स्वागतार्ह प्रयोग - एक लडकी तो देखा तो ऐसा लगा - (Movie Review - Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga)

Submitted by रसप on 2 February, 2019 - 03:14

मुख्य धारेतला भारतीय चित्रपट हा नेहमीच पलायनवादी राहिला आहे. लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातून दोन घटिका मनोरंजन मिळावं, हाच त्याचा मुख्य हेतू राहिला आहे. चित्रपट बनवणारे आणि पाहणारे, दोघेही मुख्य धारेतल्या चित्रपटाकडे ह्याच विचाराने पाहात आले आहेत. ह्या मनोरंजनात नाट्याची बाजू सांभाळण्यासाठी सगळ्यात आवडता विषय 'प्रेम' आणि मग त्याच्या जोडीने देशभक्ती, कर्तव्यभावना, कौटुंबिक कलह वगैरे कथानकं असतात.
मात्र चित्रपटाचा हा पारंपारिक चेहरा हळूहळू बदलत चालला आहे. (खरं तर, मुखवटाच. पण पिढ्यांनंतर पिढ्या जपलेला मुखवटा एक चेहराच बनल्यासारखा झाला असल्याने, 'चेहरा'.) आजचा मुख्य धारेतला चित्रपट वेगळे विषय हाताळायला पाहतो आहे. गेल्या काही वर्षांतले चित्रपट पाहिले, तर 'चित्रपटात उपकथानक म्हणून का होईना एक प्रेमकहाणी असलीच पाहिजे', ह्या आत्यंतिक उथळ, तरी प्राथमिक मताला अनेक चित्रपट सर्रास छेद देत आहेत. अनावश्यक गाण्यांना चित्रपटात स्थान राहिलेलं नाहीय आणि कथानकाची मांडणी मुख्य विषयाला अधिकाधिक धरून होताना दिसते आहे.

'समांतर चित्रपट' ही धारा कधीच लुप्त झाली असली, तरी अजूनही काही चित्रपट वेगळ्या विषयांची मांडणी करताना दिसतात किंवा वेगळ्या मांडणीने कथा सांगताना दिसतात. ते अगदी ठळकपणे मुख्य धारेला सोडूनच असतात. व्यावसायिक गणितं त्यांनी गृहीत धरलेली नसतात, हेही जाणवतं.
एखादा चित्रपट मधूनच येतो, जो व्यावसायिक गणितं सांभाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतच वेगळं कथानक किंवा वेगळी मांडणी समोर आणतो. गेल्या काही वर्षांत चांगले/ वाईट, जमलेले/ फसलेले असे अनेक व्यावसायिक प्रयोगही झाले आहेत, ही एक खूप चांगली बाब आहे. 'एक लडकी तो देखा तो ऐसा लगा' असाच एक प्रयोग करतो. तो चांगला आहे की वाईट, जमला आहे की फसला आहे; हा भाग निराळा. मात्र एक व्यावसायिक चित्रपट काही तरी वेगळेपणा समोर घेऊन येण्याचं धाडस करतो आहे, हीच बाब मुळात खूप स्तुत्य वाटते. एक असा विषय ज्याला अगदी खाजगी गप्पांतही पद्धतशीरपणे फाटा दिला जातो, झटकलं जातं; त्याला एक व्यावसायिक चित्रपट लोकांसमोर खुलेआम घेऊन येतो, इतकीच गोष्ट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' आवर्जून पाहण्यासाठी पुरेशी आहे, असं मला वाटतं.

