दाल - बाटी_ सोपी_सविस्तर

Submitted by किल्ली on 30 March, 2019 - 13:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाटी साठी साहित्यः
- गव्हाचं पीठ (६ पोळ्यांचं)
[नेहमी घरी पोळ्यांसाठी वापरतो ते पीठ घेतलं तरी चालेल, आपल्याला सोप्या पद्धतीने जास्त ताण न घेता रेसीपी बनवावयाची आहे. त्यामुळी पीठ मुळी जाडच पाहिजे, बारिक नको, रवाच पाहिजे अशा कही अटी नाहीत. साधी , सरळ सोपी भोळी भाबडी रेसीपी आहे. ]
- मक्याचं पीठ ( एका पोळीचं) (हे ऐच्छिक आहे, नसले तरी चालते)
- जीरे ( चवीनुसार, साधारण २ लहान चमचे भरून भेसळ मुक्त जीरे )
[मी कधी कधी जीरे, मोहरी, मेथी दाणे एकत्र करून ठेवते. ते तसे येथे चालणार नव्हते, मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती शोधाव्या लागल्या असत्या. उपासासाठी वेगळ्या बरणीत साठवून ठेवलेले जीरे घ्यावेत, त्यात मोहरीची भेसळ नसते. ]
- ओवा ( चवीनुसार, साधारण २ लहान चमचे भरून)
- पिवळीधम्मक हळद (चवीनुसार, रंगानुसार)
- तेल किंवा तूप (शुद्ध साजूक तूप घ्यावे, उगाच कंजूसपणा करू नये)
- पिण्यायोग्य पाणी ( सामान्य तापमानाचे )
- खाण्याचा सोडा चिमूटभर

दाळ/दाल/वरण साठी साहित्यः
- तूरडाळ (घ्या तुमच्या हिशोबाने, २-३ वाट्या)
- कांदा १
- टमाटं १
- लसणाच्या सोललेल्या ६-७ पाकळ्या (देशी लसूण वापरावा मिळाला तर, छान स्वाद आणि सुगंध येतो)
- कढीपत्याची ५-६ पाने चुरडून
(ऐच्छिक आहे, उपलब्धता असेल तर ही चैन करता येते. नाहीतर कोथिम्बीर आहेच आपली बिचारी)
- फोडणीसाठी तेल
- मोहरी (चिमुटभर, भेसळ युक्त मोहरी चालेल, त्या निमितानी जीरे आणि मेथीदाणे पोटात जातात, पौष्टिक असतात)
- लाल तिखट पुड ( चवीनुसार, रंग जास्त आणि तिखटपणा कमी असणारी पुड वापरा)
- मीठ (चवीनुसार -आयोडिन नमक)
- धणेपुड ( चवीनुसार- चिमुटभर)

dalbati 1.jpg

क्रमवार पाककृती: 

ही रेसीपी अगदी घरी नेहमी उपलब्ध असणार्‍या जिन्नासांचा वापर करून बनवता येते. जास्त उपद्व्याप करायला नकोत आणि घरच्या घरी इच्छा झाली की कमी वेळात आणि आहे त्या साहित्यात (आपल्याच कथा/कविता, जाऊदेत पांचट जोक!) बनवून खाता यावी हा सरळ साधा उद्देश आहे. हे ऑथेंटिक राजस्थानी वगैरे प्रकरण नाही. मनात भाव मात्र राजस्थानी कुझीन बनवत आहोत आणि निगडीला जाण्यायेण्याचे पैसे, आपला नम्बर कधी येइल ह्या गोष्टीची वाट पाहण्याचे कष्ट वाचवत आहोत असेच असावेत. तरच ही पाकृ चविष्ट होते. नाकं मुरडून केलीत तर तो नकारात्मक भाव व बोर चव अन्नात उतरते. [ म्हणा, मी दालबाटी करून खाणारच!]

चला आता नेमकं करायचं काय ते बघुया का?

