कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

Submitted by कुमार१ on 22 January, 2019 - 23:37

जीवनसत्वे : भाग ७

(भाग ६ : https://www.maayboli.com/node/68772)
**************************************

‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते.
ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे.

आहारस्त्रोत
:

b12.jpg

ब-१२ चे बाबतीत एक मूलभूत गोष्ट म्हणजे कुठल्याही वनस्पतीत ते नसते. पण, जर पालेभाज्या रसायनमुक्त शेतीतून निर्माण केल्या तर त्यांच्यात काही उपयुक्त जीवाणू राहतात आणि त्यांच्या माध्यमातून या भाज्यांत ब-१२ येते. तसेच शिळ्या अन्नातही जीवाणूंची वाढ होते आणि अशा अन्नसेवनातून ते आपल्याला मिळू शकते.

प्राणिज पदार्थ मात्र भरपूर ब-१२ पुरवतात. यकृत, अंडे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे त्याचे महत्वाचे स्त्रोत.
यीस्ट हाही एक त्याचा वैशिष्ट्यपूर्ण स्त्रोत. त्याचा वापर करून बनवलेले शाकाहारी पदार्थ हा अशा लोकांसाठी दिलासा असतो. ‘व्हेगन’ खाद्यशैलीतून मात्र ते मिळणे अवघड असते. अलीकडे ब-१२ ने ‘संपन्न’ केलेली काही खाद्यान्ने बाजारात मिळतात.

ब-१२ चे पचनसंस्थेतून शोषण:
हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. अन्नातले ब-१२ प्रथिनांशी घट्ट संयोग झालेले असते. प्रथम ते जठरात येते. तिथल्या हायड्रोक्लोरिक आम्ल आणि एन्झाइमच्या मदतीने ते सुटे केले जाते. नंतर तिथले IF नावाचे एक प्रथिन त्याच्याशी संयुग पावते. ही एक आवश्यक क्रिया आहे. पुढे हे संयुग लहान आतड्यांतून मार्गक्रमण करीत आतड्याच्या शेवटच्या भागात पोचते. तिथे त्याचे विघटन होऊन ब-१२ शोषले जाते. पुढे ते रक्तप्रवाहातून यकृतात पोचते आणि तिथे त्याचा मोठ्या प्रमाणात साठा होतो. पुढे ते गरजेनुसार सर्व शरीराला पोचवले जाते.

शरीरातील कार्य :
अन्य ‘ब’ जीवनसत्वांप्रमाणेच तेही काही रासायनिक क्रियांमध्ये सह-एन्झाईमचे काम करते.
१. याद्वारे ते पेशींतील DNA व RNA या मूलभूत रेणूंच्या उत्पादनात मदत करते. याकामी त्याला फोलिक असिड या अन्य ‘ब’ जीवनसत्वाचीही मदत होते.
२. मज्जातंतूंच्या कामातही त्याचे योगदान आहे.

३. अलीकडील संशोधनातून त्याचा हाडांच्या आरोग्यासाठीही संबंध असल्याचे दिसले आहे. ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते.

अभावाची कारणे
:
१. अतिशुद्ध शाकाहारी (व्हेगन) खाद्यशैली: गेल्या दोन दशकांत हा खूप कुतूहलाचा व चर्चेचा विषय झालेला आहे. येथे काही मुद्दे लक्षात घ्यावेत. सहसा जन्मल्यापासून कुणीच अशी शैली आचरत नाही. तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्राम इतकीच आहे. पुन्हा आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील.

२. जठरातील पेशींची वयानुरूप झीज होते आणि त्यामुळे वृद्धांमध्ये IF चे उत्पादन कमी होऊ लागते. तसेच अन्य काही आजारांमध्येही अशी झीज होते.
३. पचनसंस्थेचे काही आजार : यांत ब-१२ चे शोषण नीट होत नाही.

