पाटील v/s पाटील - भाग १४

Submitted by अज्ञातवासी on 25 January, 2019 - 12:38

पाटील v/s पाटील - भाग १३

https://www.maayboli.com/node/68848

मीना आणि मोहन, दोन्ही तासभर बोलत होते.
"तू बाबांना इतक्यांदा वाचवलंस, त्यांना तिकीट मिळवून दिलंस, काढ ना काहीतरी मार्ग!"
"काढतो, आणि तोही पाटील म्हटल्यावर, हरकत नसावी."
"सगळं चांगलंय रे, पण गरिबी आहे बिचाऱ्याची. चांगला शिकलाय, पण नोकरी नाही. नोकरीला लागला ना, चुटकीसरशी सगळं नीट होईल, पण... "
"पण काय मिनेताई."
"आबांना धीर नाही धरवणार. उद्याच मोठ्या काकांच्या कुणी मित्राचा मुलगा बघायला येतोय, आला आणि मला पसंत केलं, तर मला नाही म्हणायला जड जाईल रे."
"गप ग मिनेताई, असं काही नाही होणार, तुला कोण पसंत करेल? सोनी असती तर गोष्ट..." आणि एवढं बोलून मोहनने जिभ चावली.
"बोल,बोल ऐकू दे मला. ती सोनी, पावलोपावली तुझा अपमान करते, आणि तुला तिच्याच कौतुकाच्या गोष्टी सुचतात."
"सॉरी मिनेताई, पण आय प्रॉमिस. मी नक्की मदत करेन."
"तू खूप छान आहेस."
"माहितीये मला."
संध्याकाळी कामे पटकन आवरून मोहन निघाला.
बाहेर अण्णा कृष्णरावांशी बोलत होते.
"काय मग किसनराव, काही विडी, सिगारेटच व्यसन?"
"नाही हो विडी सिगारेट कसलं? हा कधीमधी सिगार...म्हणजे कधीमधी सिगारेट प्यायची इच्छा होते, पण तरीही नाही घेत."
"वा, आम्हीही पूर्ण निर्व्यसनी आहोत."
"आबा, मी आणि मोहन जरा बाहेर जाऊन येतो." मिने चाचरत म्हणाली.
"मोहनला का घेऊन चाललीस?"
"उद्या कॉलेजला प्रेझेन्टेशन आहे, यांचा मास्तरांनी गट बनवलाय, तर म्हटलं, जरा मदत करावी."
"कुठलं प्रेझेन्टेशन ग मिने?"
"मालक," कृष्णराव मध्येच म्हणाले, "इलेक्शन आणि पोराचा परीक्षेचा अभ्यास, निकालाच्या दिवशीच पहावा, त्यापूर्वी उगाच धांदल करू नये, आपल्याला काय उमजतय?"
"किसनराव, बरोबर बोललात. जा पोरांनो, किसनरावांना सोबत घेऊन जा."
"अण्णा, इतके दिवस मीच तर गाडी चालवायचो, आताही मीच चालवतो."
किसनरावानी मोहनच्या हातात चावी दिली, मोहनने आणि मिनेने घाईघाईत पळ काढला...
"मीनेताई, कुठे जायचं?"
"दिनकर पाटील महाविद्यालय, लायब्ररी."
मोहनने लायब्ररीसमोर गाडी लावली.
मोहन लायब्ररीत घुसला.
"इथे तर कुणीच..."
"शुक... हळू... लायब्ररी आहे ही."
मिने थोडस मध्ये चालत गेली.
मोहन इकडेतिकडे बघू लागला. एक पुस्तक उघडून त्याची पाने चाळू लागला.
'कविवर्य कुसुमाग्रज'
तेवढ्यात मिनेने पुस्तक ओढलं, आणि लाजत म्हणाली.
"मोहन हा प्रकाश..."
"बरं" मोहन म्हणाला.
"आता तुम्ही बाहेर जा, याच्याशी मला एकांतात बोलायचंय."
"ओके..."
"तर प्रकाश, काय शिकलात तुम्ही?"
"बी ई, मेक. एम बी ए इन ऑपरेशन मॅनेजमेंट..."
"वा वा, एम बी ए झालेले लोक आवडतात मला. बरं, अण्णा पाटील, अंबा पाटील, यांना ओळखता का?"
"हो!"
"मग तरीही मिनेवर प्रेम केलं?"
"असं आजी, बाप बघून प्रेम होतं का मोहनराव?" प्रकाश शांतपणे म्हणाला.
मोहन चमकला.
प्रकाशच्या चेहरयावर हसू होतं.
"पाच वर्षांचा होतो, तेव्हा एका अपघातात माझे आई वडील वारले. काकांनी सगळं बळकावून, माझी रवानगी अनाथ आश्रमात केली. लहानापासून प्रेम काय आहे, हे कळलंच नाही. जेव्हा मिने आली, तेव्हाही नाही कळलं, पण तिच्याबरोबर वेळ घालवला ना, तेव्हा कळलं, प्रेम काय असतं."
