फिके चांदणे धूसर वाटा रात वेगळी आहे - (लवंगलता)

Submitted by माउ on 16 April, 2019 - 09:21

फिके चांदणे धूसर वाटा रात वेगळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे

चंद्र ठिबकतो पाण्यावरती स्वप्न जागते काठी
जुळवित बसतो वेडा कोणी नि:शब्दाच्या गाठी
पणती होउन आस तेवते मंद देवळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..

कोरत येते देहावरती आठवणींच्या रेषा
रात्र पोचते डोळ्यांमधुनी स्पर्शफुलांच्या देशा
तिथे ओठ ओठांवर जुळती मिठी मोकळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..

जाणवते ना श्वासांनाही भास कुठेसा होतो
झ-यासारखा वाहत वारा तुझ्यापासुनी येतो
नकोस छेडू श्वासांना तू लाज कोवळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..

तळे पाहते रातकणांना टिपून घेते सारे
आकाशावर तलम परांनी रेखुन देते तारे
ता -यांना धूसर मेघाची ओढ आगळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..

-रसिका

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त. खूप प्रसिद्ध कवीनं केली असावी असे वाटले इतकी सुंदर उतरलीय. सरस्वती प्रसन्न आहे हो तुमच्यावर.

शब्द कमी पडताहेत व्यक्त व्हायला...पण एक नक्की आजच्या दिवसाची सुरवात एका अप्रतिम कवितेने झाली.

खूप खूप आभार!
लवंगलता व्रुत्ताची अंगभूत लय खूप सुंदर आहे...

कोमल परांनी समजलं नाही. परांनी म्हणजे?>

तळे चंदेरी रातकण टिपून घेते आणि पाण्याच्या परांनी (पिसांनी) आकाशावर तारे रेखते..असे काहीसे...
प्रेरणा: Van Gogh- the starry nights

Pages