१. कुकर मध्ये एका डब्यात धुतलेली तुरडाळ, त्यात थोडसं पाणी ( ही स्टेप का लिहीतेय मी? असो) , किंचित हळद, घालून शिजण्यास ( कुकर स्वतः वरण शिजवतो, आपण शिट्ट्या मोजायच्या) ठेवावी. ही डाळ चांगली शिजावी म्हणून कुकरला नेहमीपेक्षा १-२ शिट्ट्या जास्त द्याव्यात.
येथे तुम्ही डाळ शिजवतानाच त्यात टमाटं घालु शकता. त्याचे चार भाग करून तेही डब्यात ढकलून द्यावे.
२. डाळ शिजेपर्यन्त आपण बाटीसाठी कणिक मळून घेऊ.
बाटीसाठी लागणारे सर्व जिन्नस एका टोपात किंवा परातीत एकत्र मिसळून घ्यावे.
३. तूप गरम करून घ्यावे. हे तूपाचं(साधारण 1 छोटी वाटी) मोहन कणकेत घालून आणि पाणी घालून चांगले एकजीव करून मळून घ्या. कणिक पोळ्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडी घट्ट भिजवायची आहे. ( पण कणकेचा दगड नको)
४. कुकर झालय का ते पाहा. आच बंद करा.
५. बाट्या बनवण्यासाठी कणकेचा रोल बनवावा लागेल. त्यासाठी तो चपटा करून गुंडाळी करावी. ( फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे)
हा रोल छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यावा.
[हे स्टेप ऐच्छिक आहे. तुम्ही सरळ पीठाचे गोल गोळे बनवून त्या गोळ्यांना बाट्या असं म्हणू शकता]

dalbati 22.jpgdalbati 2.jpg

६. बाट्या कुकरच्या डब्यात ठेवुन वाफवुन घ्याव्यात.
[स्टीमर असेल तर तो वापरावा. नसेल तर, आधी वापरलेले कुकर थंड झाले आहे ह्याची खात्री करून डाळीचा डब्बा बाजुला काढुन (ह्या स्टेप ला लगोलग डाळ घोटुन ठेवलीत तर उत्तम!) तेच कुकर वापरावे. डब्बा दुसरा घ्यावा. मी काय केले असेल? माझ्याकडे २ कुकर आहेत Proud मी वाफवण्यासाठी दुसरा कुकर घेतला. Happy ]

dalbati3.jpg

७. वाफवलेल्या बाट्या शुद्ध साजूक तुपामध्ये किंवा तेलामध्ये खरपूस तळून घ्याव्यात. ( क्रिस्पी/ कुरकुरीत झाल्या तरच पाकृ यशस्वी. )
[तुमच्याकदे मावे असेल तर त्यात ह्या बाट्या बेक करून घ्या. माझ्याकडे नाहीये, मला माहित नाही मावेत कसं करायच ते]

दाल/डाळ:
१. फोडणीसाठी तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडली की जिरे घाला. जिरे लाल झाले की ठेचलेल्या लसणीच्या ३-४ पाकळ्या, कढीपत्याची चुरडलेली पाने घाला.
२. लसूण परतला की त्यात मघाशी (शिजलेल्या टमाट्यासहित) घोटुन ठेवलेली डाळ घाला. पण जरा जपुन हा, गरम तेल हातावर उडण्याची शक्यता असते, बेतानेच करावे हे काम!
३. डाळ पळीने हलवुन घ्या. मिक्स झाली की त्यात मीठ, तिखट, धणेपुड घालुन एकजीव होइल अस हलवुन घ्या.
४. थोडेसे पिण्यायोग्य पाणी घाला, २-३ लसणीच्या अख्ख्या पाकळ्या घाला आणि खळखळून उकळी आली की आच बंद करा

अरेच्चा! हे तर नेहमी करतो तसे फोडणीचे वरण! [हे असं ह्यावेळी म्हणायच नाही, दाल/डाळ असच म्हणायच. कारण आपण वरण भात नाही तर दाल बाटी खाणार आहोत म्हणून!]

