अनमोल नथ

Submitted by मनीमोहोर on 30 November, 2018 - 11:10

माझ्या आईच्या पश्चात इतके वर्ष बहिणीने संभाळलेली तिची नथ अलीकडेच फार मोठ्या मनाने तिने मला दिली. त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. मला स्वतःला नथ घालणे खरं तर आवडत नाही पण तरी ही आईची नथ तिने मला दिली हा मला माझा सन्मानच वाटला. त्यावेळी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.

आमची आई आज हयात असती तर नव्वदीच्या पुढे असती. तिच्या लग्नात तिच्या सासूबाईंची म्हणजे माझ्या आजीची ही नथ तिला दिली गेली होती. याहून अधिक नथीचा इतिहास माहीत नाही. म्हणजे ती माझ्या आजीला तिच्या आईने/ सासूबाईंनी त्यांची म्हणून दिली होती की तेव्हा ती नवीच घेतली होती वैगेरे. पण तरी ही साधारण शंभर हुन अधिक वर्ष जुनी तरी ती नक्कीच असेल.

माझी आई रोज काही नथ घालत नसे. पण नथ हे सौभाग्याचं लेणं आहे या भावनेने लग्न समारंभात किंवा कार्यप्रसंगी मात्र तिच्या नाकात नथ असेच असे. तसेच चैत्रगौरीच्या किंवा संक्रांतीच्या हळदीकुंकवाला, हरतालिकेच्या किंवा वटसावित्रीच्या पूजेला , गौरी गणपतींना औक्षण करून त्याना घरात घेताना अश्या प्रसंगी ती आवर्जून नथ घालत असे. दररोज घालत नसल्याने नथीची तार जरी अगदी बारीक/पात्तळ असली तरी ती नाकात घालताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारी एक अस्पष्ट वेदना मला आज ही स्पष्टपणे आठवते आहे. पण एकदा का ती नाकात गेली की ती वेदना क्षणार्धात निघून जात असे आणि तिचा चेहरा पुन्हा पहिल्या सारखा प्रसन्न होत असे. दिवाळीत अंगणात ठेवण्यासाठी पणत्यानी भरलेलं सूप जेव्हा ती हातात घेई तेव्हा त्या पणत्यांच्या मंद प्रकाशात उजळून निघालेला नथ घातलेला तिचा चेहरा मला आज ही आठवतोय. जणू काही आईची ही प्रतिमा माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. नथीच्या टपोऱ्या मोत्यांचं तेज तिच्या चेहऱ्यावर पसरलंय हे मला त्या लहान वयातही जाणवत असे. नथीचं काम झाल्यावर इतर कामांच्या गडबडीत ती कपाटात ठेवायला जर तिला वेळ झाला नाही तर नथीची डबी ठेवण्याची तिची आवडती आणि सर्वात सेफ जागा म्हणजे तिच्या नौवारीच केळं ! ती ते जरासं उकलून नथीची छोटीशी डबी त्यात सरकवत असे आणि केळं परत सारख करत असे. नथीची डबी केळ्यात आहे हे कोणाला समजत ही नसे. ज्या स्किलने ती हे करायची ते बघणं तेव्हा ही मला फार आवडायचं. असो. त्या नथीची डबी चांदीची आहे ज्यावर माझ्या आईच नाव कोरलं आहे इंग्लिश मध्ये. ती डबी लॉक करताना तिचा टक असा आवाज येतो. लहानपणी तिची उघड मिट करून तो टक आवाज ऐकणे आमचा टाईम पास असे. अर्थात नथ जेव्हा आईच्या नाकात असे तेव्हाच कधीतरी असा चान्स मिळत असे आम्हाला.

ती नथ माझ्या आईने वापरलेली असल्याने आमच्या साठी ती नथ अनमोलच आहे. कारण त्या नथीवरून हात फिरवताना, ती हातात घेऊन तिला कुरवळताना आम्हाला जणू काही आम्ही आईलाच भेटत आहोत असं वाटतं. आणि त्या निमित्ताने आमच्या लहानपणीच्या आठवणीना उजाळा ही मिळतो. बहिणीकडे सगळे जमलो की एखाद्या दुपारी ती नथ हातात घेऊन बघणे, जुन्या आठवणीत रमून त्यावर गप्पा मारणे हा ठरलेला कार्यक्रम असतो.

