नाचे नागीन गली गली

Submitted by पायस on 26 November, 2018 - 02:51

पूर्वपीठिका

द्वारका, कृष्णाची नगरी. कृष्ण आपल्या कक्षात फलाहार करत होता. "नारायण नारायण" च्या जापाने त्याचे लक्ष वेधले गेले. आज नारदमुनि एकटे नव्हते. सोबत कोणीतरी होते. ओळख पटायला फार वेळ लागला नाही.
"कालिया!" कधीकाळी यमुनेच्या डोहात वास्तव्यास असलेला कालिया नाग आज इथे कसा काय?
"प्रणाम भगवंत. आजच मी कालियाशी बोलत होतो की सध्या तुम्ही नागजमातीवर वरांचा वर्षाव करत आहात. बलरामदादांच्या सांगण्यावरून कलियुगात शेषनागावर एक अखंड सिनेमा बनण्याचे वरदान तुम्ही दिले आहेतच. मग मी म्हटलं की कालियाराव, बघा तुम्हाला सिनेमात काही रस असला तर. भगवंतांचा मूड आहे तोवर घ्या मागून वरदान!" आपले 'कळलाव्या' नाव सार्थ करत नारद म्हणाले. आता काही इलाज नव्हता, कृष्णाने कालियाला वर मागण्यास सांगितले.
"देवा, फार जुनी गोष्ट नाही. तुम्ही बासरीच्या मधुर सुरांवर मला डोलायला लावत माझ्या डोक्यावर नाचलात. तुम्हाला बासरी वाजवण्याचा अनुभव तर मिळाला पण तुम्हाला डोलायचा अनुभव नाही मिळाला. तरी माझी अशी इच्छा आहे की एकतरी असा सिनेमा बनावा ज्यात तुम्ही डोलता आणि इतर कोणीतरी सुरावट वाजवेल."
"अरे जर मी डोलायला लागलो तर बासरीतून पुंगीचे स्वर काढायला ऋषी कपूर येणार आहे का? मुनिवर आता तुम्हीच काहीतरी तोडगा सुचवा."
"भगवंत आपण तर सर्वज्ञ आहात. मी पामर आपल्याला काय सल्ला देणार? तरी भविष्यपुराणानुसार नितीश भारद्वाज नामे मनुष्य तुमची भूमिका वठवणार आहे. त्याच्याकरवी कदाचित ...."
"उत्तम विचार. कालिया, हा वर तुला पटतो का सांग. कलियुगात "डबल रोल" नामक तंत्र विकसित केले जाईल ज्यानुसार सिनेमात एकच अभिनेता किंवा अभिनेत्री दुहेरी भूमिका साकारू शकेल. तसेच या नितीश भारद्वाजाची 'कृष्ण' म्हणून प्रतिमा बनणार हे विधिलिखित आहे. त्यानंतर एक असा सिनेमा येईल ज्याच्यात नितीश पुंगीही वाजवेल आणि पुंगीच्या सुरांवर डोलेलही"
"मला हा वर मान्य आहे भगवन्"
"तथास्तु!"

******

(फास्ट फॉरवर्ड टू इसवी सन १९८९) लेखक, दिग्दर्शक मोहनजी प्रसाद "व्याहुत" यांचे घर

"सर सर सर, साईडप्लॉटसाठी ही आयडिया कशी वाटते इच्छाधारी नाग आणि गारुडी असा डबल रोल!"
"सुप्पर!! बाकी मसाला तर आहेच. पण तुला इतक्या चांगल्या आयडिया कधीपासून यायला लागल्या?"
"कोणीतरी तंबोरावाला होता, ही त्याची कल्पना" हे शब्द त्याने प्रयत्नपूर्वक टाळले.
"हिरोईन म्हणून आपली मीनाक्षी आहेच, औरत तेरी यही कहानी नुकताच केला आहे तिने आपल्या टीमसोबत. त्या नितीशच्या डेट्स मिळतात का बघ, सध्या महाभारतानंतर भरात आहे."
"ओके सर"

~*~*~*~*~*~*~

शेषनागनंतर नागपटांच्या अभ्यासक्रमातला पुढचा धडा आहे नाचे नागीन गली गली. नाचे नागीन गली गली आपल्याला वर नमूद केलेल्या गारुडी-नाग डबल रोल खेरीज, तांत्रिक सिद्ध पुरुष, बिछडलेला मुलगा, शाप देणारी आई, मानलेली आई, जबरदस्तीची आई, गारुड्यांच्या कबिल्यात राहणारी नागीण आणि सदाशिव अमरापूरकर असे बंपर पॅकेज आहे.

१) व्हिलनची एंट्री

अवांतरः माझे एक ह्युरिस्टिक आहे की जर पहिला सीन व्हिलनचा असेल आणि सिनेमा ८८-९६ या कालावधीतला असेल तर तो नि:संशय विश्लेषण करण्याकरिता बनलेला आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण १९९४ चा मॅडम एक्स!

१.१) सगळ्या गुरु-शिष्यांची गोष्ट गुरुपौर्णिमेला सांगण्यासारखी नसते

सुरुवात एका आश्रमाच्या दृश्याने होते. आश्रमाचे डिझाईन फार इंटरेस्टिंग आहे. सिमेंटच्या कुटिरांमध्ये शिष्यगण राहत असावेत. एक रँडम शिष्य स्टीलची बादली घेऊन चालला आहे. कुटिरांची छपरे उतरती आहेत. म्हणजे कथानक पर्जन्यमान अधिक असलेल्या एखाद्या प्रदेशात घडते. पण इतक्या चांगल्या लॉजिकवर हिंदी सिनेमांचा विश्वास नसल्याने प्रेक्षकाला कळते की सिनेमात एकदाही पाऊस पडणार नाही आहे. पत्र्याच्या छपरावर गवत पसरवून हा आश्रम जंगलात असल्याचे पटवून देण्याची पराकाष्ठा केली गेली आहे. तर अशा आश्रमाचा प्रमुख असतो सत्येन कप्पू आणि त्याचा पट्टशिष्य असतो सदाशिव अमरापूरकर!

आश्रमाचे पावित्र्य दाखवण्यासाठी सगळे भगवी वस्त्रे घालून बसलेले असतात. सदाशिव अमरापूरकरचे नाव नरसिंगदेव असते. तो सत्येन कप्पूसमोर हात जोडून बसलेला दाखवला आहे. सत्येन कप्पू प्रेक्षकांना सांगतो की याच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याने याला भारी भारी सिद्धी प्रदान केल्या आहेत. आता याच्या सारखा तांत्रिक दुसरा कोणी नाही. पण नरसिंगदेवला आणखी एक विशिष्ट सिद्धी हवी असते. तिचा वापर केला की मोठ्यातला मोठा सिद्ध पुरुष सुद्धा कैद होईल असा एक पिंजरा तयार होत असतो. या सिद्धीविषयी सांगण्यापूर्वी थोडेसे स.अ. च्या वेषभूषेविषयी - केसांमध्ये मधूनच चंदेरी रंगाचे फराटे ओढले आहेत तर काळी खोटी मिशी लावून तिच्या टोकांना पांढरे मिशांचे खुंट जोडले आहेत. यामागे दोन कारणे असू शकतात - १) एक अखंड मिशी मिळालीच नाही २) सत्येन कप्पूच्या धवल दाढीला कॉंट्रास्ट यावा आणि हा व्हिलन असल्याचे ठसावे. आता असेल ते असेल पण असा हा नरसिंगदेव ती सिद्धी मागतो.

सत्येन कप्पू विचारतो "दुरुपयोग तो नही करोगे?" यावर स.अ. चा चेहरा - "कप्पूऽऽऽ तुजा माज्यावर भरवसा नाय काय?" बिचारे गुरुदेव भोळे असल्याने त्यांचा स.अ. वर स्वतःपेक्षा अधिक विश्वास असतो. हरि ओम् म्हणताच त्यांच्या ओंजळीत मोती प्रकट होतात. ते ओंजळभर मोती स.अ. ला देऊन ते सांगतात की हरि ओम् चा जाप करून तू यांची एक माळा बनव. मग तो पिंजरा प्रकट होईल. जोवर ती माळा आहे तोवर तो पिंजरा आहे. हे सर्व चालू असताना मागून डी कॉर्डमध्ये (बहुधा) बेस गिटार वाजत राहते. लगेच नरसिंगदेव ती माळा तयार करतो. हे सगळे बघायला शिष्यगण गोळा होतात. यांच्याकडे महान टेलिपोर्टेशन पॉवर्स आहेत. आधी सत्येन कप्पू आणि स.अ. चा एक शॉट आहे ज्याच्यात बॅकग्राऊंडला एक शिष्य मस्त झाडाला टेकून झोपला आहे. पुढच्याच सेकंदाला तो पाच शिष्यांच्या मॉब शॉटमध्ये बॅकग्राऊंडला येतो. या पाच शिष्यांच्या मॉबशॉटमध्ये उजव्या बाजूला एक दाढीवाला आहे. त्यानंतर दोनच सेकंदात सात शिष्यांचा आणखी एक मॉब शॉट आहे ज्याच्यात हा दाढीवाला एकटा रिसायकल केला गेला आहे. त्याची दाढी बदलून प्रेक्षकांना हा वेगळा शिष्य आहे हे पटवून देण्याची पराकाष्ठा गेली आहे.

