कोन मारी त्याला देव तारी - पंधराशे हॅरिसन

Submitted by सीमंतिनी on 25 February, 2019 - 00:59

जेनीला, माझ्या भावी सुनेला, मरी कोंडोने जणू पछाडलं होतं. वर्ष सुरू होऊन ८ आठवडे झाले होते आणि पैकी तिने ६ “कोनमारी” पद्धतीने घर लावण्यात घालवले. राज, माझा मुलगा, एरवी जेनीच्या उपक्रमात आणि उपद्व्यापात तसा समरसून सहभागी होतो. पण ह्या वेळी मात्र त्याने अगदी लाज आणली. अगदी भर डायनिंग टेबलवर त्याने जाहीर केले की त्याला कोनमारी पद्धत किचकट वाटते आणि ऑर्गनायझिंग मध्ये त्याला अजिबात रस नाही. आता प्रकरण माझ्या “अपब्रिनगिंग” वर शेकणार असं दिसताच मी म्हणाले “ जेनी, देअर इज an इंडियन मेथड, इट्स कॉल्ड “आवराआवारी”. जस्ट लाईक “कोनमारी”, बट लिटल रिलॅक्स्ड.” नीना, माझी मुलगी, माझ्या आवरा-आवारीच्या सक्त विरोधात असते. तिने “नो आवरा-आवारी फॉर माय रूम, प्लिज!” असे स्पष्ट सांगितले. आता जेनीच्या हिरमुसल्या चेहऱ्यावर जरा उत्सुकता आली. मी ही लगेच जेनीला विकेंडला कोनमारी पद्धती वरचे पुस्तक डाऊनलोड करून वाचेन असे आश्वासन दिले. तिने त्यापेक्षा नेटफ्लिक्स वरचा शो बघ असे सुचवले. गाडी अपब्रिनगिंग स्टेशनावर न थांबताच नेटफ्लिक्स वर गेल्याचे पाहून मला हुश्श झाले.

कबूल केल्याप्रमाणे “टाईडिंग अप” नावाचा मरी कोंडोचा शो मी पाहायला घेतला आणि मी थक्कच झाले. शो बद्दल थोडक्यात सांगायच तर- लोकांचे घर “व्यायला” लागते (माझ्या काकूच्या शब्दकोशातला हा ठेवणीतला शब्द. ही “कित्ती पसारा मांडला” पुढची स्टेज!!). मग ते मरीआईला पैसे देऊन बोलावतात. ती ‘कन्सल्टन्ट म्हणून येते आणि आई-सासू सांगेल तेच सांगते. मात्र ती पैसे घेत असल्याने आई सासूच्या तार सप्तकातील भावना वजा असतात. मग लोक ही शहाण्यासारखे त्यांचे त्यांचे घर आवारात. एवढस्स्सच त्या शोचे कथाबीज. बरं, लोकांचे पसरलेले घर हा इतरांच्या करमणुकीचा विषय असू शकतो असा द्रष्टेपणा असणारा नतद्रष्ट प्रोड्युसर ही जगात असू शकतो पाहून मी अधिकच हतबुद्ध झाले. पण भलता लोकप्रिय शो होता म्हणे.

मरीआईचे घर आवरायचे काहीकाही फन्डे अगदी मजेदार होते. तिच्या मते कपडे आधी घराच्या मध्यभागी रचून ठेवायचे मग त्या वस्त्रराशीने धक्का बसल्यावर त्याची उस्तवार करायची. मला उगाचच आवरा-आवारी मेथडची आधारस्तंभ कृष्णाबाई बोहारीण आठवली. ती घरातील जुने कपडे घेऊन जायची आणि बदल्यात भांडी द्यायची. दसरादिवाळी, किंवा संक्रांत अशा कुठल्याश्या सणावाराच्या आसपास तिची फेरी असायची. मोबाईल नव्हते तरी आई-काकूला पक्के माहिती असायचे ती कधी येणार. एका कोपऱ्यात तिला द्यायच्या कपड्यांचे गाठोडे बांधलेले असायचे. मॅनेजमेंटचे पहिले तत्त्व “हॅव ऍन अजेंडा, बट डोन्ट शो दि अजेंडा” मी काकू कडून शिकले. दुपारी दरवाजाशी कृष्णाबाई आली की काकू अर्धेच गाठोडे समोर ठेवायची. कृष्णाबाई ही कपड्याची रास उंबरठ्यापर्यंत असेल तर पेला, कडीपर्यंत असेल तर दुधाचे पातेले, बेलपर्यंत असेल तर स्टीलचे घमेले आणि आयहोल पर्यंत असेल तर दहा किलोचे डबे असे काहीबाही सांगायची आणि काकूशी तिची दुपारभर हुज्जत चालायची. त्यामुळे मरीआईच्या शोमध्ये घरात छताला लागतील इतके कपडे जमा कसे होतात हा मूलभूत प्रश्न मला पडला. अमेरिकेत बोहारीण नाही ह्यांच मला उगीच दुःख झालं.

