तुझमे तेरा क्या है -६

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 25 February, 2019 - 09:22

या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maayboli.com/node/53637

तुझमे तेरा क्या है -२
https://www.maayboli.com/node/53652

तुझमे तेरा क्या है -३
https://www.maayboli.com/node/65884

तुझमे तेरा क्या है - ४
https://www.maayboli.com/node/68484

तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maayboli.com/node/68711

पुढे चालू

मी त्याच्याकडे ओढली जातेय. हे मला प्रकर्षाने जाणवत होतं. अनिरुद्ध तुझा बाॅस आहे मीरा. काम आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेवलं पाहिजे हे मला कळत होतं पण वळत नव्हतं.
माझ्या प्रोजेक्टचं ढीगभर काम येऊन पडलं होतं. वेळ कसा जात होता कळतच नव्हतं. सकाळी येऊन मी जे कामात डोकं खुपसायचे ते जेवणापुरतंच उठायला मिळायचं मला. निनादबरोबरही जास्त बोलणं व्हायचं नाही. एकदोनदा तर तो वैतागलाच. म्हणाला, “काय गं काम काम? किती काम करशील? आजूबाजूला काय चाललंय तुला माहिती तरी आहे का?” त्याचा वैताग मी समजू शकत होते. माझं खरंच दुसऱ्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नव्हतं. हा प्रोजेक्ट अगदी डिमांडिंग होता आणि मी स्वतःला झोकून देऊन काम करत होते. एक दिवस आॅनसाईट टीमचा मेल आला कि आम्ही काही फंक्शन्स पाठवतोय आणि ती एन्ड ऑफ द डे पर्यंत कोड करून हवी आहेत. मेलची ॲटॅचमेंट उघडली तर त्यात अक्षरश य फंक्शन्स होती. मी ५-१० मिनिटं कुमारच्या मेलची वाट बघितली. म्हटलं आता टास्क्स असाईन करेल मग करेल पण नाही. अर्धा तास झाला तरी त्याचा मेल आला नाही. मग मात्र मी उठून त्याच्या डेस्ककडे गेले. बघितलं तर तो आलाच नव्हता. मी परत माझ्या जागी आले. आता काय करावं असा विचार करत असतानाच अनिरुद्ध आला. तो माझ्या डेस्कपाशी आल्या आल्या मी माझ्याही नकळत उठून उभी राहिले. त्याने सांगितलं आज कुमार येणार नाही, काहीतरी अर्जंट काम आहे त्याचं, त्यामुळे त्याने लिव्ह घेतली आहे. सो, अनिरुद्ध माझ्याबरोबर काम करणार होता.

“फंक्शन्स खूप आहेत. यू विल नीड हेल्प. तू टास्क्स असाईन कर.” असं म्हणून तो गेला. मी टास्क्स असाईन केले आणि कामाला सुरुवात केली. दुपारचे २ वाजले होते. मी जेवायलासुद्धा उठले नव्हते. का काय माहित पण झपाटल्यासारखं काम करत होते मी. मला माझं काम मनापासून आवडायला लागलं होत. अखेर दुपारी ३ ला निनादचा फोन आला, त्याने “कॅफेटेरियात ये, आत्ताच्या आत्ता” इतकंच बोलून त्याने फोन कट केला. मला खरंतर काम लवकरात लवकर पूर्ण करायचं होतं पण निनादचा आवाज मला जरा वेगळाच वाटला म्हणून मी उठले.

