पु.लं. स्पर्श - विशेष लेख - शाली

Submitted by मभा दिन संयोजक on 2 March, 2019 - 01:46

सांगायचं म्हटलं तर ‘अफाट’ या एकाच शब्दात पुलंची कहाणी सांगता येईल पण लिहायचं ठरवलं तर मात्र हजारो
पानांचे खंड लिहूनही त्यात पुलंना पकडता येईलच याची खात्री नाही. काय लिहायचं भाईंविषयी? त्यांच्या
लेखनावर लिहायचं की त्यांच्या संगीतावर लिहायचं, त्यांच्या अभिनयावर लिहायचं की एक माणूस म्हणून
त्यांच्यातल्या नैतिकतेविषयी लिहायचं, दातृत्वाविषयी लिहायचं की समाजाचे ऋण फेडण्याच्या त्यांच्या
प्रामाणिक वृत्तीबद्दल लिहायचं? एका माणसात खरं तर किती गुण विधात्याने द्यावेत याला काही मर्यादा
असतात. पण त्या सर्व मर्यादा ओलांडून ईश्वराने त्यांना घडवलं असावं असं वाटतं. ‘व्यर्थ जन्मास आलो’ असं
वाटायला लावणाऱ्या या काळात पुलंची नुसती आठवण आली तरी असं वाटतं की माझं भाग्य म्हणून मी या
पुरुषोत्तमाच्या कालखंडात जन्मास आलो. माझ्या आयुष्यातील काही वर्षांना त्यांचा जवळून स्पर्श झाला. या
माणसाला कधीही देशाची सीमा आडवी आली नाही की कधी भाषा आडवी आली नाही. जात, धर्म, वर्ण यांची कधी
अडचण आली नाही की विशिष्ट विचारसरणीची बाधा आली नाही. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर’ तेथे तेथे
पुलंनी मुक्तसंचार केला. मनमुराद आस्वाद घेतला. आणि महत्वाचे म्हणजे या सर्व प्रांतात मुसाफिरी करताना
त्यांनी सदैव मराठीपण जपले. समाजात असलेल्या काही दांभिक वृत्तींवर अतिशय परखड शब्दात लिहिताना
त्यांनी कधीही स्वतःचे संतुलन ढळू दिले नाही. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर

जगभरच्या अनेक देशांत
देशस्थ होऊन फिरले
पण मनातील मराठीपणा
कधी मावळला नाही-

दुनियेच्या बाजारपेठेत
मनमुराद वावरले
पण काळजातील बुध्द
कधी काजळला नाही

विनोदी लेखन हा पुलंच्या अनेक पैलूंपैकी फक्त एक पैलू आहे. खरे पुलं त्यापलीकडे कितीतरी आहेत.
भाईंचे आजोळ तसे पहायला गेले तर गोवा. पण काही कारणाने ही दुभाषी मंडळी कारवारला स्थलांतरित झाली.
भाईंनी ’गणगोत’मध्ये ‘ऋग्वेदी’ नावाने आजोबांविषयी लिहिले आहे. या ऋग्वेदींचा म्हणजेच वामन दुभाषी
यांचा जन्म कारवारला झाला. ह्यांचीच एकुलती एक मुलगी कमल म्हणजेच भाईंची आई. कमल बेळगावच्या
(चंदगड) लक्ष्मण देशपांडे यांच्या पत्नी म्हणून आल्या. या लग्नाअगोदर लक्ष्मणरावांचे एक लग्न झाले होते.
पहिल्या पत्नीपासून त्यांना वत्सला नावाची मुलगीही होती. ही वत्सला भाईंची सावत्र बहीण असली तरी

