सांजवणी - मोरपिसारा

Submitted by हरिहर. on 14 February, 2019 - 06:45

जैसा दीपु ठेविला परिवरीं। कवणातें नियमी ना निवारी।
ही माझी देवाची व्याख्या असल्याने मी शक्यतो कुणा महाराज किंवा माताजींच्या आहारी जात नाही. पण पुण्यामध्ये एका महाराजांचा काही एकर मध्ये पसरलेला एक आश्रम आहे, तेथे मात्र माझे नियमीत जाणे असते. एकतर अतिशय विचारपुर्वक केलेले लँडस्केपींग, उत्तम जोपासलेली बाग, तळी आणि त्यातील बदके, ध्यानासाठी असलेल्या अत्यंत शांत कुटीवजा खोल्या आणि सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे दोन मजली, अतिशय प्रशस्त, आधुनिक सोयी असलेलं, भरपुर ग्रंथसंपदा असलेलं ग्रंथालय. या आश्रमाच्या बांधकामापासुनच मी व्यवसायाच्या निमित्ताने जोडला गेलो होतो त्यामुळे आश्रम पुर्ण होईपर्यंत अनेक व्यक्तींबरोबर जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. त्यामुळे आश्रमात मला कुठेही मुक्तप्रवेश असे. असाच एक दिवस एका भक्ताने दान केलेली टेंपोभर पुस्तके ग्रंथालयात आली होती ती व्यवस्थीत लावत बसलो होतो. इतका मोठा खजीना समोर पाहुन मी अगदी हरखुन गेलो होतो. इतक्यात गेटसमोरच पांढरी शुभ्र अँबेसिडर उभी राहीली. कुणी तरी मोठी किंवा राजकारणी व्यक्ती आली असेल असे समजुन मी दुर्लक्ष केले. हे नेहमीचेच होते. पण गाडीतुन उतरलेल्या व्यक्तीकडे पाहील्यावर जाणवले की हे काहीतरी वेगळे प्रकरण असावे. अंगावर पोलीसी ड्रेस, वागण्यात शिस्त आणि रुबाब, चालण्यातला आत्मविश्वास आणि सहजता, चंदेरी झाक असलेले केस, नाजुक सोनेरी फ्रेम असलेला चष्मा आणि या सगळ्याला विसंगत असा चेहऱ्यावरचा गोडवा आणि स्मितहास्य. पोलीस अधिकारी म्हणजे रुबाबदार मिशा आणि करडा चेहरा हवाच पण येथे या दोन्ही गोष्टी नव्हत्या. या माणसात काहीतरी आकर्षक होतं हे नक्की पण ते काय होतं हे मात्र माझ्या लक्षात येईना. तशी मला पोलिसांविषयी फारशी आपुलकी नाही पण या व्यक्तीला पाहुन मला छान वाटले.
मी ग्रंथपालाला हाक मारुन विचारले “मासाळ कोण आहेत रे हे? आणि या अगोदर कधी पाहिले नाही यांना आश्रमात?”
मासाळ हसतच म्हणाला “काय साहेब, तुम्ही यांना ओळखत नाही? भारी आहेत साहेब. चला मी ओळख करुन देतो तुमची.”
एका ग्रंथपालाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविषयी इतके मोकळेपणाने बोलताना पाहुन मला आश्चर्य वाटले पण कुठे एवढ्या मोठ्या माणसाचा वेळ वाया घालवा म्हणुन मी टाळले. पण मासाळ जरा जास्तच उत्साही प्राणी असल्याने तो मला ओढत आश्रमाच्या ऑफीसमध्ये घेऊन गेला. येव्हाना साहेब आत येऊन तिथल्याच एका खुर्चीवर विराजमान झाले होते. चेहऱ्यावर जरी मंद स्मित असले तरी भाषा मात्र अस्सल पोलीसी आणि अखंड सुरु होती.
मासाळ नमस्कार करुन म्हणाला “काय साहेब, आज बऱ्याच दिवसांनी चक्कर मारली?”
साहेबांनी टेबलावरचा काचेचा पेपरवेट भिंगरीसारखा जोरात फिरवला आणि म्हणाले “का रे गाढवा, मी आल्याने तुला काही त्रास झाला का?” आणि साहेब एकदम मिश्किल हसले.
“तसं नाही साहेब. मागच्या आठवड्यातली तुमची चक्कर चुकली. मला वाटले नाशिकला गेले की काय? म्हणुन विचारले.”
यावेळी साहेबांनी हाताची पाची बोटे एकत्र करुन टेबलवर चोच मारल्यासारखे केले आणि म्हणाले “**व्या मग तुला विचारुन माझं वेळापत्रक ठरऊ का मी आता. पळ किचनमधुन कॉफी आण सगळ्यांना. आणि त्या मावशीला त्रास नको देऊस, तु स्वतः बनव. काय?”
“हो साहेब. आत्ता आणतो” म्हणत मासाळ वळला. त्याला थांबवत माझ्याकडे पहात साहेब म्हणाले “अरे बावळटासारखा निघाला कुठे? हे कोण आहेत?”
“साहेब, अगोदर सगळ्यांना कॉफी आणतो मग ओळख करुन देतो. तुम्हालाच भेटायला आणलय त्यांना.” म्हणत मासाळ मागच्या मागे पळाला.
समोरच्या खुर्चीकडे हात करुन साहेब म्हणाले “हं बसा तुम्ही. मासाळ येईल इतक्यात कॉफी घेऊन. मग बोलूयात.”
मग माझ्याकडे पुर्ण दुर्लक्ष करत साहेब ऑफीसमध्ये बसलेल्या इतर काम करणाऱ्यांकडे वळाले. त्यांच्या पोलीसी स्टाईलमध्ये सगळ्याची खिल्ली उडवत, स्वतःच्याच विनोदाला हसत साहेब गप्पा मारत बसले. जसे मासाळला त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटले नव्हते तसे ते इतरांनाही वाटत नव्हते. सगळे साहेबांच्या विनोदाला, शिव्यांना हसत बोलत होते, समोरचे काम करत होते.
मी ऑफीसमध्ये आल्यापासुन त्यांचे निरिक्षण करत होतो. आपल्या मनात यांना पहाताक्षणी जी प्रतिमा तयार झाली ती चुकीची तर नाही ना असं वाटायला लागले होते. पण त्यांच्या त्या बोलण्याला एक प्रेमळ झाकही होती आणि कुणाला त्यांच्या बोलण्याचा रागही येत नव्हता. उगाच कुणाविषयी काही माहित नसताना मत बनवणे मला योग्य वाटले नाही. मी मासाळ येण्याची वाट पहात खुर्चीवर शांत बसुन राहीलो.

