नाचे नागीन गली गली

Submitted by पायस on 26 November, 2018 - 02:51

पूर्वपीठिका

द्वारका, कृष्णाची नगरी. कृष्ण आपल्या कक्षात फलाहार करत होता. "नारायण नारायण" च्या जापाने त्याचे लक्ष वेधले गेले. आज नारदमुनि एकटे नव्हते. सोबत कोणीतरी होते. ओळख पटायला फार वेळ लागला नाही.
"कालिया!" कधीकाळी यमुनेच्या डोहात वास्तव्यास असलेला कालिया नाग आज इथे कसा काय?
"प्रणाम भगवंत. आजच मी कालियाशी बोलत होतो की सध्या तुम्ही नागजमातीवर वरांचा वर्षाव करत आहात. बलरामदादांच्या सांगण्यावरून कलियुगात शेषनागावर एक अखंड सिनेमा बनण्याचे वरदान तुम्ही दिले आहेतच. मग मी म्हटलं की कालियाराव, बघा तुम्हाला सिनेमात काही रस असला तर. भगवंतांचा मूड आहे तोवर घ्या मागून वरदान!" आपले 'कळलाव्या' नाव सार्थ करत नारद म्हणाले. आता काही इलाज नव्हता, कृष्णाने कालियाला वर मागण्यास सांगितले.
"देवा, फार जुनी गोष्ट नाही. तुम्ही बासरीच्या मधुर सुरांवर मला डोलायला लावत माझ्या डोक्यावर नाचलात. तुम्हाला बासरी वाजवण्याचा अनुभव तर मिळाला पण तुम्हाला डोलायचा अनुभव नाही मिळाला. तरी माझी अशी इच्छा आहे की एकतरी असा सिनेमा बनावा ज्यात तुम्ही डोलता आणि इतर कोणीतरी सुरावट वाजवेल."
"अरे जर मी डोलायला लागलो तर बासरीतून पुंगीचे स्वर काढायला ऋषी कपूर येणार आहे का? मुनिवर आता तुम्हीच काहीतरी तोडगा सुचवा."
"भगवंत आपण तर सर्वज्ञ आहात. मी पामर आपल्याला काय सल्ला देणार? तरी भविष्यपुराणानुसार नितीश भारद्वाज नामे मनुष्य तुमची भूमिका वठवणार आहे. त्याच्याकरवी कदाचित ...."
"उत्तम विचार. कालिया, हा वर तुला पटतो का सांग. कलियुगात "डबल रोल" नामक तंत्र विकसित केले जाईल ज्यानुसार सिनेमात एकच अभिनेता किंवा अभिनेत्री दुहेरी भूमिका साकारू शकेल. तसेच या नितीश भारद्वाजाची 'कृष्ण' म्हणून प्रतिमा बनणार हे विधिलिखित आहे. त्यानंतर एक असा सिनेमा येईल ज्याच्यात नितीश पुंगीही वाजवेल आणि पुंगीच्या सुरांवर डोलेलही"
"मला हा वर मान्य आहे भगवन्"
"तथास्तु!"

******

(फास्ट फॉरवर्ड टू इसवी सन १९८९) लेखक, दिग्दर्शक मोहनजी प्रसाद "व्याहुत" यांचे घर

"सर सर सर, साईडप्लॉटसाठी ही आयडिया कशी वाटते इच्छाधारी नाग आणि गारुडी असा डबल रोल!"
"सुप्पर!! बाकी मसाला तर आहेच. पण तुला इतक्या चांगल्या आयडिया कधीपासून यायला लागल्या?"
"कोणीतरी तंबोरावाला होता, ही त्याची कल्पना" हे शब्द त्याने प्रयत्नपूर्वक टाळले.
"हिरोईन म्हणून आपली मीनाक्षी आहेच, औरत तेरी यही कहानी नुकताच केला आहे तिने आपल्या टीमसोबत. त्या नितीशच्या डेट्स मिळतात का बघ, सध्या महाभारतानंतर भरात आहे."
"ओके सर"

~*~*~*~*~*~*~

शेषनागनंतर नागपटांच्या अभ्यासक्रमातला पुढचा धडा आहे नाचे नागीन गली गली. नाचे नागीन गली गली आपल्याला वर नमूद केलेल्या गारुडी-नाग डबल रोल खेरीज, तांत्रिक सिद्ध पुरुष, बिछडलेला मुलगा, शाप देणारी आई, मानलेली आई, जबरदस्तीची आई, गारुड्यांच्या कबिल्यात राहणारी नागीण आणि सदाशिव अमरापूरकर असे बंपर पॅकेज आहे.

१) व्हिलनची एंट्री

अवांतरः माझे एक ह्युरिस्टिक आहे की जर पहिला सीन व्हिलनचा असेल आणि सिनेमा ८८-९६ या कालावधीतला असेल तर तो नि:संशय विश्लेषण करण्याकरिता बनलेला आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण १९९४ चा मॅडम एक्स!

१.१) सगळ्या गुरु-शिष्यांची गोष्ट गुरुपौर्णिमेला सांगण्यासारखी नसते

सुरुवात एका आश्रमाच्या दृश्याने होते. आश्रमाचे डिझाईन फार इंटरेस्टिंग आहे. सिमेंटच्या कुटिरांमध्ये शिष्यगण राहत असावेत. एक रँडम शिष्य स्टीलची बादली घेऊन चालला आहे. कुटिरांची छपरे उतरती आहेत. म्हणजे कथानक पर्जन्यमान अधिक असलेल्या एखाद्या प्रदेशात घडते. पण इतक्या चांगल्या लॉजिकवर हिंदी सिनेमांचा विश्वास नसल्याने प्रेक्षकाला कळते की सिनेमात एकदाही पाऊस पडणार नाही आहे. पत्र्याच्या छपरावर गवत पसरवून हा आश्रम जंगलात असल्याचे पटवून देण्याची पराकाष्ठा केली गेली आहे. तर अशा आश्रमाचा प्रमुख असतो सत्येन कप्पू आणि त्याचा पट्टशिष्य असतो सदाशिव अमरापूरकर!

आश्रमाचे पावित्र्य दाखवण्यासाठी सगळे भगवी वस्त्रे घालून बसलेले असतात. सदाशिव अमरापूरकरचे नाव नरसिंगदेव असते. तो सत्येन कप्पूसमोर हात जोडून बसलेला दाखवला आहे. सत्येन कप्पू प्रेक्षकांना सांगतो की याच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याने याला भारी भारी सिद्धी प्रदान केल्या आहेत. आता याच्या सारखा तांत्रिक दुसरा कोणी नाही. पण नरसिंगदेवला आणखी एक विशिष्ट सिद्धी हवी असते. तिचा वापर केला की मोठ्यातला मोठा सिद्ध पुरुष सुद्धा कैद होईल असा एक पिंजरा तयार होत असतो. या सिद्धीविषयी सांगण्यापूर्वी थोडेसे स.अ. च्या वेषभूषेविषयी - केसांमध्ये मधूनच चंदेरी रंगाचे फराटे ओढले आहेत तर काळी खोटी मिशी लावून तिच्या टोकांना पांढरे मिशांचे खुंट जोडले आहेत. यामागे दोन कारणे असू शकतात - १) एक अखंड मिशी मिळालीच नाही २) सत्येन कप्पूच्या धवल दाढीला कॉंट्रास्ट यावा आणि हा व्हिलन असल्याचे ठसावे. आता असेल ते असेल पण असा हा नरसिंगदेव ती सिद्धी मागतो.

सत्येन कप्पू विचारतो "दुरुपयोग तो नही करोगे?" यावर स.अ. चा चेहरा - "कप्पूऽऽऽ तुजा माज्यावर भरवसा नाय काय?" बिचारे गुरुदेव भोळे असल्याने त्यांचा स.अ. वर स्वतःपेक्षा अधिक विश्वास असतो. हरि ओम् म्हणताच त्यांच्या ओंजळीत मोती प्रकट होतात. ते ओंजळभर मोती स.अ. ला देऊन ते सांगतात की हरि ओम् चा जाप करून तू यांची एक माळा बनव. मग तो पिंजरा प्रकट होईल. जोवर ती माळा आहे तोवर तो पिंजरा आहे. हे सर्व चालू असताना मागून डी कॉर्डमध्ये (बहुधा) बेस गिटार वाजत राहते. लगेच नरसिंगदेव ती माळा तयार करतो. हे सगळे बघायला शिष्यगण गोळा होतात. यांच्याकडे महान टेलिपोर्टेशन पॉवर्स आहेत. आधी सत्येन कप्पू आणि स.अ. चा एक शॉट आहे ज्याच्यात बॅकग्राऊंडला एक शिष्य मस्त झाडाला टेकून झोपला आहे. पुढच्याच सेकंदाला तो पाच शिष्यांच्या मॉब शॉटमध्ये बॅकग्राऊंडला येतो. या पाच शिष्यांच्या मॉबशॉटमध्ये उजव्या बाजूला एक दाढीवाला आहे. त्यानंतर दोनच सेकंदात सात शिष्यांचा आणखी एक मॉब शॉट आहे ज्याच्यात हा दाढीवाला एकटा रिसायकल केला गेला आहे. त्याची दाढी बदलून प्रेक्षकांना हा वेगळा शिष्य आहे हे पटवून देण्याची पराकाष्ठा गेली आहे.