त्यांच्यात फार जिव्हाळ्याचे नाते होते. भाई कधीही दादरला त्यांच्या या वत्सीताईकडे जात. या वत्सीताईचाही
आपल्या बाबूलवर फार जीव होता. सावत्रपणा कधी या भावा-बहिणींच्या आड आला नाही. आईनंतर भाईंना
‘बाबूल’ म्हणून हाक मारणारी वत्सीताई ही एकमेव व्यक्ती होती. भाईंमध्ये असलेले संगीताचे वेड हे आईकडून
आलेले. आईंचा आवाजही अतिशय सुरेल होता. त्या पेटीही वाजवत असत. वडिलांनाही गाण्याचे प्रचंड वेड.
फिरतीची नोकरी असल्याने बरेचदा ते बाहेरच असत. कुटुंबावर निस्सीम प्रेम करणारा हा माणूस व्यवहारात
अतिशय सचोटीने वागणारा होता. नाटकांचे तर त्यांना प्रचंड वेड. बालगंधर्व म्हणजे तर त्यांचे गाण्यातले देवच
होते. पण भाईंवर कलेचे खरे संस्कार झाले ते आजोळकडून. एकूण दुभाषी कुटुंब हे कलेची आवड जोपासणारे.
आजोबा कीर्तन सुरेख करत. आज्जी तर अगदी हजरजबाबी आणि विनोदाची उत्तम जाण असलेली होती. भाईंनी
’गणगोत’मध्ये आज्जीविषयीही अगदी भरभरुन लिहिले आहे. या ‘बाय’नेही भाईंवर नकळत अनेक संस्कार
केले. आधी बेळगाव, मग मुंबईत जोगेश्वरी आणि नंतर पार्ल्याला हे कुटुंब स्थिरावले. पार्ल्यामध्ये देशपांडे
आणि दुभाषी या दोन्ही कुटुंबांनी अगदी शेजारी शेजारी घरे बांधली. पुढे पार्ल्याचा हा ‘अजमल रोड’ भाईंमुळे
अगदी सामान्य माणसालाही माहीत झाला. भाईंच्या पार्ल्याच्या वास्तव्यामधल्या आठवणी त्यांच्या लेखनात
अनेक ठिकाणी आढळतात. पार्ल्यातल्या दिवसांना भाईंच्या आयुष्यात फार महत्वाचे स्थान होते. मॅट्रिक
झाल्यानंतर पुलंनी जोगेश्वरीच्या ‘इस्माईल युसुफ कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजनेही पुलंना अगदी
भरभरुन दिले. मर्ढेकर या कॉलेजमध्ये त्यावेळी इंग्रजी हा विषय शिकवत. कॉलेजचे शिक्षण संपल्यानंतर भाईंनी
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली. आबांची फार इच्छा होती की आपल्या या
मुलाने वकिल व्हावे. साधारण याच काळात भाईंची ओळख ‘रेडिओ’ या नव्या माध्यमाशी झाली. भाईंनी स्वतःच
सांगितलंय की “बातम्या आणि बाजारभाव सोडून सगळं मी केलं” त्यांचे रेडिओवर गाणी, नाटकं, भाषणं वगैरे
सुरु होते. मित्रांबरोबर गाण्याच्या बैठकी रंगत होत्या. याच दरम्यान भाईंच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांना
नाईलाजाने पार्ल्याहून पुण्यात शिफ्ट व्हावे लागले. पुण्यात आल्यानंतरही पुलं शांत बसले नाहीतच. त्यांनी
फर्ग्युसनला धमाल सुरु केली. पुण्यात त्यावेळी गणपतीचे दहा दिवस गाण्यांची अगदी चंगळ असे. रोशनआरा
बेगम, हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीमखाँ, मास्टर कृष्णराव यांच्यासारख्या दिग्गजांच्या स्वरांनी सगळ्या
पुण्याचा माहोल कसा भारावून जात असे. भाईंसाठी हे दहा दिवस म्हणजे अगदी पर्वणीच असत. या पुणे
मुक्कामीच त्यांना केशवराव भोळे आणि जोत्स्नाबाई यांची सोबत-संगत मिळाली. हा मजेचा काळ सुरु होता. पुढे
भाई बेळगावला गेले. तेथल्या आर्ट सर्कलमध्ये रमले. खरं तर मुंबई काय, पुणे-सांगली काय किंवा बेळगाव काय,
भाईंना काहीच फरक पडत नव्हता. त्यांनीच म्हटल्या प्रमाणे ‘रांगोळीचा कण जेथे पडतो तेथे आपला रंग घेऊन
पडतो’ या उक्ती प्रमाणे ते जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी माणसे जोडली, आवडत्या कामात मन रमवले आणि
तेथील तिळतांदूळ संपताच पुढच्या मुक्कामाकडे अत्यंत आनंदाने प्रस्थान ठेवले. बेळगावच्या आर्ट सर्कल मधे
रमलेले पुलं पुन्हा एकदा पुण्याला आले.

मुंबईला असताना ओरिएंट हायस्कूलमध्ये भाई शिकवत असताना त्यांनी सत्तेचे गुलाम हे नाटक बसवले होते.
त्याच हायस्कूलमध्ये ठाकूरबाईही शिकवत होत्या. या नाटकामुळे ठाकूरबाईंची आणि पुलंची जवळीक जरा
जास्तच वाढली. आणि शेवटी रत्नागिरीच्या ठाकूर वकिलांची ही सुनीता नावाची शिक्षिका असलेली मुलगी आणि
भाई यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे लग्न रत्नागिरीला सुनीताबाईंच्या घरीच झाले. त्याचे सविस्तर वर्णन

