पूर्वपीठिका
द्वारका, कृष्णाची नगरी. कृष्ण आपल्या कक्षात फलाहार करत होता. "नारायण नारायण" च्या जापाने त्याचे लक्ष वेधले गेले. आज नारदमुनि एकटे नव्हते. सोबत कोणीतरी होते. ओळख पटायला फार वेळ लागला नाही.
"कालिया!" कधीकाळी यमुनेच्या डोहात वास्तव्यास असलेला कालिया नाग आज इथे कसा काय?
"प्रणाम भगवंत. आजच मी कालियाशी बोलत होतो की सध्या तुम्ही नागजमातीवर वरांचा वर्षाव करत आहात. बलरामदादांच्या सांगण्यावरून कलियुगात शेषनागावर एक अखंड सिनेमा बनण्याचे वरदान तुम्ही दिले आहेतच. मग मी म्हटलं की कालियाराव, बघा तुम्हाला सिनेमात काही रस असला तर. भगवंतांचा मूड आहे तोवर घ्या मागून वरदान!" आपले 'कळलाव्या' नाव सार्थ करत नारद म्हणाले. आता काही इलाज नव्हता, कृष्णाने कालियाला वर मागण्यास सांगितले.
"देवा, फार जुनी गोष्ट नाही. तुम्ही बासरीच्या मधुर सुरांवर मला डोलायला लावत माझ्या डोक्यावर नाचलात. तुम्हाला बासरी वाजवण्याचा अनुभव तर मिळाला पण तुम्हाला डोलायचा अनुभव नाही मिळाला. तरी माझी अशी इच्छा आहे की एकतरी असा सिनेमा बनावा ज्यात तुम्ही डोलता आणि इतर कोणीतरी सुरावट वाजवेल."
"अरे जर मी डोलायला लागलो तर बासरीतून पुंगीचे स्वर काढायला ऋषी कपूर येणार आहे का? मुनिवर आता तुम्हीच काहीतरी तोडगा सुचवा."
"भगवंत आपण तर सर्वज्ञ आहात. मी पामर आपल्याला काय सल्ला देणार? तरी भविष्यपुराणानुसार नितीश भारद्वाज नामे मनुष्य तुमची भूमिका वठवणार आहे. त्याच्याकरवी कदाचित ...."
"उत्तम विचार. कालिया, हा वर तुला पटतो का सांग. कलियुगात "डबल रोल" नामक तंत्र विकसित केले जाईल ज्यानुसार सिनेमात एकच अभिनेता किंवा अभिनेत्री दुहेरी भूमिका साकारू शकेल. तसेच या नितीश भारद्वाजाची 'कृष्ण' म्हणून प्रतिमा बनणार हे विधिलिखित आहे. त्यानंतर एक असा सिनेमा येईल ज्याच्यात नितीश पुंगीही वाजवेल आणि पुंगीच्या सुरांवर डोलेलही"
"मला हा वर मान्य आहे भगवन्"
"तथास्तु!"
******
(फास्ट फॉरवर्ड टू इसवी सन १९८९) लेखक, दिग्दर्शक मोहनजी प्रसाद "व्याहुत" यांचे घर
"सर सर सर, साईडप्लॉटसाठी ही आयडिया कशी वाटते इच्छाधारी नाग आणि गारुडी असा डबल रोल!"
"सुप्पर!! बाकी मसाला तर आहेच. पण तुला इतक्या चांगल्या आयडिया कधीपासून यायला लागल्या?"
"कोणीतरी तंबोरावाला होता, ही त्याची कल्पना" हे शब्द त्याने प्रयत्नपूर्वक टाळले.
"हिरोईन म्हणून आपली मीनाक्षी आहेच, औरत तेरी यही कहानी नुकताच केला आहे तिने आपल्या टीमसोबत. त्या नितीशच्या डेट्स मिळतात का बघ, सध्या महाभारतानंतर भरात आहे."