घराच्या मध्यभागी रचलेले कपडे परत कपाटात ठेवताना मरीआईची एक विशिष्ट पद्धत होती. कपडा किंवा वस्तू हातात घ्यायची आणि “डज धिस स्पार्क जॉय फॉर यू?” असा प्रश्न स्वतःला करायचा. उत्तर नाही आले तर हातातील गोष्ट टाकून द्यायची. आता हा प्रश्न दहावीस वर्षांपूर्वी मी स्वतःला कधी विचारला असता तर दात येताना किरकिरणारा राज आणि डब्याऐवजी लंचमनी साठी ‘फसी’ होणारी माझी मुलगी नीना सगळ्यात आधी घराबाहेर गेले असते. नंतर डोळे टिपत मीच घरात घेतलं असतं ती गोष्ट वेगळी. पण एकूणात जॉय ह्या एका शब्दाभोवती सगळं आयुष्य गुंफणारे भाग्यवान लोकं फार नसावेत. म्हणून अशा वेबशोजची चलती असावी. आयुष्याचा पर्पज, रिस्पॉन्सिबिलिटी, ड्यूटी घातलेला भेळभत्ता केल्याशिवाय मनाचे फॅरेक्स बेबी सुदृढ राहात नाही अशी माझीही बाळबोध धारणा. मात्र माझ्या प्रौढ मनाला “जॉय” ह्या एका शब्दाचा टकीला शॉट द्यायची माझी आता तयारी झाली होती. मी मनोमन मरीआईचे आभार मानले. मरी जॉयचा अनुभव आल्यावर जशी “टिंग” म्हणून उडी मारते त्याचीही प्रॅक्टिस मी सुरू केली.

सगळं “कोनमारी” पद्धतीने करायचं म्हणलं तर मरीआई करते तशी ‘इंट्रोडक्शन’ करावी लागणार. आधी वज्रासन घालायचं मग घराला स्वतःची ओळख करून द्यायची आणि आता सगळं “टाइडी” करणार असं सांगायचं. शुक्रवारी सकाळी मी ही कपाटापाशी गेले आणि वज्रासन घातले. मग मान खाली घालून “पंधराशे हॅरिसना, मी आता पसारा कमी करणार आहे” असं मनोभावे सांगितलं. आता घरही प्रेमाने “मुजिक” म्हणेल आणि “स्वीटी तेरा ड्रॅमा” मधल्या सीमा पहावासारखी नाचत बागडत मी घर साफ करेन अशी माझी माफक अपेक्षा होती. पण मी माझ्या कानाने स्पष्ट ऐकले पंधराशे हॅरिसन गब्बरसारखं हसलं आणि वर “बहुत जान है इन हातोमें, ये हात मुझे दे दे ठाकूर” अगदी डॉल्बी साऊंडात म्हणाले. वज्रासनातून उठताना मला खुर्चीला उगाच धरावे लागले. कुठल्या बाऊल मध्ये साचलेल्या असंख्य पेनीज, कधीतरी पेंटींग करेन म्हणून गराज मध्ये पडलेले रंग, भारतातून उगाच भसाभसा आणलेली शिकेकाई......एक नाही अनेक वस्तू डोळ्यासमोर बसंतीसारख्या नाचून गेल्या. अचानक मला राजचे म्हणणे पटले. कोनमारी पद्धत किचकट आहे! आणि भारतीय “आवरा-आवारी” मेथडही ठीकच आहे. वस्तू सापडायला 37 सेकंदां ऐवजी ३.७ मिनिटे लागले म्हणून काय बिघडणार होते, उगीच 37 तास न लागल्याशी कारण. ह्यावेळी मात्र मला घराने “मुजिक” म्हणालेलं अगदी साफ ऐकू आलं, आता “स्वीटी तेरा ड्रॅमा” लावून नाचले पाहिजे.
धिस डज स्पार्क जॉय फॉर मी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.. मुलांना पहिले बाहेर जावं लागलं असतं)) खतरनाक प्रामाणिकपणा..
आवराआवर करणे यावर माझ्या सुपुत्राला एकदा झापलं तेव्हा म्हणाला, आई, तू सौंदर्य वादी अथेन्स शहर आहेस पण मी विस्तारवादी स्पार्टा.

इट्स कॉल्ड “आवराआवारी” > Lol

मग ते मरीआईला पैसे देऊन बोलावतात. ती ‘कन्सल्टन्ट म्हणून येते >>
ला उगाचच आवरा-आवारी मेथडची आधारस्तंभ कृष्णाबाई बोहारीण आठवली.>
“हॅव ऍन अजेंडा, बट डोन्ट शो दि अजेंडा” >>
दात येताना किरकिरणारा राज आणि डब्याऐवजी लंचमनी साठी ‘फसी’ होणारी माझी मुलगी नीना सगळ्यात आधी घराबाहेर गेले असते. >>
पंधराशे हॅरिसन गब्बरसारखं हसलं >>

Lol सकाळी सकाळी खूप हसले

छान छान लिहिलंय.
कोन मारी हमारे बस की बात नही.
हम भी स्वीटी तेरा ड्रामा पे नाचनेवाले Happy अजुन भरीला ट्विस्ट कमरीया वर पण नाचणारे Happy

धमाल मजा आली
कधीतरी घाबरत घाबरत या कोनमारी ला भेटेन.

