मला भावलेले गडकरी- विशेष लेख- श्री. दत्तात्रय साळुंके

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 22:16

मंडळी, गडकरी म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर चटकन् महाराष्ट्रातली तीन व्यक्तिमत्वं दिसतात. ती म्हणजे भाषाप्रभु राम गणेश गडकरी, लोकसत्ताचे माजी संपादक माधव गडकरी आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. तसे हे तीनही गडकरी थोड्याफार फरकाने माझे आवडते आहेत. पण या लेखासाठी मी मला शालेय जीवनात मराठीच्या धड्यातून अलंकारिक भाषेचा बाज किती नादखुळा असतो, हे पटविणा-या राम गणेश गडक-यांविषयी लिहितोय.

मायबोलीवर उत्तुंग प्रेम असलेले संयोजक, म.भा.दि.२०१९ यांनी आग्रह केला की मराठी भाषा दिनानिमित्त नवीन पिढीसाठी राम गणेश गडक-यांवर लेख लिहा. मी त्यांना म्हटले, ""गडकरी म्हणजे भाषाप्रभु. त्यांना मराठी शेक्सपिअर म्हटले जाते. त्यांना माझे लिखाण काय न्याय देणार?''

असे बोलले जाते, की इंग्रज माणूस एक वेळेस आपले राज्य देईल पण शेक्सपियर देणार नाही. तद्वत् गडकरी जाऊन शंभर वर्ष झाली तरी त्यांच्या लिखाणाचे गारुड मराठी मनाला मोहिनी घालते आणि यापुढेही घालत राहील, याची मला खात्री आहे. एखादे लिखाण चिरंजीव व्हावे यामागे, ते किती विचारपूर्वक मानवी मनाचे सूक्ष्मावलोकन करते यावर अवलंबून असते. उदाहरणच द्यायचे झाले तर रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्याची मोहिनी अद्यापही आपल्या मनावर अधिराज्य गाजवते. हजारो वर्षे घराघरांत रामायण -महाभारताचे पाठ होत असले तरी महाभारत,रामायण या दूरदर्शन मालिका लागल्यावर रस्त्यावर, बाजारात, हॉटेलात होणारा शुकशुकाट हेच दर्शवून गेला.

आपण जरी कबूल केले माणूस प्रगत होत गेला, तसा तो बदलत गेला तरी काही मानवी स्वभाव गुणवैशिष्ट्ये शाश्वत आहेत. जसे की, आपल्याला जमेल तसा सुखाचा शोध घेणे आणि तो घेत असताना अपयश आले तर दुःखी होणे. या सुखाच्या परिभाषादेखील स्थलकालव्यक्तीनुसार बदलत असाव्यात. पण त्यामागच्या भावना राग, सूड, लोभ, प्रेम, मोह, काम, भीती, आत्मसन्मान, श्रध्दा इ. शाश्वत आहेत. जे लिखाण अशा शाश्वत सत्यावर आधारित असते, ते चिरकाल टिकते. आपले संतवाड्:मयसुद्धा दीर्घकाळ टिकले कारण ते माणूस आणि त्यांचे व्यवहार केंद्रस्थानी मानते. माझ्यासारख्याने गडक-यांवर लिहिणे म्हणजे त्यांच्या स्मृतीला श्रद्धा सुमन अर्पण करण्यासारखे आहे. त्यांचे मूल्यमापन करण्याइतपत मी निश्चित मोठा नाही आणि या लेखाद्वारे तुमच्या ज्ञानात भर पडावी असाही कुठला उद्देश नाही. कारण गडकरी माहीत नाहीत असा मायबोलीकर विरळाच. मला गडकरी कसे वाटले, हे मांडण्याचा भाबडा प्रयास आहे.

मानवी मनाला चिरकाल मोहिनी घालणाऱ्या लेखनाचे मूल्यमापन तरी कसे होणार! मला नेहमी या बाबतीत आंधळे आणि हत्तीची गोष्ट आठवते ज्याच्या हाताला जे लागले त्याप्रमाणे त्याला हत्ती दिसला. थोडक्यात, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला दिसते. आपण एखादी कविता वाचतो किंवा कथा वाचतो आणि नंतर आपल्याला काही तरी बोध होतो. लेखकाला जे म्हणायचे असते तेच असते काय हे, जे आपल्याला समजते? का गल्लत होते? याबाबतीत मी नेहमी अतृप्त असतो. माणूस सर्वार्थाने कळणे हवेला मुठीत पकडण्यासारखेच असावे. मुठीत किती अन् बाहेर किती सांगणे कठीणच. या बाबतीत गडकरी स्वत: विषयी लिहितात,

