जेनीला, माझ्या भावी सुनेला, मरी कोंडोने जणू पछाडलं होतं. वर्ष सुरू होऊन ८ आठवडे झाले होते आणि पैकी तिने ६ “कोनमारी” पद्धतीने घर लावण्यात घालवले. राज, माझा मुलगा, एरवी जेनीच्या उपक्रमात आणि उपद्व्यापात तसा समरसून सहभागी होतो. पण ह्या वेळी मात्र त्याने अगदी लाज आणली. अगदी भर डायनिंग टेबलवर त्याने जाहीर केले की त्याला कोनमारी पद्धत किचकट वाटते आणि ऑर्गनायझिंग मध्ये त्याला अजिबात रस नाही. आता प्रकरण माझ्या “अपब्रिनगिंग” वर शेकणार असं दिसताच मी म्हणाले “ जेनी, देअर इज an इंडियन मेथड, इट्स कॉल्ड “आवराआवारी”. जस्ट लाईक “कोनमारी”, बट लिटल रिलॅक्स्ड.” नीना, माझी मुलगी, माझ्या आवरा-आवारीच्या सक्त विरोधात असते. तिने “नो आवरा-आवारी फॉर माय रूम, प्लिज!” असे स्पष्ट सांगितले. आता जेनीच्या हिरमुसल्या चेहऱ्यावर जरा उत्सुकता आली. मी ही लगेच जेनीला विकेंडला कोनमारी पद्धती वरचे पुस्तक डाऊनलोड करून वाचेन असे आश्वासन दिले. तिने त्यापेक्षा नेटफ्लिक्स वरचा शो बघ असे सुचवले. गाडी अपब्रिनगिंग स्टेशनावर न थांबताच नेटफ्लिक्स वर गेल्याचे पाहून मला हुश्श झाले.
कबूल केल्याप्रमाणे “टाईडिंग अप” नावाचा मरी कोंडोचा शो मी पाहायला घेतला आणि मी थक्कच झाले. शो बद्दल थोडक्यात सांगायच तर- लोकांचे घर “व्यायला” लागते (माझ्या काकूच्या शब्दकोशातला हा ठेवणीतला शब्द. ही “कित्ती पसारा मांडला” पुढची स्टेज!!). मग ते मरीआईला पैसे देऊन बोलावतात. ती ‘कन्सल्टन्ट म्हणून येते आणि आई-सासू सांगेल तेच सांगते. मात्र ती पैसे घेत असल्याने आई सासूच्या तार सप्तकातील भावना वजा असतात. मग लोक ही शहाण्यासारखे त्यांचे त्यांचे घर आवारात. एवढस्स्सच त्या शोचे कथाबीज. बरं, लोकांचे पसरलेले घर हा इतरांच्या करमणुकीचा विषय असू शकतो असा द्रष्टेपणा असणारा नतद्रष्ट प्रोड्युसर ही जगात असू शकतो पाहून मी अधिकच हतबुद्ध झाले. पण भलता लोकप्रिय शो होता म्हणे.
मरीआईचे घर आवरायचे काहीकाही फन्डे अगदी मजेदार होते. तिच्या मते कपडे आधी घराच्या मध्यभागी रचून ठेवायचे मग त्या वस्त्रराशीने धक्का बसल्यावर त्याची उस्तवार करायची. मला उगाचच आवरा-आवारी मेथडची आधारस्तंभ कृष्णाबाई बोहारीण आठवली. ती घरातील जुने कपडे घेऊन जायची आणि बदल्यात भांडी द्यायची. दसरादिवाळी, किंवा संक्रांत अशा कुठल्याश्या सणावाराच्या आसपास तिची फेरी असायची. मोबाईल नव्हते तरी आई-काकूला पक्के माहिती असायचे ती कधी येणार. एका कोपऱ्यात तिला द्यायच्या कपड्यांचे गाठोडे बांधलेले असायचे. मॅनेजमेंटचे पहिले तत्त्व “हॅव ऍन अजेंडा, बट डोन्ट शो दि अजेंडा” मी काकू कडून शिकले. दुपारी दरवाजाशी कृष्णाबाई आली की काकू अर्धेच गाठोडे समोर ठेवायची. कृष्णाबाई ही कपड्याची रास उंबरठ्यापर्यंत असेल तर पेला, कडीपर्यंत असेल तर दुधाचे पातेले, बेलपर्यंत असेल तर स्टीलचे घमेले आणि आयहोल पर्यंत असेल तर दहा किलोचे डबे असे काहीबाही सांगायची आणि काकूशी तिची दुपारभर हुज्जत चालायची. त्यामुळे मरीआईच्या शोमध्ये घरात छताला लागतील इतके कपडे जमा कसे होतात हा मूलभूत प्रश्न मला पडला. अमेरिकेत बोहारीण नाही ह्यांच मला उगीच दुःख झालं.
