आयआयटी कानपूरचा एक प्रशंसनीय उपक्रम

Submitted by राघोभरारी on 8 May, 2019 - 11:33

परवाच कायप्पा वर मेसेज आला...IIT कानपुर ने भारतीय धर्म आणि तत्वज्ञान विषयी माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे. यामध्ये रामायण, रामचरितमानस, भगवद्गीता, उद्धवगीता,अष्टावक्रगीता, ब्रह्मसूत्रे, पतंजली योगसूत्रे, उपनिषदे, वेदांत अश्या सर्वांची उत्तम माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही माहिती ११ वेगवेगळ्या भाषांमध्ये देण्यात आलेली आहे. मुख्य ग्रंथ जसे रामायण, गीता, उपनिषदे यांच्या भाषांतराबरोबर जाणकारांच्या टीकादेखील उपलब्ध आहेत.
उपक्रमाविषयी ते लिहितात:
What we wish to do is to:
1. Create a repository of Indian philosophical texts on the Internet, and to make these freely available to whoever is interested.
2. Create tools as well as a process that will make the putting up of such texts on the web simple.
3. Explore the different ways in which the content can be presented, in order to enhance the study of these texts

आधुनिक युगात संस्कृती जोपासण्याचा आयआयटी कानपूरचा हा उपक्रम नक्कीच स्त्युत्य आहे...जिज्ञासूंनी याचा जरूर लाभ घ्यावा

https://www.gitasupersite.iitk.ac.in/

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे वेबसाईट! माझ्या मनात पण अशी वेबसाईट असावी असे होते. फक्त यात अजून एक फिचर हवे. श्लोकाच्या संपूर्ण अर्थासोबतच प्रत्येक शब्दावर क्लिक केले की त्याचा अर्थ पण यायला हवा. जसा रेख्ता च्या वेबसाईटवर (www.rekhta.org) उपलब्ध आहे. आणि phonetic English मध्ये पण श्लोक दिसले तर अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. यात सगळी संस्कृत नाटकं, रामायण, महाभारत, सुभाषितं असं सगळं साहित्य प्रकाशित करता येईल!

धन्यवाद लिन्क दिल्याबद्दल. थोडी ब्राउज केली. चांगली दिसते.

हो ते रेख्तासारखे केले तर खूप सोपे होईल सर्वांना वाचायला व समजायला.

अशाच पद्धतीची अजून एक वेबसाईट आहे जिथे वेद, पुराण, उपनिषदे, स्तोत्रे यांचा संग्रह आहे आणि माहिती PDF file मधून डाउनलोड करायची सुविधा पण आहे.

https://sanskritdocuments.org/

याच वेबसाईट वर शंकराचार्य रचित जवळपास सर्व स्तोत्रांचा संग्रह आहे - https://sanskritdocuments.org/sanskrit/shankaracharya/

इथेही बरीच पुस्तके PDF रूपात डाउनलोड साठी उपलब्ध आहेत - http://www.sanskritebooks.org/

आता फक्त याचे भाषांतर झाले तर सर्वांपर्यंत हे ज्ञान सहज पद्धतीने पोहोचेल.

निव्वळ मूर्खपणा आहे हा. उद्या त्यात वैदिक गणित आणि ज्योतिष्य हे विषय पण टाकतील.
आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांनी धर्म आणि तत्वज्ञान यापासून दूर राहिलेले बरे.

उपाशी बोका, आयआयटीने यात पडू नये असे का वाटते? काही आयआयटीज मध्ये जीवशास्त्राचा अभ्यास देखील होतो. कारण आता संशोधनाची व्याप्ती वाढली आहे आणि जीवशास्त्राचा आणि तंत्रज्ञानाचा संबंध अधिक घनिष्ठ होत जात आहे.
संस्कृत भाषेचा अभ्यास भारतात होणे यात गैर काय? उलट भारतीय भाषा आणि artificial intelligence याबद्दल आपण संशोधन करू शकतो. आता इंग्लिश मध्ये OCR (optical character recognition) किती सहज होते. भारतीय भाषांमध्ये का होत नाही अजून? की जेव्हा गुगल एखादे ॲप आणेल व तेव्हा होईलच आपोआप!
Natural Language Processing म्हणुन Google करून बघा. AI मधले नव्याने विकसित होणारे क्षेत्र आहे. त्यात भारतीय भाषा कधी येणार? अर्थात आत्ता असलेले केवळ संकलनाचे स्वरूप बदलून अधिक user friendly, संशोधनाभिमुख व्हायला पाहिजे यात शंका नाही. पण मुळात भाषा आणि तंत्रज्ञान यांचा नजिकच्या भविष्यात बराच जवळचा संबंध असणार आहे. तेव्हा आयआयटी भाषा क्षेत्रात काम करणे गैर नाही असे मला वाटते.

