माझी व्हिएन्ना यात्रा - सिंहावलोकन - ४

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भाग १ : http://www.maayboli.com/node/6559
भाग २ : http://www.maayboli.com/node/6789
भाग ३ : http://www.maayboli.com/node/6790
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तर व्हायोलिन ची एक हलकी धून छेडली गेली (किंवा एक लकेर उमटली :)) आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या नंतर मात्र पूर्ण ऑपेरा संपेपर्यंत कोणीही अजिबात आवाज केला नाही.

opera_poster.jpg

ऑपेरा चं नाव होतं फॉलस्टाफ. थोडक्यात कथा अशी होती..

opera_opening.jpg

जॉन फॉलस्टाफ हा एक ढेरपोट्या आणि लफंगा माणूस असतो. ढेरपोट्या हे महत्वाचे आहे कारण ते तो सारखे स्वतःचे वर्णन करायला वापरतो Happy तो जमीनीखालच्या एका अतिशय बकाल, बंकर सारख्या जागेत रहात असतो. त्याचा धंदा म्हणजे बायकांशी प्रेमाचे नाटक करणे, त्यांना फ़सवणे, आणि पैसे उकळणे. त्याच्याकडे २-३ भुरटे चोर इन्टर्नशिप वर आहेत. ते पाकिटमारी.. माफ करा... बटवामारी सारखे क्षुल्लक धंदे करुन पैसे कमावतात.

Falstaff in his bunker

अशीच एकदा पैशाची तंगी असताना तो शहरातल्या दोन प्रतिष्ठित बायकांकडून पैसे उकळायचे ठरवतो कारण त्याच्या मते त्या बायकांच्या हातात घरातल्या तिजोर्‍यांच्या चाव्या असतात. (त्यांच्या हातात नाड्या असतात असं म्हणणं कदाचित जास्त बरोबर असेल पण पैसे आणि त्यांच्या नाड्या हे काही जमले नाही Happy ) तर त्यांच्या (त्यांच्या) घरात त्या दोन बायका पैशांवर ताबा ठेवतात. (इथे हे 'त्या दोन बायका' असं म्हणून स्कोप लिमिटेड का केलाय कळलं नाही... उगाच understatement करतात Wink )

या बायकांना फसवायचे ठरवल्यावर तो त्यांना प्रेमपत्र लिहीतो. तो त्यांच्यावाचून कसा जगू शकत नाही हे त्यांना समजावून देतो. आणि मग त्या इन्टर्न चोरांना ती पत्रे नेऊन द्यायला सांगतो. पण त्यांना ते पटत नाही. शेवटी तो तिसर्‍याच माणसाला पकडून ती दोन्ही पत्रे पाठवून देतो. आणि या हाताखालच्या ठगांना हाकलून देतो.

Megan and Alice (alone in front)

या दोघी स्त्रिया (अ‍ॅलीस आणि मेगन) मैत्रीणी असतात आणि एकमेकांना या पत्राबद्दल सांगतात. किंबहुना अगदी कुतुहलाने एकमेकींना आलेले पत्र वाचतात. दोघींना एकाच मजकुराचे पत्र आले आहे हे त्यांना लक्षात येते आणि त्यांना जॉन चा संताप येतो. तो आपल्या बरोबर प्रेमाचं नाटक करुन फसवण्याचा प्रयत्न करतोय हे ही त्यांना कळतं. त्या त्याला धडा शिकवायचा ठरवतात. अ‍ॅलीस ची मुलगी नॅनेटा आणि त्यांची अजून एक मैत्रीण क्विकली यांची पण त्या मदत घेतात.

Quickly and Falstaff

ही क्विकली, जॉन कडे जाऊन मी दोघींकडून पत्राचे व त्याच्या प्रेमाच्या प्रकटीकरणाचे सकारात्मक उत्तर आणले आहे असे सांगते. शिवाय, अ‍ॅलीस ने बागेत प्रेमकूजन करायला बोलावले आहे असेही सांगते. जॉन प्रचंड खुश होतो. तो रस्त्यावरुन जात असताना त्याच्या भल्या मोठ्या पोटाकडे बघून या बायका मोह कसा आवरूरूशकत नाहीत हे सांगताना रंगून जातो. तो अ‍ॅलीस चा जन्मोजन्मीचा प्रेमी आहे (बॉलीवूड इफेक्ट ??) असे पण त्याच्या मनात येऊन जाते. शेवटी तो अ‍ॅलीस ने सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या वेळी यायचे कबूल करतो.

