शिवभक्त?

Submitted by प्रतिक सोमवंशी on 1 May, 2019 - 08:44

राजे माफ कराल, पण तुम्हाला भेटायच राहूनच गेल... अहो तिथ शिवभक्तीचा माज दाखवायच्या नादात असलेल्या त्या गर्दीत, तुम्ही कुठ दिसलेच नाही.
__________________
नाही जमल आम्हाला...
आमची शिवभक्ती नाही गाठू शकली त्या सीमा, ज्या तानाजी, बाजीने, स्वतःच्या रक्ताने तयार केलत्या, स्वतःच्या रक्ताने इतिहास लिहिला होता आम्ही फक्त तो पुस्तकात वाचतो
“डोक्यावर चंद्रकोर लावून राजे, कुणी शिवभक्त होत असत का?”
________________________
राजे तुमचा एक वीर हत्तीला हरवत होता, एक मावळा हजार यमनांना पुरून उरत होता, इथं गर्जना करून घसा आणि नाचून नाचून अंग दुखायला लागलंय.
“मिरवणुकीत नाचून राजे, कुणी शिवभक्त होत असत का?”
________________________
राजे अहो तुमच स्टेटस तर त्या मावळ्यांनी जपल होत, आम्ही तर फक्त काल तिन्हीसांजेपासूनच तुमच्यावरच्या गाण्यांनी आणि फोटो नि सगळे व्हाट्सपचे ग्रुप आणि स्टेटस भरून टाकले. अहो तुमचा इतिहास देखील आम्हाला पूर्ण माहीत नाही,
“व्हाट्सप ला स्टेटस टाकून राजे, कुणी शिवभक्त होत असत का?”
________________________
राजे तुम्ही जिंकलेल्या किल्ल्यांच्या भिंतीवर देखील आमच्या प्रेमवीरांनी त्यांची नावे कोरून ठेवलीयत, त्याच गडाच्या पायथ्याशी आता पार्ट्या करत असतात, शिवजयंतीला काय तो किल्ला सजवत असतात
“आता किल्ल्यावर ट्रेकिंगला गेल म्हणजे राजे, कुणी शिवभक्त होत असत का?”
________________________
राजे तुमचा इतिहास सांगणारे खूप येतात कार्यक्रमाला, स्वतःला 'शिवश्री' म्हणून भूषवतात, अरे श्री म्हणजे मालक आणि शिवाजीचे मालक म्हणवून घ्यायला यांनी लाजा गहाण टाकल्यात का असा प्रश्न पडतो.
“आता नुसता इतिहास वाचून दाखवला म्हणून राजे, कुणी शिवभक्त होत असत का?”
________________________
तुमचे फोटो आणि नंबर प्लेट असणाऱ्या गाड्या दारूच्या अड्ड्यासमोर उभ्या असतात, दंगलीतही सापडतात, त्या गाडीवरची धूळ पुसायची तसदी सुद्धा कुणी घेत नाही
“तुम्ही सांगा राजे गाडीवर तुमचा फोटो लावला म्हणून कुणी शिवभक्त होत असत का?”
________________________
जर कपाळावर चंद्रकोर, कानात बाळी, वाढलेली दाढी या आधारावर जर कुणी शिवभक्त होत असेल ना तर मी नाही शिवभक्त सर्वप्रथम माझा कडेलोट करा.
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users