कॅफेटेरियात गेले तर निनाद डोकं पकडून बसला होता.
“काय रे काय झालं?” मी विचारलं.
“मीरा....” त्याचे डोळे पाण्याने भरले होते.
“निनाद आर यू ओके?” मला काही कळेचना काय झालंय.
“शर्वरी... शर्वरीला मोहितनं प्रपोज केलंय” त्याच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत होतं.
“अरे मेरे शेर.... प्रपोजच केलंय ना?! त्यात काय मग? दुल्हन तो वो तेरीही बनेगी!” मी त्याचा मूड हलका व्हावा म्हणून म्हटलं.
“मीरा प्लीज... ती हो म्हणालीये त्याला” आणि त्याने मान फिरवून खिडकीबाहेर बघायला सुरूवात केली.
आणि मी? मी अवाक् झाले होते. शर्वरी?!
ती?? आमची एस क्यूब??!
तिने मोहीतला हो म्हटलंय?! का?
कधी झालं हे सगळं?
मी कुठे होते तेंव्हा? मला काहीच कळत नव्हतं. जणू मी त्या मुलीला ओळखत असूनही अजून अनोळखीच होती ती. निनाद तिच्यावर जीव ओवाळून टाकतो हे तिला एकदाही कळलं नसेल? का कळूनही ती अशी वागतेय? नाही नाही! शर्वरी अशी नाही. ती मुद्दाम असं काही करणार नाही. तिला निनादला तिच्याबद्दल काय वाटतंय हे कळायला हवं..

“मीरा...” निनाद मला विचारात गढलेली पाहून अस्वस्थ झाला होता.
“निनाद मी निघते” म्हणून मी तिथून उठले. मला शर्वरी बरोबर बोलायला हवं होतं. ती असं कसं काय वागू शकते? इज शी आऊट आॅफ हर माईंड? निनादचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला कसं काय कळत नाहीये? मागून येणाऱ्या निनादच्या हाका पाठीमागे टाकत मी शर्वरीच्या डेस्ककडे निघाले. तिथे जाऊन बघितलं तर शर्वरी आणि मोहित काहीतरी बोलत होते. माझे पाय जागच्या जागी थांबले. त्या माणसाची मला चीड यायला लागली होती.
“शर्वरी, मला तुझ्याशी बोलायचंय” मी म्हटलं.
“बोल ना” तिने मोहितसमोर बोलू शकतेस अशा अविर्भावात माझ्याकडे पाहिलं.
“मला तुझ्याशी एकटीशी बोलायचं आहे. प्लिज माझ्याबरोबर चल” मला काहीतरी सोक्षमोक्ष लावायचाच होता या मोहित प्रकरणाचा. शर्वरीला घेऊन मी पुन्हा कॅफेटेरियात गेले तर निनाद अजून तिथेच होता. मला आणि शर्वरीला एकत्र बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झर्रकन बदलले. तो पुढे आला,
“मीरा, जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी.” म्हणून त्याने माझ्या मनगटाला धरून जवळ जवळ ओढलंच. आम्ही कॅफेटेरियाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन उभे राहिलो. मी वैतागलेच. असा कसा हा?
“निनाद, प्लिज..” त्याने लगेच माझा सोडला.
“सॉरी मीरा. रियली सॉरी. पण मला माहित आहे तू काय करणार होतीस ते. शर्वरीला जाब विचारणार होतीस ना?” त्याने अचूक ओळखलं होतं मी काय करणार ते.
“तो मी विचारणारच आहे आणि तू मला थांबवू शकत नाहीस, कळलं? तिच्या डोक्यात काय चाललंय ते मला कळायलाच हवं.” मीही असाच हा विषय सोडणार नव्हते. माझ्या मित्राच्या आयुष्याचा प्रश्न होता हा.
“मीरा प्लिज... डोन्ट ट्राय टू बी अ सेंट. तू माझी मैत्रीण आहेस ना? मग प्लिज, मला आणखी काही त्रास नको वाटत असेल तर असं काही करू नकोस.तू जर तिच्याशी या विषयावर बोलणार असलीस तर आपली मैत्री त्याच दिवशी संपेल. आणि मला तुला गमवायचं नाहीये” माझी मैत्रीण या शब्दांवर जोर देत निनाद म्हणाला. मी थांबले. मागे वळून शर्वरीला आपण नंतर बोलू अशी खूण केली, तिने खांदे उडवले, हे काय असं म्हणून आणि ती निघून गेली. थँक यू म्हणून निनादही निघून गेला. माझं डोकं दुखायला लागलं होतं. काय आहे हे? शर्वरी आणि मोहितचा इतका का राग येतोय मला? तिला ज्याला हवं त्याला हो म्हणण्याचा अधिकार आहेच की. मी कोण ठरवणारी तिने कोणाला हो आणि कोणाला नाही म्हणावं? निनादला वाईट वाटलं कि मला त्याचा त्रास का होतो? त्याच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स त्याने मला सांगितलेच पाहिजेत आणि ते मीच सोडवले पाहिजेत असं का वाटत मला?
अण्णाच्या हातची कॉफी घेतल्यावर जरा बरं वाटायला लागलं. मी परत माझ्या डेस्कवर आले, सगळं काम पूर्ण करून स्टेटस अनिरुद्धला पाठवलं आणि ऑफिसमधून निघाले.

