पुस्तक परिचय - आडवाटेची पुस्तकं

Submitted by अश्विनी कंठी on 20 February, 2019 - 00:06

निखिलेश चित्रे यांचे 'आडवाटेची पुस्तकं' म्हणजे नेहमीपेक्षा वेगळया प्रकारची पुस्तक. Book on books ह्या प्रकारातील हे अजून सुरेख पुस्तक.

ह्या पुस्तकाचा विषय आहे जगभरातल्या साहित्यिकांच्या कादंबऱ्या. यातल्या सर्व साहित्यिकांनी ‘कादंबरी’ या वाडमय प्रकारात वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. कधी त्यांनी कथन पद्धतीत बदल केला, तर कधी  पुस्तकाच्या मांडणीमध्ये. काहींनी निवेदन शैलीत प्रयोग केले. कधी पूर्वापार चालत आलेले निकष बाजूला ठेवून प्रयोग केले, तर कधी वाचकाला सक्रीय बनवण्यासारखा नवीन प्रकार साहित्यविश्वात रुजू केला. या अनेकविध नाविन्यपूर्ण प्रयोगांची ओळख म्हणजेच हे पुस्तक.

Advatechi Pustake Cover.jpg

खूप काही सांगावेसे वाटत आहे, पण वानगीदाखल काही थोडेसेच प्रयोग सांगते.