"निव्वळ मूर्खपणा आहे हा......आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांनी धर्म आणि तत्वज्ञान यापासून दूर राहिलेले बरे"---> ह्या अश्या विचारांमुळेच आज आपण आपल्या ज्ञानापासून दूर राहिलो आहोत. जिथे जगामध्ये मोठमोठ्या विद्यापीठामध्ये आपल्या भारतीय संस्कृती, ग्रंथसंपदेबद्दल अभ्यास, research सुरु आहे तिथे आपल्याच देशातल्या लोकांना त्याचा अभिमान वाटण्याऐवजी हा मूर्खपणा वाटतो हीच खरी शोकांतिका आहे.
सध्या हार्वर्ड मध्ये Department of South Asian Studies मध्ये ४ भारतीय भाषा शिकवल्या जातात ज्यात संस्कृत पण आहे https://sas.fas.harvard.edu/sanskrit

अमेरिकेत तर केवळ हिंदू philosophy शिकवणारी एक स्वतंत्र युनिव्हर्सिटी आहे https://www.hua.edu/

ऑक्सफर्ड मध्ये भारतीय धर्म आणि तत्वज्ञान मध्ये डिग्री आणि पीएचडी कोर्सेस पण आहेत https://www.ox.ac.uk/admissions/graduate/courses/mphil-classical-indian-...

एवढेच काय तर जर्मनीमध्ये १४ टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत भाषा आणि भारतीय तत्वज्ञान शिकवले जाते https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3038926/Sanskrit...

वरील लिंक मधील बातमीत अगदी पहिल्याच २ ओळी पुरेश्या बोलक्या आहेत - "Will Germans be the eventual custodians of Sanskrit, its rich heritage and culture? If the demand for Sanskrit and Indology courses in Germany is any indication, that’s what the future looks like. "
याच लेखात म्हणले आहे- "Dr. Michaels feels that instead of indulging in a political and religious debate, Indians should try to preserve their heritage.....the majority of Sanskrit scholars, including those at Harvard, California Berkeley and the UK, are Germans,” he said.....But why? “Probably because we never colonised India and maintained a romantic view about it,” quipped Dr. Michaels.

वरील वाक्ये ही एक धोक्याची घंटा पण आहे कारण बाहेरील जग आपल्या संस्कृत भाषेचा, धर्म आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करत आहेत आणि आपल्या भारतात मात्र या सगळ्याबद्दल उदासीनता आहे. जगामध्ये आयआयटी सारख्या किंवा त्याहूनही जास्त प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमध्ये आपले तत्वज्ञान शिकवले जात असताना इथे मात्र त्यापासून दूर राहा असे सुचविले जाते आणि बऱ्याचदा काही जाणून न घेता त्यावर टीका पण केली जाते. ज्यादिवशी ही मानसिकता बदलेल तो दिवस भारतासाठी सुदिन असेल.