पुलंनी अनेकदा केले आहे. नाटक, रेडिओ, संगीत याबरोबरच भाईंना चित्रपटाचेही आकर्षण होतेच. गुळाचा
गणपती हा चित्रपट म्हणजे ‘सर्व काही पुलं’ असा होता. वंदे मातरम हा चित्रपटही अगदी झपाटल्यासारखा
काढला सगळ्यांनी. यातही मुकुंदाच्या प्रमुख भूमिकेत भाई होते तर कृष्णेची भूमिका सुनीताबाईंनी केली होती.
या चित्रपटाकडून सगळ्यांनाच फार अपेक्षा होत्या पण सेन्सॉर बोर्डाने अगदी क्षुल्लक कारणावरुनही त्यात फार
काटछाट केली. आज हसू येईल पण “करु वा रणी मरुन जाऊ” सारखी वाक्ये ‘हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी
आहेत’ म्हणून कापली. असे अनेक प्रसंग कापून बोर्डाने या चित्रपटाचे अक्षरशः मातेरे केले. पण यातली गाणी
मात्र लोकांच्या पसंतीला उतरली. ’वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ यासारखी गाणी लोकांनी उचलून
धरली. दुर्दैवाने आज या चित्रपटाची फिल्म देखील उपलब्ध नाही. पण एकूणच चित्रपट सृष्टीतला लबाड कारभार
पुलंना काही मानवला नाही आणि त्यांनी चित्रपट क्षेत्र सोडले. पुलंच्या या एका निर्णयामुळे रसिक अनेक चांगल्या
कलाकृतींना मुकले. अनेक उत्कृष्ट कलाकृती कधी जन्मालाच आल्या नाहीत. पुलंना एकदा विचारले असता ते
म्हणाले होते की “मी चित्रपट नाही सोडला, चित्रपटानेच मला सोडले”. या क्षेत्राने पुलंना अगदीच कडू अनुभव
दिले. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या पदवीदान प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पुलंनी अगदी कटु
उद्गार काढले होते. ते म्हणाले, “आज मागे वळून पाहताना मी कधी काळी चित्रपटसृष्टीत होतो यापेक्षा मी
त्यातून बाहेर पडलो हेच जास्त अभिमानास्पद वाटते”. सिनेमाचे जग सोडेपर्यंत पुलंनी त्यात नजरेत भरेल अशी
भर घातली होतीच.

नाट्यक्षेत्रातही पुलं असेच रमले. पण सुरुवात मात्र अतिशय निराशाजनक झाली होती. तुकारामांचे अभंग हे
गंगेने तारले म्हणजेच ‘लोकगंगेने’ तारले. लोकांना हे अभंग मुखोद्गत होते. त्यांचेच नंतर संकलन केले गेले. या
आशयाचे ‘तुका म्हणे आता’ हे नाटक पुलंनी लिहिले. सगळ्यांनीच हौसेने कामे केली होती. यातील गीते
गदिमांनी लिहिली होती. पण प्रेक्षकांनी मात्र हे नाटक सपशेल नाकारले. या नाटकाचे फक्त इन मिन तीन प्रयोग
झाले. ’तुका म्हणे आता’मध्ये ‘संतू तेल्या’ची भूमिका वसंतराव देशपांडे यांनी, ‘ग्यानू चांभार’ ही भूमिका वसंत
शिंदे यांनी तर ‘शिवाजीमहाराजां’ची भूमिका वसंत सबनीस यांनी केली होती. नाटक अगदी जोरात आपटले. लोक
विनोदाने म्हणायचे “तीन वसंत एका संताला वाचवू शकले नाहीत” .या नाटकाला प्रेक्षकांनी दिलेल्या
प्रतिसादावर विनोद करताना मी भाईंना पाहिले होते. आणि त्याच वेळी “अरे या नाटकाचा असा शेवट नको
व्हायला होता रे!” अशी खंतही मी त्यांच्या तोंडून ऐकली होती. भाईंचे हे नाटक जरी पहिल्याच प्रयोगात
पावसाच्या मुसळधार सरीत बुडाले तरी लोकगंगेने मात्र ते तारले नाही हे खरंच फार दुर्दैवी आहे. ’भाग्यवान’
आणि ’तुका म्हणे आता’ या नाटकांनी जरी भाईंना धक्का दिला असला तरी त्यानंतर आलेल्या ’तुझे आहे
तुजपाशी’ आणि ’सुंदर मी होणार’ या नाटकांनी मात्र महाराष्ट्राला वेड लावलं. या नाटकांनी भाईंना रसिक
प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा करुन दिली. या सगळ्या विविध क्षेत्रात पुलंचा मुक्त संचार सुरु असतानाच
भाईंना दिल्लीहून आकाशवाणीचे आमंत्रण आले. देशाला नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याची नवलाई होती
तशीच आकाशवाणीचीही होती. आकाशवाणीवर अनेक प्रतिभावंतांची मांदियाळी जमा झाली होती. नभोवाणी
मंत्रालयाचे सचिव प्रमुख सचिव पुरुषोत्तम लाड हे स्वतः कविमनाचे, कलासक्त व बुद्धिमान होते. भाईंना तसेही
लिहिण्यापेक्षा बोलण्यात जास्त रस. हा गुण बहुतेक बायकडून आला असावा. त्यामुळे भाई आकाशवाणीवर छान

