मला काहीच आठवत नाहीये भाग ४ - भेट!

Submitted by अज्ञातवासी on 1 January, 2019 - 13:12

भाग १
https://www.maayboli.com/node/68392

भाग २
https://www.maayboli.com/node/68439

भाग ३
https://www.maayboli.com/node/68477

"मने आता बरी आहेस ना?"
मी शुद्धीवर आले, आई बाबा माझ्या जवळ उभे होते.
...आणि तो दूरवर माझ्यापासून लांब उभा होता.
त्याला पाठमोर पाहताच मला कुणीतरी कुठेतरी ओढून नेतय असा भास व्हायला लागला. मला अक्षरशः ओरडावस वाटत होतं, त्याला सांगावस वाटत होतं. दूर निघून जा.
तो माझ्याजवळ आला, मी अस्पष्टपणे त्याला बघितलं.
उंचापुरा, धष्टपुष्ट, गव्हाळ वर्ण, गोल चेहरा, लांब नाक... मी याला कुठेही बघितलं नाही, पण का हा मला ओळखीचा वाटतोय.
"बरं वाटतय आता?" त्याने मला विचारलं.
न जाणे का हा आवाज मला खूप ओळखीचा वाटला, पण हा मला दुसऱ्याच जगात नेतोय असं वाटलं...
"मने हे जमदग्नी, तू बेशुद्ध पडलीस ना, सगळे यांच्या नाटकात इतके रमून गेले होते, की कुणाचंही तुझ्याकडे लक्ष नव्हतं. मात्र हे नाटक सोडून तुझ्याजवळ आले, आणि तुला यांच्या गाडीतून घरी आणलं."
"नमस्कार, मी कुमार..."
बाबा अक्षरशः अचंबित होऊन जागीच उभे राहिले....
"चला मी निघतो, पुढच्या शोची तयारी करायचीय."
बाबांनी हलकेच हात हलवला. अजूनही ते धक्क्यात होते.
तो थोडासा पुढे गेला, आणि वळून म्हणाला.
"इथल्या प्रचंड प्रतिसादाने आम्ही अजून १५ दिवस इथे मुक्काम वाढवलाय... यांच्या बेशुद्धीमुळे तुम्हाला नाटक अर्ध्यावर सोडावं लागलं...
...म्हणून मी इथे शनिवारी रात्रीच्या शोच्या विशेष निमंत्रितांच्या रांगेचे चार पास इथे ठेवतोय. भेटुयात."
तो सगळयांना नमस्कार करून निघूनही गेला.
आणि सोबत मला ओढणारी ऊर्जाही...
"मने, माझ्या डोळ्याला डोळा नाही ग. कशी बेशुद्ध पडलीस? आता लवकर बरी हो."
माझं लक्ष त्या पासेसवर होतं
"आई आपण तीन, मग पासेस चार का?"
"म्हणजे तुझं अजूनही माझ्याकडे लक्ष नाही?"
अरेच्या, ही मला कशी दिसली नाही.
"तुझं अंग गरम म्हणून दोन तासापासून चंदन उगळतेय मी, आणि तू, कृतघ्न, तू माझ्याकडे बघतही नाहीस!"
आयुषी! तिला बघून मला इतकं बरं वाटलं!
मी अंथरून फेकलं, तिच्याकडे गेले, आणि तिला करकचून मिठी मारली.
"चल नाटकी, मी तुला माफ केलं." ती म्हणाली.
माझं बेशुद्ध होणं हा घरात चर्चेचा विषय होता. बऱ्याच मुलांचे आई बाबा मला भेटून गेले होते. आयुषीचे बाबा ही भेटायला आले होते... जाताना त्यांचं पासवर लक्ष गेलं.
"देवशपथ! तुम्हाला हे पासेस कुठे मिळाले?" त्यांनी बाबांना विचारलं.
"जमदग्नीने दिले..." बाबा दचकून म्हणाले.
"अहो जमदग्नी हे पास फक्त खूप जवळच्याना देतो. मोठमोठे निमंत्रित या पासेससाठी झगडतात... असे किती पास आहेत?"
चार...
"हे तिघे आणि मी चार," आयुषी अभिमानाने म्हणाली.
"पोरी, इतक्या कमी वयात बापालाही मागे टाकलस ग!" ते भावविवश होत म्हणाले...
त्यांच्याकडे पास नसल्याची निराशा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
"तुम्ही माझ्याऐवजी जाल?" मी त्यांना म्हणाले.
त्यांनी चमकून माझ्याकडे बघितलं.
"म्हणजे मलाही आरामाची गरज आहे, सलग चार पाच तास ताण येईल मला खूप. तुम्ही जाल?"