"ओके सर"
~*~*~*~*~*~*~
शेषनागनंतर नागपटांच्या अभ्यासक्रमातला पुढचा धडा आहे नाचे नागीन गली गली. नाचे नागीन गली गली आपल्याला वर नमूद केलेल्या गारुडी-नाग डबल रोल खेरीज, तांत्रिक सिद्ध पुरुष, बिछडलेला मुलगा, शाप देणारी आई, मानलेली आई, जबरदस्तीची आई, गारुड्यांच्या कबिल्यात राहणारी नागीण आणि सदाशिव अमरापूरकर असे बंपर पॅकेज आहे.
१) व्हिलनची एंट्री
अवांतरः माझे एक ह्युरिस्टिक आहे की जर पहिला सीन व्हिलनचा असेल आणि सिनेमा ८८-९६ या कालावधीतला असेल तर तो नि:संशय विश्लेषण करण्याकरिता बनलेला आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण १९९४ चा मॅडम एक्स!
१.१) सगळ्या गुरु-शिष्यांची गोष्ट गुरुपौर्णिमेला सांगण्यासारखी नसते
सुरुवात एका आश्रमाच्या दृश्याने होते. आश्रमाचे डिझाईन फार इंटरेस्टिंग आहे. सिमेंटच्या कुटिरांमध्ये शिष्यगण राहत असावेत. एक रँडम शिष्य स्टीलची बादली घेऊन चालला आहे. कुटिरांची छपरे उतरती आहेत. म्हणजे कथानक पर्जन्यमान अधिक असलेल्या एखाद्या प्रदेशात घडते. पण इतक्या चांगल्या लॉजिकवर हिंदी सिनेमांचा विश्वास नसल्याने प्रेक्षकाला कळते की सिनेमात एकदाही पाऊस पडणार नाही आहे. पत्र्याच्या छपरावर गवत पसरवून हा आश्रम जंगलात असल्याचे पटवून देण्याची पराकाष्ठा केली गेली आहे. तर अशा आश्रमाचा प्रमुख असतो सत्येन कप्पू आणि त्याचा पट्टशिष्य असतो सदाशिव अमरापूरकर!
आश्रमाचे पावित्र्य दाखवण्यासाठी सगळे भगवी वस्त्रे घालून बसलेले असतात. सदाशिव अमरापूरकरचे नाव नरसिंगदेव असते. तो सत्येन कप्पूसमोर हात जोडून बसलेला दाखवला आहे. सत्येन कप्पू प्रेक्षकांना सांगतो की याच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याने याला भारी भारी सिद्धी प्रदान केल्या आहेत. आता याच्या सारखा तांत्रिक दुसरा कोणी नाही. पण नरसिंगदेवला आणखी एक विशिष्ट सिद्धी हवी असते. तिचा वापर केला की मोठ्यातला मोठा सिद्ध पुरुष सुद्धा कैद होईल असा एक पिंजरा तयार होत असतो. या सिद्धीविषयी सांगण्यापूर्वी थोडेसे स.अ. च्या वेषभूषेविषयी - केसांमध्ये मधूनच चंदेरी रंगाचे फराटे ओढले आहेत तर काळी खोटी मिशी लावून तिच्या टोकांना पांढरे मिशांचे खुंट जोडले आहेत. यामागे दोन कारणे असू शकतात - १) एक अखंड मिशी मिळालीच नाही २) सत्येन कप्पूच्या धवल दाढीला कॉंट्रास्ट यावा आणि हा व्हिलन असल्याचे ठसावे. आता असेल ते असेल पण असा हा नरसिंगदेव ती सिद्धी मागतो.