वरील वाक्य हे खरंतर एक धोक्याची घंटा पण आहे कारण बाहेरील जग आपल्या संस्कृत भाषेचा, धर्म आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करत आहेत आणि आपल्या भारतात मात्र या सगळ्याबद्दल उदासीनता आहे.
>>>>

भारतात एकुणातच तत्त्वज्ञान, भाषा, राज्य शास्त्र, समाज शास्त्र या ह्युमॅनिटीज अंतर्गत येणार्‍या ज्ञानशाखांबद्दल उदासिनता आहे. केवळ हिंदू तत्त्वज्ञानाबाबत उदासीनता आणि इस्लामिक तत्त्वाज्ञानाच्या अभ्यासात प्रचंड संख्येने विद्यार्थी जात आहेत अशी परिस्थिती नाहिये. आपली देशाची आर्थिक परिस्थिती जस जशी सुधारेल तस तसे या शाखात काम करण्याचा टक्का वाढेल असे मला वाटते. तोवर ज्यात नोकर्‍या मिळतात ते शिक्षण घेण्याकडेच कल असेल. वीस वर्षापुर्वीची परिस्थिती व आजची स्थिती पाहता इंजिनीअर/मेडिकल या दोन क्षेत्रांच्या बाहेर पाहणारे विद्यार्थी अधिक दिसू लागले आहेत.

अश्या शाखांमध्ये काम करताना अभिमान असण्यापेक्षा आवड असणे अधिक गरजेचे आहे. समजा मला हिंदू धर्माचा अभिमान असेल तर मी निरपेक्षपणे हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करु शकेन का? समजा माझ्या अभ्यासातून असे समजले की हिंदू तत्वज्ञानापेक्षा अमूक एक दुसरे तत्त्वज्ञान अधिक प्रगल्भ आहे तर एक अभिमानी अभ्यासक हे बायस न आणता मांडेल की ज्यात अभिमान नाही पण आवड/प्रेम आहे तो?

धर्म - तत्वाज्ञान आदी विषयांचा अभ्यास भारतीय विश्वविद्यालयातून होत आहे. त्याला किती निधी मिळतो हा चिंतेचा प्रश्न आहे.

इस्लामिक तत्वज्ञान मदरसेमध्ये शिकवले जाते आणि तिथे बरेच विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र हिंदू धर्माच्या शिक्षण देणाऱ्या संस्था अगदी बोटावर मोजण्या इतपतच आहेत. आता असे शिक्षण या काळात घेऊन काय उपयोग, उदरनिर्वाह कसा चालविणार असा विचार करणं साहजिकच आहे. परंतु यालाही कारण आपल्या लोकांनी दाखवलेली उदासीनताच आहे. या क्षेत्रामध्ये संशोधनाच्या, नोकरीच्या संधी कधी उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत आणि म्हणून हळूहळू याकडे दुर्लक्ष होत गेले. आज शाळेमध्ये सुद्धा इतर अनेक विषय असतात परंतु भारतीय तत्वज्ञान विषयी एकही विषय शालेय अभ्यासक्रमात नाही. आणि काही गोष्टी माहीतच नसतील तर आवड तरी कशी निर्माण होणार आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होणार? आज संस्कृत फक्त प्रादेशिक भाषेतील शाळेमध्ये ८- १० मध्ये स्कोअरिंग subject एवढीच ओळख ठेऊन आहे. मात्र अनेक इंग्रजी किंवा मराठी शाळेमध्ये मात्र जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश अश्या भाषा अगदी प्राथमिक इयत्तेपासून शिकवल्या जातात. एवढेच काय तर अश्या भाषा शिकवणारे अनेक classes पण आहेत आणि ते अगदी चांगले चालतात.
आज अमेरिका, जर्मन आणि बाकी यूरोपमध्ये संस्कृत शिक्षकांची खूप गरज आहे. परंतु आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना हे ठाऊकच नाही. मी आधीच्या प्रतिसादामध्ये दिलेल्या लिंक मध्ये वाचलेत तर कळून येईल कि अमेरिकेत संस्कृत शिकवणारी बरीचशी मंडळी जर्मन आहेत. आता इथे खरंतर भारतीय जास्तीत जास्त असायला हवेत. पण करणार काय? असे ज्ञान असणारी मंडळी आपल्याकडे नाहीत आणि अश्या संधी उपलब्ध आहेत याची माहितीही आपल्याला नाही. आज जरासुद्धा शिक्षणपद्धतीत धर्म आणि तत्वज्ञान यांचे शिक्षण द्यायचे प्रयत्न सुरु करायचे झाले कि लगेच धर्मनिरपेक्षता, भगवेकरण या नावाखाली राजकारण सुरु करण्यात येते. आज बाहेरची लोकं आपल्याला 'भारतीयांनी धर्म आणि राजकारण याच्या वर जाऊन त्यांचा वारसा जपावा' असे सल्ले देत आहेत. आणि दुर्दैवाने ते खरे पण आहे. बाहेरील लोकांनी आपल्याला आपल्या ज्ञानवारसेबद्दल असे सल्ले देणं हाच आपला मोठा अपमान आहे. इंग्रजाळलेल्या आपल्या शिक्षण पद्धतीत आपल्या वारश्याबद्दल माहिती देणारे शिक्षण बालवयात उपलब्ध नाही त्यामुळे आवड नाही, लोकांचा कल नाही, त्यामुळे या क्षेत्रात रोजगार नाही आणि त्यामुळे या सगळ्याकडे अजूनच दुर्लक्ष झाले असे हे दुष्टचक्र आहे.