जसा जसा एक एक मोती ओवला जातो तसा तसा पिंजरा तयार व्हायला लागतो. हे सगळे चालू असताना स.अ.च्या मागे एक गाय "आय डोंट गिव्ह अ डॅम अबाऊट दीज हूमन्स" भावाने चारा खाण्यात रमली आहे. पिंजरा पोपटाच्या बसण्यासाठी रेडिमेड दांडी सकट येतो. नरसिंगदेव सॉफ्टवेअर टेस्टर असल्याने "सॉफ्टवेअर तर तयार झाले गुरुदेव पण अजून टेस्टिंग झाले नाही आणि तुमच्या पेक्षा अधिक चांगली टेस्टकेस ती कोणती?" हा बहाणा बनवून सत्येन कप्पूचा पोपट करतो - आय मीन इट, शब्दशः पोपट करतो. पोपटरुपी गुरुदेव टेस्टिंगसाठी पिंजर्‍यात स्वतःहून कैद होतात. टेस्टिंग होते आणि आता गुरुदेव आपल्याला बाहेर काढण्याची विनंती करतात. नरसिंगदेवचा चेहरा - येडा समजतो का मला? गुरुदेव वगळता नरसिंगदेवइतका चमत्कारी तांत्रिक दुसरा कोणी नसतो. वर साळसूदपणे तो सुनावतो "भस्मासुराने तर आपल्या वरदात्या शंकराला भस्म करण्याचा प्रयत्न केला होता. मी तर तुमचे नित्य दर्शन व्हावे म्हणून फक्त कैद करून ठेवतो आहे." सगळे शिष्य लगेच नरसिंगदेवची गुलामी कबूल करतात.

१.२) शाप देणारी आई
देवराज नामक एका रँडम ठाकूरच्या जमिनीवर नरसिंगदेव कब्जा करतो. याने हा ठाकूर भलताच खवळतो आणि आपली माणसे पाठवून जमीन परत घ्यायला बघतो. या ठाकूरची आई असते सुहास जोशी. सुहास सांगते की नरसिंगदेव फार मोठा तांत्रिक आहे तू त्याच्याशी पंगा नको घेऊस. पण पोरगं हट्टाला पेटलेलं असतं. नरसिंगदेव आता एका आलिशान हवेलीत राहत असतो. हवेलीच्या दिवाणखान्यातच एक कालिमातेची मूर्ती असते. मूर्तीमागच्या भिंतीवर सापांचे चित्र काढून इच्छाधारीवाला मोटिफ अधोरेखित केला आहे. मूर्तीसमोर एक हवनकुंड असते. स.अ. ने आता भगवी वस्त्रे टाकून देऊन कवड्या लावलेले काळे कपडे परिधान केलेले आहेत. बायकोचा सबुरीने घेण्याचा संदेश धुडकावून लावत स.अ. या आधी कधीच न ऐकलेला तांत्रिकांचा मंत्र म्हणतो
"ऊर्ध्वमूल अधः शाखं अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदासि यस्य पर्णानि यस्तं वेदसवेदवित्"
...........
..........
..........

शॉकमधून सावरण्यासाठी दोन मिनिटे घेऊन भेदरलेला प्रेक्षक पुढचा सिनेमा बघू लागतो. एका पळीने विभूती हवन कुंडात टाकतो. इतका वेळ ते कुंड विझलेले असते. पण विभूती टाकताच कुंडात अग्नि प्रकट होतो आणि एक अग्निगोल प्रकट होतो. अग्निगोलास स.अ. आज्ञा देतो की जाऊन देवराजला भस्म कर. इथे स.अ.ची बायको प्रेक्षकांच्या मनातली प्रतिक्रिया देते - प्रतिक्रिया. तो अग्निगोल मग जाऊन देवराजला भस्म करतो. इथे आपल्याला ग्रीन स्क्रीनवर हातात मशाल उर्फ अग्निगोल घेऊन धावणार्‍या माणसाची अस्पष्ट आकृती दिसू शकते.

देवराजला भस्म करून अग्निगोल परत कुंडात येतो आणि कुंडातली आग विझते. स.अ. ला कामगिरी फत्ते झाल्याचे लक्षात येऊन तो खुश होतो. इथे अग्निगोलाचा पाठलाग करत सुहास जोशी स.अ.च्या हवेलीत येते. ती मुलगा गेल्याच्या दु:खात शिव्यांची लाखोली वाहते. मग ती त्याला शाप देते - तू कोडी बन जाएगा. तेरा एक एक अंग गल गल कर गिरेगा. आता असा शाप दिल्यावर एवढा मोठा तांत्रिक कसा शांत बसेल. मग तो तिला "तेरी मौत तुझे बकवास करने पर मजबूर कर रही है, ले मर" असे म्हणून पुन्हा हवनकुंड प्रज्ज्वलित करतो आणि बायकोच्या विरोधाला न जुमानता गीतेतला आणखी एक श्लोक म्हणून सुहास जोशीवर पाणी फेकतो. याने सुहास जोशी नक्की का मरते हे अजून कळू शकलेले नाही कारण ती उगाचच पाच सहा वेळा नहीं म्हणते पण बाकी हार्ट अ‍ॅटॅक, जळून मरणे वगैरे कोणतीच सिंप्टम्स दिसत नाहीत. तिच्या लाशला मग याचे शिष्य नदीत फेकून देतात.
दुसर्‍या दिवशी रेघारेघांचा शर्ट आणि रेघारेघांचा पायजमा घालून झोपलेल्या नरसिंगदेवला उठवायला त्याची बायको चहा घेऊन येते. चहा घ्यायला तो हात पुढे करतो आणि त्याच्या लक्षात येते की आपला डावा अंगठा वितळत आहे. याने दोन गोष्टी सिद्ध होतात - १) नरसिंगदेव सव्यसाची आहे (कारण तो आहुती उजव्या हाताने देतो पण चहा डाव्या हाताने घेतो), २) जोशीबाईंचा शाप फळला आहे. हे लक्षात येताच स.अ. ची जाम तंतरते.

२) हिरो-हिरोईन की एंट्री

२.१) पुढच्यास ठेच मागच्यास शहाणा हे खरे असले तरी याचा अर्थ पुढचा शहाणा होत नाही. तो परत परत ठेचकाळतच राहतो.

आपल्या दगाबाज शिष्याची ही अवस्था बघून सत्येन कप्पू पिंजर्‍यात बसून खदाखदा हसतो. कप्पू आधी त्याची नीच, अधम, दुष्ट, पापी अशा शब्दांत संभावना करतो. स.अ. भगवान शंकराची शपथ घेऊन प्राणांची भीक मागतो तरी कप्पूजी बधत नाहीत. मग तो "मी तुमचा दास होऊन राहीन" असे वचन देतो आणि गुरुदेव म्हणतात "ठीक हैं". या शापातून मुक्त होण्याचा अतिशय स्पेसिफिक उपाय
नरसिंगदेवला अमरकुंडात स्नान करावे लागेल. अमरकुंडात पोहोचण्यासाठी इच्छाधारी नागाची मणी मिळवावी लागेल. हा इच्छाधारी नाग आपल्या नागीणीसोबत दर पौर्णिमेच्या रात्री काळ्या पर्वतावर येतो. तोवर सड-गलकर मरू नये म्हणून "ओम् नमः स्वाहा" या मंत्राचा एक कोटीवेळा जाप केल्यास ही सड-गल प्रोसेस पंधरा वर्षांसाठी थांबेल.
स.अ. लगेच भगव्या वस्त्रांत येऊन जाप सुरु करतो आणि जवळपास बारा मिनिटांनंतर श्रेयनामावली पडद्यावर झळकते. इंटरेस्टिंगली इथे पहिले नाव मीनाक्षी शेषाद्रीचे आहे, हिरो नितीश भारद्वाजचे नाही. क्रेडिट्स संपेपर्यंत स.अ.चा जाप पूर्ण होतो आणि त्याचा कोड तात्पुरता बरा होतो. कप्पू मग त्याला आपल्याला स्वतंत्र करायला सांगतो. "आधी अमरकुंड तर मिळू दे" करून तो त्याला पुन्हा चुना लावतो. सुभद्रा (त्याची बायको, कृष्णकथेचा मोटिफ) ला गुरुदेवांच्या दाणापाणीची व्यवस्था करायला सांगून तो निघून जातो. (इथे सत्येन कप्पूची "दुष्ट पापी" वाली डायलॉग डिलीव्हरी बघण्यासारखी)