सत्येन कप्पू विचारतो "दुरुपयोग तो नही करोगे?" यावर स.अ. चा चेहरा - "कप्पूऽऽऽ तुजा माज्यावर भरवसा नाय काय?" बिचारे गुरुदेव भोळे असल्याने त्यांचा स.अ. वर स्वतःपेक्षा अधिक विश्वास असतो. हरि ओम् म्हणताच त्यांच्या ओंजळीत मोती प्रकट होतात. ते ओंजळभर मोती स.अ. ला देऊन ते सांगतात की हरि ओम् चा जाप करून तू यांची एक माळा बनव. मग तो पिंजरा प्रकट होईल. जोवर ती माळा आहे तोवर तो पिंजरा आहे. हे सर्व चालू असताना मागून डी कॉर्डमध्ये (बहुधा) बेस गिटार वाजत राहते. लगेच नरसिंगदेव ती माळा तयार करतो. हे सगळे बघायला शिष्यगण गोळा होतात. यांच्याकडे महान टेलिपोर्टेशन पॉवर्स आहेत. आधी सत्येन कप्पू आणि स.अ. चा एक शॉट आहे ज्याच्यात बॅकग्राऊंडला एक शिष्य मस्त झाडाला टेकून झोपला आहे. पुढच्याच सेकंदाला तो पाच शिष्यांच्या मॉब शॉटमध्ये बॅकग्राऊंडला येतो. या पाच शिष्यांच्या मॉबशॉटमध्ये उजव्या बाजूला एक दाढीवाला आहे. त्यानंतर दोनच सेकंदात सात शिष्यांचा आणखी एक मॉब शॉट आहे ज्याच्यात हा दाढीवाला एकटा रिसायकल केला गेला आहे. त्याची दाढी बदलून प्रेक्षकांना हा वेगळा शिष्य आहे हे पटवून देण्याची पराकाष्ठा गेली आहे.
जसा जसा एक एक मोती ओवला जातो तसा तसा पिंजरा तयार व्हायला लागतो. हे सगळे चालू असताना स.अ.च्या मागे एक गाय "आय डोंट गिव्ह अ डॅम अबाऊट दीज हूमन्स" भावाने चारा खाण्यात रमली आहे. पिंजरा पोपटाच्या बसण्यासाठी रेडिमेड दांडी सकट येतो. नरसिंगदेव सॉफ्टवेअर टेस्टर असल्याने "सॉफ्टवेअर तर तयार झाले गुरुदेव पण अजून टेस्टिंग झाले नाही आणि तुमच्या पेक्षा अधिक चांगली टेस्टकेस ती कोणती?" हा बहाणा बनवून सत्येन कप्पूचा पोपट करतो - आय मीन इट, शब्दशः पोपट करतो. पोपटरुपी गुरुदेव टेस्टिंगसाठी पिंजर्यात स्वतःहून कैद होतात. टेस्टिंग होते आणि आता गुरुदेव आपल्याला बाहेर काढण्याची विनंती करतात. नरसिंगदेवचा चेहरा - येडा समजतो का मला? गुरुदेव वगळता नरसिंगदेवइतका चमत्कारी तांत्रिक दुसरा कोणी नसतो. वर साळसूदपणे तो सुनावतो "भस्मासुराने तर आपल्या वरदात्या शंकराला भस्म करण्याचा प्रयत्न केला होता. मी तर तुमचे नित्य दर्शन व्हावे म्हणून फक्त कैद करून ठेवतो आहे." सगळे शिष्य लगेच नरसिंगदेवची गुलामी कबूल करतात.
१.२) शाप देणारी आई
देवराज नामक एका रँडम ठाकूरच्या जमिनीवर नरसिंगदेव कब्जा करतो. याने हा ठाकूर भलताच खवळतो आणि आपली माणसे पाठवून जमीन परत घ्यायला बघतो. या ठाकूरची आई असते सुहास जोशी. सुहास सांगते की नरसिंगदेव फार मोठा तांत्रिक आहे तू त्याच्याशी पंगा नको घेऊस. पण पोरगं हट्टाला पेटलेलं असतं. नरसिंगदेव आता एका आलिशान हवेलीत राहत असतो. हवेलीच्या दिवाणखान्यातच एक कालिमातेची मूर्ती असते. मूर्तीमागच्या भिंतीवर सापांचे चित्र काढून इच्छाधारीवाला मोटिफ अधोरेखित केला आहे. मूर्तीसमोर एक हवनकुंड असते. स.अ. ने आता भगवी वस्त्रे टाकून देऊन कवड्या लावलेले काळे कपडे परिधान केलेले आहेत. बायकोचा सबुरीने घेण्याचा संदेश धुडकावून लावत स.अ. या आधी कधीच न ऐकलेला तांत्रिकांचा मंत्र म्हणतो
"ऊर्ध्वमूल अधः शाखं अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदासि यस्य पर्णानि यस्तं वेदसवेदवित्"
...........
..........
..........