ही दादांची आणि माझी पहिली भेट. तोवर मासाळ कॉफी घेऊन आला. ट्रे साहेबांसमोर धरल्यावर त्यांनी एक मग उचलुन अगोदर माझ्या समोर धरला. मी घेतल्यावर मग स्वतःसाठी एक मग घेऊन बाकीच्यांना द्यायला सांगीतला. बहुतेक हे शिष्टाचार नसुन तो त्यांचा स्वभावच असावा. आम्ही आमची कॉफी काहीही न बोलता संपवली. मासाळ शेजारीच उभा होता. त्याने साहेबांची ओळख करुन देत सांगीतले “हे ए.सी.पी. अभिमन्यु सुर्यवंशी. आपल्या आश्रमाच्या कामातही लक्ष घालतात.” मग माझ्याकडे हात करत म्हणाला “हे हरिहरसाहेब. हे…”
त्याला मध्येच थांबवत साहेबच म्हणाले “काय करता आपण हरिहर.”
समोर ‘असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस’ या पदावर काम करणारी व्यक्ती बसली आहे याचे मला नाही म्हटले तरी थोडं दडपण आले होते. आजवर मी फक्त हिंदी चित्रपटातच एसीपी पाहीले होते. मी म्हणालो “आश्रमातले लँडस्केपींगचे थोडे काम केले होते. ते संपले, पण येथल्या ग्रंथालयाच्या नादाने व नर्सरीच्या ओढीने अधुन मधुन येत असतो.”
“अरे वा वा! छान!” म्हणत साहेब मोठ्याने हसले. आता यात ‘अरे वा’ म्हणन्यासारखे किंवा हसण्यासारखे काय होते हे मला समजेना. पण त्यांच्यापुढे काय बोलणार? मीही कसंनुसं हसलो.
“चला, जरा आश्रमात एक चक्कर मारुन येऊयात.” म्हणत साहेब ऊठले. मीही निमुटपणे ऊठुन त्यांच्यासोबत निघालो. एकतर मला अगदी साध्या हवालदाराची सुध्दा भिती वाटते अकारण तेथे आता या एसीपींबरोबर आश्रम फिरायचा म्हणजे एक त्रासच होता. कुठुन या मासाळच्या नादी लागुन ऑफीसमध्ये आलो असं झालं मला. पण आता दुसरा काही मार्गही नव्हता. मग मला अगोदरच तोंडपाठ असलेला आश्रम साहेबांनी बारीक सारीक माहिती देत पुन्हा फिरुन दाखवला. अगदी गोशाळेपासुन ते शंकराच्या भव्य मुर्तीपर्यंत. तासभर आश्रम फिरुन झाल्यावर आम्ही ग्रंथालयात येऊन बसलो. कुणी तरी थंड मसाला ताकाचे ग्लास समोर आणुन ठेवले. तासभर साहेबच बोलत होते. आता निवांत बसल्यावर मला म्हणाले “हं तर हरिहर, काय करता आपण? आणि हे ग्रंथालयाचे काय? तुम्ही बरीचशी ग्रंथालयाची जबाबदारी स्वतःहुन उचलली आहे असं कळालं. वाचनाची आवड दिसतेय. काही लिहिता की फक्त वाचता?”
तासाभरात मला एक जाणवलं ते हे की हा माणुस आतुन बाहेरुन अगदी निर्मळ आहे. चुकुन पोलीसी व्यवसायात आले असावेत. निवृत्ती अगदीच जवळ आली होती. इतके वर्ष खात्यात राहील्याने भाषा जरी कठोर पोताची झाली असली तरी हा माणुस मनातलं हळवेपण जपुन होता. माझा संकोच संपला होता. मी काही म्हणनार तोच काऊंटरवर बसलेला मासाळ मधेच म्हणाला “तर काय! लिहितात की अप्पासाहेब. पेपरमध्येही बरेचदा येतं छापुन त्यांनी लिहिलेले.”
या मासाळला कधी कुठे काय बोलावे हे अजिबात समजत नाही.
मी हसुन म्हणालो “त्याचं काय ऐकता साहेब. इतर थोर माणसांनी इतकं काही लिहुन ठेवलय की ते वाचायलाच अनेक जन्म कमी पडतील. त्यात मी काय अजुन भर टाकणार? आणि कशाला टाकायची?”
“तेही खरच आहे म्हणा. पण माणसाने लिहावे काही ना काही. दुनियेसाठी नाही तरी स्वतःसाठी तरी नक्कीच लिहावे. तुमच्या लिखाणाची कात्रणे असतील तर दाखवा मला पुढच्या भेटीत. काय?” म्हणत साहेब उठले. त्या दिवसाची आमची ती भेट तिथेच संपली पण ती भेट एका नव्या मैत्रीची नांदी होती हे तेंव्हा जाणवले नाही.

हळू हळू आमच्या भेटी वाढू लागल्या. ओळख होऊ लागली. तारा जुळू लागल्या. मी नकळत ‘साहेबां’वरुन ‘दादां’वर आलो तर दादाही हरिहरवरुन अप्पावर आले. पुर्वी आश्रमात भेटायचो ते आता माझ्या किंवा त्यांच्या घरी भेटायला लागलो. हा स्नेह इतका वाढला की दादा माझ्या पत्नीला मानसकन्या मानायला लागले आणि मी त्यांच्या पत्नीला मावशी म्हणू लागलो. आमच्या मैत्रीतील वयाची, अधिकारांची, पदाची दरी केंव्हाच दुर झाली. कधी दादा रहात त्या भागात कामासाठी जाणे झाले तर मी घरी “दुपारी तिकडेच जेवण करेन ग” असं सांगुन बाहेर पडू लागलो, आणि कधीही पुर्वसुचनेशिवाय त्यांच्या घरी जाऊन “मावशी भुक लागलीय खुप” असं हक्काने म्हणू लागलो. वर्षभरातच दादा निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर दादांनी खुप व्याप वाढवले. शिवाजी मराठाच्या कमीटीवर तर ते होतेच, पण आता त्यांना विश्वस्त म्हणुन नेमून महाराजांनी आश्रमाच्या कामातही अधिकृतरीत्या गुंतवून टाकले. डेक्कन एज्युकेशन असोशिएशनच्या सदस्य मंडळातही ते होतेच शिवाय अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदच्या नियामक मंडळातही ते सक्रिय झाले. त्यात त्यांचा एक मुलगा पुण्यात वकिली करत होता तर दुसऱ्या मुलाचे नाशिकला क्लिनिक होते. त्यामुळे दादांच्या आणि मावशीच्या पुणे-नाशिक वाऱ्याही वाढल्या. त्यात भर म्हणुन की काय, नोकरीमुळे जे काही वाचायचे राहीले होते ते सगळे दादांनी एक एक करत वाचायला घेतले. त्यांच्या घरातल्या कपाटात दररोज काही पुस्तकांची नव्याने भर पडत चालली. माझाही व्यवसाय सुरु होता. दिवस मजेत चालले होते.
एक दिवस दुपारी अचानक दादांचा फोन आला “आहेस का रे आज घरी? येईन म्हणतोय संध्याकाळी.”
“दादा तुमच्यासाठी कधीही वेळ आहे. या तुम्ही, मी थांबतो घरी.” म्हणत मी फोन ठेवला पण डोक्यातला भुंगा काही जाईना. आज अगदी फोन करुन आवर्जुन येत आहेत म्हणजे काहीतरी काम असणार. काय असेल? कुठे जायचे असेल का? का काही नविन प्रकल्प वगैरे सुरु करतायेत सामाजिक? काही सुचेना. विचार केला, संध्याकाळी आले की समजेलच.