यावज्जीवही काय मी नकळले आप्तांप्रती नीटसे
मित्रांतेही न कळे गूढ न कळे माझे मलाही तसे

या मागचे मूळ सूत्र हेच असावे, की एखादी पराकोटीची भावनिक अनुभूती मनुष्य जेव्हा घेत असतो तेव्हा ती शब्दातीत असते. तिला शब्दात पकडावे तरी कसे?
साहित्य निर्मिती म्हणजे अनुभूतीचे प्रकटीकरण. ही अनुभूती स्वतःची असू शकते, निरीक्षणातून/कल्पनेने आलेली असू शकते. ही अनुभूती जेवढी लोकांच्या जवळ जाते, तेवढी ती लोकांना भावते . गडक-यांची अनुभूती त्यांच्या अलंकारिक भाषावैभवाएवढीच बलशाली आहे. म्हणून ती आजही मानवी मनोव्यापाराला चपखल लागू होते. नुसतेच अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य नाहीत. गडक-यांचे शब्द जेव्हा भाषासौंदर्य वृद्धिंगत करतात, तेवढ्याच ताकदीने भावाशी एकरूप होतात, अनुभूतीशी नाळ जोडतात. या बाबतीत कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात,

शब्दांत भाव नाही
ना वेध अनुभवाचा
रचना सुरेख झाली
उपयोग काय त्याचा?

याच बाबतीत गुलजार म्हणतात,

मैं एहसास लिखता हूं, लोग अल्फाज पढते है|

थोडक्यात शब्दांत अनुभव नसेल, तर ते शब्द मृतप्राय आहेत. गडकऱ्यांची विलक्षण कल्पनाशक्ती वाचकाची मती गुंग करणारी आहे.
प्रतिमा आणि प्रतीकांचा विस्मयकारक वापर हे गडक-यांच्या लिखाणाचे बलस्थान. त्यांच्या नाटकात असंख्य प्रतिमा आणि प्रतीके डोकावतात. हा प्रतिमा आणि प्रतीकांचा सुरेख मेळ घालत गडक-यांनी सुंदर भाषावैभवाची देणगी मराठी वाचकांना दिली, हे जरी खरे असले, तरी काही टीकाकारांना गडक-यांचे हे प्रयोग अनुचित वाटले. त्यांची शैली पोकळ व कृत्रिम वाटली. मुख्य म्हणजे गडकरी हे पहिले लेखक आहेत, ज्यांनी असे सुंदर प्रयोग केले. गडक-यांनी प्रयासपूर्वक केलेली खटकेबाज शब्दरचना त्यांच्या लिखाणाला एक वेगळाच बाज देऊन जाते. अशाच संवाद कौशल्याने त्यांनी या संवादात एक नादमाधुर्य निर्माण केले. दोन परस्परविरोधी प्रतिमांचा वापर करून तिसरीच प्रतिमा रंगवायची आणि त्यातून काही तरी शब्दातीत पकडायचे हा त्यांचा हातखंडा.

तत्कालीन नाटकातून असलेल्या गायकी ढंगाचा गडकऱ्यांना फारसा मोह नव्हता. इतर नाटककारांनी जसे गाण्यासाठी प्रसंग निर्माण केले, तो बाज गडकरींचा नव्हता. त्यांच्या भावबंधन आणि एकच प्याला नाटकातली पदे कोल्हटकर आणि गुर्जरांनी लिहिली आहेत. तरीदेखील या पदांची मोहिनी जनमानसावर अजून आहे. अजून ही पदे लोक गुणगुणतात, रेडिओ, टीव्हीवर गायली जातात.