चित्रपटाची कथा 'गजल धालीवाल' हिने लिहिली आहे. 'गजल' भारतातील मोजक्या ट्रान्स-वूमन्सपैकी एक आहे. स्वत:च्या लैंगिकतेच्या शारीरिक व मानसिक घडणीतली असमानता समजून घेऊन, स्वीकारून आणि मग प्रयत्नपूर्वक त्यांत समतोल साधून घेण्याचा मोठा संघर्ष तिने स्वत:शीही केला आहे आणि उर्वरित जगाशीही. चित्रपटातील 'एक लडकी' म्हणजेच 'स्वीटी' (सोनम कपूर) हाच संघर्ष अनुभवते आहे. तिचा हा संघर्ष चित्रपटाचा बहुतांश भाग खूप समर्थपणे मांडतो. हा विषय मांडणं म्हणजे एक कसरत होती. जर तो अगदी गंभीरपणे मांडला असता, तर पचायला अवघड होता. कडवट औषध शुगरकोट करून घ्यायचं असतं म्हणून हा विषय हलक्या-फुलक्या शैलीत मांडला आहे. पण असं करतानाही त्यातलं गांभीर्य जपणं अनिवार्य होतं, कुठलाही थिल्लरपणा येऊ न देणं महत्वाचं होतं. ही कसरत उत्तम निभावली गेली आहे. कथानकाची मांडणी, पात्रं, घटना, चित्रण खूप वास्तववादी वाटतं. अनेक प्रसंग पाहताना, हे आपण प्रत्यक्षातही पाहिलं असल्याचं जाणवत राहतं. अश्या मुलांचं वेगळं वागणं, एकटं पडणं, त्यांनी स्वत:च्या कोशात शिरणं, त्यांच्या आवडी-निवडी हे सगळं छोट्या छोट्या प्रसंगांतून प्रभावीपणे मांडलं आहे. स्वीटीच्या कपड्यांच्या रंगसंगतीतही हा विचार केलेला दिसतो.
शेवटच्या भागात मात्र कथानकातला हा वास्तववाद मागे पडत जातो आणि नेहमीचा फिल्मी उथळपणा त्याची जागा घेतो. आधी घेतलेल्या मेहनतीवर, जसजसं आपण शेवटाकडे सरकत जातो, तसतसा बोळा फिरायला लागतो, ही 'एक लडकी को..' ची मोठी उणीव आहे.

ELKDTAL_0.jpg (24.9 KB)

मात्र ही एकच उणीव नाही. ह्यापेक्षा मोठी उणीव आहे 'सोनम कपूर'. एका अतिशय प्रभावी व्यक्तिरेखेला साकारण्यासाठी आवश्यक ठहराव तिच्या क्षमतेबाहेरचा असावा, असं 'नीरजा'मध्ये वाटलं होतं, इथे त्यावर शिक्कामोर्तबच होतं. जिथे जिथे कथेची तिच्याकडून लक्षणीय सादरीकरणाची अपेक्षा होती, तिथे तिथे तिच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. पण जिथे जिथे सोनम कपूर कमी पडते, तिथे तिथे सहाय्यक कलाकार सांभाळून घेतात असं चित्र पुन्हा पुन्हा दिसून येतं. तिचा एकटीचा असा कुठलाही प्रसंग चित्रपटात नाही किंवा तिला लांबलचक मोनोलॉगसुद्धा नाही. मुख्य व्यक्तिरेखा इतकी फुसकी झाल्यामुळे बाकीच्यांच्या मेहनतीचं चीज फक्त सांभाळून घेण्यातच होतं.

'राजकुमार राव सुंदर काम करतो', हे म्हणून (लिहून) आता कंटाळा यायला हवा ! पण त्याने साकारलेला स्ट्रगलिंग लेखक, निरपेक्ष प्रेमी, मित्र खूप कन्व्हीन्सिंग आहे. त्याला भावनिक उद्रेकाचे असे कुठले प्रसंग नाहीत. मात्र दारू पिऊन स्वीटीच्या खोलीत जाणं, किचनच्या खिडकीतून पत्र देणं व अजून काही साध्याश्या प्रसंगांतही तो मजा आणतो. स्वीटीचं सत्य ऐकतानाच्या प्रसंगात स्वत: स्वीटी (सोनम) जितकी उथळ वाटते तेव्हढाच साहिल (राजकुमार) मनाला पटतो. तो एक अतिशय महत्वाचा प्रसंग केवळ राजकुमारमुळे तरला तरी आहे.

अनिल कपूरने कॅरेक्टर रोल्स करायला सुरु करण्याचं कारकिर्दीतलं एक महत्वाचं वळण अगदी बेमालूमपणे घेतलं आहे. त्याचा भावनिक संघर्ष दाखवण्यासाठी कथानकात फारसा वाव त्याला मिळाला नाहीय, तरी जितका आहे त्यात त्याने छाप सोडली आहे. खरं तर अनिल कपूरने वाईट काम केलंय, असा एकही चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेलाच नाही. त्या दृष्टीने तो खरोखरच (क्रिटीकल अक्लेमच्या बाबत) खूप अंडररेटेडही असावा.