संध्याकाळी टेरेसमध्ये डोंगराआड जाणारा सुर्य पहात कॉफी पित बसलो होतो. बेल कधी वाजली आणि दादा कधी आत आले, काही समजलं नाही. दादांनी समोरच्या टिपॉयवर कसलं तरी बाड आपटलं आणि मी दचकलो. शेजारच्या खुर्चीवर बसत त्यांनी ते बाड माझ्याकडे सरकवले. “आता हे काय आहे?” विचारलं तर नेहमीच्या स्टाईलने म्हणाले “मुर्खा पाहिल्या शिवाय कसं कळणार काय आहे ते. वाचुन पहा.”
मी निमुटपणे समोरचे जाडजुड बाड उचलले. जरासे चाळले. कसले तरी हस्तलिखित होते. पहिली ओळ वाचली
“तुम्हाला माझी कहानी सांगायला मी काही कुणी राजा नाही की…..”
हे मी कुठे तरी वाचले होते. पहिला पॅरा वाचुन काढला आणि लक्षात आले की ही एका प्रसिध्द कादंबरीची सुरवात होती. थोडे फार शब्द इकडे तिकडे झाले होते. दादा त्या कादंबरीच्या लेखकाचे फॅन वगैरे काही नव्हते. मग मला समजेना की स्वतःच्या हाताने एवढे कष्ट करुन दादांनी हे का लिहिले असावे? बरं मुळ कादंबरी मराठीतच असल्याने अनुवाद करावा असही काही नव्हते किंवा ती कादंबरी काही तत्वज्ञानावर लिहिलेली नव्हती की मग त्यावर दादांनी टिकात्मक काही लिहावे. बायकोने कॉफी आणि केक आणुन दिला.
कॉफीचा कप हातात घेत दादा म्हणाले “माझी कॉफी होईपर्यंत तुझी दोन तिन पाने वाचुन होतील. निट वाच. मग बोलू.”
दहा मिनिटात दादांनी कॉफी आणि मी त्या बाडाची सुरवातीची काही पाने वाचुन संपवली. त्यांनी कप आणि मी हातातले हस्तलिखित खाली ठेवले आणि एकमेकांडे पाहीले. माझ्या चेहऱ्यावर ‘काढाल तो अर्थ निघेल’ असे भाव होते. म्हटलं तर हताश, म्हटलं त्रासीक आणि म्हटलं तर स्थितप्रज्ञ. हे सगळे भाव नजरेत ठेऊन मी त्यांच्याकडे पाहिले.
अर्थात पोलीसी खाक्या नसानसात असल्याने त्यांना काही फारसा फरक पडला नाही. खाली ठेवलेले स्टेपल केलेले बाड उचलून पुन्हा माझ्या हातात देत दादा म्हणाले “पाहु नकोस असा. हे वाचुन ठेव दोन दिवसात. मी येतो परवा तेंव्हा सविस्तर चर्चा करु यावर. तुझी मावशीपण येणारे सोबत. ‘रमा भेटली नाही बरेच दिवस’ असं किती दिवस म्हणतेय.”
“अहो पण शनिवारीतर येऊन गेलो आम्ही दोघेही.”
“बरं मग मी एकटा येतो. तू वाचुन ठेव बारकाईने. नुसती मान हलवू नकोस. काय?”
मी पुन्हा मान हलवली. आता वाघोबा म्हटलं तरी खाणारच होता त्यामुळे ते पेपर्स मी व्यवस्थित आत नेऊन ठेवले आणि मग आमच्या कुठल्या कुठल्या गप्पा सुरु झाल्या. शिवाजीनगरला रहात असताना सुरेश भट कसे अचानक आले. मग रात्रभर कशा गझला रंगल्या. शिवाजी सावंतांनी दादांच्या ‘सुर्यवंशी’ आडनावावर कशी टिपणी केली होती. अशा कसलाही खास विषय नसलेल्या गप्पा सुरु झाल्या. मग नेहमी प्रमाणे त्यांच्या आवडत्या प्रसंगाची आठवण निघाली. वहिदा रेहमान कशी एअरपोर्टला भेटली आणि दादा कसे तिला “तुम्ही फार उशीरा भेटलात हो” हे त्यांच्या ‘मराठी हिंदीत’ कसे बोलले हे पु्न्हा एकदा डिट्टेलवार ऐकायला लागले मला. ‘इंदिरा गांधीचे बॉडीगार्ड असताना काय रोमांच उभे रहायचे अंगावर’ हे सांगताना टेरेसमध्ये बसुन मावळत्या सुर्याकडे पाहुन दादा पुन्हा रोमांचित झाले. माझ्या लक्षात आलं, इतके दिवस मला न सांगता दादा रोज त्यांचे आत्मचरित्र लिहीत होते. या दोन दिवसात ते त्यांनी पुर्ण केलं होतं. आत्मचरित्र लिहिताना पुन्हा एकदा सगळे आयुष्य ते पुन्हा जगले होते. आता टेरेसमध्ये बसुन ते भाऊक झाले होते तो त्याचाच परिणाम होता. अंधार पडला. पार्किंगमधून दादांच्या ड्रायव्हरचा दोनदा फोन आला. तो ही बिचार कारमध्ये बसुन बसुन कंटाळला असणार. मग मात्र दादा उठले. “वाचुन ठेव बारकाईने. तुला बरेच काम करायचं आहे त्यावर.” हे पुन्हा पुन्हा बजावत साहेब गेले.