४. IF ची अनुवांशिक कमतरता : हा ऑटोइम्युन प्रकारातील आजार आहे.
५. अलीकडे लठ्ठपणा कमी करण्यासाठी पचनसंस्थेवर काही शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यात जठराचा काही भाग काढून टाकला जातो. त्यामुळे IF चे प्रमाण खूप कमी होते आणि त्याचा परिणाम ब-१२ चे शोषणावर होतो.

अभावाचे परिणाम:
शरीरातील सर्वच पेशींच्या वाढीवर परिणाम होतो परंतु, तो लालपेशी आणि मज्जासंस्थेवर प्रकर्षाने दिसून येतो. रुग्णात साधारण खालील लक्षणे दिसतात:
१. रक्तक्षय आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा: हा रक्तक्षय लोहाच्या कमतरेतून होणाऱ्यापेक्षा वेगळ्या प्रकाराचा असतो. यात लालपेशी मोठ्या आणि विचित्र आकाराच्या होतात.

२. हातापायांना ‘मुंग्या’ येणे आणि चालताना अस्थिर वाटणे: मज्जारज्जू व मज्जातंतूवर दुष्परिणाम झाल्याने हे होते.
३. काही रुग्णांत मनस्वास्थ्य बिघडू शकते आणि विस्मरण होते.

४. वृद्धावस्थेत हाडे ठिसूळ होणे.

वृद्धावस्था आणि ब-१२ चा पुरवठा:
या अवस्थेत जठराची पचनशक्ती बरीच कमी झालेली असते. त्यामुळे नैसर्गिक आहारातील ब-१२ शरीरात नीट शोषले जात नाही. याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते. त्यामुळे अशा स्त्रोतांचा वापर वृद्धांमध्ये गरजेनुसार जरूर करावा.

‘ब १२’-ची रक्तपातळी:
अलीकडे समाजात रक्तावरील चाळणी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याची जाहिरातबाजीही भरपूर होते. काही वेळेस गप्पांतून अशी टूम निघते की, “शाकाहारी आहात ना, मग मग घ्या एकदा ब-१२ मोजून”. पण वैद्यकीय सल्ल्याशिवाय या फंदात पडू नये. याची काही कारणे आहेत.

ब-१२ मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. आंतरराष्ट्रीय पद्धती सतत विकसित होत असतात, पण गरीब देशांत त्या वेगाने प्रस्थापित होत नाहीत. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरेचदा जुळणारी नसते. काही वेळेस पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास नसेल तर उठसूठ या चाचणीच्या फंदात पडू नये.
********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला हा ही लेख.
शेवटच्या परिच्छेदातला त्रास म्हणजे 'अभावाचे परिणाम' मधल्या ४ गोष्टी की अजूनही काही.

खेळाडूंच्या पर्फोर्मन्स आणि रिकव्हरी संदर्भाने ह्याचे काही खास महत्व असते का? का?

ब१२ चे सप्लिमेंट्स घ्यायची असतील तर काही जण methylcobalamin चांगले म्हणतात तर काहीजण cyanocobalamin. कोणते चांगले?

माझ्या बायकोला मधुमेह आहे आणि मधुमेहाच्या औषधांव्यतिरिक्त प्रेव्हेंटिव्ह मेजर म्हणून डॉक ने मुख्य methylcobalamin घटक असलेल्या गोळ्या सुरू केल्या आहेत Nueromed D. कधी वाटते यांची खरच एवढी गरज असेल का D व्यतिरीक्त.

हर्पेन, धन्यवाद.
त्रास म्हणजे 'अभावाची कारणे' मधल्या ४ गोष्टी की >>> बरोबर.

खेळाडूंच्या रिकव्हरी संदर्भाने ह्याचे काही खास महत्व असते का? >>>
मला नाही वाटत. तिथे मुख्यतः प्रथिने, ब१ व ब६ चे महत्व आहे. तसेच 'रिकव्हरी'चा अर्थ स्पष्ट झाला पाहिजे. जखम भरणे वगैरे असेल तर अन्य काही घटक महत्वाचे असतील.

मानव, धन्यवाद. चांगले प्रश्न.

