही प्रमाणात असणार संस्कृतमध्ये काही प्रमाणात ग्रंथनिर्मिती या काळातही झालेली आहे (उदा विद्यारण्यस्वामीकृत पंचदशी)

"ऊर्जितावस्था आणि र्‍हास ह्या नैसर्गिक अवस्था आहेत. काही तात्कालिक कारणे असतातच पण केवळ त्यावरच भर न देता साकल्याने विचार करणे जरूरीचे असते" --> मान्य. परंतु साकल्याने विचार करताना काही विशिष्ट कालखंडात झालेला बदल आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम हेही दुर्लक्षून चालणार नाही हेही तितकेच खरे.

आयआयटी कानपूर नी फक्त भारतीय प्राचीन वाडमय , ग्रंथ,आणि साहित्य नेट वर उपलब्ध करून दिले आहे भारतीय भाषे मध्ये ह्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखे काहीच नाही फक्त ते हिंदू धर्माशी संबंधित आहे ह्या मुळे काही लोक उगाच विरोध करत आहेत .
त्या पेक्षा त्यांनी भारतातील सर्वच धर्माचे ग्रंथ,रीतिरिवाज,प्राचीन कला , विज्ञान ह्याची सुधा माहिती भारतीय भाषेत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करावी हे समजण्या सारखे आहे .
पण कानपूर आयआयटी chya स्तुत्य उपक्रम ल धर्म चिकटवणे आणि विरोध करणे ह्याला काही ही अर्थ नाही .
आणि हिंदूची ची संस्कृती शालेय शिक्षणात शिकवली जावि अशी
हिंदू ची सुधा मागणी नाही .
पण ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्या साठी साहित्य उपलब्ध करून देणे ह्यात काहीच गैर नाही

राघोभरारी, "हा सर्व इतिहासाचा भाग झाला" असे म्हणून बाजूला सारता येत नाही तो. सर्व मानव्य शाखा एकमेकांच्या हातात हात घालून वावरतात. सर्व शास्त्रांचेही थोड्याबहुत प्रमाणात तसेच असते. वाङ्मयाचा इतिहास, संस्कृतीचा इतिहास, कलेचा इतिहास, भाषेचा इतिहास, धर्मांचा इतिहास, इतकेच काय तत्त्वज्ञानाचाही इतिहास असतो. भूगोलही असतो. कोणत्या ठिकाणी संस्कृती कशी आणि का बहराला आली, पुनरुज्जीवन का झाले, तिथेच का घडले, धर्मयुद्धे कुठे आणि का घडली, सब्बख्तघीन, अल्लख्तघीन हे कुठले प्रकरण, टाय्ग्ग्रिस-युफ्रेटिस काय आहेत, तिथे काय घडले, सप्तसिन्धु, आर्यावर्त, दोआब यांचे स्थान आणि माहात्म्य काय ही सगळी मुळे समजून घेणे आवश्यक असते. अशा अनेक अंगांनी आपण भूतकालाचा वेध घेत असतो. स्थळकाळाची द्विमिती तर असतेच, पण सामाजिक स्थिती किंवा परिस्थितीची तिसरी मितीसुद्धा या शोधात असते. पुरावेसुद्धा निव्वळ दस्तऐवजीय नसतात. पुरातत्त्वीय, नाणी, शिलालेख, भित्तीचित्रे, आर्किटेक्चर, ताम्रपत्रे, भूर्जपत्रे, फॉसिल्स्, कार्बन डेटिन्ग, पर्यावरणीय बदल असा विविधांगी शोध असतो. भारतीय तत्त्वज्ञान हे कधीच एकसंध किंवा मोनोलिथ नव्हते. निसर्ग, ब्रह्मतत्त्व, आत्मा, प्रकृती, माया असे शब्द अनेक अर्थांनी वापरलेले आढळतात. द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, सांख्य हे सर्व धर्ममान्य आहे. अनेकदा विरुद्ध मतेसुद्धा मांडली गेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने इंटर्प्रिटेशन मान्य आहे. गीतेचा एकच अर्थ लावा असेही नाही. कोणी ज्ञानेश्वरी लिहितो, कोणी गीतारहस्य लिहितो, कोणी गीताप्रवचने. पुन्हा या सर्वांतला भेद आणि साम्य, विविधता आणि एकता उलगडून दाखवणार्‍याही अनेक टीका, समीक्षा आहेत. हे सर्व शालेय अभ्यासात समाविष्ट होणे हे शक्य, इष्ट आणि योग्य नाही. शिवाय तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृती या व्यतिरिक्त अनेक विषयांची ओळख शालेय जीवनात होणे अभिप्रेत असते. विज्ञानशास्त्रांमध्ये तर नित्य नवीन भर पडत असते. १९३०सालचे पदार्थविज्ञानाचे पुस्तक बघितले तर त्यात जे जे थॉम्सनवर विस्तृत माहिती आहे. पण मॅक्स प्लॅन्क, श्रोडिन्जरवर अगदी त्रोटक माहिती आहे. जेम्स चॅड्विक, नील्स बोह्र, सब अ‍ॅटॉमिक पार्टिकल्स, फ्यूजन, फिशन या विषयी काहीच माहिती नाही. हे सर्व शास्त्रज्ञ आणि शोध पुढील काळातल्या अभ्यासक्रमात समाविष्ट होऊन विद्यार्थ्यांना शिकावे लागले, तेव्हा जे जे थॉम्सनचा उल्लेख एका ओळीवर आला. ज्ञानाच्या कक्षा रुन्द होत जातात तसतश्या त्याच्या शाखा बनत जातात आणि त्या त्या शाखेत त्या विषयाचा सखोल आणि तपशीलवार अभ्यास होऊ शकतो. शालेय अभ्यासक्रमात ह्या सगळ्याला धावता स्पर्श केलेला असतो आणि तेच योग्य आणि फीजिबल आहे.

