अनमोल नथ

Submitted by मनीमोहोर on 30 November, 2018 - 11:10

माझ्या आईच्या पश्चात इतके वर्ष बहिणीने संभाळलेली तिची नथ अलीकडेच फार मोठ्या मनाने तिने मला दिली. त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. मला स्वतःला नथ घालणे खरं तर आवडत नाही पण तरी ही आईची नथ तिने मला दिली हा मला माझा सन्मानच वाटला. त्यावेळी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.

आमची आई आज हयात असती तर नव्वदीच्या पुढे असती. तिच्या लग्नात तिच्या सासूबाईंची म्हणजे माझ्या आजीची ही नथ तिला दिली गेली होती. याहून अधिक नथीचा इतिहास माहीत नाही. म्हणजे ती माझ्या आजीला तिच्या आईने/ सासूबाईंनी त्यांची म्हणून दिली होती की तेव्हा ती नवीच घेतली होती वैगेरे. पण तरी ही साधारण शंभर हुन अधिक वर्ष जुनी तरी ती नक्कीच असेल.

माझी आई रोज काही नथ घालत नसे. पण नथ हे सौभाग्याचं लेणं आहे या भावनेने लग्न समारंभात किंवा कार्यप्रसंगी मात्र तिच्या नाकात नथ असेच असे. तसेच चैत्रगौरीच्या किंवा संक्रांतीच्या हळदीकुंकवाला, हरतालिकेच्या किंवा वटसावित्रीच्या पूजेला , गौरी गणपतींना औक्षण करून त्याना घरात घेताना अश्या प्रसंगी ती आवर्जून नथ घालत असे. दररोज घालत नसल्याने नथीची तार जरी अगदी बारीक/पात्तळ असली तरी ती नाकात घालताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारी एक अस्पष्ट वेदना मला आज ही स्पष्टपणे आठवते आहे. पण एकदा का ती नाकात गेली की ती वेदना क्षणार्धात निघून जात असे आणि तिचा चेहरा पुन्हा पहिल्या सारखा प्रसन्न होत असे. दिवाळीत अंगणात ठेवण्यासाठी पणत्यानी भरलेलं सूप जेव्हा ती हातात घेई तेव्हा त्या पणत्यांच्या मंद प्रकाशात उजळून निघालेला नथ घातलेला तिचा चेहरा मला आज ही आठवतोय. जणू काही आईची ही प्रतिमा माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. नथीच्या टपोऱ्या मोत्यांचं तेज तिच्या चेहऱ्यावर पसरलंय हे मला त्या लहान वयातही जाणवत असे. नथीचं काम झाल्यावर इतर कामांच्या गडबडीत ती कपाटात ठेवायला जर तिला वेळ झाला नाही तर नथीची डबी ठेवण्याची तिची आवडती आणि सर्वात सेफ जागा म्हणजे तिच्या नौवारीच केळं ! ती ते जरासं उकलून नथीची छोटीशी डबी त्यात सरकवत असे आणि केळं परत सारख करत असे. नथीची डबी केळ्यात आहे हे कोणाला समजत ही नसे. ज्या स्किलने ती हे करायची ते बघणं तेव्हा ही मला फार आवडायचं. असो. त्या नथीची डबी चांदीची आहे ज्यावर माझ्या आईच नाव कोरलं आहे इंग्लिश मध्ये. ती डबी लॉक करताना तिचा टक असा आवाज येतो. लहानपणी तिची उघड मिट करून तो टक आवाज ऐकणे आमचा टाईम पास असे. अर्थात नथ जेव्हा आईच्या नाकात असे तेव्हाच कधीतरी असा चान्स मिळत असे आम्हाला.

ती नथ माझ्या आईने वापरलेली असल्याने आमच्या साठी ती नथ अनमोलच आहे. कारण त्या नथीवरून हात फिरवताना, ती हातात घेऊन तिला कुरवळताना आम्हाला जणू काही आम्ही आईलाच भेटत आहोत असं वाटतं. आणि त्या निमित्ताने आमच्या लहानपणीच्या आठवणीना उजाळा ही मिळतो. बहिणीकडे सगळे जमलो की एखाद्या दुपारी ती नथ हातात घेऊन बघणे, जुन्या आठवणीत रमून त्यावर गप्पा मारणे हा ठरलेला कार्यक्रम असतो.

