उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप

Submitted by कुमार१ on 3 March, 2019 - 22:36

खनिजांचा खजिना : भाग ७
(भाग ६: https://www.maayboli.com/node/69114)
******************
या अंतिम लेखात आपण ६ खनिजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
मॅग्नेशियम :
हा कॅल्शियम व फॉस्फरसचा हाडांमधला अजून एक साथी आहे.
आहारातील स्त्रोत:
हिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्ये, वाटाणा, चवळी, बदाम इ. ते भरपूर प्रमाणात असते.
शरीरातील कार्य
मॅग्नेशियम मुख्यतः पेशींच्या आत आढळते. हाडांत त्याचा बऱ्यापैकी साठा असतो आणि तो त्यांच्या बळकटीस उपयुक्त असतो. पेशींत ते जवळपास ३०० एन्झाइम्सचे गतिवर्धक म्हणून काम करते. याद्वारे त्याचे खालील क्रियांत योगदान असते:
* ऊर्जानिर्मिती
* DNA व RNA यांच्या उत्पादनात मदत
* मज्जातंतूंचे संदेशवहन आणि स्नायूंचे आकुंचन
* हृदयकार्यात मदत
* पॅराथायरॉइड हॉर्मोन (PTH) च्या कार्यावर नियंत्रण . याद्वारे ते रक्तातील कॅल्शियमच्या पातळीवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवते.

मॅग्नेशियमचा अभाव
आहारात ते विपुल प्रमाणात असल्याने सहसा त्याचा अभाव होत नाही. खालील विशिष्ट परिस्थितींत तो दिसतो:
पचनसंस्थेचे विकार
दीर्घकालीन मद्यपान
औषधांचे दुष्परिणाम: यांत काही मूत्रप्रवाह वाढवणारी औषधे (उदा. Lasix), जठराम्ल कमी करणारी औषधे (उदा. Esomeprazole) व काही कर्करोग विरोधी औषधांचा समावेश आहे.
*****
क्रोमियम
सूक्ष्म (मायक्रोग्राम) प्रमाणात लागणारे हे खनिज आपल्याला अख्खी धान्ये, मांसाहार, ब्रोकोली आणि द्राक्षातून मिळते. स्वयंपाकात जर स्टीलच्या भांड्यांतून अन्न शिजवले तर त्यातूनही ते मिळते.

शरीरातील कार्य:
आपली ग्लुकोजची रक्तपातळी स्थिर ठेवण्यात इन्सुलिन हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. क्रोमियम इन्सुलिनचा पेशींतील प्रभाव वाढवते. वाढत्या वयानुसार ग्लुकोजचा चयापचय मंदावतो. तो टिकवण्याचे बाबतीत क्रोमियम उपयुक्त आहे.
समज-गैरसमज
क्रोमियमचे वरील कार्य बघता त्याने संपन्न केलेली काही खाद्ये बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्टेरॉलने बाधित रुग्णांना फायदा होईल अशी जाहिरात केलेली आढळते. पण, अद्याप असे काहीही सिद्ध झालेले नाही.याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.
****
सेलेनियम
सूक्ष्म (मायक्रोग्राम) प्रमाणात लागणारे हे खनिज आपल्याला समुद्री अन्न, मांस, अख्खी धान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि कठीण कवचाच्या फळांतून मिळते.
शरीरातील कार्य:
ते सुमारे २ डझन प्रथिनांत असते. त्याद्वारे ते खालील कार्यांत मदत करते:
DNA चे उत्पादन
Antioxidant कार्य
जननेन्द्रीयांचे कार्य
थायरॉइड हॉर्मोन्सना मदत.