"हा सर्व इतिहासाचा भाग झाला" असे म्हणून बाजूला सारता येत नाही तो..... ----->माझा मुद्दा भारतीय तत्वज्ञान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे हा होता. तुम्ही दिलेली सर्व माहिती चोल, कलिंग, खारवेल कालखंड, राष्ट्रकूट, वाकाटक, शिलाहार, यादव,चालुक्य, पश्चिमेकडे शक, हर्षवर्धन ह्यांचे संदर्भ इतिहासात मोडतात. त्यांचा भारतीय तत्त्वज्ञानविषयक तोंडओळख यांच्याशी सरळसोट संबंध नाही. त्यामुळे या विषयासाठी तो अप्रस्तुत हे मी म्हंटले. बाकी हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या देशात १० वर्षात शिकवण्यासाठी इतिहासात काय समाविष्ट करावे आणि काय नाही हा एक स्वतंत्र वेगळा विषय होईल.

"पुन्हा या सर्वांतला भेद आणि साम्य, विविधता आणि एकता उलगडून दाखवणार्‍याही अनेक टीका, समीक्षा आहेत. हे सर्व शालेय अभ्यासात समाविष्ट होणे हे शक्य, इष्ट आणि योग्य नाही" --> एवढे डिटेल मध्ये शालेय जीवनात उलगडा करून सांगावे असे माझे म्हणणे देखील नाही. ती खूप पुढची गोष्ट झाली. पण पहिल्यांदा असे काही ज्ञान आपल्याकडे आहे ते तरी कळू द्या. आज कोणत्याही कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलाला षडदर्शने कोणती, अद्वैत, द्वैत या संकल्पना म्हणजे काय, प्रमुख १० उपनिषदांची नावे (निदान नावे तरी), अष्टांग योगाची ८ अंगे कोणती, वेदांची ४ महावाक्ये कोणती असे बेसिक प्रश्न विचारले तर माझी खात्री आहे की १० पैकी ९ मुलांना याची माहिती देता येणार नाही. कारण अश्या विषयाचा स्पर्श झालेलाच नसतो. कोणीतरी स्वतःहून पुस्तक वाचले किंवा पालक या विषयात रुची ठेऊन असतील किंवा काही कारणाने यावरची पुस्तके वाचनात आली असतील तरच ही माहिती असेल कोणालातरी. पण बहुसंख्य जण या विषयाची काहीही माहिती नसणारेच आढळतील. आणि माहितीच नसेल झाली तर आवड कोठून येणार. मग पुढे बहुसंख्य लोकांचा हे ज्ञान म्हणजे निरुपयोगी आणि याची माहिती ठेवणारे जुनाटमतवादी किंवा मूर्ख असा समज होतो.