इतके वर्ष वापरल्यामुळे तिची बांधणी आता जरा सैलावली आहे. तसेच ती चापाची नसल्याने आणि हल्ली कोणाचे नाक टोचलेलं नसल्याने इच्छा असून ही ती वापरता येत नाही. जुन्या घरावर जरी प्रेम असलं तरी त्याच ही रिनोवेशन करावंच लागत, ते ही काळा प्रमाणे बदलावंच लागत. तस ही नथ ही वापरण्या योग्य करण्या साठी ती चापाची करून घ्यावी ह्या विचाराने आम्ही एका प्रसिद्ध सराफांच्या दुकानात गेलो. ती नथ पर्स मधून काढुन मी काउंटर वर ठेवता क्षणी त्या सेल्समन चे डोळेच चमकले आणि आपण काहीतरी विलक्षण बघतोय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. काहीतरी अनमोल चीज बघितल्याचा पहिला भर ओसरल्यावर ही नथ कशी फार मौल्यवान आहे हे त्याने आम्हाला सांगितले. कारण ती जगप्रसिद्ध बसरा जातीच्या अस्सल मोत्यांची आहे.

आता थोडं बसरा मोत्यांबद्दल... (अर्थात कुतुहलामुळे नेटवरून घेतलेली माहिती) आखाती देशात हे मोती नैसर्गिकपणे म्हणजे पावसाचा थेंब (आपल्याकडे पडतील स्वाती तर पिकतील मोती अशी यथार्थ म्हण ही आहे. )शिंपल्यात पडून तयार होत असत आणि तिथल्या बसरा ह्या शहरात त्यांचा व्यापार चालत असे. त्यावरूनच त्याना बसरा हे नाव मिळालं आहे. त्यावर कोणती ही कृत्रिम प्रक्रिया केली गेली नसल्यामुळे ते नैसर्गिक आणि अगदी अस्सल मानले जातात. सहाजिकच त्यांचा आकार ही अगदी गोल आणि एक सारखा नसतो. आपल्या नैसर्गिक तेजामुळे त्यांना हिऱ्यासारखी नाही पण स्निग्ध चांदण्यासारखी चमक मात्र प्राप्त होते. मला वाटत म्हणूनच मोती हे चंद्राचं रत्न मानत असावेत. अलीकडच्या काळात आखाती देशात तेल विहिरी वाढल्यामुळे हे बसरा मोती तयार होण आता बंद झालं आहे. आता बसरा जातीचे नवीन मोती बाजारात मिळणं शक्य नाही. असेच कुणाकडे असले आणि तुम्हाला मिळाले तरच ! म्हणजे आता ते दुर्मिळ आणि म्हणून अधिक मौल्यवान ही झाले आहेत.

अशी दुर्मिळ चीज आपल्याकडे आहे आणि ती आपल्या आईने वापरली ही आहे ह्या भावनेने दुकानात ही माझे डोळे भरून आले. दुकानातील सर्व विक्रेत्यांना अगदी बोलावून बोलावून ती नथ दाखवण्यात आली. तिची बांधणी नीट निरखून पहाण्यात आली. नथीचा प्रत्येक मोती जरी आकाराने वेगळा असला तरी कारागिराने ते असे काही चपखलपणे गुंफले आहेत की नथीचा आकार फार सुबक झाला आहे.

आईने वापरलेली म्हणून आमच्यासाठी मौल्यवान असलेली ती नथ आता भौतिक जगात ही मौल्यवान झाली आहे. नॅचरली पहिली रिऍक्शन “आहे तशीच राहू दे , कोण देणार मोती बदली होणार नाहीत याचा भरवसा" अशीच होती. त्यामुळे पुनर्बांधणीचा विचार बारगळुन ती परत पर्स मध्ये ठेवली गेली. दुसरी खरेदी करत असताना ही पर्समधील नथीची डबी सारखी चाचपुन पाहिली जात होती. परंतु त्यामुळे विक्रेत्याचा माझ्या पर्समध्ये आणखी काही दुर्मिळ वस्तू असाव्यात असा गोड गैरसमज मात्र झाला.

