भोग भोगता आयुष्याचे

Submitted by पुरंदरे शशांक on 12 March, 2019 - 02:51

भोग भोगता आयुष्याचे

भोग भोगिता आयुष्याचे भोग कधि हे टळले का
उठून जाता क्षणात इथूनी उमजून काही आले का

माझे माझे म्हणता म्हणता दूर दूर ते गेले का
कोण नेमके दूर जवळचे कधीच नाही कळले का

अजून हाती यावे काही आस कधी ती थकली का
हातामधूनी निसटून जाता शिल्लक काही उरली का

मीच एकटा रसिक गुणी अन् दानशूरही मीच निका
वाजे डंका किती काळचा लोक बधीर हे झाले का

चढता पडता जरा ढकलता पुढेच ना मी गेलो का
चहूकडून अंधारुन येता कुठे जातसे कळेल का

भास पुराणे किती काळचे भ्रमणातूनि सरले का
सत्यत्वाचा भास जरासा दचकावून तो जातो का

(निका... खरा, मीच एकटा)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे माझे म्हणता म्हणता दूर दूर ते गेले का
कोण नेमके दूर जवळचे कधीच नाही कळले का

अजून हाती यावे काही आस कधी ती थकली का
हातामधूनी निसटून जाता शिल्लक काही उरली का>>> खुप सुरेख

अगदी मस्त जमला आहे फटका. अनंत फंदी यांची आठवण करुन दिली.

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यहि, गर्वभार हा वाहू नको
एकाहून चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको ॥

माणसाला अंतर्मुख करणे हे फटक्याचे वैशिष्ट्य... म्हणून त्याला फटका नाव पडले असावे.
हा फटका सुध्दा अगदी तसाच.
शालींनी अजुन भर घातली.
मी अजुन थोडी भर घालतो.
आम्ही आठवीत असताना बसवलेल्या पु. लं. च्या पुढारी पाहिजे एकांकिकेतला सुंदर फटका
Screenshot_2019-03-12-17-58-35-193_com.facebook.lite_.png (139.42 KB)
शालींनी दिलेला फटका शाहिर सांबळेच्या आवाजात
https://youtu.be/jT5qENLJaZI
हा अजुन एक सुंदर फटका
https://youtu.be/q922B-k_d1k