अभावाचे परिणाम: हे फारसे दिसत नाहीत. जगाच्या काही भागांत त्याच्या अभावाने हृदयस्नायूचा दुबळेपणा आणि पुरुष वंध्यत्व झाल्याची नोंद आढळते.
समज-गैरसमज
काही कर्करोग, करोनरी हृदयविकार आणि थायरॉइडच्या आजारांत ते प्रतिबंधात्मक असते का यावर उलटसुलट संशोधन निष्कर्ष आहेत. त्यामुळे सध्या कोणतेही मत देता येत नाही.
***

आयोडीन
याचे शरीरातील एकमेव कार्य म्हणजे थायरॉइड हॉर्मोन्सचा घटक असणे हे होय. यावर मी यापूर्वीच स्वतंत्र लेख लिहीला आहे (https://www.maayboli.com/node/65228).
***
कोबाल्ट
याचे शरीरातील एकमेव कार्य म्हणजे कोबालामिन(ब-१२)या जीवनसत्वाचाचा घटक असणे हे होय. यावर मी यापूर्वीच स्वतंत्र लेख लिहीला आहे (https://www.maayboli.com/node/68838).

गंधक(S) :
१. हे शरीराच्या विविध पेशींत असते. मुख्यत्वे ते काही अमिनो आम्लांचा घटक आहे. यांच्यापासूनच आपली प्रथिने बनतात.
२. रोज अन्नातून शरीरात अनेक घातक पदार्थ जात असतात. आपल्या यकृतात त्यांचा निचरा करणारी यंत्रणा असते. त्यासाठी जी रसायने लागतात त्यापैकी active sulphate हे एक महत्वाचे आहे.
३. इन्सुलिन, ब-१ जीवनसत्व यांसारख्या महत्वाच्या पदार्थांत गंधक असते.
आहारातून पुरेसे गंधक मिळण्यासाठी उच्च प्रथिनयुक्त आहार महत्वाचा. लसूण, कांदा व ब्रोकोलीतही ते चांगल्या प्रमाणात असते.
*******
तर अशी ही शरीरास उपयुक्त खनिजे. त्यांची अनेकविध कामे आपण आतापर्यंत पाहिली. पेशींतील मूलभूत कामकाज, शरीरसांगाड्याची बळकटी आणि अनेक प्रथिनांचे घटक असणे ही त्यापैकी महत्वाची. याबरोबरच उपयुक्त खनिजांचे विवेचन संपले.
***
आता दोन शब्द निरुपयोगी व घातक खनिजांबद्दल. ही खनिजे आपल्या अन्नपदार्थांतून, काही तयार पदार्थांच्या पॅकिंगमधून, प्रसाधानांतून तर अन्य काही नकळतपणे आपल्या शरीरात जातात. त्यापैकी काहींची ही यादी:
अ‍ॅल्युमिनियम, अर्सेनिक, ब्रोमिन, कॅडमियम, शिसे, पारा, चांदी आणि स्ट्रॉन्शियम.
जर ही दीर्घकाळ जास्त प्रमाणात जात राहिली तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. त्यांत प्रामुख्याने कर्करोग, मेंदूविकार, मूत्रपिंडविकार आणि हॉर्मोन्सचा बिघाड यांचा समावेश आहे. याबाबतचे विवेचन मी माबोवरील यापूर्वीच्या अन्य काही लेखांत केलेले आहे.
*****************************************
समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली रक्तपातळी स्थिर ठेवण्यात इन्सुलिन हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. >>> इथे साखरेची पातळी हव ना?

चांदी शरीराला घातक असते? म्हणजे चांदीच्या फुलपात्रातून पाणी पिणे, चांदीच्या ताटात जेवणे इ. राजेशाही पद्धती चुकिच्य होत्या?

माधव, धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.

चांदीचे शरीरात जाणारे प्रमाण महत्वाचे. ताट, वाटी, भांड्यातून जाणारे प्रमाण नगण्य असते. पण मिठाईला त्याचा वर्ख लावणे अयोग्य.

… तसे पूर्ण निसर्गस्नेही व्हायचे असल्यास केळीच्या पानावर जेवणे उत्तम ! ☺️

किल्ली,
नियमित प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार !