बदला - सफाईदार रहस्यपट. काही चुका झाल्यात का ? ( स्पॉयलर्स असणार इथे)

Submitted by किरणुद्दीन on 20 March, 2019 - 15:40

अ‍ॅलर्ट : - हा धागा बदला हा सिनेमा पाहीलेल्यांसाठी आहे. ज्यांनी पाहिला नाही त्यांनी कृपया पाहण्याआधी वाचू नये.

सिनेमाच्या कथेबद्दल अर्थातच इथे काही नाही. मात्र सिनेमा कसा वाटला, चुका आहेत कि अचूक रहस्यपट आहे याबद्दल आपण इथेच हितगूज करूयात.

थोडंसं सिनेमाबाबत :
badla.jpg

सिनेमाची श्रेयनामावली सुरू झाली तेव्हांच हा सुजॉय घोषचा सिनेमा असल्याचे समजले. हे ठीकच झालं. नाहीतर तो कसा असेल याच्याबद्दल थोडीतरी कल्पना केलीच असती. मात्र प्रोमोज किंवा दिग्दर्शकाच्या नावावरून सिनेमा ताकास तूर लागू देत नाही. शेवटी चकवा असणार हे ठाऊक असूनही तो चकवतोच. शेवटच्या काही मिनिटात अपेक्षित शेवटाचा अंदाज येतो. मात्र नाट्य खिळवून ठेवते.

अमिताभचे डोळे आता पाहवत नाहीत. पण या सिनेमात ते उत्तमरित्या लपवले गेले आहेत. अर्थात दोन तीन क्लोज अप्समधे ते दिसतात. तेव्हां बघवत नाही. ताजमहाल च्या जागी खंडहर तसं वाटतं. त्याच्या डोळ्यातली आग केव्हांच विझली आहे. मात्र तरीही देहबोली आणि आवाज याच्या जोडीला शब्दफेक यावर अमिताभने बादल गुप्ताचे पात्र भन्नाट साकारले आहे.

सुजॉय गुप्ताच्या सिनेमात ज्या शहरात कथानक घडते त्या शहराचे कथेच्या ओघात होणारे दर्शन हा आता कौतुकाचा विषय नाही राहीलेला. ते एक पात्रंच असतं हे ठाऊकच आहे आपल्याला. सिनेमाबद्दल इतकंच.. रहस्यकथा साकारताना कथेच्या ओघात जाणवणार नाहीत इतपत चुका माफ असतात. मात्र अलिकडे प्रेक्षकांना रहस्यपट पाहून पाहून ब-याच गोष्टींचा अंदाज येतो. कदाचित हाच विचार करून चकवे सोडले गेले आहेत. ते करताना काही चुका राहील्यात का असे प्रश्न पडतात. त्या प्रश्नांवर बोलूयात.

पहिला प्रश्न : -तापसी पन्नूचे कॅरेक्टर उभे करताना गडबड झाली आहे असे वाटले. ती एक यशस्वी उद्योजिका आहे. प्रसिद्ध आहे. पैसा आणि सत्ता आहे हातात. असे लोक एखाद्या नामांकित वकीलाला का पारखतील ? ती ज्या पद्धतीने वकीलाला आपली कहाणी सांगताना धक्के देते तो भाग गंडला आहे असे वाटते. अर्थात चित्रपटाच्या फ्लो मधे ते जाणवत नाही हे ही खरे. मात्र धक्के देणे ही चित्रपटाची गरज आहे. पात्रांची का असावी ? त्यातून एक यशस्वी उद्योजिका आपल्या वकीलाला मुद्दामून गाळलेल्या जागा न भरता डिटेल्स सांगते ते ही कधी, तर तीन तासात तिच्या भविष्याचा फैसला होणार असेल तेव्हां ! हे खरे वाटत नाही.

दुसरा प्रश्न : - कहानी १ प्रमाणेच मेक अप आर्टिस्टला इथेही काम आहे. मेक अप आर्टीस्ट सामान्यांना सहजपणे उपलब्ध होऊ शकतील का ?

तिसरा प्रश्न : - बादल गुप्ता जो आपल्याला सिनेमात पहिल्यांदा भेटतो आणि शेवटपर्यंत तिची कहाणी सांगतो. तो तिला बोलता बोलता बोलतो की माझ्यापेक्षा जास्त रानीला कोण चांगले ओळखेल ? ही हिण्ट तो समोरच्या हुषार मुलीला का देईल ? ज्याला आपले ध्येय साध्य करायचे आहे , तो ही चूक करणार नाही.