शॉकमधून सावरण्यासाठी दोन मिनिटे घेऊन भेदरलेला प्रेक्षक पुढचा सिनेमा बघू लागतो. एका पळीने विभूती हवन कुंडात टाकतो. इतका वेळ ते कुंड विझलेले असते. पण विभूती टाकताच कुंडात अग्नि प्रकट होतो आणि एक अग्निगोल प्रकट होतो. अग्निगोलास स.अ. आज्ञा देतो की जाऊन देवराजला भस्म कर. इथे स.अ.ची बायको प्रेक्षकांच्या मनातली प्रतिक्रिया देते - प्रतिक्रिया. तो अग्निगोल मग जाऊन देवराजला भस्म करतो. इथे आपल्याला ग्रीन स्क्रीनवर हातात मशाल उर्फ अग्निगोल घेऊन धावणार्या माणसाची अस्पष्ट आकृती दिसू शकते.
देवराजला भस्म करून अग्निगोल परत कुंडात येतो आणि कुंडातली आग विझते. स.अ. ला कामगिरी फत्ते झाल्याचे लक्षात येऊन तो खुश होतो. इथे अग्निगोलाचा पाठलाग करत सुहास जोशी स.अ.च्या हवेलीत येते. ती मुलगा गेल्याच्या दु:खात शिव्यांची लाखोली वाहते. मग ती त्याला शाप देते - तू कोडी बन जाएगा. तेरा एक एक अंग गल गल कर गिरेगा. आता असा शाप दिल्यावर एवढा मोठा तांत्रिक कसा शांत बसेल. मग तो तिला "तेरी मौत तुझे बकवास करने पर मजबूर कर रही है, ले मर" असे म्हणून पुन्हा हवनकुंड प्रज्ज्वलित करतो आणि बायकोच्या विरोधाला न जुमानता गीतेतला आणखी एक श्लोक म्हणून सुहास जोशीवर पाणी फेकतो. याने सुहास जोशी नक्की का मरते हे अजून कळू शकलेले नाही कारण ती उगाचच पाच सहा वेळा नहीं म्हणते पण बाकी हार्ट अॅटॅक, जळून मरणे वगैरे कोणतीच सिंप्टम्स दिसत नाहीत. तिच्या लाशला मग याचे शिष्य नदीत फेकून देतात.
दुसर्या दिवशी रेघारेघांचा शर्ट आणि रेघारेघांचा पायजमा घालून झोपलेल्या नरसिंगदेवला उठवायला त्याची बायको चहा घेऊन येते. चहा घ्यायला तो हात पुढे करतो आणि त्याच्या लक्षात येते की आपला डावा अंगठा वितळत आहे. याने दोन गोष्टी सिद्ध होतात - १) नरसिंगदेव सव्यसाची आहे (कारण तो आहुती उजव्या हाताने देतो पण चहा डाव्या हाताने घेतो), २) जोशीबाईंचा शाप फळला आहे. हे लक्षात येताच स.अ. ची जाम तंतरते.
२) हिरो-हिरोईन की एंट्री
२.१) पुढच्यास ठेच मागच्यास शहाणा हे खरे असले तरी याचा अर्थ पुढचा शहाणा होत नाही. तो परत परत ठेचकाळतच राहतो.
आपल्या दगाबाज शिष्याची ही अवस्था बघून सत्येन कप्पू पिंजर्यात बसून खदाखदा हसतो. कप्पू आधी त्याची नीच, अधम, दुष्ट, पापी अशा शब्दांत संभावना करतो. स.अ. भगवान शंकराची शपथ घेऊन प्राणांची भीक मागतो तरी कप्पूजी बधत नाहीत. मग तो "मी तुमचा दास होऊन राहीन" असे वचन देतो आणि गुरुदेव म्हणतात "ठीक हैं". या शापातून मुक्त होण्याचा अतिशय स्पेसिफिक उपाय
नरसिंगदेवला अमरकुंडात स्नान करावे लागेल. अमरकुंडात पोहोचण्यासाठी इच्छाधारी नागाची मणी मिळवावी लागेल. हा इच्छाधारी नाग आपल्या नागीणीसोबत दर पौर्णिमेच्या रात्री काळ्या पर्वतावर येतो. तोवर सड-गलकर मरू नये म्हणून "ओम् नमः स्वाहा" या मंत्राचा एक कोटीवेळा जाप केल्यास ही सड-गल प्रोसेस पंधरा वर्षांसाठी थांबेल.
स.अ. लगेच भगव्या वस्त्रांत येऊन जाप सुरु करतो आणि जवळपास बारा मिनिटांनंतर श्रेयनामावली पडद्यावर झळकते. इंटरेस्टिंगली इथे पहिले नाव मीनाक्षी शेषाद्रीचे आहे, हिरो नितीश भारद्वाजचे नाही. क्रेडिट्स संपेपर्यंत स.अ.चा जाप पूर्ण होतो आणि त्याचा कोड तात्पुरता बरा होतो. कप्पू मग त्याला आपल्याला स्वतंत्र करायला सांगतो. "आधी अमरकुंड तर मिळू दे" करून तो त्याला पुन्हा चुना लावतो. सुभद्रा (त्याची बायको, कृष्णकथेचा मोटिफ) ला गुरुदेवांच्या दाणापाणीची व्यवस्था करायला सांगून तो निघून जातो. (इथे सत्येन कप्पूची "दुष्ट पापी" वाली डायलॉग डिलीव्हरी बघण्यासारखी)
२.२) नाग सरपटणारा प्राणी आहे म्हणून इच्छाधारी नागांनीही सरपटलेच पाहिजे
काळा पर्वत आश्चर्यजनकरित्या निळसर प्रकाशात न्हाऊन निघालेला आहे. डच अँगलमध्ये, खराब शॉटमध्ये नागाचे चित्र तरंगत पर्वतावर येते. तोंडातून एक मणी काढून ते जमिनीवर ठेवते. मग त्या नागाचा भरजरी कपडे घातलेला नितीश भारद्वाज बनतो. हा महाभारताच्या सेटवरून थेट इथे आला असावा. थोडे "आ आ आ आ" आणि "ओ ओ ओ ओ" होते व मीनाक्षी शेषाद्रीची एंट्री होते. नागाच्या मानाने नागीण बरीच कमी नटली आहे जे बॉलिवूडसाठी जरा रेअर आहे. तरी केसांत नाग हेअर बँड घालून एका बाजूने पोंगा सोडलेला. नाग टिकली, जरीकाम केलेला गुलाबी स्कर्ट, पर्वतावरच्या धबधब्यात नाचता येईल या दृष्टीने घातलेली चोळी असा सरंजाम आहे. तरी हे दोघे सुसह्य आहेत. सेट अप होताच पुंगीच्या बॅकग्राऊंड मुझिकवर नितीन मुकेश "मिले मन से ये मन मिले तन से ये तन आयी मधुर मिलन की सुहानी रैना" करून रडू लागतो. सोबत म्हणून साधना सरगम ताई "जागी मन में तपन लागी तन में अगन, आज अगन से अगन बुझा दे सजना" करून साथ देऊ लागतात. याला पहारा म्हणून स.अ. शतपावली करतो आहे.
गाणं मोठं रंजक आहे. दोघांपैकी कोणाच्याही तनात अगन लागल्याचे जाणवत नाही. शेषाद्रीताईंनी आडनावाला जागणारी नागीण काही वठवलेली नाही. त्यांनी भरत नाट्यम्, कुचिपुडी, कथक, आणि ओडिसी नृत्यकलांचे शिक्षण घेतले खरे पण श्रीदेवी स्कूल ऑफ स्नेक डान्सिंगमध्ये त्या गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे नृत्य शास्त्रीय नृत्य वाटत राहते. त्यातही त्यांनी भर कंबर, मान आणि डोळे हलवण्यावर दिलेला आहे. नितीशने उर्वरित अवयव (त्याचे स्वतःचे, मीनाक्षीचे नव्हे) हलवून मानवी शरीराचा कोटा पूर्ण केला आहे. एक कडवे झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की एवढे ढीगभर कपडे घातल्याने ती अगन आणि सुहानी रैना सगळं व्यर्थ चाललं आहे. मग मीनाक्षी चोळी काढून नुसतेच झुळझुळीत पातळ नेसते तर नितीश खालचे निळ्या रंगाचे वस्त्र आणि गळ्यातल्या माळा वगळता सर्व काढून टाकतो. एव्हाना नृत्यदिग्दर्शकालाही जाग आलेली असते. मग त्या दोघांना झाडावरून सरपटत धबधब्याने निर्माण झालेल्या तळ्यात जायला सांगतो, कारण ते नाग आहेत ना. इथे हे लोक सोयीस्कर रित्या विसरतात की नाग अर्थात इंडियन कोब्रा झाडांवर राहत नाही, झाडांवर राहणारा (arboreal) भारतीय साप अजगर! तसेच त्या धबधब्याची नदी होत नाही हे भौगोलिक आश्चर्यही आपल्याला बघायला मिळते. मग थोड्या पोजेस मारल्यानंतर त्यांची तने एकदाची एकमेकांना मिळतात. पण परमोच्च बिंदू येणार तर त्याजागी नरसिंगदेव येतो.