जसा जसा एक एक मोती ओवला जातो तसा तसा पिंजरा तयार व्हायला लागतो. हे सगळे चालू असताना स.अ.च्या मागे एक गाय "आय डोंट गिव्ह अ डॅम अबाऊट दीज हूमन्स" भावाने चारा खाण्यात रमली आहे. पिंजरा पोपटाच्या बसण्यासाठी रेडिमेड दांडी सकट येतो. नरसिंगदेव सॉफ्टवेअर टेस्टर असल्याने "सॉफ्टवेअर तर तयार झाले गुरुदेव पण अजून टेस्टिंग झाले नाही आणि तुमच्या पेक्षा अधिक चांगली टेस्टकेस ती कोणती?" हा बहाणा बनवून सत्येन कप्पूचा पोपट करतो - आय मीन इट, शब्दशः पोपट करतो. पोपटरुपी गुरुदेव टेस्टिंगसाठी पिंजर्‍यात स्वतःहून कैद होतात. टेस्टिंग होते आणि आता गुरुदेव आपल्याला बाहेर काढण्याची विनंती करतात. नरसिंगदेवचा चेहरा - येडा समजतो का मला? गुरुदेव वगळता नरसिंगदेवइतका चमत्कारी तांत्रिक दुसरा कोणी नसतो. वर साळसूदपणे तो सुनावतो "भस्मासुराने तर आपल्या वरदात्या शंकराला भस्म करण्याचा प्रयत्न केला होता. मी तर तुमचे नित्य दर्शन व्हावे म्हणून फक्त कैद करून ठेवतो आहे." सगळे शिष्य लगेच नरसिंगदेवची गुलामी कबूल करतात.

१.२) शाप देणारी आई
देवराज नामक एका रँडम ठाकूरच्या जमिनीवर नरसिंगदेव कब्जा करतो. याने हा ठाकूर भलताच खवळतो आणि आपली माणसे पाठवून जमीन परत घ्यायला बघतो. या ठाकूरची आई असते सुहास जोशी. सुहास सांगते की नरसिंगदेव फार मोठा तांत्रिक आहे तू त्याच्याशी पंगा नको घेऊस. पण पोरगं हट्टाला पेटलेलं असतं. नरसिंगदेव आता एका आलिशान हवेलीत राहत असतो. हवेलीच्या दिवाणखान्यातच एक कालिमातेची मूर्ती असते. मूर्तीमागच्या भिंतीवर सापांचे चित्र काढून इच्छाधारीवाला मोटिफ अधोरेखित केला आहे. मूर्तीसमोर एक हवनकुंड असते. स.अ. ने आता भगवी वस्त्रे टाकून देऊन कवड्या लावलेले काळे कपडे परिधान केलेले आहेत. बायकोचा सबुरीने घेण्याचा संदेश धुडकावून लावत स.अ. या आधी कधीच न ऐकलेला तांत्रिकांचा मंत्र म्हणतो
"ऊर्ध्वमूल अधः शाखं अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदासि यस्य पर्णानि यस्तं वेदसवेदवित्"
...........
..........
..........

शॉकमधून सावरण्यासाठी दोन मिनिटे घेऊन भेदरलेला प्रेक्षक पुढचा सिनेमा बघू लागतो. एका पळीने विभूती हवन कुंडात टाकतो. इतका वेळ ते कुंड विझलेले असते. पण विभूती टाकताच कुंडात अग्नि प्रकट होतो आणि एक अग्निगोल प्रकट होतो. अग्निगोलास स.अ. आज्ञा देतो की जाऊन देवराजला भस्म कर. इथे स.अ.ची बायको प्रेक्षकांच्या मनातली प्रतिक्रिया देते - प्रतिक्रिया. तो अग्निगोल मग जाऊन देवराजला भस्म करतो. इथे आपल्याला ग्रीन स्क्रीनवर हातात मशाल उर्फ अग्निगोल घेऊन धावणार्‍या माणसाची अस्पष्ट आकृती दिसू शकते.

देवराजला भस्म करून अग्निगोल परत कुंडात येतो आणि कुंडातली आग विझते. स.अ. ला कामगिरी फत्ते झाल्याचे लक्षात येऊन तो खुश होतो. इथे अग्निगोलाचा पाठलाग करत सुहास जोशी स.अ.च्या हवेलीत येते. ती मुलगा गेल्याच्या दु:खात शिव्यांची लाखोली वाहते. मग ती त्याला शाप देते - तू कोडी बन जाएगा. तेरा एक एक अंग गल गल कर गिरेगा. आता असा शाप दिल्यावर एवढा मोठा तांत्रिक कसा शांत बसेल. मग तो तिला "तेरी मौत तुझे बकवास करने पर मजबूर कर रही है, ले मर" असे म्हणून पुन्हा हवनकुंड प्रज्ज्वलित करतो आणि बायकोच्या विरोधाला न जुमानता गीतेतला आणखी एक श्लोक म्हणून सुहास जोशीवर पाणी फेकतो. याने सुहास जोशी नक्की का मरते हे अजून कळू शकलेले नाही कारण ती उगाचच पाच सहा वेळा नहीं म्हणते पण बाकी हार्ट अ‍ॅटॅक, जळून मरणे वगैरे कोणतीच सिंप्टम्स दिसत नाहीत. तिच्या लाशला मग याचे शिष्य नदीत फेकून देतात.
दुसर्‍या दिवशी रेघारेघांचा शर्ट आणि रेघारेघांचा पायजमा घालून झोपलेल्या नरसिंगदेवला उठवायला त्याची बायको चहा घेऊन येते. चहा घ्यायला तो हात पुढे करतो आणि त्याच्या लक्षात येते की आपला डावा अंगठा वितळत आहे. याने दोन गोष्टी सिद्ध होतात - १) नरसिंगदेव सव्यसाची आहे (कारण तो आहुती उजव्या हाताने देतो पण चहा डाव्या हाताने घेतो), २) जोशीबाईंचा शाप फळला आहे. हे लक्षात येताच स.अ. ची जाम तंतरते.

२) हिरो-हिरोईन की एंट्री

२.१) पुढच्यास ठेच मागच्यास शहाणा हे खरे असले तरी याचा अर्थ पुढचा शहाणा होत नाही. तो परत परत ठेचकाळतच राहतो.

आपल्या दगाबाज शिष्याची ही अवस्था बघून सत्येन कप्पू पिंजर्‍यात बसून खदाखदा हसतो. कप्पू आधी त्याची नीच, अधम, दुष्ट, पापी अशा शब्दांत संभावना करतो. स.अ. भगवान शंकराची शपथ घेऊन प्राणांची भीक मागतो तरी कप्पूजी बधत नाहीत. मग तो "मी तुमचा दास होऊन राहीन" असे वचन देतो आणि गुरुदेव म्हणतात "ठीक हैं". या शापातून मुक्त होण्याचा अतिशय स्पेसिफिक उपाय
नरसिंगदेवला अमरकुंडात स्नान करावे लागेल. अमरकुंडात पोहोचण्यासाठी इच्छाधारी नागाची मणी मिळवावी लागेल. हा इच्छाधारी नाग आपल्या नागीणीसोबत दर पौर्णिमेच्या रात्री काळ्या पर्वतावर येतो. तोवर सड-गलकर मरू नये म्हणून "ओम् नमः स्वाहा" या मंत्राचा एक कोटीवेळा जाप केल्यास ही सड-गल प्रोसेस पंधरा वर्षांसाठी थांबेल.
स.अ. लगेच भगव्या वस्त्रांत येऊन जाप सुरु करतो आणि जवळपास बारा मिनिटांनंतर श्रेयनामावली पडद्यावर झळकते. इंटरेस्टिंगली इथे पहिले नाव मीनाक्षी शेषाद्रीचे आहे, हिरो नितीश भारद्वाजचे नाही. क्रेडिट्स संपेपर्यंत स.अ.चा जाप पूर्ण होतो आणि त्याचा कोड तात्पुरता बरा होतो. कप्पू मग त्याला आपल्याला स्वतंत्र करायला सांगतो. "आधी अमरकुंड तर मिळू दे" करून तो त्याला पुन्हा चुना लावतो. सुभद्रा (त्याची बायको, कृष्णकथेचा मोटिफ) ला गुरुदेवांच्या दाणापाणीची व्यवस्था करायला सांगून तो निघून जातो. (इथे सत्येन कप्पूची "दुष्ट पापी" वाली डायलॉग डिलीव्हरी बघण्यासारखी)

२.२) नाग सरपटणारा प्राणी आहे म्हणून इच्छाधारी नागांनीही सरपटलेच पाहिजे

काळा पर्वत आश्चर्यजनकरित्या निळसर प्रकाशात न्हाऊन निघालेला आहे. डच अँगलमध्ये, खराब शॉटमध्ये नागाचे चित्र तरंगत पर्वतावर येते. तोंडातून एक मणी काढून ते जमिनीवर ठेवते. मग त्या नागाचा भरजरी कपडे घातलेला नितीश भारद्वाज बनतो. हा महाभारताच्या सेटवरून थेट इथे आला असावा. थोडे "आ आ आ आ" आणि "ओ ओ ओ ओ" होते व मीनाक्षी शेषाद्रीची एंट्री होते. नागाच्या मानाने नागीण बरीच कमी नटली आहे जे बॉलिवूडसाठी जरा रेअर आहे. तरी केसांत नाग हेअर बँड घालून एका बाजूने पोंगा सोडलेला. नाग टिकली, जरीकाम केलेला गुलाबी स्कर्ट, पर्वतावरच्या धबधब्यात नाचता येईल या दृष्टीने घातलेली चोळी असा सरंजाम आहे. तरी हे दोघे सुसह्य आहेत. सेट अप होताच पुंगीच्या बॅकग्राऊंड मुझिकवर नितीन मुकेश "मिले मन से ये मन मिले तन से ये तन आयी मधुर मिलन की सुहानी रैना" करून रडू लागतो. सोबत म्हणून साधना सरगम ताई "जागी मन में तपन लागी तन में अगन, आज अगन से अगन बुझा दे सजना" करून साथ देऊ लागतात. याला पहारा म्हणून स.अ. शतपावली करतो आहे.