१. काही जण methylcobalamin चांगले म्हणतात तर काहीजण cyanocobalamin. कोणते चांगले? >>>
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन्हीच्या कार्यक्षमते मध्ये फारसा फरक नाही. दोनातील कोणतेही औषध घ्या. काही फरक पडणार नाही. तेव्हा किमतीतला फरक बघून ठरवणे !

२. माझ्या बायकोला मधुमेह आहे आणि मधुमेहाच्या औषधांव्यतिरिक्त प्रेव्हेंटिव्ह मेजर म्हणून डॉक ने मुख्य methylcobalamin घटक असलेल्या गोळ्या सुरू केल्या आहेत >>>

बरोबर. मधुमेह उपचारासाठी Metformin ही गोळी बहुसंख्य रुग्णांना सुरवातीस दिली जाते. तिच्यामुळे ब-१२ चे नैसर्गिक शोषण कमी होते व त्यामुळे त्याची कमतरता होते.

Metformin ही गोळी बहुसंख्य रुग्णांना सुरवातीस दिली जाते. तिच्यामुळे ब-१२ चे नैसर्गिक शोषण कमी होते व त्यामुळे त्याची कमतरता होते.>>>
ओह! उपयुक्त माहिती, धन्यवाद डॉक्टर!

'रिकव्हरी' म्हणजे जखम भरणे वगैरे असे अपेक्षित नाहीच, खेळल्यानंतर होणारी दमणूक जाऊन नवीन जोमाने परत तयार होणे अशा अर्थी विचारायचे होते

धन्यवाद डॉक्टर.

थो डे अवांतर होइल प ण खुप दिवसांपासून एक शन्का आहे ती विचारतेच आता
आपल्याला बन्द पिशवीतून जे दुध मिळते त्यावार pasteurization, homogneization केलेले असते, तसा पाकिटावर उल्लेख्ही असतो
ह्या प्रक्रियेमुळे दुधामधील पोषकतत्वे नाहीशी होतात का?
वैयक्तिक्रित्या गवळ्यांकडून किवा डेअरीमधून मिळणारे दुध जास्त चांगले असते असा समज आहे, खरा आहे का?
दुशात साखर वगिरे काहीही न टाकता प्यावे असं म्हणतात,
कुठल्या स्वरूपात शरीरात दूध गेले पाहिजे?
उद्देश असा की त्यातील पोषक्तत्वे टिकली पाहिजेत

चांगला लेख.

कुठल्या स्वरूपात शरीरात दूध गेले पाहिजे?>>>>>> नुसते दूध देऊ नका,त्याबरोबर शिरा/केळे वगैरे द्या असे एका पेडीने मुलगा लहान असताना सांगितले होते.त्याबाबत काय कारण असावे? अवांतर होतंय्,क्षमस्व!

किल्ली, धन्यवाद. चांगले प्रश्न.
१. Pasteurization ह्या प्रक्रियेमुळे दुधामधील पोषकतत्वे नाहीशी होतात का? >>

तूर्त आपण फक्त जीवनसत्वासंबंधी बोलू. Pasteurization दरम्यान तापमान ६३ सें. असते. त्यामुळे त्यातील ब- १ व १२ अवघ्या १०% ने कमी होईल. ‘क’ चा नाश अधिक होईल पण ‘क’ साठी आपण दुधावर अवलंबून नसतोच.

२. वैयक्तिक्रित्या गवळ्यांकडून किवा डेअरीमधून मिळणारे दुध जास्त चांगले असते असा समज >>>>
मोठे व्यावसयिक दूध उद्योग दुधात काही रसायने मिसळतात असे “ऐकिवात” आहे. गवळी त्यात फारतर पाणीच मिसळत असावेत असा अंदाज ! ख खो तेच जा.

३. दुधात साखर वगिरे काहीही न टाकता प्यावे असं म्हणतात, >>>
मला कल्पना नाही. आहारतज्ञाचे मत घ्यावे.