३) कॉम्प्लिकेटेड प्लॉटचा सेटअप इलॅबोरेट असावा लागतो
३.१) गाव तिथे जत्रा
स.अ. ला बघून ते दोघे नागरुपात पळ काढतात. स.अ. मग एक पुंगी पैदा करून त्यांना शोधायला लागतो. पुंगीच्या कर्णकटू आवाजाला वैतागून ते परत मनुष्यरुपात येतात. पण काही अनाकलनीय कारणाने ते लहान मुलांचे रुप घेतात. नितीश बनतो मास्टर आलोक आणि मीनाक्षी बनते बेबी गुड्डू. हे स.अ.च्या नजरेतून सुटलेले नसते. दोघे धावत धावत पोहोचतात एका जत्रेत. इथे दोघा बालकलाकारांनी दमल्याचा न भूतो न भविष्यति असा अभिनय केला आहे. साधारण गावाच्या विरंगुळ्याची चव लक्षात यावी म्हणून एक बाई बाप्याचा वेष घालून दुसर्या बाईला छेडत "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" या गाण्यावर नाचताना दाखवली आहे. तर अशा गावच्या जत्रेत श्रीराम लागू आणि आशालता आपल्या सुपुत्रास घेऊन आले आहेत. आणि त्यांचा सुपुत्र आहे - मास्टर आलोक! इथे डबल रोलची भानगड अनुभवी प्रेक्षकास लगेच समजू शकते. त्या अजाण बालकाने देवदर्शनाआधी मेला बघण्याचा हट्ट धरलेला असतो. सुदैवाने हे साल २००० नाही. अन्यथा किमान ट्विंकल खन्नाच्या त्या गाण्याच्या भीतिने तरी त्याने मेला बघण्याचा हट्ट धरला नसता.
इथे नरसिंगदेवही जत्रेच्या ठिकाणी पोहोचतो. तो नागजोडप्याला शोधत, पुंगी वाजवत जत्रेत हिंडू लागतो. त्याच्या पुंगीच्या आवाजाने वैतागून जत्रेतला एकही व्यक्ती त्याच्याकडून पुंगी हिसकावून, त्याच्या पेकाटात लाथ घालत नाही हे विशेष! आपल्या मास्टर आलोक (नाग) आणि बेबी गुड्डूला मात्र या पुंगीचा त्रास होऊ लागतो. इतक्या वर्षात एकाही इच्छाधारी नागाला न सुचलेले शहाणपण ते दाखवतात. कानात बोटे घालतात. पुंगीचा आवाजच ऐकू येत नाही तर हे डोलणार कसे? एका कँपा कोला विकणार्या गाडीमागे ते लपतात. तिथून चालत जाणारा नरसिंगदेव कोला पीत नसल्याने नजर फिरवतो आणि त्या दोघांच्या शेजारून निघून जातो. हे सर्व घडल्यावर एकदाचे व्हायचे तेच होते - जत्रेत या दोघांची चुकामूक होते आणि ते हरवतात.