है शाब्बास!! मस्त..
मी एक कुठलातरी कपड्याची घडी घालायचा व्हिडिओ पाह्यला होता तिचा (बहुतेक तिचाच). आईशप्पथ इत्का वेळ कपड्यांच्या घड्या शिकण्यात आणि मग करण्यात घालवायचा या कल्पनेने मला डिप्रेशन आले होते.

>> पंधराशे हॅरिसन इज बॅक
सो ग्लॅड इट इज बॅक!!!

नेहेमीप्रमाणेच मस्त, खुसखुशीत.
घरी आवराआवरी होत नसणे किंवा प्रायॉरिटी लिस्ट मध्ये आवराआवरी ला सगळ्यात खालचा नंबर असणे ह्याने फार त्रास होतो हो! पण शेवटी "केल्याने होत आहे रे; आधी केलेची पाहिजे" ह्याचं महत्त्व जाणवतं आणि मी परत म्हणते "आजच आवराआवरी करणं नडलंय का" Lol

सही लिहिलंय!

शो बद्दल थोडक्यात सांगायच तर- लोकांचे घर “व्यायला” लागते (माझ्या काकूच्या शब्दकोशातला हा ठेवणीतला शब्द. ही “कित्ती पसारा मांडला” पुढची स्टेज!!). मग ते मरीआईला पैसे देऊन बोलावतात. ती ‘कन्सल्टन्ट म्हणून येते आणि आई-सासू सांगेल तेच सांगते. मात्र ती पैसे घेत असल्याने आई सासूच्या तार सप्तकातील भावना वजा असतात. मग लोक ही शहाण्यासारखे त्यांचे त्यांचे घर आवारात. एवढस्स्सच त्या शोचे कथाबीज. बरं, लोकांचे पसरलेले घर हा इतरांच्या करमणुकीचा विषय असू शकतो असा द्रष्टेपणा असणारा नतद्रष्ट प्रोड्युसर ही जगात असू शकतो पाहून मी अधिकच हतबुद्ध झाले.
डज धिस स्पार्क जॉय फॉर यू?” असा प्रश्न स्वतःला करायचा. उत्तर नाही आले तर हातातील गोष्ट टाकून द्यायची. आता हा प्रश्न दहावीस वर्षांपूर्वी मी स्वतःला कधी विचारला असता तर दात येताना किरकिरणारा राज आणि डब्याऐवजी लंचमनी साठी ‘फसी’ होणारी माझी मुलगी नीना सगळ्यात आधी घराबाहेर गेले असते.

हे वाचून भयंकर हसायला आलं. Rofl

हे वाचून भयंकर हसायला आलं. Rofl>> खरंच, अशक्य जोरात हसले..:)
अतिशय खुसखुशीत आणि आटोपशीर लिहिलं आहेस..पसारा न घालता Happy

वाह वाह पंधराशे हॅरिसन चा नवीन भाग बघून आनंद झाला!

> आता हा प्रश्न दहावीस वर्षांपूर्वी मी स्वतःला कधी विचारला असता तर दात येताना किरकिरणारा राज आणि डब्याऐवजी लंचमनी साठी ‘फसी’ होणारी माझी मुलगी नीना सगळ्यात आधी घराबाहेर गेले असते.

आयुष्याचा पर्पज, रिस्पॉन्सिबिलिटी, ड्यूटी घातलेला भेळभत्ता केल्याशिवाय मनाचे फॅरेक्स बेबी सुदृढ राहात नाही अशी माझीही बाळबोध धारणा. >

मस्त Lol Lol

दात येताना किरकिरणारा राज आणि डब्याऐवजी लंचमनी साठी ‘फसी’ होणारी माझी मुलगी नीना सगळ्यात आधी घराबाहेर गेले असते. >>
:-)) :-))

मस्त लिहिलंय.कोन मारी स्टाईलने कपाटात काही भाग रचला आहे.बाकी तिचं नाही पटत किंवा करता येत नाही.

अरे काय भन्नाट लिहिलं आहे. खुसुखुसू हसणे म्हणजे काय हे आज हे ललित वाचताना कळलं.

कविता महाजनच 'भिन्न' संपवून संध्याकाळपासून उदास आणि बधिर होते. हा उतारा बेस्ट होता.

प्रचंड आवडलं. मी कोनमारीचे २ एपिसोड्स पहिले. ज्या लोकांना कपडे हँगरला टांगायचं कंटाळा येतो ती लोकं बसून सुरकुती न पाडता घडी घालणार ? त्यामुळं तेच २ एपिसोड्स , बस्स

Pages