इकडे त्याने हाकलून दिलेले दोन्ही ठग अ‍ॅलीस च्या नवर्‍याकडे जाऊन त्याला हा प्रकार सांगतात. तो रागावतो आणि तो सुद्धा जॉन ला धडा शिकवण्यासाठी वेषांतर करुन त्याच्या घरी येतो. आपल्याला अ‍ॅलीस आवडते, जॉन ने तिचं मन वळवावं आणि ती आपल्याला मिळवून द्यावी याठी तो जॉन ला पैसे पण देऊ करतो. जॉन, त्या बदल्यात त्याला अ‍ॅलीस मिळवून देण्याचं कबूल करतो. वर अ‍ॅलीस चा नवरा कसा मूर्ख आहे, तिच्यासाठी कसा पुरेसा नाही आणि म्हणून ती त्याच्यासारख्या (जॉनसारख्या) मर्दाकडे आकृष्ट झाली आहे असं वेष बदललेल्या तिच्या नवर्‍यालाच सांगतो. अर्थातच, तिच्या नवर्‍याचा जॉन ला धडा शिकवण्याचा इरादा अजून पक्का होतो.

ठरल्याप्रमाणे, जॉन अ‍ॅलीस ला भेटायला बागेत जातो. मेगन, अ‍ॅलीस ची मुलगी - नॅनेटा आणि ती मैत्रीण या सगळ्या लपून हे बघत असतात. अ‍ॅलीस जॉन च्या प्रेमात आकंठ बुडल्याचं नाटक करत असताना (इथे आपला हिंदी पिक्चर बघितल्यासारखं वाटतं..) तिचा नवरा काही लोकांना घेऊन जॉन च्या शोधात येतो. त्याला अचानक आलेला पाहून या सगळ्या जणी पळण्याची तयारी करतात. त्यातच नॅनेटा आणि तिचा प्रियकर (यांची जोडी एक अफलातून होती, ती होती चवळीची शेंग, आणि तो होता दुधीभोपळा) तिच्या वडिलांना दिसू नये म्हणून आडोशाला लपतात. सगळे जण जॉन समजून त्यांनाच पकडतात आणि एवढ्या गोंधळात या बायका जॉन ला धुण्याच्या बास्केट मध्ये टाकून सांडपाण्याच्या नाल्यात ढकलून देतात.

John and Alice

हे झालं तरी या सगळ्या गोंधळामुळे जॉनला चांगली अद्दल घडवता आली नाही म्हणून या बायका हळहळत असतात. त्यांची मैत्रीण क्विकली परत एकदा जॉन कडे येऊन तिची मैत्रीण या सगळ्या प्रकारात कशी निर्दोष आहे आणि ती कशी जॉन वर प्रेम करते ते सांगते. त्यांची आधीची भेट अर्धवट राहिल्याने ती कशी पुन्हा भेटायला आतुर आहे हे ही परत परत सांगते. जॉन तिच्यापुढे पाघळतो आणि (नुकतीच झालेली सांडपाण्याची आंघोळ विसरून) परत एकदा भेटीला तयार होतो. यावेळी त्याला मध्यरात्री जंगलात बोलावतात. पण त्याने येताना डोक्यावर खुणेसाठी शिंगे लावली पाहिजेत असं सांगतात. काहीही करुन यावेळी जॉनला वठणीवर आणायचेच असा सगळ्यांचा निर्धार झालेला असतो. त्यातच नॅनेटाचे वडिल तिचं लग्न त्यांच्या ओळखीच्या डॉक्टर शी लावायचं ठरवतात.

opera5.jpg

जॉन डोक्यावर शिंगे असलेला मुकुट घालून सांगितलेल्या ठिकाणी येतो. नॅनेटा परीचे आणि इतर लोक सैतानाचे वेष घेऊन येतात, जॉन ला दोरीने बांधतात. त्याचा उपहास करतात. त्याला काय चाललंय हेच कळत नसतं.. पण एवढ्या सगळ्या घोळात, एका सैतानाचा मुखवटा गळून पडतो (तो असतो त्याचा इन्टर्न चोर) आणि त्याला कळतं की त्याला सगळ्यांनी मिळून फसवलंय. नॅनेटा या गोंधळाचा फायदा घेऊन आपलं लग्न आपल्या प्रियकराबरोबरच होईल हे बघते...

opera6.jpg

सरते शेवटी जॉन ला त्याच्या वागण्याचा पश्चात्ताप होतो. तो पुन्हा असे न वागण्याचे ठरवतो. आणि मग आनंदी आनंद होऊन पडदा पडतो. The opera closes with Falstaff's words "Tutto nel mondo è burla" (Everything in the world is a joke.)