दोन महिने असेच गेले. प्रोजेक्टचं काम प्रचंड होतं. या दोन महिन्यात मी निनाद किंवा शर्वरी दोघांशीही हाय हॅलो पलीकडे काहीच बोलू शकले नव्हते. या दोन महिन्यात झालेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे कुमारने स्वतः सांगून हा प्रोजेक्ट सोडला होता आणि अनिरुद्ध आणि मी या प्रोजेक्टवर काम करायला लागलो होतो. आम्ही दोघे रोज सकाळी टास्क्स ठरवायचो आणि दिवसभर अगदी मान दुखेपर्यंत काम करायचो.

फायनली प्रोजेक्ट संपला. आता लगेचच कुठला नवीन प्रोजेक्ट लाईन मध्ये नव्हता. ऑफिसमध्ये दिवाळीच्या सेलिब्रेशनची धामधूम होती. देऊन देऊन ऑफिसवाले एकच दिवस सुट्टी देणार होते आम्हाला. माझा मूड जरा खट्टू झाला होता त्यामुळे. दिवाळी खूप आवडती असल्याने आणि या वर्षी ती साजरी करायला घरी राहता येणार नसल्याने उगाचच कसंतरी वाटत होतं.
आमची दिवाळी खूप साधी असायची. मी आई आणि बाबा छान तयार व्हायचो. मी दारात रांगोळी काढायचे, बाबा लायटिंगच्या माळा नीट करण्यात गुंतलेले असायचे. आई आमचं औक्षण करायची. मग आईने केलेल्या मस्त फराळावर ताव मारायचो आम्ही. मी घरभर पणत्यांच्या ओळी लावायचे. त्यांच्या ज्योतींकडे पाहायला आवडायचं मला.

काहीबाही गेम्स वगैरे झाल्यावर दिवाळीच्या आधीचा दिवस ट्रॅडिशनल डे असेल असा मेल आला. त्याच खरंतर टेन्शनच आलं मला. एकतर मी आत्तापर्यंत साडी क्वचितच नेसली होती. आणि दुसरं म्हणजे साडी नेसून ऑफिसला यायचं म्हणजे बसने यावं लागणार होतं. सिक लिव्ह सांगावी का त्या दिवशी उठून, असा विचार करत होते मी. घरी गेल्यावर आईला सांगितलं तर आई खूप खुश झाली, म्हणाली अशी काही तू मनाने साडी नेसणार नाहीस, बरं झालं.
बघता बघता आलाही ट्रॅडिशनल डे. आईने मला तिनेच आणलेली साडी छान नेसवून दिली होती. मला बसमधून जायचं टेन्शन आलं होतं, तेव्हढ्यात शर्वरीचा फोन आला. ती म्हणाली मी तुला घ्यायला येतेय. मी नाही म्हटलं पण ती काही ऐकेना. शर्वरी आली आणि आम्ही तिच्या कारमधून निघालो. मला काय बोलावं सुचत नव्हतं. त्या दिवशीचा निनादचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता.
“मीरा, खूप छान दिसतेयस तू आज” शर्वरी म्हणाली.
“थँक्स” मी तुटकच बोलले.
“रागावलीयेस का माझ्यावर?” तिचा प्रश्न.
“नाही. मी रागावण्यासारखं काही केलंयस का तू?” मी पुन्हा बॉल तिच्या कोर्टमधे ढकलला. मला तिच्याकडूनच ऐकायचं होतं काय झालंय ते.
आणि त्यानंतर ती जे बोलली ते ऐकल्यावर मात्र मला ही मुलगी पूर्ण वेडी आहे यावर विश्वास बसला होता.
शर्वरीचं असं म्हणणं होतं कि निनाद तिला ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून आवडतो. आणि तिला हेही माहित आहे कि निनादलाही ती खूप आवडते. ती मोहीतला हो म्हणाली ते निनादने स्वतः येऊन सांगावं म्हणून. आणि हे सगळं मोहीतला माहिती होतं.
मी जे ऐकतेय ते खरंय ना? कि काहीतरी चुकीचं ऐकतेय मी?
“कसली ड्रामा क्वीन आहेस तू? हे असलं सगळं मी टीव्हीवरच्या मालिकांमध्येच बघितलंय. निनादला काय वाटलं असेल? त्याने कसा घालवला असेल हा वेळ?” मला राग, आश्चर्य, उत्साह सगळं एकत्रच वाटत होतं.
“मी निनादला आज सगळं सांगणार आहे. त्याला प्रपोज करणार आहे मी” तिने पुढचा बाउंसर टाकला.
काय? मी जवळजवळ ओरडलेच!
होय मीरा. मी आज निनादला प्रपोज करणार आहे आणि त्याला हे सगळं खरंही सांगणार आहे.