२.२) नाग सरपटणारा प्राणी आहे म्हणून इच्छाधारी नागांनीही सरपटलेच पाहिजे

काळा पर्वत आश्चर्यजनकरित्या निळसर प्रकाशात न्हाऊन निघालेला आहे. डच अँगलमध्ये, खराब शॉटमध्ये नागाचे चित्र तरंगत पर्वतावर येते. तोंडातून एक मणी काढून ते जमिनीवर ठेवते. मग त्या नागाचा भरजरी कपडे घातलेला नितीश भारद्वाज बनतो. हा महाभारताच्या सेटवरून थेट इथे आला असावा. थोडे "आ आ आ आ" आणि "ओ ओ ओ ओ" होते व मीनाक्षी शेषाद्रीची एंट्री होते. नागाच्या मानाने नागीण बरीच कमी नटली आहे जे बॉलिवूडसाठी जरा रेअर आहे. तरी केसांत नाग हेअर बँड घालून एका बाजूने पोंगा सोडलेला. नाग टिकली, जरीकाम केलेला गुलाबी स्कर्ट, पर्वतावरच्या धबधब्यात नाचता येईल या दृष्टीने घातलेली चोळी असा सरंजाम आहे. तरी हे दोघे सुसह्य आहेत. सेट अप होताच पुंगीच्या बॅकग्राऊंड मुझिकवर नितीन मुकेश "मिले मन से ये मन मिले तन से ये तन आयी मधुर मिलन की सुहानी रैना" करून रडू लागतो. सोबत म्हणून साधना सरगम ताई "जागी मन में तपन लागी तन में अगन, आज अगन से अगन बुझा दे सजना" करून साथ देऊ लागतात. याला पहारा म्हणून स.अ. शतपावली करतो आहे.

गाणं मोठं रंजक आहे. दोघांपैकी कोणाच्याही तनात अगन लागल्याचे जाणवत नाही. शेषाद्रीताईंनी आडनावाला जागणारी नागीण काही वठवलेली नाही. त्यांनी भरत नाट्यम्, कुचिपुडी, कथक, आणि ओडिसी नृत्यकलांचे शिक्षण घेतले खरे पण श्रीदेवी स्कूल ऑफ स्नेक डान्सिंगमध्ये त्या गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे नृत्य शास्त्रीय नृत्य वाटत राहते. त्यातही त्यांनी भर कंबर, मान आणि डोळे हलवण्यावर दिलेला आहे. नितीशने उर्वरित अवयव (त्याचे स्वतःचे, मीनाक्षीचे नव्हे) हलवून मानवी शरीराचा कोटा पूर्ण केला आहे. एक कडवे झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की एवढे ढीगभर कपडे घातल्याने ती अगन आणि सुहानी रैना सगळं व्यर्थ चाललं आहे. मग मीनाक्षी चोळी काढून नुसतेच झुळझुळीत पातळ नेसते तर नितीश खालचे निळ्या रंगाचे वस्त्र आणि गळ्यातल्या माळा वगळता सर्व काढून टाकतो. एव्हाना नृत्यदिग्दर्शकालाही जाग आलेली असते. मग त्या दोघांना झाडावरून सरपटत धबधब्याने निर्माण झालेल्या तळ्यात जायला सांगतो, कारण ते नाग आहेत ना. इथे हे लोक सोयीस्कर रित्या विसरतात की नाग अर्थात इंडियन कोब्रा झाडांवर राहत नाही, झाडांवर राहणारा (arboreal) भारतीय साप अजगर! तसेच त्या धबधब्याची नदी होत नाही हे भौगोलिक आश्चर्यही आपल्याला बघायला मिळते. मग थोड्या पोजेस मारल्यानंतर त्यांची तने एकदाची एकमेकांना मिळतात. पण परमोच्च बिंदू येणार तर त्याजागी नरसिंगदेव येतो.

३) कॉम्प्लिकेटेड प्लॉटचा सेटअप इलॅबोरेट असावा लागतो

३.१) गाव तिथे जत्रा

स.अ. ला बघून ते दोघे नागरुपात पळ काढतात. स.अ. मग एक पुंगी पैदा करून त्यांना शोधायला लागतो. पुंगीच्या कर्णकटू आवाजाला वैतागून ते परत मनुष्यरुपात येतात. पण काही अनाकलनीय कारणाने ते लहान मुलांचे रुप घेतात. नितीश बनतो मास्टर आलोक आणि मीनाक्षी बनते बेबी गुड्डू. हे स.अ.च्या नजरेतून सुटलेले नसते. दोघे धावत धावत पोहोचतात एका जत्रेत. इथे दोघा बालकलाकारांनी दमल्याचा न भूतो न भविष्यति असा अभिनय केला आहे. साधारण गावाच्या विरंगुळ्याची चव लक्षात यावी म्हणून एक बाई बाप्याचा वेष घालून दुसर्‍या बाईला छेडत "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" या गाण्यावर नाचताना दाखवली आहे. तर अशा गावच्या जत्रेत श्रीराम लागू आणि आशालता आपल्या सुपुत्रास घेऊन आले आहेत. आणि त्यांचा सुपुत्र आहे - मास्टर आलोक! इथे डबल रोलची भानगड अनुभवी प्रेक्षकास लगेच समजू शकते. त्या अजाण बालकाने देवदर्शनाआधी मेला बघण्याचा हट्ट धरलेला असतो. सुदैवाने हे साल २००० नाही. अन्यथा किमान ट्विंकल खन्नाच्या त्या गाण्याच्या भीतिने तरी त्याने मेला बघण्याचा हट्ट धरला नसता.

इथे नरसिंगदेवही जत्रेच्या ठिकाणी पोहोचतो. तो नागजोडप्याला शोधत, पुंगी वाजवत जत्रेत हिंडू लागतो. त्याच्या पुंगीच्या आवाजाने वैतागून जत्रेतला एकही व्यक्ती त्याच्याकडून पुंगी हिसकावून, त्याच्या पेकाटात लाथ घालत नाही हे विशेष! आपल्या मास्टर आलोक (नाग) आणि बेबी गुड्डूला मात्र या पुंगीचा त्रास होऊ लागतो. इतक्या वर्षात एकाही इच्छाधारी नागाला न सुचलेले शहाणपण ते दाखवतात. कानात बोटे घालतात. पुंगीचा आवाजच ऐकू येत नाही तर हे डोलणार कसे? एका कँपा कोला विकणार्‍या गाडीमागे ते लपतात. तिथून चालत जाणारा नरसिंगदेव कोला पीत नसल्याने नजर फिरवतो आणि त्या दोघांच्या शेजारून निघून जातो. हे सर्व घडल्यावर एकदाचे व्हायचे तेच होते - जत्रेत या दोघांची चुकामूक होते आणि ते हरवतात.

३.२) जत्रेत लहान मुले हरवली नाही तर त्या जत्रेला काय अर्थ आहे

दोन हरवलेल्या मुलांना कोणीही जत्रेच्या "हरवलेली मुले" केंद्रात का देत नाही हा प्रश्न आपण सोडून देऊ. मुख्य गोष्टी अशी की आपल्याला या दोघांची नावे कळतात. मीनाक्षीचे नाव आहे मोहिनी आणि नितीशचे नाव आहे नागेश. बाकी ते "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" चालूच आहे. त्या गाण्याची कोरिओग्राफी डबल मिनींगच्या दृष्टीने अभ्यासण्याजोगी आहे. इकडे मास्टर आलोक (नाग) आणि मास्टर आलोक (मानव) यांची भेट होते. इथे कंटिन्यूटी मिस्टेक आहे. आधी शॉटमध्ये मास्टर आलोक (मानव) मँगो डॉली (चोकोबार सारखे आईसक्रीम) खात असतो. ती थोडीफार खाऊन झालेली असते (काडीचे दुसरे टोक दिसत आहे इतपत खाऊन झाली आहे). कट टू मास्टर आलोक (नाग). कट टू मास्टर आलोक (मानव) जो म्हणतो की "अरे". इथे याच्या हातात अजिबात न खाल्लेली नवीन कांडी आलेली आहे. ते दोघे आपल्या सारखाच दिसणारा दुसरा मास्टर आलोक बघून प्रसन्नपणे हसतात. काही कारणाने जत्रेत दोन भिल्लही आलेले असतात. ते मास्टर आलोक (मानव) वर कांबळे टाकून त्याला पळवून घेऊन जातात. याने मास्टर आलोक (नाग) भलताच क्रुद्ध होतो.

