राजगड ते तोरणा!

Submitted by हर्षा शहा on 5 December, 2018 - 05:46

राधिका … एक हसमुख आणि अति-उत्साही व्यक्तिमत्व. तिची आणि माझी ओळख योगा क्लास मध्ये तीन वर्षांपूर्वी झाली. काही दिवसांत कळलं कि तिला ट्रेकिंग ची आवड आहे आणि ती अधून मधून जाते. मीही अशा सोबती च्या शोधात होते. पण काही ना काही कारणाने तिच्या बरोबर जाणे होत नव्हते. दरम्यान वर्षभरा पूर्वी मला दुसरा छान ग्रुप मिळाला आणि माझी हौस लहान सहान गडांवर जाऊन भागू लागली. मग राधिका चे सगळे प्रस्ताव अवघड हि वाटायचे म्हणून टाळू लागले.

२ आठवड्यां पूर्वी राधिका ने एका अवघड ट्रेक बद्दल विचारले. नेहमी प्रमाणे मला नाही झेपणार असे सांगून मी टाळू लागले. पण या वेळी तिने आता तुझं बस झालं तू यायचच आहेस असं बजावलं. मीही विचार केला, किती दिवस जमणार नाही, झेपणार नाही म्हणत छोट्या गोष्टीं वर भागवायचे, कधी तरी पुढची पायरी गाठली पाहिजे. मनाची तयारी करून तिला हो म्हणाले. खरं तर सध्या चालण्याचा व्यायाम बंद होता आणि टेकडी वर जाणे सुद्धा. त्यात गेले काही आठवडे माने च दुखणं मागे लागलं होतं. त्यात अवघड ट्रेक म्हणून मनात प्रचंड शंका भीती आणि विचार चालू होते. इतका वेळ चालणे जमेल का, उतरताना ची भीती, पाठीला ओझं घेऊन इतके तास ट्रेक करता येईल का? असे एक ना अनेक विचार...

नेहमीच्या ग्रुप मध्ये विचारून पाहिलं पण फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. तरी या वेळी माघार घ्यायची नाही असं ठरवलं होतं. पण माने च दुखणं वाढतच होत. ट्रेक आता दोनच दिवसांवर आला होता, शेवटी डॉक्टर कड़े जाऊन x-ray काढून घेतला नशिब सगळं व्यवस्थित होत पण तरी पाठीवर ओझं घेऊन ट्रेक करू नकोस, दुसरं कोणी तुझं ओझं वाहणार असेल तर जा असा सल्ला दिला डॉक्टरांनी. झालं परत राधिका ला कॉल केला कि बाई सॉरी याही वेळी जमत नाहीय. पण ती थोडीच ऐकणार होती, तू चलच आम्ही तुझा लोड शेअर करू.

माझी ट्रेक बद्दल ची भीती बघून सुनिल माझ्या बरोबर ट्रेक ला यायला तयार झाला. खरं तर तोही १५ दिवसांपूर्वी सायकलिंग च्या छोट्या अपघातामुळे अशा ट्रेक साठी सक्षम नव्हता परंतु त्यालाही या ट्रेक चे खुप कुतूहल वाटत होते आणि मला हि प्रोत्साहन मिळेल म्हणून आदल्या दिवशी तयार झाला.

शनिवार ६ ऑक्टोम्बर ला सकाळीच ७.३० ला निघून राजगड वर जायचे, रात्री तिथेच मुक्काम करून पहाटे उठून दुपार पर्यंत तोरणा गाठायचा असा प्लॅन होता. भारतीय नौसेनेत सेवा केलेले आणि गेली अनेक वर्ष कॉर्पोरेट ट्रेनिंगआणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज मध्ये कार्यरत असलेले गिरीश कोणकर, यांनी हा ट्रेक आयोजित केला होता (नंतर कळले राधिका च्या आग्रह खातर होता हा ट्रेक).

पहिल्यांदा असा राहता ट्रेक करणार होते त्यामुळे बरोबर घ्यायचे सामान थोडे वाढणार होते त्यात भर ऊन्हातला ट्रेक म्हणून पाणी पण जास्त कॅरी करायचे होते (३ लिटर). गिरीश आणि रवी ने दिलेल्या सल्ल्या प्रमाणे प्रत्येक गोष्ट घेताना ती किती जागा घेईल आणि वजन वाढवेल, खरंच गरज आहे का? असा विचार करत सॅक भरली.
गिरीश, रवी आणि महेश या आयोजकां बरोबर आम्ही १२ जणांनी दोन दिवसांच्या आनंद यात्रे साठी सकाळी ८ ला प्रस्थान केले. बस सुरु झाली नि राधिका ने तिच्या मुंबई कर मित्र मंडळींशी (निधी, राजीव आणि आनंद) ओळख करून दिली. गप्पा मारत प्रवास सुरु झाला.

खेड शिवापूर च्या टोलनाक्या नंतर हॉटेल पृथ्वी मध्ये नाश्ता करायला थांबलो. पोहे, वडापाव आणि फक्कड चहा घेऊन पुढील प्रवासाला निघालो. नसरापूर फाट्याला वळलो. आता रस्ता छोटा झाला होता आणि आजूबाजूला विलोभनीय दृश्य सुरु झाले. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेती आणि त्याला किनार होती केशरी रंगाच्या कॉसमॉस फुलांची, पावसाळ्या नंतर भरपूर उगवतात हि आणि खूप दिवस टिकतात. फोटो काढणे शक्य नव्हते कारण बस भरधाव सुटली होती. छोटी छोटी गावे मागे टाकत, छान गार वारं अंगावर घेत आणि डोळ्यात ती केशरी फुलांची रांग साठवत पुढे चाललो होतो. मन प्रसन्न होते.