घरी आल्यावर, भावनेचा पहिला आवेग ओसरल्यावर पुन्हा बुद्धीने विचार करणे सुरू झाले आणि ती जर कोणी वापरावी असे वाटत असेल तर ती चापाची करून घेण्याला पर्याय नाही हा विचार पक्का होऊन ती चापाची करण्यासाठी त्या सराफांना दिली. त्यावेळी माझ्या जणू काही काळजाचा तुकडा काढून मी त्याना देतेय असंच मला वाटत होतं. पुन्हा पुन्हा "नीट करा " अस मी त्याना सांगत होते. कारण ती त्याना देताना मी फार मोठी रिस्क घेत आहे असं मला वाटत होतं. पण त्यांनी तिचा मेक ओव्हर अतिशय छान पद्धतीने करून दिला. नथीचं बदललेलं रूप ही (चापाची केली) तेवढंच सुंदर दिसत आहे. मूळ नथीचं सौंदर्य कुठे ही कमी झालेलं नाहीये हेच खूप मोठं समाधान आहे.

ओरिजनल आणि नवीन नथीचा फोटो

IMG_2018-12-04_14-02-11.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती सुंदर आहे नथ आणि काय लिहिलंय तुम्ही! ग्रेट! आईवरचं प्रेम जाणवतंय अगदी!
नथीच्या टपोऱ्या मोत्यांचं तेज तिच्या चेहऱ्यावर पसरलंय>>>खूप छान वाटलं.

कसला मस्त लेख लिहिलायस ममो ताई.
खरंच पणत्यांचं ताट हाती घेतलेल्या नथ घातलेल्या काकू डोळ्यासमोर आल्या.

शाली , पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.

वेडोबा, अनु खूप खूप आभार प्रतिसादाबद्दल

मस्त आहेत मोती एकदम.
इतक्या अस्सल मोत्यांची नथ त्यावेळी किती महाग असेल असं मनात आलं.

तुमचा लेख आला की लगेच वाचते, कधी कामाच्या घाईत असले की सवडीने वाचावं म्हणून मागे पडतो, कधी प्रतिसाद देण्याचा वेळ आणि मूड पण नसतो पण खूप छान लिहिता अशाच लिहीत रहा. आत्ता मी प्रतिसाद लिहिपर्यंत पाहिला प्रतिसाद आला सुद्धा Happy

छानच लिहिलंय . माझ्या ही आईची अशीच नथ आहे. त्याची आठवण झाली . तिला माझ्या आजीने दिली आहे. चापाची केल्यावर तितकीच व्यवस्थित बसते का ?

अगदी अगदी झालंय मला. ह्या वर्षी च्या भारत वारीत एक नथ घ्यावी असा विचार मनात डोकावत होताच पण आता मात्र आईची नथ, तिचा चेहरा आणि नथीची डबी अगदी डोळ्यासमोर आली. ममो, तुम्ही खुप सुंदर लिहिता. हा लेख आता मी आईलाच वाचायला पाठवणार आहे.

छान आहे नथ. फोटो जरा अजून चांगला हवा होता पण.
माझ्या आईची पण अशीच आहे नथ. मला असले ट्रॅडिशनल प्रकार अजिबात शोभत नाहीत. दुसर्‍यांचे बघायला आवडतात मात्र.

किती छान लिहिलंय ! माझीही एक आठवण... माझ्या पणजीची नथ अशीच वंशपरंपरागत माझ्याकडे चालत आली आहे. तिच्या लग्नात १९०२ च्या सुमारास केलेली आणि ती ठेवायला एक चांदीची सुबक डबीही आहे ज्यावर पणजीचे नाव कोरले आहे. एका पिढीत हस्तांतरण होताना, जिला मिळणार होती तिचे नाक टोचलेले नसल्याने ,नात्यातल्याच एका सराफांकडून मोती खडे तेच वापरून चापाची करून पुन्हा बांधून घेतली. चापाची असल्याने जरा जड वाटते पण दुसऱ्या कशाला त्याची सर नाही. ती घातल्यावर काहीतरी अद्भुत वाटते.

छान आठवण.
आईची आहे अशीच नथ. त्याच्याबरोबर मोत्याच्या बुगड्या पण. शंभर वर्ष जुन्या असाव्यात. बुगड्या जीर्ण झाल्या आहेत. नथ मात्र अजुनही मस्त आहे. जड आहे खर खुपच. नथ चाफेकळी नाकाला छान दिसत अस आपल माझ मत. आमच नाक नकटं त्यामुळ नथीच्या भानगडीत पडत नाही. एकदा एक अगदी बारीक नथ घालून बघितली तर ते नकट नाक पण दिसेना. लोल.

आहाहा गोड लेख, सर्व डोळ्यासमोर आले. नथही फार छान.

