तुझमे तेरा क्या है - १

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 23 April, 2015 - 08:55

सकाळचे शार्प ८:००. मी ऑफिसच्या गेटवर उभी आहे. कसं असेल ऑफिस आता? बदलले असेल? की तसंच जसं मी सोडून गेले होते ४ वर्षांपूर्वी?
मी नक्की कशाचा विचार करतेय? ऑफिसचा की त्याचा? तो.. आज भेटणार इतक्या दिवसांनी. एकमेकांसमोर उभे राहणार आम्ही. काय बोलणार माहीत नाही.
ही माझी गोष्ट.
मी मीरा.
गोष्टीची सुरुवात होते पुण्यात.

पुण्यातली नावाजलेली आयटी कंपनी.
स्थळः एच आर ऑफिस.
मी माझ्या इंटरव्यूच्या रिझल्टची वाट पाहत होते. सोबत आणखी ६ चेहरे, माझ्यासारखीच वाट पाहणारे. इंटरव्यू बरा गेला होता का? चांगला झाला की, सगळी उत्तरे अगदी व्यवस्थित दिली होती मी. सिलेक्शन होईल बहुतेक असे वाटत होते. बोर झालंय आता, अरे जॉब देणार नसला तर थांबवून का ठेवतात? टाईमपास म्हणून इतरांना न्याहाळायला सुरुवात केली. समोर बसली होती एक मुलगी. फॉर्मल चुडीदार, लांब केस, एकदम "एस क्यूब " टाईप्स - सज्जन, सुंदर, सद्गुणी. हात घट्ट मिटून त्यांच्याकडे बघत होती. तिच्या शेजारी एक मुलगा, तो ही फॉर्मल कपड्यात. गंभीर भाव होते त्याच्या चेहर्‍यावर.
पलिकडे आणखी एक जण, चेहरा थोडा बेफिकीर. इतका की जशी या जॉबची त्याला गरजच नाही, पण जॉब त्याला मिळणारच आहे असा भाव होता.
माझे ऑबझर्वेशन एच आर च्या हाकेने थांबले . मी सिलेक्ट झाले होते आणि माझ्याबरोबर ते समोरचे तिघेही. मला खूप आनंद झाला होता, अखेर माझ्या पहिल्या जॉबचे अपॉईंट्मेंट लेटर माझ्या हातात होते. एका आठवड्याने मी ती कंपनी जॉईन करणार होते.

एक आठवडा कसा गेला ते कळालंच नाही. आणि तो जॉईनिंगचा दिवस आला. ऑफिसला पोहोचले तर समोर ती एस क्यूब उभी होती.
"हाय, आय अ‍ॅम शर्वरी" तिचा आवाज खूप गोड होता. देवा! आधीच एस क्यूब त्यात नाव छान, आवाज गोड! पेढा मधात बुडवून खाल्ला तर कसं होईल तसं.
"हाय, आय अ‍ॅम मीरा, नाईस टू मीट यू" मी हसून प्रत्युत्तर दिले. आमच्या दोघींची गेस्ट आयडी कार्ड्स बनवायची चालली होती ती तयार होईपर्यंत बोलत बसलो. शर्वरी मूळची पुण्याचीच. तिला गाण्याची आवड होती, तिने सांगितले की ती शास्त्रीय संगीतसुद्धा शिकली होती.
"खरंतर मला गाण्यातच करीयर करायचे होते" ती सांगत होती.
"इकडे आयटीत कशी वाट चुकलीस मग?"
"बाबांना माझे गाण्यावरचे प्रेम पटत नाही , त्यांचा हट्ट होता की मी इंजिनिअरिंगच करावे. त्यामुळे इकडे आले."
किती सहज तिने माझ्यासारख्या अनोळखी मुलीला मनातली गोष्ट सांगून टाकली होती. किती वेगळी होती ती माझ्यापेक्षा. मला असे मनातले सांगणे या जन्मात तरी शक्य नव्हते. मनातले पटकन बोलून टाकणारा स्वभावच नव्हता माझा.
तिच्याशी बोलताना समोर लक्ष गेले, समोरून एक मुलगा चालत येत होता. अरे हा तर कालचा तो हू केअर्स अ‍ॅटिट्यूडवाला आहे. आणि अचानक "थाड!" मोठा आवाज झाला. तो रिसेप्शनच्या काचेला धडकला होता. कुठे बघत चालला होता कोणास ठाऊक? त्याला काच आहे हे लक्षातच आलं नव्हत बहुतेक. आम्ही दोघीही हसलो, मी पाहिलं, हसताना शर्वरीच्या गालावर छान खळी पडते. पण त्याचवेळी हे ही पाहिलं की त्या मुलाचंही लक्ष शर्वरीकडेच आहे.