साधारण १०.३० च्या सुमारास राजगड पायथ्याशी पोचलो. ट्रेक लीड रवी ने सूचना दिल्या कि उद्या सकाळ पर्यंत लागेल तितकंच सामान बरोबर घ्या कारण दुसऱ्या दिवशी राजगड उतरल्यावर एके ठिकाणी बस थांबणार आहे आपल्या साठी, तेंव्हा नको ते सामान त्यात ठेऊन हवं ते परत घेता येईल. पण चढाई च्या तयारीत होतो आम्ही सगळे - कॅप, सन स्क्रीन, गॉगल आणि बाकीचे सामान व्यवस्थित पाठीला लावण्याच्या नादात रवी च्या सुचने कडे फारसे लक्ष दिले गेले नाही. ठरल्या प्रमाणे ग्रुप मधल्या काही लोकांनी माझं काही सामान त्याच्या सॅक मध्ये घ्यायची तयारी दाखवली. पाण्याच्या बॉटल्स अभिषेकने स्वतः कडे घेतल्या, राधिका ने माझ्या साठी स्लीपिंग बॅग आणली होती ती सुनीलने घेतली आणि १-२ डबे राजीवने. नंतर मला कळलं कि अभिषेक दोन सॅक कॅरी करणार आहे. आश्चर्य वाटले आणि कौतुक हि. थोड्याच वेळात कळले कि हा त्याचा पहिलाच ट्रेक होता. म्हंटल आता कळेल याला हे असे बरोबर नाही. असो...

गड चढायला सुरुवात करायच्या आधी आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. हॅरीएट नावाची एक ब्रिटिश युवती इतिहासाची विशेष आवड असल्या मुळे या ट्रेक साठी आली होती. ग्रुप मधल्या सगळ्यांत लहान १६ वर्षांच्या दोन मुलींशी तिची छान गट्टी जमली होती. त्यांना बघून मला माझ्या मुलांनी पण यायला हवे होते असे वाटले.

साधारण ११ वाजता उत्साहात आम्ही गड चढायला सुरुवात केली. गिरीश, राजीव आणि राधिका ची बॅकपॅक बरीच मोठी होती पण कॉम्पॅक्ट. ते तिघे गिर्यारोहणाच्या सरावा साठी अशी जड (८ ते १० kg) बॅकपॅक घेऊन आले होते. पण सुनील ची बॅगपॅक बघून लक्षात आलं कि रवी ने जी काही यादी दिली होती ते सगळं तंतोतंत आणले होते! त्यात माझी स्लीपिंग बॅग. सुनील नि अभिषेक बॅकपॅकच्या ओझ्यानेच जास्त दमत होते. मध्ये १-२ ठिकाणी थांबून रवीने त्यांना बॅगपॅक कशी भरायची, खांद्यावर कशी घ्यायची याच्या काही टिप्स दिल्या आणि तसे काही करूनही दिले. त्यामुळे ओझं थोडं झेपनीय झालं.

20181006_125307-1.jpg

चढत असताना दिसणारा राजगड.

गप्पा मारत, रमत गमत, अधून मधून फोटो काढत चढाई चालू होती. पिवळ्या रंगाची सोनकी ची सुंदर छोटीशी फुले पायथ्यापासून साथी ला होती. पावसाळा नुकताच संपल्या मुळे थोडं वर गेल्यावर खाली सगळं हिरवंगार दिसत होत आणि थकवा दूर पळून जात होता. ऊनहि फारसे जाणवत नव्हते. जस जसे ऊंचा वर जात होतो, गार वारा साथ देत होता आणि अजून रंगीबेरंगी फुलांचे गालिचे दिसू लागले.

20181006_133141-1.jpg

अगदी शेवटची चोर दरवाजाच्या इथली चढण थोडी कठीण होती, सुरक्षितते साठी तिथे दोन्ही बाजूनी रेलिंग लावले होते त्यामुळे भीती वाटत नव्हती पण एका वेळी एकच जण पुढे जाऊ शकत होता. दरवाज्या जवळ पोचल्या वर सगळेच फोटो काढायला थांबत असल्या मुळे गडा वर जायला अजून प्रतीक्षा करावी लागत होती. २.४५ तासात आम्ही एकदाचे गडावर पोचलो.

आकाश एकदम निरभ्र होतं. तरी उन्हाचा त्रास होत नव्हता. चला पहिला टप्पा छान पार पडला म्हणून आम्ही सगळे खूष होतो. पद्मावती मंदिरा पाशी आमची जेवणाची व्यवस्था केली होती. पण तिथे जाताना सुद्धा पद्मावती तळ्या पाशी रेंगाळलोच. जस जशी भुके ची जाणीव होऊ लागली तसे पटकन फ्रेश होऊन देवळाच्या उजव्या बाजूला पंगतीत जेवायला बसलो. मस्त पैकी पिठलं-भाकरी, बटाटा-वांगं भाजी, दही-साखर, कांदा, हिरव्या मिरचीचा खर्डा आणि इंद्रायणी चा भात अश्या फक्कड गावरान जेवणा वर तुटून पडलो. वाढणारे हि आग्रहा ने जरा जास्त च वाढत होते. भरपेट जेवण झाल्या वर काहींना सुस्ती आली आणि तिथेच पाय पसरून घोरू हि लागले.

20181006_140746-2.jpg

पद्मावती तळे.

राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. रायगड वर राजधानी हलवण्या आधी २५ वर्षे राजगडाला तो मान मिळाला होता. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या (सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती) व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. महाराजांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. पद्मावती मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.

मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनीएवढी लांब नाही, मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे.

20181006_162738-1.jpg

राजगड च्या सर्व भागांचे विस्तारित वर्णन इंटरनेट वर वर उपलब्ध आहे म्हणून इथे फार खोलात जात नाही.

४.३० पर्यंत किल्ला फिरून या मग आपण बाले किल्ल्या वर जाऊयात अशा सूचना मिळाल्या होत्या. पोटात इंधन गेल्यामुळे परत ताजे तवाने झालो होतो. वेळ आहे तर बाकी किल्ला फिरून येऊ म्हणून आम्ही ७ जण ३ च्या सुमारास तिथून निघालो.

परत एकदा आमची आनंद यात्रा सुरु झाली. गप्पा मारत, सुंदर फुले बघत, एकमेकांचे छान छान फोटोस काढत निवांत चालत होतो सुवेळा माची च्या दिशेने. सुवेळा माची प्रत्येक ठिकाणाहून वेगळी आणि सुंदर दिसत होती. ऊंचा वरून खाली आणि चहूबाजूला दिसणारे दृश्य विहंगम होते. माची जवळ आल्यावर, एके ठिकाणाहून खाली एका बाजूला संथ शांत पाणी आणि दुसऱ्या बाजूला एका मागोमाग एक अशा असंख्य डोंगर रांगा दिसत होत्या. प्रकाश खूप असल्या मुळे डोळ्याला जे दिसत होते तस फोटो मध्ये येणं कठीण होते. ठीक ठिकाणी थांबून ती दृश्य डोळ्यात साठवून घेत होतो. आमच्या निवांतपणा मुळे बाले किल्ल्या ची वेळ गाठणे कठीण वाटत होते. माची च्या टोका पर्यंत न जाता आता मागे फिरू यात का? का टोक पर्यंत जाऊन मग बालेकिल्ला ला हि जात येईल आपापलं? अशी चर्चा होऊन, आता आलोच आहोत इथवर तर माची च टोक गाठायचेच असा निर्णय झाला नि फोटो साठी वेळ न घालवता झपाझप चालायचे असं ठरवून निघालो.

20181006_155134-1.jpg20181006_153632-2.jpg

माची जवळ आली तसं कळलं कि मध्ये मोठा खड्डा आहे नि दोनही बाजूला भिंत. निमुळत्या भिंती वरून चालत जात टोक गाठायचे होते. आता एकमेकांशी न बोलता शांतपणे एक मागोमाग एक चालत निघालो. मधेच वाटू लागले उगाच अट्टाहास आहे हा, पण बाकीच्यांचा आग्रह बघता निमूट पणे चालत राहिले. बघता बघता ८-१० मिनिटात टोक गाठले. घोंगावणारा वारा आणि तिथून दिसणारे नयन रम्य दृश्य, इथवर आल्याचे चीज झाले होते Happy वाऱ्यावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्यां पाशी शिरस्त्या प्रमाणे पोझेस देऊन फोटो सेशन वैगेरे झाल्या वर एक एक करत आम्ही तिथल्या दगडांवर स्थानापन्न झालो. अभिषेकने आम्हाला चिअर अप करत मस्त ग्रुप फोटो क्लिक केला. आता शांत बसून आजूबाजूचा नजारा न्याहाळू लागलो. शहरातल्या धावपळी आणि गोंगाटा पासून मैलो लांब, आम्ही सगळे निसर्गप्रेमी, तिथली शांतता शांत बसून अनुभवत होतो. निसर्गाचे आवाज कानात साठवत होतो. निधी ने तो आवाज आणि ते दृश्य मोबाइलला मध्ये रेकॉर्ड केले. ते एक प्रकारचं ग्रुप मेडिटेशन चालू होतं. ते भंग करून तिथून निघायची कोणाचीच इच्छा होत नव्हती पण बाले किल्ला पण गाठायचा होता म्हणून १०-१५ मिनिटांनी नाईलाजाने उठलो.

20181006_161152-1.jpg20181006_164623.jpg

५ वाजून गेले होते. आता लवकरच सूर्यास्ताची वेळ सुरु होणार होती त्या आधी बालेकिल्ला गाठायला हवा होता. झपाझप निघालो. गडा वरून सूर्यास्त पाहायची संधी चुकवायची नव्हती. जेवण झाल्यावर सुनील सोडून सगळ्यांनी चपला किंवा फ्लोटर्स घालते होते, त्यात सूर्य प्रकाश कमी होतं चालला होता, त्या मुळे परत येताना अंधारात कसे उतरू असा प्रश्न पण पडला होता आणि वर जायच्या नादात सूर्यास्त चुकेल अशी काळजी पण वाटत होती. त्या मुळे आम्ही ५ जणांनी माघार घेतली आणि सूर्यास्ताच्या १०-१५ मिनिट आधीच, एका मोठ्या चौथऱ्या वर जाउन निवांत बसलो. तिथून डाव्या बाजूला बालेकिल्ला, खाली आळु दरवाजा आणि उजवीकडे पद्मावती माची दिसत होती (काही ग्रुप्स ने तिथे छोटे तंबू ठोकले होते आणि त्या हिरव्या गार गवतावर ते मस्त टुमदार वाटत होते).
आणि समोर सह्याद्रीच्या रांगाच्या पाश्र्वभूमीवर सूर्याने आपली दाहकता पूर्ण पणे शांत केली होती. तो सुंदर केसरी भास्कर अस्ताला जात होता. आणि आम्ही ते डोळे भरून शांतपणे पाहत बसलो होतो.