स्टीलच्या भांड्यांच्या स्टॉलमधून डॉ. लागू आणि आशालता काहीतरी खरेदी करत असतात. इथे स्पष्ट दिसते की प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना चिनीमातीच्या सहा कपांचा सेट दिला आहे, स्टीलच्या भांड्यांच्या स्टॉलवर. मग त्यांच्या लक्षात येते की अरे आपलं पोरगं जागेवर नाही. इथे कळते की मास्टर आलोक (मानव) चे नाव कमल आहे. यांचा नोकर भोला, ज्याने कमलवर लक्ष ठेवणे अपेक्षित असते तो "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" बघण्यात मग्न असतो. तोही मग यांच्याबरोबरीने कमलला शोधायला लागतो. इकडे कमलला त्या भिल्लांनी बळी द्यायला आणलेले असते. ते कमलचा बळी देणार इतक्यात तिथे नागेश येऊन त्यांना चावतो आणि कमलचा जीव वाचवतो. हे झाल्यावर त्याला आठवण होते की अरे मोहिनीला तर आपण मागेच सोडून आलो. क्यू तिचा रडण्याचा शॉट. पण दैवाला काही वेगळेच मंजूर असते. ते नोकर लोक नागेशला कमल समजून शब्दशः उचलून घेऊन जातात. आशालता आईच्या ममतेने त्याची विचारपूस करते. आधी तो कमल असल्याचे नाकारतो पण दुरून स.अ. येताना दिसताच तो आढेवेढे न घेता लागू आणि आशालता बरोबर जातो.

इकडे रमत गमत चाललेल्या स.अ. ला मरून पडलेला भिल्ल दिसतो. भिल्लाला साप चावल्याचे स्पष्ट असतेच पण स.अ. एका सेकंदात याला चावणारा इच्छाधारी नागच आहे हे ठरवतो. नजर वळवताच त्याला बलिवेदीवरचा कमल दिसतो. आश्चर्याची बाब अशी इच्छाधारी नागाचा दंश ओळखता येत असला तरी स.अ. ला इच्छाधारी नाग आणि माणूस यांच्यात फरक करता येत नसतो. त्यामुळे तो कमलला उचलून घेऊन जातो.

पुढे कमलचे काय होते? आपण घरात आणलेला मुलगा इच्छाधारी नाग आहे हे आशालता आणि श्रीरामना समजते का? मधल्या काळात असे काय घडते की मोहिनीवर गल्लो गल्ली नाचण्याची पाळी येते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स.अ. ला अमरकुंड सापडते का? तसेच सत्येन कप्पूची मुक्तता होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार. पण एका अल्पविरामानंतर प्रतिसादांत - उरलेले रसग्रहण प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या ऐसें वैसे जैसे तैसे गाण्यात तावायफ कडव्यात नितीश भारदवाज एक पुस्तक वाचताना दाखवला आहे. आता हा लोळून कादंबरी/कवितासंग्रह वगैरे वाचत असेल असा तुमचा अंदाज असेल. गेला बाजार नि.भा. मराठी असल्याने वपु नाहीतर विनोदी साहित्य वगैरे.
पण नाही.
वेट फॉर इट. पुस्तक आहे how to make your own high pressure spray plant.

दिग्दर्शकाची STEM प्रती असलेली निष्ठा यातून दिसून येते.

154393860740478.png

दिग्दर्शकाची STEM प्रती असलेली निष्ठा यातून दिसून येते. >> +1 Lol जबऱ्या निरीक्षण टण्या, माझ्या नजरेतून हे सुटले होते.

खर तर द्व्यर्थी विनोद करण्याची फार इच्छा होती पण राहुदे! Proud

आंतरजालावर बरीच शोधाशोध केल्यावर या पुस्तकाचे परिक्षण देखील हाती लागले. इच्छुकांनी इथे त्याचा लाभ घ्यावा: https://www.motorsportmagazine.com/archive/article/june-1981/116/book-re...

Universiti Putra Malaysia (UPM) या मलेशियातील युनिवर्सिटीच्या PERPUSTAKAAN SULTAN ABDUL SAMAD या लायब्ररीत हे पुस्तक उपलब्ध आहे.

रामनगर, पिपली, चंदगढ (किंवा जे काही आहे ते या सिनेमात) या त्रिकोणात कुठे मोटर रिपेअरी, बॉडी शॉप गराज नसेल. ती धंद्याची सुवर्णसंधी पाहून नितिश भारद्वाज गॅरेज काढण्याचा विचार करतो आहे. तिथे बॉडी शॉपमध्ये पेंटिंग वगैरे साठी त्याला हाय प्रेशर पंपाची गरज असणार म्हणून तो संध्याकाळी फावल्या वेळात हे पुस्तक वाचतो आहे असाही गहन विचार या मागे असू शकतो.

टण्या _/\_

चित्रपटात कोणते पुस्तक आहे याचे निरीक्षण ठीक आहे. पण ते पुस्तक शोधून काढून त्याचे परीक्षणही वाचणे या सिद्धीपर्यंत जाणे म्हणजे टोटल रिस्पेक्ट. Happy

"पण ते पुस्तक शोधून काढून त्याचे परीक्षणही वाचणे या सिद्धीपर्यंत जाणे म्हणजे टोटल रिस्पेक्ट." - Happy हे सही आहे!

टण्या _/\_

पण ते पुस्तक शोधून काढून त्याचे परीक्षणही वाचणे या सिद्धीपर्यंत जाणे म्हणजे टोटल रिस्पेक्ट >> ही सिद्धी तर या सिनेमातल्या सो कॉल्ड सिद्ध पुरुष, सत्येन कप्पूलाही साध्य झालेली नसावी!

ही सिद्धी तर या सिनेमातल्या सो कॉल्ड सिद्ध पुरुष, सत्येन कप्पूलाही साध्य झालेली नसावी!>>+१११. त्यामुळेच त्याचा पोपट झाला बहुतेक Wink
बाकी खरंच रिस्पेक्ट!

@टवणेसर, काय निरीक्षण! काय निरीक्षण! मानलं ब्वा!

साहिला चा असला आचरट्पणा आशालताला आवडतोय हे तर कहर आहे. आमच्या मातोश्री असत्या तर हे असले पोषाख बघुनच तिची रवानगी पुन्हा परदेशात केली असती. तिची तरी नैतर स्वतःच्या लेकाची तरी. पुढचा गाणं-न्रुत्यरुप्री अत्याचारी आचरटपणा बघण्याचा सहन करण्याचा प्रश्नच नाही.
श्री ला वाचले ह्या कचाट्यातुन. ते नाहीत ह्या सीनमधे ते बरंय. नैतर त्यांना बिचार्यांना मागे टाळ्या पिटाव्या लागल्या असत्या आणि रुमच्या दारावरच्या सावल्या बघुन आशालतासारखं खुद्द्कन हसावं लागलं असतं.

पायस जबरदस्त लेखन. तुमचे सर्व प्रति साद जमल्यास लेखात अपडेट करा. गॉड ब्लेस युअर व्हिजन अ‍ॅन्ड सेन्स ऑफ ह्युमर.

साहिला चा असला आचरट्पणा आशालताला आवडतोय हे तर कहर आहे. आमच्या मातोश्री असत्या तर हे असले पोषाख बघुनच तिची रवानगी पुन्हा परदेशात केली असती. तिची तरी नैतर स्वतःच्या लेकाची तरी. पुढचा गाणं-न्रुत्यरुप्री अत्याचारी आचरटपणा बघण्याचा सहन करण्याचा प्रश्नच नाही.+११११११११११११११
काल पुर्ण पाहिला हा सिनेमा, कहर आहे _/\_

जर तुम्हाला असे वाटत असेल की ही अचाटपणाची परिसीमा आहे तर नाही... Happy
मग काय आहे आचरट पणाची परिसीमा.....? सावल्यांमध्ये जे सुचवले जाते ते पाहून आशालता भयंकर खुश होऊन खुदकन हसते. तर घरातले नोकर आनंदाने टाळ्या पिटतात.... ही का? ......हॉरीबले!

काहीही...
आणि नितीश वाचत असलेले पुस्तक...व त्याचे परीक्षणही.......? साष्टांग दंडवत!
Biggrin

सावल्यांमध्ये जे सुचवले जाते ते पाहून आशालता भयंकर खुश होऊन खुदकन हसते. तर घरातले नोकर आनंदाने टाळ्या पिटतात.... >>>लग्ना आधीच !!

ही साहिला HAHK मधली स्वीटी आहे का?? >> हो.

९) इच्छाधारी नागांची लोकसंख्या घटते आहे यात नवल ते काय?

