तुझमे तेरा क्या है - २

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 24 April, 2015 - 12:24

"डू यू वाँट लिफ्ट?" निनाद विचारत होता.
"थँक्स. पण माझी बस येईल इतक्यात." मला खरंतर त्याने लिफ्ट हवी का असं विचारणं आवडलं नव्हतं. एका दिवसाच्या ओळखीत त्याच्या बाईकवर लिफ्ट घेणं मला पटणारं नव्हतं.
तो हसला माझ्याकडे पाहून, काहीतरी समजल्यासारखा, आणि आला त्या वेगात निघूनही गेला. मी मात्र तो का हसला असेल यावर घरी पोहोचेपर्यंत विचार करत राहिले.

आई बाबांना मला जॉब मिळाल्याचा खूप आनंद झाला होता. बाबा मला म्हणाले की त्यांच्या कष्टाचे सार्थक झालं असं त्यांना वाटतंय. त्या रात्री मी खूप खुश होते, उद्या माझ्याकडे माझा जॉब असणार होता, माझा पहिला जॉब. रात्री कधी झोप लागली आणि कधी सकाळ झाली ते कळालंच नाही. सकाळी उठून पटकन आवरून ऑफिससाठी तयार झाले. आईने मस्त डबा करून दिला होता. ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी मी लवकर निघून बस स्टॉपवर येऊन थांबले होते. पण बराच वेळ गेला तरी बस आली नाही. आज दुसर्‍याच दिवशी ऑफिसला उशीर होणार अशी भिती वाटायला लागली. चालत जावं का? चालत ऑफिसला पोहोचायला अर्धा तास तरी लागला असता आणि एव्हढा वेळ शिल्लक नव्हता माझ्याकडे. एव्हढ्यात एक कार समोर येऊन थांबली. एका मध्यमवयीन गृहस्थाने कारचा दरवाजा उघडला. ती व्यक्ती ड्रायव्हर वाटत नव्हती. जरा साशंकतेनेच पाहिलं मी त्याच्याकडे, तोच हाक आली,
"मीरा..."
"अगं शर्वरी तू?! हाय!"
"ये ना. ऑफिसला एकत्र जाऊयात. बाबा मला ऑफिसलाच सोड्णार आहेत". अच्छा, ते शर्वरीचे बाबा होते तर. मी हो म्हटलं आणि तिच्या कारमध्ये बसले. जाताना ती जास्त काही बोलली नाही, फक्त माझी तिच्या बाबांशी ओळख करून दिली तितकच. आम्ही ऑफिसला पोहोचलो आणि आमच्या ट्रेनींग हॉलमध्ये येऊन बसलो.
"मीरा आय अ‍ॅम सॉरी"
"अगं सॉरी का म्हणतेस? काय झालं?"
"अगं कारमध्ये जास्त काही बोललेच नाही तुझ्याशी. तू म्हणशील काय मुलगी आहे, आधी लिफ्ट देते आणि नंतर काही बोलतही नाही."
"ठीक आहे गं, चलता है!"
"तुला खरं सांगू? मला बाबांची थोडी भिती वाटते गं. त्यांना कोणती गोष्ट पटेल न पटेल सांगता येत नाही. म्हणजे असं नाही की त्यांच माझ्यावर किंवा माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये, पण..."
"पण काय?"
"पण आई गेल्यापासून बाबा खूप बदललेत. माझे बाबा आधी असे नव्हते. खूप मस्त होतं आमच्या तिघांचं आयुष्य. मी, बाबा आणि आई. पण आई गेल्यापासून बाबांनी जसं काही बंद करून घेतलं स्व्तःला आतल्या आत. खूप गंभीर झालेत, रागवतातही पटकन. माझ्या अ‍ॅडमिशनच्या वेळीही त्यांनी मला निक्षून नाही सांगितलं संगीत शिकण्यासाठी. ए तुला माहित आहे, मला गाण्याची देणगी कोणाकडून मिळालीये? माझ्या आईकडून. तिचा आवाजही खूप गोड होता. पण बाबांना कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणावं वाटत नाही गं मला. आधीच ते खूप एकटे पडलेत, त्यात त्यांच्या मनाविरूद्ध वागून मला त्यांना दुखवायचं नव्हतं."
शर्वरीची आई नाही हे ऐकूनच खूप वाईट वाटलं मला. किती गोड मुलगी आहे ही, का बरे देवाने असे केले असेल तिच्याच बाबतीत?
"शर्वरी मी काय बोलू? मी समजू शकते नाही म्ह्णू शकत गं, कारण आई जवळ नसण्याचा मी विचारही नाही करू शकत. तुझं खरंच कौतुक वाटतं मला. तुझ्या बाबांना किती समजून घेतेयस तू!" आणि ती हसली, तिच्या गालावरच्या खळीसह! तिला माझ्या बोलण्याने बरं वाटतंय हे बघून मला बरं वाटलं.
"हेल्लो गर्ल्स" मागून आवाज आला, आम्ही दोघींनी पाहिलं तर निनाद येत होता.
"हाय निनाद, आज उशिरा आलास?" शर्वरीने त्याला विचारलं.
का कोणास ठाऊक पण मी त्याच्याशी बोलले नाही. ते त्याच्या लक्षात आलं असावं.
"हाय मीरा. लक्ष कुठाय तुझं? की जाणूनबुजून दुर्लक्ष करतेयस?" त्याच्या प्रश्नाचा रोख सरळ होता.
काय??? बरा आहे ना हा? मी कशाला जाणूनबुजून दुर्लक्ष करू? आता काहीही उत्तर दिलं तरी त्याच्याकडे उत्तर तयारच असणार म्हणा. काय करू?
"नाही रे तसं काही नाही. हॅलो! कसा आहेस?"
"मी छान, मस्त, मजेत! तू सांग"
"मीही ओके."
"हे गाईज, हाय, कसे आहात सगळे?" मोहित आला होता. त्याच्या हातात काल मिळालेल्या पुस्तकातली २ पुस्तके होती.
"हाय मोहित. कसा आहेस? अभ्यास सुरूही केलास तू?" शर्वरीला तिच्या पुस्तकांची आठवण येऊन टेंशन आलं.
"अगं हो. काल घरी गेल्यावर एक पुस्तक वाचून काढलं, आता दुसरं वाचतोय" शर्वरी त्याच्याशी बोलण्यात गढून गेली. त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला एक मेंटॉर असाईन केला जाईल आणि दोघांच्या टीम मध्ये आम्ही काम करू. शर्वरीने ठरवून टाकलं होतं की ती मोहितबरोबरच काम करणार आहे. त्यामुळे माझ्याकडे निनादसोबत काम करण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नव्हता. आमच्या मेंटॉरचं नाव रागिणी होतं. ती आम्हाला ४ वर्षे सिनिअर होती. तिचं काम अगदी प्रिसाईझ असायचं, आमच्या शंकांना नेमकी उत्तरे द्यायची ती आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करायला प्रवृत्त करायची.