तर... अशी सगळी कथा माझ्यासमोर उलगडत असताना, किमान पहिल्या अंकाच्या वेळी तरी माझी शेजारीण माझ्यासारखीच पुढच्या कट्ट्यावर झुकून बघत होती. म्हणजे खरं तर पूर्ण सभागृहात ज्यांना पुढे आधाराला कठडा होता ते सर्व प्रेक्षक त्या कठड्यावर झुकून ऑपेरा बघत होते. तेवढाच जवळ गेल्याचा फील येत असावा. ज्यांना मागच्या रांगेत जागा होत्या ते प्रेक्षक ही त्यांच्या समोरच्या कट्ट्यावर झुकतच होते, पण पहिल्या रांगेतल्यांची ऐट काही औरच Wink थोड्या वेळाने मला अचानक असे जाणवले की शेजारी खूप जागा दिसते आहे. बघितले तर काय... सुकन्या छानपैकी खुर्चीला मागे टेकून झोपली होती. Sad लोक एवढे पैसे घालवून झोपायला येथे येतात ? दिवसभर खूप काम झाले असेल, काल रात्री नीट झोप झाली नसेल, झोपायला शांतता मिळेल असं ठिकाण शोधता शोधता ती येथे पोहोचली असेल वगैरे सर्व तर्कवितर्क करुन झाले पण तरीही झोप ???? मला एवढाच वेळ हे बघायला मिळणार आहे याची चिंता होती, खेद होता आणि ही झोपली होती हो... माझा अगदी सात्विक सात्विक म्हणतात ना तसा संताप झाला.. (पण माझ्या संतापाला कोण विचारतो.. आणि ते पण जर्मन मधून.. जाऊद्या..) तर ती झोपली होती, तिची दुर्बिण तशीच समोर वाळीत टाकल्यासारखी पडली होती. मग मी हळूच त्यातून कसे दिसते ते पाहून घेतले. आता दुर्बिणीतून कसे दिसते ते मला माहिती होते आणि आहे, पण (मौका भी है, दस्तुर भी है... च्या तालावर) दुर्बिण होती, वापरात नव्हती, मालकीण झोपली होती, म्हणून (दुर्बिण) डोळ्यांना लावून बघितली एवढंच..ऑपेरा संपल्यावर शेजारणीला तसे सांगितले पण... म्हणजे ते दस्तुर चे नव्हे, दुर्बिणीला हात लावला ते..

ते वरती म्हणालो ना की ऑपेरा संपेपर्यंत कोणीही आवाज केला नाही, ते अशा प्रकारे सुद्धा खरे ठरले.. आता झोपलेली माणसे आवाज तरी कशी करणार म्हणा..

त्या अजून २ घरे पलिकडे असलेल्या प्याद्याने उर्फ़ त्या विद्यार्थिनीने हा ऑपेरा कदाचित आधी पाहिला होता किंवा ती त्याचा अभ्यास करुन आली होती... थोड्या थोड्या वेळाने पुढे काय होणार असेल याचे अचूक अंदाज बांधत होती. हे सगळे अंदाज न चुकता शेजारी असलेल्या घोड्याला उर्फ़ मुलाला समजलेच पाहिजेत अन्यथा त्याचे पैसे वाया जातील अशा सिन्सीअरीटी ने समजावत होती. मला ऐकू येतंय पण सुदैवाने मला इंग्लिश वाचता येतं त्यामुळे मला जरूर नाही आणि ज्याला वाचता येत नाहीये त्याला कळतही नाहीये तेव्हा त्यालाही तशी जरूर नाहीये असं एकदाच तिला खडसावून सांगावं असं वाटलं पण मला.. पण काय करणार हो, एकतर परक्या देशात, सामायिक भाषेचा प्रश्न, त्यातून समोर एक स्त्री.. उगाच लोकांना अजून एक लोकनाट्य बघावं लागलं असतं. एकूण सगळीच गैरसोय होउ शकते असं लक्षात येऊन मी तसे करण्याचे टाळले. Happy

