उत्तरार्ध

Submitted by प्रतिक सोमवंशी on 22 March, 2019 - 03:46

उत्तरार्ध
.
खूप कमवली धन दौलत, खूप कमवली नाती खूप जपली माणस आपली, खूप जपल्या आठवणी खूप मिळाले मित्र नवे, खूप जण साथ सोडून गेले, खूप जगलो सुखात आयुष्य खूप दुःखही सहन केले, खूप हसलो सुखात खूप दुःखात रडूनही झाले, पण या सर्वांशी deal करताना, स्वतःशीच बोलायचे राहून गेले. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही अस म्हणतात पण एका प्रसंगामुळे आज ती पुन्हा आलीय. त्या प्रसंगाने आज मला पुन्हा भूतकाळात मागे वळून पाहायला, स्वतःशीच बोलायला भाग पाडलय. काय कुणास ठाव, कदाचित आज नियतीने नशिबात हेच लिहिल असेल. एकदा का आयुष्य वार्धक्याकडे वळाल की मागे घडलेल्या घटनांकडे नव्या दृष्टीकोनातून पहायची संधी मिळते. अस म्हणतात आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात त्यातली एक जरी बाहेर आली की तिच्या मागून रांगच लागते. असच काहीस घडतय आता मलाच माझी कथा मांडावी लागेल आज.
मी आता एका बसस्थानकात उभा आहे. वय वर्ष पंच्याहत्तरच्या आसपास, भुकेने वाळून गेलेलो, अंगावर एक ठिगळांचा आधार असलेला सदरा आहे, खांद्यावर एक मळालेली फाटकी झोळी, हातात मला नेहमी सोबत आणि चालताना आधार देणारी वेळूची काठी आहे. मी किती पावसाळे झेलले हे माझ्या पांढऱ्याशुभ्र दाढी आणि डोक्यावर पडलेल्या टक्कला वरून कुणालाही कळून येईल. अनवाणी भटकून पायांवर असंख्य जखमांचे नक्षीकाम झालेले आहे. एकटाच पडलोय आज काहीतरी लिहाव म्हणतोय, झोळीतून माझी वही आणि लेखणी काढली पण त्या लेखणीची शाई संपलीय. नवी लेखणी घ्यायला पैशेही नाहीत. जे पैशे भेटतात ते पोटाची भूक भागवायला कमी पडतात तर लेखणी कुठून आणायची. पोटाच्या भुकेपुढे मनाची भूक नेहमीच हार मानते. नुकतीच शाळा सुटली असल्याने समोर मला एक मुलींचा घोळका दिसला, काठी टेकीत टेकीत त्यांच्याकडे जाऊन मी लेखणीची मागणी केली पण माझ्या कृश अवताराने त्या घाबरून गेल्या, घृणा दिसली त्यांच्या नजरेत मला. पाठीवर असलेल्या दप्तरातून एक लेखणीही देउशी वाटली नाही त्यांना, हाकलून लावल हो त्यांनी मला. त्यांना वाटल असेल या अडाण्याला काय काम लेखणीच पण त्यांना काय माहीत याच लेखणीने मला मोकळ होयला आजपर्यंत साथ दिलीय, माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलीय, माझ्या मनाचा दाह शांत केलाय. असो, बडे बाप की बडी औलादे ! तसाच चालत दोन तीन मुले होती तिथे गेलो त्यातल्या एकाने लेखणी देऊही केली आणि एकाने पैशे पुढ केले जे मी नाकारले, उलट ज्याने लेखणी दिली मी त्यालाच पैशे देऊ केले मला उपकार नको होते कुणाचे. त्याने माझ्या डोळ्यातला स्वाभिमान आणि भूक पहिली कदाचित. तो म्हणाला, “असू द्या बाबा, काहीतरी खाऊन घ्या त्याच, माझ्याकडे खूप आहेत लेखण्या, तुम्ही ते पैशे ठेवा.” मी ते घेऊन परत माझ्या एकांतात एका झाडाखाली मनाचा आकांत शांत करायला, लिहायला बसलो.
सावलीत विसवल्यावर शरीराला हायस वाटल, थकवाही थंड वाऱ्याच्या झोताबरोबर नाहीसा झाला. आता नशिबी आलीय ती शिशिरातील पानगळ! झाडावरून पडणार एक एक पान मला माझ्या आयुष्यातून कमी होणाऱ्या एका एका क्षणांसारख भासू लागलय. तो मुलगा काही डोळ्यासमोरून जात नाहीय त्याचा आवाज अजून कानात तसाच गुंजतोय.