आमच्या ट्रेनिंगचा एक महिना संपत आला होता.
मोहित शर्वरीबद्दल खूपच कंसर्नड असायचा. त्याचं तिच्याशी वागणं मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे हे मला जाणवत होतं, फक्त ते तसंच निनादलाही जाणवतंय का हे मला निनादला विचारायचं होतं. शर्वरी मात्र जशी निनादबरोबर बोलायची तशीच मोहितबरोबरही.
निनादसोबत काम करताना त्याच्याबद्दल बर्‍याच गोष्टी नव्याने कळत होत्या मला. जसं की तो जितका बेफिकीर दिसतो किंवा दाखवतो स्वतःला , तितका तो केअरलेस नाही.
निनादची आणि माझी छान मैत्री झाली होती.
त्या दिवशी आम्ही काही असाईनमेंट्स सोडवत होतो, काही प्रोग्रॅम्स लिहायचे होते. माझं डोक खूप दुखत होतं त्या दिवशी, त्यामुळे काम काही उरकतच नव्हतं. त्यात प्रोजेक्ट बडी निनाद! मग तर संपलच! एक तर बोलण्यात त्याचा हात कोणी धरू शकायचं नाही. ऑफिस सुटायची वेळ होत आली होती. आज आमचा प्रोजेक्ट पूर्ण होणं आवश्यक होतं.
"काय गं? काम उरकत नाहीये का? माझा कोड झालाय लिहून, वर्क पण होतोय, पण तुझा कोड म्हणजे माझ्या प्रोग्रॅमचा इन्पुट डेटा आहे तो मिळाल्याशिवाय पूर्ण नाही होणार आपला प्रोजेक्ट!"
"सॉरी निनाद. मी लगेच पूर्ण करते"
"आपला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण नाही होणार असंच आपण काम करत राहिलो तर. आज सगळं कंपाईल, रन करून मगच घरी जाऊ"
"अरे तू कशाला थांबतोस? तू तुझा कोड सेंड कर मला, मी पूर्ण करते माझं काम आणि मगच जाईन घरी."
"हो का? इतकी थकलीयेस, बरं वाटत नाहीये तुला आणि म्हणे मी करते. नाही, मला मान्य आहे तू टॉपर होतीस, तू सगळं काम स्वतः करू शकतेस, पण मी पण ढ नव्हतो गं. मी करू शकतो तुला मदत."
मी काहीच बोलले नाही.
"हं. कळालं मला. तुला मदत नकोय. अशी कशी गं तू? इतकं मानी असू नये." त्याच्या चेहर्‍यावर मिष्कील भाव होता. तो जणू चेहरे वाचू शकायचा. कोणाच्या मनात काय चाललंय हे त्याला अचूक कळायचं.
"ए गप रे. मानी वगैरे काही नाही. स्वावलंबी म्हणतात याला"
"हो हो! हे स्वावलंबी मुली, तुला पटत असेल तर कॅफेटेरियामधून कॉफी घेऊन येऊया का? तुलाही बरं वाटेल."
"जशी तुझी इच्छा वत्सा " मी त्याच्यासारखेच हातवारे करत म्हणाले आणि आम्ही दोघे खिदळतच कँटीनकडे निघालो.