दिवसभर मला त्या दोघांनाही पुन्हा भेटता आलं नाही कारण लंच ब्रेक मध्ये मी पाहिलं तर दोघेही ऑफिसमध्ये नव्हतेच. रवीने त्याच्या बायकोने केलेले लाडू आणले होते. अप्रतिम होते चवीला. सगळ्या ऑफिसमध्ये लोक मस्त फिरत होते, एकमेकांशी बोलत, अघोषित सुट्टी असल्यासारखे. पण मला ज्याच्याशी बोलायचं होतं तो कुठे नव्हताच. अनिरूद्ध. सकाळी साडी नेसल्यापासून मला असं वाटत होतं कि त्यानं मला पहावं पण त्याचा कुठे पत्ताच नव्हता. त्याच्या डेस्ककडे उगाचच एक चक्कर मारली मी, मीटिंगमध्ये असतो तेंव्हा त्याची बॅग तरी डेस्कजवळ असायची, आज तीही नव्हती. म्हणजे हा ऑफिसला आलाच नाहीये का काय? बहुतेक उशिरा येणार असेल म्हणून मी वाट पाहायचं ठरवलं. जणू तो भेटला नाही तर माझी दिवाळी चांगलीच जाणार नव्हती.
शेवटी ऑफिस सुटलं. मी तरीही थांबले होते, मगाशी रवी आणि कुमार बोलताना मी ऐकलं होतं की अनिरूद्ध आलाय. पण तब्बल तासाभरानेही तो डेस्कवर आला नाही म्हटल्यावर मी निघायचं ठरवलं. सकाळी मला शर्वरीने सोडलं होतं पण आत्ता तिचाच कुठे पत्ता नव्हता त्यामुळे मला बसने जावं लागणार होतं. माझ्या डेस्कपासून ऑफिसच्या रिसेप्शनपर्यंत जायला एका कॉरिडॉरमधून जावं लागायचं. मी निघाले, साडी सावरत, घड्याळाकडे बघत आपल्याच विचारात चालत असताना अचानक मला तो दिसला. कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाहून तो चालत येत होता. नेव्ही ब्लू कुर्ता, मोतिया रंगाची सुरवार. मला काय करू असं झालं होतं. मला झालेला आनंद त्याला दिसू नये याची पराकाष्ठा करत मी जमिनीवर नजर खिळवली.
पर नजरे कहाॅं किसीकी सुनती हैं? डोळ्यांनी माझा घात केलाच! त्याच्याकडे पाहिलं तर तो थेट माझ्याकडे पाहत येत होता. मला माझ्या हृदयाचे ठोके जाणवत होते. तो आला आणि म्हणाला,
“हाय मीरा”
“हाय अनिरुद्ध. हाऊ आर यू?” मी शक्य तितका नॉर्मल आवाज ठेवत म्हणाले.
“घरी निघालीस?”
“हो. निघालेय.” आधी दिवसभर गायब व्हायचं आणि ऐनवेळी उगवून असं काहीतरी विचारायचं. जाऊदे! याला काही पडलेलंच नाहीये कोणी आपली वाट बघतंय याचं.
“चलो, बाय... हॅपी दिवाली” असं म्हणून मी निघणार इतक्यात तो म्हणाला,
“थांब. एक मिनिट. हॅपी दिवाली. हे तुझ्यासाठी” म्हणत त्याने एक गिफ्ट बॉक्स माझ्या समोर धरलं.
“मी? हे?!”
“अगं कंपनी गिफ्ट आहे. सगळ्या टीमला दिलं होतं, तुलाच द्यायचं राहील होतं.”
“ओह्ह! थँक यू” म्हणून मी ते बॉक्स घेतलं आणि निघणार एव्हढ्यात, त्याने हाताने माझा रस्ता अडवला. तो असं काही करेल असं माझ्या गावीही नव्हतं त्यामुळे मी गोंधळले होते.
“मीरा... एक विचारू? खरं सांगशील?” तो म्हणाला.
“काय?” मी.
“का?”
“काय का?”
“आॅफिस सुटून एक तास झालाय मीरा. का थांबलीस?” माझ्याकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी त्याचा हात बाजूला सारला आणि निघणार इतक्यात त्याच्या हाताची पकड माझ्या हातावर बसली. मी शहारले. मी हात सोडवून घ्यायचा फुका प्रयत्न केला. त्याने हसून माझा हात सोडला.
“खूप सुंदर दिसतेयस तू” तो म्हणाला आणि मी मागे न बघता तडक तिथून निघाले.
क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Omg! finally..!
छान लिहिलयं..
जमलं तर पुढचे भाग लवकर टाका...