माझा आक्षेप हा या विषयाबाबत शालेय अभ्यासक्रमात साधी ओळख सुद्धा करून न देणे हा आहे. म्हणणे इतकेच की निदान माध्यमिक जीवनातली २-३ वर्षे याबाबत थोडी का होईना माहिती दिली जावी. आता काय, कोणती आणि किती माहिती द्यावी यासाठी सर्वंकष विचारविनिमय व्हावा आणि तो वेगळा विषयही होईल. आणि यातून कोणाला उत्सुकतेपोटी अधिक शिक्षण घ्यावे वाटले तर पुढे Philosophy चे कोर्सेस आहेतच की.

" ज्ञानाच्या कक्षा रुन्द होत जातात तसतश्या त्याच्या शाखा बनत जातात आणि त्या त्या शाखेत त्या विषयाचा सखोल आणि तपशीलवार अभ्यास होऊ शकतो. शालेय अभ्यासक्रमात ह्या सगळ्याला धावता स्पर्श केलेला असतो आणि तेच योग्य आणि फीजिबल आहे"----> हे मीदेखील मान्य करतो. पण वर म्हणल्याप्रमाणे माझा आक्षेप हा भारतीय तत्त्वज्ञान विषयाबाबत शालेय अभ्यासक्रमात साधी ओळख सुद्धा करून न देणे हा आहे. धावता स्पर्श सोडाच पण आजच्या शैक्षणिक पाठ्यक्रमात साधा उल्लेख देखील आढळत नाही.
आणि हे फक्त हिंदू तत्वज्ञान नाही तर जैन, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, शीख या सर्वांबाबत लागू आहे कारण भारताच्या गौरवशाली परंपरेत या सर्वांचा वाटा आहेच. केवळ धर्माची वरवरची ओळख, त्यांचे प्रणेते, प्रमुख धर्मग्रंथ आणि त्यांचा कालखंड यावरील ४ पाने सोडल्यास काहीही शिकवले जात नाही. उदा द्यायचेच झाल्यास बुद्ध धर्मातील ७ Suttas, Abhidhamma, Vipasana अश्या काही तत्वज्ञानाची थोड्याश्या विस्ताराने माहिती शालेय जीवनातच उपलब्ध करून देण्यात का येऊ नये? हेच बाकीच्या धर्मातील तत्वज्ञानाला पण लागू करता येईल.

<<< आज कोणत्याही कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलाला षडदर्शने कोणती, अद्वैत, द्वैत या संकल्पना म्हणजे काय, प्रमुख १० उपनिषदांची नावे (निदान नावे तरी), अष्टांग योगाची ८ अंगे कोणती, वेदांची ४ महावाक्ये कोणती असे बेसिक प्रश्न विचारले तर माझी खात्री आहे की १० पैकी ९ मुलांना याची माहिती देता येणार नाही. >>>
मुलांचे सोडा, १००० पैकी ९९९ पालकांना पण येणार नाही. पण त्याने काही अडतंय का कुणाचं? संस्कृत भाषा मृत झाली तरी काही अडणार आहे का? ज्यांना आवड आहे ते गंमत म्हणून शिकत बसतील.
जगात नामशेष झालेल्या भरपूर भाषा आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/Lists_of_extinct_languages
जगात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पण भरपूर भाषा आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/Lists_of_endangered_languages
थोडक्यात संस्कृत ही काही जगातली विशेष भाषा नाही, जरी तुम्हाला त्याबद्दल खूप आत्मियता असली तरी.

मुद्दा हा आहे की I.I.T. सारख्या टेक्नॉलॉजीच्या संस्थेने सोशल सायन्स क्षेत्रात पडावे का? - माझ्या मते नाही.
धर्मावर आधारित शिक्षण शासकीय संस्थेने (म्हणजे खाजगी न्हवे, सरकारी पैशाने चालणारी संस्था) द्यावे का? - माझ्या मते नाही.

[मुद्दा हा आहे की I.I.T. सारख्या टेक्नॉलॉजीच्या संस्थेने सोशल सायन्स क्षेत्रात पडावे का? - ]

हो, अत्यावश्यक आहे.

उपाशी बोका, technology is a subset of science. There is a technical aspect in social science studies as well.
माझा आक्षेप मुख्यतः कामाच्या स्वरूपाविषयी होता. जो अजूनही थोडाफार आहे. पण humanities साठी किमान एक स्वतंत्र विभाग आहे हे कळल्यावर संकलन करणे ही गोष्ट अनाठायी वाटत नाही आता.