३.२) जत्रेत लहान मुले हरवली नाही तर त्या जत्रेला काय अर्थ आहे
दोन हरवलेल्या मुलांना कोणीही जत्रेच्या "हरवलेली मुले" केंद्रात का देत नाही हा प्रश्न आपण सोडून देऊ. मुख्य गोष्टी अशी की आपल्याला या दोघांची नावे कळतात. मीनाक्षीचे नाव आहे मोहिनी आणि नितीशचे नाव आहे नागेश. बाकी ते "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" चालूच आहे. त्या गाण्याची कोरिओग्राफी डबल मिनींगच्या दृष्टीने अभ्यासण्याजोगी आहे. इकडे मास्टर आलोक (नाग) आणि मास्टर आलोक (मानव) यांची भेट होते. इथे कंटिन्यूटी मिस्टेक आहे. आधी शॉटमध्ये मास्टर आलोक (मानव) मँगो डॉली (चोकोबार सारखे आईसक्रीम) खात असतो. ती थोडीफार खाऊन झालेली असते (काडीचे दुसरे टोक दिसत आहे इतपत खाऊन झाली आहे). कट टू मास्टर आलोक (नाग). कट टू मास्टर आलोक (मानव) जो म्हणतो की "अरे". इथे याच्या हातात अजिबात न खाल्लेली नवीन कांडी आलेली आहे. ते दोघे आपल्या सारखाच दिसणारा दुसरा मास्टर आलोक बघून प्रसन्नपणे हसतात. काही कारणाने जत्रेत दोन भिल्लही आलेले असतात. ते मास्टर आलोक (मानव) वर कांबळे टाकून त्याला पळवून घेऊन जातात. याने मास्टर आलोक (नाग) भलताच क्रुद्ध होतो.
स्टीलच्या भांड्यांच्या स्टॉलमधून डॉ. लागू आणि आशालता काहीतरी खरेदी करत असतात. इथे स्पष्ट दिसते की प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना चिनीमातीच्या सहा कपांचा सेट दिला आहे, स्टीलच्या भांड्यांच्या स्टॉलवर. मग त्यांच्या लक्षात येते की अरे आपलं पोरगं जागेवर नाही. इथे कळते की मास्टर आलोक (मानव) चे नाव कमल आहे. यांचा नोकर भोला, ज्याने कमलवर लक्ष ठेवणे अपेक्षित असते तो "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" बघण्यात मग्न असतो. तोही मग यांच्याबरोबरीने कमलला शोधायला लागतो. इकडे कमलला त्या भिल्लांनी बळी द्यायला आणलेले असते. ते कमलचा बळी देणार इतक्यात तिथे नागेश येऊन त्यांना चावतो आणि कमलचा जीव वाचवतो. हे झाल्यावर त्याला आठवण होते की अरे मोहिनीला तर आपण मागेच सोडून आलो. क्यू तिचा रडण्याचा शॉट. पण दैवाला काही वेगळेच मंजूर असते. ते नोकर लोक नागेशला कमल समजून शब्दशः उचलून घेऊन जातात. आशालता आईच्या ममतेने त्याची विचारपूस करते. आधी तो कमल असल्याचे नाकारतो पण दुरून स.अ. येताना दिसताच तो आढेवेढे न घेता लागू आणि आशालता बरोबर जातो.
इकडे रमत गमत चाललेल्या स.अ. ला मरून पडलेला भिल्ल दिसतो. भिल्लाला साप चावल्याचे स्पष्ट असतेच पण स.अ. एका सेकंदात याला चावणारा इच्छाधारी नागच आहे हे ठरवतो. नजर वळवताच त्याला बलिवेदीवरचा कमल दिसतो. आश्चर्याची बाब अशी इच्छाधारी नागाचा दंश ओळखता येत असला तरी स.अ. ला इच्छाधारी नाग आणि माणूस यांच्यात फरक करता येत नसतो. त्यामुळे तो कमलला उचलून घेऊन जातो.
पुढे कमलचे काय होते? आपण घरात आणलेला मुलगा इच्छाधारी नाग आहे हे आशालता आणि श्रीरामना समजते का? मधल्या काळात असे काय घडते की मोहिनीवर गल्लो गल्ली नाचण्याची पाळी येते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स.अ. ला अमरकुंड सापडते का? तसेच सत्येन कप्पूची मुक्तता होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार. पण एका अल्पविरामानंतर प्रतिसादांत - उरलेले रसग्रहण प्रतिसादांत.
तो गे लोकान्चा समर्थक पण आहे
तो गे लोकान्चा समर्थक पण आहे
Pages