गाणं मोठं रंजक आहे. दोघांपैकी कोणाच्याही तनात अगन लागल्याचे जाणवत नाही. शेषाद्रीताईंनी आडनावाला जागणारी नागीण काही वठवलेली नाही. त्यांनी भरत नाट्यम्, कुचिपुडी, कथक, आणि ओडिसी नृत्यकलांचे शिक्षण घेतले खरे पण श्रीदेवी स्कूल ऑफ स्नेक डान्सिंगमध्ये त्या गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे नृत्य शास्त्रीय नृत्य वाटत राहते. त्यातही त्यांनी भर कंबर, मान आणि डोळे हलवण्यावर दिलेला आहे. नितीशने उर्वरित अवयव (त्याचे स्वतःचे, मीनाक्षीचे नव्हे) हलवून मानवी शरीराचा कोटा पूर्ण केला आहे. एक कडवे झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की एवढे ढीगभर कपडे घातल्याने ती अगन आणि सुहानी रैना सगळं व्यर्थ चाललं आहे. मग मीनाक्षी चोळी काढून नुसतेच झुळझुळीत पातळ नेसते तर नितीश खालचे निळ्या रंगाचे वस्त्र आणि गळ्यातल्या माळा वगळता सर्व काढून टाकतो. एव्हाना नृत्यदिग्दर्शकालाही जाग आलेली असते. मग त्या दोघांना झाडावरून सरपटत धबधब्याने निर्माण झालेल्या तळ्यात जायला सांगतो, कारण ते नाग आहेत ना. इथे हे लोक सोयीस्कर रित्या विसरतात की नाग अर्थात इंडियन कोब्रा झाडांवर राहत नाही, झाडांवर राहणारा (arboreal) भारतीय साप अजगर! तसेच त्या धबधब्याची नदी होत नाही हे भौगोलिक आश्चर्यही आपल्याला बघायला मिळते. मग थोड्या पोजेस मारल्यानंतर त्यांची तने एकदाची एकमेकांना मिळतात. पण परमोच्च बिंदू येणार तर त्याजागी नरसिंगदेव येतो.

३) कॉम्प्लिकेटेड प्लॉटचा सेटअप इलॅबोरेट असावा लागतो

३.१) गाव तिथे जत्रा

स.अ. ला बघून ते दोघे नागरुपात पळ काढतात. स.अ. मग एक पुंगी पैदा करून त्यांना शोधायला लागतो. पुंगीच्या कर्णकटू आवाजाला वैतागून ते परत मनुष्यरुपात येतात. पण काही अनाकलनीय कारणाने ते लहान मुलांचे रुप घेतात. नितीश बनतो मास्टर आलोक आणि मीनाक्षी बनते बेबी गुड्डू. हे स.अ.च्या नजरेतून सुटलेले नसते. दोघे धावत धावत पोहोचतात एका जत्रेत. इथे दोघा बालकलाकारांनी दमल्याचा न भूतो न भविष्यति असा अभिनय केला आहे. साधारण गावाच्या विरंगुळ्याची चव लक्षात यावी म्हणून एक बाई बाप्याचा वेष घालून दुसर्‍या बाईला छेडत "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" या गाण्यावर नाचताना दाखवली आहे. तर अशा गावच्या जत्रेत श्रीराम लागू आणि आशालता आपल्या सुपुत्रास घेऊन आले आहेत. आणि त्यांचा सुपुत्र आहे - मास्टर आलोक! इथे डबल रोलची भानगड अनुभवी प्रेक्षकास लगेच समजू शकते. त्या अजाण बालकाने देवदर्शनाआधी मेला बघण्याचा हट्ट धरलेला असतो. सुदैवाने हे साल २००० नाही. अन्यथा किमान ट्विंकल खन्नाच्या त्या गाण्याच्या भीतिने तरी त्याने मेला बघण्याचा हट्ट धरला नसता.

इथे नरसिंगदेवही जत्रेच्या ठिकाणी पोहोचतो. तो नागजोडप्याला शोधत, पुंगी वाजवत जत्रेत हिंडू लागतो. त्याच्या पुंगीच्या आवाजाने वैतागून जत्रेतला एकही व्यक्ती त्याच्याकडून पुंगी हिसकावून, त्याच्या पेकाटात लाथ घालत नाही हे विशेष! आपल्या मास्टर आलोक (नाग) आणि बेबी गुड्डूला मात्र या पुंगीचा त्रास होऊ लागतो. इतक्या वर्षात एकाही इच्छाधारी नागाला न सुचलेले शहाणपण ते दाखवतात. कानात बोटे घालतात. पुंगीचा आवाजच ऐकू येत नाही तर हे डोलणार कसे? एका कँपा कोला विकणार्‍या गाडीमागे ते लपतात. तिथून चालत जाणारा नरसिंगदेव कोला पीत नसल्याने नजर फिरवतो आणि त्या दोघांच्या शेजारून निघून जातो. हे सर्व घडल्यावर एकदाचे व्हायचे तेच होते - जत्रेत या दोघांची चुकामूक होते आणि ते हरवतात.

३.२) जत्रेत लहान मुले हरवली नाही तर त्या जत्रेला काय अर्थ आहे

दोन हरवलेल्या मुलांना कोणीही जत्रेच्या "हरवलेली मुले" केंद्रात का देत नाही हा प्रश्न आपण सोडून देऊ. मुख्य गोष्टी अशी की आपल्याला या दोघांची नावे कळतात. मीनाक्षीचे नाव आहे मोहिनी आणि नितीशचे नाव आहे नागेश. बाकी ते "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" चालूच आहे. त्या गाण्याची कोरिओग्राफी डबल मिनींगच्या दृष्टीने अभ्यासण्याजोगी आहे. इकडे मास्टर आलोक (नाग) आणि मास्टर आलोक (मानव) यांची भेट होते. इथे कंटिन्यूटी मिस्टेक आहे. आधी शॉटमध्ये मास्टर आलोक (मानव) मँगो डॉली (चोकोबार सारखे आईसक्रीम) खात असतो. ती थोडीफार खाऊन झालेली असते (काडीचे दुसरे टोक दिसत आहे इतपत खाऊन झाली आहे). कट टू मास्टर आलोक (नाग). कट टू मास्टर आलोक (मानव) जो म्हणतो की "अरे". इथे याच्या हातात अजिबात न खाल्लेली नवीन कांडी आलेली आहे. ते दोघे आपल्या सारखाच दिसणारा दुसरा मास्टर आलोक बघून प्रसन्नपणे हसतात. काही कारणाने जत्रेत दोन भिल्लही आलेले असतात. ते मास्टर आलोक (मानव) वर कांबळे टाकून त्याला पळवून घेऊन जातात. याने मास्टर आलोक (नाग) भलताच क्रुद्ध होतो.

स्टीलच्या भांड्यांच्या स्टॉलमधून डॉ. लागू आणि आशालता काहीतरी खरेदी करत असतात. इथे स्पष्ट दिसते की प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना चिनीमातीच्या सहा कपांचा सेट दिला आहे, स्टीलच्या भांड्यांच्या स्टॉलवर. मग त्यांच्या लक्षात येते की अरे आपलं पोरगं जागेवर नाही. इथे कळते की मास्टर आलोक (मानव) चे नाव कमल आहे. यांचा नोकर भोला, ज्याने कमलवर लक्ष ठेवणे अपेक्षित असते तो "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" बघण्यात मग्न असतो. तोही मग यांच्याबरोबरीने कमलला शोधायला लागतो. इकडे कमलला त्या भिल्लांनी बळी द्यायला आणलेले असते. ते कमलचा बळी देणार इतक्यात तिथे नागेश येऊन त्यांना चावतो आणि कमलचा जीव वाचवतो. हे झाल्यावर त्याला आठवण होते की अरे मोहिनीला तर आपण मागेच सोडून आलो. क्यू तिचा रडण्याचा शॉट. पण दैवाला काही वेगळेच मंजूर असते. ते नोकर लोक नागेशला कमल समजून शब्दशः उचलून घेऊन जातात. आशालता आईच्या ममतेने त्याची विचारपूस करते. आधी तो कमल असल्याचे नाकारतो पण दुरून स.अ. येताना दिसताच तो आढेवेढे न घेता लागू आणि आशालता बरोबर जातो.

इकडे रमत गमत चाललेल्या स.अ. ला मरून पडलेला भिल्ल दिसतो. भिल्लाला साप चावल्याचे स्पष्ट असतेच पण स.अ. एका सेकंदात याला चावणारा इच्छाधारी नागच आहे हे ठरवतो. नजर वळवताच त्याला बलिवेदीवरचा कमल दिसतो. आश्चर्याची बाब अशी इच्छाधारी नागाचा दंश ओळखता येत असला तरी स.अ. ला इच्छाधारी नाग आणि माणूस यांच्यात फरक करता येत नसतो. त्यामुळे तो कमलला उचलून घेऊन जातो.

पुढे कमलचे काय होते? आपण घरात आणलेला मुलगा इच्छाधारी नाग आहे हे आशालता आणि श्रीरामना समजते का? मधल्या काळात असे काय घडते की मोहिनीवर गल्लो गल्ली नाचण्याची पाळी येते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स.अ. ला अमरकुंड सापडते का? तसेच सत्येन कप्पूची मुक्तता होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार. पण एका अल्पविरामानंतर प्रतिसादांत - उरलेले रसग्रहण प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तिचे चणे संपलेले असतात. फोलपटे त्याच्या केसांत ओतून ती त्याला लिपटते. प्रॉब्लेम इतकाच होतो की ती नागरुपात लिपटते. मुलीची नागीण झालेली बघून काकांची तंतरते आणि ते पळ काढतात. मीनाक्षी यावर खदाखदा हसते. >>>>> मीही खदाखदा हसले Biggrin

भयंकर आहे पिक्चर
आता साप नाग डिप्लोयमेंट चालूच आहे तर दूध का कर्ज हा पुढचा पिक्चर आलाच पाहिजे!!!