जुही चावला चित्रपटात नसती, तरी चाललं असतं. मूळ कथानकाला तिचा काही फारसा हातभार नाहीय. मात्र तिच्या असण्याने अनेक हलके-फुलके प्रसंग दिले आहेत. खासकरून अनिल कपूर आणि ती एकत्र जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा ते धमाल करतात !

तमिळ, तेलुगु चित्रपटातला लोकप्रिय चेहरा 'रेजिना कॅसेन्ड्रा' प्रथमच हिंदीत दिसला आहे. तिचा टवटवीत मिश्कीलपणा आणि सहजाभिनय मुख्य व्यक्तिरेखेसाठी साजेसा होता. येत्या काळात तिला चांगल्या भूमिका नक्कीच मिळायला हव्या.

'रोचक कोहली'च्या संगीताची बाजूही कमजोर वाटते. आरडीचं '१९४२ अ लव्ह स्टोरी'मधलं 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' रिक्रिएट केलं आहे. ते कम्पोजिशन आवडलं. मूळ मेलडीला हात लावलेला नाहीय आणि ओरिजिनलमध्ये जे म्युझिक पीसेस होते त्यांनाही शब्दांत बांधलंय. एरव्ही रिमेक/ रिक्रिएट करताना ऱ्हिदम आणि कम्पोजिशनमध्ये गोंधळ घातला जातो, तसं तरी नाहीय. पण कॉन्स्टीपेटेड आवाजात गायची फॅशन गलिच्छ आहे. असो. त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही कारण सगळेच आजकाल कुंथत कुंथत गाताना दिसतात !

दिग्दर्शिका 'शेली चोप्रा' ह्यांचा (बहुतेक) हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्या कामात अनुभवी सफाईदारपणा ठळकपणे जाणवतो. कथानकाने शेवटच्या भागात खाल्लेल्या गटांगळ्या आणि सोनम कपूरने टाकलेल्या पाट्या वगळल्या तर दिग्दर्शिकेचा एक पहिला प्रयत्न आणि वेगळ्या विषयाची हाताळणी म्हणून 'एक लडकी को..' हा एक स्वागतार्ह प्रयोग आवडायला हरकत नसावी.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2019/02/movie-review-ek-ladki-ko-dekha-to...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनम कपूर बाबत लिहिलेला शब्द न शब्द पटला... ती आहे म्हणूनच नाही बघणार हा सिनेमा... तिला सहनच नाही करू शकत... तिच्या जागी दुसरं कोणी असत तर प्रयोग म्हणून तरी नक्कीच पहिला असता पण आता बिग नो...

फारच वेगळा विषय. परवा ट्रेलर बघितलं त्यावरून आणि तुमच्या परिक्षणावरून राजकुमार रावसाठी सिनेमा बघावासा वाटतोय.
तुम्ही उरी, The accidental PM, मणिकर्णिका बघितले की नाही? तसेच भाई ठाकरे? पहिले तीन मी बघितले आहेत पण तरी तुमचे परीक्षण वाचायला आवडेल.

सोनम एवजी आलिया किवा भुमी पाहिजे होती, हिला एवढ डिप काहिच झेपत नाही, नॉर्मली सुद्धा ती किती इरीटेटिन्ग अ‍ॅक्सेन्ट मधे बोलत असते.

रसप, तुम्ही स्टोरी सिक्रेटच लिहुन टाकलं Uhoh

नवीन Submitted by सस्मित on 2 February, 2019 - 16:14

>>
काहीही सीक्रेट नाहीय. ट्रेलरमधून स्पष्ट दिसलंय, विकीवर लिहिलंय आणि त्या व्यतिरिक्त पान-पानभर आर्टिकल्स ओतून झालीयत लोकांची रिलीजच्याही आधीच.
बळंच खोट काढत असता का ?

तुम्ही उरी, The accidental PM, मणिकर्णिका बघितले की नाही? तसेच भाई ठाकरे? पहिले तीन मी बघितले आहेत पण तरी तुमचे परीक्षण वाचायला आवडेल.

Submitted by वत्सला on 2 February, 2019 - 19:05

>>
पैकी फक्त 'उरी' पाहिला होता. जबरदस्त वाटला. लिहायला वेळ झाला नाही. तरी - जर अजून एकदा पाहायला वेळ मिळाला तर - नंतर लिहीन.