बारिक चिरलेला कान्दा/कोथिम्बीर, लिम्बाची फोड आणि एका वाटीत (हो हो वाटीत आणि हो , माझ्या फोटोत तुपाची वाटी शोधु नये) साजुक तुपाबरोबर सर्व्ह करा

dalbati4.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

१. ही साधी काढीव पाकृ आहे, तरीही चवीला उत्तम होते.
२. मावे मध्ये बाट्या बेक केल्या तर आणखी फास्ट होईल.
३. चिरोट्याला रोल करून वळकटी बनवतो तसं करुन वाफवलं तर मस्त लेअर्स पडतात.
४. इडली पात्रात सुद्धा बाट्या वाफवता येतात. प्रत्येक इडलीच्या खाचेत बाटे ठेवुन द्यायची
५. तुपात तळली तर जास्त चवदार होते. घरी कढवलेलं साजुक तुप वापरता आलं तर भारीच!
६. ह्या बाट्या नुसत्या सुद्धा छान खमंग लागतात चवीला, खाऊन बघा एखादी.
७. उरल्या तर पाकृ अयशस्वी असं समजु नका, एखाद्या चाळनीने झाकुन ठेवा म्हणजे वातड होणार नाहीत आणि नन्तर खाऊन संपवा

आधीचे दाल-बाटी चे धागे:
राजस्थानी दाल बाटी: https://www.maayboli.com/node/51439, मानुषी, २०१४ (पाकृ)
दाल बाटी (फोटोसहित): https://www.maayboli.com/node/43986, डीडी, २०१३ (पाकृ)
एयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल: https://www.maayboli.com/node/67143, आ.रा.रा. , २०१८, (पाकृ)
परमहंसांची दाल-बाटी: शाली , https://www.maayboli.com/node/66161, २०१८ (लेख)
दाल-बाफले ,रविवारचा "स्पेशल"मेनू: सुलेखा, https://www.maayboli.com/node/39682, २०१२, )पाकृ)

माहितीचा स्रोत: 
बालमैत्रिण - शिवानी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाव टिस्पुन बेकिन्ग पावडर घातली तर छान हलक्या होतिल बाटया, बाट्याची कणीक नसेल तर रवा मिसळावाच त्याने बाटी खुसखुशित होते, बाट्या उरल्या तर मिक्सर माधुन काढाव्या आणी गुळ-तुप किवा साखर तुप घालुन लाडु वळावे छान चविचे लाडु होतील मुळ क्रुतित ओवा मात्र वगळावा लागेल.

प्राजक्ता, तुप साखर घालुन करतात त्यालाच चुरमा म्हणतात. हा दाल बाटीबरोबर असतोच. पण दालबाटी हॉटेल, ढाब्यांवर मिळायला लागल्यापासुन चुरमा ऐच्छीक झाला व बरेचजण तो ट्राय देखील करत नाहीत.

दालमध्ये किमान तिन डाळी हव्यातच. बाटी बनवणे तसं जरा ट्रिकी आहे. पुपो करताना पुरन भरुन हळुहळू उंडा बंद करतो तसेच पुरन न भरता बाटी आतुन किंचीत हॉलो केली की भाजल्यावर छान खुसखुशीत होते.

बाटी डिशमध्ये ठेऊन त्यावर वड्यावर सांबार ओतावे तसे दाल घालून सर्व्ह करायचा पदार्थ नाही हा. कुणी प्रेमाने ताटात बाटी अगदी बारीक चुरून द्यावी, त्यावर दाल घालावी व आग्रहाने भरपुर तुप वाढावे तेंव्हा खरी दाल-बाटीची चव खुलते.