  • हुलीयो कोर्तासार या लेखकाने त्याच्या ‘हॉपस्कॉच’ ह्या कादंबरीमध्ये कथन पद्धतीमध्ये प्रयोग करून पाहिला. त्याने प्रकरणांच्या क्रमाची जाणीवपूर्वक उलथापालथ केली. वाचक हे पुस्तक नेहमीच्या पुस्तकाप्रमाणे पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत वाचू शकतात किंवा  प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी आता कोणते प्रकरण वाचावे, तो नंबर सांगितला आहे त्या प्रमाणे वाचू शकतात. अश्या क्रमाने वाचले की ते कथानक ऑरोबोरस या स्वतःचंच शेपूट गिळणाऱ्या सापासारखे गोल फिरत राहते, संपतच नाही.
  • फर्नांदो पेस्सोआ (पोर्तुगीज) या लेखकाने वेगवेगळ्या प्रकारच्या कविता (निसर्गकविता, प्रेमकविता, बंडखोर कविता, इ.) तीन वेगवेगळ्या टोपणनावांनी केल्या. पण ती फक्त ही टोपणनावेच घेऊन थांबला नाही, तर त्याने प्रत्येक टोपणनावाला एक काल्पनिक व्यक्तिमत्व दिले. एक पेशाने डॉक्टर होता, दुसरा इंजिनिअर आणि तिसरा मेंढपाळ. या सर्वांना त्याने वेगवेगळी सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी दिली, वेगवेगळ्या आवडी निवडी दिल्या. त्यांच्या आयुष्याच्या कल्पिलेल्या प्रवासामुळे (कोणी लेखन संन्यास घेतला, तर कोण जुगारी झाला) आणि बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यक्तिमत्व बदलत गेले आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या कवितांमध्ये फर्नांडो लिहित गेला. ही कल्पनाशक्तीची अद्भुत भरारीच होय.
  • गेओर्गी गोस्पोदिनव (बल्गेरिअयन) ची ‘नॅचरल नॉव्हेल’ नावाची कादंबरी जगभर गाजली आहे. त्या कादंबरीच्या सुरवातीला वाक्य आहे. ‘ही कादंबरी असंख्य सूक्ष्म कणांची बनलेली आहे आणि या कणांना एकत्र जुळवण्याच्या अमर्याद शक्यता आहेत.’ या कादंबरीचे वैशिष्ट्य असे की इथे  निवेदनाचे सगळे प्रकार वापरले आहेत - गप्पा, निबंध, समीक्षा, प्रवासवर्णन, रहस्यकथा, बातमी, जाहिरात चिंतन.... तीन निवेदक मिळून ही गुंतागुंतीची गोष्ट सांगतात. हे कमी पडले म्हणून की काय, पण एक माशीदेखील अजून एका निवेदकाचे काम करते आणि कादंबरीतल्या कथाबिजांना एकत्र जोडते. माशीला संयुक्त डोळ्यातून अनंत प्रतिमा दिसतात, म्हणून माशीची निवड केली आहे. लेखकाची ही सृजनात्मकता पाहून वाचक निश्चितच या पुस्तकाच्या प्रेमात पडावा.
  • मर्सेल बेनाबू (फ्रेंच) या लेखकाच्या ‘Why I have not written any of my books’नावाच्या कादंबरीत लेखनाची तीव्र ऊर्मी असूनही लिहिता का आले नाही हे या लेखकाने सांगितले.आणि तेही कसे मांडले आहे पहा... सुरुवातीला प्रस्तावना... मग परत प्रस्तावना..... मग पहिले प्रकरण.... आणि शेवट दीर्घ प्रस्तावना असे या कादंबरीचे स्वरूप आहे. त्याचेच दुसरे पुस्तक म्हणजे ‘Dump this book while still you can’. पुस्तकच्या सुरुवातीलाच “ चला हे पुस्तक लगेच बाजूला ठेवा. नाहीतर असा करा की आत्ता ताबडतोब शक्य तितक्या लांब फेकून द्या. जास्त उशीर व्हायच्या आधीच. असा केलं तरच तुम्ही त्याच्या तावडीतून सुटू शकाल तोच तुमच्या सुटकेचा एकमेव मार्ग आहे.” असे सुरुवात लिहून लेखकाने वाचकांची उत्कंठा शिगेला पोचवली आहे. संपूर्ण पुस्तक वाचताना आपण पुस्तक वाचतोय असा एका वाचकाला भास होतोय अशी कादंबरीची मांडणी आहे. ही एक रहस्यकथा असून इथे दुर्मिळ पुस्तके चोरीला जात आहेत. अश्या दुहिरी मांडणीतून बेनाबूला वाचकाला वाचनात सक्रीय ठेवायचे आहे.
  • वाचण्याच्या पद्धतीत बदल घडवू इच्छिणारा अजून एक लेखक म्हणजे मिलोराद पावीच (सर्बियन). त्याने ‘डिक्शनरी ऑफ खार्जास’ नावाची कादंबरी शब्दकोशाच्या स्वरुपात लिहिली आहे आणि दुसरी एक कादंबरी तर शब्दकोड्याच्या स्वरुपात. इथे या कादंबरीत वाचक कोणत्याही पानावरून कोणत्याही पानावर जावू शकतो. त्याने त्याच्या प्रत्येक कादंबरीत नवे वाचनव्यूह तयार केले आहेत, ज्यामुळे वाचन प्रक्रियेचे सरळधोप रूपच पालटले.
  • रोमानिअयन लेखक दुमित्रू सेपेनिएगे याने ‘द पिजन पोस्ट’ ही कादंबरी लिहिताना स्वतःच्या आयुष्यातील तपशील लिहून कादंबरीला सुरुवात केली, पण त्याच्या लक्षात आले की हे एकट्याचे आयुष्य पुरेसे नाही महणून त्याने त्याच्या ३ बालमित्रांना विचारून त्यांच्या आयुष्यातील तपशील कादंबरीत घालायला सुरुवात केली. मात्र याचा परिणाम असा झाला की प्रत्येकजणच कादंबरीची दिशा ठरवू लागला. या वेगळ्याच प्रयत्नांमधून लेखक लेखकाचे स्वातंत्र्य, लेखन प्रक्रियेचे फसवं खाजगीपण आणि लेखक परत स्वतःलाच जन्माला घालत असतो ही सत्यता .. या बाबीकडे लक्ष वेधून घेवू इच्छितो.
  • रशिअन लेखक सिगीझमुंड क्रशीशानोवस्की च्या मते मनातले विचार कागदावर उतरवण हे त्या विचारांवर अन्याय करणारे असते.त्याच्या लेटर्स किलर्स क्लब या  कादंबरीत  तो असे दाखवतो की ५-6 लेखक हातात कागद न घेता आपापली कलाकृती सदर करतो. मग त्यावर तिथेच चर्चा होते, सुधारित रचना पुन्हा ऐकवली जाते. लेखकाच्या मते विचार जेव्हा शब्दात गुंफले जातात तेव्हा त्यांचे सृजनत्व हरवते.