माझ्या आईकडे पण फार सुरेख नथ आहे.

खूपच सुंदर लेख लिहिला आहे ...नथ तर अप्रतिमच आहे आणि तुम्ही माहिती ही छान दिलेत... नवीन माहिती समजली मोत्यांची...माहिती बद्दल धन्यवाद Happy

खूप सुंदर लेख, सुपातल्या पणत्यांनी चेहरा उजळलेली स्त्री नजरेसमोर आली. माझ्या चेहऱ्याला नथ कधीच सूट होणार नाही, पण नथ घातलेला चेहरा मला फार सुंदर आणि सोज्वळ वाटतो. दुसऱ्यांदा नजर टाकवीशी वाटतेच.

सुरेख लेख आणी आठवणी !! ममो, मोती अप्रतीम आहेत गं !!! काय ठसठशीत आहे ही नथ. मस्त!!

खूप सुंदर!!
एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटकात आई-मुलीचा एक संवाद आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दागिन्यांबद्दल आई म्हणते की ते दागिने घातले की वाटतं, किती जणींचे हात, किती जणींचे गळे या दागिन्यांना लागले असतील. ते दागिने घातले की आपल्या देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या पूर्वज बायका उभ्या राहून आपल्याकडे पाहतायत असं वाटायचं.
मला दागिन्यांची फारशी आवड नाही. पण ही भावना फार छान असते. नाटकातलं हे वाक्य वाचून अंगावर काटा आला होता.

मनीमोहोर, लेख नेहमीप्रमाणेच उत्तम! तुम्ही फार छान लिहीता.
वावे, मलाही दागिन्यांची आवड नाही. पण तुम्ही लिहीलेलं वाक्य नाटक बघताना माझ्याही मनाला भिडलं होतं. आज माझ्या सासूबाई जगात नाहीत. पण त्यांचे दागिने हाताळताना हा लेख आणि तुमची ही प्रतिक्रिया आठवेल, हे निश्चित.

छान!

सासुकडून सुनेकडे आणि मग आईकडून मुलीकडे. मुलगा-सून नसल्यासच मुलींकडे जातात का दागिने? की असे काही नाही?

म.मो, मस्त लेख! ती नथ पाहून आजीच्या नथीची आठवण झाली.चांदीच्या डबीत ती नथ आसे.नंतर आईला मिळाली,तिच्या सुनेसाठी! आईचे नाकच टोचले नव्हते.त्यामुळे ती नथ तशीच पडून होती.आईने तिच्या सुनेला दिली आहे.

एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटकात आई-मुलीचा एक संवाद आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दागिन्यांबद्दल आई म्हणते की ते दागिने घातले की वाटतं, किती जणींचे हात, किती जणींचे गळे या दागिन्यांना लागले असतील. ते दागिने घातले की आपल्या देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या पूर्वज बायका उभ्या राहून आपल्याकडे पाहतायत असं वाटायचं.>>>>> वावे,खरंच एक वेगळा विचार आहे हा.

रच्याकने, माझ्या आजीची खर्‍या जरीची पैठणी शाळेच्या हळदीकुंकवाला नेसले होते.(आईने नेसवलेली).माझ्या भावाची चेष्टा'अग,ती (पैठणी)आजीच्या सासूची असेल.तिला इसब वगैरे झाले असेल तर तुला होईल, कारण या साड्या धूत नाहीत इ.'माझा जाम मूड गेला होता त्यावेळी.

मस्त लेख आणि नथ ममो Happy
एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटकात आई-मुलीचा एक संवाद आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दागिन्यांबद्दल आई म्हणते की ते दागिने घातले की वाटतं, किती जणींचे हात, किती जणींचे गळे या दागिन्यांना लागले असतील. ते दागिने घातले की आपल्या देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या पूर्वज बायका उभ्या राहून आपल्याकडे पाहतायत असं वाटायचं.>>> हे खूप आवडलं

मस्त लेख.. मलापण वाडाच आठवलं. फार सुंदर प्रसंग आहे हा नाटकात. झिम्मा मध्ये बाईंनी पण लिहिले आहे ह्यावर. पूर्ण स्टेजवर अंधार आणि फक्त मोठया सुनेवर लाईट. तिने ते सारे दागिने घातलेत आणि तीच्या तोंडी वावेंनी लिहिलेली वाक्ये... असो फारच अवांतर.☺️

Pages