20181006_180651.jpg20181006_181044.jpg

जसा सूर्य पूर्ण पणे दिसेनासा झाला तस तिथे रात किड्यांचा आवाज सुरु झाला आणि काही मिनिटांतच तो इतका तीव्र झाला कि आम्हाला एकमेकांच बोलणं पण ऐकू येईना आणि आता भीती वाटू लागली त्या आवाजाची. निधी ने तो आवाज हि रेकॉर्ड केला. बालेकिल्ल्यावर गेलेल्या आमच्या ग्रुप ची वाट बघत अजून तिथेच बसावं का उठाव या विचारात होतो पण त्या आवाज ची तीव्रता बघता नि अंधार हि आता वाढत चालला होता आणि थंडी हि, म्हणून तिथून उठून पद्मावती देवळाच्या दिशेने निघालो. आता भुकेची जाणीव झाली होती. मस्त गरम गरम चहा प्यायची इच्छा झाली सगळ्यांना.

पद्मावती मंदिरात आम्ही आमचं सामान ठेवलं होतं. तिथे दिवे नसल्यामुळे खूप अंधार होता, त्यातच मोबाइलला टॉर्च लावून आम्ही आमचं सामान आवरू लागलो रात्री आणि सकाळी काय लागेल आणि काय नको ते ठेऊन द्यायचं होतं. तिथेच १-२ गावकऱ्यांना चहा ची ऑर्डर दिली. त्यांचे हि सगळं काम अंधारात चालू होतं. मधूनच एखाद्या वेळी CFL लागायचा आणि परत लगेच जायचा पण. त्याच अंधारात चहा आणि निधी ने आणलेल्या खाकऱ्यांवर ताव मारला. तेवढ्यात आमच्या ग्रुप मधले बाकीचे सहकारी पण बालेकिल्ल्याहून परत आले. गिरीश ने कांदाभजीची ऑर्डर दिली. मंदिरा बाहेर उभ्या उभ्या गरमा गरम भजी फस्त केली.

साधारण ७ वाजता मंदिर पासून थोडं लांब एके ठिकाणी मॅट्स घेऊन जाउन बसलो. वर आकाश चांदण्यांनी भरायला सुरुवात झाली होती आणि थंड वातावरणमुळे मस्त वाटत होते. गाण्याची मैफिल करायची रात्री हे सकाळीच ठरलं होतं. सुनील, गिरीश आणि मी एका मागोमाग एक जुनी हिंदी मराठी गाणी गात होतो. साधारण तासभर असं मन भरून गाऊन झाल्यावर जेवायला जायला उठलो. परत देवळापाशी गेल्यावर लक्षात आलं कि कित्ती लोकं आले आहेत इथे राहायला. रात्र शांततेत जाणार नाहीय याची जाणीव झाली. आता देवळाच्या पुढे आमची पंगत बसली जेवायला. जवळपास सकाळ सारखाच मेनू होता पण फारशी भूक नव्हती.

जेवण झाल्यावर तिथल्याच पाण्याच्या टाकी मधून आम्ही आमच्या पाण्याच्या बॉटल्स भरून घेतल्या. रात्रीच्या अंधारात टॉर्च च्या प्रकाशात हळू हळू (आत घाण जाऊ नये म्हणून) असं पाणी भरून घेणं पण गमतीशीर वाटत होते. आणि बाटली भरून झाल्यावर प्रत्येक जण पाणी किती क्लिअर दिसत आहे ते न्याहाळून बघत होते :). गिरीश आणि रवीने ग्वाही देऊन सुद्धा पाण्याच्या शुध्दते बाबत काहींचे मन साशंक होते म्हणून काही बाटल्या गावकऱ्यांकडून विकत पण घेतल्या (त्या हि याच टाकीतून भरलेल्या असतील असं मला वाटत होतं). थोडं वजन वाढलं तरी चालेल पण उद्या मात्र आपण स्वतःच पाणी कॅरी करायचं मी ठरवलं.

रात्रीचे १० वाजत आले होते. आता देवळाच्या डाव्या बाजूला उघड्या वर मस्त पथाऱ्या टाकून आकाशाकडे बघत ताणून देऊ मस्त असा इरादा होता. पहाटे ४.३० ला तोरण्या च्या दिशेने निघायचे होते. बिस्तरा टाकला, थंडी चा बंदोबस्त हि मस्त केला होता - जर्किन वर जर्किन आणि राधिका ने दिलेली कोझी स्लीपिंग बॅग. चष्मा लावून चांदण्यांनी गच्च भरलेल्या आकाशाकडे विस्मयाने पाहून घेतलं. लहानपणी उन्हाळ्याच्या सुटटी मध्ये क्वचित असे ओपन टू स्काय झोपलो असू. त्या नंतर आत्ताच अशी संधी मिळाली होती. एकंदरीत मस्त वाटत होते. परंतु तिथे रहायला आलेल्या ग्रुप्स चा गोंगाट वाढतच होता. आजूबाजूला काही लोक झोपायचा प्रयत्न करत आहेत हे त्यांच्या गावी हि नव्हतं. कोणीतरी उठून सांगावं त्यांना असं वाटत होतं पण ते काम आपणच करावं अशी हिम्मत हि झाली नाही. उगाच कशाला पंगा घ्या. हळू हळू आजू बाजूने घोरण्याचे आवाज यायला लागले. आपल्याला कधी येणार झोप? उद्या इतकं चालायला झेपणार का? पहाटे जाग येणार का? हा गोंगाट कधी थांबणार? अशा विविध विचारांनी घेरलं होते. मधेच कुत्री जोरदार भुंकत होती. थोड्या दूर वर काही हौशी लोकांनी मोठ्याने गाणी लावली होती, काही पोवाडे पण. मधूनच गार वाऱ्याची जोरदार झुळूक यायची कि परत तोंड नि डोकं झाकून घ्यावं लागायचं. मधूनच मागे लक्ष जाव तर हॅरीएट चा गोरापान चेहरा दिसायचा नि उगाच भीती वाटायची Happy कधी तरी बाजूला लक्ष गेलं कि वाढलेलं गवत दिसायची नि पुढचे विचार यायच्या आत मी मान फिरवून घ्यायचे. आता घोरणाऱ्या लोकां बद्दल जळायला व्हायला लागलं. रात्री एक च्या सुमारास गोंगाट थांबला असावा. झोप यावी म्हणून जे काही प्रकार मला माहित होते अगदी योगनिद्रेपर्यंत, ते सगळे प्रयोग फसलेले होते. रात्रभरात मी एक मिनिट हि झोपले असेल असं मला वाटलं नाही. पण तरीही माहित नाही का पण काळजी नव्हती. एकप्रकारची शांतता अनुभवत होते. पहाटे ४ च्या सुमारास आमची हालचाल सुरु झाली.