गडकरी माझ्या वाचनात आले ते शालेय जीवनात. मला गडक-यांच्या भावबंधन नाटकातला एक प्रवेश मराठी पुस्तकात धडा म्हणून अभ्यासाला होता. भावबंधन मधल्या त्या उताऱ्यांचे गारुड अजूनही माझ्यावरुन उतरायला तयार नाही . या नाटकात जे काही शाब्दिक कोट्यांनी बहरलेले चमत्कृतीयुक्त संवाद आहेत याची नवीन वाचकांना प्रचिती यावी म्हणून अंशतः येथे देत आहे.
पूर्वपीठिका - या नाटकात प्रभाकर नायक आहे, घन:श्याम खलनायक आहे आणि लतिका नायिका आहे. लतिका श्रीमंत घरची, लाडात वाढलेली मुलगी. घन:श्याम त्यांचा नोकर, तिच्या वडिलांच्या पेढीवर असलेला मुनीम. तिची मैत्रीण मालती घन:श्यामला आवडते. पण मालती मनोहरवर प्रेम करते. घन:श्याम मालतीला मागणी घालतो. मालती त्याला सांगते, ती आधीच कोणालातरी हृदय देऊन बसलीय. आपल्याकडे नोकर असलेल्या एका मुनीमाने आपल्या प्रिय मैत्रिणीला मागणी घालावी, हे लतिकेला आवडत नाही. मालती मनोहरवर जीव ओवाळते हे तिला माहीत आहे. लतिका घन:श्यामचा उपमर्द करते. नंतर घन:श्यामचा सूडाचा प्रवास सुरू होतो.त्यासाठी घन:श्याम मालती च्या वडिलांचा एक बनावट कबुलीनामा तयार करतो. लतिकेच्या वडिलांनी तयार केलेल्या बनावट हुंड्या पळवतो. या कागदपत्रांच्या आधारे तो मालतीने लतिकेच्या बाबांशी लग्न करावे आणि लतिकेने त्याच्याशी लग्न करावे अशी योजना करतो. त्याच्या मनाप्रमाणे न घडल्यास पोलिसात जाण्याची धमकी देतो. त्यामुळे सर्व घाबरतात. लतिका घन:श्यामची माफी मागते आणि तिच्या प्रियजनांची त्याने सुटका करण्याची याचना करते ते खटकेबाज संवाद पुढील प्रमाणे.

http://ramganeshgadkari.com/egadlari/index.php?option=com_content&view=a...

असे शाब्दिक कोट्यांनी खचाखच भरलेले खटकेबाज संवाद आणि प्रसंगानुरूप उपमा यामुळे हे लिखाण कायमचे स्मरणात राहते. मी हा लेख लिहीत असतानादेखील या नाटकाचे संवाद मला कुठल्याही पुनरावलोकनाशिवाय आठवताहेत, यातच गडकरी यांच्या लेखणीची जादू आहे.

