ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही, असे काही करु नका! तुमच्या शुभेच्छा पोहचल्याही असतील. शब्द एडीट करुन काय होणार? Happy
शुभेच्छा द्यायचे राहीले कारण अतिपरिचयात अवज्ञा.
तुमच्या भावना पोहचल्या अज्ञातवासी. खुप धन्यवाद!

शुभेच्छा द्यायचे राहीले कारण अतिपरिचयात अवज्ञा.
तुमच्या भावना पोहचल्या अज्ञातवासी. खुप धन्यवाद!>>>>>
Happy
आणि लिखाणाची आता डबल मेजवानी मिळेल, त्याबद्दल तुम्हा दोघांनाही धन्यवाद!

अरे वा! खुप नविन नविन शब्द कळत आहेत. काही माहित असुनही विस्मरणात गेले होते. सगळ्यांचे खुप आभार!
अज्ञातवासी आणि आप्पा शुभेच्छांसाठी तुमचे धन्यवाद!
हा माझा पहिलाच धागा असल्याने यासारखे धागे आधीच येथे आहेत का हे पहायचे लक्षात आले नाही.

कोदंडपाणी यांना पहिल्या लेखाच्या अनेकविध शुभेच्छा!.>>>>>>+१.

घरी प्रमाण मराठी बोलत असल्याने कोकणी ,मागच्या पिढीतील आई आणि काका बोलू शकतात.ते फक्त समजते.
खूप वर्षांपूर्वी,गावी गेले असता तिकडची गावकरी मंडळी मराठीत बोलू लागली "दोंपारचे निबार कसे कमकमत आहे ना"म्हणजे दुपारचे उन कसे चणचणत आहे.;) Wink

उंडगा= कामधंदा नसलेला,टोळभैरव.
आउस्=आई
बापूस= वडील

पाठ: शेळी
>>>>
आमच्याकडे शेळीच्या लहान पिलांना बोकड (मेल),
पाट (फिमेल) म्हणतात.

ठू - ठेवं

लहानपणी आम्ही पोरं दुपारी उन्हात उनाडक्या करत फिरायचो तेव्हा आजी म्हणायची "वाईस पडून रहा " हा वाईस बहुतेक "जरा" शब्दासाठी असावा .
सोसाट्याचा वारा - खैदान
दावं - सुम्ब
पेन्डूळी - फुकटे
पांदी - झाडांनी वेढलेला रस्ता
डालग - कोंबड्या किंवा कुत्र्या-मांजराच्या पिलांना डांबायला वापरतात ती टोपली
हरा - तशीच मोठी टोपली पण हि सच्छिद्र नसते आणि थोडी उथळ असते
डोरलं - मंगळसूत्र
भोकाडी - भूत
दट्ट्या - दंडुका

तरीही 'शिरा पडो' हा वाक्प्रचार वापरायला माझ्या लेकीला खूप आवडते. अर्थ साधारणपणे 'सत्यानाश झाला/होवो' च्या जवळपास जातो.
<<
मूळ अर्थ तोंडात शिळं अन्न पडो असा आहे, असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं.

चेडू = मुली हा शब्द कोकणात वापरला जातो .यात भीतीदायक असे काही नाही .
माझ्याच घरात वयोवृद्ध मंडळी "काय गो चेडवा , कसा हस " असे विचारत असतात आमच्याकडे आली की. लहानपणपासून ऐकतेय .

*तरीही 'शिरा पडो' हा वाक्प्रचार साधारणपणे 'सत्यानाश झाला/होवो' च्या जवळपास जातो.**मूळ अर्थ तोंडात शिळं अन्न पडो असा आहे, असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं.* -
कोकणी भाषेचा अभ्यासक असलेल्या माझ्या मित्राचं मत - 'शिरा पडो' असं नसून 'शिरां पडो' असं आहे. वाळलेलया लाकडाच्या काटक्याना कोकणात शिरडीं/ शिरां म्हणतात. त्या घरावर पडलेल्या असतील तर आग लागून घर बेचिराख होऊ शकतं. त्यामुळे ' शिरां पडो घरावर ' अशी मूळ शापवाणी असावी.

भांणशेरं - गरम भांडी उचलण्यासाठी चुलीजवळ ठेवलेला कापडाचा तुकडा.

माझ्याही एका कोकणी मित्राने शिरां याचा अर्थ काटेकुटे असा सांगितला होता. पण मला काही ते पटले नाही. तोंडावर काटे पडो अशी शिवी कोण देईल? असं वाटलं होतं.

भांणशेरं हा नविन शब्द समजला. मस्त आहे. चुल, वैल आणि भांणशेरं.

भाऊ,
आपण कोकणात आहात. तेव्हा मजपेक्षा जास्त आपणास ठावे.

"शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार" असाच नॉर्मली वापरला जातो ना हा वाक्प्रचार?