घराच्या मध्यभागी रचलेले कपडे परत कपाटात ठेवताना मरीआईची एक विशिष्ट पद्धत होती. कपडा किंवा वस्तू हातात घ्यायची आणि “डज धिस स्पार्क जॉय फॉर यू?” असा प्रश्न स्वतःला करायचा. उत्तर नाही आले तर हातातील गोष्ट टाकून द्यायची. आता हा प्रश्न दहावीस वर्षांपूर्वी मी स्वतःला कधी विचारला असता तर दात येताना किरकिरणारा राज आणि डब्याऐवजी लंचमनी साठी ‘फसी’ होणारी माझी मुलगी नीना सगळ्यात आधी घराबाहेर गेले असते. नंतर डोळे टिपत मीच घरात घेतलं असतं ती गोष्ट वेगळी. पण एकूणात जॉय ह्या एका शब्दाभोवती सगळं आयुष्य गुंफणारे भाग्यवान लोकं फार नसावेत. म्हणून अशा वेबशोजची चलती असावी. आयुष्याचा पर्पज, रिस्पॉन्सिबिलिटी, ड्यूटी घातलेला भेळभत्ता केल्याशिवाय मनाचे फॅरेक्स बेबी सुदृढ राहात नाही अशी माझीही बाळबोध धारणा. मात्र माझ्या प्रौढ मनाला “जॉय” ह्या एका शब्दाचा टकीला शॉट द्यायची माझी आता तयारी झाली होती. मी मनोमन मरीआईचे आभार मानले. मरी जॉयचा अनुभव आल्यावर जशी “टिंग” म्हणून उडी मारते त्याचीही प्रॅक्टिस मी सुरू केली.
सगळं “कोनमारी” पद्धतीने करायचं म्हणलं तर मरीआई करते तशी ‘इंट्रोडक्शन’ करावी लागणार. आधी वज्रासन घालायचं मग घराला स्वतःची ओळख करून द्यायची आणि आता सगळं “टाइडी” करणार असं सांगायचं. शुक्रवारी सकाळी मी ही कपाटापाशी गेले आणि वज्रासन घातले. मग मान खाली घालून “पंधराशे हॅरिसना, मी आता पसारा कमी करणार आहे” असं मनोभावे सांगितलं. आता घरही प्रेमाने “मुजिक” म्हणेल आणि “स्वीटी तेरा ड्रॅमा” मधल्या सीमा पहावासारखी नाचत बागडत मी घर साफ करेन अशी माझी माफक अपेक्षा होती. पण मी माझ्या कानाने स्पष्ट ऐकले पंधराशे हॅरिसन गब्बरसारखं हसलं आणि वर “बहुत जान है इन हातोमें, ये हात मुझे दे दे ठाकूर” अगदी डॉल्बी साऊंडात म्हणाले. वज्रासनातून उठताना मला खुर्चीला उगाच धरावे लागले. कुठल्या बाऊल मध्ये साचलेल्या असंख्य पेनीज, कधीतरी पेंटींग करेन म्हणून गराज मध्ये पडलेले रंग, भारतातून उगाच भसाभसा आणलेली शिकेकाई......एक नाही अनेक वस्तू डोळ्यासमोर बसंतीसारख्या नाचून गेल्या. अचानक मला राजचे म्हणणे पटले. कोनमारी पद्धत किचकट आहे! आणि भारतीय “आवरा-आवारी” मेथडही ठीकच आहे. वस्तू सापडायला 37 सेकंदां ऐवजी ३.७ मिनिटे लागले म्हणून काय बिघडणार होते, उगीच 37 तास न लागल्याशी कारण. ह्यावेळी मात्र मला घराने “मुजिक” म्हणालेलं अगदी साफ ऐकू आलं, आता “स्वीटी तेरा ड्रॅमा” लावून नाचले पाहिजे.
धिस डज स्पार्क जॉय फॉर मी.
(No subject)
Lol मस्त लिहिलंय!
:-)) मस्त लिहिलंय!
Pages