“बाबा” किती आर्त साद होती ती, एका क्षणाला वाटल माझा राम मला साद घालतोय. त्याला तिथच मिठी मारावी आणि त्या मिठीत जीव सोडून द्यावा अस वाटल मला. किती दिवसांनी ऐकला होता तो शब्द. पाखरे एकदा मोठी होऊन उडून गेली की त्यांना घरट्याकडे परतायची तमा राहत नसते, मनुष्याच्या बाबतीत अस होयच नाही, पण आता या अघोरी कलियुगात तेच घडतय. कसा दिसत असेल राम? काय करत असेल? सुखात तर असेल ना? पोरान कितीही अवहेलना केली, दुःख दिले तरी त्याच्या सुखाचा विचार काही मनातून जात नाही. अठरा वर्ष्याचा होता जेंव्हा घर सोडून गेला, तेंव्हापासून त्याचा काय ठाव ठिकाणा नाही लागला अजूनही भटकतोय त्याला शोधत. या विस्तिर्ण जगात कुठे असेल तो? किती लाडात वाढवल त्याला, त्याचे सगळे हट्ट पूर्ण केले, तळहातावरच्या फोडासारखा जपला त्याला. शेवटी आईविना पोर ते किती दिवस बापासोबत काढणार ना?
ती वारली तेंव्हा तो फक्त सहा वर्ष्याचा होता. ‛ती’ आता तीच रूप डोळ्यासमोर उभ राहायला लागलय. दिसायला सावळा वर्ण, तरतरीत नाक, मोठ कपाळ, गुलाबाच्या पाकळीसारखे नाजूक ओठ आणि हो त्या ओठांवरचा तो तिळ! त्या तिळाकडे पाहिल्यावर अस वाटायच जणू तो मला खुणवतच आहे. ती सुंदर, सुलक्षणी आणि संस्कारी होती, तिला देवाधर्माचा खूप नाद, नेहमी अभंग गुणगुणत असायची.
गरिबी माणसाला खायला उठते, पण तीच माझ्यावरच प्रेम काही कमी होत नाही, नशिबाचे भोग समजून भोगायचे त्याला काय पर्याय नाही उरला. आम्ही तिघे त्या द्ररिद्रीत सुद्धा सुखात संसार करायचो, त्याचे इवले इवले पाय माझ्या झोपडीच्या अंगणात खेळायचे, पाऊसात मनसोक्त नाचायचे. छतावरून भांड्यांवर गळणारे पावसाचे थेंब वेगळच संगीत निर्माण करायचे. चिमणीच्या मंद प्रकाशात भाकरी तोडायला आनंद वाटायचा. त्या रात्रीपर्यंत सगळ काही सुखात चालल होत. एका दिवशी खूप जोरात वादळ येऊन धडकल, सोसाट्याचा वारा सुटला, पावसाची मुसळधार चालू झाली, एकाएकी तिला कापर भरून आल तिच अंग तापेने फनफनल, फाटकी गोधडी अंगावर घेऊन ती कशीबशी जगू लागली. दुष्काळात तेरावा म्हणतात ना तो हाच! तिला दवाखान्यात घेऊन जायला पण पैशे नव्हते, आणि पाऊसही थांबण्याच नाव घेईना. किती भयाण दृश्य होत ते, तिन्हीसांजेलाच तिमिराच ग्रहण आसमानाला गिळंकृत करू लागल. अस वाटायच एखादा जोराचा वारा आला तर झोपडी सोबत आम्हा तिघांनाही वाहून नेईल. झोपडीच छत केंव्हाच गळायला लागल होता, एव्हाना पूर्ण घरात चिखल झाला होता. सकाळी ते वादळ शमल पण एका नव्या वादळाला जागत करून. घरातल पाणी काढता काढता विझलेल्या चिमणीच्या ज्योती बरोबर ‛ती’ ची ज्योतही केंव्हा मावळली कळलच नाही. ती गेली पण ठेवून गेली तो आमच्या नशिबी कायमचा न संपणारा अंधःकार.
ति गेल्या नंतर आम्ही कशेबशे दिवस काढू लागलो, पोराला कधीच कसलीच कमी पडू दिली नाही मी. त्याला सरकारी शाळेत घातल. पण जस जस ते मोठ होऊ लागल त्याला सोबतच्या पोरांचा हेवा वाटायला लागला. घरी आल्यावर ते सांगू लागल, पोरांचा बाप त्यांचे कशे लाड पुरवतो, मला माझीच लाज वाटू लागली हो. त्याचा बाप कमी पडला त्याचे हट्ट पुरवायला. दिवसभर दगड फोडून, लोकांच्या घरी मिळेल ते काम करून दोन वेळेची भाकर मिळायची, जे थोडे फार पैशे उरतील ते त्याच्या शिक्षणाला आणि लाड पुरवायला जायचे. लोक देतील ते वापरलेले जुने कपडे मी घालायचो पण त्याला कधी कमी पडू दिले नाहीत. स्वतः अनवाणी फिरायचो पण त्याला मनासारखा जोडा घेऊन द्यायचो, तरी, तरी कमी पडत होतो मी? नाही, तो चुकत होता स्वतःची परिस्थिती समजून घ्यायला.
शाळेत जाऊन एक मात्र फायदा झाला, राम घरी आल्यानंतर मला लिहवाचायला शिकवू लागला. सुरुवातीला अवघड गेल मला पण 5 महिन्यांच्या प्रयत्नांनंतर जमल सगळ. आज मी हे जे काही लिहितोय त्यामागे त्याचाच हात आहे. आता मोठा झाला होता तो पण त्याचे लाड पुरवण अवघड झाल होत, पण तोही काम करून त्याचे लाड स्वतःच पूर्ण करायचा मी त्याला कधी एक रुपयाही मागितला नाही. कुठून कमावतो कुठे खर्च करतो त्याच त्यालाच माहीत होत, संसाराच गाड एकट्याने ओढता ओढता त्याच्याकडे माझ दुर्लक्ष झाल खर.
असाच एक काळा दिवस आला परत, त्याचा वाढदिवस होता, संध्याकाळी उशिरा घरी आला तो. पण, दारू पिऊन. वाढदिवस असा साजरा करतात त्या दिवशी कळाल मला. माझ्या काळजात कट्यार खुपसली कुणीतरी अस भासल मला. तळपायाची आग मस्तकात गेली, आणि रागात त्याच्या 2, 3 मुस्काटात ठेवून दिल्या मी. तोही रागारागात बोलू लागला, माझी लायकी काढू लागला. हातात पैसा खेळू लागला की गुर्मी चढते माणसाला, त्यात कमीच असतात जे जमिनीवर टिकतात. पैश्याची आणि दारूची नशा बोलत होती ती. त्याचा एक एक शब्द माझ्या काळजाच्या ऐरणीवर लोहाचे घाव घालत होता, माझीही सहनशक्ती संपली होती तेंव्हा मी म्हणालो, “चालता हो माझ्या घरातून” तर तोही वर तोंड करून म्हणाला, “या झोपड्यात तुम्हीच राहा, मी चाललो, शोधायला पण येऊ नका, माझा महाल बांधले तेंव्हा बघा घेतो का घरात तुम्हाला.” आणि गेलाही निघून, त्याची ती पाठमोरी आकृती अंधारात गायब होताना आजही स्वप्नात दिसते, कशीबशी स्वतःचा तोल सांभाळत प्रकाशातून तिमिराकडे जाताना, आणि मी आजही शोधतोय त्याला.
दुसरा दिवस उगवला मला वाटल रात्रीचा राग शांत झाला असेल आता येईलच तो घरी. पण, भलताच हट्टी हो तो. जसाजसा सूर्यनारायण डोक्यावर चढत होता तसतशी माझ्या काळजाची घालमेल अजूनच वाढत होती. शेवटी मी घराबाहेर पडलो, अन्नही गोड लागत नव्हत. त्याला गावभर शोधल, पण कुठच त्याचा ठावठिकाणा लागला नाही. विचारपूस केली तरी हाती काही लागेना कारण, कुणी म्हणे त्याला शहरात जाताना पाहिल, कुणी त्याला गावाबाहेरच्या विहिरीकडे जाताना पाहिल, तर कुणी माळरानावर, एकजण तर म्हणाला त्याला मुंजा घेऊन गेला. मी सगळीकडे शोधल पण त्यांच्या बोलण्यात तथ्य आढळून आल नाही. पोलिसात फिर्याद दिली पण तेही अपयशी ठरले. शेवटी मीच एक झोळी घेऊन बाहेर पडलो, माझ्या रामाला शोधायला, माझ्या जगण्याचा एकमेव आधार शोधायला. त्याच्याशिवाय होतच कोण माझ? तसाच फिरत होतो गावच्या गाव पायदळी तुडवत, माळरानावर चांदण्याच्या प्रकाशात रात्र काढत. आजूबाजूच्या गावात विचारपूस करत करत मी किती लांब येऊन पोहोचलो. दोन घरी लाकड फोडून वा मिळेल ते काम करून एखादा भाकरीचा तुकडा व थोडे फार पैशे मिळवायचो आणि परत प्रवासाला सुरुवात करायचो.
आजवर या प्रवासात खूप अनुभव आले, खुप वेगवेगळी माणस मिळाली. काहींनी झिडकारले, काहींनी मायेन विचारपूस केली. काहींनी शिव्या दिल्या तर काहींनी भाकर दिली. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात ना ते प्रकर्षाने जाणवल मला.
एक रात्र आठवते मला, अवसेची काळी रात्र, असाच माळरानावरून भटकत होतो आणि एक चिता जळताना पहिली. त्या चितेची आग मनाला चटके देत होती, सरणाच्या जळत्या लाकडाची तडतड हृदयाच्या ठोक्यांच्या धडधडीत मिसळत होती, एक वेळ मनात शंकेचा कावळा ओरडून सांगू लागला, “ तुझ्या रामाची तर नाही ना ही चिता?” पण समजावू लागलो स्वतःला नसेल म्हणून. मग विचारांच रहाटगाड चालू झाल आणि मला त्याने ‛ती’ च्या चितेपुढे नेऊन ठेवल. मनाच कर्मच असत ना विचार करण त्याला कुणी थोपवू नाही शकत. तिच्या चितेला किती कष्टाने लाकड गोळा करावी लागली होती. मला मरण दिसू लागल माझ समोर. मी असाच भटकत कुठेतरी अनंतात विलीन झालो तर कोण देईल माझ्या चितेला अग्नी? कोण करेल माझ श्राद्ध? कोण देईल मला माती? कोण येईल ती राख सावडायला? का अशीच वाऱ्यावर वाहून जाइल ती दूर दूर कुठेतरी? माझ मन त्या चितेला म्हणू लागल, “चार लाकड मला पण दे, माझ सरण पेटायला वाट पाहतय, बाभळीचीही चालतील, मेल्यावर चंदनाचा सुवास कुठ येणार आहे? चार माणस माझ्याकडे पण पाठवा,
तिरडी माझी वाट पाहतेय, रडली नाही तरी चालतील, मेल्यावर कुणाचा आक्रोश कुठ ऐकू येणार आहे? असच लांबून त्या चितेकडे पाहत बसलो, कवटी फुटायच्या आवाजाने, माझ्या अश्रूंचा बांध पण फुटला, किती दिवसाच साचलेल पाणी पुरासारख वाहू लागल. पण नंतर एखाद्या पक्ष्याला पिंजऱ्यातुन मोकळ केल्यासारख माझ मनही शांत झाल.
