साधना - ३

Submitted by प्राचीन on 10 March, 2019 - 07:16

मागील भागात साधनेच्या विविध मार्गांचा उल्लेख झाला होता. साधनेचे हे जे मार्ग आहेत, त्यांचा खरा उपयोग पापक्षालनासाठी होतो. दुष्कर्मांचा नाश झाल्याखेरीज परमेश्वराच्या सन्निध जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही व साधनेचे हे एक अनिवार्य अंग आहे. यासाठी मागे ज्या मार्गांचा उल्लेख केलेला आहे, त्यांपैकी - मोठमोठे यज्ञ वगैरे सांप्रतच्या काळात होत नाहीत. तसेच उपवास, व्रते, प्रदक्षिणा यांचा हठयोगाशी संबंध आहे. त्यांच्या आचरणाने मनोधैर्य, सहनशक्ती वाढते.
व्रत म्हणजे काय , तर कर्तव्य म्हणून पाळला जाणारा विधायक किंवा निषेधात्मक निश्चय अशी मिताक्षरी टीकेत व्याख्या दिलेली आहे.
पुरुषाणां क्रियार्थानां शरीरधारणार्थो बलकरणार्थश्चायं संस्कारो व्रतं नाम। (मनुस्मृति शाबर भाष्य ४/३/८)
तीर्थयात्रेचा महिमा रामायण,महाभारत,पुराणादि ग्रंथांमध्ये वर्णिलेला आहे.
अभिसंगंम्य तीर्थानि पुण्यान्यायतनानि च ।
नर: पापात्प्रमुच्येत, ब्राह्मणाश्च तपस्विन:॥
सर्वा समुद्रगा: पुण्या: नगोत्तमा:।
सर्वत्रायतनं पुण्यं सर्वे पुण्या वनाश्रया:॥ (देवलस्मृति)

अर्थ – सर्व महानद्या, पर्वत, वनप्रदेश ही पुण्यप्रद अशी तीर्थस्थाने आहेत. मुमुक्षु तापसजन त्यांचे सेवन करतात व आपल्या पापांचे क्षालन करतात.
ख्रिश्चन लोक जेरुसलेम, तर मुस्लिम लोक मक्का व मदिना; बौद्ध लोक गया, सारनाथ इ. स्थाने पवित्र मानतात. हिंदू लोकांची तर अगणित तीर्थक्षेत्रे आहेत – अयोध्या,मथुरा,काशी, द्वारका बारा ज्योतिर्लिंगे,इ.
दानाचेही महत्त्व सर्व धर्मांत मान्य केलेले आहे. चरितार्थासाठी धनसंचय करणे गरजेचे असले तरी योग्य व्यक्तीला किंवा योग्य ठिकाणी दानदेखील करावे, ते पुण्यकारक मानले जाते. ज्याला दान द्यायचे, त्याच्याकडून परतफेडीची अपेक्षा नाही, असे दान सात्विक असते.
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्॥ (भगवद्गीता १७/२०)

परोपकाराचेदेखील महत्त्व आहे –
परोपकार: कर्तव्य: प्राणैरपि धनैरपि।
परोपकारजं पुण्यं न स्थातु क्रतुशतैरपि॥ -सुभाषित