मुव्ही बघितला नाही.. पण विषय कितीही छान असला तरी सोनम अती बोअर आहे.. खुबसुरत मधे तिच ''विकु'' बोलावणे तिच्या टिपिकल आवाजात डोक्यात फिरते आठवला मुव्ही तरी.. वीरे वेडिन्ग मधे पण खुप इरिटेटिंग होती.. नेपोटिझम आहेच खर तर नाहि तर तिला कोणी घेतलं तरी असतं का मुव्हीज मधे.. उथळ आहे ती खुप..

बळंच खोट काढत असता का ?>>>>> नाही ओ. बळंच नव्हतं लिहिलं.
मी जे काही ट्रेलर्स पाहिले त्यातुन असं काही आहे हे कळलं नव्ह्तं.
विकीवर लिहिलंय आणि त्या व्यतिरिक्त पान-पानभर आर्टिकल्स ओतून झालीयत लोकांची रिलीजच्याही आधीच.>>>>>>> हे पण काही वाचलं नव्हतं.
धन्यवाद.

ट्रेलर न पाहता अथवा काहीही माहिती न वाचता पाहिला. तिची सच्चाई कळेपर्यंत तिची व तिच्या भावाच्या वागण्याची काही टोटलच लागत नाही..व अचानक धक्का बसतो. वेगळ्या विषय निवडीबद्दल खरंचच कौतूक. बाकी अनिल व राजकुमार राव तर आवडतातच, त्याबद्दल रसप ना पूर्ण अनुमोदन! पण रेजिना सर्वात जास्त आवडली, तिच्या प्रत्येक सीनमधे तिच्यावरुन नजर हटत नव्हती Wink
सोनम सहन करायची ताकद असल्यास वन टाईम वॉच नक्कीच आहे.

सुनिधी +१

यूट्यूब ब्राऊझ करताना याचा ट्रेलर पाहिला होता.

अरे वा! राजकुमार रावचा नवा सिनेमा…
अर्र! सोनम कपूर ??
अरे वा! अनिल कपूर, जूही चावलाही आहेत…
ई... पण हिरॉइन सोनम कपूर… ??
काहीतरी वेगळा विषय वाटतोय… बहुतेक लेस्बियन नात्यावरचा असावा…
असल्या वेगळ्या सिनेमात सोनम कपूर?? हॅट्ट ….

… असा प्रवास करून या सिनेमाला मनोमन पूर्णविराम दिला! Lol

अर्र! इतकी सोनम कपूर लोकांच्या डोक्यात जाते का?? Lol कंगना रानौत जशी माझी नावडती झालीये तसंच हे पण Happy
मला सोनम आवडत नाही की नावडतही नाही.
पण केवळ सोनम आहे म्हणुन रा रा अनिल आणि त्यांचा चांगला विषय असलेला चांगला सादरीकरण असलेला सिनेमा बघु नये हे जमणार नाही.
(देवा, कंगना आणि रा रा/आयुष्मान/ रण्वीर सिंग असा सिनेमा कधीच नको यायला Lol )

ऑनेस्टली, कंगना बरीच बरी आहे सोनमपेक्षा.
नाकावरची माशी उडते तरी कंगनाच्या.. आवाजात मार खाते माझ्या मते. पण आवाजात तर सोनम मारच काय, असेल नसेल ते सगळंच खाते. बेसिकली, ती एक दगड आहे. तिच्याकडून कसलीही अपेक्षा करणारा अंधश्रद्धाळू मानावा.

बेसिकली, ती एक दगड आहे.>> Lol
लोकांना सोनम चा फ्याशन सेन्स आवडतो म्हणे, मला कधीच नाही आवडले ते चित्रविचित्र कपडे ,
अभिनय वगैरे तर जाउच द्या, न बोललेल बर...
कोणाला शिक्षा द्यायची असेल तर त्याला 'प्रेम रतन धन पायो' दाखवावे, तो नक्कीच तुमचे 'पायो' धरेल मला सोडा, मला सोडा करत Proud

देवा, कंगना आणि रा रा/आयुष्मान/ रण्वीर सिंग असा सिनेमा कधीच नको यायला >>>>>> मग सस्मित तुमची मानसिक तयारी करुन घ्या, कंगनाचा आगामी सिनेमा रा रा बरोबर आहे.