सारांश: दूध व त्याचे पदार्थ आवडतील त्या स्वरुपात खावेत. पोषणमूल्यात फरक पडणार नाही
. हे मा वै म.

एका वेबिनारमध्ये कळले की ४० - ५० वर्षांपूर्वी नदी, ओढा, विहिरी यांचे पाणी गाळून पीत असत तेव्हा पाण्यातूनच ब-१२ आणि ते बनवणारे जिवाणू आपल्याला मिळत.
परंतु दूषित पाण्यामुळे रोगराईही पसरत असे. पटकी रोगाची लागण दूषित पाण्यामुळे होत असे आणि कित्येक जण दगावत.
तेव्हा पाण्याच्या शुद्धीकरणास पाण्यात क्लोरीन मिसळले जाऊ लागले. (मला आठवते की लहानपणी गावी म्युनिसिपालिटीचे लोक येऊन विहिरीत क्लोरीन पावडर टाकत.) त्यामुळे पटकी आणि इतर रोगांचा नायनाट झाला. पण पाण्यातून मिळणारे ब१२ बंद झाले.
व्हेजिटेरीयन लोकांनी चाळीशी की पन्नाशी नंतर ब१२ चे सप्लिमेंट्स घ्याच असे त्यांनी सांगितले. न्यूट्रिशनल यीस्ट किंवा गोळ्या.

मानव, सहमत.
जलशुद्धीकरणा च्या जय अत्याधुनिक पद्धती आहेत त्यातून असे काही तोटे झाले आहेत.
** वेबिनार ">>>>
हा शब्द एकदम चिकणा आहे ☺️

या मालिकेतील सगळेच लेख उत्तम आहेत. या लेखाची मात्र विशेष वाट पहात होते. कारणं दोन-
एका ऑफिसच्या mandatory मेडिकल मध्ये मला B12 डेफिशिअन्सी दिसत होती, तेव्हा मला D आणि B12 देण्यात आलं होतं. D का ते आठवत नाही, कदाचित सकाळी '8 ते रात्री वाटेल ती वेळ' असं AC मध्ये बसून D चा पण अभाव असेल. आणि कोणीतरी एक कमेंट केली होती की B12 च्या अभावामुळे वजन वाढतं, त्यामुळे मी घाबरले होते. मी जाड नाही आणि माझ्यासाठी जाड होण्यासारख दुसरं दु:स्वप्न नाही. Happy

दुसरं कारण एअरपोर्टवर ऐकलेलं एक डॉक्टर आणि तिची मैत्रीण यांचं संभाषण. ती डॉक्टर हेल्दी हेअर आणि हेअर ग्रोथ साठी आयर्न आणि B12 सप्लिमेंट बद्दल काही बोलत होती. फार ऐकू आलं नाही, पण केस आणि रिलेटेड विषय बायकांसाठी नेहमीच इंटरेस्टिंग असतात.

माबोकरांचे प्रश्न आणि त्यावरचे तुमचे प्रतिसादही उपयोगी आणि माहितीपूर्ण असतात. पुन्हा एकदा आभार

मीरा, धन्यवाद.
तुम्हा सर्वांच्या सहभागानेच चर्चा रंगतदार होत आहेत.

B12 च्या अभावामुळे वजन वाढतं >>>> कसं काय बुवा, मलाही जाणून घ्यायला आवडेल ! ☺️

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख व उपयुक्त चर्चा. बऱ्याच शंका दूर झाल्या.
एक भाबडा प्रश्न, डॉक्टर.
या मालिकेत तुम्ही बी-१ वरून एकदम बी-१२ वर उडी मारली आहे. म्हणजे मधल्या नंबरची बी इतकी महत्त्वाची नाहीत का ?

कसं काय बुवा, मलाही जाणून घ्यायला आवडेल ! >>>>. मला माहित नाही. माझा डेफिशिअन्सी रिपोर्ट पाहिल्यावर अशी कमेंट ऐकली होती. आजुबाजुला quacks ची कमी नसते. Happy

साद, धन्यवाद.
सर्वच जीवनसत्वे महत्वाची आहेत. ब-१ व १२ वर स्वतंत्र लेख लिहीण्याइतका मजकूर आहे एवढेच. बाकीची 'ब' यापुढील एका लेखात घेणार आहे.