ती जळती चिता सोडून तसाच चालत एका मंदिरात पोहोचलो आणि तिथच तळमळत रात्र काढली. सकाळी उठून गावात काम मागायला फिरू लागलो, सोबत रामाची विचारपूसही चालूच होती. पण, गावात वेगळीच धावपळ उडाली होती, जो तो मंदिराच्या दिशेने पळत होता. मीही कुतूहला पोटी तिकडे गेलो तेंव्हा कळाल, रात्री कुणीतरी मंदिरातली दानपेटी चोरली होती. या घोर कलियुगात आता देव पण सुरक्षित राहिले नव्हते. पण, तेवढ्यात एकजण म्हणाला, “चोर, चोर, पकडा याला, यालाच काल रात्री मी मंदिरात रात्र काढताना पाहिल होत !” आणि पापणी मिटायच्या आत मुंग्यांनी साखरेच्या कणाला चिटकाव तसा सगळ्यांनी मला विळखा घातला. मला काही कळायच्या आत सगळे मला मारू लागले, मी जिवाच्या आकांताने ओरडू लागलो, “मी चोर नाही, मी चोरी नाही केली, मला सोडा” पण माझ कोण ऐकणार इथ, मी ना त्यांच्या गावातला, आणि नशीबच फाटक माझ ज्या मंदिरात झोपलो तिथलीच दानपेटी चोरी गेली. मला भरपूर चोप मिळाला, नंतर मला गावातील एका झाडाला बांधून ठेवण्यात आल, मला नंतर पंचांन पुढे नेण्यात आल, गावची पंचायत बसली मला गुन्हा कबूल करायला सांगण्यात आल आणि लुटीचा माल कुठे ठेवलाय हे विचारण्यात आल. पण जो गुन्हा मी केलाच नाही त्याची कबुली का देऊ मी? मी फक्त एवढच सांगू लागलो, “मी निर्दोष आहे, मी चोरी नाही केली विठ्ठलाची शपथ” पण कुणी माझ ऐकायला तयारच नव्हत. मी गुन्हा कबुल करावा म्हणून माझी गावातून धिंड काढण्यात आली, लोक माझ्यावर शेणाचे गोळे, दगड फेकू लागले, माझ्या अब्रूचे धिंडवडे निघाले वाजत गाजत. मला चोप देऊन झाल्यावर मला पोलिसांच्या हवाली करण्यात आल, तिथही चोप मिळाला तो वेगळा. थाण्यातली ती रात्र खूप भयानक होती, अंगावरील जखमांची लाही लाही होत होती. कधीपण विचारपूस करायच्या नावाखाली पोकळ बांबूचे फटके पडायचे, अंगाला असंख्य इंगळ्या डसल्यासारख्या जाणवू लागायच्या. शेवटी, पाच दिवसांनी खरा चोर सापडला आणि मला मोकळ करण्यात आल. नंतर एका पोलिसाने माझी हकीकत ऐकली व मला त्याचे पुराणे कपडे देऊन जायला सांगितल, सोबत तुमच्या मुलाला शोधू हे पोकळ आश्वासनही देण्यात आल. पुन्हा कधीच मी त्या गावाकडे वळूनही पाहिल नाही. त्या जखमा त्यानंतर कित्येक दिवस बोचऱ्या थंडीत मला वेदना देऊ लागल्या. कसे विसरू ते दिवस, ज्या देवाच्या आडोश्याला राहिलो तोच देव माझ्या मदतीलाही धावून नाही आला.
जसा वर्षा ऋतु वातावरणातील ग्रीष्माचा दाह शांत करतो, तसच आयुष्यातही सुख दुःख एकामागोमाग एक येतच असतात. माणसंही असच ऋतूंप्रमाणे बदलत जातात. मला एका गृहस्थाबद्दल नमूद करूशी वाटत. त्याच्यामुळे मला कळाल की या जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. त्या गावात झालेल्या विटंबनेनंतर मी तिथून निघालो खरा पण कुठे चाललो आहे मलाच माहीत नव्हत. माझी गतीही जखमांमुळे आणि वेदनांमुळे कमी झाली होती, मिळेल तिथे विश्रांती करून मी पुढचा प्रवास चालू करायचो. असच एका शेताच्या बांधावर एका आंब्याच्या झाडाच्या दाट सावलीत विश्रांतीसाठी थांबलो आणि कधी निद्रेने मला मिठी मारली कळालच नाही. तेंव्हा तिथला शेतात काम करणारा माणूस न्याहारीसाठी आला आणि त्याने मला उठवल, माझी विचारपूस केली, “काय र बाबा, तू या गावचा नाही दिसत, कसकाय येण केल.” मी मग त्याला माझी सगळी कैफियत ऐकवली. त्याने मला धीर दिला, “हे बघ, हे सारे नियतीचे खेळ, आजपर्यंत कुणाला कळाले आहेत का, देवाचा प्रसाद म्हणून घ्यायच खाऊन.” मग त्याने त्याच न्याहारीच गाठोड सोडल आणि मला एक भाकर देऊ केली. मी आधी नकार दिला पण पोटातला अग्नी शांत करण्यासाठी मला नमाव लागल. ती भाकरी मी आधाशासारखी खाऊ लागलो. खूप दिवसांनी पोटात काहीतरी गेल होत. त्याने माझ्याकडे पाहिल आणि म्हणाला, “खूप दिवसाचा भुकेला दिसतोयस, घे लाजू नको अजून घे.” मीही 2..3 भाकरी खाऊन घेतल्या मग पोटभर पाणी पिऊन आमचा गप्पांचा फड जमला. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या अनुभवांचं गाठोड सोडल आणि त्यातल्या एक एक भाकरी खाऊ लागलो. आम्ही हसलो, रडलो, एकमेकांना आधार दिला. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला बायकोलाही सगळ काही घडलेल सांगितल आणि मलाही ताकीद दिली, “जोपर्यंत या जखमा भरत नाहीत, तू कुठेच नाही जायच” ती ताकीदही मला माझ्या जखमांवरून मायेन हात फिरवल्यासारखी भासू लागली. त्याने माझ्या जखमांवर ओषध पट्टी केली. जिथ रक्ताची नाती उलटी होऊन डसली तिथ त्या अनोळखी लोकांनी मला रक्ताच्या नात्यासारख जपल. मी जायची गोष्ट केल्यावर ते मला इथंच राहा म्हणू लागले मग माझी पंचाईत झाली. माझ एक मन मला म्हणू लागल,“ इथच राहा कुठ त्या हलकटाला शोधायला जातोस”, तर दुसर मन म्हणू लागल,“चल आता तर जखमाही भरल्यात, किती दिवस लोकांच्या घरी काढणार, तुझा राम तुझी वाट पाहतोय.” शेवटी मी त्यांचा निरोप घेतला, त्याच्या भरल्या डोळ्यांनी मला थांबवायचा प्रयत्न केला पण शेवटी मला जावच लागणार होत ना. चालताना वाटांशी मैत्री केली की काट्यांच भय पण समाप्त होत. आपण फक्त चालत रहायच आपल्या धेयप्राप्तीसाठी. मला एक शायरी आठवते कुठेतरी ऐकलेली, “भटकता हू जिंदगीकी तलाश मै अक्सर, जिंदगीकोही हमसफर बनाकर, न जाने कब नसीब होंगी मंजिले, पता सपनो का जेब मै लिए चलता हू।"
अरे हे काय पाहतोय मी, तो मुलगा ज्याने मला लेखणी दिली, तो माझ्याकडे चालत येतोय, आणि त्याच्यासोबत एक माणूसही आहे. राम ! हो हो माझा राम! .... त्यादिवशी तो जो मुलगा माझ्या रामाला घेऊन आला तो माझाच नातू आहे हे मला नंतर कळाल. राम माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “बाबाss बाबा, मला माफ करा, मी चुकलो, खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. मी रागाच्या भरात घर सोडून गेलो पण 2 दिवसांनी परत आलो पण तिथ कुणीच नव्हत, गावातील लोक म्हणे तुलाच शोधायला गेलाय.” त्यानेही मला खूप शोधल, अनेक गाव पालथी घातली, पण माझा पत्ता लागला नाही. शेवटी त्यानेही हार मानली पण तरी शोध चालू होता. कुठे काही बातमी आली तर तो जाऊन पाहायचा. त्याच्या मुलाने जेंव्हा घरी जाऊन त्याला घडलेली हकीकत सांगितली तेंव्हा त्याला राहवले नाही आणि तो शोधत आला आणि नियतीने शेवटी बापलेकाचा मिलाप घडवून आणला, आज 35 वर्ष्यानी भेटला तो मला. किती मोठा झालाय, एका नावाजलेल्या कंपनीत कामाला आहे म्हणे, 40, 50000 रुपये मिळवतो म्हणे महिन्याला. खूप कमवून ठेवलय त्याने, मोठी म्हाडी बांधलीय, लग्न केल, एक मुलगाही आहे. पोराचं चांगलं झाल, यातच बापच समाधान असत. आता मी मरायला मोकळा. आम्ही त्याच्या घरी आलो त्याच्या बायकोनेही चांगले स्वागत केले माझे आता त्याच्या घरात बसूनच ही पुढची कथा लिहितोय. दैव किती अप्रत्यशीत असत ना, काय होईल पुढच्या क्षणी कुणीच सांगू शकत नाही. माझच बघा ना ज्याच्या शोधत थकून इथ विश्रामाला थांबलो, त्याच्याच मुलाकडून लेखणी घेतली, आणि मागच सार लिहू लागलो, इतक्या वेळ मला माहीतही नव्हतं तो माझच नातू आहे आणि मला माझ्या रामाशी गाठ घालून देईल. खूप आभारी आहे मी भगवंताचा, आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना आमची भेट घडवून आणली त्याने. आता मला कोणत्याच चितेकडे लाकड मागायची वेळ नाही येणार, ना कुणापुढे माझ्या अरथीला खांदा द्यायला भीक मागावी लागणार.