पूर्ण वेळ, समोर जसा रागरंग बदलेल तसा तसा संगीत दिग्दर्शकाच्या हातातला बाण हलत होता.. कधी कधी जोरात, कधी हळू, कधी एकावेळी एक पाऊल टाकत तर कधी उड्या मारत स्वर चढत होते. कधी एकावेळी एक मोरपिस हळूच गुदगुल्या करुन जाते आहे असे वाटे तर कधी अख्खा गुलमोहोर सर्व फुलांचा एकाचवेळी वर्षाव करतोय असं वाटायला लावत पूर्ण वाद्यवृंद सूरात येत होता. अंगावर रोमांच उठतात असं पुस्तकांत वाचलं होतं, ते कसे ते येथे अनुभवलं.. Pretty Woman मध्ये ज्युलिया रॉबर्ट्स ऑपेरा बघताना का रडली असेल याचा विचार करावाच लागला नाही इतक्या सहज तो अनुभव प्रत्ययास येत होता. एक व्हायोलिन जेथे अख्ख्या सभागृहाला मंत्रमुग्ध करुन टाकत होतं, तेथे वीस व्हायोलिन एकावेळी एक स्वर आळवताना काय होत असेल याची कल्पना दूरदर्शन वर हे ऐकून येणं शक्यच नाही. मुळात विनोदी कथेला जोड देताना अशा highest notes वर जायची जरूर भासेल असं वाटलं नव्हतं, पण ते ऐकल्यावर, तसं झालं नसतं तर मी बरंच काही miss केलं असतं याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. शेवटी शेवटी तर कथेत पुढे काय होणार हे साधारण कळल्यावर तर नाट्याकडे थोडे दुर्लक्ष करुन, मी प्राण कानात आणून फक्त ऐकत होतो. हे सर्व अनुभवण्यासाठी आयुष्यात एकदा तरी ऑपेरा बघावाच अशी मी नक्कीच शिफारस करेन.

मला अगदीच राहवलं नाही तेथे मात्र मी २०-२० सेकंदांचं ध्वनीमुद्रण करुन घेतलं Happy

operacast.jpg

पडदा पडल्यावर नेहमीचा प्रेक्षकांना अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. प्रथम एक एक पात्र, मग पूर्ण चमू, मग जोडी जोडी आणि मग एकटा संगीत दिग्दर्शक, असे येऊन नमस्कार करुन गेले. हा सगळा वेळ आम्ही न कंटाळता टाळ्या वाजवत होतो. एक दोघांनी शिट्ट्या पण मारल्या. सर्वात मागे असलेले ते उभे प्रेक्षक अजून तेथेच होते. पुढच्या वेळी जरूर पडली तर असा उभं राहून ऑपेरा पाहायला मी दोन पायांवर तयार आहे.

कसं असतं बघा.. कोणत्याही किंमतीचे तिकिट घेतलेला प्रेक्षक असूदे, जातिवंत प्रेक्षक अस्सल कलावंताला दाद सारखीच देतो. कडक इस्त्रीचे कोट आणि झुळझुळते ड्रेस घातलेल्या लोकांकडून इतकी उस्फुर्त दाद मिळेल अशी अपेक्षा ही कोणी केली नसेल. मी तर नक्कीच केली नव्हती. पण या सुखद अपेक्षाभंगामुळे बरे वाटले.

ऑपेरा संपला आणि सगळे लोक बाहेर पडले. मी तेथेच थांबून एक फोटो मात्र काढून घेतला.. शेवटी पटेल पॉइंट ला गेलो होतो याचा पुरावा तर पाहिजे ना.. बाहेर आलो. छान हवा होती. मग त्या मध्यवर्ती रस्त्यावरुन एक चक्कर मारल्या शिवाय परत जायचे नाही असे ठरवून निघालो.