चौथा प्रश्न - बादल गुप्ता तिला सांगतो की तुझ्यावर रानीने पाळत ठेवली. तुला भेटायला येणा-यांवर पण तिने पाळत ठेवली. असेच एकदा तिने मला पाहीले माझा पाठलाग केला..... इथे प्रश्न उभा राहतो की अरेच्चा ! म्हणजे हा बादल गुप्ता आणि नैना तर या आधीही भेटलेच होते की... तर मग .... सिनेमा गंडला की काय ?

चौथ्या प्रश्नात माझी काही चूक नसेल तर मग ही चूक माफ करणे अवघड होतेय.
एरव्ही संजॉय घोष एक दमदार रहस्यपट देण्यात कमालीचा यशस्वी झालेला आहे. अंधाधून पेक्षा हा सिनेमा कितीतरी पटीने उत्तम रहस्यपट आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते दोघे नवरा बायको पूर्वी द्रामा आर्टिस्ट असतात . त्यामुळे मेकअप वगैरे त्यांना सहजतेने उपलब्ध होते,

कॉलेज के जमाने से हम दोनो ड्रामा मे काम करते थे , बाद मे हॉटेल का जॉब , हीदेखील हिंटच होती, पण शेवटी कळते

ते दोघे नवरा बायको पूर्वी द्रामा आर्टिस्ट असतात . त्यामुळे मेकअप वगैरे त्यांना सहजतेने उपलब्ध होते, >>> बरोबर. पण मास्क वगैरे अती झालं आहे. हा अंदाज कुणालाच करता येणे शक्य नाही.

चैतन्य रासकरने सुचवल्यामुळे Invisible Guest पाहिला आहे.
अब्बास-मस्तानटाईपचा (म्हणजे ते जिथून कॉपी करतात त्या प्रकारातला :-P) थ्रिलर वाटला. बर्यापैकी आवडला होता पण फार इम्प्रेस झाले असे नाही.

कहानीदेखील ठीकच वाटलेला. अंधाधूनमात्र आवडलेला.

मला फारसा आवडला नाही. तापसी पन्नूचे कॅरॅक्टरच चुकले आहे. तिला स्वत:चा बचाव करायचा आहे पण ती जरासुद्धा बचावात्मक वागत नाही. तिचा कॉर्पोरेट आणि कौटुंबिक वावर फारसा दाखवलाच नाहीय. खूपसा भाग अमिताभबरोबर आहे आणि त्यात ती उद्धट, उद्दाम, वनअपमनशिप वाली वाटते. पुन्हा तिला कुटुंबाचा अतिशय आणि खराखुरा वाटणारा लळाही असावा . तिच्या कॉर्पोरेट यशामध्ये काही खोट असेल किंवा ते यश इल गॉटन असेल असंही जाणवत नाही. फक्त अमिताभबरोबर बौद्धिक कसरत अथवा कुस्ती करताना मात्र ती माजोर्डी वाटते. म्हणजे एकूणात ती खल वृत्तीची वाटत नाही. किंवा कदाचित कथेतला हाच धक्का असेल. पण मग ताडून पाहिले तरी आधीचे प्रसंग किंवा तिचे वागणे (अमिताभखेरीज जेवढे दाखवलेय तेवढे) खोटेही वाटत नाहीत. अमिताभचा जखडून ठेवल्यासारखा अभिनय आणि आवाज- रादर त्याचे ते सुप्रसिद्ध डिकशन अजिबात आवडले नव्हते. त्यात सदोष ध्वनिमुद्रण/ पुनर्मुद्रण. पण आवाज आणि अभिनय याविषयी थोडाफार उलगडा शेवटी झाला. अमिताभच्या प्रवेशापासूनच काहीसा सूचक अंदेशा मिळायला लागतो आणि रहस्य पातळ होऊ लागते. प्रेडिक्टेबल वाटते. अर्थात शेवटाचा पूर्ण अंदाज येत नाही इतक्या लवकर पण...
ता. क. : अमृता सिन्हने मानव कौल वर पाळत ठेवलेली असते. तेव्हा त्यात अमिताभ दिसतो आणि मग हा लीड तापसीपर्यन्त पोचतो.