असेच सुंदर संवाद एकच प्याला नाटकात आहेत. सुधाकर, एक प्रथितयश वकील काही कारणामुळे आपली सनद गमावून बसतो आणि दारुडा होतो. पण ही केवळ एक प्रतिथयश वकील दारूच्या व्यसनापायी सर्वस्व गमावून बसतो याची कथा नसून त्या अनुषंगाने गडक-यांनी दोन परस्पर विरोधी स्री मनं रेखाटली आहेत. एक दारुड्या नवऱ्याला सोडून जाणारी खंबीर मनाची गीता तर दुसरी दारुड्या नवऱ्याला पती परमेश्वर मानणारी सिंधू . सोन्यासारखा संसार मातीमोल झाला तरीदेखील नवऱ्याचे पाय न सोडणारी सिंधू म्हणते, "कशी या त्यजू पदाला. " दोन वेगवेगळ्या परिस्थितींत स्त्रीमन कसे वेगवेगळे प्रकट होते, हे त्यातून दिसते. गीता गरीब असूनही बंडखोर वृत्तीची. तर सिंधू श्रीमंत घरची असूनही आपला संसार विस्कटू नये, सुधाकराला त्रास होऊ नये, म्हणून नमतं घेणारी. गीता आणि सिंधू बोलत असताना गीतेचे संभाषण चुकून सुधाकर ऐकतो आणि तो दारुच्या व्यसनापायी सिंधूसारख्या देवीशी किती वाईट वागला, याचा त्याला साक्षात्कार होतो. तो दारू सोडायचे ठरवतो. पण जे लोक त्याच्याबरोबर गुत्त्यात दारू प्यायला असतात, ज्यांची लायकी सुधाकराच्या मानाने काहीच नसते, ते सुद्धा त्याला काम देण्याचे नाकारतात. इथे माणसाची स्वार्थपरायणता दिसून येते. जोपर्यंत सुधाकराबरोबर दारू प्यायला मिळत होते तोपर्यंत सारे बरोबर होते. थोडक्यात उगवत्या सूर्याला सारे नमस्कार करतात. सुधाकराने केलेला सुधारण्याचा प्रांजल प्रयत्न व्यर्थ ठरतो. एकदा दारुडा असे शिक्कामोर्तब झाले की कोण विश्वास ठेवणार!त्याला कुठेच काम मिळत नाही, म्हणून तो पुन्हा दारुडा होतो. चोर, व्यसनी लोक सुधारायचे असतील तर त्यांना समाजाचे पाठबळ मिळावे लागते. तळीराम हा या नाटकातला खरा खलनायक आणि व्यसनाधीनतेचा कडेलोट. हे पात्र आजही एवढे जिवंत आहे, की लोक अजुनही दारुड्याला तळीराम या नावाने बोलावतात, यातच या पात्राचे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्याचे इंगित लपले आहे. सिंधू आणि सुधाकर ही पात्रे देखील अजरामर झालेली आहेत. या नाटकाचे अजूनही प्रयोग होतात शेक्सपिअरच्या हॅम्लेट सारखे.
या दोन्ही नाटकात मला काही साम्यस्थळे दिसली. दोन्ही नाटकांत दोन अत्यंत सोशिक नायिका आहेत. भावबंधन मधे मालती, तर एकच प्यालात सिंधू. कुटुंबासाठी त्यागमूर्तीच. दोन्हीकडचे नादान, आत्मरत नायक. आपल्या विद्वत्तेचा फाजील अभिमान असलेले अहंकार ,एककल्ली पुरुष. गडक-यांच्या नाटकातली ही पात्रे एवढी नैसर्गिक वाटतात, की आपल्या आजुबाजूलाच त्यांचा वावर असावा. गडकऱ्यांच्या नाटकातली पात्रं स्वला महत्त्व देणारी आहेत; म्हणजेच ती खूप आत्मकेंद्रित आहेत. त्यामुळे एका वेगळ्याच विश्वात आहेत. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा इष्ट किंवा अनिष्ट परिणाम त्या पात्रांवर होत असतो; पण तेदेखील त्या पात्रांच्या दृष्टिकोनातूनच घडते.
त्यांनी एकच प्याला, भावबंधन, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, वेड्यांचा बाजार, राजसंन्यास ही नाटके लिहिली. यांतील वेड्यांचा बाजार आणि राजसंन्यास ही नाटके अपूर्ण आहेत.
राम गणेश गडकरी यांचा जन्म २६ मे १८८५ चा. यांचे जन्मस्थळ गणदेवी- नवसारी, गुजरात येथले. त्यांचा मृत्यू २३ जानेवारी १९१९ चा. त्यांना उणंपुरं ३३ वर्षांचे आयुष्य लाभलं. इतक्या अल्पायुष्यात एवढी प्रगल्भ जाण असलेले आणि प्रतिभा असलेले लिखाण करणे, मला तर दैवी चमत्कारच वाटतो.

त्यांच्या नाटकांतून नटवर्य बालगंधर्व, गणपतराव बोडस, कृष्णराव कोल्हापुरे, मास्टर दीनानाथ, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, पंढरपूरकर बोवा, केशवराव दाते, दामूअण्णा मालवणकर, चिंतामणराव कोल्हटकर, परशुराम सावंत, दिनकर ढेरे, चंद्रकांत गोखले, जयमाला शिलेदार,फैय्याज अशा रंगभूमी गाजवणाऱ्या अनेक दिग्गजांनी काम केले. गडकऱ्यांच्या नाटकाने त्यांची काही पात्रे देखील लोकप्रिय झाली. ही पात्र दिग्गज नटांनी वठवली. त्यांनी गडकऱ्यांना आपल्या नाटकातून जे सांगायचं, ते अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवलं. आपण असे म्हणू शकतो, की या पात्रांचा सक्षम अभिनय त्यांना अजरामर करुन गेला. पण गडकऱ्यांच्या अलंकारिक आणि चमत्कृतीयुक्त संवादांनी या पात्रांना प्रभावीपणे लोकांपर्यंत जसे पोहोचवले, तसेच या पात्रांनीही गडकऱ्यांच्या प्रतिभेला योग्य तो न्याय दिला. गडकऱ्यांची नाटकं पहाणं म्हणजे भाषाशैली आणि अभिनय यांचा सुंदर मिलाफ. या मिलाफाच्या मिश्रणाचा एकच प्याला प्रेक्षकांच्या आणि नटाच्या रोमरोमात असा भिनायचा की ती नशा कधीच उतरु नये असेच वाटत असावे.