मला वाटते की धर्म आणि तत्त्वज्ञान, संस्कृती या संंबंधीची माहिती शालेय पाठ्यक्रमात 'इतिहास' या विषयात समाविष्ट केलेली असते. धर्माची सामाजिक वृद्धी आणि समाजात धर्माची वृद्धी हा इतिहासाचा विषय आहे. प्रत्येक धर्माची मूलतत्त्वे साधारणपणे सांगितली जातात आणि धर्मप्रवर्तकांची माहिती दिली जाते. सकल धार्मिक वाङ्मयाचा परामर्श घेणे हे इतिहास या विषयात बसत नाही. राघोभरींनी दिलेली 'नव्याने' समाविष्ट करण्याची यादी पाहाता राघोभरारींचे असे मत दिसते की तत्त्वज्ञान हा एक वेगळा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. (नव्याने या शब्दावर जोर अशासाठी की या सर्वांची त्रोटक ओळख सध्याच्या अभ्यासक्रमात आहेच). पण एक विषय किंवा विषयाची व्याप्ती वाढवताना एकंदर किती ज्ञानसाठा आकलनशक्तीच्या कोणत्या पातळीवर वितरित करावा ह्याची मर्यादा किंवा क्वान्टिटी ठरलेली असेल, तर इतर कोणत्यातरी ज्ञानशाखेचा संकोच होणारच. जे ज्ञान किंवा माहिती वर्धमान आहे, त्याला अधिकाधिक जागा द्यावी लागते. ज्या ज्ञानात आणखी काही भर पडत नाही आहे, त्याला आधी निश्चित केलेली आणि वापरली गेलेली जागा पुरते. उदा. पर्यावरण, ओझोन थर, कार्बन फुट्प्रिन्ट्स यांचा समावेश त्रोटक रीत्या करण्याजोगा आहे आणि बहुधा तो तसा केलेला आहे. हिन्दु, बौद्ध आणि जैन यांच्या कॅनॉनिकल आणि पवित्र वाङ्मयाची नुसती ओळखसुद्धा सकल माहितीसाठ्याची व्याप्ति वाढवणारे ठरेल. वेदपाठशाळा ह्या एकाच ज्ञानशाखेला वाहिलेल्या संस्था असतात. तिथे लहान मुलांकडून सुरुवातीला अमरकोश आणि अष्टाध्यायी घोकून घेणे हाच अभ्यासक्रम असतो. e=mc^2 शिकवणे हा नाही. तिथे पदार्थविज्ञान, रसायन, प्राणी/वनस्पतिशास्त्र, बौद्ध-जैन-शीख-ईसाई- झरतुश्ती तत्त्वज्ञान, जग, जागतिक इतिहास, भूगोल, समाज, नागरिक शास्त्र यांची तोंडओळख करून घेणे आवश्यक नसते. आणि मुख्य म्हणजे तिथेही फक्त माहिती मिळते. ज्ञान नाही. ते आपलेआपण करून घ्यायचे असते. वेदान्ताचा आपल्याला भावलेला आणि समजलेला अर्थ उमगून घेऊन पुढे वाटचाल करायची असते. शिवाय याही अभ्यासक्रमातून माहितीसंपन्न अशाच व्यक्ती बहुतांशी निर्माण होतात. त्या ज्ञानी असतीलच असे नाही. ज्ञान हे तसेही दुर्मीळच असते. माहिती ही जालावर असू किंवा मिळू शकते. ज्ञान हे स्वतः चिंतनमननप्रयोगाने मिळवावयाचे असते. असो.
चिनूक्स यांनी दर्शवविल्याप्रमाणे आज महाजालावर सगळे वेद, बहुतेक सारी उपनिषदे, गीता, भक्तिसूत्रे, मल्लीनाथी, भाष्ये असे प्रचंड वाङ्मय उपलब्ध आहे. पुन्हा नव्याने संकलन होणार असेल तर होवो बापडे. पण इथलेच वर्शन बरोबर हे कोण ठरवणार? उत्तरेकडे संकलित केलेल्या अथवा जालावर समाविष्ट केलेल्या रोमन लिपीतल्या संस्कृत वाङ्मयातला एक मोठा दोष म्हणजे ते फोनेटिकली शुद्ध लिहिलेले नसते. देवनागरीत लिहिलेलेसुद्धा अशुद्ध असते. योग्य पद्धत अशी होऊ शकेल की संस्कृत भाषा - यात अर्थात आर्ष संस्कृत आलेच- आणि हिन्दु धर्मशास्त्र जाणणार्‍या प्रकांड पंडितांच्या (शक्य असेल तर दक्षिणेकडच्या) चमूकडून हे सर्व तपासून/करवून घ्यावे. आय आय टीचा सहयोग फक्त तांत्रिक सल्ल्यापुरता अथवा तान्त्रिक सहभागापुरता मर्यादित असावा.