९.१) नागिणींचे आवडत्या संगीतकारांत नौशाद यांचा समावेश होतो

बहुधा तरी सेठ गिरधारीलालच्या बंगल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मीनाक्षीचे इतका वेळ बरे, बॉलिवूड बंजारन श्ट्यांडर्डने उत्कृष्ट, असलेले कपडे हळूहळू साहिलाच्या वळणावर जाऊ लागलेले दिसतात. १९४९ च्या दिल्लगीमधले "तू मेरा चांद मैं तेरी चांदनी" हे गाणे गुणगुणत ती नितीश (नाग) साठी जेवण घेऊन चाललेली असते. वाटेत तिला साहिला हटकते. साहिलाचा फ्रॉक पाहताच मीनाक्षीचे कपडे अचानक कुत्यूर स्टँडर्ड वाटू लागतात. ती मीनाक्षीच्या हातातले ताट हिसकावून घेते आणि तिला हाकलण्याचा प्रयत्न करते. इकडे नागेश आपल्या नागीणीची वाट बघत बसलेला असतो. दार वाजलेले ऐकून तो म्हणतो की "ये आत दुसरे कोणी नाही." नागीणीच्या जागी भूतणीला बघून तो हादरतो. साहिला लगेच चान्स मारू बघते - कोई नही हैं इसी लिए तो हम आये हैं, खाना लाना नौकरों का नही मेरा काम हैं इत्यादी संवाद तिच्या तोंडी आहेत. नितीशचे लक्ष मात्र दारावरच्या मीनाक्षीकडेच आहे. तो अनवधानाने बोलून जातो - मैं हर जन्म तुम्हारा ही रहूंगा. साहिला भलतीच एक्साईट होते आणि म्हणते ओह डार्लिंग, किस मी. इतका वेळ शांत असलेल्या मीनाक्षीला आपल्या नवर्‍याला पाच पैशाचे चॉकोलेट संबोधल्याचा भलताच राग येतो (आजची किंमत ५० पैसे, इन्फ्लेशन रेटने १९८९ मध्ये ~६ पैसे). ती चटणी द्यायची राहिली, डाळ द्यायची राहिली असे बहाणे करून आत घुसते. साहिलाच्या विरोधाला न जुमानता डाळ घेऊन तिच्या जवळ येते आणि बशीने डाळ साहिलाच्या मांडीवर ओतते व तिचा बेत हाणून पाडते. ही अनोखी कॅटफाईट बघून नितीश मिश्किल हसतो. एवढ्याने मीनाक्षीचे समाधान झालेले नसते. ती नागीण बनून साहिलाला बाथरूममध्येही घाबरवते.

मग ती स्वयंपाक घरात येऊन दुधीची भोपळ्याचे साल काढत असते. शैलीतल्या बदलांचा आणखी एक पुरावा म्हणजे नाग मोटिफसाठी प्रत्येक नागपटात भाजी ही कायम पडवळाचीच होत असते (विश्वास नसेल तर शेषनाग पुन्हा पाहावा. जितेंद्र मंडईतून उसाची मोळी आणावी तशी पडवळाची मोळी घेऊन येतो.) इथे ती दुधी भोपळ्याची भाजी किंवा उत्तर भारत म्हणून चला घिया-चने की सब्जी बनवत असते. मीनाक्षीने नागपटांचा अभ्यास न केल्याचाही हा परिणाम असू शकतो. मीनाक्षीला इच्छाधारी रुप कधी प्राप्त झाले असावे याचाही अंदाज बांधता येऊ शकतो. आता ती १९५४ सालच्या शादाब चित्रपटातले "जोगन बन जाऊंगी सजना तोरे कारन" गुणगुणत आहे. म्हणजे तिला इच्छाधारी रुप प्राप्त होऊन किमान ३५ वर्षे होऊन गेली आहेत. इंटरेस्टिंगली तिने गुणगुणलेली सर्व गाणी ड्युएट आहेत, संगीतकार नौशाद आहे आणि पुरुष गायक श्याम कुमार आहे. हिच्या स्पेसिफिक टेस्टमागे काय कारण असेल याचा विचार करत असतानाच प्रेक्षकाला स्वयंपाकघराच्या दारातून इतर नोकर अतिशय क्रिपी पद्धतीने तिला ताडताना दिसतात. पण नितीश (नाग) ला हा अधिकार फक्त आपला असल्याचे ज्ञात असल्याने तो येऊन त्यांना हाकलून लावतो. मग क्रिपी हसत तिच्याशी बोलू लागतो. त्याला तिने असे नोकर बनून राहणे पसंत नसते. आता या घरात नोकरांना ब्युटी पार्लरमध्ये फेशिअल आणि हेअर स्टाईल करून घेण्याइतका पगार मिळत असेल तर कोण नोकर बनून राहणार नाही? पण मीनाक्षी नितीशच्या बुद्धिमत्तेचा विचार करून "प्यार की तडप" असे कारण पुढे करते. हे सर्व जरी ठीक असले तरी आता यांचा बनलेला मूड वाया जाऊन कसे चालेल? त्यासाठी रात्री "पहाडी वाला खंडहर" या अतिशय स्पेसिफिक पत्त्यावर भेटायचे ठरते. नेमका स.अ. त्याच रात्री त्याच पहाडीवर नागयज्ञ करायचा ठरवतो. त्याने म्हणे जगातले सगळे नाग त्या पहाडीवर येऊन मरणार असतात. नागयज्ञाची इंटेन्सिटी पुरती कळावी म्हणून ११ गारुडी व ११ तांत्रिक आणले आहेत. मिसेस नरसिंगदेव त्याला थांबवण्याचा तोकडा प्रयत्न करतात. पण गाण्याची वेळ झालेली असल्यामुळे स.अ. तिच्याकडे दुर्लक्ष करतो.

९.२) नागयज्ञ

गाण्याचे बोल आहेत - यार मिला, प्यार मिला, हां हां प्यार मिला, करार मिला, दिल मेरा गाने लगाऽऽऽ इयां इयां, हो हो, इयां इयां! या इयां इयांला काही अर्थ आहे असा प्रेक्षकाचा समज व्हावा म्हणून भिल्ल जोडपी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून बोलवली आहेत पण ते नाचतात स.अ. च्या नागयज्ञात! पण हे गाण्याचे मुख्य आकर्षण नाही. मुख्य आकर्षण इथे बघू शकता - मुख्य आकर्षण. रहस्यमयी रित्या नितीश (मानव) पुंगी वाजवत येतो आणि हा पुंगी भिल्लकन्यांसाठी का वाजवतो आहे हा प्रश्न सोडवण्याची प्रेक्षक पराकाष्ठा करत असताना स.अ. चे न भूतो न भविष्यति असे क्लोज अप आपल्याला बघण्याची संधी आहे. ६०% सिनेमा संपल्यानंतर अखेर मीनाक्षी हाताने नागाचा फणा करते पण त्यात व्यायाम नृत्य शैली मिसळल्यामुळे सगळं मुसळ केरात जाते. नितीश (मानव) च्या पुंगीत दम नसल्याने स.अ. स्वतः पुंगी वाजवायला लागतो. डझनावारी नाग जमा होतात पण हे दोघे नाचण्यात बिझी असल्याने ते काही येत नाहीत. स.अ. च्या छातीचा भाता झाल्यानंतर ते दोघे एकदाचे झिंगलेल्या अवस्थेत त्या यज्ञस्थळी येतात.

इथे मिसेस नरसिंगदेव त्यांना सावध करून पळवून लावतात आणि सिनेमाची लांबी कमीत कमी वीस मिनिटांनी वाढवतात. स.अ. चा एक शिष्य हे बघतो आणि पुंगीवादनात दंग असलेल्या स.अ. ला जाऊन घडला प्रकार विदित करतो. स.अ. मग कॅज्युअली हातातल्या पुंगीचा त्रिशूळ बनवून मिसेसना फेकून मारतो. त्यांची रिस्ट्रेंड रिअ‍ॅक्शन बघून हे या सिनेमातले सॉफ्ट डिसमिसल म्हणावे लागेल. मग स.अ. आणि त्याचे शिष्य पुंग्या वाजवत संपूर्ण जंगलभर हिंडतात पण तोवर नागरुप घेऊन नितीश (नाग) व मीनाक्षी केव्हाच घरी परत आलेले असतात आणि प्रणयाराधनात मग्न असतात. जर हेच करायचं होतं तर काळ्या पर्वतावर कशाला गेले होते? त्याच्या खोलीत मीनाक्षी रात्री नागरुपात आली असती आणि तोच परिणाम साधता आला असता. इच्छाधारी नागांची संख्या इतकी कमी का आहे याचे रहस्य हा सिनेमा उलगडतो.

९.३) पंधरा साल का भूला अगर घर को आये तो उसे भूला नही कहते

दुसर्‍या दिवशी सकाळी आशालता मोहिनीच्या नावाने शंख करत असते पण मोहिनी नागेशच्या बाहुपाशात अजूनही झोपलेली असते. हा आरडाओरडा ऐकून नितीश (नाग) ला जाग येते आणि तो मीनाक्षीला उठवतो. आता पटकन खाली जावे तर मीनाक्षीला घटकाभर गप्पा मारायची हौस येते. ती म्हणते की आज पौर्णिमा आहे. आज रात्री मी नव्या नवरीच्या वेषात तुझ्याकडे येईन. आपण ओके म्हणणार एवढ्यात ती लगेच गाऊन बदलून भरजरी लाल साडी नेसते. नितीशला थोडी अक्कल असल्याने तो तिला पटकन जायला सांगतो. पण तिचे दुर्दैव अजून संपलेले नसते. गणपती देखाव्यांमध्ये मिळणार्‍या यांत्रिक घार/गरुड इ. पक्ष्यांपैकी एक तिथून उडत चाललेला असतो. तो नागरुपातल्या मीनाक्षीला उचलून घेऊन जातो. हे दिसताच नाईटड्रेसमध्ये नितीश (नाग) त्या गरुडामागे धावत सुटतो. त्याला घराबाहेर पडताना श्री.ला. बघतात. तेही त्याच्या मागेमागे नोकर चाकर घेऊन येतात.