गडकऱ्यांच्या लिखाणाविषयी अनेक प्रथितयश लेखकांनी लिहिले आहे. त्यांनी त्यांना जसे मस्तकी लावले तसेच अलंकारिक भाषेचा अतिरेक म्हणून हिणवलेही. एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर मराठी साहित्यिकांच्या लिखाणाविषयी लिहिले गेले नाही. गडक-यांविषयी लिहीणारांची यादीदेखील खूप मोठी आहे. (अत्रे, कोल्हटकर चिं ग, वि स खांडेकर, गंगाधर गाडगीळ, क्षीरसागर पां. ग., क्षीरसागर श्री. के., ना. सी. फडके, गणपतराव बोडस, राजाध्यक्ष म. वि., ग.त्र्यं. माडखोलकर,वाळिंबे रा. शं., प्रा. वा. म. धोंड, रु. पां. पाजणकर आदि.) हेही त्यांच्या लिखाणाची थोरवी अधोरेखित करणारेच आहे.
नाट्यलेखनाव्यतिरिक्त गडक-यांनी विनोदी लेखन आणि कवितादेखील केल्या. विनोदी लेखन त्यांनी बाळकराम या टोपण नावाने केले, तर गोविंदाग्रज हे टोपण नाव कविता करण्यासाठी घेतले. या विनोदी लेखांचे एकत्रित संकलन "संपूर्ण बाळकराम" या पुस्तकात केले आहे, तर काव्यसंकलन वाग्वैजयंती या कवितासंग्रहात केले आहे.
गडक-यांचे लिखाण वाचताना त्यांच्यासमोर शब्द हात जोडून उभे असावेत, असे वाटते. त्यांचा लिखाणातल्या शब्दांचे पदलालित्य केवळ अप्रतिम. त्यांच्या शब्दांनी ताल धरला, की वाचकही त्यावर कधी डोलू लागतो, हे त्याचे त्यालाच कळत नाही .
त्यांनी मुक्तछंद हाताळला तशाच छंदबद्ध कविताही केल्या. त्यांच्या कवितेतील गेयता वाचकांच्या मनात नादब्रम्ह उभे करते. वाग्वैजयंती या काव्यसंग्रहाची अर्पण पत्रिका वाचली, तरी आपल्याला हे पटेल.

http://ramganeshgadkari.com/egadlari/index.php?option=com_content&view=s...

गडक-यांच्या कवितांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कवितेआधी कवितेचा दिलेला भावार्थ. तो वाचकाला कविता समजणे सोपे करतो. मला आवडलेल्या कविता अशा- ये ये कविते, काव्याची व्याख्या, राजहंस माझा निजला, दिवाळी, श्रीमहाराष्ट्र गीत. महाराष्ट्र गीताच्या काही ओळी आपणासाठी इथे देत आहे.

श्रीमहाराष्ट्र गीत
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।
अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी देशा ॥
मी समग्र गडकरी अभ्यासले नाहीत. माझ्या वाचनात जे आले ते मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न. जर काही चुकले असेल तर क्षमा असावी.
साभार :-
msblc.maharashtra.gov.in
http://ramganeshgadkari.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. एक तपशीलातली छोटीशी विसंगती - भावबंधन नाटकात घनश्याम खलनायक आहे, नायक नाही. नायक प्रभाकर आहे. पण सर्व पात्रांपेक्षा घनश्यामच भाव खाऊन जातो ही बाब खरी आहे!
बाकी परिचय सुंदर!

लेख अतिशय आवडला. एकच प्यालामध्ये सिंधू जितकी सोशिक आहे तितकीच गीता फटकळ. त्या दोघींच्या संवादाचा उल्लेख केला आहात ते खरं तर गीताचं स्वगत आहे ना?