त्यांनी उड्या मारतच संमती दिली. "नक्की..."
"आणि हो, एक गंमत सांगू का माणिकराव?" बाबा म्हणाले.
"काय हो?"
"तुम्ही एवढे नाटकवेडे, मग सांगा, जमदग्नीच खरं नाव काय?"
"विनायकराव काय थट्टा लावलीये, साक्षात नाट्यदैवतेचा पुत्र तो, कुणाला त्याचं नाव माहितीये का... मोठमोठे पत्रकार हरलेत, आणि तुम्ही मला विचारतायेत!"
"मग ऐका, त्याचं खरं नाव त्याने इथे माझ्या घरी येऊन सांगितलंय"
आयुषीचे बाबा आता फक्त चक्कर येऊन पडायचे बाकी होते!
"आणि हेही सांगितलं की कुणाला सांगायचं नाही म्हणून," बाबा मिश्किल हसत म्हणाले.
"कुमार नाव आहे त्याचं. मीही इथे होते विसरलात वाटतं"... आयुषी म्हणाली.
आता तर तिच्या बाबांनी तिला इतकं घट्ट कवटाळले, की तिचा श्वास कोंडला गेला.
"सोडा मला", एवढंच ती बोलू शकली.
शनिवार उगवला. चौघे नाटकाला गेले.
परत आल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद लपत नव्हता.
"विनायकराव, नशीब काढलंत हो. साक्षात जमदग्नी तुमच्या घरी येऊन गेला."
जेवतांना आई बाबांचा नाटक हाच विषय होता.
जेवता जेवता आई म्हणाली.
"मने तू नाटकाला का आली नाहीस असं जमदग्नी विचारत होता तुझ्याबद्दल!"
का मला ओढतोय तो जाळ्यात, नाही जायचंय मला!
"मग तू काय सांगितलस"
"मी म्हटलं तुझी तब्येत बरी नाही, म्हणून तू आली नाहीस."
"मग?"
"मग काय, बिचारा चिंताक्रांत झाला. म्हणाला उद्या सकाळी येतो तुला बघायला. प्रेमाबीमात पडला की काय तुझ्या!" आई मिश्किल हसत म्हणाली.
आता हे सहनशक्तीपलीकडे होतं.
"आई तुम्हाला मी जड झाले असेन तर सांगा, मी जाईन कुठेही राहायला. पण त्या नाटक्याबरोबर माझं नातं जोडू नका."
"अग शांत हो, विनोद करतेय ती," बाबा चमकून म्हणाले...
थोडा वेळ शांततेत गेला, असह्य शांततेत....
"मने, ऐकशील?" आई म्हणाली
"हं..."
"तो कोण आहे, हे तुला माहिती नसेल, म्हणून तू असं बोलतेय. तो नाटक्या नाही, तर लोक त्याला नटसम्राट म्हणतात. हातावर पोट घेऊन फिरणारा भिकारी नाहीये तो, पण स्वतःच राज्य विसरलेला राजा आहे. त्यालाही वयाच्या नवव्या वर्षाआधीच काही आठवत नाही. गुलाम कुसुणुस यांचा एकटा वारस आहे तो. स्वतःच्या बळावर पैशाच्या राशी उभ्या केल्यात त्याने...
...अनेक वर्षे परीचारिकेची नोकरी केलीये मी. अनेक पुरुष दिसलेत. पुरुषाची नजर आणि चाल एका क्षणात ओळखते, आणि सांगते, तो तसला पुरुष नाही."
आई बाबांकडे वळून म्हणाली.
"जेवण झाल्यावर कुमारच्या मॅनेजरकडे जा, आणि सांगा त्याला, उद्या आपल्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून."
"हं..."बाबा उद्गारले.
आईने माझं बळच काढून घेतलं होतं.
मी निर्धार केला, आणि पुढचे शब्द उच्चारले,
"मी भेटेन त्याला!!!!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@उमाणु - मी मोबाईलवर टाईप करत असल्यानं जरा लहान भाग होतायेत.
पुढील भाग मोठा टाकण्याचा प्रयत्न करेन
धन्यवाद!

@ कोमल धन्यवाद
@ गुगु, धन्यवाद, यु अल्वेज सपोर्ट मी
@किल्ली, धन्यवाद, पण आता प्लिज जुनं उत्खनन करू नका!
Wink

अज्ञातवासी अहो या कथेत काय आहे हे आम्ही विसरा याच्या आत ही कथा येवुदे.. पाटील थांबवा आता जमदग्नी येवू दे

Pages