कॅफेटेरीयात तुरळकच लोक होते, आमच्यासारखे उशीरपर्यंत थांबलेले. निनादचं वॉलेट विसरलं म्हणून तो परत डेस्कवर गेला आणि मी कॉफी घ्यायला गेले. मला स्ट्राँग कॉफी आवडायची, अगदी नावालाच दूध घातलेली, त्यामुळे मी मशिन कॉफी घ्यायचे नाही. कॅफेटेरीयाचा अटेंड्ंट होता, सगळे त्याला अण्णा म्हणायचे, अण्णालाच सांगावं लागायचं.
"अण्णा एक कॉफी"
"कमी दूध, कमी साखर. मेरेको पता है. अभी लाया मैडम" अण्णाची बोलायची ढब साऊथ ईंडियन होती. तो होताही मूळचा तिकडचाच कुठला तरी. मॅडम मधल्या ''म'' चा उच्चार तो मैत्रिण मधल्या मै सारखा करायचा. त्यावरून निनादचं त्याच्याशी खूपदा तात्विक वाजायचं पण ते तेव्हढ्यापुरतंच. अण्णा खूप साधा आणि सरळ माणूस होता, मन लावून आपलं काम करत असायचा. मी हसून मान डोलावली आणि एक खिडकीशेजारचं टेबल पकडून बसले. पुढच्या आठवड्यापासून आमच्या टेस्टस सुरू होणार होत्या, ज्यांच्या रिझल्ट्स वरून आम्हाला प्रॅक्टिसेस मिळणार होत्या. मला कोणती प्रॅक्टीस मिळेल कोणास ठाऊक? मी विचारात हरवून गेले होते.