सेवा,परोपकार यांमध्ये ऋणानुबंधांचे, जन्मानुजन्मीचे संचित कर्म नाहिसे करण्याची शक्ती असते. त्यांमुळे सामाजिक घटकांना तर लाभ होतोच, पण साधकाचीही साधनमार्गावर प्रगती होते.
साधनेची पूर्वतयारी
साधना विविध प्रकारच्या असल्या तरी त्या सर्व साधनांत काही प्राथमिक स्वरुपाचे नियम असतात. नियमांच्या पालनाच्या बाबतीत, परमेश्वराचे अस्तित्त्व व तो सर्व प्राणिमात्रांत अंशात्मकदृष्ट्या वास करत असतो, हे गृहीत धरले जाते. सर्व धर्मांत अशा तर्‍हेचे सर्वसामान्य नियम असतातच. सदाचाराचे अधिष्ठान हे सर्व धर्मांत असतेच. सदाचार म्हणजे सत्य ह्या तत्त्वावर आधारलेला, त्यास अनुसरून केलेला आचार. सत्य म्हणजे सत्स्वरुपाशी प्रत्यक्ष संपर्क व आस्तिक्य बुद्धी - त्या आस्तिक्य बुद्धीला स्मरून केलेला आचार. सत्याचे पालन, माता – पितरांचा आदर करणे, समाधानवृत्तीने राहणे, सज्जनांच्या संगतीत राहणे,विहित कर्माचे नियमपूर्वक पालन, दुष्कर्माचा तिरस्कार करणे, स्वत:च्या हातून वाईट कर्म झाल्यास त्याबद्दल लज्जा व पश्चाताप वाटणे, विनाकारण कोणाला त्रास न देणे, आत्मसंयमन, मधुर भाषण, कोणत्याही प्रसंगी मन स्थिर ठेवणे अशा तर्‍हेच्या आचरणास सदाचरण म्हणतात.
अष्टांगयोगामध्ये आत्मसंयमनाच्या ज्या पद्धती सांगितल्या आहेत, त्यांचा थोडक्यात विचार करू या.
यम – विचार व कृती यांसंबंधीचे निर्बंध, दंडक किंवा काय करू नये याचे आदेश. यांच्यामुळे चित्तशुद्धी होते.
अहिंसासत्यास्तयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:॥
अहिंसा – कोणत्याही प्राण्याची शारीरिक वा मानसिक हिंसा न करणे.
सत्य – सत्याने वागणे, खोटे आचरण (किंवा बोलणे) कधीही न करणे.
अस्तेय – चोरी न करणे
ब्रह्मचर्य – निसर्गाने निर्माण केलेल्या शब्द, स्पर्श,रस,गंध या पाचही विषयांच्या मोहाला आवरून ह्या विषयांच्या सेवनात संयम पाळणे.
अपरिग्रह – अनावश्यक गोष्टींचा संग्रह न करणे.
यमांना आनुषंगिक असे काही निर्बंध आहेत. उदा: मौन- अनावश्यक न बोलणे; क्षमा- सूडभावना न ठेवणे,
आहार – आहार मित व समतोल ठेवणे. ज्याची जशी प्रकृती असेल तसा आहार. (म्हणजे उष्ण – थंड, कफ-वात-पित्तप्रधान ) भूक लागल्याखेरीज न खाणे,सात्विक आहार ठेवणे इ.
गीतेमध्ये सात्विक आहार पुढीलप्रमाणे सांगितलेला आहे –
आयु:सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धना:।
रस्या: स्निग्धा: स्थिरा ह्रद्या आहारा: सात्विकप्रिया:॥ (१७.८)

सात्विक आहार म्हणजे जो सेवन केल्याने आयुष्य,बुद्धी,शक्ती,आरोग्य,सुख, स्नेह वाढतो व जो रुचकर,स्निग्ध,शरीरात मिसळून जाणारा मन प्रसन्न ठेवणारा असतो, तो.
निद्रा – दिवसा झोप न घेणे, रात्री फार न जागणे, पहाटे उठणे.
विहार – दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात व्यायाम घेणे, स्वत:चे शारीरिक काम स्वत; करणे, कोणतेही काम हलके न मानता करणे, साधी राहणी ठेवणे,इ.
नियम :- - साधकाने काय करावे या संबंधीचे विधायक आदेश. जसे शौच (स्वच्छता), जप (कोणत्याही देवतेच्या मंत्राचा जप ). ह्या जपाच्यादेखील तीन पद्धती आहेत. त्या म्हणजे, वाचिक, उपांशु व मानस.
वाचिक जप म्हणजे अर्थात् मोठ्याने नामोच्चारण करणे.
उपांशु जप म्हणजे नुसते ओठांची हालचाल होऊन इतरांना जप ऐकू येत नाही.
जो जप कोणालाही ऐकू येत नाही व केवळ मनातल्या मनात केला जातो, त्याबरोबरच अर्थाचेही चिंतन केले जाते,त्यास मानस जप म्हणतात.
याव्यतिरिक्त, वेदमंत्रांच्या पाठास स्वाध्याय म्हणतात.
तप या शब्दाचा सांप्रत कालानुसार अर्थ असा लावता येईल, की देव,गुरुजन,वडीलधारे,विद्वान यांची सेवा करणे, त्यांच्याकरिता कष्ट झाले तरी ते सोसणे;परोपकार करणे, (ऋत या विश्वव्यापी नियमानुसार, एखाद्याने केलेले सत्कृत्य कधीही वाया जात नाही, त्याचे साधनेच्या दृष्टीने महत्त्व हे, की मन व्यापक व्हायला मदत होते.)
वाचिक तप म्हणजे सत्य, अनुद्वेगकर, प्रिय परंतु हितकर बोलणे (जेव्हा अप्रिय पण हितकर बोलावयाचा प्रसंग येतो, तेव्हा तारतम्य बाळगणे जरूरी आहे).
मानसिक शौच / तप म्हणजे कोणाचाही मत्सर, द्वेष न करणे,मनानेदेखील व्यभिचार, दुराचार न करणे, मन प्रसन्न राखणे,मनाची साधनावर एकाग्रता असणे,इ.
नाथपंथीय योगसाधनेत यम आणि नियम ही अंगे प्राथमिक व अवश्यमेव मानली आहेत.
नियमांमध्ये दर्शविलेले बरेचसे आदेश साधारणपणे सुसंस्कृत कुटुंबांतून पाळले जातातच. कोणत्याही बंधनांचे पालन न करता, केवळ इंद्रियांचेच लळे पुरवणे व त्यांच्या लहरीप्रमाणे वाहवत जाणे म्हणजे पशुत्वच होय. शरीरापेक्षाही मन ताब्यात ठेवणे फार अवघड. ते स्वैरगामी असते. त्याचा निग्रह करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी दोन उपाय सुचविलेले आहेत, ते म्हणजे अभ्यास आणि वैराग्य.
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥ (भ.गी.६/३५)