मुलाच्या घरी सुख आणि आराम माझ्या पायाशी लोटांगण घालतायत पण आयुष्यभर कष्ट झेललेल्या मला हा आराम हराम वाटायला लागलाय. सवय लागलीय ना शरीराला कष्ट करायची म्हणून. परत वाटत फिरायला जाव जिथ नवीन नवीन माणस भेटतील, नवीन अनुभव वाट्याला येतील पण आता शरीर साथ पण देत नाही ना. आता नवीन खेळ चालू झालाय, संध्याकाळी आम्ही चौघे जेवणानंतर बसतो मनसोक्त गप्पा मारतो, मी त्यांना माझ्या वाटेला किती अनुभव आले ते एक एक करून सांगू लागतो. तेही मन लावून ऐकतात मला सांत्वन देतात, माझा नातू झोपताना पाय चेपून देतो, एकंदरीत आता आराम मिळतोय मला. माझ्या मुलानेही मला त्याची हकीकत सांगितली. तो जेंव्हा घराबाहेर गेला तेंव्हा तो रागात होता. पण जेंव्हा त्याचा राग शांत झाला तेंव्हा त्याला उमजल तो किती वाईट वागलाय. ज्या मित्रांना त्याने आपल मानल त्यांनी त्याला स्वतःच्या बापाला न शोधण्याचा सल्ला दिला. त्यातला एकजण तर म्हटला म्हणे,“जाऊदे ना एकदाची कटकट गेली, तू ते घर आणि जागा विकून टाक, पैशे मिळतील आपण मस्त पार्टी करू मग.” मग रामाला कळाल त्याची संगत किती वाईट आहे, ज्या घरात त्याच्या आईच्या इतक्या आठवणी आहेत, ज्या घरात तो लहानाच मोठा झाला, ते घर तो कसकाय विकल. तो मुलगा म्हणून जरी वाईट असला तरी माणूस म्हणून नीच नव्हता. तो चुकला होता, पण त्या चुकीला अजून वाढवायच नव्हत त्याला. पुढे त्याने त्यांची संगत सोडून दिली पण त्याचा घर विकायला केलेला नकार त्यांच्या मनाला खूप झोंबला होता. त्यांनी याला एकट्याला बघून एका रात्री बेदम मारल, आवाजाने लोक जागी झाली तेंव्हा त्याचे मित्र आणि मारेकरी पळून गेली. तो घरात तसाच तळमळत होता जसा मी तळमळायचो त्या तुरुंगात. त्याला तेंव्हा खूप गरज भासली सहऱ्याची, मायेन कुणीतरी त्याला जवळ करून त्याच्या जखमांवर मलमपट्टी करणाऱ्याची पण त्याच आपल म्हणाव अस कुणीच नव्हत. मला तरी तो एक सद्गृहस्थ भेटला होता, ज्याने मला धीर दिला, आसरा दिला पण माझ्या मुलाला कुणी नाही भेटल. नंतर त्याने स्वतःच्या करिअर वर लक्ष द्यायच आणि माझा शोध पण चालू ठेवला. त्याने त्याची बारावी पूर्ण केली नंतर शहरात एका कंपनीत कामाला लागला, शिक्षण पण चालू ठेवल कामासोबत व पदवीही घेतली. तो चांगला मोठा साहेब झाला कंपनीत. नंतर त्याने शहरात एक घर बांधल, त्याच कंपनीच्या एका मोठ्या घराहकाला हा माझा राम खूप आवडला. त्याने त्याच्या मुलीच लग्न लावून दिल रामाशी. रामाचे सासरेही मला भेटून गेले आजच खूप चांगले वाटले मला. तो माणूस मनमोकळा होता नेहमी हसतमुख राहायचा. त्याला पाहून मला त्या मदत करणाऱ्या गृहस्थाची आठवण आली. तो रामाच खूप कौतुक करत होता आणि मला सांगत होता त्याला राम का आवडला ते.