रात्री जेवणे झाल्यावर झोपताना मला काहीतरी वाचायला लागतेच. मग सध्या सुरु असलेले पुस्तक बाजुला ठेवले आणि दादांचे हस्तलिखित वाचायला घेतले. पानामागुन पाने उलटत होतो, वाचत होतो. बायको कधीच लाईट बंद करुन झोपली होती. बराच वेळ मी दादांचे आयुष्य उत्सुकतेने वाचत होतो. मध्येच बायको उठुन आत गेली. अर्ध्या तासाने बेडरुममध्ये येत तिने साईडटेबलवर चहाचा कप ठेवला.
“अरे, आता कशाला चहा केलास मध्येच. नको होता मला. तू झोप.” म्हणत मी पुढचे पान उलटले.
माझ्या हातातील पेपर्स घेत बायको म्हणाली “परत काय झोपू! बाहेर बघ उजाडलय. माझी अंघोळही उरकली. उठ अगोदर.”
बाहेर पाहिले तर खरच उजाडले होते. म्हणजे मी रात्रभर वाचतच होतो तर. चहाच्या कपाावर झाकण ठेऊन मी बाथरुमकडे पळालो. तासाभरात सगळे आवरुन पुन्हा एकदा ते बाड हातात घेतले. शेवटची काही पाने राहीली होती. तीही तासाभरात वाचून संपवली. दादांच्या सगळ्या आयुष्याचा चित्रपट रात्रभरात डोळ्यांसमोरुन सरकुन गेला होता.
पण आता प्रश्न हा होता की उद्या दादा आले की ते प्रथम ‘प्रतिक्रिया’ विचारणार. काय सांगायचे? कारण मला त्या लिखाणात अनेक गोष्टी पटल्या नव्हत्या. यावर बायकोचा सल्ला घेण्यात काहीच अर्थ नव्हता. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने पुस्तकाला हातही लावला नव्हता. रोजचा पेपर मी पुरवणीपासुन वाचायला सुरवात करे तर बायको पहिले पान वाचुन पेपर बाजुला सारते. मला काही समजत नव्हते. बेडवर बसुन मी समोरच्या हस्तलिखिताकडे पहात होतो. बायकोने बेडमध्येच पोळी भाजीची डिश आणुन दिली. माझ्या चेहऱ्याकडे पाहुनच तिला समजले की नवऱ्याचे पॅराशुट मध्येच कुठेतरी झाडात वगैरे अडकलेले दिसतेय आणि तो अधांतरी लटकतोय. तिने फक्त प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी माझी अडचण तिला सांगितली.
तिने क्षणभरही वेळ न लावता सांगितले “हे बघ, तुला वाचक म्हणुन जे जे वाटले ते सगळं जसेच्या तसे दादांना सांग. संकोचामुळे उगाच खोटे कौतुक करु नको. दादांचे हे पहिलेच लिखाण आहे. त्याला जर अनिष्ठ वळण लागले तर मग पुढच्या लिखाणातही ते तसेच राहील. तुमची मैत्री काही एवढ्या तेवढ्या कारणावरुन तुटणार नाही पण तुझ्या खोट्या बोलण्याने दादांमधल्या लेखकाचे मात्र नुकसान होईल हे लक्षात ठेव.”

माझ्या समोरची द्विधा मनःस्थिती संपली. रात्रभर मी जे वाचले होते त्यात अनेक दोष होते. एक तर दादांनी गेल्या काही दिवसात जे भरमसाठ वाचन केले होते, त्यातल्या त्यांना आवडलेल्या लेखकांचा काही ठिकाणी बराच प्रभाव दिसत होता. दुसरं म्हणजे सगळं आयुष्य स्टेशन डायरी, पंचनामे, कोर्टाचे पेपर वाचण्यात आणि लिहिण्यात गेल्याने सगळे आत्मचरित्र म्हणजे दादांच्या आयुष्याचा पंचनामा झाला होता. हे सगळं दादांनी फार प्रयत्नपुर्वक लिहिलं होतं हे खरं असलं तरी आत्मचरित्र लिहिताना कधी कधी लेखनाशी नकळत समरस झाल्याने काही काही पाने अगदी अप्रतिम जमली होती. त्या पानांमधुन दादांमधला खरा लेखक कसा आहे हे स्पष्ट जाणवत होते. खुप विचार केल्यावर मला एक जाणवले की लेखक म्हणुन दादांची लेखणी अप्रतिम काम करत होती. पण नोकरीमुळे आणि एका दमात केलेल्या अती वाचनामुळे त्यांच्यातला लेखक बाहेर यायलाच तयार नव्हता. उत्तम लेखन हे फक्त प्रमाण मराठी भाषेतच होऊ शकते याचा त्यांच्या मनावर चांगलाच पगडा बसला होता. त्यांनी मनापासुन लिहिलेली जी काही पाने होती ती इतकी सुरेख आणि सहज झाली होती कुणीही म्हणु शकले नसते की हे लेखन एका नवोदित लेखकाचे आहे. मला आता फक्त एकच काम करायचे होते. त्यांच्या डोक्यातली स्टेशन डायरी आणि त्यांचे आवडते लेखक बाहेर काढायचे होते. मग उरणार होता निखळ सच्चा लेखन करणारा लेखक. पण हेच काम महाकर्मकठीण होते.

दुसऱ्या दिवशी दादा आले. सोबत मावशीही होत्या. चहा वगैरे झाल्यावर दादांनी उत्सुकतेने विचारले “वाचलेस काय रे सगळे? कसं वाटलं?”
या प्रश्नाला तोंड देण्यासाठी मी दिवसभर मनाची तयारी केली होती. ‘स्पष्ट बोलायचे आहे’ हे इतक्या वेळा मनातल्या मनात घोटले होते की दादांनी विचारल्याबरोबर माझ्या तोंडातुन गेले “नाही आवडले फारसे.”
माझ्या इतक्या स्पष्ट बोलण्याने मावशी क्षणभर आवाक झाल्या. मी दादांचा अंदाज घ्यावा म्हणुन त्यांच्याकडे पाहिले तर ते एकदम खुष दिसले. मी बावरलो. मला वाटले त्यांनी ऐकले नाही की काय व्यवस्थित? मावशी मध्येच सावरासावर करणार होत्या पण दादा अचानक उठले आणि माझ्या पाठीवर भक्कम थाप मारत म्हणाले “तुला म्हटलो नव्हतो का ग, अगदी तसेच झाले.”
मग माझ्याकडे वळुन म्हणाले “अप्पा, रागाऊ नकोस. हे हस्तलिखित तुला दाखवायच्या अगोदर माझ्या दोन प्राध्यपक मित्रांना दाखवले होते. मग तुला दिले वाचायला. त्या दोघांच्याही प्रतिक्रिया ‘आहे असे छापायला द्या, उत्तम जमले आहे’ अशा होत्या. अर्थात दोष त्यांचा नाही. त्यांनी माझी मैत्री पहायच्या अगोदर माझे पद पाहिले. मला माहित होते अप्पा की तू जे आहे ते स्पष्ट सांगणार म्हणुन.”
माझा जीव भांड्यात पडला. हे खरं होतं की दादांनी कुणालाही हस्तलिखित वाचायला देऊन प्रतिक्रिया मागितली की तो माणुस अगदी मनसोक्त स्तुती करी. दादांच्या समोर “अमुक अमुक चांगले नाही जमले.” असं सांगायची हिंमतच कुणी करत नव्हते. परिणामी दादांना खरी प्रतिक्रियाच मिळत नव्हती. मावशीच्या चेहऱ्यावरचा तणावही क्षणात दुर झाला.
सोफ्यावर आरामात बसत दादा म्हणाले “हं! तर अप्पा, काय काय खटकले तुला ते सांग आता आणि उद्यापासुन आपण रोज दोन तास यावर काम करत बसत जाऊ. योग्य तेथे बदल करत जाऊ.”