प्रदीर्घ व सखोल ध्यानाने मन निर्विकार व एकाग्र करणे,अशी अभ्यासाची व्याख्या योगशास्त्रात दिलेली आहे. पण सामान्यत: अभ्यास याचा अर्थ, एखादा स्वभावधर्म अंगी आणण्याकरिता किंवा काढून टाकण्याकरिता निष्ठेने व चिकाटीने सतत केली जाणारी कृती होय. मग ते मंत्रांचा उच्चार करणे असो,की व्यायाम वा चांगले आचरण!
वैराग्य म्हणजे विरक्ती. दैहिक भावना पुरती विसरणे, शरीरधर्माविषयीची अनास्था,आपण केवळ देहीच नसून आपल्या देहामध्ये आत्मा हा पर्यवेक्षक आहे,याची सतत जाणीव असणे.
मुंडकोपनिषदात एक सुंदर रूपक दिलेले आहे. एका झाडाच्या फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत. एकमेकांचे ते अगदी जिवलग मित्र आहेत.एक पक्षी फळ खात आहे व दुसरा ते नुसते पाहत आहे.
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्य: पिप्पलं स्वद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिजाकशीति॥ (मुं.३.२)

जो पक्षी फळ खात आहे, तो जीव आणि जो पक्षी ते फळ खाताना नुसते पाहत आहे, तो ईश्वरांश आत्मा. जीव हा मायेच्या, अविद्येच्या आधीन आहे.तो देहधर्मात गुंतलेला आहे. दुसरा पक्षी आत्मरूप असून मायातीत आहे. म्हणून तो मुक्त,शक्तिमान व ज्ञानी आहे. पहिल्या पक्ष्याच्या खाण्याचे अवलोकनाने दुसरा पक्षी अलिप्तपणे राहूनही मानसिक समाधान अनुभवत आहे.
अशी विदेही भावना येणे कठीण आहे; पण त्याकरिता प्राणायाम,ध्यानधारणा यांचा उपयोग होतो. ह्यादृष्टीने शंकराचार्यांच्या आत्मषटकम् चे नित्य पठण केल्यास लाभ होतो. त्यांच्या मते, आपण माळेतील मण्यांप्रमाणे वेगवेगळे जन्म घेत आलेले आहोत; प्रवासी आहोत; निरनिराळ्या जन्मांतील देह म्हणजे मी नव्हे, हे सतत लक्षात ठेवायला हवे.याबाबतीत जे स्वैरगामी असे मन,त्याचाच याकरिता फार उपयोग होतो.जणु एक महान साधनच परमेश्वराने दिले आहे माणसाला !
परिचर्या –
बाल,तरूण व संसारी माणसांनी आपापले अभ्यास, प्रापंचिक कर्मे, व्यवसाय चालूच ठेवावेत. पण त्याबरोबरच वयाला व व्यवसायाला उचित अशी साधनाही करावी. साधनेतील शारीरिक भाग मध्यम व वयस्क यांनी झेपेल तसा करावा; जनसंपर्क शक्य तेवढाच ठेवावा; जिथे वर्दळ कमी आहे व निसर्गाचे सौंदर्य मनास उल्हसित करील, अशा ठिकाणी वास्तव्य करावे. मनाला संतोष वाटेल,साधनेला हुरूप यावा, त्यायोगे बुद्धी स्थिर व स्वस्वरूपी प्रतिष्ठित व्हावी, अशा ठिकाणी साधना करावी. शहरी भागात राहणार्‍या किंवा जागेची समस्या असणार्‍या साधकांनी राहत्या जागेतच एखाद्या कोपर्‍यात साधनेसाठी जागा तयार करावी. आपल्या इष्ट देवतेची मूर्ती,प्रतिमा किंवा चित्र समोर ठेवावे.