रमले. दर सोमवारी संध्याकाळी एखादी कौटुंबिक नाटिका ते सादर करत असत. ’अमृतवृक्ष’, ’जनाबाई’ या
त्यांच्या संगीतिका श्रोत्यांना खूप आवडल्या. ’गोफ’ सारखा कार्यक्रमही खूप गाजला.

पुलंचे पहिले पुस्तक माझ्या हातात आले ते व्यक्तिचित्रे असलेले ’व्यक्ती आणि वल्ली’. हे पुस्तक वाचले आणि
अगदी झपाटल्यासारखे झाले. यातल्या प्रत्येक व्यक्तीने मला जेवढे हसवले तेवढेच रडवले देखील. पुलंच्या या
लेखनशैलीच्या मी इतका प्रेमात पडलो की सुरवातीला मी दुसरे काही वाचायलाच तयार नव्हतो. त्यांची
’गणगोत’, ’गुण गाईन आवडी’ आणि ’मैत्र’ ही व्यक्तिचित्रे असलेली पुस्तके मी अक्षरशः पाठ केली. व्यक्ती
आणि वल्लीमधील पात्रे काल्पनिक असली तरी इतर पुस्तकांमधल्या व्यक्ती या खऱ्या होत्या, प्रसिध्द होत्या.
त्यांच्याबद्दल वाचताना एक वेगळीच मजा आली. ’गणगोत’मध्ये नावाप्रमाणेच पुलंच्या नात्यातल्या व्यक्तींचे
चित्रण होते. त्यातही मला भावून गेले ते बाय आणि दिनेश. दिनेश वाचताना तर असं वाटलं की आता त्याची
बोबडी हाक ऐकायला येते की काय. पांडित्यपूर्ण भाषेत लिहिणे सोपे पण बाळबोध लिहिणे अतिशय अवघड.
पुलंना ही कला फार अप्रतिम साधली होती. ’मैत्र’मध्ये त्यांच्या आयुष्यात आलेल्या त्यांच्या मित्रांची व्यक्तिचित्रे
आहेत. ती वाचायलाही खूप मजा येते. ’गुण गाईन आवडी’मधली माणसे वाचताना अगदी भारावून जायला होते.
माणूस म्हटला की त्यात डावं उजवं हे असणारच, पण पुलंची नजर ही फक्त समोरच्या गोष्टीतून सौंदर्यच
पहाणारी होती. मग ती एखादी व्यक्ती असो, प्रसंग असो वा प्रांत असो. असं कोणतं क्षेत्र आहे की ज्यात उत्तुंग
कर्तृत्व असलेली व्यक्ती पुलंची स्नेही नव्हती? लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार, अभिनेते, समाजसेवक,
विचारवंत, गायक, वादक, प्रकाशक, रसिक, जेथे जेथे काही सुंदर आहे तेथे तेथे पुलं अंतरीच्या ओढीने गेले. त्यात
स्वतःला आकंठ बुडवून घेतलं त्यांनी. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे करणारी शैली, तुमच्या आमच्या
आजूबाजूला घडणारे प्रसंग यामुळे पुलंची ही माणसे आपल्याला क्षणातच ’आपली’ वाटायला लागतात. काही
काही व्यक्तिचित्रांमध्ये पुलं अतिशय भावुकतेनेही लिहून जातात. त्यांच्या अशा या व्यक्तिचित्रांचा दर्जा जरा
वेगळाच ठरतो आणि मनाला स्पर्श करुन जातो. बेगम अख्तरवरचा ‘जाने क्यूं तेरे नाम पे रोना आया’ हा लेख
वाचताना हे सारखे जाणवत रहाते. येथे पुलंमधला चित्रकार हे व्यक्तिचित्र रंगवताना अगदी गहिऱ्या छटांचा
वापर करतो. माणसांचे वेड असलेला हा एक वेडा माणूस होता हेच खरं. अर्थात त्यांनाही आयुष्यात काही नमुने
भेटलेच. “आपण फक्त एक विदूषक आहात हे सदैव लक्षात ठेवा” असं स्पष्ट शब्दात सांगणारे पत्रही पुलंना
एका व्यक्तीने पाठवले होते. पण अशी उदाहरणे अतिशय क्वचित. एक मात्र आहे, माणसातले फक्त चांगले तेच
पहायचे या स्वभावामुळे पुलंनी रंगवलेली ही व्यक्तिचित्रं बऱ्याचदा एकसुरी वाटून जातात. क्षणभर असं वाटून
जातं की त्यांना फक्त उत्तुंग व्यक्तिमत्व असलेली, अजिबातच हिणकसपणा नसलेली, फक्त देवमाणसेच भेटली
की काय? त्यांच्या या प्रचंड मोठ्या आणि विविधता असलेल्या गोतावळ्यात फक्त आणि फक्त आदर्श व्यक्तीच
होत्या का? ते कसं शक्य आहे? शक्यच नाही. पुलंनी मात्र भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिमधील हिणकस जे आहे
त्याकडे दुर्लक्ष करुन उत्तमाला प्रतिसाद दिला. परिणामी त्यांनी रंगवलेले हे व्यक्तींचे कॅन्व्हास हे एकाच
रंगसंगतीमध्ये रंगवल्यासारखे एकसुरी झाले. अर्थात त्यामुळे त्यातला गोडवा मात्र अजिबात कमी होत नाही.