खूप धन्यवाद श्रद्धा Happy
गेले काही दिवस बरेच धावपळीत गेल्याने लिहायला वेळच मिळाला नव्हता. आता लवकरच पुढचा भाग टाकेन Happy

वाह, वाचताना वाटत होत की संपूच नये. आता पुढच्या भागाची वाट पाहावी लागणारे. प्लिज लवकर लिहा

Kharay yaar.... It was an amazing part... Imagining all the seens..
Plz post new part soon...

वाह, वाचताना वाटत होत की संपूच नये. आता पुढच्या भागाची वाट पाहावी लागणारे. प्लिज लवकर लिहा. >>>+१

मी बघते असले बारके कपल्स फॉर्म होतात ब्रेक होतात. मधल्यामध्ये कामाला शेंड्या. बॉस वर क्रश अधोगतिचा मार्ग.

> मधल्यामध्ये कामाला शेंड्या. > +१

> बॉस वर क्रश अधोगतिचा मार्ग. > क्रश असायला काही हरकत नाही, प्रेमात वगैरे पडू नका.

आणि तो बॉस हेंद्रट आहे का? > इतक्यात त्याच्या हाताची पकड माझ्या हातावर बसली. मी शहारले. मी हात सोडवून घ्यायचा फुका प्रयत्न केला. त्याने हसून माझा हात सोडला.
“खूप सुंदर दिसतेयस तू” तो म्हणाला > हे सेक्शुअल हरासमेंट मधे येऊ शकते.

सध्या तो निनाद एक तेवढा जरा बरा वाटतोय. नौटंकी शर्वरीला नकार दिला नाही तर तोदेखील बावळट वाटेल.
मीराचे या प्रकरणातले वागणे येडपट आहे. तशीही मीरा येडपटच आहे Lol

अहा!!!
कित्ती सुंदर लिहिलंय, मस्त मस्त !!
लौकर येऊ दे पुढचा भाग Happy