हा निगुतीने करुन कौतूकाने खायचा पदार्थ आहे. Happy

प्रत्यक्ष कृतीपेक्षा लिहिलेली कृती खूपच जास्त सविस्तर आणि चविष्ट Wink वाटतेय.
लेखनात हंशा आणि टाळ्यांसारखं अवांतर प्रतिसादांसाठी कुठे जागा घ्यायच्या हे तुम्हांला बरोबर समजलेलं आहे. पण सावध. ही वाट ऋन्मार्गाकडे जाते.
बाट्यांचं रूप आवडलेलं नसलं, तरी तुमच्या कल्पकतेला दाद.
तुपाचं मोहन किती घाला यचं ते लिहिलेलं नाही. जर या कृतीने लोकांनी दालबाटी करू न पहावी म्हणून ती लिहिली असेल, तर ते मस्ट आहे.
तुम्ही प्रतिसाद खेळकरपणे घेता, म्हणून हे सगळं लिहिलंय.

दाल बाफल्यांची ही आणखी एक रेसिपी
https://www.maayboli.com/node/39682

छान लिखाण,
इतक्या इलॅबोरेट पाकृ तुम्ही करता या बद्दल कौतुक वाटते

मस्त खुसखुशीत झालीय पाककृती.
आई असंच बनवायची.फक्त ती कापलेल्या रोल तुकड्याना ला चप्पट करून तुपावर तव्यात झाकण घालून परतायची.या अश्या बट्ट्या एकदम मस्त खारी कणिक कुकीज बनतात.
मुख्य म्हणजे तू कोणत्याही अटी न घालता लवचिक पाककृती बनवली आहेस त्यामुळे करायला मजा येईल ☺️☺️कस्टमायझेशन इज की टू बेटर युजर एक्सपिरियन्स(प्रेझेंटेशन आणि ट्युटोरियल ऐकणे कमी केले पाहिजे)

छान.लिखाणाची शैली आवडली.
रच्याकने ते सविस्तर वगैरे लिहिता त्यामागे कही खास कारण?
बालुशाही सविस्तर / डालबाटी सविस्तर Light 1

धन्यवाद आसा, देवकी, Srd Happy
@ शाली:
तुम्ही म्हणता ते सगळे बरोबर आहे. पण वरती दिलेली पाकृ शोर्ट्कट/ काढीव प्रकरण आहे.. दाल बाटी खुप छान प्रकारे करता / खाता येते हे मान्यच आहे
@ भरतः
एकदा खरंच करून बघा, ह्या कृतीने.. आणि रीव्यु द्या Happy Proud
तुपाचं मोहन किती घाला यचं >>> लिहीलं आहे, तुम्ही सांगितल्यानन्तर.. राहुन गेलं होतं
बाट्यांचं रूप आवडलेलं नसलं>>>रूप नको गुण पाहा
@ मी अनु:
कोणत्याही अटी न घालता लवचिक पाककृती बनवली आहेस>> मुदामच केल आहे असं.. वीकडे ला हापिसातनं घरी आल्यानन्तर करता येइल अशी पाकृ देणे हा मुख्य उद्देश होता..
@ दिपिका :
रुप कसंही असो<< रूप नको गुण पाहा
@ देवकी:
रच्याकने ते सविस्तर वगैरे लिहिता त्यामागे कही खास कारण?>> गुपित आहे Lol

छान लिहिली आहे दाल बाटी.
साधी , सरळ सोपी भोळी भाबडी रेसीपी >>>गूड वन Happy

@ दिपिका :
रुप कसंही असो<< रूप नको गुण पाहा<<मीही त्याच अर्थाने लिहिले आहे Uhoh

दीपिका,
हो न, मी फक्त सहमती दर्शवली Happy
रूप नको गुण पहा ह्या नावाचा धडा होता बालभारतीमध्ये ते आठवलं

चांगली लिहिलीयेस ! आवडली Happy
माझ्या फोटोत तुपाची वाटी शोधु नये>> बरणी शोधली आम्ही .. Proud
तडकलेल्या , खाचा मारलेल्या ,आणि जळालेल्या(खरंतर खरपूस भाजलेल्या ) बाट्या पाहिल्या आहेत . त्या मानाने तुझ्या जरा नाजूक आणि सोज्वळ दिसतायत Happy
मी खूप ऐकलंय पण कधीच खाल्ला नाहीये हा पदार्थ Sad Uhoh
कडक असतात कि ठिसूळ आणि खुसखुशीत ?