नवरा बायको पूर्वी अति dramatic असतात असे म्हणावे लागेल, किती ते ओव्हर acting.
त्यांची बडबड प्रेक्षक म्हणून आपल्यालाही असह्य होते.

पहिला प्रश्न - हेच संवाद प्रतिस्पर्धी वकीलासोबत कोर्टात असले असते तर जास्त धमाल आली असती आणि थोडेफार पटलेही असते
पण इथे एकाच पक्षाचे वकील आणि आरोपी एकमेकांना मात द्यायला बघतात हे अतीच झाले

आशुचँप, सहमत. ती अति बडबड कंटाळवाणी वाटते. पडद्यावर सतत अमिताभला पाहाणे आता सुखद राहिलेले नाही आणि किंचित डिस्टॉर्टेड रूपात तर नाहीच नाही.

सनीने जबरदस्त एकटिंग केले, सगळेच फिके पडलेत त्याच्यासमोर. त्याच्या रुपात बॉलिवूडला नवीन अमिताभ मिळाला.

बादल गुप्ता हा नैना ला भेटलेला नसतो. तिचा तो मित्र असतो त्याच्याबरोबर भेट होत असते त्याची तेव्हा अमृता सिंग पाळत ठेवून फोटो काढते आणि त्याप्रमाणे मेकप्/मास्क लावून मग तिचा नवरा जातो नैना कडे.
फक्त एकच जेव्हा नैनाचा मित्र (जिमि) विमानात असतो आणि खुद्द बोलतो बादल शी तेव्हा तो आवाज का नाही ओळखत? Uhoh

बाकी मला जिथे अर्जुन चा खून होतो ते हॉटेल मला हायझेनबर्ग च्या एका कोड्यातल्यासारखे वाटले. कुणाला आठवतो का तो धागा?

बाकी मला जिथे अर्जुन चा खून होतो ते हॉटेल मला हायझेनबर्ग च्या एका कोड्यातल्यासारखे वाटले. कुणाला आठवतो का तो धागा?>>>>

मी बदला पाहिला नाही पण मूळ चित्रपटात विंटर सुरू असल्यामुळे आतून खिडकीचे हँडल knob काढून ठेवले हे बघताच मलाही हाबेची गोष्ट आठवलेली Happy Happy

फक्त एकच जेव्हा नैनाचा मित्र (जिमि) विमानात असतो आणि खुद्द बोलतो बादल शी तेव्हा तो आवाज का नाही ओळखत? Uhoh >>>>>> तेंव्हा जिमी ला सिग्नल नसतात नीट, सो त्याला ऐकू येत नसतं

अ‍ॅमी एकदम करेक्ट थँक्स. मी सिनेमा पाहिल्यापासून वेड्यासारखी आठवत होते तो धागा. तु डोक्यातल्या किड्याला वाट करून दिलिस Happy

बाकी सिनेमा आपल्याला उसंत घेऊ देत नाही अतिशय फास्ट असल्याने चूका असल्या तरिही त्या आपल्या लक्षात येत नाहीत.
अर्जुन ला इतकी ही अक्कल का असू नये की एखाद्याचा फोन आपण घेतला असेल सोबत तर तो सायलेंट करावा.
बरं तो मुलगा ह्यांचाच आहे हे कळल्यावर सुद्धा त्याने ते करू नये?

हा सिनेमा परकीय कल्पनेवरून उचललेला आहे हे समजल्याने हिरमोड झाला.. सुजॉय घोषकडून अपेक्षा नव्हती.

सुरवातीला नैना अमिताभला सांगते की गाडीचा अपघात झाल्यावर अर्जुन गाडीजवळ गेला आणि त्याने सांगितले की सनी मेलाय नंतर तो नैनाला फोन नाही करून देत आणि सनीचा मोबाईल खिशात ठेवतो, नंतर शेवटी खरी स्टोरी अशी असते की नैनाच त्या गाडीजवळ प्रथम जाते आणि अर्जुनला जबरदस्ती करते पोलिसांना फोन वैगरे नको करू, म्हणजे सनीचा मोबाईल पण नैना जवळच असायला पाहिजे, अर्जुनकडे कसा येईल तो?

मला अंधाधून इतका नाही आवडला. ज्यांना आवडला त्यांना लखलाभ. डोळे गेले, डोळे आले, डोळे गेले पुन्हा आले. क्या मजाक है यार ? शेवटचा धक्का नसता दिला तरी चालला असता एव्हढे धक्के उगाच दिलेत.