रात्रीचे साधारण ११ वाजले होते. रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. साहजिकच होतं. आधीच शुक्रवार रात्र आणि त्यात हवा कधी नव्हे ती बरी होती.. बहुतांशी दुकाने बंद झाली होती पण छोटी souvenir ची दुकाने आणि खाण्याची ठिकाणे (यात पेयपानाची ठिकाणे पण आली) मात्र अजुनही भरलेली होती. भर चौकात २-३ ठिकाणी पथार्‍या टाकून लोक चित्रे काढत होते. या कलाकारांची एकाग्रता वाखाणण्यासारखी होती. आजुबाजुला एवढे लोक नको तितकी बडबड करत असताना, नीट लक्ष देऊन आणि वेग कमी होऊ न देता ते भराभर चित्रे काढत होते. रंगाचा फवारा (म्हणजे स्प्रे बरं का..) आणि फवारलेला रंग विस्कटायला कागद एवढ्या सामग्रीवर ही चित्रे आकारास येत होती. लगेच मी पण तशा एकाचे (छाया)चित्र काढले Happy

painter in work 1painter in work 2painting 1painting 2

रस्त्यातच एका ठिकाणी एक छोटे खोपट टाकून एक माणूस काहीतरी विकत होता. भोवती खूप गर्दी होती. काय आहे ते उत्सुकतेने बघायला गेलो तर ती बेक्ड बटाटा भजी निघाली. अर्थातच ते त्याला भजी म्हणत नाहीत पण तसाच पदार्थ होता. खाण्याची गोष्ट समोर दिसत असताना न खाता परत येण्यासारखे पाप माझ्या हातून घडू नये म्हणून मग मी पण ते घेऊन खाल्ले. एव्हाना मला कडकडून भूक लागली होती, जेवायचे होतेच. तेव्हा परत एकदा काय खायचे आणि काय काय घटक घेऊन खायचे याचा विचार करत मी परत फिरलो.

क्रमशः ..

लिहायला खूप वेळ घेतला याबद्दल क्षमस्व. आणि मी लिहावं म्हणून मागे लागणार्‍या सर्वांचे आभार ! Happy

आवडलं वर्णन!!!
ऑपेरा पाहायची उत्सुकता वाटायला लागली आता..

सुरेख वर्णन. ऑपेरा बघायची इच्छा होते आहे! ते स्प्रे पेंटिंग्स पण मस्त!

मस्तच लिहीलाय हा भाग पण. फोटो पण छान आलेत.

ध्वनीमुद्रणाच्या क्लिप्स टाकु शलास तर बघ. ऐकायला आवडेल.

छान लिहीलय.
ऑपेराच्या सगळ्या फोटोतले लोक एकदम हेन्स अँडरसनच्या गोष्टीतल्या थंबलिनासारखे छोटे वाटतात Happy

छान लिहिलंय... मजा आली वाचायला... Happy

मस्त लिहिलय अन फोटोसकट म्हणून जास्तच आवडले. Happy जमेल तेव्हा ध्वनिमुद्रण टाका, आवडेल ऐकायला.. Happy

हा भागही आवडला. फोटोंसकट वर्णन वाचताना मजा आली.

छानच लिहिलंय.... मिल्या, शॉनब्रन पॅलेस्-मोझार्ट्-स्ट्रडेल (हा शब्द नीट लिहिता येत नाहिये) यावर पण लिहि की!

ते रेकॉर्डिंग इथे कसे टाकायचे याबद्दल तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. बघतो, कसे करायचे ते.
भाग्य, अजून लिखाण चालू आहे, बघुया काय काय जमतं ते..

मस्तच! मीपण फिरतेय तुझ्याबरोबर. आणि खाली क्रमशः वाचून बरं वाटलं... नाहीतर वाचून संपेपर्यंत आता इथे थांबतोयस का काय असं सारखं धास्तावायला होतं! केवळ मनसोक्त भटकणे या हेतूने काहीही न ठरवता समोर दिसेल त्या गाडीत शिरून माहीत नसलेल्या वाटेवरचा माहीत नसलेल्या गावाचा प्रवास सुरू झाल्यावर प्रत्येक थांब्यानंतर गाडी अजुन पुढे जाणार आहे आणि आपल्याला आणखीन फिरायला मिळणार आहे याचा होतो तस्सा आनंद झाला... कंडक्टरनं उतरा, लास्ट स्टॉप अशी आरोळी देऊच नये असं वाटतं. हा आनंद वेगळाच.. अनिश्चित. स्वतःच्या गाडीतून फिरताना मिळत नाही.. कितीही छान पुस्तक हातात असताना अजुन थोडेच उरलेय.. ती हूरहूर वगैरे.. ते सगळं माहिती असतं.. वगैरे वगैरे वगैरे! असो.

मस्तच.
प्रत्येक भागाखाली क्रमशः .. असच येत राहो.

हा भाग पण आवडला. फोटो, वर्णन, चित्रं सगळच सुंदर! पुढचा भाग लवकर पाठवा.