नंतर त्याच्याशीही ओळख झाली. त्याचे नाव निनाद होते. निनादचे बाबांची स्व्तःच्या मालकीची प्रथितयश कंपनी होती. पण तो म्हणाला त्याला तिथे जॉब करायचा नाहीये. मी मनात म्हटलं, किती अ‍ॅटिट्यूड आहे या मुलाला. माझ्या बाबांची अशी कंपनी असती तर मी एका पायावर तयार झाले असते तिथे काम करायला. पण असं काही नव्हतं. अर्थात माझी तक्रार नव्हती याबद्दल. माझ्या आई बाबांनी खूप कष्टाने मला शिकवलं होतं. मला इथे यायला खूप कष्ट घ्यावे लागले होते. पण मी ठरवलं होतं, आई बाबांचे सगळे श्रम दूर करायचे, त्यांना खूप आनंदात ठेवायचं. मी जॉबच्या पहिल्याच दिवशी मनात स्वप्नांचे इमले बांधत होते.
आम्हाला तिघांना एच आर ने काँफरन्स हॉलमध्ये बसायला सांगितले होते. थोड्याच वेळात आमचे ईंडक्शन प्रोग्राम्स सुरू होणार होते. हॉलमध्ये पोहोचलो तर तिथे तो गंभीर आधीच हजर होता. मी घड्याळाकडे नजर टाकली, आम्ही तिघे वेळेत आलो होतो. याचाच अर्थ तो खूपच लवकर आला होता. चलो गुड! कोणितरी असं हवच ग्रुपमध्ये.

इंडक्शन प्रोग्राम सुरू झाला, त्यात तीन तास कसे गेले कळालेच नाही. लंच ब्रेक मध्ये आमच्या चौघांची चांगलीच गट्टी जमली. गंभीरचं नाव मोहित होतं.
मोहित शर्मा. आमच्या ग्रुपमध्ये तो एकटाच नॉर्थ इंडियन, बाकी आम्ही तिघे मराठी होतो. पण त्याचं मराठी अगदी छान होतं.
"तुला इतकं चांगलं मराठी कसं येतं रे?" मी विचारलं.
"मी डिग्री इथेच केली ना, हॉस्टेलवर सगळे मित्र मराठी होते, त्यामुळे ही भाषा बोलता यायला लागली."
"छान आहे. नाहीतर हल्ली मराठी माणसांना पण नीट मराठी बोलता येत नाही " इति शर्वरी.
"तू तुमच्या कॉलेजचा टॉपर होतास का रे?" निनादचा मोहितला प्रश्न.
"हो! तू कसे काय ओळखलेस?"
"अरे काही नाही मित्रा, तुझ्याकडे पाहूनच कोणीही सांगेल की तू नक्की टॉपरच असणार"
"हो का? अरे टॉपर तर मीरा ही होती तिच्या कॉलेजची, तिच्याकडे बघून नाही वाटत का तुला तसं?" शर्वरीचा प्रतिप्रश्न.
निनाद थोडासा हिरमुसला, त्याचा गेस चुकीचा आहे की बरोबर यापेक्षा शर्वरी मोहितची बाजू घेऊन बोलतेय याचं वाईट वाटलं की काय त्याला कोण जाणे.
"अरे अर्धा तास होऊन गेला, आपल्याला जायला हवं आता." शर्वरीने घड्याळाकडे पहात म्हटलं.
"अगं इथे काय कोणी विचारायला नाही येणार तुला. आणि हे कॉलेज नाहीये मॅडम, जाऊ की ५ मिनिटात." मी तिला समजवायचा प्रयत्न केला पण ती काही ऐकेना.
मग मात्र मोहितने तिची बाजू घेतली आणि आम्हाला उठावंच लागलं.