समजा मला हिंदू धर्माचा अभिमान असेल तर मी निरपेक्षपणे हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करु शकेन का? ---> नक्कीच. तसे करता न आल्यास तो दुराभिमान असेल अभिमान नाही. अभिमान हा अभ्यासातून, शिकवणुकीतून, ज्ञानातून येतो आणि मुळातच भारतीय तत्वज्ञानाची शिकवणच 'वसुधैव कुटुंबकम' अशी आहे. सर्व धर्म, पंथ, मते यांचा आदर करणारी आहे.
आता आपल्यापैकी सर्वांनाच मराठी भाषेचा अभिमान आहे परंतु याचा अर्थ असा नाही कि आपण हिंदी किंवा इंग्रजी भाषा शिकतच नाही.

हेला आणि उपाशी बोका दोघांना +१

अतुल ठाकूर यांचा सांस्कृतिक भांडवल, भाषा आणि असमानता हा लेख आठवला. कोणीही कधीच फारशी वापरत नसलेल्या भाषेच्या जोरावर विकसीत देशात कामाच्या संधी उपलब्ध करायचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत Angry

व्यंकोजीराजेंनी पोथ्या पुस्तके संग्रहीत करून ठेवली होती. आता डिजिटल स्वरुपात साठवत आहेत.
जोपासना आणि वाचकांना उपलब्ध करून देणे हा विषय आहे. त्यात काय लिहिलं आहे ते बरोबर का चूक प्रश्न नाही. जोपासना.
--
पाऊस पडावा म्हणून काय इन्द्र,वरुणाची स्तुती आहे/ होती ती जाणून घेणे वेगळे आणि असा काय पाऊस पडतो का यावर विश्वास असणे /नसणे वेगळे.
---
इतर धर्मग्रंथांत दिलेल्या चमत्कारांवर विश्वास ठेवणारे त्यांचे अनुनायी आहेत आणि विरोधकही आहेत.
----
इकडे हे नको म्हणणारे वास्तुपुजा करतातच ना?
पण तेव्हा का टाळत नाहीत?
------
स्वर्ग /नरक कल्पना न सांगणारे धर्म किती? खरेपणा कोणी पाहिला आहे?

अगदि स्तुत्य उपक्रम, एक कॉमन रिपाझटरी बिल्ड करण्याच्या दृष्टिकोनातुन. वर मथळ्यात दिलेला उद्देश आणि हे काम कसं आणि का सुरु केलं हे या वेबसाइटच्याच हिस्टरी टॅबवर असुन देखील इथे लोकांना आतापासुन रोजगार निर्माण होणार्/नाहि होणार याची चिंता का बरं ग्रासायला लागली?

"इफ यु बिल्ड, दे विल कम", या बिझनेस मॅनेजमेंटच्या उक्तिनुसार या रोपट्याचा पुढे भविष्यात वृक्ष होउ शकतो...

रिसर्च हा अप्लाईड असतोच असं नाही.
फक्त कुतुहल म्हणून तुम्हाला कोणाला काही शोधावसं वाटत नाही का? नसेल वाटत तर दुसरं कोणी ते करुच नये असं का वाटतं? १०,००० वर्षांपुर्वी पृथ्वी कशी होती? माणसं कशी होती? त्यात कसे बदल झाले? हे ग्रंथ कधी लिहिले, त्यात कोणी कसे बदल केले असू शकतील? महाभारतात काय मूळ आहे आणि काय नंतर घुसडलं असेल? यावरची विविध अभ्यासकांची मतं वाचायला किती मजा येते!
हिंदुत्त्ववादी/ धर्मवेडे/ उजवे लोक याचा वापर माथी भडकवण्यासाठी करतीलच (हा धागा ही त्याच उद्देशाने आहे असं धागाकर्त्याच्या नंतरच्या पोस्ट वाचून मला वाटतं आहे) पण मूळ साईट वर मला तो उद्देश दिसला नाही.
आपल्या देशात लिहिलेले ग्रंथ/ इतिहास जतन करुन सहज अ‍ॅक्सेसिबल जर कोणी करत असेल तर ते किती फायदेशीर आहे! लिहिताना पटकन एखाद्या गीतेतल्या श्लोकाचा संदर्भ द्यायचा असेल तर ते सहजसाध्य होईल की!
एखादी उर्दु गझल ऐकली की अनेकदा ढिम्म कळत नाही, ते आंतरजालावर शोधून वाचायला मला आवडतं, आणि जे सहज मिळतं ही. तसंच संस्कृत श्लोकांचं होतं असेल तर त्यात वाईट काय असेल?
त्यात जे लिहिलं आहे त्यावर विश्वास बिलकुल ठेवू नका. पण काय आहे ते वाचायला मिळत असेल तर चांगलंच आहे की.
आणि आयआयटी ने का करु नये? ह्युमॅनेटरीअन अँड सोशल सायन्स अख्खं डिपार्टमेंट आहे आणि त्याचे दोन कोर्स घ्यायचे असतात प्रत्येकाला.
शाळा कॉलेजात जे शिकतो त्या सगळ्याचा डायरेक्टली वापर पैसे मिळवायला कशाला झाला पाहिजे?

जोपासना आणि वाचकांना उपलब्ध करून देणे हा विषय आहे. त्यात काय लिहिलं आहे ते बरोबर का चूक प्रश्न नाही. जोपासना. >>>
"इफ यु बिल्ड, दे विल कम", या बिझनेस मॅनेजमेंटच्या उक्तिनुसार या रोपट्याचा पुढे भविष्यात वृक्ष होउ शकतो... >>>
एखादी उर्दु गझल ऐकली की अनेकदा ढिम्म कळत नाही, ते आंतरजालावर शोधून वाचायला मला आवडतं, आणि जे सहज मिळतं ही. तसंच संस्कृत श्लोकांचं होतं असेल तर त्यात वाईट काय असेल? >>> +१

राघोभरारी, तुमच्या पोस्ट्स फारशा पटल्या नाहीत. प्रश्नांचा रोख हे संकलन का करावे असा नसून आयआयटीने का करावे असा आहे. एखाद्या Institute of Indian Languages अशा संस्थेने हे संकलन करणे हे त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात सहज बसते. जी उदाहरणे तुम्ही दिली आहेत ती सर्व विद्यापीठे किंवा विशिष्ठ संस्थांची आहेत.
जर आयआयटीचे काम केवळ संकलनाच्या पातळीवर राहणार असेल तर माझीही थोडी निराशा होईल.
केवळ संस्कृत ग्रंथांच्या पीडिएफ आवृत्त्या काढणे म्हणजे ज्ञान उपलब्ध करून देणे नव्हे. It is just information and not knowledge.
रोजगाराचा मुद्दा फारसा रेलेव्हंट वाटला नाही. Every field has its own employability index. That may or may not not relate to the popularity of the subject matter.