एक एक जण उठल्यावर कळलं कि सगळ्यांच्या झोपेची अवस्था जवळपास एकसारखीच होती. आवरून लवकरात लवकर तोरण्याच्या दिशेने निघायचे होते. सॅक रात्रीच व्यवस्थित पॅक करून ठेवली होती आणि सकाळी लागणाऱ्या गोष्टी वरच्या वर ठेवल्या होत्या. त्यामुळे लवकर आवरून होणार होते. ब्रश करताना सहज आकाशाकडे लक्ष गेले नि चंद्राची ती सुंदर तांबडी कोर नेहमी पेक्षा मोठी दिसत होती. नजर खिळवून ठेवणारे सौंदर्य होते ते.

एक-एक जण चहा घेऊन तयार होई पर्यंत पहाटेचे ५.30 वाजले निघायला. देवळा बाहेर मस्त ग्रुप फोटो क्लिक करून आम्ही तोरणाच्या दिशेने जायला निघालो.

IMG-20181008-WA0049.jpg

वर आकाश चांदण्यांनी भरले होते आणि खाली बघावे तर लहान लहान गावांमधले छोटे छोटे दिवे लुकलुकत होते. वरच्या चांदण्यांचे खाली प्रतिबिंब पडले कि काय असे वाटत होते. आणि इथे आमच्या प्रत्येका च्या हातात टॉर्च. हे सगळे मंद प्रकाश, थंड वातावरणात, ती निरव शांतता, मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक आणि त्यावर डोलणारे गवत…अहाहा अश्या वातावरणात पहिल्यांदा ट्रेक करत होते. हा अनुभव आयुष्य भर लक्षात राहणार होता.

IMG-20181008-WA0038.jpg

सुरूवातीचा बराच रस्ता अरुंद होता. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर. आम्ही सगळे एकमेकांशी न बोलता आणि एका मागोमाग एक असे शांतपणे टॉर्च च्या प्रकाशात खाली बघून चालत होतो. एका बाजूला अंधारात अरुंद पायवाटेवर चालायची थोडी भीती तर दुसऱ्या बाजूला भारावलेले वातावरण Happy मध्ये एकदा पायवाट थोडी सुरक्षित ठिकाणी आल्यावर सहज मागे वळून पहिले तर अजून विलोभनीय दृश्याने मन मोहित झाले. डोंगराच्या कड्याच्या बाजूला चंद्राची ती सुरेख कोर अजूनच सुरेख दिसत होती. जणू आम्हाला साथ देत होती Happy हळू हळू पहाटेचा मंद प्रकाश सुरु झाला. आणि सूर्योदयची वेळ जवळ आली. प्रकाश वाढला तशी मनातली मंद भीती नाहीशी झाली. निघाल्या पासून जवळपास तासाभराने त्या सुंदर चंद्रकोरी ची जागा आता सकाळच्या शांत रवीने घेतली होती. त्याच डोंगराच्या किनारीला येऊन तो थांबला होता. असा सूर्योदय प्रथमच बघत होते. अशा वेळी फोटो साठी ब्रेक घेणं अनिवार्य होते Happy आता सूर्य देव दिवसभर साथीला असणार होता.

20181007_063807.jpg20181007_063015.jpg

आम्ही ज्या पायवाटेने मार्गक्रमण करत होतो तिथून लोक राजगड परिक्रमा करतात अशी माहिती रवी ने दिली. काल राजगडावर इह गर्दी लागली होती पण आज आम्हाला अभावानेच लोकं दिसणार होते.

20181007_063024-1.jpg

साधारण ७ च्या सुमारास आम्ही संजीवनी माची वर आलो. ५-१० मिनिट तिथे फोटो सेशन आणि जलप्राशन करून आता राजगड उतरायला सुरुवात केली. स्टिफ उतरण सुरु होण्यापूर्वी, सुनीलने आणलेली एक किलो सफरचंद खाऊन, त्याचा भार थोडा हलका करायचं ठरलं. त्याने आणलेले सफरचंद कटर बघून सुनीलची तयारी कित्ती जय्यत होती बघून थक्क झालो Happy लाल आणि हिरवी सफरचंद खाऊन आणि तिथून खाली दिसणाऱ्या दऱ्या आणि हिरवळ पाहून परत ताजे तवाने झालो. मौके का फायदा उठते हुवे काही लोकांनी फोटो सेशन ची हौस परत थोडक्यात भागवून घेतली हे सांगणे न लगे

IMG-20181008-WA0019.jpg

संजीवनी माची.