त्यानंतरचा दिड महिना आम्हा दोघांनाही दुसरे काही सुचत नव्हते. सुरवातीला अगदी काटेकोरपणे सुरु झालेले काम नंतर नंतर अगदी वादळी होत गेले. कधी कधी आत्मचरित्र सोडुन आमच्या इतर गप्पा रंगायच्या तर कधी कधी पानेच्या पाने खोडण्यावरुन वाद व्हायचे. भांडणेही खुपदा झाली. एकदा अशाच भांडणात दादा रागा रागात माझ्या घरातुन उठुन निघुन गेले तर दुसऱ्या भांडणात मी त्यांच्या घरातुन हातातली नाष्ट्याची भरलेली डिश तशीच ठेऊन निघुन आलो. आमच्या दोघांच्या या स्वभावामुळे तिकडे मावशी तर इकडे माझी बायको यांची मात्र कमालीची तारांबळ उडायला लागली. एकदा तर बायको म्हणाली की “आपल्या घरात इतकी पुस्तके आहेत, त्या सगळ्या लेखकांच्या बायकांनी असच सगळं भोगलं असेल कारे? आणि काही काही लेखकांची तर डझन डझन पुस्तके आहेत. त्यांच्या बायकांचे काय हाल झाले असतील?”
मला बायकोची किव आली. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरुच राहीले.

मुळात दादा त्यांच्यातल्या लेखकाला वावच द्यायला तयार नव्हते. प्रमाण मराठीतच लिहायचा त्यांचा हट्ट असायचा. मी वेळोवेळी सांगुन पाहीले की तुम्ही आईबरोबर ज्या भाषेत बोलत होता ती अहिराणी सदृष्य भाषा खुप सुंदर वाटते. आहे तशी वापरा संवादांसाठी. एक नैसर्गीकपणा येईल लेखनात. उगाच अलंकारीक काही लिहु नका. पण त्यांचा पोलीसी हटवादीपणा काही त्यांना तसे करु देईना. प्रत्येक गोष्ट अगोदर त्यांना पटऊन द्यायची आणि ती जेंव्हा त्यांना पटेल तेंव्हाच ते लेखनात बदल करायचे. यात माझी आणि त्यांचीही खुप शक्ती वाया जाऊ लागली. भांडणेही वाढायला लागली. चढत्या आलेखाने वाद वाढले. मला त्यांच्या काही चुका अजिबात सहन होईना आणि त्यांनाही आयुष्यभर अंगवळणी पडलेली सवय एका आठवड्यात घालवता येईना. आम्ही अक्षरशः एक एक पान पुढे सरकत होतो. आत्मचरित्रात बालपण मागे पडुन आता दादा आता कॉलेजला गेले होते. आत्मचरित्रातला गुलाबी पानांचा भाग सुरु झाला होता. मला वाटले दादा आता खुलतील. लेखन अगदी खुमासदार होईल. पण दादांमधला एसीपी नेहमीच त्यांच्यातल्या लेखकाच्या छातीवर बसु लागला, तो काही खाली उतरेना. उदाहरणार्थ, त्यांच्या आत्मचरित्रातला एक अगदी रोमँटीक प्रसंग. “एका सकाळी दादा कॉलेजला गेले असता त्यांना अचानक त्यांच्या स्वप्नातली परी सायकलवरुन येताना दिसली आणि ते तिच्या प्रेमात पडले.” माझ्यासारख्या माणसाने या प्रसंगावर आत्मचरित्रातली दहा पाने खर्च केली असती. पण दादांनी लिहिले “मी दहा फर्लांगावर असलेल्या वळणावरुन डावीकडे वळालो आणि पहातो तर काय... सदरहू तरुणी माझ्या पासुन चार यार्डावर उभी.” हे वाचुन मी डोक्याला हात लावला. दादांनी या गुलाबी प्रसंगाचा अगदी पंचनामा करुन ‘सदरहु तरुणीला’ आरोपी केले होते. अजुन एक असाच प्रसंग. पोलीस खात्यात आयुष्य गेल्याने दादांना तसे ड्रिंक्स वर्ज्य नव्हते. कधीतरी वर्षातुन एकदा दोनदा प्रसंगानुरुप त्यांना एखादे ड्रिंक घ्यावे लागे. पण आयुष्यातली पहीली दारुची चव त्यांनी तरुणपणात घेतली तो मजेशीर प्रसंग सांगुन झाल्यावर दादांनी लिहिले “तो माझ्या आयुष्यातला पहिला प्याला.” त्यांचे ते एक वाक्य काढण्यासाठी मला जीवाचे रान करावे लागले. “अहो दादा, याचा अर्थ असा होतो की त्या प्याल्यापासुन तुम्ही प्यायला सुरवात केली. पुढे 'सुधाकर वगैरे झाला की काय तुमचा?' असा संशय येईल वाचकांना. त्यात तुम्ही पोलीस अधिकारी होतात. म्हणजे विचारायलाच नको.” तेंव्हा कुठे दादांनी ते वाक्य काढले. मला यावर एक उपाय सुचला. मी दादांच्या आयुष्यातले काही महत्वाचे प्रसंग घेऊन ते माझ्या शैलीत लिहुन त्यांना दाखवले. उद्देश होता की अगदी मित्राला एखादी गम्मत सांगावी किंवा आईला एखादा प्रसंग सांगावा तसे लेखनही सहज व्हावे. दुसऱ्या दिवशी दादा आले. मी त्याच्या हातातले बाड घेऊन त्यांनी नक्की काय काय बदल केले आहेत हे उत्सुकतेने पाहीले. पण दादांनी मी लिहुन दिलेले प्रसंग तसेच्या तसे कॉपी करुन तेथे टाकले होते. मी खुप समजावले की दादा मी तुम्हाला ते उदाहरण म्हणुन लिहुन दिले होते. असच करायचे असेल तर तुम्ही आत्मचरित्र न लिहिता कुणाकडुन तरी तुमचे चरित्र लिहुन घ्या. मग लोकांना काय नावे ठेवायची असतील ती ठेऊ द्या. माझी इतकी चिडचिड व्हायचे कारण म्हणजे मला दादांच्या लेखनशैलीतली ताकद माहित होती. पण दादांनी स्वतःच तिला दाबुन ठेवली होती. उत्तम लिखाणाच्या त्यांच्या कल्पना काहीतरी वेगळ्याच होत्या. मध्ये दोन दिवस गेले. माझा आता दादांच्या आत्मचरित्रातला रस कमी व्हायला लागला होता. लहानपण, कॉलेजलाईफ, ट्रेनिंग, पहिली पोस्टींग या पायऱ्याच चढायला इतका वेळ लागत होता. पुढचा भाग तर त्याहुन कठीण होता. निरनिराळ्या केसेस, राजकारण्यांची प्रकरणे, खात्यातले राजकारण, पोलीसांच्या अडचणी वगैरे बाबींवर लिहायचे म्हणजे तारेवरची कसरत होती. बरीच नावे वगळावी लागणार होती. अनेक प्रसंग टाळावे लागणार होते. शेवटी मला कल्पना सुचली. नेहमीप्रमाणे दादा आले. चहा वगैरे झाल्यावर मी त्यांना उठवले आणि “तासाभरात परत येऊ” म्हणत सोबत घेतले. ड्रायव्हरला तेथेच थांबायला सांगुन मी दादांना घेऊन गाडी धनकवडीमधल्या कलानगरकडे वळवली. पंधराच मिनिटात आम्ही आम्ही कलानगरमधील आनंद यादव यांच्या घरासमोर उभे होतो. गाडी पार्क करुन आम्ही रितसर “आत येऊ का?” विचारत यादवसरांच्या घरात शिरलो. त्यांचे ज्ञानेश्वर महाराजांवरच्या कादंबरीवर लेखन चालले होते. पण त्या गडबडीतही सरांनी आमच्यासाठी वेळ काढला होता. मी दादांची ओळख करुन दिली. येण्याचे प्रयोजन सांगितले. दादांची नक्की काय अडचण आहे याचा उल्लेखही न करता मी हस्तलिखित यादवसरांकडे दिले. आनंद यादवांच्या ‘झोंबी’चे बरेचसे यश हे त्यातली भाषा आणि वातावरण निर्मितीला आहे त्यामुळे त्यांना वेगळे सांगायची काही गरज नव्हतीच. इतक्या व्यापातुनही सरांनी चक्क अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दादांचे लिखान नजरेखालुन घातले आणि काही पानांवर खुणा करुन पुन्हा माझ्या हातात दिले. आम्हा दोघांनाही उत्सुकता होती ते काय सांगतात याची. खरे तर मला जास्त होती. कारण मी कितीही सांगितले तरी दादा ऐकत नव्हते पण जर यादवसरांनीही तेच सांगितले तर मात्र बराच फरक पडणार होता. काही क्षण शांततेत गेले आणि मग यादवसर म्हणाले “तुम्ही शब्दांच्या पसाऱ्यात कशासाठी अडकता आहात? तुमची जी बोलण्याची शैली आहे तिच लेखणाचीही असुद्या. जसे बोलता तसे लिहा. काही नियम वगैरे पाळू नका. जे आहे, जसे आहे ते ते त्याच भाषेत व्यक्त करा.” आणि त्यानंतर ते दहा मिनिटे सविस्तर सांगत राहीले. दादा कान देऊन ऐकत राहीले. खरं तर मला यादवसरांबरोबर त्याच्या ज्ञानेश्वरांवर येणाऱ्या कादंबरीवर बोलायचे होते पण आज दादांचे सगळे समज एकदा क्लिअर होऊदे म्हणत मी तो मोह टाळला. घरी परतत असताना दादा जरा गप्प गप्पच होते. त्यानंतर आमच्या भेटी नेहमीप्रमाणे होत राहील्या पण त्यात आता आत्मचरित्राचा उल्लेख कमी यायला लागला. मला समजेना दादा नाराज वगैरे झालेत की काय. पण त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन मला तसे काही जाणवेना. अधे मधे ते एखादा पॅरा दाखवत, काही विचारत. यापलिकडे लेखनाचा उल्लेख सहसा नसे.