मी बघीतला रे पायस पिच्चर.. शिनमाची हिरो मिनाक्षी आहे नितीश नाही हे पन लिहायच होत ना वर..
शेवटच गाणं कम म्युझिक फक्त अन फक्त आधीच्या रेखाच्या गाण्याला फाईट द्यायची म्हणुन वाजवलय कि काय अस वाटायला लागतं..
तू चालू दे स्टेप बाय स्टेप..मी उगा स्पॉयलर नाही देत इथे Biggrin

पहिला सीन व्हिलनचा असेल आणि सिनेमा ८८-९६ या कालावधीतला असेल तर तो नि:संशय विश्लेषण करण्याकरिता बनलेला आहे >>> हे सही आहे! जुन्या हिंदी गाण्यात नायक बिनदिक्कतपणे नायिकेला तुझे खुदाने मेरे लिए बनाया है म्हणतो तसे काहीतरी Happy

वाचतो वर्णन. सध्या फक्त चाळले आहे.

सर्वांना धन्यवाद Happy

इथे या लोकांनी बालपण ते तरुणपण या काळात वयाला साजेशी रुपे कशी बदलली हा प्रश्न आपण सोडून देऊ>>म्हणजे काय >> ते इच्छाधारी नाग आहेत, खरी लहान मुले नव्हे. त्यांचे वय वाढेल तसे घेतलेले रूप वाढते वय दर्शवते का? या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळत नाही. इच्छाधारी लोर नुसार असे व्हायला नको आहे.

आता साप नाग डिप्लोयमेंट चालूच आहे तर दूध का कर्ज हा पुढचा पिक्चर आलाच पाहिजे!!! >> मी यानंतर जलजला किंवा हिरवं कुंकू प्लॅन करत होतो. करतो दूध का कर्जवर विचार

शिनमाची हिरो मिनाक्षी आहे नितीश नाही हे पन लिहायच होत ना वर >> अगं तिचं नाव क्रेडीट्समध्ये त्याच्याआधी येतं हे लिहिलंय ना! अर्थात ती लीड प्रोटॅगोनिस्ट आहे.
आणि स्पॉइलर्स आर ओके. तू जे गाणं/नाच म्हणते आहेस, ते रेखाला फाईट द्यायला नसणार, कारण हा सिनेमा शेषनागच्या आधीचा आहे. रेखाने याला फाईट द्यायला तसा नाच केला असेल Proud

हे सही आहे! जुन्या हिंदी गाण्यात नायक बिनदिक्कतपणे नायिकेला तुझे खुदाने मेरे लिए बनाया है म्हणतो तसे काहीतरी >> फा Lol

मस्त !!!

नागाशी संबंध नाहीये पण जमलं तर तुमच्या यादी मध्ये "पाताळ भैरवी" पण ऍड करा Happy

मस्त लिहीले आहेस पायस. सुरूवातीला नमनाची वाक्ये जरा लांबली पण नंतर मस्त पिक अप घेतला आहे Happy

स.अ.च्या मागे एक गाय "आय डोंट गिव्ह अ डॅम अबाऊट दीज हूमन्स" भावाने चारा खाण्यात रमली आहे. >>> Lol

तिच्या लाशला मग याचे शिष्य नदीत फेकून देतात. >>> नदीत फेकली म्हणजे ती कोठेतरी बाहेर येणार हा नियम पाळला आहे का इथे?

थोडे "आ आ आ आ" आणि "ओ ओ ओ ओ" होते व मीनाक्षी शेषाद्रीची एंट्री होते. >>> त्या काळच्या बहुतांश चित्रपटांत हीरॉइनची एण्ट्री झाल्यावर मग "आ आ आ आ" आणि "ओ ओ ओ ओ" व्हायचे Wink

आश्रमाच्या डिझाइन बद्दल सहमत. प्रत्येक रूम मधे भिंतीवर ठिकठिकाणी नाग आर्ट ते मॉडर्न आर्ट पर्यंत सर्व प्रकारच्या चित्रकला आहेत. कदाचित सिद्धी प्राप्त होत असताना त्यातील एकेक चित्र समजत असेल तेथील विद्यार्थ्यांना. बाकी नागावरच्या पिक्चर मधल्या लोकांच्या घरात अनावश्यक "नाग आर्ट्/मोटिफ" असतात हे ही एक ह्युरिस्टिक अ‍ॅड करायला हवे.

पण आश्रमात पाउसच काय एकूणच पंचमहाभूते लांबच राहात असावीत असे दिसते. किंवा एखाद्या सुपर सिद्धीवाल्याने बोलावल्याशिवाय येत नसावीत. तो आगीचा गोळा त्या व्यक्तीमागे जोरात जातो तेव्हा हवेने किमान त्या ज्वाळा थोड्या मागे व्हायला हव्यात? पण नाही. सर्व ज्वाळा व्हर्टिकली उभ्या. तिसरे म्हणजे आगीपासून पळताना पाण्यात शिरावे हे त्याला माहीत नसेल असे नाही. म्हणजे तेथे पाणीही नसावे.

मात्र दार बंद केल्यावर किल्ल्यांच्या दरवाजांवर हत्ती धडका मारतात तसा तो आगीचा गोळा "स्टार्ट" वगैरे घेउन धडका मारतो हा अति मनोरंजक सीन आहे.

टॉप लेव्हलच्या गुरूची सर्व सिद्धी तो पिंजर्‍यात अडकल्यावर फिकी पडते हे ही एक मस्त लॉजिक आहे.

बाकी इच्छाधारी नाग हंटर्स च्या युनियन्स किंवा इण्टरनेट फोरम्स वगैरे नाहीत हे किती चांगले आहे! तिकडे शेषनाग मधे डॅनीने "इच्छाधारी टेस्ट" विकसित केली होती. पण तेथे लोकांकरता रस्त्यारस्त्यांत पीयूसी च्या गाड्या उभ्या असतात सारख्या या टेस्ट च्या फ्रॅन्चाइजी काढून गबर होण्यापेक्षा तो हीरो लोकांच्या नादी लागला. त्याने ebay वगैरे वर ती विकली असती आणि याला मिळाली असती तर हा जास्तच पॉवरफुल झाला असता.

मला सारखे वाटत होते या चित्रपटावर मी छोटीशी का होईना पण कॉमेण्ट केली होती. बेकरी पाव पॅटिस मधे र्म्द ने सेव्ह केल्याने तेथे सापडली.

फारएण्ड | 27 June, 2016 - 08:47

इथे नाचे नागिन गली गली चा शेवटचा भाग चालू होता. नितीश भारद्वाज चा डबल रोल. एक इच्छाधारी नाग. एक नॉर्मल माणूस. पहिल्याचे मीनाक्षी शेषाद्री बरोबर अनेक पोजेस मधे डान्सेस. (चित्रपटाच्या) क्लायमॅक्स मधे सुमारे दहा बारा प्राणी एकमेकांशी मारामारी करतात. सत्येन कप्पूचा सदाशिव अमरापूरकरने लिटरली पोपट केलेला असतो. शेवटी स.अ मरतो. श्रीराम लागू व आशालता यांना स्क्रिप्ट ऐकवल्यावर त्यांचे जे चेहरे झाले ते पटकन शूट करून ते पीसेस यात वापरले असावेत.

"हाँ ये सच है के मै एक इच्छाधारी नाग हूँ" सारखे जबरी संवाद होते.

--------------------------
पायस - "लिटरली पोपट केला" वर एकदम ग्रेट माइण्ड्स!

६) जर हिरो/हिरवीणवर एकतर्फा प्रेम करणारे कॅरेक्टर आणले असेल तर हिरो/हिरवीण बिछडलेले असू शकत नाहीत, त्यांना एकत्र आणावे लागते

६.१) श्रीदेवीचा नागीन डान्स स्क्रीनवर लावून तुम्ही नागीन डान्स केलात म्हणून तुम्ही इच्छाधारी होत नाही

परदेसने या साईडप्लॉटवरून प्रेरणा घेतली याच्यावर पुढचा शॉट शिक्कामोर्तब करतो. रुप तीन वर्षाची असताना तिची आई देवाघरी जाते. तिचे संपूर्ण आयुष्य तिने अमेरिकेत काढलेले असते. तरी दिलीपला तिला एका दिवसात घुंघटवाली बहू बनवायची असते. तिचे लग्न कमल उर्फ नागेशशी लावून देण्याच्या इराद्याने तो अमेरिकेतून आलेला असतो. श्री.ला. आपली संमती कळवतात, नागेशला ती पसंत आहे की नाही याच्याशी कोणाला घेणेदेणे नसते. नागेश याबाबतीत काहीच करू शकत नसल्याने दुर्मुखतो ज्याचा अर्थ आशालता "बघा कसा लाजतो गुलाम" असा काढते. इकडे युनुस परवेझचा कॉमेडी ट्रॅक आपल्या दुर्दैवाने संपलेला नसतो. तो आखाड्यात कुस्ती खेळत असताना मीनाक्षी इकडे तिकडे प्रकट होऊन त्याला घाबरवते आणि प्रेक्षकांना होत असलेल्या मनस्तापावर खदाखदा हसते. हा सिनेमा तसा सहन करण्यासारखा आहे पण याचे एडिटिंग विशेष गचाळ आहे. आता तिचा लिपटण्याचा प्रसंग आणि हा प्रसंग एकत्र जोडता आला असता. पण एडिटर लिंकच लागू देत नाही. एक मुद्दा सलग कव्हर होईल तर शपथ!

इथे साहिला नितीश (नाग) ला घेऊन वरच्या मजल्यावरच्या खोलीत घेऊन जाते. जर हम आपके कौन हैं मध्ये ती भयंकर दिसली असा तुमचा समज आहे तर या सिनेमासाठी अजून तुमची तयारी झालेली नाही. ती नागेशला सांगते की मला हिंदुस्तानी संगीत, कपडे आणि संस्कृती फारच आवडायला लागली आहे (एका दिवसात). तर मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. संस्कारी नागेशचे लगेच तोंड वाकडे होते. पण ती जे दाखवते ते बघून तोच काय अगदी अनुभवी प्रेक्षकही चाट पडतो. टीव्ही ऑन केला जातो. त्यावर नगीनाची व्हिडिओ कॅसेट लावली जाते. श्रीदेवीचा नागीन डान्स चाललेला असतो. त्यावर साहिला आपला नागीन डान्स दाखवू लागते. हा सीन विशेष कहर आहे - इथे बघू शकता. पुंगीच्या आवाजावर नागेश डोलायला लागतो आणि नागरुपात येतो. साहिला आपल्या नाचात मग्न असल्याने तिला तो रुप बदलताना दिसत नाही. पण लक्ष जाताच सोफ्यावर नाग बसला आहे हे तिला दिसते आणि तिची जाम टरकते. खाली श्री.ला. गॅरिबाल्डी नावाचे पुस्तक वाचत बसलेले असतात. पोटेन्शिअल सूनबाईंची किंचाळी ऐकून ते धावत धावत येतात. ती त्यांना आत साप असल्याचे सांगते. खोलीत बघतात तर कोणी नसते. मग नितीश भारद्वाज (नाग) साळसूदपणे येऊन सारवासारव करतो. तिला म्हणतो की "ये इंडिया हैं, यहां बहुत नाग रहता हैं. लगता हैं वो बीन का आवाज सुन के आ गया होगा". साहिला थेट पुंगीचे म्युझिक परत कधीही न ऐकण्याची प्रतिज्ञ करते. नागेशची डोकेदुखीपासून सुटका झाली.

६.२) अतर्क्य कथानक परवडले पण नीरस गाणी नकोत.

स.अ. अजूनही त्या इच्छाधारी जोड्याला (पक्षी: कपल, बूट नव्हे) शोधत असतो. त्यासाठी तो शब्दशः अख्खं जंगल खोदायला घेतो, कोणते जंगल हा प्रश्न गौण आहे. तिकडे मीनाक्षी आपल्या नागेशच्या आठवणीने तळमळत असते. असे तळमळणे मळमळण्यासारखेच असते. त्यामुळे ते गाण्यावाटे बाहेर काढणे फार आवश्यक असते. त्यात तिला खिडकीतून बाहेर एक दुलहन की डोली चाललेली दिसते. लगेच गाणे सुरु होते - मितवा रे ओ मितवा, कैसे दिन बीतें कोई जतन बता जा. गाणे ठेवणीतले असले तरी साधना सरगम ताई बर्‍या गायल्यात. मीनाक्षीला श्रीदेवीचा नागीन ड्रेस (डिट्टो कॉपी) दिला आहे. ती यात दिसतेही सुंदर. म्हटले तर सिनेमाचा हा भाग फारच सुसह्य आहे. पण ही सुसह्यता एकच मिनिट टिकते. मग नितीश भारद्वाज आपल्या घरातून अचानक बासरी वाजवायला लागतो आणि नितीन मुकेश रडायला लागतो. सुदैवाने त्याला गायला दोनच ओळी दिल्या आहेत. यात वाईट गोष्ट अशी आहे की हे इतके जनरिक आहे की यावर काहीही टिप्पणी करण्यासारखी नाही. सिनेमाच्या अतर्क्यपणाला गालबोट लावून जाते हे गाणे! नाही म्हणायला एक गोष्ट खटकते. हे गाणे मीनाक्षी काळ्या पर्वतावर जाऊन गाते. म्हणजे तिलाही काळ्या पर्वताचा पत्ता माहित आहे. तरीही चौदा-पंधरा वर्षांत एकदाही दोघे एकाच वेळी काळ्या पर्वतावर जात नाहीत. प्रेक्षकांच्या राहुकालात अजून ऐंशी मिनिटे बाकी असल्याने तसे घडत नाही आणि सिनेमा चालूच राहतो.

६.३) बिछडे साथी ज्यादा दिन बिछडे नही रह सकते

इथे साहिलाताईंचे आपल्याला घाबरवण्याचे काम इमानेइतबारे चालू आहे. नितीश विचारमग्न बसलेला असताना ती त्याला मागून येऊन बिलगते. मँजेंटा रंगाच्या तंग मॅक्सी टॉपवर तिने लाल रंगाची पश्मिना शाल खांद्यावरून ओढली आहे. त्या मॅक्सी टॉपला खाली लाल झुळझुळीत कापडाचे पॅचिंग आहे. कानात दीड इंची त्रिकोणी आकाराचे आभूषण घातले आहे. हातात लाल ग्लोव्हज् घालून दोन्ही हातांच्या तर्जनी आणि अनामिकेत अंगठ्या घातल्या आहेत. आता नितीश मीनाक्षीला सोडून हिला कन्सिडर तरी करेल का? मान्य आहे की यांची जोडी जुळवायची नाही आहे पण त्यासाठी हिला असे विचित्र कपडे घालायला लावायची गरज नव्हती (जर हा तिचा स्वतःचा फॅशन चॉईस असेल तर माझी तिच्या मेकअप आर्टिस्ट आणि कॉश्चुम डिझाईनरकरिता पूर्ण सहानुभूति!). तिच्या मेकअप आणि हेअर स्टाईल्स विषयी न बोलणेच इष्ट!

असो, तिला जायचे असते शॉपिंगला. नितीश म्हणतो मग जा, मी कशाला पाहिजे. त्यावर ती आशालताकरवी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते. तोही नाईलाजाने तिच्यासोबत जायला तयार होतो. कट टू "अपना बाजार शॉपिंग सेंटर" नामक कळकट इमारत. नितीश आणि साहिलाची खरेदी झालेली असते आणि ते दोघे इमारतीतून बाहेर पडतात. काही कारणाने मीनाक्षी साध्वीच्या वेषात तिथेच आलेली असते. ती तत्क्षणी नितीशला ओळखते. साहिला सोबत शॉपिंगची सत्त्वपरीक्षा दिल्यामुळे त्याचे लक्ष मीनाक्षीकडे जात नाही. तो आपल्याच तंद्रीत अँबॅसेडॉरमध्ये बसून साहिलासोबत घराच्या दिशेने जाऊ लागतो. मीनाक्षी त्याच्यामागे धावायला लागते. दिग्दर्शकाच्या मते युनुस परवेझ-नागीण-घाबरणे जोकमध्ये अजूनही दम उरलेला असल्यामुळे त्याला गाडीपाशी बर्फाचा गोळा खात उभे केले आहे. मीनाक्षीला आपल्या (प्रत्यक्षात गाडीच्या) दिशेने धावताना बघून तोही धावत सुटतो.

आता पाठलाग सुरू होतो. गाडी पुढे, मध्ये युनुस परवेझ आणि सर्वात मागे मीनाक्षी. युनुस परवेझ जीवाच्या आकांताने धावत सुटतो आणि नितीशला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो. कॅमेरा अँगल्सनुसार हे नितीशला निश्चित दिसले पाहिजे. तरीही तो निर्विकारपणे गाडी चालवतच राहतो. मीनाक्षी मात्र काही तेवढ्या जोशात धावत नाही. तिच्या हाकाही बेंबीच्या देठापासून मारलेल्या नसतात. त्यामुळे नागेशला त्या हाकाही ऐकू येत नाहीत. शेवटी ती "मैं तो थक गई भाईशा" करून जमिनीवर लोळण घेते. गाडी दृष्टीआड जाते. भारतीय जनतेचा जन्मसिद्ध हक्क, अर्थात बघेगिरी करायला पाच-सहा लोक गोळा होतात. ती त्यांना गाडीचा पाठलाग करायची विनंती करते. ते म्हणतात का करायचा आम्ही पाठलाग? ती म्हणते "मेरे नागेश उस गाडी में हैं". बघे - अरे पर वो गाडी तो देवगड के सेठ गिरिधारीलाल के साहबजादे की हैं. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात - १) श्रीराम लागूंचे सिनेमातले नाव गिरिधारीलाल आहे. २) मोहिनीला नागेशचा पत्ता समजला आहे.

पायस - "लिटरली पोपट केला" वर एकदम ग्रेट माइण्ड्स! >> हायला! खरंच ग्रेमा Happy क्लायमॅक्सबद्दलच्या टिप्पणीशी सहमत. क्लायमॅक्समध्ये इतके प्राणी आणि रुपे बदलली जातात इच्छाधारी स.अ. आणि सत्येन कप्पू तर नाहीत ना असा प्रश्न पडावा.

नदीत फेकली म्हणजे ती कोठेतरी बाहेर येणार हा नियम पाळला आहे का इथे? >> फेकताना दाखवली नाही आहे. त्यामुळे हा नियम लागू होणार नाही ना? बाकी सुहास जोशी ज्या पद्धतीने रडते ते बघता तिने पुढच्या वर्षीच्या तुम मेरे हो ची प्रॅक्टिस केली असावी - तुम मेरे हो मधले रुदन

बाकी नागावरच्या पिक्चर मधल्या लोकांच्या घरात अनावश्यक "नाग आर्ट्/मोटिफ" असतात हे ही एक ह्युरिस्टिक अ‍ॅड करायला हवे >> तुझ्या नियमावलीच्या धाग्याप्रमाणे अशा ह्युरिस्टिक्सचा धागा काढला पाहिजे.

त्याने ebay वगैरे वर ती विकली असती आणि याला मिळाली असती तर हा जास्तच पॉवरफुल झाला असता. >> इथेही ग्रेमा! शेषनागमध्ये अघोरीने आपले पोटेन्शिअल कसे वाया घालवले आहे हे कळून अजूनच हळहळ वाटते. माझ्यामते अघोरी वगळता नाग हातात पकडून तो इच्छाधारी आहे की नाही हे सांगता येणारा दुसरा तांत्रिक बॉलिवूडमध्ये झाला नाही.

Biggrin
माझ्यामते अघोरी वगळता नाग हातात पकडून तो इच्छाधारी आहे की नाही हे सांगता येणारा दुसरा तांत्रिक बॉलिवूडमध्ये झाला नाही.-- काय ते कौतुक अघोरीचं...!!
आणि अगदी लिंकांसहित वर्णन लिहीण्याची तुमची हातोटी खरंच वाखाणण्या जोगी आहे! उदा - तुम मेरे हो मधलं रुदन!! Happy
युनुस परवेझ चं काय होतं मग..? उगाचच धावतो फक्त? कैच्या कैच!

पायस,
मी तो पिक्चर 10 मिन पेक्षा जास्त वेळ पाहू शकलो नाही,
का बाबा स्वतः ला असा त्रास करून घेतोयस? माबोकर काय, 10 मिन हसतील, वा वा म्हणतील आणि आपल्या कामाला लागतील, पण असे पिक्चर पाहून जे मानसिक आघात होतील त्यातून तुला सावरायला किती वेळ लागेल... कायम स्वरूपी मानसिक प्रोब्लेम होऊ शकतो अशाने...
कुटुंबियांच्या खूप अपेक्षा असतील तुझ्याकडून,
तुझ्या आशा नादांबद्दल त्यांना कळले तर काय वाटेल त्यांना
असले नाद करायच्या आधी त्यांचा विचार कर.

जप स्वतः ला

सिम्बा मस्त पोस्ट। श्री.ला., सु.जो. अशांनी असल्या पिक्चर मधे काम का केलं असेल? ती रूप तर येडी च वाटते, काय डान्स केलाय बापरे!! पायस खरंच धन्य आहात असले चित्रविचित्र पिक्चर बघू शकताय !! तो मीशे आणि निभा चा डान्स हैट आहे, त्यावर मिसेस सअ ची रिऍक्शन भन्नTट आहे.

<<<<<<< तर मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. संस्कारी नागेशचे लगेच तोंड वाकडे होते. पण ती जे दाखवते ते बघून तोच काय अगदी अनुभवी प्रेक्षकही चाट पडतो. टीव्ही ऑन केला जातो. त्यावर नगीनाची व्हिडिओ कॅसेट लावली जाते. श्रीदेवीचा नागीन डान्स चाललेला असतो. त्यावर साहिला आपला नागीन डान्स दाखवू लागते.>>>>>> अचाट आणि अतर्क्य शिरोमणी

७) हिरो-हिरोईन एकत्र आले की गाण्यातून पुढच्या कथानकाचा सेटअप न केल्यास कथानकाचे स्ट्रक्चर सबऑप्टिमल बनते. मग एखादा कॉमेडी सीन घुसडून तो सेटअप करून घ्यावा लागतो.

७.१) वॉचमनचे काम रात्रीचा पहारा देणे नसून, रात्रभर तंबाखू चघळणे आहे

श्रीराम लागूंचे गिरिधारीलाल नाव ऐकून प्रेक्षक काहीसा विचारत पडलेला असतो. कृष्णाचा मोटिफ सिनेमात पाळायचा हे मान्य केले तरी डॉक्टर अख्खा पर्वत कसा बरे उचलत असतील? पण बंगल्याच्या पाटीवर गिरिधारीलालच्या ऐवजी "सेठ गिरधारीलाल" लिहिलेले दिसते. संस्कृतमध्ये गिर् हा रेफान्त स्त्रीलिंगी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो वाणी. डॉक्टर लागूंना गिरधारीलाल हे नामाभिधान अगदीच सयुक्तिक आहे. म्हणजे पाटी रंगवताना केल्या गेलेल्या शुद्धलेखनाच्या चुकीचाही लेखकाने कसा खुबीने वापर करून घेतला आहे. त्यांचे आडनाव महत्त्वाचे नसल्याने ते गाळण्याचे शहाणपण पाटी रंगवणार्‍याने दाखवले आहे.

रामप्रसाद चौबे म्हणून बंगल्याचा वॉचमन असतो. रात्रीची वेळ असते आणि हा तंबाखू मळत बसलेला असतो. अशावेळी अवचित मीनाक्षी साध्वीच्या वेषात त्याच्यासमोर अवतरते. ती म्हणते छोटे सरकारना बोलव, ते मला ओळखतात. पण चौबेच्या मते छोटे सरकारचे कॅरेक्टर स्वच्छ असल्याने, ही मुद्दामून काहीतरी किटाळ आणण्याकरता आली आहे असा त्याचा समज होतो. तो तिला धक्के देऊन हाकलून लावतो. मीनाक्षी ऑलमोस्ट चिडचिड नागीण अवस्थेत जाते. पण वेळीच राग आवरून ती नागरुप घेते आणि बंगल्यात प्रवेश करते. चौबे तंबाखू मळण्यात मग्न असल्याने त्याला समोरची मुलगी नागीण बनली आहे हे दिसत नाही. ती गायब झाली हे लक्षात आल्यावर तो "गेली उडत" म्हणून परत मन लावून तंबाखू मळत बसतो.

इकडे मीनाक्षी सहजरित्या बंगल्यातल्या खोल्यांची चाचणी करू लागते. साध्वीच्या वेषातली मीनाक्षी आता रजपूत स्त्रीच्या वेषात असते. उगाच जंप स्केअर काढण्यासाठी झुंबर हलताना दाखवून त्याच्या आवाजाने आपल्याला दचकवण्याचा प्रयत्न केला आहे. जर झुंबराचा सपोर्ट इतका तकलादू आहे की मोठमोठ्याने आवाज येतो तर संपूर्ण सिनेमात ते कोणाच्या तरी डोक्यात पडत का नाही? अशी शंका जर तुमच्या मनाला चाटून गेली असेल तर फार विचार करू नका, हे सगळे आधीच डोक्यावर पडलेले आहेत अजून झुंबर पडून काय मोठा फरक घडून येणार आहे? असो, नागेशचे स्वच्छ कॅरेक्टर दाखवण्याकरिता त्याला आणि साहिलाला वेगवेगळ्या बेडरूम्समध्ये झोपलेले दाखवले आहे. हवी ती बेडरूम सापडताच मीनाक्षी आत शिरते आणि त्याला उठवते. आपली बिछडी हुई नागीण इतक्या वर्षांनंतर भेटल्याने नागेश फारच एक्साईट होतो. इथे शैलीत बदल म्हणून लगेच फेडआऊट शॉट मारण्याऐवजी दहा सेकंद त्यांना मनसोक्त मिठी मारू दिली आहे. मग फेडआऊट आणि स्वप्नात गाणे सुरू

७.२) अतर्क्यपणाच्या मिरच्या जास्त पडल्या असतील तर वरून बर्‍या गाण्याचे तेल टाकणे इष्टप्राय

आधुनिकतेची कास धरलेले नाग-नागीण असल्याने ते स्वप्नातही नाचायला देवगडमधल्या कुठल्याशा बागेत जातात. नागेशने फॉर्मल शर्ट पँट घातला आहे. व्यवस्थित इन केलेला शर्ट, कंबरेला बेल्ट आणि पायात कडक बूट बघता याने जरा भांग पाडला असता तर नक्की "आज इंटरव्ह्यू का?" अशी विचारणा झाली असती. मीनाक्षीने पंजाबी ड्रेस घातला आहे. हा ड्रेस सिनेमातले इतर कपडे बघता फारच सेन्सिबल म्हणावा लागतो. त्यामुळे काहीतरी चुकतंय अशी भावना उगाचच प्रेक्षकाच्या मनात पिंगा घालू लागते. मोजून चाळीस सेकंदात दोघे ट्रेडिशनल वेअरमध्ये स्वप्नांमध्ये आढळणार्‍या लोकेशनला जातात अँड ऑर्डर इज रिस्टोअर्ड.

मीनाक्षीने खरंच नागीणींचा अभ्यास करायला हवा होता. तिने नृत्यात फक्त मान आणि डोळे यांच्या हालचालींवर भर दिला आहे. आता हा एकापेक्षा एकचा मंच असता तर तो "डान्स हा इथून ते इथपर्यंत असतो" म्हणून खपून गेले असते. पण ते तसे नसल्याने पंचाईत होते. इंस्ट्रुमेंटल पीस संपून गाण्याचे बोल सुरू होतात - तुम क्या आये दुनिया बदल गयी. नितीशला आपल्याला या गाण्यासाठी प्लेबॅक उदित नारायण देत आहे हे ठाऊक असावे. कारण उदितजी गाताना जसे हातवारे करतात तसेच तो नाचताना करतो. उर्वरित गाण्यात ते एकाआड एक ट्रॅडिशनल आणि मॉडर्न असे कपडे बदलत राहतात. हा सिनेमा राजस्थानमध्ये घडत असल्याचा पुरावाही आपल्याला मिळतो कारण मध्येच ते दोघे उंटावर बसलेले दाखवले आहेत. स्वप्ने बघायला पैसे पडत नसल्याने मध्येच ताजमहल समोर दीपमाळा उभारून तिथेही ते नाचून घेतात. हा अपवाद वगळता सेट डिझाईनरने आपले काम चोख बजावले आहे. कृष्ण/विष्णु मोटिफवरून आणि स.अ.च्या हवेलीत जिकडे तिकडे नागांचे डिझाईन आहे वरून कितीही विनोद केले तरी या गाण्यात तरी कमळांचा बर्‍याचदा कल्पकतेने उपयोग केला आहे. एखाद ठिकाणी ते बटबटीत वाटू शकते पण ओव्हरऑल हा सिनेमातला आणखी एक सुसह्य स्पॉट आहे. नितीन मुकेशच्या रडक्या आवाजापेक्षा उदित नारायणचा आवाज असल्याचाही फायदा मिळतो हे नाकारता येत नाही.