IMG-20181008-WA0138.jpg

काही सखल भाग संपल्यावर आता स्टिफ उतरण लागली. आधीच उतरणीला मला घाबरायला होतं त्यात या वेळी ३-४ किलो ओझं होतं पाठीवर. शांतपणे उतरायला सुरुवात केली. रवी आणि महेशने पुढे जाऊन दोर लावला होता, जेणे करून लोकांना आधार मिळेल नि उतरण सोपी जाईल. मी सरळ खाली बसून हळू हळू उतरायला सुरु केलं. जमेल तसा दोर चा आधार घेत होते. काही ठिकाणी पाठीवरच्या ओझ्या मुळेच पडू कि काय अशी भीती वाटत होती, अशा वेळी मी सरळ सॅक खाली टाकून देत होते. ज्यांच्या बॅकपॅक अजून जड होत्या त्यांना अजून अजून अवघड जात होते. १०-१५ मिनिटांनी एकदाचा तो बॅड पॅच संपला नि आम्ही खाली पोचलो. तिथे छोट्या छोट्या झाडांमुळे मस्त सावली होती. त्या सावलीत बसून निवांत डार्क चॉकोलेट खाल्ले, पाणी पिऊन परत पुढच्या प्रवास साठी सज्ज झालो.

IMG-20181008-WA0089.jpg

आता परत एक छोटीशी टेकडी चढून मग बराचसा सखल भाग होता. टेकडी एका रस्त्याला उतरणार होती जिथे आमची बस आमच्या साठी नाश्ता घेऊन थांबणार होती. आता थोडे दमायला झाले होते नि नाष्ट्या साठी कधी एकदा बस पर्यंत पोचतो असे झाले होते. ठरलेल्या वेळे पेक्षा थोडं उशिराच बस पाशी पोचलो. तिथे मिलिंद आणि समीर, आमच्या साठी गरमागरम पोहे आणि चहा घेऊन थांबले होते. हे दोघे रवीच्या टीम मधले होते आणि या पुढे आम्हाला गाईड करायला जॉईन होणार होते. पोहे खूपच अप्रतिम होते. नको असलेले सामान बस मध्ये ठेऊन दिले. रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. आणि आता उन्हाचा सामना करण्या साठी सज्ज होऊन (लेन्स, गॉगल, कॅप, सन्स्क्रीन) साधारण तासाभराने तिथून निघालो.

आता तोरण्या पर्यंत जायला अनेक छोट्या मोठ्या टेकड्या पार करायच्या होत्या. पण जास्त करून सखल भाग असणार होता. काही टेकड्यांवर दोनही बाजूनी खांद्या पर्यंत वाढलेली फुलांची झाड आणि मध्ये पाऊलवाट होती तर काही ठिकाणी खाली दरी नि बाजूला डोंगर अशी अरुंद पायवाट. तर कधी डोंगर माथ्यावर पाऊलवाट जिथून दोनही बाजूने सुंदर नजारा दिसत होता. डोंगर, दऱ्या, हिरवळ आणि भरपूर फुले. पिवळी गुलाबी, निळी. Full ३६० degree veiw! एकत्र चालता येईल अशी वाट क्वचितच होती त्यामुळे एका मागोमाग एक असे चालत होतो आणि वेगवेगळ्या लोकां बरोबर संवाद साधायची संधी मिळत होती. तो नजारा आणि गप्पां मुळे, वेळ आणि रस्ता झरझर सरत होता. दर साधारण तासाभराने गिरीश विश्रांती साठी थांबवत होता. एके ठिकाणी एका गावकरी आजीबाईं मुळे सरबत मिळाले. आणि त्यामुळे अंमळ विश्रांती सुद्धा. दर वेळी बसायला जागा मिळेलच असे नव्हते मग उभ्यानेच पाणी पिऊन थोडं थांबून निघत होतो.

IMG-20181008-WA0104.jpg

साधारण दोन अडीच तास चालल्यावर मात्र थोडासा थकवा जाणवायला लागला. मग पाण्या बरोबर थोडं इलेकट्रोल घ्यायला सुरुवात केली आणि तरतरीत वाटू लागलं. वर डोंगरां वर मस्त गार वारं वाहत होत. डोळे बंद करून वाऱ्याचा आवाज ऐकताना समुद्र किनाऱ्या पाशी लाटांचा आवाज ऐकत आहोत असं वाटत होतं. त्या वाऱ्यामुळे आजू बाजूच्या गवतांवर सुंदर लाटा तयार होत होत्या. त्याचाहि विडिओ घेतला आम्ही.

आता मागे राजगड लांब आणि पुढे तोरणा जवळ दिसू लागला. तोरणा किल्ल्या चे मूळ नाव प्रचंडगड, खरोखर प्रचंड दिसत होता. मिलिंदची फुल्ल फोटोग्राफी चालू होती. मी आणि अभिषेक सगळ्यात मागे पडलो होतो. गप्पा मारत चालत असताना खाली दरी आणि शेजारी डोंगर अशी अरुंद पायवाट सुरु झाली. आम्ही दोघे गप्प झालो आणि शांत पणे चालू लागलो. ती पायवाट संपल्यावर मी अभिषेकशी बोलायला गेले तर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हंटले येईल सावकाश चालत असेल. ४-५ मिनिटा नंतरही तो दिसला नाही मग मात्र मी घाबरले पण मागे फिरून त्याला बघायला जायची हिम्मत होत नव्हती. म्हणून पुढे कोणी आहे का बघायला गेले. मिलिंद आणि समीर फोटोग्राफी करत होते. समीर म्हणाला मी बघतो. आम्ही परत हाका मारल्या तरी अभिषेकचा पत्ता नाही. आता समीर म्हणाला जाऊनच बघतो. तो निघणार तेवढ्यात अभिषेक दिसला नि हुश्श झालं. मी त्याला म्हणले तू प्लीझ सगळ्यांच्या पुढे थांब, टेन्शन नको. थोडसं पुढे गृप आमची वाट बघत होता.