मध्ये बरेच दिवस गेले. माझ्याकडुन तरी आत्मचरित्रावर फारसे काही काम होत नव्हते. दादा गप्प बसणारे नव्हते म्हणजे त्यांचे काम जोरात सुरु असणार याचा अंदाज होता. एक दिवस दादा घरी आले. विशेष खुष दिसत होते. आल्या आल्याच त्यांनी माझ्या हातात आत्मचरित्राची एक स्टेपल केलेली प्रिंट दिली. हसत म्हणाले “आता बहुतेक यात काही फरक करणार नाही. हीच फायनल प्रत आहे असं समज. वाच आणि मला सांग.” तासभर बसुन, आत्मचरित्र सोडुन सगळ्या विषयांवर गप्पा मारुन दादा गेले. मी त्याच रात्री त्यांची ‘फायनल प्रत’ वाचायला घेतली.

काय काय नव्हते त्या पुस्तकात? जवळ जवळ चारशे पानांचे पुस्तक झाले होते. मला अगोदर दिलेल्या हस्तलिखिताचा तर मागमुसही या प्रतित दिसत नव्हता. आयुष्य पोलीस खात्यात जाऊन, महत्वाच्या केसेस हाताळुन, अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या सहवासात येऊनही पुस्तकाच्या केंद्रबिंदुत यापैकी काहीच नव्हते. पुस्तकाचा केंद्रबिंदु होता निखळ, निरागस, निर्भिड आयुष्य. दादा जगले तो प्रामाणिकपणासाठीचा प्रांजळ रगेलपणा. सदैव तणावात राहुनही कशातही विनोद शोधायची वृत्ती, नोकरी निमित्ताने राज्यभर फिरतानाही त्यातली दगदग दुर्लक्षून जाईल तेथून जमा केलेला आनंद आणि सच्ची माणसे. सदैव गुन्हेगारांशीच संबंध येत असुनही त्या गुन्हेगारांच्या मनोविश्वाचा घेतलेला मागोवा, त्यांच्या क्रुरतेबरोबरच असणारी दयाबुध्दी, कारुण्य. भर दंगलीत गाडीच्या टपावर उभे राहुन जमावाला शांत करायचे धाडस. दादांची लेखणी अगदी मनसोक्त चाललेली होती. अगदी कसलेल्या लेखकालाही जमणार नाही असं काय काय रेखाटुन गेले होते दादा. तेही अगदी सहजतेने. एका पोलीस अधिकाऱ्याच्या आत्मचरित्रात काय असणार? इतरांची फोडलेली गुपीते, स्वतःची अनाठाई किंवा न केलेली धाडसे, गुन्हेगार, बकाल वस्त्या आणि शेवटी माझे आयुष्य कसे यशस्वी होते हेच. दुसरं काय असणार? पण दादांनी एकत्र कुटूंबात राहुन अनुभवलेली नाती, त्यांची विण, आईबरोबरचे लडिवाळ संबंध, वडीलांचा करारीपणा, लहानसे खेडे, त्यातली लोकं यावर इतके सुरेख लिहिले होते की मला खरेच वाटेना. दादांमधल्या सुप्त लेखकाचा मला अंदाज आला होता. त्या लेखकाला मी जागे करायचाही प्रयत्न केला होता. पण तो लेखक आपले पहिलेच पुस्तक इतके कसदार लिहिल याचा मला खरोखर अंदाजच आला नव्हता. मग एकदिवस रोज एक तरी ओवी वाचायच्या सवयीमुळे दादांना ज्ञानेश्वरीत ‘सांजवणी’ हा शब्द दिसला आणि आत्मचरित्रासाठी तेच नाव नक्की करण्यात आले. हस्तलिखित ते पुस्तक प्रकाशन हा प्रवास हाही एक वेगळाच विषय आहे. प्रकाशकांचे एक वेगळेच विश्व यानिमित्ताने दादांनी आणि मी पुण्यातल्या पायी केलेल्या भटकंतीत अनुभवले. त्यावर पुन्हा कधी तरी सविस्तर लिहिन. यादवसरांनी ज्या पध्दतीने मदत केली होती ते पाहुन दादांनी प्रस्तावनाही त्यांच्याकडेच सोपावली. आनंद यादव यांनीही अगदी आनंदाने सुरेख प्रस्तावना लिहुन दिली. प्रिंटिंग प्रेसचे जे काही सोपस्कार असतात ते पुर्ण करुन अखेर ‘रामनवमी’च्या दिवशी दादांचे पहिले वहिले पुस्तक प्रकाशित झाले. विषेश म्हणजे पहिलेच पुस्तक असुनही काही महिन्यातच त्याची दुसरी आणि तिसरही आवृत्ती काढायला लागली. इतके सुंदर लिखाण अनेकांच्या नजरेत भरले तसे ते आकाशवाणीच्याही नजरेत आले. मग आकाशवाणीवर सांजवणीचे रितसर वाचन सुरु झाले. या पुस्तकानंतर मात्र दादांनी मागे पाहीलेच नाही. साधारणपणे एखाद्या लेखकाचा प्रवास हा किरकोळ लेख, दिवाळी अंकात एखादी कथा, मग कथासंग्रह, नंतर चरित्रनायकावर कादंबरी, जग भटकुन आल्यावर मग प्रवासवर्णन आणि मग यथावकाश आत्मचरित्र असा होतो. पण दादांचा सगळा प्रवास हा नेमका याच्या उलट झाला. आधी कळस मग पाया या पध्दतीने दादांचा लेखनाचा प्रवास झाला. अजुनही तो सुरुच आहे.