पुलंचा हा हळवा आणि गुणग्राहक स्वभाव लक्षात घेता कुणाचा गैरसमज होईल, पण वेळप्रसंगी पुलंची लेखणी
फार परखडपणेही चाले. तिला अशावेळी दुधारी तलवारीची धार चढे. पण हा परखडपणा प्रत्येकवेळीच पुलं वापरत

असं नव्हे. ज्याला आपण ‘वाभाडे काढणे’ म्हणतो ते तसे न काढता ते खूपदा उपहासात्मक लिहून त्याची कसर
भरुन काढत. असं उपहासात्मक लिहिताना कधी कधी पुलंची लेखणी फार टोकदार व बोचरी होते. याचे उत्तम
उदाहरण म्हणजे ‘भगवान श्री सखाराम बाईंडर’ ही एकांकिका. हिची मी असंख्य पारायणे केली आहेत. या
नाटकात पुलंची लेखणी इतकी मर्मावर आघात करत चालली आहे की विचारु नका. अर्थात हे माझे मत आहे.
इतरांना हे नाटक वाचताना कदाचित काही वेगळेही जाणवले असेल, नाही असे नाही. विजय तेंडुलकरांचे
‘सखाराम बाईंडर’ हे नाटक रंगमंचावर आले आणि एकच गदारोळ झाला. अश्लील अश्लील म्हणुन समाजातला
एक भाग अक्षरशः पेटून उठला. नाटकाचे प्रयोग बंद पाडले गेले. अश्लीलतेचे आरोप करणाऱ्यांना उत्तर द्यायला
म्हणू हवं तर पण पुलंनी ’भगवान श्री सखाराम बाईंडर’ हे नाटक लिहिले. तेंडुलकरांची पात्रे कसलाही विधिनिषेध
न बाळगता, स्पष्ट आणि बोलीबाषेतले शब्द वापरुन बोलतात. पुलंनी तेंडुलकरांच्या संवादाचा आशय तोच ठेवत
शब्दशैली बदलली. या नाटकात बुवाबाजीवरही पुलंनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. आशय तोच ठेवून जर शब्द
बदलले तर ते स्वीकारायला समाजाचा फारसा विरोध नसतो हे दाखवण्यासाठी पुलंनी या नाटकात अक्षरशः काही
उच्चार करवणार नाहीत अशा शिव्यांचे प्रयोजन देखील केले. भगिनीभोगी, दरिद्रलिंगी ही काही उदाहरण
त्यासाठी पुरेशी आहेत. या नाटकाच्या निमित्ताने पुलंनी समाजात असलेल्या अनेक दंभांवर सणसणीत आसूड
ओढला आहे. तेंडुलकरांच्या नाटकावर त्यावेळच्या काही प्रथितयश अभिनेत्रींनी खूप टीका केली होती. त्याचा
समाचार घेताना पुलं नाटकात सखारामच्या तोंडात अनेक विनोदी आणि उपरोधिक संवाद टाकतात. एका
ठिकाणी पुलंनी कंसात टीप देताना लिहिले आहे “आमचा निषेध करु नये ही समस्त परमपवित्र नाट्यचंद्रिका,
सौंदर्याच्या तोफा-बंदुका वगैरेंना लेखकाची नम्र विनंती आहे” जाता जाता पुलं त्यावेळच्या ‘सोज्वळ’ नाटकांची
टोपी उडवायला विसरत नाहीत. सखारामची एक रखेल सखारामला उद्देशून खालील कविता म्हणते:

केशरमिश्रित मोतीचूर तू, मी साधी रेवडी
वाहते ही दुर्वांची जुडी।

मराठियेचा मत्त मयूर तू, मी देशी कोंबडी
वाहते ही दुर्वांची जुडी।

या अशा हलक्याफुलक्या विनोदाबरोबरच पुलंनी सखाराम या पात्राचा वापर करुन टोकाला जाऊन टीका केली
आहे. एके ठिकाणी तो म्हणतो

सखाराम: कसं राह्यचं ते सोयीनं ठरवू, कसं दिसायचं ते महत्त्वाचं. संस्कृती म्हणजे असं असं असणं नव्हे. असं
असं दिसणं. पुस्तकाला कापडी बाइंडिंग असतं तसं माणसाला मॉरल बाइंडिंग असतं.
चंपा: त्याचा बायंडर कोन?

सखाराम: ज्यांना कधी आपल्यासारखं झोपडपट्टीत राहावं लागत नाही, ज्यांच्या बायकांना साड्या बदलायला
निराळ्या खोल्या असतात, ज्यांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च प्रकारच्या गरजा भागतात. ज्यांना रोज
शंभर शंभर रुपयांची विलायती परवडते, जे आकडा लावत नाहीत, घोडा लावतात-
चंपा: म्हणजे पैशेवाले?
सखाराम: थू; पैशेवाले नाही म्हणायचं, मॉरल बायंडर.
चंपा: मारो गोली
सखाराम: चंपूताई, आपण गोळ्या खाणारे-मारणारे ते. आपला आवाज बंद करणारे ते. आपली भाषा त्यांना सोसत
नाही. आपली गटारं त्यांना पाहवत नाही ना, तशी. चंपाताई, तुझी भाषा सुधारली पाहिजे. तरच संस्कृती टिकते.
संस्कृतीला खरं बोललेलं खपत नाही, समजलं? संस्कृती म्हणजे वरुन कीर्तन आणि आतून तमाशा.

संस्कृतीबद्दल ही जळजळीत मतं तेच पुलं मांडत आहेत ज्यांनी आम्हाला “संस्कृती म्हणजे सिंहगडावर भरुन
आलेली छाती” असं म्हणत संस्कृतीची ओळख करुन दिली. व्यक्तिचित्रे लिहिताना पुलं व्यक्तींमधील
हिणकसाकडे दुर्लक्ष करतात पण समाजात जेथे जेथे हिणकस दिसले तेथे तेथे त्यांनी आपल्या पद्धतीने खरपूस
समाचार घेतला आहे. ’भगवान श्री सखाराम....’ मध्ये बोचरा होणारा पुलंचा उपरोध बटाट्याच्या चाळीत मात्र
अगदी नर्म विनोदी होऊन आपल्याला भेटतो. बटाट्याची चाळ हा ललितलेखनाचा प्रकार. पुलंच्या इतर
ललितांमध्ये चाळीला अमाप प्रसिध्दी मिळाली. पुलंनी हे नाव खरंतर पठ्ठेबापूरावांच्या एका वगात ऐकले होते
तेच त्यांनी घेतले. पण त्याकाळात खरेच अशी एक बटाट्याची चाळ मुंबईत होती. पुलंच्या या कै. धुळा नामा
बटाटे, टोपल्यांचे व्यापारी यांनी वसवलेल्या या चाळीत चार पिढ्या नांदल्या. त्यामुळे पुलंना भाष्य करण्यासाठी
वेगवेगळ्या वयाची, स्वभावाची पात्रे आयतीच मिळाली. या चाळीच्या संगीतिकेत पुलंनी अतिशय समर्पक
शब्दात चाळीची ओळख करुन दिली आहे. ती प्रत्यक्ष पुलंनीच गायलेल्या ध्वनिमुद्रिकेतच ऐकायला हवी. साठ
बिऱ्हाडांच्या चाळीत खास नग राहतात. चाळीतली एक एक प्रकरणं वाचून अक्षरशः चकित व्हायला होते.
संगीतिका हा तर माझा सर्वात आवडता भाग. ’गच्चीसह.. झालीच पाहिजे’,’ भ्रमणमंडळ’, ’सांस्कृतिक
शिष्टमंडळ’ हे भाग तर निव्वळ अप्रतिम आहेत. भ्रमणमंडळाचा मुंबई ते पुणे हा प्रवास म्हणजे तर धमाल आहे.
काय काय घडत नाही या मंडळाच्या बाबतीत? हमाल त्रास देतात, टांगेवाला फसवतो, सामान हरवते, कोचरेकर
मास्तरांच्या धोतरावर टिफीनमधला रस्सा सांडल्यावर “किती तिखट घालतात हे लोक भाजीमधे” ही प्रतिक्रिया
ऐकून तर मला श्वास घेता येईना इतके हसू आले होते. मनसोक्त हसत आपण जेंव्हा चाळीच्या शेवटच्या
अध्यायावर येतो आणि ‘चाळीचे चिंतन’ ऐकतो तेंव्हा खरोखर अगदी भरुन येते. चिंतन ऐकताना सारखं एक
जाणवत राहतं की पुलंनी चाळीतली पात्रे जरी काल्पनिक उभी केली असली तरी त्यांचे आनंदाचे ठेवे, दुःखाची
कारणे, एकोपा हा अगदी खरा आहे. जुन्या आठवणी काढून ‘आमच्या काळी असे नव्हते हो’ असं म्हणणारा मी
नाही तरीही फ्लॅट संस्कृतीत येऊन आपण बरंच काही गमावलं आहे याची मनोमन खात्री पटते.