इतकी पण वाईट नाहीये सोनम.फॅशन सेन्सही चांगला आहे.मुख्य म्हणजे तिची 'मी फोटोत जी दिसते ती दिसायला मला अनेक निर्बंध पाळावे लागतात, चेहर्यावर 3 तास अमुक रोज फासावे लागते, तुम्ही तसे फोटोत दिसत नाही म्हणून न्यूनगंड बाळगू नका' अशी एक पोस्ट फिरते ती मला खूप आवडली होती(म्हणजे फेसबुक किंवा इंस्टा वर उजळ माथ्याने तेलकट थोबाड आणि वेडे वाकडे दात दाखवणारे फोटो टाकायला मोकळं रान मिळाल्यागत वाटलं ☺️☺️☺️)
तिला रांजणा मधल्या सारखे रोल जमतात.खूप गंभीर रोल जमत नाहीत.कंगना ला अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या अथवा डिप्रेसड आणि नंतर आत्मविश्वास वाढवून ढ्याण झालेल्या तरुणी चे रोल चांगले जमतात.

मी फोटोत जी दिसते ती दिसायला मला अनेक निर्बंध पाळावे लागतात, चेहर्यावर 3 तास अमुक रोज फासावे लागते, तुम्ही तसे फोटोत दिसत नाही म्हणून न्यूनगंड बाळगू नका>> असे विचार असेल तर मनाने चांगली आहे,
पण मला नै आवडत तरीही तिला पडद्यावर बघायला

कंगना ला अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या अथवा डिप्रेसड आणि नंतर आत्मविश्वास वाढवून ढ्याण झालेल्या तरुणी चे रोल चांगले जमतात>>> १००० * +१११११११११ हे पर्फेक्ट पटलं
भुताने पछाडलेली भुमिका पण छान करते कन्गना,
फ्याशन, क्वीन, तनु वेड्स मनु हे तिचे सिनेमे आवडले होता

सोनम कपूर हा प्रदीप कुमार, भारत भूषण, प्रिया राजवंश या अभिनयसम्राट त्रिमूर्तींचा एकत्र पुनर्जन्म आहे.
अशी अभिनेत्री शतकाशतकातून एकदाच जन्माला (पण का?) येते.

ललिता-प्रिती Happy
सोनम डोक्यात बिक्यात जात नाही पण झायेद खान , हेमाची मुलगी (नाव सुध्धा विसरले) व अजुनही काहीजण ० अभिनय येणारे यांच्यासारखीच तिला पण पडद्यावर पहायची ताकद नाही हे खरं. पहिले दोघे आता दिसत नाही म्हणा.
तरी फवाद खानसाठी तिचा 'खुबसुरत' पाहिला होता, तेव्हा तोच मला (स्वप्नात येऊन) म्हणाला, 'कशाला पाहिलास? जिंदगी गुलजार पुन्हा का नाहीलंस त्यापेक्षा?'

mi_anu, +१.

पण हल्ली रिअलीस्टीक इन्टरव्ह्यूज् देण्याची फॅशन आहे त्यामुळे सोनम च्या नावाने जे काही सोशल मीडीया त पसरलं असेल ते बहुतेक अगदी युनिक नसावं. तरी किमान मी तरी इतर मुलींनां असं बोलताना ऐकलेलं नाही अजून. पण सोनम ला मात्र त्या अनुपमा चोप्रा शी ह्या विषयावर बोलताना ऐकलं आहे.

सोनम कपूर इतकी वाईट आहे का? मी तिचा फक्त नीरजा पाहिला होता आणी मला तो सिनेमा आवडला होता. बाकी इतकं काही पाहिलं नाहीये मत बनवायला.

मला तरी सोनम कपूर तेव्हढी टाकाऊ वाटत नाही. दुसर्‍या अनेक अभिनयाच्या नावाने बोम्ब असलेल्या हिरॉईन्स येतात मग ही नक्कीच अबाव्ह अ‍ॅव्हरेज म्हणायला हरकत नाही. आणि अर्थात स्टार किड असल्याचं अ‍ॅड्व्हान्टेज आहेच तिच्याकडे. मग का नाही ते वापरायचं तीने? Happy

Pages