इतके वर्ष वापरल्यामुळे तिची बांधणी आता जरा सैलावली आहे. तसेच ती चापाची नसल्याने आणि हल्ली कोणाचे नाक टोचलेलं नसल्याने इच्छा असून ही ती वापरता येत नाही. जुन्या घरावर जरी प्रेम असलं तरी त्याच ही रिनोवेशन करावंच लागत, ते ही काळा प्रमाणे बदलावंच लागत. तस ही नथ ही वापरण्या योग्य करण्या साठी ती चापाची करून घ्यावी ह्या विचाराने आम्ही एका प्रसिद्ध सराफांच्या दुकानात गेलो. ती नथ पर्स मधून काढुन मी काउंटर वर ठेवता क्षणी त्या सेल्समन चे डोळेच चमकले आणि आपण काहीतरी विलक्षण बघतोय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. काहीतरी अनमोल चीज बघितल्याचा पहिला भर ओसरल्यावर ही नथ कशी फार मौल्यवान आहे हे त्याने आम्हाला सांगितले. कारण ती जगप्रसिद्ध बसरा जातीच्या अस्सल मोत्यांची आहे.

आता थोडं बसरा मोत्यांबद्दल... (अर्थात कुतुहलामुळे नेटवरून घेतलेली माहिती) आखाती देशात हे मोती नैसर्गिकपणे म्हणजे पावसाचा थेंब (आपल्याकडे पडतील स्वाती तर पिकतील मोती अशी यथार्थ म्हण ही आहे. )शिंपल्यात पडून तयार होत असत आणि तिथल्या बसरा ह्या शहरात त्यांचा व्यापार चालत असे. त्यावरूनच त्याना बसरा हे नाव मिळालं आहे. त्यावर कोणती ही कृत्रिम प्रक्रिया केली गेली नसल्यामुळे ते नैसर्गिक आणि अगदी अस्सल मानले जातात. सहाजिकच त्यांचा आकार ही अगदी गोल आणि एक सारखा नसतो. आपल्या नैसर्गिक तेजामुळे त्यांना हिऱ्यासारखी नाही पण स्निग्ध चांदण्यासारखी चमक मात्र प्राप्त होते. मला वाटत म्हणूनच मोती हे चंद्राचं रत्न मानत असावेत. अलीकडच्या काळात आखाती देशात तेल विहिरी वाढल्यामुळे हे बसरा मोती तयार होण आता बंद झालं आहे. आता बसरा जातीचे नवीन मोती बाजारात मिळणं शक्य नाही. असेच कुणाकडे असले आणि तुम्हाला मिळाले तरच ! म्हणजे आता ते दुर्मिळ आणि म्हणून अधिक मौल्यवान ही झाले आहेत.

अशी दुर्मिळ चीज आपल्याकडे आहे आणि ती आपल्या आईने वापरली ही आहे ह्या भावनेने दुकानात ही माझे डोळे भरून आले. दुकानातील सर्व विक्रेत्यांना अगदी बोलावून बोलावून ती नथ दाखवण्यात आली. तिची बांधणी नीट निरखून पहाण्यात आली. नथीचा प्रत्येक मोती जरी आकाराने वेगळा असला तरी कारागिराने ते असे काही चपखलपणे गुंफले आहेत की नथीचा आकार फार सुबक झाला आहे.

आईने वापरलेली म्हणून आमच्यासाठी मौल्यवान असलेली ती नथ आता भौतिक जगात ही मौल्यवान झाली आहे. नॅचरली पहिली रिऍक्शन “आहे तशीच राहू दे , कोण देणार मोती बदली होणार नाहीत याचा भरवसा" अशीच होती. त्यामुळे पुनर्बांधणीचा विचार बारगळुन ती परत पर्स मध्ये ठेवली गेली. दुसरी खरेदी करत असताना ही पर्समधील नथीची डबी सारखी चाचपुन पाहिली जात होती. परंतु त्यामुळे विक्रेत्याचा माझ्या पर्समध्ये आणखी काही दुर्मिळ वस्तू असाव्यात असा गोड गैरसमज मात्र झाला.