भारतातल्या शाळांची अवस्था पाहता पहिल्यांदा मुलांना नीट लिहायला वाचायला शिकवले पाहिजे. नवीन विषय वाढवण्यापेक्षा आहे ते विषय जरी नीट शिकवले तरी खूप आहे.
बाकी आयआयटी ने हे करावा की नाही यात फार काही तथ्य नाही. ही सगळी माहिती प्रिंट आणि डिजिटल मध्ये आधीपासूनच होती. हे फक्त एक वेब ऍप आहे. 2 3 लोकांनी प्रोजेक्ट म्हणून केले असावा. टेस्टिंग देखील फार केलेले नाहीये. श्लोक आणि अर्थ जुळत नाहीयेत बऱ्याच ठिकाणी.
बाकी हिंदुत्व आणि विरोधी आपल्या आपल्या स्वार्थाने ह्याचा हवा तसा अर्थ लावणारच ज्याला फार काही महत्व नाही.
ज्याला आवड आहे त्याला उपयोग होऊ शकेल. बाकीच्यांनी उगाच जीवाला त्रास करून घेऊ नये.

संकलन बघितले. स्तुत्य उपक्रम आहे. पण असे संकलन इतरही काही संकेत स्थलांवर उपलब्ध आहे त्यामुळे विशेष काही नाही वाटले. पण आय.आय.टी. सारखी संस्था हे कार्य करतेय म्हटल्यावर हे संकलन बर्‍याच प्रमाणात प्रमाणीत असावे.

पण... संकलन चाळून वा वा म्हणण्यापलीकडे मी काही करू शकलो नाही, कारण संस्कृत फारसे समजत नाही.

ज्ञान संकलीत झाले आहे.
ते ग्रहण करायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे.
आता माझ्यासारख्याला ज्यात हे ज्ञान जाणून घेण्यात स्वारस्य आहे त्याचे घोडे भाषेमुळे अडले आहे. जिज्ञासा यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचा अर्थ दिला तर थोडा उपयोग होईल. पण तरी तो प्रकारही सुरुवातीस कंटाळवाणा होतो. सुरुवातीस सूत्राचा अर्थ, त्याचे संदर्भ ओघवत्या भाषेत दिला (भाषांतरीय भाषेत नाही) तर विषय समजण्यास खूप फायदा होइल. आणि मग पुढे अधीक जाणून घ्यावेसे वाटले तर प्रत्येक शब्दाचा अर्थ उपयोगी येइल. उपनिषदे, योगसूत्रे अशांच्या बाबतीत अर्थाच्या अधिक जवळ जाण्यासाठी स्वतःचे चिंतन गरजेचे आहे कारण संहितेत सूत्रे आहेत. रामायण / महाभारतासारखे ते काव्य/इतिहास नाही. त्यामुळे सूत्र उकलताना प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन विचार करणे गरजेचे असते.

<हे फक्त एक वेब ऍप आहे. 2 3 लोकांनी प्रोजेक्ट म्हणून केले असावा. टेस्टिंग देखील फार केलेले नाहीये. श्लोक आणि अर्थ जुळत नाहीयेत बऱ्याच ठिकाणी>
ओह! मी माझ्या आधीच्या प्रतिसादात म्ह्टले होते की या निमि त्ताने ऑथेंटिक टेक्स्ट एका जागी उपलब्ध होईल. पण हे वरचं वाचून असं वाटतंय की यात आणि अ न्यत्र उप लब्ध असलेल्या साहित्यात काही फरक नसेल, तरीही याला उगाचच आय आय टीचं लेबल लागल्याने मान्यता मिळेल की काय?