तोंडात काटक्या पडण्याचे प्रयोजन मला तरी उमजत नाही. उलट शिळेपाके खाऊन रहायची वेळ येवो अर्थात, अत्यंत गरीबी येवो असा कानावर बोटे मोडत उच्चारलेला शाप मात्र मला तरी बरोबर वाटतो.

बोळकांड- बोळ
नळकांड - नळी
सावतार - सावत्र
कासरा - दोर
समदं - सगळं
उली उली - थोडं थोडं
उलसक - अगदी थोडं
इव्हढसक - छोटसं
पडवी - याचा exact प्रतिशब्द नाही आठवत
डास - दंश
दरा - दरी
गडी आलं - चोर आले

पडवी, वसरी = ओसरी
वरधावा = नव-या मुलाचा लहान भाऊ
परण्या जाणे = लग्न लागयच्या आधी नवरा ग्रामदेवतांचे दर्शण घेतो
मांडवपरातणी ?
गडंगण्यार = नवरा, नवरी आणि कलवरे गावातले लोक जेऊ घालतात.
बाहुला = बोहला
सुगड = छोटे मडके
उतरंड = तळाला मोठे मडके त्यावर थोडे लहान अशी एकावर एक रचलेली मडकी.
कणा = मोटेने पाणी काढताना सोंदुर फिरणारे खालचे चाक
सोंदुर = कण्यावर फिरता दोर
मोट = पाणी भरणारे पत्र्याचे भांडे
नाडा= मोटेच्या वरच्या चाकावरचा दोर
रावसाहेब = भावसायबाचे वरिष्ठ
मामलेदार= तहसीलदार
फुळकावणी = प्रमाणापेक्षा जास्त पातळ भाजी
माडगं = भाजलेल्या हुलग्याचे सार
बरसान = सर्दी
ख्वांड = लहान वयाचा बैल
कालवड = लहान वयाची गाय

बरसान.....खूप वर्षांनी हा शब्द वाचला Happy

गडंगण्यार...याचा अपभ्रंश...गडांगान असाही ऐकला आहे.
माझी आजी 'गरम करणे' ला 'ऊन करणे' असे म्हणायची.

गुठं = उडीद डाळीची पातळ भाजी
काठवत = पिठ कालवण्याची लाकडी प्रांत
वगराळं = एक लांब दांड्याला वेल्ड केलेले फुलपात्रासम भांडे
भगूलं = पातेलं
आवा= चूलीची उप चूल जिने जाळ दुभंगतो, शिवी
रूखवत = लग्नात तळलेले कुर्डयी; पापड टोपलीत भरुन नव-याच्या मुक्कामी वाजत गाजत नेणे.
येरझार = फे-या मारणं
हेलपाटा = फुकट गेलेले चालणे
हेळ= पाणवठा
कवाचा= कधीचा
गेल्ता = गेला होता
आल्ता = आला होता
तोतरं = बोबडं
खुळपं = कोपरापासून हात नसलेला

चेडू = मुलगी, हे आधी ऐकलेलं आहे. 'हिरव्या हिरव्या' या प्रसिद्ध गाण्याची दुसरी ओळ आहे ना - 'सांग गो चेडवा दिसतां कसो खंडाळ्याचो घांट'

अनेकाकडुन गेला बाजार हा गेला बाजार तो अस ऐकले आहे. या गेला बाजार वाक्प्रचाराचा अर्थ कोणी सान्गेल काय? धन्यवाद.

"शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार" >>> हे मूळचे 'शिळा पडो' किंवा भाऊ नमसकर म्हणतात तसे वाळलेल्या लाकडाच्या काटक्या (शिरां) असावे. त्या शिळेचे/ शिर्‍यांचे आता 'शिरा' झाल्यावर अगदि सत्यनारायणी बदल वाटतो Happy
असो. मजा येते आहे, बरेच नवीन (जुने) शब्द कळताहेत.

या गेला बाजार वाक्प्रचाराचा अर्थ कोणी सान्गेल काय? >>
गेला बाजार - किमान पक्षी/ कमित कमी. " माझी गाडी पन्नास हजाराला विकेल . गेला बाजार, चाळीसला तर कोणीही घेइल"

आवचिंदी/औचिंदी पोरगं - आगावू मूल
बनेल / चाप्टर - धूर्त / आतल्या गाठीचा
मुसडं - तोंड (मुसडं ठेसू का असं आजी म्हणायची)
बेणं - मुलगा (त्याआधी एखादं विशेषण लागतं)

पाटपलान शब्द नव्याने कळाला.

कत्ती - लांब पण फक्त टोकाला धार असणारा कोयता
वाफसा - पावसानंतर थोडी सुकून काम करण्यायोग्य होण्याची जमिनीची अवस्था.
पहाळी - पावसाची सर
निढळ - कपाळ
कुचीर - काम टाळणारा. अंकुरीत न होणारे बी.
हाट - बाजार
पायताण - चप्पल

Pages