ह्या पुस्तकात या सगळ्याच्याच जोडीला प्रत्येक लेखकाची लेखनशैली,त्यांची वैशिष्ट्य त्यांनी केलेले प्रयोग याची माहिती आहे. तसेच  त्या त्या वेळची सामाजिक परिस्थिती आणि त्यामुळे तयार  झालेली लेखकाची मानसिकता, लेखकांच्या या नैविण्य्पूर्ण प्रयोगांमुळे त्या त्या देशातले पूर्वापार आलेले साहित्य प्रवाह कसे बदलत गेले आणि त्यांच्या साहित्यजीवनावर, वाचकांवर परिणाम काय झाला.... ह्या सर्व तपशिलांनी पुस्तक सजले आहे. इतकी सगळी माहिती असूनही हे पुस्तक म्हणजे फक्त एक माहितीकोश झालेला नाही याचे कारण  निखिलेश चित्रे यांचे सोप्या रोजच्या मराठी भाषेतील सहज पद्धतीचे निवेदन. त्यांचा व्यासंग त्यांनी आपल्यापर्यंत अतिशय रंजकतेने पोचवला याकरता त्यांना खूप खूप धन्यवाद.

पुस्तक तर मला आवडलेच पण जोडीला आपल्याला अजून कितीतरी वाचायचं आहे याची चुटपूट पण लागून राहिली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हो, हे पुस्तक वाचू वाचू म्हणून वाचायचे राहिलेच आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

लेखक एकेकाळी माबोकर होता Happy

खरोखरच काय आडवाटेवरची पुस्तके आहेत. पुस्तक ओळख (पुस्तकातली आणि पुस्तकाची) सुरेखच. नक्की वाचायला हवे असे दिसते.

वरदा, कोण माबोकर होता हा लेखक?

हा लेख वाचून माझ्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया:
काय वैविध्यपूर्ण पध्दतीने लोक लिहितात, ते तितक्याच अभ्यासपूर्ण पध्दतीने तोलामोलाच्या कुवतीचे लोक वाचतात, त्यावर पुस्तक लिहितात आणि ते वाचून त्या पुस्तकाचा परिचयही अतिशय सुंदर शैलीत पुन्हा चांगले वाचक करून देतात! कमाल आहे.

'आडवाटेवरची पुस्तके' हे पुस्तक तर जागतिक (आंतरराष्ट्रीय) वाङ्मयातीलही जगावेगळ्या पुस्तकांचा परिचय करून देणारे आहे.

हा लेख वाचून माझ्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया:
काय वैविध्यपूर्ण पध्दतीने लोक लिहितात, ते तितक्याच अभ्यासपूर्ण पध्दतीने तोलामोलाच्या कुवतीचे लोक वाचतात, त्यावर पुस्तक लिहितात आणि ते वाचून त्या पुस्तकाचा परिचयही अतिशय सुंदर शैलीत पुन्हा चांगले वाचक करून देतात! कमाल आहे.>>>
अगदी खर आहे.

हे पुस्तक, पुस्तकातली पुस्तकं आणि हा लेख , सगळच जबरी अद्भुत आहे. अश्विनी खुप धन्यवाद लेख लिहिल्याबद्दल.

बापरे! काय काय प्रकारची पुस्तकं असतात जगात!
वाचायला हवंच हे पुस्तक.
चित्रकलेत जशी अमूर्त शैली असते तशी ही लेखनातली अमूर्त शैली म्हणावी का?

असेच एक मराठीतही पुस्तक वाचले.
ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम....! कविता महाजन.
वेगळा प्रयोग आहे.
पुस्तकांतील पुस्तक - एंबेडेड - त्यात आत्मनिवेदनाने पहिली काही पाने सुरु होतात..मग नायिका स्वत:च पुस्तक लिहीते. ते पूर्ण पुस्तक आत आहे...व पुन्हा पहिले पुस्तक चालू होते....

आपली विचार करण्याची कूवत ज्या मर्यादेला संपते तिथे या सार्यांची कल्पनाशक्ती सुरू होते !
खरच , आपण अजून वाङ्मयीन जगाची ही रूपे पाहिलेलीच नाहीत असा न्यूनगंड आला ... हे वाचून !

ह्या परिचयातून साहित्यातल्या वेगळ्याच रत्नाच्या खाणीची कवाडं उघडलीत , वाचकांसाठी.. धन्यवाद !

छान परिचय.

टवणेसर, तुमच्या वडिलांची प्रतिक्रिया आवडली.