घरी आल्यावर, भावनेचा पहिला आवेग ओसरल्यावर पुन्हा बुद्धीने विचार करणे सुरू झाले आणि ती जर कोणी वापरावी असे वाटत असेल तर ती चापाची करून घेण्याला पर्याय नाही हा विचार पक्का होऊन ती चापाची करण्यासाठी त्या सराफांना दिली. त्यावेळी माझ्या जणू काही काळजाचा तुकडा काढून मी त्याना देतेय असंच मला वाटत होतं. पुन्हा पुन्हा "नीट करा " अस मी त्याना सांगत होते. कारण ती त्याना देताना मी फार मोठी रिस्क घेत आहे असं मला वाटत होतं. पण त्यांनी तिचा मेक ओव्हर अतिशय छान पद्धतीने करून दिला. नथीचं बदललेलं रूप ही (चापाची केली) तेवढंच सुंदर दिसत आहे. मूळ नथीचं सौंदर्य कुठे ही कमी झालेलं नाहीये हेच खूप मोठं समाधान आहे.

ओरिजनल आणि नवीन नथीचा फोटो

IMG_2018-12-04_14-02-11.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अति अवांतर:
लंपन हा तो प्रसंग नाही. तुम्ही म्हणताय तोही असाच प्रभावी आहे. पण मी म्हणत्ये तो आई आणि प्रभा यांच्यामधला संवाद. प्रभा ते दागिने विकणार म्हणते तेव्हा आई हे सांगते.

वावे, हो ही वाक्ये दोन वेळा येतात नाटकात. आला तो प्रसंग पण लक्षात. गुरुमायच्या तोंडी पण आहेत हे संवाद.

सगळेच प्रतिसाद खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद सर्वाना.

तुमचा लेख आला की लगेच वाचते, कधी कामाच्या घाईत असले की सवडीने वाचावं म्हणून मागे पडतो, कधी प्रतिसाद देण्याचा वेळ आणि मूड पण नसतो पण खूप छान लिहिता अशाच लिहीत रहा.>> वेडोबा, खूप खूप आभार.

चापाची केल्यावर तितकीच व्यवस्थित बसते का ? अश्विनी , चापाचीही चांगली बसते आहे.

वाट्टेल ते .. मस्त लिहिलं आहे. आमच्या ह्या नथीचीही चांदीची डबी आहे. लॉक करताना टॉक असा आवाज होतो तिचा. लहानपणी तिची उघड मिट करून टॉक आवाज ऐकणे हा आमचा खेळ असे. अर्थात नथ जेव्हा आईच्या नाकात असे तेव्हाच हा चान्स मिळत असे आम्हाला. त्या डबीवर माझ्या आईचे नाव कोरलेले आहे. आणि ते ही इंग्लिश मध्ये.

वावे खूप छान प्रतिसाद. अर्थात तुझे प्रतिसाद मला नेहमीच आवडतात .छान लिहितेस.त्या नाटकात जे दागिन्यांबद्दल लिहिलं आहेस ते मला आपल्या नॉर्मल रोजच्या वापरातल्या भांड्यांबद्दल ही वाटत. आमच्याकडे रोजचे भाताचे तांदूळ मापायच एक निठव आहे लाकडाच. त्याबाबत ही मला नेहमी वाटत की माझ्या आधीच्या किती बायकांचे हात ह्याला लागले असतील, किती जणींनी ह्याने तांदूळ मोजले असतील वैगेरे वैगेरे

अँमी, दागिन्यांची वाटणी हा या धाग्याचा विषय नाही .

देवकी मस्त आठवण.

फोटो quality बद्दल अगदीच सहमत. प्रत्यक्षात फोटो इथल्या पेक्षा बरा आहे. इथे रिसायझिंग होताना quality अगदीच गेली आहे.

लेखनशैली केवळ सुंदर....

बहुतेक महाराष्ट्रात पूर्वी तरी नथ हे सौभाग्यलक्षण मानायचे. एखादीची तेवढी ऐपत नसेल तर नथीच्या जागी कुंकू लावत असत..... असं मला आठवतंय...

ममो, धन्यवाद Happy अनया, तुम्हाला माझा प्रतिसाद आठवेल हे वाचून छान वाटलं Happy
ममो, खरं आहे. घरात किती जुन्या वस्तू असतात पिढ्यानपिढ्या वापरलेल्या. आमच्या घरीही असंच निठवं आहे, पायलीही आहे जुनी. एक लाकडी पाळणा आहे, जो माझ्या आजोबांसाठी त्यांच्या आजोळहून आला होता. त्यात आजोबांपासून ते माझ्या बहिणीच्या मुलीपर्यंत घरातली एकूणएक सगळी बाळं झोपली आहेत Happy

फारच छान लिहिलंय. माझ्याकडे अशाच, माझ्या आजेसासुबाईंनी दिलेल्या मोत्याच्या कुड्या आहेत. त्या त्यांच्याकडे परंपरेने आल्या होत्या Happy

माबोकरांच्या आयांच्या नथी/ दागिने म्हणजे किमान 45 ते 50 वर्षे जुने! आयांना त्यांचा आयांकडून किंवा सासवांकडून दागिने परंपरेने मिळाले असतील तर किमान 70 ते 90-95 वर्ष जुने!!! विचार करून देखील भारी वाटतंय!