पुलंनी भारतीय संस्कृतीवर तर प्रेम केलेच पण परकीय संस्कृतींचाही त्यांनी जवळून अनुभव घेतला. त्याचे
आलेले कडुगोड अनुभव पुलंनी लिहून ठेवले आहेत. ’अपूर्वाई’ आणि ’पूर्वरंग’ ही दोन्ही पुस्तके पुलंच्या
परदेशवारीवर सगळ्या बाजूंनी प्रकाश टाकतात. पुलंनी त्यांच्या पहिल्याच परदेश प्रवासाचे वर्णन केले ते
’अपूर्वाई’मध्ये. पहिलीच परदेशवारी असल्याने पुलंचा प्रवास घरातूनच सुरु झाला. या लहानमोठ्या अनुभवांचे
वर्णन, उल्लेख त्यांच्या अनेक लेखांमध्ये अधूनमधून येत राहतात. अगदी ’असा मी असामी’मध्येही याचा
वेगळ्या संदर्भात उल्लेख येऊन जातो. ’अंतू बर्वा’मध्येही याचा उल्लेख आढळतो. पुलंनी या प्रवासांमध्ये नाटके
पाहिली, संगीत ऐकले. प्रायोगिक रंगभूमीवर केले जाणारे विविध प्रयोग पाहिले, त्यांचे कौतुकही केले. पण
महत्वाचा विषय आणि आवड म्हणजे माणूस. या इंग्रज माणसांचे त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. तेथील
व्यक्तींना भारतातील व्यक्तिमत्वांच्या काल्पनिक वेशभूषेत पाहिले. तेथील लोकांच्या अभिमानाविषयी पुलंनी
कौतुकाने लिहिले आहे तसेच त्यांना खटकलेल्या गोष्टींविषयी देखील पोटतिडकीने लिहिले आहे. ’ जावे त्यांच्या
देशा’ या पुस्तकात पुलं एके ठिकाणी लिहितात की:

"न्यूयार्कच्या रस्त्यातली म्हातारीच भयग्रस्त नाही, तर हा सगळा समाजच भयग्रस्त आणि भ्रमिष्ट
झाल्यासारखा मला वाटत होता. ‘सेल’ हा इथला मूलमंत्र आहे! वस्तू विका, बुध्दी विका, कला विका, कौमार्य
विका, तारुण्य विका, विकण्यासारखे उरत नाही वार्धक्य! म्हणूनच ते निरुपयोगी होते. कुणालाच ते नको असते.
‘विक्री’ हा ज्या संस्कृतीचा युगधर्म होतो, तिथे वार्धक्याचे निर्माल्य होत नाही, पाचोळा होतो."

असं काही पुलं लिहून जातात आणि ते वाचताना अंगावर काटा उभा रहातो. परदेशातल्या समाजाकडे पाहून जरी
पुलंनी हे लिहिलं असलं तरी ते यच्चयावत समाजाला लागू पडते. भोगवाद किंवा चंगळवाद याविषयी ते जे
म्हणतात ते येथे दिल्या शिवाय राहवत नाही अगदी. ते लिहितात:

"वयाचे पंधरावे वर्ष उलटण्याच्या आत शरीराचे सगळे भोग कुठल्याही जबाबदारीचे घोंगडे गळ्यात अडकवून न
घेता भोगून झाले की पुढे कसलेतरी कृत्रिम उत्तेजन मिळाल्याखेरीज जगणेच अशक्य! त्यातून मग त्या
उत्तेजनासाठी मोटार-सायकलींवरुन भन्नाट भटकणे सुरु होते. दिशाहीन भ्रमंती चालू होते. अनोळखी तरुण-
तरुणींची भरमसाट शय्यासोबत घडायला लागते. आणि या साऱ्यांच्या अतिरेकानं ती झिंगही भराभरही
ओसरायला लागते. मग ती जोरदार करण्यासाठी सायकीडेलिक विद्युतदीपांच्या घेरी आणणाऱ्या प्रकाशात
आणि कानठळ्या बसविणाऱ्या संगीतात बेहोषीचा शोध सुरु होतो. आणि शेवटी साऱ्या संवेदनांचा मेंदूत ठेचून
ठेचून भरलेला चिखल मात्र उरतो."