20181007_114453-2.jpg

तोरणा चढायला सुरुवात करायच्या आधीची हि शेवटची विश्रांती होती.

20181007_112113-2.jpg

मागे आहे तो प्रचंडगड(तोरणा).

४ जणांचे ४ गृप पाडून, प्रत्येक गृप बरोबर एक एक्स्पर्ट (मिलिंद, समीर, महेश आणि रवी) घेऊन चढायचे असे ठरले. ऊन थोडं वाढलं होते आणि बऱ्यापैकी दमलो हि होतो पण आता थोडंच बाकी आहे म्हणून उत्साह होता. मी, राधिका, सुनील आणि छोटी इशा एका गृप मध्ये होती. इशा सगळ्यात जास्त दमली होती. पहिल्या चढाई नंतर, तिला पुढे चालवेना. तिला पाणी आणि इलेकट्रोल देऊन थोडी विश्रांती देऊन मग पुढे निघालो. साधारण अर्ध्या तासात तोरणा गाठला. दुपारचे १२.२० वाजले होते. खूप आनंद वाटत होता कि करू शकलो. अजून थोडच बाकी आहे असं वाटलं म्हणून रत्नाकर ला कॉल करून कळवले कि तोरण्याला पोचले एकदाचे.

20181007_120544-1.jpg

या फोटो मध्ये दिसत आहे तो मागचा राजगड आणि जिथून हा फोटो काढला तो तोरणा. खरं वाटत नावात कि इतकं अंतर पार करून आलो.

एकदाचे वर आलो, परंतु 'प्रचंडगड' आहे हा, देवळा पर्यंत जायला अजून बरच चालायचं होते. एके ठिकाणी बुरुज सर करायला लोखंडी शिडी लावली होती. हळू हळू पुढे जाऊ लागलो तस कळलं कि मी घरी कॉल करायची घाई केली होती. बरेच बॅड पॅचेस सर करत, दमत भागत, पुढे सरकत होतो. काही ठिकाणी दोनही बाजूला रेलिंग लावले होते त्यामुळे सोपं जात होते. मधून अधून थांबून खाली वाहणारी गुंजवणी नदी आणि जसे सगळ्या ऊंची वरून दिसतात तसे नजारे बघून स्तिमित होत होतो. पण आता दमलेले असल्यामुळे कधी एकदा देवळात पोचून जेवतो असे झाले होते.

20181007_141356-1.jpg20181007_153848-1.jpg

आता सगळं सोपं आहे असं वाटत असतानाच एक मोठा कडा लागला, त्याच्या बाजूला छोटा कडा होता आणि खाली दरी. हा छोटा कडा पार करायचे टेन्शन होते. परंतु देवाचे नाव घेत तेही पार पडले. तोरणा चढाई च्या वेळी सगळ्या बॅड पॅचेसला मिलिंदची चांगलीच मदत झाली. अतिशय छान पद्धतीने सूचना देत (कधी कोणता पाय कुठे ठेवायचा, छोट्या छोट्या स्टेप्स घेत पुढे जात राहायचं, मोठ्या स्टेप्स ने पाय आणि गुढग्यावर ताण येतो, झुकून न चढता सरळ उभं राहून चढत राहायचं इत्यादी) धीर देत आणि क्वचित चुकलो तर थोडं रागावत मदत करत होता. त्याला ३२ वर्षांचा गिर्यारोहणाचा अनुभव आहे आणि आजवर त्याने हजारो लोकांना अनेक गड किल्ले सर करण्या साठी मदत केली आहे.

भूक आणि दम लागलेला असल्या मुळे फार कुठे फोटोच्या भानगडी मध्ये न पडता आणि न रेंगाळता सरळ देवळाच्या दिशेने झपाझप चालत २.१५ च्या सुमारास देवळात पोचलो. सॅक काढून ठेवल्या नंतर शूज काढून पाठीबरोबर पायाचा हि भार हलका केला. जेवायला घरून डबे घेऊन आलो होतो, नि तिथे गावकरी मसाले भात करून देत होते. एका आज्जीं कडून भरपूर ताक हि घेतले. शाळेत डबे शेअर करून खायचो तसे गोल करून बसलो नि यथेच्छ ताव मारला. जेवण झाल्यावर देखील उठून तोरणा फिरून यायची इच्छा झाली नाही. काही जण पाय पसरून राजगड सारखे इथे हि घोरू लागले. मीही थोडा प्रयत्न केला, झोप लागली नाही पण बरं वाटले.

तोरणा चढत असताना मिलिंद आणि राधिका कडून, उतरताना जाम कंटाळा येतो पण पायथा येत नाही लवकर, असे ऐकले होते. पण रवी सांगत होता कि आता रॊड आणि पार्किंग थोडे वर आले आहे त्यामुळे साधारण २ किमी वाचेल उतरायचं आणि वेळहि वाचेल. शिवाय २ वर्षां पूर्वी दोनही बाजूला रेलिंग बांधल्या मुळे भरभर खाली उतरू शकू. ३.१५, ३.३० च्या सुमारास उतरायला सुरुवात केली. पाय आता मी म्हणत होते. त्यात उतरताना अजूनच गुडघ्यां वर ताण येत होता, पण शेवटचा टप्पा होता त्यामुळे फार काळजी नव्हती.