प्रथम दादांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. काही काळ मध्ये गेल्यावर त्यांनी स्रियांच्या मनोविश्वाला स्पर्श करणारा ‘अपराजिता’ हा कथासंग्रह लिहिला. आयुष्यात आलेले अनेकविध अनुभव, जगण्यावर असलेले निस्सीम प्रेम उलगडून दाखवणारा ‘नियतीच्या वाटा’ हा कथासंग्रहही प्रकाशित झाला. पोलीस खात्यात असल्याने समाजात वावरताना अनेक समस्या त्यांनी पाहिल्या होत्या. त्यावर आधारीत ‘पुढचं पाऊल’ हा कथासंग्रहही लोकप्रिय ठरला. लिखाणातून काही दिवस विश्रांती घेऊन दादा मनसोक्त भटकंती करुन आले. एका वेगळ्या नजरेतुन जगाला पाहुन आलेल्या दादांना गप्प कसे बसवेल? त्यांचे ‘केल्याने देशाटन’ आणि ‘अविस्मरणीय युरोप’ ही दोन प्रवासवर्णनेही प्रकाशित झाली. कथा, प्रवासवर्णने लिहुन आता दादांना वेगळेच विषय खुणावू लागले. गंगापुर धरणाचे नाव अनेकांनी ऐकलेले असेल पण ते बांधण्यासाठी एका साध्या शेतकऱ्याने चक्क अठरा वर्ष संघर्ष केला हे फार थोड्या लोकांना माहित असेल. त्या शेतकऱ्याच्या संघर्षाला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी दादांनी ‘कुणा एकाची धरणगाथा’ लिहिले. ते ही पुस्तक अल्पावधीतच लोकप्रिय झाले. अशाच एका तळागाळातुन वर येऊन कतृत्व सिध्द करणाऱ्या आमदार ए. टी. पवार यांच्या कार्यावर ‘आदिवासींचा विकाससुर्य’ हे पुस्तक लिहिले. पुण्यातल्या युनिक बुक्सने ते प्रकाशित केले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच उभारल्या गेलेल्या शेतकरी लढ्यात उतरलेल्या अनेक अनामिक सेनापतींवर ‘शेतकरी जेंव्हा जागा होतो’ हे पुस्तकही लवकरच वाचकांच्या भेटीला आले. अनेक मान्यवरांनी या पुस्तकाची दखल घेतली. पुण्यातील उत्तमराव पाटील यांच्या आयुष्यावर बेतलेली ‘जनसेवेस्तव जीवन दिधले’ ही चरित्रात्मक कादंबरी तर अनेकांच्या जिव्हाळ्याची ठरली. शतपर्वही चर्चेचा विषय ठरले. ऐतिहासीक कादंबऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी दादांनी ‘स्वातंत्र्यसुर्य महाराणा प्रताप’ तसेच मिराबांईच्या मनोविश्वाचा मागोवा घेणारी ‘संत मिराबाई’ ही कादंबरीही अतिशय तरल भाषेत लिहिली गेली. मिराबाईंची ह्रदयीची प्रीत उलगडुन उलगडून दाखवताना दादांच्या लेखनीला सुरेख बहर आला होता. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. अजुनही दादा लिहित आहे. या सगळ्या प्रवासात काही कटू घटनांमुळे दादांनी पुणे सोडले आणि नाशिक जवळ केले. अर्थात निरपुर हे त्यांचे गाव असल्याने त्यांचा नाशिककडे ओढा असणे हे नैसर्गीकच होते पण त्यामुळे दर चार दिवसाला रंगणाऱ्या आमच्या गप्पांच्या बैठका आता महिन्यातुन एखादवेळी व्हायला लागल्या. कधी त्यांना पुण्याला यायला जमले नाही तर मी ‘काळ्या रामाच्या’ दर्शनाचे निमित्त काढतो आणि या रामाला भेटुन येतो. नशिबाने लाभावेत असे काही मित्र मला लाभले. दादाही त्यांपैकीच एक.
दादांच्या पुढील लेखनाला माझ्या खुप खुप शुभेच्छा!!!

(श्री. अभिमन्यु सुर्यवंशी यांची आतापर्यंत १३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच अनेक दिवाळी अंकात त्यांच्या कथा नियमित येत असतात. अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची एक वेगळी यादी करावी लागेल. दादांच्या चरित्रात्मक कादंबऱ्यांवर सौ. कल्पना देवरे यांनी पुणे विद्यापीठातुन एम. फिल केले. तेही ए ग्रेड मिळवून. दादांविषयी, त्यांनी सांजवणीत न लिहिलेल्या अनेक प्रसंगांविषयी लिहिण्यासारखे बरेच काही आहे. ते पुन्हा केंव्हा तरी.)

दादांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे.
acp dada.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान ओघवत्या भाषेत लिहिलंयत हरिहर.
वाचता वाचता 'कुण्या एकाची धरण गाथा' हे आल्यावर अरेच्चा झाले. वाचलंय हे पुस्तक.

वाह, खूपच मस्त लिहिलंय....

आता वाचलीच पाहिजेत साहेबांची सगळीच पुस्तकं...

तुमचे एकूणच मित्रमंडळ भारीच्चे अगदी... Happy

@peacelily2025, पुणे आणि नाशिक येथे सहज मिळावीत. सांजवणी जर नाहीच मिळाले तर माझ्याकडे काही प्रती आहेत त्यातली देऊ शकेन. बुकगंगावर त्यांची बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.

सर्वांचे प्रतिसादासाठी धन्यवाद! Happy

लेख खूप आवडला.

व्यक्तिचित्र अतिशय सुरेख उतरले आहे.

हो, मस्त झालाय लेख. अगदी डोळ्यासमओर येत होतं सर्व. तुमची लिखाणशैली खूप प्रभावी आहे. सुर्यवंशी सरांबद्दल छान माहिती कळली आणी पोलीसातला लेखक पण उमगला. खूप छान !!

मी दहा फर्लांगावर असलेल्या वळणावरुन डावीकडे वळालो आणि पहातो तर काय... सदरहू तरुणी माझ्या पासुन चार यार्डावर उभी.” हे वाचुन मी डोक्याला हात लावला. >>>>>>> हो मी पण न राहवुन खुदकन हसले. Proud पूर्वी श्रीकांत सिनकरांच्या कथा वाचल्याने हे असे वाचले की मोठी गंमत वाटते.

खूप धन्यवाद... दादांच्यातल्या साहित्यिक दादांना कठोरपणे मुक्त केलेत...अन्यथा आत्मचरित्रा नंतर पुढचे पुस्तक आले नसते.

सदैव तणावात राहुनही कशातही विनोद शोधायची वृत्ती, नोकरी निमित्ताने राज्यभर फिरतानाही त्यातली दगदग दुर्लक्षून जाईल तेथून जमा केलेला आनंद आणि सच्ची माणसे. सदैव गुन्हेगारांशीच संबंध येत असुनही त्या गुन्हेगारांच्या मनोविश्वाचा घेतलेला मागोवा, त्यांच्या क्रुरतेबरोबरच असणारी दयाबुध्दी, कारुण्य. भर दंगलीत गाडीच्या टपावर उभे राहुन जमावाला शांत करायचे धाडस. दादांची लेखणी अगदी मनसोक्त चाललेली होती.

त्यांच्यातला मुलखावेगळा माणूस तुमच्या प्रतिभेने अचूक हेरला.

शाली,
मोरपिसारा उपक्रमांतर्गत लेख प्रकाशित करण्याच्या सूचनांमध्ये काही बदल केले आहेत. कृपया https://www.maayboli.com/node/69006
या धाग्यावरील बदललेल्या सूचना वाचून त्याप्रमाणे शीर्षकात बदल करावा ही विनंती. तसदीसाठी दिलगीर आहोत.

माझ्यासारख्या माणसाने या प्रसंगावर आत्मचरित्रातली दहा पाने खर्च केली असती. पण दादांनी लिहिले “मी दहा फर्लांगावर असलेल्या वळणावरुन डावीकडे वळालो आणि पहातो तर काय... सदरहू तरुणी माझ्या पासुन चार यार्डावर उभी.”

>>>.मला आवडले हे, शॉर्ट आणि स्वीट.

मस्त लेख शाली !!!

धन्यवाद च्रप्स!
इतर सर्वांचेही प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!

अप्पा, सकाळी तुझा लेख वाचला. उत्तम जमला आहे. सांजवणी आणि इतर पुस्तके लिहिताना तुझी खुप मदत झाली, त्याविषयी मी काही बोलणार नाही पण तू स्वतःची सर्व कामे सोडून दोन महिने फक्त या सांजवणीला वाहून घेतलेस ते फक्त एक जीवीचा जीवलगच करु शकतो. तुला आणि मलाही सहन करणाऱ्या रमाचही कौतुक. मुलीचे आभार मानू नये म्हणतात म्हणून मानत नाही इतकेच. कथासंग्रह लिहितानाही तुझी फार मदत झाली. कसं लिहावं हे सांगण्यासाठी तू ज्या दोन तिन कथा लिहून दिल्या होत्या त्या अजुनही मी जपून ठेवल्या आहेत. आणि प्रांजळपणे कबुल करतो की त्या आजही मला माझ्या लेखनापेक्षा कितीतरी उजव्या वाटतात. तू लिखाणाकडे जरा लक्ष द्यावे असे मी सुचवेन. तू फार छान लिहितोस पण... जरा लहरीपणा कमी कर. लेख उत्तमच झाला आहे. तुझ्या पुढील लेखनास अनेक शुभेच्छा!
—अभिमन्यू दो. सुर्यवंशी

(दादांनी आग्रह केल्यामुळे त्यांचा हा प्रतिसाद येथे दिला आहे.)

बऱ्याच दिवसांपासून हे व्यक्तिचित्र वाचायचं मनात होतं. आज वाचलंच. तुमच्या शैलीत छान ओघवतं लिहीलंय. आवडलं. Happy

माणसामधल्या साहित्यिकाला जागं करणं हे एक आव्हान असतं... दादांच्या व्यक्तिमत्वात दडलेला लेखक तुम्ही अचूक हेरलात आणि योग्य प्रोत्साहन देऊन, प्रसंगी सुधारणा सुचवून लपलेला प्रतिभावान लेखक समोर आणलात. मायमराठीच्या साहित्यात दादांचे अमूल्य योगदान मिळाले, यात तुमचाही मोलाचा वाटा आहे. Happy

खूप छान... सांजवणी हा शब्द पण किती गोड आहे.
धन्यवाद अशा व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल. ही पुस्तकं जेव्हा कधी वाचता येतील तेव्हा जरूर वाचेन. तुमची लेखनशैली पण अप्रतिम आहे अगदी डोळ्यासमोर चित्र उभे केलेत.

सुन्दर परिचय

सांजवणी नक्किच वाचायचा प्रयत्न असेल

फार प्रसिद्ध नसलेल्या माणसातला कलंदरपणा उलगडून दाखवणे सोपे नसते. समोरच्याला त्या माणसाची माहिती नसते त्यामुळे लिखाण कंटाळवाणे होउ शकते (नव्हे, त्याचीच शक्यता जास्त असते). पण तुमचं माणसं चितारण्याचं कसब अफलातून आहे - तुमच्यातल्या चित्रकारामुळे असेल!

अफाट सुंदर झालाय हा लेख.