नथ ठेवायची आजीची लाकडी पेटी आठवली. इतकुशी होती आणि आत मऊ पिंजलेल्या कापसासारखं होतं काहितरी. ती डब्बी बंद करायला खूप मजा वाटायची.

पुन्हा एकदा आभार प्रतिसादकांचे.

घरात किती जुन्या वस्तू असतात पिढ्यानपिढ्या वापरलेल्या. आमच्या घरीही असंच निठवं आहे, पायलीही आहे जुनी. एक लाकडी पाळणा आहे, जो माझ्या आजोबांसाठी त्यांच्या आजोळहून आला होता. त्यात आजोबांपासून ते माझ्या बहिणीच्या मुलीपर्यंत घरातली एकूणएक सगळी बाळं झोपली आहेत Happy वावे किती गोड.

बहुतेक महाराष्ट्रात पूर्वी तरी नथ हे सौभाग्यलक्षण मानायचे. एखादीची तेवढी ऐपत नसेल तर नथीच्या जागी कुंकू लावत असत..... असं मला आठवतंय... >> हे नव्हतं माहीत शशांक

माबोकरांच्या आयांच्या नथी/ दागिने म्हणजे किमान 45 ते 50 वर्षे जुने! आयांना त्यांचा आयांकडून किंवा सासवांकडून दागिने परंपरेने मिळाले असतील तर किमान 70 ते 90-95 वर्ष जुने!!! विचार करून देखील भारी वाटतंय! >> वत्सला मस्त लिहिलं आहेस.

नथ ठेवायची आजीची लाकडी पेटी आठवली. इतकुशी होती आणि आत मऊ पिंजलेल्या कापसासारखं होतं काहितरी. ती डब्बी बंद करायला खूप मजा वाटायची. >> अंजली, किती छान आठवण

मनीमोहोर... तुमचं लिखाण इतकं समृद्ध असतं की मराठी संस्कृती ज्यांना माहित नसेल त्यांनी तुमचं लिखाण वाचावं आणि तिच्या प्रेमात पडावं .

कित्ती हृदय आठवण गं ! खूप छान !
मला हा संपूर्ण लेख वाचताना शांताबाईंच्या "पैठणी" कवितेची आठवण येत होती .. कवितेचं अगदी प्रत्येक कडवं या लेखातल्या प्रत्येक परिच्छेदाला लागू होतंय. पैठणी काय आणि नथ काय दोन्ही हि अगदी खानदानी आणि सोज्वळ . सगळ्यांना हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी .. त्यातून ती आई / आजी अश्या आपुलकीच्या माणसांकडून आली असेल तर मग तर तिच्याबद्दल ची आपलेपणाची /मायेची भावना अधिक दृढ होत जाते.
मला तर माझ्या आई /आज्जीने त्यांच्या लग्नाच्या आधीपासून वापरात असलेल्या पळी - पंचपात्र पासून ते सगळ्या भांड्यांबद्दल खूप कुतूहल आपुलकी वाटते .. अश्या गोष्टी हातात घेतल्यावर त्यांचं प्रेम ,ऊब , आशीर्वाद ,सोशिकता आपोआप आपल्यात पाझरतंय असा भास होतो. Happy

दिवाळीत अंगणात ठेवण्यासाठी पणत्यानी भरलेलं सूप जेव्हा ती हातात घेई तेव्हा त्या पणत्यांच्या मंद प्रकाशात उजळून निघालेला नथ घातलेला तिचा चेहरा मला आज ही आठवतोय. >> अगदी डोळ्यासमोर उभं राहील !

एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटकात आई-मुलीचा एक संवाद आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दागिन्यांबद्दल आई म्हणते की ते दागिने घातले की वाटतं, किती जणींचे हात, किती जणींचे गळे या दागिन्यांना लागले असतील. ते दागिने घातले की आपल्या देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या पूर्वज बायका उभ्या राहून आपल्याकडे पाहतायत असं वाटायचं.>>> किती सुंदर विचार आहे हा.