नितीश (नाग) भलताच वेगवान धावक असल्याने तो क्षणार्धात माळरानावर पोहोचतो. त्या पक्ष्याला आपल्या घरट्याकडे जाण्याऐवजी थोडावेळ गोल गोल घिरट्या घालायची हुक्की येते. मग नितीश (नाग) नेम साधतो आणि त्या पक्ष्याच्या पंज्यातून मीनाक्षी (नागीण) खाली पडते. इथे आपल्याला एक वेल जज्ड कॅच बघायला मिळतो. नितीश (नाग) चे हे जलवे चाललेले असताना नितीश (मानव) पुंगी वाजवत इकडून तिकडे हिंडत असतो. स.अ. त्याला सांगतो की तू जरा त्या तिथे जाऊन शोध मी हा असा इथे शोध घेतो.

नितीश (नाग) ला उशीराने का होईना शहाणपण येते की या जोडप्याचे आपण कसलेही देणे लागत नाही. लहानपणीच जर त्याने "तो तुमचा मुलगा तिथे जवळचा एका भिल्ल वस्तीत बेशुद्ध पडला आहे." हे सांगितले असते तर त्याच्या सोबतिणीवर ही वेळ आली नसती. त्यामुळे तो जाऊन सर्व सत्य सांगण्याचा निश्चय करतो. हे सर्व घडत असताना त्या तिथे श्री.ला. आलेले असतात. ते रमत गमत पाठलाग करत असल्याने नितीश (नाग) त्यांच्या दृष्टीआड झालेला असतो. त्याची बंदूक मात्र त्यांना सापडते, जी त्याने नेमकी फेकून दिलेली असते. थोडा शोध अजून घेता तो यांना मिळालाही असता पण त्या तिथे पाठवलेला नितीश (मानव) तिथे येतो. त्यामुळे ते त्यालाच कमल समजतात, जे खरेही आहे म्हणा! सर्व प्रकार कमलच्या ध्यानात येतो. तो त्यांना काहीबाही थाप मारून, दोन मिनिटात येतो असे सांगून स.अ. कडे परत जातो. स.अ ला तो सांगतो की माझा हमशकल जिथे राहतो त्या ठिकाणाचा पत्ता लागला आहे. स.अ. त्याला म्हणतो की तू त्या घरी जा आणि तिथल्या सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढ, मी तुझ्या मागोमाग आलोच इच्छाधारी नाग पकडायला.

स.अ. ला इच्छाधारींचा पत्ता लागला आहे. श्री.ला. आणि आशालता यांना त्यांचा मुलगा परत मिळाला आहे. साहिलाचा भयाण फॅशन सेन्स आता काहीच मिनिटे आणखी सहन करावा लागणार आहे. नवीन मुद्दे उपस्थित होणे बंद झाले आहे. याचाच अर्थ आता महा-क्लायमॅक्सची सुरुवात होणार आहे.

त्या पक्ष्याला आपल्या घरट्याकडे जाण्याऐवजी थोडावेळ गोल गोल घिरट्या घालायची हुक्की येते. >>> Lol पटकन चाळताना हे एक लोलवाक्य पिकअप केले. आपले व्हिलन्स पाहून हे पक्षी शिकले असावेत. हम तुम्हे इतनी आसानी से नहीं मारेंगे वगैरे

बाकी बॅकलॉग क्लिअर करतोय जमेल तसा.

जबरद स्त. चालू आहे. मी फोन वर हे वाचत वाचत अर्धा सिनेमा पाहिला. मला अजुन एक जौम्मत कळली आहे.

नाचे नागिन गली गली म्हणजे ना ना ग ग म्हणजे नाग नाग. अस्स आहे ते.

महा-क्लायमॅक्सची सुरुवात होणार आहे.>> येउ द्या लव्कर .. Happy
इथे वाचुन सिनेमा पुर्ण पाहिलाय.. पण तुम्ही चिरफाड लिहिल्याशिवाय मजा नाह्वी

नाचे नागिन गली गली म्हणजे ना ना ग ग म्हणजे नाग नाग. अस्स आहे ते.>> आवडलय Lol

त्या गाण्यामध्ये पाहिले का?
भिल्ल-भिल्लीणीच्या जोड्या आहेत, पण एक्सत्रा कोर्डीनेटर ने माती खाल्ली आणि एक्सत्रा चा काउंट चुकवला
मग 2 भिल्लीणींची जोडी बनली,

मग असी डायरेक्टर ने माती खाल्ली आणि ही विजोड जोडी अगदी कॅमेरा समोरच उभी केली

छातीचा भाता !>>> मेलेच हसता हसता!!
मग 2 भिल्लीणींची जोडी बनली,

मग असी डायरेक्टर ने माती खाल्ली आणि ही विजोड जोडी अगदी कॅमेरा समोरच उभी केली>> नैतर काय, भयाण डान्स आहे, नितीश वेगळाच वाटतोय Biggrin

ही साहिला HAHK मधली स्वीटी आहे का?? >> हो. >>>>>>> हया साहिलाच प्रत्येक चित्रपटात असच नशीब असत. ती नायकासाठी फिल्डिन्ग लावते. पण शेवटी तिला 'पदरी पडल पवित्र झाल' हया न्यायाने कॉमेडियनला स्विकाराव लागत. Lol HAHK ( आधी सलमान, नन्तर दिलीप जोशी), त्याच्या आधीचा जितेन्द्र- जयाप्रदाचा मां (आधी जितेन्द्र, नन्तर कादर खान). हया पिक्चरमध्ये हिच कोणाशी जुळत शेवटी हे काय माहित नाही बै.

नाचे नागिन गली गली म्हणजे ना ना ग ग म्हणजे नाग नाग. >> Lol

ती नायकासाठी फिल्डिन्ग लावते. पण शेवटी तिला 'पदरी पडल पवित्र झाल' हया न्यायाने कॉमेडियनला स्विकाराव लागत. >> Lol हिचं सिनेमातलं नशीब इतकं वाईट आहे की कधी कधी तर तर हिला कॉमेडिअन सुद्धा नाही मिळत. उदा. धरम संकटमध्ये ही डाकूंची सरदार असते आणि विनोद खन्नाला बदला घेता यावा म्हणून ती त्याला डाकू बनण्यासाठी मदत करते (ट्रोप सबव्हर्जन). एवढं करून सुद्धा तो अमृता सिंगकडे जातो.

१०) महाक्लायमॅक्स - १

क्लायमॅक्सच्या सुधारित व्याख्येनुसार जेव्हा नवीन मुद्दे उपस्थित होणे बंद होतील आणि उपस्थित झालेले मुद्दे/प्रश्न/अडचणी सुटू लागतील तेव्हा क्लायमॅक्स सुरू होतो. सध्या श्री.ला/आशालता जोडप्याला कमल-नागेशचा उलगडा होऊन कमल परत मिळणे, सत्येन कप्पूची सुटका, स.अ. ला अमरकुंड मिळणे (त्याशिवाय फाईट कशी होणार?) आणि त्याचा अंत व त्याचे पर्यवसनी मोहिनी-नागेश मिलन असे मुद्दे बाकी आहेत. हे सगळे कव्हर करायला अत्यंत हाय पेस्ड असा अर्ध्या तासाचा क्लायमॅक्स आहे. हा दोन भागांत कव्हर होईल.