आज एक गोष्ट घडली, संध्याकाळी पाय मोकळे करायला म्हणून मी बाहेर गेलो तेंव्हा माझा नातू किशोर समोरच्या मैदानात मुलांसोबत खेळत होता मी जेंव्हा तिथे गेलो तेंव्हा सगळ्यांनी एकच गलका केला, मला घेरल त्यांनी आणि म्हणू लागले, “आजोबा गोष्ट सांगा ना! आजोबा गोष्ट सांगा ना!” मला कुठ जमतय गोष्ट सांगायला, माझी तर धांदलच उडाली. मी मग असच मनाला जमेल तशी काहीतरी गोष्ट रंगवून सांगितली. त्या मुलांच्या निरागस चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मनाला खूप छान वाटल, फिरून आलेला थकवा एका क्षणात दूर झाला. मग घरी आल्यावर नातूही त्याचा आईबापाला कौतुकाने सांगू लागला, की आजोबांनी सगळ्यांना किती छान गोष्ट सांगितली ते.
दिवसा मागून दिवस सरत होते, मला मात्र घरात कोंडल्यासारख वाटायला लागल, मी रामाला ते बोलूनही दाखवल. त्याने मग पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जायची योजना आखली, आणि आम्ही निघालोही. पंढरपूर, तुका म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूवरी. पंढरपूरला एका मठात थांबलो, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही चंद्रभागेत स्नानाला गेलो दर्शना आधी. चंद्रभागेत एक डुबकी लावली, एक दीर्घ श्वास घेऊन पाण्याखाली जाव, भयाण शांतता असते तिथे, ना कुठला आवाज ना कुठला व्यतेय, तिथे स्वतःत गुंतून जातो माणूस. आपल्याला स्वतःच्या आत्मीयतेचा शोध लागतो. अंतरंगातला आवाज आपल्याशी खूप काही बोलू पाहतो, त्याला मोकळीक दिली की जोपर्यंत श्वास तुटत नाही, तोपर्यंत स्वतःशीच संवाद विना व्यतेय साधता येतो. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे तिथेच भेटतात,कधी एखादी कविता सुचते तर कधी एखाद गूढ उलगडत. माउलीने म्हणूनच सांगितले असेल चंद्रभागेत स्नान केल्यावर पाप नष्ट होतात म्हणून. कारण तिथे पाण्याखाली आपल्याला आपल्या चुका समजतात आणि ज्याला त्या मान्य होतात त्याची पापे त्या पाण्यात आपोआप धुतल्या जातात. स्नानानंतर मी बारीला लागलो आणि थोड्याच वेळाने गाभाऱ्यात उभा होतो, माझ्या विठोबासमोर, रूप पाहतां लोचनीं। सुख जालें वो साजणी ॥ असच म्हणायला होतय. माझ्या डोळ्यांच पारण फिटल आज त्याच विटेवर उभ असलेल रूप पाहून. माझी माय, माझी विठू माऊली माझ्या समोर होती. मला एक अभंग आठवतोय, “उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥ ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥२॥ ऐसे संतजन ऐसे हरिदास | ऐसा नामघोष सांगा कोठे ॥३॥ तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे | पंढरी निर्माण केली देवे ॥४॥” मी तर म्हणतो, प्रत्येकाने आयुष्याच्या उत्तरार्धात एकदा तरी पंढरी जाऊन यावे. खूप काही भेटेल तुम्हाला जे तुम्हालाच उमजेल, एक आंतरिक बदल घडेल जो शब्दात सांगण मात्र खूप कठीण आहे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव।। माझ जीवन सार्थकी लागल त्या दर्शनाने. आजपर्यंत जे भोगल, जे क्षीण होते ते सार सार मी तिथच विठोबाच्या जवळ सोडून आलो, स्वखुशीने नाही पण विठ्ठलानेच घेतल ते माझ्या नकळत. आता मनात आहे ते फक्त समाधान! परतीच्या प्रवासात जेंव्हा गाडीत बसलो तेंव्हा काचेबाहेर पाहताना मन खूपच सुन्न सुन्न वाटू लागल, काहीतरी हरवल अस भासू लागल. सोबत सगळे असूनपण माझ्या वाटेला एकटेपणा आल्यासारख वाटतय. मन आता मागे वळून भूतकाळात डोकावतय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users