"मैडम.. आपका कॉफी.." अण्णाच्या आवाजाने मागे वळून पाहिलं, माझी कॉफी तयार होती. निनादचा अजून पत्ता नव्हता. कॉफीचा मग घेऊन मागे वळणार इतक्यात एक आवाज आला,
"अण्णा एक कॉफी. आपली नेहमीचीच"
"येस्सर..." म्ह्णून अण्णा किचनमध्ये गायब झाला.

कोण आहे म्हणून मी मागे नजर फिरवली तर समोर तो उभा होता.
पर्फेक्ट व्हाईट शर्ट, त्याच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या. त्याला साजेसा टाय, थोडासा सैल केलेला.
मी नजर उचलून पाहिलं तर त्याची नजर माझ्यावरच रोखलेली होती.
कशी होती ती नजर? हे नाही सांगू शकणार.
एकच शब्द असावा...
थेट.
समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारी. त्याच्या नजरेतून नजर सोडवून घेणं खूपच अवघड जात होतं मला.
काय हे मीरा?! स्टॉप लुकिंग अ‍ॅट हिम! मी मनात स्वतःला बजावत होते पण तशी कृती काही माझ्याकडून घडत नव्हती.
त्याला तरी काय होतय दुसरीकडे नजर वळवायला? तूच का नमतेपणा घ्यायचास? असं एक मन मला सांगत होतं. मग मात्र मी निग्रहाने मान वळवली.
"सर, आपका स्ट्राँग कॉफी" अण्णा त्याची कॉफी घेऊन आला.
मी माझ्या टेबलवर येऊन बसले. तो पलिकडच्याच टेबलपाशी जाऊन बसला.

"काय गं? घेतलीस का कॉफी?" निनाद आला एकदाचा.
"किती वेळ रे? नोटा छापायला गेला होतास की काय?" मला खरंतर राग आला होता निनादचा. का ते माहीत नाही.
"अगं हो हो! किती चिडशील? शर्वरी भेटली, तिला काही क्वेशन्स होते असाईनमेंटबद्दल ते विचारत होती.
"का? मोहित नाही आलाय का आज?" मी त्याला छेडलं. निनादच्या मनात शर्वरीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे खुद्द त्यानंच मला सांगितलं होतं, त्यामुळे जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा मी त्याला तिच्यावरून चांगलंच पिडायचे.
"ए गपे. घेतलीस ना कॉफी? चल आता. तुला माझी मदत नको आहे हे मला माहित आहे पण तुझं काम पूर्ण होईपर्यंत मी थांबणार आहे तुझ्यासोबत" मोहितचा विषय त्याला आवडला नव्हता हे स्पष्ट दिसत होतं त्याच्या चेहर्‍यावर.
"चल निघू" म्हणत मी उठले आणि निघाले. जाता जाता सहज शेजारच्या टेबलवर माझं लक्ष गेलं, तो अजूनही तिथेच होता.
त्याने एक हलकीशी स्माईल दिली आणि बास! मी ब्लँक झाले होते. एकाच जागेवर थांबले होते, पुन्हा त्याची ती अडकवणारी नजर माझ्यासमोर होती आणि मला पुन्हा हरायचं नव्हतं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bhari watatay..
Anubhavalyasarkh,.... Wink

धन्यवाद स्वस्ति, अदिति, santosh m, युनिकॉर्न, रीया Happy

आशिशगुन, चौथा कोनाडा आणि preetiiii हाही भाग वाचून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद Happy

अरे Sad
दोनच भाग लिहून गायब झाल्या का या ताई Sad

कोणी ओळखत असेल तर सांगा त्यांना पुढचा भाग लिहायला...

.
.

अहाहा!
हा ही भाग सुंदर ! " तो " कोण अन कसा असेल याची उत्सुकता लागलीय ! >>> +११११११११११११११११११११११११११११११
छान लिहिता तुम्ही ! सुंदर , अप्रतिम..
आता पुढचा भाग वाचतो लगेच.