१०.१) केवळ पुंगीच्या जोरावर इच्छाधारी नागाला कंट्रोल करता येत नाही

मीनाक्षी आणि नितीश (नाग) परत त्या बंगल्यापाशी येतात. ती त्याला म्हणते की तू जाऊन आशालताला टाटा करून ये, मी बाहेर तुझी वाट बघते. तो बरं म्हणतो. त्यावेळी जीपमधून येणारे श्री.ला आणि नितीश (मानव) त्यांना दिसत नाहीत. आत जाऊन तो आशालताला सत्य सांगतो. आशालता फारच गोंधळते की हे काय चालले आहे. हे कमी म्हणून नितीश (मानव) आणि श्री.ला. दोघे एकदम आत घुसतात. दोन-दोन नितीश पाहून श्री.ला. सुद्धा गोंधळतात. नितीश (मानव) सांगतो की इथे डुप्लिकेटच्या मुद्द्यावरून आश्चर्यचकित व्हायचे काहीही कारण नाही. हा एक इच्छाधारी नाग आहे, तो कोणाचेही रुप धारण करू शकतो. कमलला बघून नागेश मात्र भयंकर खुश होतो. आता तर त्याला वचनभंगाचे वैषम्य बाळगण्याचेही कारण उरत नाही. तो सर्वकाही खरं खरं सांगून टाकतो. तो इच्छाधारी नाग असल्याचे ऐकून श्रीराम लागू संयत प्रतिक्रिया देतात, आशालता भावूक प्रतिक्रिया देते आणि साहिला वरच्या मजल्यावरून खाली बघत चेहर्‍याचे स्नायु हलवते. नितीश (मानव) इतक्या वर्षांत पुरता ब्रेनवॉश झालेला असल्यामुळे तो सरळ पुंगी बाहेर काढतो आणि स.अ. यायच्याआधी याला गिफ्टपॅक करून ठेवू बघतो. इतक्या वर्षांत एकाही इच्छाधारी नागाला न सुचलेला उपाय नितीश (नाग) ला सुचतो. त्या पुंगीने डोके उठायच्या आत तो जाऊन नितीश (मानव) च्या हातातली पुंगी फेकून देतो. मग त्या दोघांची झोंबाझोंबी होऊन त्याचे पर्यवसन नितीश (मानव) ची पुंगी (पक्षी: वाद्य) फुटण्यात होते. हे सर्व वरच्या मजल्यावरून खाली आलेली साहिला, चाकाच्या खुर्चीतली आशालता आणि गरागरा डोळे फिरवणारे श्रीराम लागू टकामका बघत राहतात. आशालताच्या प्रेमाच्या बंधनात बांधलेला असल्याने नितीश (नाग) नितीश(मानव) ला चावू शकत नसतो, अन्यथा ही फाईट लांबण्याचे काहीही कारण नाही. मग ते थोडा वेळ फाईटिंग करतात. ही फाईट प्रचंड कन्फ्युजिंग आहे. कारण नितीश (मानव) ला मार पडतो आहे हे या तिघांना खालच्या मजल्यावरून दिसू शकते पण मध्ये मध्ये क्लिअरली ती फाईट नितीशच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत चाललेली आहे (हिंट्स: खोलीतला ट्रान्झिस्टर वगैरे). मग मध्ये एकदा ती फाईट सोफा असलेल्या एका खोलीत जाते जिथे साहिलाच्या गाण्यातले एक कडवे होते. पण एकही शॉट दिवाणखान्यातला नाही जिथे आपले तीन प्रेक्षक आहेत. तरीही त्यांना हे दोघे आणि या दोघांना हे तिघे दिसू शकतात. फाईटचा शेवटचा शॉट दिवाणखान्यात दाखवून आपल्याला मॅचकटच्या मदतीने गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या गंडलेल्या कंटिन्युटीची आपण नोंद घेतली पाहिजे. नितीश (मानव) चे डोके संगमरवरी फरशीवर आपटते आणि तो बेशुद्ध होतो. मग नितीश (नाग) दिलगिरी व्यक्त करून नागलोकात जायला निघतो.

१०.२) महान पुस्तकांच्या कितीही प्रती घेतल्या तरी कमीच पडतात

हे सर्व इतके सोपे असते तर सिनेमा घडलाच नसता. बाहेर उभ्या असलेल्या मीनाक्षीला घर शोधत येणारा स.अ. दिसतो. तिने भिंतीचा आडोसा घेतल्याने स.अ. ला ती दिसत नाही पण घर त्याला सापडते. तो घरात पुंगी वाजवतच येतो. दारातच नितीश (नाग) त्याला भेटतो. महान तांत्रिक असल्याने तो थोडा अनुभवी असतो. त्यामुळे नितीश (नाग) ला प्रयत्न करूनही त्याची पुंगी हिसकावून घेता येत नाही. नितीश (नाग) आपल्या बिळात, हे आपलं वरच्या मजल्यावरच्या खोलीत पळ काढतो. तो इतका बावचळून जातो की त्याला खिडकीही उघडता येत नाही. मग तो हाताचा फणा करून स.अ. वर वार करतो आणि सुदैवाने पुंगी खाली पडते. पुन्हा महान तांत्रिक असल्याने स.अ. पूर्ण तयारीनिशी आलेला असतो. जादूने त्याच्या हातात नवी पुंगी येते आणि पुन्हा नितीश (नाग) चे टॉर्चर सुरू होते. तो वैतागून नागरुपात येतो आणि त्याला स.अ. कैद करतो.

इथे नितीश (मानव) शुद्धीवर आलेला असतो. त्याच्या क्लोजअप मध्ये आपल्याला "how to make your own high pressure spray plant" या महान पुस्तकाच्या १७ प्रती शिडाळ्यावर मांडून ठेवलेल्या दिसतात. एकाच पुस्तकाच्या १७ प्रतींची आवश्यकता सेठ गिरधारीलाल आणि कुटुंबिय यांना भासत असेल तर ते निश्चितच फार महान पुस्तक असले पाहिजे, कृपया अभ्यासू वाचकांनी याची नोंद घ्यावी. इकडे स.अ. निवांतपणे नितीश (नाग, नागरुप) ला हातात धरून खाली येतो. नाग स.अ. ला का चावत नाही हे अजून कळू शकलेले नाही. हातात नाग घेऊन येणारा तांत्रिक पाहून साहिला आणि नोकरवर्ग दचकण्याचा अभिनय करतात. पण या घडणार्‍या घटना इतक्या अतर्क्य आणि वेगवान आहेत की श्री.ला. आणि आशालताच्या चेहर्‍यावर पूर्णवेळ "व्हिस्की, टँगो, फॉक्सट्रॉट" असे भाव आहेत. डोक्यावर पडल्यानंंतर आधीचे डोक्यावर पडणे कॅन्सल होऊन नितीश (मानव) ला सर्वकाही आठवते. पण स.अ. ला त्याने काही फरक पडत नसल्यामुळे तो या चिल्लर लोकांवर हसून, हातात इच्छाधारी नाग पकडून कॅज्युअली रस्त्यावरून रमत गमत चालत परतीची वाट धरतो. मीनाक्षी हे बघते. आता आपल्या नवर्‍याचे प्राण वाचवण्याची जबाबदारी तिच्यावर येते. खरं तर तिची या सिनेमातली साहसे बघता तिचे नाव सावित्री ठेवायला हरकत नव्हती. पण नितीश सत्यवान दिसत नसल्यामुळे आणि कृष्णाचा मोटिफ बघता मोहिनी नावच सुयोग्य असल्याचे झटकन लक्षात येते आणि पटकन पुढच्या अचाट प्रसंगाला प्रेक्षक धीरोदात्तपणे सामोरा जातो.

१०.३) बॉलिवूडमध्ये मानव कृतघ्न तर इच्छाधारी नाग कृतज्ञ असतात

जपानी याकुझांमध्ये पॉम्पेडॉर नावाची केशभूषा प्रसिद्ध आहे. याकुझा आणि साहिला मध्ये काहीही साम्य नसतानाही तिची तशी केशभूषा केली आहे. ती श्री.लांना म्हणते की ही नागीण आहे, हिला मारून टाका. या लोकांचा कृतघ्नपणा पाहून मीनाक्षी चिडते आणि या सर्वांना नागेशच्या उपकारांची जाणीव करून देते. पण साहिला आपला धोशा कायम ठेवते. ते नोकरही का कोणास ठाऊक तिचे ऐकतात. प्रत्यक्षात श्री.ला अजूनही परिस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. मग मीनाक्षी चिडचिड अवस्थेत जाते आणि नाचता नाचता फाईट करू लागते. इथे काही अनाकलनीय कारणाने एक सेठजी, एक मुनिमजी, एक पगारदार वर्गीय, दोन कुकरी घेतलेले गुरखे असे बघे आले आहेत. या लोकांचा इतर सिनेमाशी काहीही संबंध नाही पण तेही साहिलाच्या हाकेला ओ देऊन नागीणीला मारू बघत आहेत. मीनाक्षी हाताचा फणा करून उगाच फूत्कारते आणि चिडचिड अवस्थेमुळे निळे झालेले डोळे गरागरा फिरवते. तिचे फूत्कारणे बघून श्री.ला. दचकतात. त्यांचे स्वगत काहीसे असे असावे - मी एक शब्द तरी बोललो आहे का? तू आमची शत्रू नाही एवढे कन्फर्म करण्याचा प्रयत्न चालू आहे? म्हातार्‍या माणसावर असे फूत्कारतात का कधी? हेच का तुझ्या बिळातले संस्कार!