अतिशय स्तुत्य उपक्रम! यात आणखी भर पडत जाईल नक्कीच. एखाद्या साहित्याचा, धर्माचा, अभ्यास कुणालाही निषिद्ध नाही. एखादा धर्माचा विरोधक देखिल धार्मिक पुस्तकात काय लिहिले आहे याचा अभ्यास करून त्यांचा संदर्भासाठी उपयोग करू शकतो. 'पूर्वी आमच्याकडे अमुकतमुक होतं' असं म्हणणारा निदान खरंच तसं होतं का हे पडताळून पाहू शकतो. आणि हे सर्व वाद-विवाद सोडून द्या; केवळ माहितीसाठी म्हणून माहिती - ही देखिल उपलब्ध व्हावी. दर वेळी कोणता उद्देश त्यामागे असायलाच पाहिजे असंही नाही. उपलब्धता, ती पण त्यातल्या त्यात शाश्वत टिकणार्‍या स्वरूपात (इलेक्ट्रॉनिक) आणि सर्वांना मुक्तपणे मिळेल अशी, स्वागतार्हच आहे.

सर्व धर्माचे जुजबी माहिती मुलांना शालेय शिक्षणात झालीच पाहिजे,
काही गोष्टी खरच बोलायची ईचा नाही तरी बोलावे लागत आहे
भारतात धर्मांतरित christan
धर्मांतरित मुस्लिम
धर्मांतरित बुद्ध धर्मीय
ह्यांना ते ज्या धर्मात गेलेत त्या धर्मा विषयी सुद्धा त्यांना फार थोडीच माहिती आहे आणि
जी माहिती धर्मांतर करताना हिंदू कसे वाईट हे जे शिकवलं आहे तेवडीच माहिती त्यांना हिंदू धर्मा विषयी आहे
जी पोस्ट आहे त्यावर origianal मुस्लिम धर्मीय जे गल्फ मध्ये राहतात त्यांचे विचार घेतले तर ते टोकाची विरोधी भूमिका घेणार नाहीत
तेच चीन, थायलंड सारख्या बहुसंख्य बुद्ध धर्मीय असणाऱ्या देशात ह्याच विषयावर कंमेंट घेतली तर त्यांना सुध्दा ह्यात काहीच वावगे वाटणार नाहीं

राजेश१८८, जालावर आधीच भरपूर म्हणजे भरपूर माहिती आहे. धर्मांतरित मुस्लिम (मूळचे हिन्दू) ही माहिती वाचतात का? जर ते वाचत असतील तर त्यांना या नव्या साइटचा फारसा उपयोग होणार नाही. आणि ते वाचतच नसतील, त्यांना रस नसेल तर ते इथे फिरकणारही नाहीत. तेव्हा पूर्वहिन्दू धर्मांतरितांना हिंदू धर्माची चांगली माहिती या नव्या वेबसाइटद्वारे पुरवण्याच्या प्रयत्नांचा हेतु जर या मागे असेल तर तो फारसा साध्य होणार नाही. अशा साइट्स हिंदूंमधेही फार थोडे लोक वाचतात. कारण त्याशिवाय त्यांचे चालू शकते. खरीखुरी ज्ञानलालसा असणारे लोकच इथे येतील. त्यांच्यासाठी आणखी एक समांतर साधन उपलब्ध झाले इतकेच. आणि ही साइट किंवा अ‍ॅप तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असेलही पण आशयाच्या बाजूने उत्कृष्टतेची काय हमी? अनेक वर्शन्स तपासून त्यातले त्यातल्या त्यात उत्तम तेच निवडले गेले आहे काय? चिकित्सा झाली आहे काय? की फक्त डाटा एन्ट्रीचेच काम झाले आहे?
तरीही ठीक आहे. वर म्हटल्याप्रमाणे आणखी एक माहितीचे ठिकाण उपलब्ध झाले आहे, त्याचे स्वागत.

मान्य
पण आंधळा विरोध करणारे हेच असतात हे सत्य आहे
ना घरचे ना घाट वरचे

>>आणि ही साइट किंवा अ‍ॅप तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असेलही पण आशयाच्या बाजूने उत्कृष्टतेची काय हमी?<<
उपक्रम आयआयटि, कानपूरचा आहे, कोकाटे इंग्लिश स्पिकिंगचा नाहि हे तुमच्या ध्यानात आलं असेलंच...

इंटरेस्टिंगली, काहि संन्माननिय अपवाद वगळता हा उपक्रम एका विशिष्ठ कंपूच्या डोळ्यात खुपतोय याचं अजिबात आश्चर्य वाटलं नाहि. म्हणतात ना - गांव बसा नहि, और... Wink

Pages