पुलंची ’अपूर्वाई’ आणि ’पूर्वरंग’ ही पुस्तकं आपल्याला एक सुरेख अनुभव देऊन जातात. या दोन प्रवास
वर्णनांच्या दृष्टीने ’वंगचित्रे’ आणि ’जावे त्यांच्या देशा’ ही पुस्तके प्रवासवर्णने असली तरी फार वेगळी आहेत. या
दोन्ही पुस्तकांच्या शैलीमध्ये, मांडणीमध्ये कमालीचा फरक आहे.

पुलंमधल्या लेखक, संगीतकार, गायक, विचारवंतावर लिहू तेवढे थोडेच आहे. त्यांच्या समाजभानावर स्वतंत्र
लेख लिहायला हवा. पुलंच्या दातृत्वाविषयी आजच्या पिढीला फारसे माहीत नाही. त्यांनी किती विद्यार्थ्यांना
शिक्षणासाठी मदत केली त्याची गणती नाही. ग्रंथालयांना, शाळांना, साहित्यपरिषदेला जमेल तेथे पुलं मदत
करत होतेच पण समाजातल्या उपेक्षित वर्गासाठी ज्या संस्था काम करत त्यांनाही पुलंकडून सढळ हाताने मदत
होत असे. ‘बेरड’कार भीमराव गस्ती यांची ’उत्थान’ ही संस्था देवदासींसाठी काम करते. या संस्थेला पुलंनी
केलेल्या आर्थिक मदतीविषयी गस्ती म्हणतात, “ पुलंनी दिलेल्या देणगीमुळे आम्हाला पुढे जाण्यासाठी एक
संधी मिळाली. त्यामुळेच संस्थेची इमारत उभी राहिली” अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. या
सगळ्यामागे उभे आहे ते ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’ .
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने लेख लिहीत असल्यामुळे पुलंच्या साहित्यावर लिहायचा प्रयत्न केला आहे. पण
मला स्वत:ला साहित्यिक पुलंपेक्षा समाजसेवक पुलं कितीतरी जवळचे वाटतात. एका समाजसेवकाला समाजाचे
किती भान असावे याचे एकमेव उदाहरण म्हणजे पुलं. त्यांच्या विषयी जास्त काय लिहू? पाडगावकरांच्या चार
ओळींनी लेखाचा शेवट करतो.

पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.

(संदर्भ: पुलंची पुस्तके, अमृतसिध्दी)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>" एका माणसात खरं तर किती गुण विधात्याने द्यावेत याला काही मर्यादा असतात. पण त्या सर्व मर्यादा ओलांडून ईश्वराने त्यांना घडवलं असावं असं वाटतं. "...>>>
अगदी खरं... माणसातला माणूस किती सुंदर असू शकतो हे तुम्हा आम्हाला समजावे म्हणून असेल.
लेखातले काही संवाद अंतर्मुख व्हायला लावतात. त्यात असलेल्या कारुण्याची झाक अप्रतिमच उदा.
"वयाचे पंधरावे वर्ष उलटण्याच्या आत शरीराचे सगळे भोग कुठल्याही जबाबदारीचे घोंगडे गळ्यात अडकवून न
घेता भोगून झाले .... वगैरे.
तसे पु. ल. चें सारेच अगदी विनोदी लिखाण सुध्दा अंतर्मुख करते.
या लेखातून बरेच माहित नसलेले समजले.
खूप धन्यवाद या सुरेख लेखासाठी...

खूप सुंदर लिहिलंय शाली! लेख आधीच वाचला होता, पण प्रतिसाद द्यायचा राहिला.
भगवान सखाराम बाइंडर अशी काही एकांकिका पुलंनी लिहिली होती हेच मला माहीत नव्हतं. जबरदस्त असणार आहे. वाचली पाहिजे. ' ती फुलराणी' मध्ये सुरुवातीला जे गाणं आहे, तेही असंच तिरकस आहे. आता शब्द सगळे लक्षात नाहीत, पण ' ही आमची सभ्यता आणि आमची संस्कृती' असं काही तरी आहे त्यात!