बोकलत, एक्झॅट्ली. खऱ्याखोट्या प्रसंगांची एवढी सरमिसळ आहे की डोकं भंजाळून जातं संगती लावता लावता. टाप्शी टण्णू बळजबरीने तो फोन अर्जुनकडे देते का? आठवत नाही.

पहिला प्रश्न (उत्तर) :- तिने दोन खून केलेले आहेत. बादल गुप्ता तिला पहिल्यांदा भेटतोय आणि तो तिची स्वत:ची फाईंड नसून तिच्या वकील मित्राने रेकमेंड केलेला आहे. त्यामुळे कदाचित तिला पूर्ण सत्य सांगायचं नसावंच. मात्र बादल गुप्ता - प्रत्यक्षात सगळं सत्य जाणून असल्याने - तिला चतुराईने बोलतं करत असतो आणि झालेल्या घटनेचं तिच्याकडून प्रत्येक वेळी एक अपग्रेडेड वर्जन मिळवत असतो. कथानकाचा जीव - त्यातला थरार - च ह्या नवनव्या वर्जन्समध्ये आहे, असं मला वाटलं. त्यामुळे ते खटकलं नाहीच, उलट मस्त वाटलं.

दुसरा प्रश्न (उत्तर) :- दोघे नाट्य कलाकार असल्याचं दाखवलं आहे. तेव्हढी Cinematic Liberty मी दिली.

तिसरा प्रश्न :- त्याने दिलेली हिंट ती मिस करते, हे खरंय. ती हिंट तो का देतो, हेसुद्धा अनाकलनीय आहे. मलाही हा भाग पटला नाही.

चौथा प्रश्न :- (बहुतेक) अश्या आशयाचा एक डायलॉग आहे की, 'खरं काय झालं असेल हे मी माझ्या अनुभवामुळे guess करू शकतो, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे.' त्यामुळे तो आणि नैना एकमेकांना भेटलेले आहेत, हा भाग तसा रिलेव्हन्ट वाटला.

------------------------------

मला एक भाग प्रचंड म्हणजे प्रचंड खटकला. रस्त्यात कुणा तरी अनोळखी माणसाची गाडी बंद पडल्याचे दिसल्यावर त्याची चौकशी आणि तिथल्या तिथे थोडीफार मदत करणे, हे ठीक, पण त्याला अगदी आग्रह कर-करून घरी घेऊन येणं, जणू काही जुनी ओळखच असावी इतक्या मोकळेपणाने वागणं वगैरे भाग अगदीच बोगस आणि बाकीच्या सिनेमाच्या ग्रीपिंग मूडला विजोड वाटला. I mean, मी औरंगाबादमध्येसुद्धा असं काही करणार नाही, हे लोक लंडनच्या कुठल्याश्या आउटस्कर्ट्समध्ये एका पूर्णत: अनोळखी व्यक्तीला घरी घेऊन येतात ! त्याच्याकडे मुलाचा मोबाईलही निघतो, तरी त्यांना विचित्र वाटत नाही; हा पुढचा सगळा भाग तर बाष्कळ आहे.

--------------------------------

सिनेमा कुठल्या इंग्रजी सिनेमाचा रिमेक आहे, हे मला पाहण्यापूर्वी माहित नव्हतं. पण पाहिल्यानंतरची माझी पहिली प्रतिक्रिया हीच होती की एक तर हा रिमेक आहे किंवा 'जेम्स हॅडली चेस' वगैरे कुणाच्या कथेवर आधारलेला आहे.
नंतर समजलं की हा 'द इनव्हिजिबल गेस्ट'चा अधिकृत रिमेक आहे.
रिमेक जरी असला, तरी माझ्या मते चांगला केला आहे. खासकरून महाभारताचे संदर्भ अचूक गुंफले आहेत. ह्यावरून लक्षात येतं की रिमेकच्या नावाखाली नक्कल केलेली नसून स्वत:चं डोकंही वापरलं आहे.

--------------------------------

'अंधाधून' आणि 'बदला' वेगळ्या पठडीचे थ्रिलर्स आहेत. तुलना करायला नको खरं तर. पण केलीच तर माझ्यासाठी दोनपैकी एक निवडणं अवघड आहे. निवडायचाच झाला तर मी अंधाधून निवडीन. अनेक कारणं आहेत. ते एका दुसऱ्या सिनेमाच्या धाग्यावर सांगणं नको वाटतंय.