७.३) रेडिओतले आवाज आणि प्रत्यक्ष आयुष्यातले आवाज यांच्यात फरक करता येत नाही

स्वप्नरंजन संपून ते दोघे परत भूतलावर येतात. दोघे इतकावेळ आलिंगन स्टेजमध्येच अडकलेले पाहून काहीशी निराशा होते. किमान फेडआऊट नंतर दोघांना बेडवर एकमेकांशेजारी दाखवता आले असते. असो, दोघेही इतकी वर्षे एकमेकांशिवाय तडपले असल्याची कबूली देतात. मीनाक्षी म्हणते की चल आपण पळून जाऊ. नितीश म्हणतो की हे शक्य नाही, मी आशालताला वचन दिले आहे. सगळी परिस्थिती कळल्यावर मीनाक्षी म्हणते ओके, पण मीसुद्धा तुझ्यासोबतच राहणार. हे सर्व चालू असताना साहिलाला जाग आलेली असते. तिला कमल उर्फ नागेशच्या बेडरूममधून मुलीचा आवाज ऐकून आश्चर्य वाटते. लगेच ती धाडधाड करून दार ठोठावायला लागते. या दणादणीने सगळे घर जागे होते. श्री.ला. येऊन तिला विचारतात काय झाले? ती म्हणते याच्या बेडरूममध्ये कोणीतरी मुलगी आहे.

कमल येऊन दार उघडतो आणि त्याच्या खोलीत कोणी मुलगी नसते. तो म्हणतो की मी रेडिओ ऐकत होतो, त्याचा आवाज असेल. साहिला फारच संशयी असल्याचे तिला सुनावून श्री.ला. आपल्या खोलीत परत जातात. तरीही ती स्वतः खोलीचा कानाकोपरा शोधते. इथे कौतुकास्पद गोष्ट अशी की त्याच्या बिछान्याजवळ एक ट्रान्झिस्टर दाखवला आहे. तिचे समाधान झाल्याने ती जायला निघणार इतक्यात तिला चादरीखाली काहीतरी वळवळताना दिसते. कुतुहलाने ती चादर उचलते तर तिच्या खाली नाग असतो. ती "साप साप" करून किंचाळते तर लगेच श्रीराम लागू हातात बंदूक घेऊन येतात. असे घडणार हे अंतर्ज्ञान त्यांना असल्याचा किती फायदा होतो बघा. इथे मीनाक्षी (नागीण) खिडकीतून निसटू बघत असते. लागू तिच्यावर गोळी झाडणार एवढ्यात नितीश त्यांचा नेम चुकवतो आणि खोलीतला बल्ब फुटतो. "साप को मारना पाप होता है" असा अनुप्रास जुळवून तो तात्पुरते त्यांचे समाधान करतो. पण आता मीनाक्षी लवकरच घरात इतर कोणत्यातरी रुपात प्रवेश करणार हे निश्चित होते. इथे शेषनागमध्ये जितेंद्र ऋषी कपूरच्या घरात कसा घुसतो याची प्रेरणा कुठून आली हे स्पष्ट होते.

७.४) हिरो-हिरवीणचे आयुष्य सुखकर चाललेले असले तर ताबडतोब व्हिलनने त्यांच्या आयुष्यात एंट्री घेणे अनिवार्य आहे

युनुस परवेझच्या जोकमध्ये अजूनही जीव शिल्लक असल्याचा दिग्दर्शकाचा समज असल्याने आपल्याला त्याला आणखी दोन मिनिटे झेलावे लागणार आहे. दवाखान्याचा शॉट, दिनेश हिंगू डॉक्टर दाखवला आहे. चरस खाल्ल्याने नपुंसक झालेला कोणीतरी पेशंट तो तपासत असतो. या तीस सेकंदांच्या लाँगशॉटविषयी खरंच काहीही बोलण्यासारखे नाही. दिनेश हिंगू वेंधळा आहे हे सिद्ध करणे हा या शॉटमागचा उद्देश आहे. युनुसचे नाव छेडा पहिलवान असल्याचेही आपल्याला या सीनमध्ये समजते (कारण तो पोरींची छेड काढतो, गेट इट?). तो दिनेशकडून उपचार करून घ्यायला आलेला असतो. थोडे न-विनोदी, बंडल संवाद झाल्यानंतर दिनेश स्टेथोस्कोपने त्याला तपासत असतो. युनुसला तो स्टेथोस्कोपही नाग वाटतो आणि तो धावत सुटतो. बाहेरची एक बाई त्याला मीनाक्षी वाटते आणि तो परत धावत दवाखान्यात जातो. इथे एक कळत नाही - स्टेथोस्कोप नाग वाटला, ओके. बाईच्या जागी मीनाक्षी दिसली, ओके. पण त्याला दिसते की मीनाक्षीने आपल्याला डोळा मारला. म्हणजे काय त्या बाईनेही त्याला डोळा मारला?

असो मुख्य मुद्दा यानंतर स्पष्ट होतो. युनुसची ही अवस्था त्याच्या पंटरला बघवत नाही. आपल्या उस्तादसाठी अजून काय करता येईल या विचारात तो असताना एकजण येऊन सांगतो की अरे याची मदत कोणी डॉक्टर करू शकत नाही. यासाठी तर एखादा तांत्रिकच हवा. आता इथे तांत्रिक कोण मिळणार? तर इथून चाळीस कोसांवर, पीपली गावात तांत्रिक नरसिंगदेव यांचे निवासस्थान असल्याचे कळते. आमिर खानने पुढच्या वर्षी आलेल्या तुम मेरे होमध्ये तांत्रिकाचा रोल केलेला असला; तरी या पीपलीचा आणि त्याच्या पीपली लाईव्हचा काही संबंध नाही, चिंता नसावी. महत्त्वाची गोष्ट अशी की आता नितीश (नाग) - मीनाक्षी आणि स.अ. यांची थेट टक्कर होण्याची संधी निर्माण झाली आहे.

भारी Lol
हा एकापेक्षा एकचा मंच असता तर तो "डान्स हा इथून ते इथपर्यंत असतो" म्हणून खपून गेले असते. >>> _/\_

कारण उदितजी गाताना जसे हातवारे करतात तसेच तो नाचताना करतो. >> Lol

स्वप्ने बघायला पैसे पडत नसल्याने मध्येच ताजमहल समोर दीपमाळा उभारून तिथेही ते नाचून घेतात.>> Rofl

८) तांत्रिक आणि विद्यार्थी यांच्यात एक महत्त्वाचे साम्य असते. एलेव्हन्थ अवरशिवाय त्यांच्या कामाला सुरुवात होत नाही.

८.१) भाभूच्या चेहर्‍यावरही भाव दिसतील - सोचा न था

स.अ. च्या हवेलीत काय चालले आहे बघूया. पंधरा वर्षे पूर्ण होत आलेली असल्याने त्याचा अंगठा परत सडायला लागला आहे. इतक्या वर्षात स.अ. ला भरघोस दाढीही आलेली आहे. अचानक तो स्वप्नातून जागा होतो आणि आपल्याला कळते की तो स्वप्न पाहत होता. पण इथे हलगर्जीपणा झालेला आहे. त्याच्या अंगठ्याला केलेला प्रोस्थेटिक मेकअप नीट स्वच्छ न केल्याने त्याची काही पुटं दिसत राहतात. याचा आवाज ऐकून नितीश (मानव) आणि मिसेस नरसिंगदेव धावत येतात. तीन वर्षांनंतर आलेल्या बेटाने अरुणा इराणीला म्हातारी दाखवायची प्रेरणा मिसेस नरसिंगदेवकडून घेतली असावी कारण तसाच एक पांढरा पट्टा मारून तिचे वय वाढलेले दाखवले आहे. स.अ. त्यांना सांगतो की आता फक्त दहा दिवस उरले आहेत. त्याला जर दहा दिवसात नागमणी मिळाला नाही तर तो शापाने मरेल.

तेवढ्यात तिथे युनुस परवेझला आणले जाते. आधी स.अ. त्याच्यावर उपचार करायला नाकार देतो. पण जेव्हा त्याला युनुसने मुलीला नागीण बनताना पाहिले आहे हे कळते तेव्हा तो या प्रकरणात रस घेतो. त्याला कळते की युनुसच्या गावात, रामनगरमध्ये ही तरुणी राहते. आता नागेश राहतो देवगडमध्ये. मीनाक्षी राहते रामनगरमध्ये. स.अ. राहतो पीपलीमध्ये. पण हे तीन एकमेकांच्या उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम नक्की कुठे आहेत हे काही केल्या कळत नाही. मूळात देवगडमधून नागेश शॉपिंगसाठी रामनगरला का येतो हेसुद्धा कळत नाही. असो, इकडे मीनाक्षी आपला नवरा सापडल्याने आनंदात असते. ती जाऊन ही बातमी भाभू आणि पेंटलला सांगते. आनंदाने मीनाक्षी बिलगल्यानंतर भाभूचा चेहरा पहावा - कधी नव्हे ते भाभूच्या चेहर्‍यावर कोणते तरी भाव दिसले आहेत, तेही (आमच्या अंदाजे) नैसर्गिक! मीनाक्षी त्याला म्हणते की आता मला जायची परवानगी द्या. भाभू म्हणतो की हो जा की, पण मी तुला मुलीसारखं सांभाळलं तर मला तुझी "बिदाई" वाजतगाजत करू देत. तिचा चेहरा पडतो. ती म्हणते की तिच्या नवर्‍याचा नाईलाज आहे, तो यांना भेटायला आत्ता नाही येऊ शकत. थोडे इमोशनल संवाद मारून भाभू आणि पेंटल म्हणतात ठीक आहे, तसं तर तसं. यांचा समजूतदारपणा बघून मीनाक्षीला गहिवरून येते. तिला बघून हे दोघे गहिवरतात. या तिघांना बघून प्रेक्षकाला "फेक कँडिड" चे उगमस्थान समजते. उगाचच एक पांढरे कबूतर मीनाक्षीच्या हातात दिले आहे. ती "चिडिया उड गयी" अशा अर्थाचे रुपक मांडताना त्या कबूतराला जरा कुरवाळून उगाचच उडवून लावते. या शॉटचे बरेच रिटेक झाले असणार. कारण ते कबूतर मीनाक्षीवर भयंकर उचकलेले स्पष्ट दिसते. मग ती भाभू आणि पेंटलचा साश्रुनयनांनी निरोप घेते.

८.२) जबरदस्तीने सेटिंग लावणारी आई

इकडे देवगडमध्ये नितीश (नाग) विचारमग्न असतो. आशालता व्हीलचेअर ढकलत येते आणि म्हणते की साहिलाला इथे येऊन बरेच दिवस झाले. तू तिच्याशी धड बोलत नाहीस. असे का बरे? जर तिने हे संभाषण वरून ऐकत असलेल्या साहिलाचे कपडे बघितले असते तर हा प्रश्न विचारण्याची हिंमत केली नसती. नितीश तिला स्पष्ट सांगतो की आमचे संस्कार जुळत नाहीत. त्यावर ती सुनावते की तू तिला बदलण्याचा प्रयत्न केलास? इंटरेस्टिंगली इथे तू स्वतः बदलण्याचा प्रयत्न केलास का, हा प्रश्न ती सोयिस्कररित्या टाळते. त्यावर तो तिला म्हणतो की या जन्मात ती माझ्यासारखी होऊ शकत नाही. इथे अर्थातच तो इच्छाधारी फॅक्टरच्या संदर्भाने बोलत असावा. पण साहिलाला ही पार्श्वभूमि माहित नसल्याने ती म्हणते - चॅलेंज अ‍ॅक्सेप्टेड!

अलका याज्ञिक ताई गाऊ लागतात - जैसे भी तू मानेगा मना लूंगी सावरिया, ऐसे, वैसे, जैसे कहेगा तैसे. यातल्या प्रत्येक "ऐसे, वैसे, जैसे, तैसे" ला ती तिची कटी आणि नितंब उडवते. या पॉईंटला पुढचे गाणे न बघताही "बेटी तुमसे ना हो पाएगा" चा शिक्का मारता येऊ शकतो. बरं तिचे कपडेही तसेच भयाण अभारतीय आहेत. नितीश हे थट्टेवारी न्यायचा प्रयत्न करून वरच्या मजल्यावर जातो. हिला क्षणार्धात कपडे बदलून टेलिपोर्ट होता येत असल्याने हा बेत फसतो. बंजारन स्टाईल घागरा चोळी घालून ती पुढचे कडवे नाचू लागते. कहर म्हणजे यावर आशालता आणि घरातले नोकर मागून टाळ्या वाजवत आहेत. जर तुम्हाला असे वाटत असेल की ही अचाटपणाची परिसीमा आहे तर ना- *बार्नी मोड ऑन* - वेट फॉर इट -ही. नाही. *बार्नी मोड ऑफ*

तिसर्‍या कडव्यात बिचारा नितीश पुस्तक वाचत पडलेला असतो. तर साहिला कोठेवालीच्या वेषात येऊन त्याच्या मोगर्‍याच्या कळ्या उधळते. उर्वरित नाचात नितीशच्या चेहर्‍यावर "कुठल्या जन्माची पापे फेडतो आहे" हा प्रश्न दिसू शकतो. शेवटी ती त्याला तळमजल्यावरच्या कोणत्यातरी खोलीत घेऊन जाते. दाराच्या काचेतून दोघांच्या सावल्या दिसू शकतात. सावल्यांमध्ये जे सुचवले जाते ते पाहून आशालता भयंकर खुश होऊन खुदकन हसते. तर घरातले नोकर आनंदाने टाळ्या पिटतात.

८.३) दोघांत तिसरी अति करू लागली तर हिरोईनला ताबडतोब हिरोच्या घरात पाठवावे

इकडे युनुस स.अ.ला भाभूच्या घरी घेऊन येतो. त्याची अवस्था बघून स.अ. "देखने में हाथी और हाथ मारो तो चपाती" अशा शब्दांत त्याची निंदा करतो. मग तो भाभूकडे जातो. भाभू आणि पेंटल त्याचे स्वागत करतात. तो त्यांना पाणी मागतो. पेंटल पाणी घेऊन येणार इतक्यात तो म्हणतो की मी फक्त मुलीच्या हातून पाणी पितो. हे नॉर्मल असल्याने इतर काही प्रश्न विचारण्याऐवजी भाभू निर्विकारपणे म्हणतो की घरात मुलगी नाही. स.अ.ने दरडावताच पेंटल सांगतो की माझी मानलेली बहीण होती पण ती आता इथे राहत नाही, आत्ता थोड्यावेळापूर्वीच घर सोडून गेली. भाभू सांगतो की चौदा-पंधरा बरस पहले, काले पर्बत के मेले में उसका पती गुम हुआ था वो अब मिल गया. स.अ. ला इतकी माहिती पुरेशी असते.

हा सावळा गोंधळ चाललेला असताना युनुसला पुन्हा एकदा फेफरे भरते आणि सगळीकडे त्याला नाग आणि मीनाक्षी दिसू लागतात. यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि तो थेट तिरडीवर! जनरल जनता "तिरडीवर झोपलेला पैलवान कसा दिसतो" हे बघायला गोळा होते. मीनाक्षीही तिथे येते. तिचा आवाज ऐकून युनुस डोळे उघडतो आणि तिरडीसकट धावत सुटतो. इथे हा विनोदी प्रसंग म्हणून ज्यांना खपवला जात आहे त्या प्रेक्षकांवर मीनाक्षी मनसोक्त हसते.

आता रामनगरमधले सर्व प्लॉट पॉईंट निस्तरले असल्याने मीनाक्षी देवगडला जायला मोकळी असते. रामप्रसादची नजर चुकवून ती बंगल्यात घुसते आणि थेट आशालताचे पाय धरते. ती आश्रय आणि काम देण्याची विनंती करते. आधी नोकर, मग आशालता आणि शेवटी साहिला आणि श्रीराम लागू याला माईल्ड विरोध करतात. त्यांचा मुद्दा व्हॅलिड असतो. घरात आणखी नोकरांची गरज नाही. पण नितीश (नाग) "स्त्रियांची मदत करणे आपला धर्म आहे" असे अचाट तत्त्वज्ञान सांगायला लागतो आणि सगळे खांदे उडवतात. इथे सगळे नोकर हिला आपापल्या खोलीत राहू द्यायची तयारी दाखवतात. पण आशालता इतकी मूर्ख नसल्याने ती हिला धान्याच्या कोठारात राहायला जागा देते. मीनाक्षीही हिला आणि नितीश (नाग) ला धन्यवाद म्हणते. इथे नितीशचा चेहरा अगदी सहज वाचता येतो - येस्स, फायनली बे इज हिअर!

कबूतर मीनाक्षीवर भयंकर उचकलेले स्पष्ट दिसते.>>> Lol

जर तिने हे संभाषण वरून ऐकत असलेल्या साहिलाचे कपडे बघितले असते तर हा प्रश्न विचारण्याची हिंमत केली नसती.>>>. Lol
ऐसे, वैसे, जैसे, तैसे" ला ती तिची कटी आणि नितंब उडवते. या पॉईंटला पुढचे गाणे न बघताही "बेटी तुमसे ना हो पाएगा" चा शिक्का मारता येऊ शकतो. >>>>>> Rofl इथे लिंक हवी होती
हे नॉर्मल असल्याने इतर काही प्रश्न विचारण्याऐवजी भाभू निर्विकारपणे म्हणतो>>>> Lol
येस्स, फायनली बे इज हिअर!>>>>>> Lol

मॅगी, मी इथे लिण्क हवी होती लिहिलंय तो सीन बघितला. अशक्य कहर आहे ती साहिला नटी Lol
ती जिन्यावरनं धावत येते तेव्हाचे, गाण्याच्या सुरुवातीचे कपडे अतिभयाण आहेत. मधे हंडा पण घेते कमरेवर. अ आणि अ अ‍ॅवार्ड मिळालाच पाहिजे.

आता मी पण येते बघून. Proud

कबूतर मीनाक्षीवर भयंकर उचकलेले स्पष्ट दिसते.>>> :हहगलो: इथे मी फुटलेच.

बाकी सस्मित ला +1.

मँजेंटा रंगाच्या तंग मॅक्सी टॉपवर तिने लाल रंगाची पश्मिना शाल खांद्यावरून ओढली आहे. त्या मॅक्सी टॉपला खाली लाल झुळझुळीत कापडाचे पॅचिंग आहे. कानात दीड इंची त्रिकोणी आकाराचे आभूषण घातले आहे. हातात लाल ग्लोव्हज् घालून दोन्ही हातांच्या तर्जनी आणि अनामिकेत अंगठ्या घातल्या आहेत. आता नितीश मीनाक्षीला सोडून हिला कन्सिडर तरी करेल का? मान्य आहे की यांची जोडी जुळवायची नाही आहे पण त्यासाठी हिला असे विचित्र कपडे घालायला लावायची गरज नव्हती >> फुटलो अचानक, आजूबाजूचं पब्लिक दचकलं Lol

मॅगी, मी इथे लिण्क हवी होती लिहिलंय तो सीन बघितला. अशक्य कहर आहे ती साहिला नटी Lol
ती जिन्यावरनं धावत येते तेव्हाचे, गाण्याच्या सुरुवातीचे कपडे अतिभयाण आहेत.>>>>>> अगदी अगदी.असला आचरटपणा कशी काय सहन करते ती आई. तिसर्या कडव्या त ती साहिला , मांडीवर लोळू बघते तेव्हा नागेश अक्षरशः कळवळतो.

Pages