संकलन आणि सहज उपलब्धी हाच उद्देश आहे. क्लाउड सोर्सिंग मधून तुम्हाला तुमचं इंटरप्रिटेशन द्यायचं असेल तरी लॉगिन करून करता येईल असं वाचलेलं आठवतंय.
1. Create a repository of Indian philosophical texts on the Internet, and to make these freely available to whoever is interested.
2. Create tools as well as a process that will make the putting up of such texts on the web simple.
3. Explore the different ways in which the content can be presented, in order to enhance the study of these texts

अमितव, धन्यवाद!
जर रेख्ता च्या धर्तीवर संस्कृतसाठी कोणी वेबसाईट तयार करणार असेल तर मला फार फार आनंद वाटेल! आणि अर्थातच सर्व प्रकारची यथाशक्ती मदत करायला आवडेल!

<मात्र अनेक इंग्रजी किंवा मराठी शाळेमध्ये मात्र जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश अश्या भाषा अगदी प्राथमिक इयत्तेपासून शिकवल्या जातात.> खरंच की काय?
माझ्या पाहण्यात तरी (महाराष्ट्र बोर्ड) आठवीपासूनच या भाषातली एखादी निवडता येते, संस्कृतप्रमाणेच.
नवोदय विद्यालयांत पाचवी सहावीपासून तिसरी भाषा म्हणून विदेशी भाषा निवडता येत असे.

http://www.sanskrit.nic.in/about_us.php

अतिशय सुंदर साईट आहे. इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

Iit कानपुरचेही आभार की त्यांनी हा मौल्यवान खजिना नेटवर आणला.

मस्त आहे वेबसाईट! माझ्या मनात पण अशी वेबसाईट असावी असे होते. फक्त यात अजून एक फिचर हवे. श्लोकाच्या संपूर्ण अर्थासोबतच प्रत्येक शब्दावर क्लिक केले की त्याचा अर्थ पण यायला हवा. >>

सहमत. मी अजून पूर्ण साईट पाहिली नाही पण कुठेतरी प्रतिसाद द्यायची सोय असेल. तिथे आपण लिहू शकतो.

एखाद्या Institute of Indian Languages अशा संस्थेने हे संकलन करणे हे त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात सहज बसते.>>>>

याच्याशीही सहमत. पण त्यांच्याकडे साधने नसावीत, आयआयटीकडे असावीत. यांनी आता संकलन करून दिले आहेच तर भाषाविषयक संस्थानी पुढे येऊन बाकीचे काम करावे.

तिथे सात आठ भाषांतरे दिलेली आहेत पण अजून ती।उपलब्ध नाहीत. भाषा विषयक संस्था हे काम करू शकतात. इच्छा हवी म्हणजे मार्ग निघतात.

कोणीही कधीच फारशी वापरत नसलेल्या भाषेच्या जोरावर विकसीत देशात कामाच्या संधी उपलब्ध करायचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत Angry>>>>>

हे संस्कृतच्या संदर्भात बोलत आहात का? चीन मध्ये संस्कृत ही भाषा शिकण्याची संधी मुलांना मिळते व मुले ती संधी घेताहेत. माझ्या मुलीच्या संपर्कात तिच्याच वयाचा एक चिनी मुलगा होता जो संस्कृत शिकत होता. त्याला वाटले हिलाही संस्कृत येत असणार. पण मुलगी शाळेत जेवढे शिकलेली तेवढेच तिला येत होते. त्याचे संस्कृत ऐकून तिला मनोमन लाज वाटली.

साइट चांगली आहे. घरून एक्स्प्लोअर करीन.

भगवत्गीता व जर्मतीत डेवलप झालेले एस ए पी इआर पी सॉफ्ट वेअर ह्यात मला खूप साम्य आढ्ळले आहे. म्हणजे एस ए पी मास्टर करताना गीतेतील सूचना कामी येतात.

मला आव ड्ते संस्कृत भाषा. मोडकी तोडकी येते पण. ह्या साइटचा उपयोग होईल अभ्यास करायला. दहावी परेन्त शिकले आहे मी संस्कृत.

{Create a repository of Indian philosophical texts on the Internet, and to make these freely available to whoever is interested.}
हा उद्देश आवडला. या गोष्टी नेटवर उपलब्ध असतीलही. पण त्यांच्या authenticity बद्दल खात्री नसते.

हे संकेतस्थळ भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल आहे, कर्मकांडाबद्दल नसावं. त्यामुळे त्याबद्दलचा त्रागा अस्थानी आहे.