"बरं, आता कसकाय चालतय तुझं?"
"काका पाठवतो थोडे पैसे महिन्याला, इस्टेटवर हक्क सांगू नये म्हणून. मी MPSC ची तयारी करतोय. पार्ट टाइम टिचिंग करून पैसे मिळवतो."
"तुझा CV देऊन ठेव मला, एखादा चांगला जॉब शोधतो. काकाला सांग, इस्टेट कायम ठेव तुझ्याजवळ, पण माझ्या लग्नाची बोलणी करण्यापर्यंत मला मालक म्हणून राहू दे."
"नाही ऐकणार तो!"
"ऐकावं लागेल," मोहनच्या आवाजात जरब होती...
"ऐकला नाही, तर त्याचं खानदान अनाथ होईल. मिनेताई..."
मिने आत आली.
"झालंय माझं बोलून. तुम्हीही घ्या, काही राहिलं असलं तर. पण लवकर बाहेर या, मी वाट बघतोय."मोहन तडक बाहेर गेला.
"मिने, मला तुला एक प्रश्न विचारायचाय, विचारू?" प्रकाश म्हणाला.
"विचार ना," मिने लाजत म्हणाली.
"हा खरंच तुझा ड्रायवर होता?????"
मोहन आणि मीना, घराकडे निघाले.
"मग कसा वाटला प्रकाश?"
"चांगलाय, त्याचा CV घेऊन प्रेझेन्टेशन द्यावं लागेल. मिळेल जॉब?"
"मोहन, खरं सांगतोस? आहे एखादं ठिकाण?"
"हो!
"सांग ना मला!"
"पाटील स्टील!!!"
दुसऱ्या दिवशी सकाळी, नास्ता करताना मोहनने व्यासला सूचना दिल्या.
"व्यास, त्याला एखादी चांगली पोजिशन द्या. चांगली म्हणजे, टॉप मॅनेजमेंट मध्ये नको, पण सरळ ब्लु कॉलरही नको."
"डेप्युटी मॅनेजर चालेल सर?"
"असिस्टंट मॅनेजर, तो माणूस आहेच या पोस्टच्या लायक."
"ओके सर."
"बाबा, अण्णा पाटलांच्या घरात लवकरच सनई वाजणार असं दिसतंय..."
"मोहन, काल तू बाहेर गेल्यावर शाम आला होता."
"कोण?"
"अण्णाचा मोठा भाऊ, शामराव. मोहन बापाचा निचपणा आणि आईचा छद्मीपणा, शाम त्याचं बेस्ट मिश्रण."
"बऱ्याचदा ऐकलं होतं मी, पण काल नाही बघता आलं."
"अरे जिल्ह्याला राहतो ना तो, म्हणून नसेल बघता आलं. आणि आज मिनेला बघायला पाहुणे येतायेत, शामचेच मित्र आहेत."
मोहनने दोन्ही हात घडी घालून टेबलावर डोकं ठेवलं.
थोड्यावेळाने तो उठला, आणि कृष्णरावांना म्हणाला.
"चला निघुयात..."
पाटलांच्या घरी आज लगबग सुरू होती. किसनराव पाहुण्यांना घ्यायला गाडी घेऊन गेले होते.
"मोहन,".मिने मोहनजवळ आली. "मला भीती वाटतेय रे."
"काळजी नको. प्रकाशला जॉब मिळालाय, उद्या न्यूज कळेल त्याला. आजचा दिवस पार पाडा."
"कसं रे?"
"जेव्हा तुम्हाला एकांतात बोलायला वेळ मिळेल, तेव्हा मुलाला सगळं सांगा, आणि नापसंत करायला लावा."
"अरे काहीही काय बोलतोय?"
"पर्याय नाहीये मिनेताई, पर्याय नाहीये, आजचा दिवस महत्वाचा आहे, आणि आता सगळं तुमच्या हातात आहे."
तेवढ्यात बारा तेरा गाड्या वाड्यासमोर येऊन थांबल्या...
अण्णा घाईघाईने बाहेर आले.
"दादा," अण्णानी शामरावाची गळाभेट घेतली.
"अण्णा, मोठा हो. आणि हे, आमचे मित्र, शिक्षणसम्राट काकासाहेब मोरे..."
काकासाहेब गाडीतून खाली उतरले.
"आणि यांचे पुत्र, सर्वेश मोरे..."
अणांनी सगळ्यांना नमस्कार केला.
बोलणी सुरू झाली, मिने आणि सर्वेश एकांतात बोलायला गेले.
थोड्या वेळाने दोघे बाहेर आले.
आणि सर्वेश म्हणाला...
"मला मुलगी पसंत आहे!!!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users