लेख नेहमीप्रमाणे छान. फोटो अजुन क्लीअर हवा होता.

अंजली, किती छान लिहिलं आहेस. खूप आवडलं. भांडयांबाबत मला ही अगदी असच वाटत. मध्यन्तरी घरी एक पूजा होती. गुरुजी त्यांचा तांब्या घेऊन आले होते तयारीत. पण मी म्हटलं हा माझा वापरा तुम्ही , तुमचा राहू दे. अर्थात त्यामागे कारण तू लिहिलं आहेस तेच होतं.

अंजली , हार्पेन, वावे तुम्हाला त्या प्रसिद्ध पैठणी कवितेची आठवण यावी हे वाचून या पेक्षा मोठं प्रशस्तीपत्रक आणखी काय असेल ? रच्याकने, माझ्या मुलीने जेव्हा हे वाचल तेव्हा तिने ही हेच लिहिलं होतं की आई, पैठणी कविता आठवली हे तू लिहिलेलं वाचताना.

हार्पेन , कविता परत ऐकली. सुंदरच आहे . माझ्या मुलीला शाळेत (सातवीत असेल बहुदा) होती ही. मी तिला शिकवली होती हे ही आठवतंय मला. अर्थात त्या मागचा गर्भितार्थ समजण्याचं तिचं वय नव्हतं तेव्हा पण कुठेतरी ते मनात झिरपत असत म्हणूनच तिला ही हीच कविता आठवली असेल. इथे रेडिमेड दिल्याबद्दल खूप खूप आभार.

मनीमोहोर... तुमचं लिखाण इतकं समृद्ध असतं की मराठी संस्कृती ज्यांना माहित नसेल त्यांनी तुमचं लिखाण वाचावं आणि तिच्या प्रेमात पडावं . >> मयुरी काय बोलू, निःशब्द आहे.

नवीन फोटो दाखवते आहे बघा कसा वाटतोय ते.

मी नेहमी म्हणते तेच परत एकदा लिहिते .मायबोलीला खूप खूप धन्यवाद.मायबोली नसती तर ही नथ तुमच्या पर्यंत पोचण अशक्य होतं.

पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दागिन्यांबद्दल आई म्हणते की ते दागिने घातले की वाटतं, किती जणींचे हात, किती जणींचे गळे या दागिन्यांना लागले असतील. ते दागिने घातले की आपल्या देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या पूर्वज बायका उभ्या राहून आपल्याकडे पाहतायत असं वाटायचं.>>
वावे , कसलं भारीये हे वाक्य ! मी हे नाटक वाचलेलं /पाहिलेलं नाही तरी मला वाचताना हि काटा आला ..
अगदी असंच काहीसं वाटतं नेहेमी अश्या वस्तू हाताळल्या कि !
मनीमोहोर, Happy खरच आमच्या सगळ्यांच्या मनाच्या कप्प्यातलं गुपित ओळखून लिहिलेला लेख !

मनीमोहोर, हा ही अतिशय सुंदर लेख...
तुमच्या लिखाणाची जातकुळीच खूप सुंदर असते, आपल्या पूर्वापार परंपरांचे पेड गुंफणारी..

ममो, माझे कसले आभार
शांता शेळक्यांची शब्दकळाच इतकी लोभसवाणी आहे
आणि प्रत्ययकारी आहे आणि त्यांनी जे पद्यात लिहिलंय तशाच धर्तीवर तू गद्यात लिहिलंयस, वाचल्यावर प्रतिसादास शब्द सुचेना.
तुझेच आभार

मनीमोहोर, Happy खरच आमच्या सगळ्यांच्या मनाच्या कप्प्यातलं गुपित ओळखून लिहिलेला लेख !>> अंजली थँक्यू सो मच.

देवकी , वावे फोटो आवडला , सांगितलंत धन्यवाद.

तुमच्या लिखाणाची जातकुळीच खूप सुंदर असते, आपल्या पूर्वापार परंपरांचे पेड गुंफणारी.. >>> निरु, किती छान लिहिलं आहे.

शांता शेळक्यांची शब्दकळाच इतकी लोभसवाणी आहे
आणि प्रत्ययकारी आहे आणि त्यांनी जे पद्यात लिहिलंय तशाच धर्तीवर तू गद्यात लिहिलंयस, वाचल्यावर प्रतिसादास शब्द सुचेना. >>> हार्पेन खूप खूप आभार.

Pages