त्याची पूजा करावी व त्यासमोर ध्यान,जप,पठण इ. करावे.दिवसाकाठी अर्धा तास तरी साधनेत व्यतीत करावा. अधिकस्य अधिकं फलम्। आपल्या दिनचर्येतील निवांत वेळ निश्चित करावी व शक्यतोवर पाळावी. स्थिरसुखमासनम्। यानुसार फार त्रासदायक होणार नाही अशी बैठक असली, की ध्यान चांगले लागते. खरं तर साधनेसाठी ब्राह्ममुहूर्त ही उत्तम वेळ आहे. म्हणजे सूर्योदयाच्या आधी सुमारे तीन तास. त्यावेळी जर योग्य प्रमाणात विश्रांती झाली असेल,तर मेंदू ताजातवाना होतो.शिवाय बाह्य व्यवधाने कमी असतात. (क्रमश:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा ही भाग सुरेख झाला आहे. छान माहिती दिली आहे.
माणूस आस्तिक असो वा नास्तीक, त्याने यम-नियम होता होईल तितके पाळायला हवेत. निदान कायीक नियम तरी पाळायचा प्रयत्न केला पाहीजे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

जाता जाता
नामस्मरणाचे चार प्रकार आहेत.
1. वैखरी
2. मध्यमा
3. पश्यन्ति
4. परा
नामस्मरणाची सुरवात ही वैखरी वाणीने होते. आणि साधना वाढेल तशी पुढील वाणीत जप होऊ लागतो.
स्पष्ट नामोच्चार करत जप करणे म्हणजे वैखरी.
मंद पुटपुटत लयीत जप करणे म्हणजे मध्यमा.
मनाने जप करणे म्हणजे पश्यन्ति. या वाणीत केलेला जप ह्रदयात सुरु असतो.
आणि सगळ्यात महत्वाची वाणी म्हणजे परावाणी. येथे साधक जप करत नाही. तो अंखड सुरु राहतो.

ंआत्मसाक्षात्काराचा कितीही ध्यास घेतला तरीही देहभावना जाणे इतकं सहजसाध्य नाही. चारीपैकी कोणतीही मुक्ती मिळविण्यासाठी सद्गुरुची खुप आवश्यकता आहे. केवळ तेच देहाध्यास दुर करु शकतात. साधना करणाराला प्रत्येक टप्प्यावर खाली घसरण्याचा खूप मोठा धोका असतो. ॠद्धि सिध्दी ,वाचासिध्दी अशा अनेक गोष्टी साधना करताना अडकवू शकतात. वित्तेषणे पेक्षा ही. लोकेषणा फार चिवट असते. मान मिळवण्यासाठी साधक आपली साधना पणाला लावू शकतो.
आजकालच्या कितीतरी बाबा लोकांनी चांगल्या हेतूने साधना सुरु केलेली असते पण सिध्द होण्याआधीच शिष्य बनवण्याची घाई करुन लोकेषणा, कामविकार यात अडकुन पडतात.

मी २०१६ साली संत बनायचे ध्येय ठेवले होते पण आजपर्यंत ०.०००१ टक्के सुध्दा प्रगती झाली नाही. साधे यम नियम पाळणे सुध्दा फार अवघड आहे. प्रयत्न करत राहणे केवळ आपल्या हाती आहे.

@शाली
मला वाटते वाणीचे चार वेगवेगळे प्रकार नसतात.