संस्क्रुत भाषा आता व्यवहारात वापरात नसली तरी तीतलं वाङ्मय आणि तत्त्वज्ञान यांच्यासाठी वाचक आणि अभ्यासक नक्कीच आहेत.

{Create a repository of Indian philosophical texts on the Internet, and to make these freely available to whoever is interested.} इतका स्वच्छ उद्देश आहे. बाकी त्रागा मूर्ख व अस्थानी आहे. ज्ञानजतन आणि संवर्धन करणे हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाचे लक्षण आहे. नाहीतर मोल्सवर्थ शब्दकोश युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या संस्थळावर कशाला सापडला असता? त्यांना काय गरज आहे? सांस्कृतिक भांडवल हे काही फक्त पगार मिळवायला वापरलं जाऊ शकत नाही, जाऊही नये. अत्यंत संकुचित आणि अनाठायी असा हा विचार आहे.

प्रश्नांचा रोख हे संकलन का करावे असा नसून आयआयटीने का करावे असा आहे. >>> हेही अगदी चुकीचं. कुठल्याही जागतिक विश्वविद्यापीठात फक्त एका क्षेत्रात संशोधन होत नाही. तेथील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत वाव मिळायलाच हवा. वर टवण्यांनी म्हटल्याप्रमाणे इंजिनीयरिंग आणि मेडिकल ह्या क्षेत्राबाहेर पडणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्या प्रवृत्तींना वाव मिळायला हवा.

अमितव, तुझा प्रतिसाद वाचताना बर्‍याच ठिकाणी अगदी अगदी झालं.

राघोभरारी, तुमच्या अनेक मुद्द्यांशी सहमत नाही. शिक्षणपद्धतीपासून धर्म दूरच राहिलेला बरा आहे. टवणे सरांचा प्रतिसाद ह्या बाबतीत उल्लेखनीय आहे. तुम्ही ही लिंक देऊन चांगले काम केलेत. पण ज्ञानसंकलन आणि अभ्यास व धार्मिक शिक्षण ह्या सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत.

अगदी अलीकडेच माझ्या ध्यानात आलं, की प्राचीन हिंदू व बौद्ध तत्त्वज्ञानाच्या काही ग्रंथांत जे विचार आहेत, ते जणू हायर कॅटेगरी थिअरी ह्या अमूर्त गणिताच्या शाखेचे पूर्वज आहेत. आता ह्याचा अर्थ त्यांनी काही सिद्धता दिल्या होत्या वगैरे अजिबात होत नाही, पण काही विचार तरी तसे होते हे नक्की. हे सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. आता एका बाजूचे लोक 'म्हणजे त्यांना हे सगळं आधीच माहिती होतं' म्हणणार, तर दुसर्‍या बाजूचे लोक 'असं काही नव्हतंच मुळी' हे म्हणत बसणार. त्यामुळे ह्यावर लिहायची काही सोय नाही. परंतु ज्ञान संकलित असेल, तर कमीत कमी माझ्यासारख्याला अश्या गोष्टींची जाणीव होण्यातलं तरी समाधान मिळेल, हे नक्की. त्यातून ते आंतर्जालावर चांगल्या प्रकारे साठवलं असेल, तर अभ्यासकाला त्यातून नक्कीच चांगलं काहीतरी मिळेल.

भा, आयआयटी हे विश्वविद्यापीठ आहे का? AFAIK, IIT is not a university. It's institute of technology. मला या उपक्रमाला आयआयटीने तांत्रिक मदत केली इथवर ठिक वाटते. पण या धर्तीचे उपक्रम राबवायला वेगळी संस्था हवी (जी कागदोपत्री असेलही पण तिची तेवढी क्षमता पण हवी. संस्था सरकारीच हवी असेही नाही.
IMHO, IIT can rather focus on the technological aspect of linguistics.

भरत, अरे वा! मला माहित नव्हते की आयआयटी पवईमध्ये humanities department सुरू झाले आहे. सगळ्याच आयआयटींची विद्यापीठ बनण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे बहुतेक.. चांगली गोष्ट आहे!

Pages