लंचनंतर एका सेशनमधे आम्हाला सांगण्यात आले की इथून पुढे २ महिने आमचे ट्रेनिंग असणार आहे. त्यानंतर पुन्हा आमच्या टेस्ट्स होऊन आम्हाला वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस असाईन होतील. ट्रेनींगची भलीमोठी पुस्तके आम्हाला मिळाली. लॉकर्स मिळाले नसल्यामुळे ती सगळी पुस्तके घरी घेऊन जावे लागणार होते. शर्वरीला ती पुस्तके बघूनच टेंशन आले होते आणि तिने ते बोलूनही दाखवले,
"मीरा, ट्रेनिंगसाठीच इतकी पुस्तके दिली आहेत तर मग जॉब करताना कसं होणार?"
"अगं काळजी करू नकोस, सगळे नीट होईल, चिल!" मी तिला धीर द्यायचा प्रयत्न केला.
"शर्वरी, आपण एकत्र करू ना अभ्यास. डोंट वरी" मोहित म्हणाला.
मी मनात म्हटलं, मदतीला तत्पर...मोहित निरंतर... देवा! हा मोहित जरा जास्तच करतोय नाही? जाऊ दे! निघायला हवं आता म्हणत मी माझी बॅग उचलली.
"चलो, बाय उद्या भेटू" एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही चौघे निघालो.
मी बस स्टॉपवर येऊन बसची वाट पहात थांबले. १० मिनिटे तरी गेली असतील. आणि एक बाईक करकचून ब्रेक लावत माझ्यासमोर थांबली. काय माणूस आहे असा विचार डोक्यात येतोय ना येतोय तोच त्याने हेल्मेट काढलं. तो निनाद होता.
"डू यू वाँट लिफ्ट?" तो विचारत होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात तर छान झाली आहे. पु.ले.शु. >>> धन्यवाद चौकट राजा Happy
"एस क्युब" म्हणजे काय>>> "एस क्यूब " टाईप्स - सज्जन, सुंदर, सद्गुणी Happy

खुपच सुंदर ! ओघवते लिखाण ! वर्णनात्मक असले तरी नेमके आटोपशीर लिहिलेय. मजा आली.

पुढल्या भागाची उत्सुकता वाढलीय.
लवकर टाका पुढील भाग !

>>>छान .पुलेशु.>>>धन्यवाद बंट्या Happy

>>>खुपच सुंदर ! ओघवते लिखाण ! वर्णनात्मक असले तरी नेमके आटोपशीर लिहिलेय. मजा आली.पुढल्या भागाची उत्सुकता वाढलीय. लवकर टाका पुढील भाग !>>> धन्यवाद चौथा कोनाडा Happy लवकरच पुढचा भाग टाकेन Happy

मस्त ओघवती शैली Happy

Sक्यूब Lol कॉलेज दिवस आणि ते सर्व असे शॉर्टफॉर्म्स आठवले पटकन

सुरुवात खुप छान झालीय. "एस क्यूब " concept पन छान आहे. >> +१११११११११११११११११११११
खुपच सुंदर ! ओघवते लिखाण ! वर्णनात्मक असले तरी नेमके आटोपशीर लिहिलेय. मजा आली. >> +१११११११११११११११११

.
.