धन्यवाद अंजली Happy
नेक काम मे देरी क्यो... करून बघा.. इतर कोणी कुकर लावलं असेल तर अर्ध काम झालेलं आहे असं समजून उर्वरित बट्या करायला घ्या.. चालतं Happy
क्रची आणि क्रिस्पी असतात बट्या.. रामदेव हॉटेल मधल्या मऊ असतात

किल्ली, पि सौ ला ब्रँड फॅक्टरी च्या आसपास एक टेम्पररी दिसणारे राजस्थानी हॉटेल आहे.तेथेही बट्ट्या ओके मिळतात
रामदेव बाबा ढाबा शी बरोबरी नाही.
आम्हाला रामदेव बाबा मधल्या टेनिस बॉल साईझ बाटी वरणात कुस्करता येत नाहीत नीट.आजूबाजूला पब्लिक मजेत खात असते त्या.आम्ही दर वेळी 3 टेनिस बॉल घरी आणतो.रामदेवबाबाचे नवरतन दाल बाफले खाता येतात आणि आवडतात.(आता जाऊन 3 वर्षे झाली असतील.)

बाटी वरणात नाही कुस्करायची.
नुसती बाटी ताटातच कुस्करायची . आणि त्यावर वरण घालून कालवून खायचं वरणभातासारखं.

बाटी वरणात नाही कुस्करायची. नुसती बाटी ताटातच कुस्करायची . आणि त्यावर वरण घालून कालवून खायचं वरणभातासारखं. +११११
तुपही ओतायचं
टेनिस बॉल>> Lol
3 वर्षे झाली असतील>> Uhoh
रामदेव बाबा ढाबा >>> ते लोक भट्टीत मातीचं भाडं , त्यात देसी घी आणि त्यात बाटी चे गोळे असं ठेवुन व्यवस्थित भाजतात.. छान तर होणारच! वरचं आवरण क्रिस्पी आणि आत मऊ/पोकळ अशा त्या बाट्या असतात.. Happy
आज एकादशी आहे मला, आता अजुन जास्त वर्णन करणं जमणार नाही Proud

ट्रान्सपोर्ट नगर निगडी
पुणे शहराकडून जुन्या मुंबई पुणे हायवे वरून निगडीकडे येताना भक्ती शक्ती चौक नंतरचे डावीकडचे वळण(जीपीएस लावून जा मी पत्ते चुकवते)
खूप जुना गंजलेला वाटणारा रस्ता आणि भरपूर ट्रक दिसतील.तिथेच 1 किमी जाऊन उजवीकडे.
गुरुवार शनिवार रविवार साडेआठ नंतर गर्दी असते.
अंबियन्स कॉलेज मेस सारखा आहे.ओव्हर हाईपड वाटल्यास प्रतिसाद लेखक जबाबदार राहणार नाही ☺️☺️

Happy ओके अनु! मी दालबाट्या कधीच खाल्ल्या नाहीयेत. माझी धाव वरणफळांपर्यंतच! ही रामदेवबाबा ढाब्याची प्रसिद्ध असेल तर ती आधी खाऊन बघते आणि नंतर किल्लीची सोपी आणि सविस्तर रेसिपी करून बघते Happy
राजधानी रेस्टॉरंटमधे देतात तो चुरमा असतो का वर कुणी तरी लिहिलाय तो?

वावे वरणफळे आवडत असतील तल दाल बाटी नक्की आवडेल. दालबाटी मिळते तेथे चुरमा मिळतोच.
चकोल्यांची आठवण काढलीत म्हणजे आता करणे आलेच. तोंपासु!

Pages