वा छानच लीहीलय...भावबंधन चा घनश्याम अजरामर.केला तो चिंतामणरावांनी....."मी घनश्याम"अस त्यानी म्हणून प्रवेश केला की नाट्यग्रुह त्यांच्या ताब्यात जात असे म्हणतात.......गणपतराव जोश्यांनंतर गद्य नटात त्यांचाच नंबर लागत असेल....राम गणेश हे अत्यंत कोटिबाज होते....किर्लोस्कर नाटक कंपनीवर त्यांचा फार जीव...शंकरराव मुजुमदारांचा मुलगा श्रीधर हा त्यांचा.मीत्र त्याच्या शीफारशीने गडकर्यांचा प्रवेश कंपनीत झाला.......कीर्लोस्कर कंपनीत त्यांचा प्रवेश.हा तिथल्या मुलांना शिकवण्या साठी झाला..त्यावेळी क्रुष्णा कोल्हापुरे,मास्टर.दिनानाथ,दिनकर कामण्णा ही मुल कंपनीत त्यांची विद्यार्थी होती.........नंतर त्यानी बाजारमास्तर ते गेटकिपर म्हणुन हि काम केले......कंपनीत शंकरराव मुजूमदार व देवल असे दोन गट होते......गेटकिपर च्या .अनुभवाचा उपयोग त्यांना माणस वाचण्यासाठी झाला...पुढे साहीत्यात त्यांना त्याचा उपयोग झाला.... कंपनीचे नाटककार श्रीपाद क्रुष्ण कोल्हटकर.हे त्यांचे गुरु...त्यांचा विवाह फारसा टिकला नाही....त्यांचे एका मुलीवर फार प्रेम होते पण परीस्थीतीतील तफावती मुळे तीने त्यांना नकार दिला...ती पुढे सांगली संस्थानची राणी झाली...त्याच बालपण गुजरात मधे.गेल....नंतर वडीलांच्या म्रुत्यू नंतर खोपोली जवळ च्या वतनाच्या गावी ते आले....तीथ शालेय जीवनातच त्यांनी कवीता लीहायला चालू केली....त्यांचा मूळचा पींड कवीचाच त्यांच गद्य साहीत्य हे त्यांच्या कवीतेचाच विस्तार........क्रांतीकारक .कान्हेरे यांनी जँकसनचा खून नासिक येथे किर्लोस्कर कंपनीच नाटक चालू असता थेटरातच केला तेव्हा राम गणेश यांनी घाबरून त्यांचे गर्वनीर्वाण (बहतेक हेच)या नाटकाचे हस्तलीखीत जाळून टाकले त्याभधे ईंग्रज सरकार.वर टिका होती.....शिवाजीवर महाकाव्य लीहाव असा त्यांचा मानस होता...त्यांना गप्पाच्या मैफीली रंगवण्याचा भलताच शौक ...त्यांचा दुसरा शौक म्हणजे बीडी ....बीडिचा त्यांना अतोनात.शौक....बीडी आणी चहा...एकदा. तात्यासाहेब केळकर त्याच्या कडे गेले असता गडकरींच्या खोलीला पडलेल्या बीडीच्या थोटका.मुळे त्यांनी.त्याला उकिरड्याची उपमा दिली होती...मद्यपान ... ही माफक प्रमाणात करत असत कोल्हापूरचे काही सरदार त्यांचे मित्र ते कोल्हापूरला मौज मजा व त्यांचा पाहुणचार घेण्यास जात असत.......बालकवी ठोंबरे वर.त्यांच बंधूवत प्रेम होते

@ dilipp
खूप सुंदर आणि रोचक प्रतिसाद.
दत्ताच्या देवळा जवळ लाल धाग्याची मिळणारी बिडी आवडायची, दारुचे व्यसन नव्हते परंतु दारुडे कसे असतात याचे काही महिने बार समोर थांबून निरिक्षण केले. God afraid उशापायथ्याला देवाच्या तसबिरी इत्यादी.
@ किल्ली खूप धन्यवाद.

एकच प्याला तील.गीता हे नाव मामा वरेरकर यांच्या मुलीवरून घेतल होत ....तर ...तळीराम ...आगाशे म्हणून होते त्यांच्या वरून

@ dilip
खूप रंजक माहिती..
समकालीन नाटककार, नाट्यसंस्थांंन विषयी भरपूर माहिती आहे तुम्हाला...
@ शाली पुन्हा आभार पुनर्वाचन आणि सुंदर प्रतिसादाबद्दल

समकालीन नाटककार, नाट्यसंस्थांंन विषयी भरपूर माहिती आहे तुम्हाला...)))))मला.त्या काळाबद्दल.म्हणजे...संगीत नाटकाचा काळ....भाउराव ,बालगंधर्व.केशवराव,बोडस.,यांचा.काळ...तसेच मूकपट म्हणजे ,,भालजी,मास्टर.वीठ्ठल,चंद्रकात,सुर्यकात.वीवेक ,गदीमा ,यांचा काळ या बद्दल वाचण्यात रस आहे...