मीरा,
आजुबाजुला quacks ची कमी नसते.>> + १११ .
सध्या स्वघोषित तज्ञांची कमी नाही !

मधुमेह उपचारासाठी Metformin ही गोळी बहुसंख्य रुग्णांना सुरवातीस दिली जाते. तिच्यामुळे ब-१२ चे नैसर्गिक शोषण कमी होते व त्यामुळे त्याची कमतरता होते.>>>>>>>>>>> ओह ही माहिती नवीन आहे. माझं ब-१२ नॉर्मल आहे. आता लक्ष ठेवीन कारण गेले ७-८ महिने Metformin सुरू केलेय.

धन्यवाद डॉक्टर! माझ्या आईची तोंडाची चवपूर्णपणे गेली होती. अगदी पाणी सुद्धा कडू लगे. तिने ब -१२ supplements सुरु केल्यावर तीला चव लागू लागली अन्नाची. हे खरोखरच ब -१२ ने झाला असेल का? का अन्य काही कारणे ?

सेव्हेरस स्नेप,
ब १२ कमतरतेमुळे भूक मंदावू शकते. तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर रुग्ण तपासणी केल्यावरच देता येईल. त्यांना कदाचित अनेक ब जीवनसत्वांची कमतरता झाली असावी.
सहज ......
तुमच्या सदस्य नामाचा अर्थ ? ☺️

मध्यंतरी पायाचे fracture झाले होते त्यानंतर डॉ नी मला Ca, डी व बी-१२ विटामिन असे सर्व लिहून दिले होते. त्याचे महत्व आता समजले.
पु भा प्र

वेबिनार ">>>>
हा शब्द एकदम चिकणा आहे ☺️ >>>>
web + seminar चा जोडशब्द आहे. कॉर्पोरेटवाल्याना चिकणा नाही वाटत. एका देशातल्या लोकांनी ग्लोबल ऑडियन्स साठी कंडक्ट केलेलं असल्याने काही पण वेळ असते. पण तुमची कंपनी, तुमचे बॉसेस तुम्ही अटेंड करावं अशी अपेक्षा करतात. तिथलं नॉलेज आणि चर्चा उपयोगी पडतात.

अतिशय उत्तम माहिती. मी असेही ऐकले आहे की ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे ब१२ शोषून घ्यायची प्रक्रिया देखिल मंदावते. त्यामुळे कालांतराने ड आणि ब१२ हे एकत्रितपणे कमी आढळतात. ह्या लॉजिकमध्ये कितपत तथ्य आहे?

साद,
हाडांच्या दुखण्यांसाठी Ca, D &B-12 हा त्रिवेणी संगम आहे !

मीरा, सहमत.तसाच एक जोडशब्द म्हणजे feminar. बायकांच्या सेमिनारसाठी .

शंतनू, धन्यवाद.
तुम्ही म्हणता ते ड व ब-१२ संबंधी सध्या गृहीतक आहे. पूर्णपणे सिद्ध झाल्याचे अधिकृत संदर्भ मिळाले नाहीत. तरी लक्ष ठेवीन.

माझ्या पत्नीची splin काढलीय. तिला folvite घ्यावे लागते रोज. तिला infection होऊ नये म्हणून वर्षातून एकदा कुठलेतरी एक इंजेक्शन सांगितले होते पण आता तो प्रेस्क्रीप्शन पेपर मिळत नाही. तुम्ही सांगू शकता की हीमॅटोलॉजिस्टला विचारावे?

हाही लेख सुरेखच... धन्यवाद...

दत्तात्रय, धन्यवाद.
रुग्णास प्रत्यक्ष न बघता कुठलाही सल्ला जालावरून देणे अयोग्य आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या डॉ. नाच विचारावे.
शुभेच्छा !

Pages