वाणी एकच असते.
ही मूळ वाणी म्हणजे परावाणी.
ती जेव्हा स्थूल होत जाते तेव्हा मग पश्यन्ती, मध्यमा, वैखरी असे म्हणतात.
पण सर्वांच्या मुळाशी परावाणी असतेच.

यातील परावाणी अर्थरूप असते.

के वी बेलसरे यांना वैखरी कनिष्ठ व परा श्रेष्ठ वाटत असे. तसे सांगत लिहीत असत. पण मग श्री महाराजांनी त्यांचा तो गैरसमज दूर केला. हा गैरसमज दूर केल्याचा उल्लेख मला वाटते अध्यात्म संवाद मधे आहे. कोणत्या भागात? ते आता आठवत नाही.

थोडक्यात वैखरी वाणीत जप करताना त्यामागे मध्यमा, पश्यन्ती व परा असतेच.
मध्यमेत जप करताना त्यामागे पश्यन्ती व परा असतेच. फक्त वैखरीचा लोप होतो.
पश्यन्तीमधील जपामागे परा असतेच फक्त मध्यमा व वैखरीचा लोप होतो.

यास्तव कोणताही प्रकार श्रेष्ठ कनिष्ठ समजू नये.
त्यामुळे साधना वाढेल त्याप्रमाणे पुढील वाणीत जप होतो असे समजणे संयुक्तिक वाटत नाही.
असो.

वाणी हे मानवाचे व्यक्त होण्याचे मुख्य साधन आहे आणि त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवणारे प्रमुख लक्षणही.

आपण जे तोंडावाटे बोलतो ती झाली वैखरी. माणसात ती खूप प्रगत असते पण इतर प्राण्यातही वैखरी असतेच. भीती, भूक, विणीचा हंगाम यानुसार प्राणीही मुखावाटे वेगवेगळे आवाज काढतच असतात. फक्त त्यांची भाषा माणसाएवढी प्रगत नसते.

मुखावाटे शब्द / आवाज उमटण्याआधी त्याचा एक आराखडा तयार होतो. हा आराखडा म्हणजे मध्यमा. प्राण्यांची मध्यमा खूप बेसीक असते पण मानवाची मध्यमा मात्र बरीच गुंतागुंतीची असते. कुठली बोली बोलायची, कुठले शब्द योजायचे, कुठली पट्टी वापरायची असा सगळा विचार मध्यमेत होतो.

मध्यमेचा आराखडा ज्या विचारावर / भावनेवर रचला जातो, तो तरल विचार म्हणजे पश्यन्ती. प्राण्यातच नाही तर वनस्पतीतही ही वाणी असते. बहुतेक माणसांत जे पश्यन्तीत आहे ते वैखरीत येतेच. फार कमी जणांना विचारावर ताबा ठेऊन बोलता येते आणि त्याहून कमी जणांना पश्यन्तीत वाईट विचार येउ न देणे जमते.

प्रत्येक येणार्‍या अनुभवाला कसे व्यक्त व्हायचे, त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे ठरवणारी रचना प्रत्येक सजीवात (फक्त माणसात नाही) असते. ही रचना म्हणजे परा. आपले डी.एन.ए., आपल्या भोवतालची परिस्थीती, आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव यांनी परा बनलेली असते. नीट बघितले तर यातले आपल्या हाती काहीच नसते. म्हणून साधनेने जेंव्हा नाम या पातळीपर्यंत पोहचते तेंव्हा आपल्या प्रत्येक व्यक्त होण्यात नामाचा पण अंश असतो.

शाम भागवत मी ढोबळमानाने वाणीचे प्रकार सांगीतले. श्रेष्ठ कनिष्ठ असा काही हेतू नाही. गैरसमज नसावा.

माधव अगदी सोप्या शब्दात सांगीतलेत.

जपाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर सखोल विवेचन हवे असेल तर प्रत्यगात्मनंद सरस्वती या बंगाली विद्वानांनी केवळ याच विषयावर जपसूत्रम नावाचे खंडात्मक ग्रंथ लिहिलेत. त्यातील भाग नेटवर स्कॅन केलेले मिळतील

प्रतिसाद व चर्चा यांबद्दल सगळ्यांचे आभार.. जास्तीची माहिती दिलीत जिद्दू.. सगळ्यांनाच उपयोग होईल