तिकडे स.अ. च्या चालण्याचा स्पीड सुपरफास्ट असल्याने तो त्याच्या चाळीस कोसांवरच्या हवेलीत पोहोचला आहे. काळ्या रंगाच्या वर्तुळात हिरवा नाग ठेवून तो पुंगी वाजवतो आहे. याचे पुंगीवादन चाललेले असते तोवर हे लोक मीनाक्षीला घेराव घालून बसले आहेत. या डान्स-फाईटच्या दोन तीन तरी आवृत्त्या शूट झाल्या असाव्यात पण फालतू एडिटरने जंपकट्स टाकून त्या फाईटचं पार मातेरं केलं आहे. दोन-तीन आवृत्त्यांचा पुरावा - साहिलाच्या दोन वेगवेगळ्या केशभूषा दिसतात (एक पॉम्पेडॉर आणि एक तुलनेने साधी). मीनाक्षीची सेट केलेली एकच बट कपाळावर येते किंवा तिचे घामेजलेले केस विस्कटलेले दिसतात. बघ्यांच्या हातातली शस्त्रे बदलत राहतात. पगारदार वर्गीयाची ब्रीफकेस सेठजी आणि मुनीमजीच्या हातात जाते. बघ्यांची संख्या पाच ते दहा मध्ये फिरत राहते. आशालता काही ठिकाणी बाहेर दिसते काही ठिकाणी दिसत नाही. जर सिनेमा एवीतेवी लांबलाच आहे तर ही फाईट पूर्ण दाखवायला हरकत नव्हती. किमान यांचा कृतघ्नपणा नीट ठसला असता.

असो, तर हे लोक मग तिच्यावर भाले फेकून मारतात. पण अतिशय टुकार नेम असल्याने चार फुटांवरूनही त्यांना नेम साधता येत नाही. तिकडे कंटाळून नागेश (नागरुप) नागमणी बाहेर काढतो. नागमणी मिळाल्याने स.अ. अतिशय आनंदतो. सत्येन कप्पू (पोपट) प्रेक्षकांसाठी टाईमलाईनचा खुलासा करतो. स.अ. ला अमरकुंड पर्यंत दुसर्‍या दिवशीच्या सूर्यास्ताच्या आधी पोहोचणे भाग आहे. अन्यथा सुहास जोशीच्या शापामुळे तो मरेल. गुरुदेवांच्या मते त्यांच्या शिष्याचे डेडलाईनच्या आधी त्या ठिकाणी पोहोचणे अशक्य आहे. पण स.अ. ला आपल्या शक्तींवर पूर्ण विश्वास असतो. तो तडक अमरकुंडांचा रस्ता धरतो. इकडे मीनाक्षीला त्या भाल्यामुळे आयतेच हत्यार मिळते. ती मांडीवर आपटून त्याचे दोन तुकडे करते आणि दांडक्याच्या कांडक्याने या लोकांना बडवते. "गठ्ठ्याने लोक बडवले जात असतील तर भारतीय जनता ते बघायला गर्दी करतेच करते" या त्रिकालाबाधित सत्याची पुनःप्रचिती प्रेक्षकांना द्यावी या हेतुने आता शेकडोंच्या संख्येने मॉब दाखवला आहे. बघ्यांना बडवून ती फणकार्‍याने स.अ. च्या हवेलीच्या दिशेने जाते. नितीश (मानव) ही बंदूक उचलून तिच्या मागे मागे निघतो. श्री.ला. विचारतात, तू कुठे निघालास? तो म्हणतो मी तिच्या "सुहाग की रक्षा" हेतु निघालो आहे. त्याला सगळे लॉजिकल सल्ला देतात, हे काम आपल्या कुवतीबाहेरचे आहे. झाले गेले विसरून आता आमच्या सोबत राहा. यावर तो या लोकांची कृतघ्न म्हणून संभावना करतो (जे बरोबरच आहे) आणि कसे नागेश-मोहिनी जनावरे असूनही कृतज्ञ होते हे अधोरेखित करतो. आँ? इच्छाधारी नागांची कधीपासून जनावरांमध्ये गणना होऊ लागली? श्री.लांना आपल्या पोराची बौद्धिक कुवत कळून चुकते व ते त्याला घरात डांबतात. या लोकांचे सिनेमातले अवतारकार्य संपले असल्याची नोंद घ्यावी.

१०.४) जादुई वस्तुंसोबत त्यांचा डेमो असणे श्रेयस्कर

मीनाक्षी वास काढत काढत स.अ. च्या हवेलीत पोहोचते. तिला दिसते की एका वर्तुळात एक नाग निपचित पडला आहे. "मेरे स्वामी" करून ती त्याच्याकडे झेपावते तर त्या वर्तुळातून ज्वाळा निघतात आणि मागून स्फोट झाल्याचे मुझिक वाजते. या ज्वाळा म्हणजे शाळेत मॅग्नेशिअमच्या पट्ट्या जाळण्याचा रसायनशास्त्रातला प्रयोग करताना ज्या इग्निशन फ्लेम्स दिसतात त्या होय. ती काळी पूड बहुधा बेरिलिअमची असावी कारण मॅग्नेशिअमची पूड सहसा एवढी काळी दिसत नाही. या गोंधळाने झोपलेला नाग जागा होतो. पण देणे घेणे राम जाणे म्हणून तो निवांत पडून राहतो.

या मिनी स्फोटांनी त्रस्त झालेल्या मीनाक्षीची सत्येन कप्पू (पोपट) ला दया येते. तो तिला सांगतो की याची मणी स.अ. कडे आहे व त्यामुळे याची ही अशी अवस्था झाली आहे. सत्येन कप्पू आपली पोपट बनण्याची करुण कहाणीही तिला विदित करतो. याने मीनाक्षी भलतीच दु:खी होते. ती सांगते की २४ तासांत जर नागमणी परत मिळाली नाही तर - आणि इच्छाधारींच्या मणीविषयक नियम ती सांगणार एवढ्यात माठ सत्येन कप्पू तिला इंटरप्ट करून "वो तुझे कभी मणी वापस नही देगा" हे सांगतो. ऑब्व्हिअस गोष्टी सांगण्यापेक्षा मणी मिळाली नाही तर काय होईल हे सांगणे जास्त महत्त्वाचे नाही का? अशाने याच्या पोपट बनण्याविषयी प्रेक्षकाला काय सहानुभूति उरेल? असो, मीनाक्षी आपल्या सुहागसाठी अमरकुंडच काय, गरज पडल्यास स्वर्गलोकातही जायचा निश्चय करते.

स.अ. रमत गमत कुठल्यातरी रँडम पर्वतातून चालला आहे. एक हिमालयाचा शॉट टाकून आपल्याला तो शिवालिक प्रदेशांत असल्याचे कळवले आहे (कारण त्याच्या पर्वतावर बर्फ पडलेला नाही). त्या पर्वतराजींमध्ये एक शिळा बसवलेली गुफा असते. नागमणी तिच्या जवळ नेताच ती शिळा बाजूला सरकते आणि स.अ तिच्यात प्रवेश करतो. दुसर्‍याच क्षणी तो एका वेगळ्याच स्थळी शब्दशः फेकला जातो. या स्थळी कायमस्वरुपी वावटळ आणि वाळलेली पाने असतात. कोण्या एका तामसिक देवतेची मूर्तीही तिथे आहे आणि त्या मूर्तीच्या तोंडातून सतत ज्वाळा बाहेर पडत आहेत. मूर्तीच्या समोर एक छोटे टेकाड आहे. या टेकाडावर एक छोटेसे कृत्रिम तळे आहे, तळ्यात काही जलपर्णी आहेत. हेच ते अमरकुंड! प्रेक्षकांना याच्या जादूची खात्री पटावी म्हणून कुठूनतरी एक यांत्रिक कावळा येतो, कुंडात डुबी घेतो आणि यांत्रिक हंस होऊन बाहेर पडतो! एकंदरीत हे अमरकुंड फारच कस्टमर फ्रेंडली आहे. दरवेळी कोणीही नवीन व्यक्ती तिथे आला की त्याच्या डेमो साठी ही यांत्रिक कावळा/हंस योजना असावी. विशेष म्हणजे हे सर्व स.अ. टेकाडाच्या पायथ्याशी उभे राहूनही सहज दिसू शकते.

अमरकुंड मिळाल्याने स.अ. हरखतो. पायर्‍या चढून तो टेकाडाच्या माथ्यावर पोहोचतो. शॉर्टकट घेऊन मीनाक्षी तिथे आधीच पोहोचलेली असते. ती ऑलरेडी चिडचिड अवस्थेत आहे. तर स.अ. कडे नागमणी आणि त्याच्या महान सिद्धींची ताकद आहे. तिच्याकडे वेळच वेळ आहे तर स.अ.ला सूर्यास्ताच्या आत अमरकुंडात स्नान करणे भाग आहे. क्लायमॅक्समधला सर्वात महत्त्वाचा भाग अर्थात फायनल फाईटची सिद्धता झाली आहे. हा पंधरा मिनिटांचा महासंग्राम महाक्लायमॅक्स-२ मध्ये.

त्याचे पर्यवसन नितीश (मानव) ची पुंगी (पक्षी: वाद्य) फुटण्यात होते. >>> Lol

हेच का तुझ्या बिळातले संस्कार! >> Lol

Pages