रेलिंग मुळे बॅड पॅचेस ची विशेष भीती वाटली नाही आणि फार जड हि गेले नाही. त्यात मिलिंद, महेश आणि सुनील होतेच बरोबर मदतीला. तास-दीड तासात थोडा सखल भागत आल्यावर मग निधी, मी, राधिका आणि मिलिंद थोड निवांत चालत गप्पा मारत सगळ्यात शेवटी पार्किंग पाशी आलो. तोरणाला पोचल्यावर खूप आनंद झाला होता पण आता पायथ्याशी आल्यावर एकदम शांत वाटत होते. स्पीचलेस.
रवी आणि गिरीश ने, छान केलात सगळ्यांनी ट्रेक आणि बऱ्या पैकी वेळेत होतात सगळीकडे, असे सांगत स्वतः ला शाबासकी द्या म्हणले Happy
ग्रुप फोटो काढून बस मध्ये बसलो.

20181007_173855-1.jpg

गुंजवणे पाशी एका हॉटेल मध्ये चहा प्यायला थांबलो. इतने अच्छे ट्रेक के बाद वडा पाव और कांदा भजी बनता है म्हणत यथेच्छ ताव मारला. दोनही बढीया होते. चहा पण एक नंबर होता. थोडे दमलेले होतो पण एक प्रकारचं समाधान होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर.

बस मध्ये पण गप्पा रंगल्या होत्या. पुढे कुठे कुठे जाऊ शकतो, फोटोस कसे शेअर करायचे, ब्लॉग लिहुयात का, कोणी कस परफॉर्म केलं ट्रेक मध्ये, या ट्रेक मुळे आत्मविश्वास कसा वाढला असे एक ना अनेक विषय. रात्री ९ च्या सुमारास घरी आले. इतकी सतत बडबड चालू होती माझी कि रत्नाकर म्हणायला लागला कि अग दमलीस कि नाही किती बोलत आहेस. माहित नाही पण खूप एनर्जेटिक वाटत होते.

दोनही किल्ल्या वरचे अजून बरेच काही बघायचे बाकी आहे. त्यामुळे परत जायची इच्छा आहे. खूप लोक आज काल रनिंग, सायकलिंग मध्ये रमतात, मला मात्र ट्रेकिंग भारी आवडतं. गड किल्ल्या पर्यंत चा प्रवास हि आवडतो आणि कष्ट करून चढून वर गेल्यावर जे नजारे बघायला आणि अनुभवायला मिळतात ते बघून सगळे कष्ट कारणी लागले असे वाटते. त्या काळात लोकांनी किती मुश्किलीने हे सगळं बांधलं असेल आणि कसं संरक्षण केलं असेल याचा विचार करून स्तिमित व्हायला होते. स्फुरण मिळते, आपण त्या मानाने काहीच साध्य करत नाही याची जाणीव होते. उंचावरून खाली दिसणाऱ्या विशाल दऱ्या, डोंगर बघते तेंव्हा खालची झाडे एक वेळ दिसतात पण माणसे ठिबकया सारखी अथवा दिसतही नाहीत. आपण किती छोटे आहोत परंतु आपले अहंकार किती मोठा आहे याची जाणीव होते.

हे दोन किल्ले धरून एकूण गेल्या ५-६ वर्षात १३ किल्ले आजवर पाहायला मिळाले (गेल्या वर्षभरात सगळ्यात जास्त किल्ले झाले कारण छान गृप मिळाला). अजून बरंच फिरायची इच्छा आहे. समविचारी लोकं भेटले आहेत त्यामुळे नक्की साध्य होईल असं वाटत आहे Happy

राधिका आणि सुनील खूप खूप धन्यवाद. तुम्हा दोघांमुळे ट्रेक आणि लेख दोनही पार पडले.

20181006_140615-1.jpg

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
फोटोही सुंदर. मलाही केव्हाचं करायचंय राजगड ते तोरणा. कधी मुहुर्त लागतोय देव जाणे.

व्वा! सुरेख. काय छान फोटो आहेत आणी वर्णन पण झकास ! छान वाटले वाचुन. अशीच भटकंती करत रहा. मायबोलीवर आणी मिसळपाव वर
भटकंतीची बरीच माहिती आहे.

दोनही किल्ल्या वरचे अजून बरेच काही बघायचे बाकी आहे. त्यामुळे परत जायची इच्छा आहे. खूप लोक आज काल रनिंग, सायकलिंग मध्ये रमतात, मला मात्र ट्रेकिंग भारी आवडतं. गड किल्ल्या पर्यंत चा प्रवास हि आवडतो आणि कष्ट करून चढून वर गेल्यावर जे नजारे बघायला आणि अनुभवायला मिळतात ते बघून सगळे कष्ट कारणी लागले असे वाटते. त्या काळात लोकांनी किती मुश्किलीने हे सगळं बांधलं असेल आणि कस संरक्षण केलं असेल याचा विचार करून स्तिमित व्हायला होते. स्फुरण मिळते, आपण त्या मानाने काहीच साध्य करत नाही याची जाणीव होते. ऊंचावरून खाली दिसणाऱ्या विशाल दऱ्या, डोंगर बघते तेंव्हा खालची झाडे एक वेळ दिसतात पण माणसे ठिबकया सारखी अथवा दिसतही नाहीत. आपण किती छोटे आहोत परंतु आपले अहंकार किती मोठा आहे याची जाणीव होते. >>>> सहमत. छान रुट आणि मस्त लेख. पु. ले. शु.

H...mast lihilayas g! Solid anubhav asanar yaat shanka nahi. Photos pan bhaari ahet. Ata next kuthala trek?