ते एका दुसऱ्या सिनेमाच्या धाग्यावर सांगणं नको वाटतंय. >>> माझी हरकत नाही.
दुस-या म्हणजे बदला च्या धाग्यावर अंधाहून असे का ? माझा संबंध धक्कातंत्राशी होता. त्यातल्या शेवटच्या धक्क्यामुळे मागचे संदर्भ उलटेपालटे होतात आणि त्याची आवश्यकता नव्हती. बदला मधेही धक्कातंत्र वापरले आहे. कमी आहेत पण गुंगवले आहे. कहानी १ हा सिनेमा निर्दोष झालेला आहे.

रहस्यकथा लेखक कथेचा घाट कसा वापरतो हे महत्वाचे असते. सरळसोट पणे फ्लो मांडण्याऐवजी चौकशीतून घटना उलगडतात असा घाट घातला तर या घटना रिव्हर्स करताना त्याला पुन्हा पुन्हा त्या कथेत दोष राहतात का हे तपासून पाहणे जिकीरीचे असते. कधी कधी आपणच धक्क्यांच्या प्रेमात इतके पडतो कि एखादा बारीक दोष राहून गेला तर त्याकडे डोळेझाक होऊ शकते.

बोकलत यांनी निर्देश केलेली चूक याच पद्धतीची आहे. वेगवान सादरीकरणात ती समजून येत नाही.

बादल नाव जवळपास चाळीस वर्षांनंतर पुन्हा अमिताभकरिता वापरलं गेलंय - बी आर चोप्रांच्या जमीरनंतर...

सुरवातीला नैना अमिताभला सांगते की गाडीचा अपघात झाल्यावर अर्जुन गाडीजवळ गेला आणि त्याने सांगितले की सनी मेलाय नंतर तो नैनाला फोन नाही करून देत आणि सनीचा मोबाईल खिशात ठेवतो, नंतर शेवटी खरी स्टोरी अशी असते की नैनाच त्या गाडीजवळ प्रथम जाते आणि अर्जुनला जबरदस्ती करते पोलिसांना फोन वैगरे नको करू, म्हणजे सनीचा मोबाईल पण नैना जवळच असायला पाहिजे, अर्जुनकडे कसा येईल तो? >> हा एक अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट आहे अ‍ॅक्चुली. सुजॉय घोष ला विचारले पाहिजे.

कहानी १ हा सिनेमा निर्दोष झालेला आहे. >> एकदम सत्य बात. मला कहानी अक्षरशः २-३ वेळा पाहिल्याशिवाय पुरता समजला नव्हता... त्यात खोट काढायला अजिबात वाव नव्हता.

तो फोन चा किस्सा नैना ने सांगितला आहे,
तो कितपत खरा ते आपले आपण ठरवायचे
खरेतर अरजून सारखा संवेदनशील माणूस ( जो लगोलग पोलिसांना कळवायला निघालेला), त्यांच्या घरी जाऊन इतके निर्ढावल्या सारखे वागू शकेल का हा प्रश्न आहे

खऱ्या व्हर्जन मध्ये तो राणी च्या घरी गेला, आणि सनी चे त्यांच्याशी असलेलं नाते कळल्यावर तिकडून गुपचूप पळून गेला असेल कदाचित,
प्रत्यक्षात फोन नैनाकडे असेल आणि नंतर गाडी बरोबर पाण्यात गेला असेल

UK मध्ये जिकडे फारसे इंडियन दिसत नाहीत अशा सुनसान भागात ते एकमेकांना भेटतात, त्यांच्या घरापासून 15 मिन च्या अंतरावर, त्यामुळे आग्रह करून घरी घेऊन जाणे शक्य आहे.

जेंव्हा तो पहिला माणूस मदत पाहिजे का ते विचारायला येतो तेंव्हा सनीचा मोबाईल गाडीत वाजतो. त्या माणसाला संशय येऊ नये म्हणून अर्जुन जाऊन तो फोन उचलतो आणि इन्शुरन्सचा असल्याचे भासवत फोन स्वतःकडे ठेवतो. म्हणून तो फोन त्याच्याकडे असतो.
रसप, परदेशात कधी कधी आपल्या देशाची माणसं दिसली कि मदत करण्याची ईच्छा अनावर होत असावी .....

Pages