पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २५. नागिन (१९७६)

Submitted by स्वप्ना_राज on 14 November, 2018 - 12:55

index_2.jpg

बगाराम खटणेची आणि तुमची ओळख आहेच. ‘धुंद' ह्या चित्रपटाबद्दल लिहिल्यानंतर खटणे क्रेझी लाईन आखल्यावर झुरळ काही दिवस गायब होतात तसा गायब झाला होता. मला वाटलं जुने चित्रपट पाहायचं भूत एव्हाना त्याच्या डोक्यावरून उतरलं असेल. पण एके दिवशी संध्याकाळी अचानक तो आपली वही घेऊन अवतीर्ण झाला. एकता कपूरने मर्यादित भागांची मालिका काढणार असल्याचं जाहीर केल्याची बातमी ऐकणाऱ्याच्या चेहेर्‍यावर येतील तसे 'गहरा सदमा' एव्हढ्याच शब्दांनी वर्णन करता येईल असे भाव त्याच्या चेहेऱ्यावर होते.

‘या खटणे. बऱ्याच दिवसांनी आलात. होतात कुठे?’
उत्तरादाखल खटणेने एक सुस्कारा टाकला आणि आपली वही पुढे केली.
‘पुन्हा नव्या चित्रपटाबद्दल लिहिलंत का?’
परत एक सुस्कारा - ‘हो'. हा एखादा मूकपट बघून आलाय की काय?

मी त्याने खूण करून ठेवलेलं पान उघडलं आणि भयानक दचकलो.
‘मला वाटलंच होतं तुमची अशी प्रतिक्रिया होणार म्हणून' ह्या वेळी आधी वाक्य आलं आणि मग सुस्कारा.
‘पण....’
‘मित्रांनी खूप आग्रह केला. माझ्याच्याने मोडवला नाही.’ दु:खाचं मूळ कारण ह्यापेक्षा किमान शब्दांत मांडता येणं प्राप्त परिस्थितीत खटणेला शक्य झालं नसतं.

त्याच्या दु:खात सहभागी होणं मला भाग होतं. माझ्या दु:खात तुम्हाला सहभागी होता येतं का ते बघा.
----

चित्रपट पाहिल्याचा दिनांक: ८ नोव्हेंबर २०१८
स्थळ: मुंबई शहर
वेळ: रात्रौ ९
चित्रपटाचे नाव: नागिन (मराठी अर्थ नागिण उर्फ सौ. नाग.....नागिण ह्या व्याधीशी गल्लत करू नये)
साल: १९७६
निर्माता व दिग्दर्शक – राजकुमार कोहली
संगीत – लक्ष्मीकांत प्यारेलाल
स्वरसाज - श्रीमती आशा भोसले, श्रीमती लता मंगेशकर, श्रीमती सुमन कल्याणपूर, श्री. किशोर कुमार, श्री. मोहम्मद रफी आणि श्री. महेंद्र कपूर
चित्रपटाचा एकूण अवधी - १८० मिनिटे (फार झाली!)
भाषा: हिंदी
प्रमुख पात्रं - इच्छाधारी नाग, इच्छाधारी नागिण (ह्या दोघांनाही नावं नाहीत. नागांच्या राज्यात फॉर्म भरायला लागत नाहीत का?), विजय, किरण, राजेश आणि इतरेजन.

कथानक:

कृष्णचरित्रातली कालियामर्दनाची कथा माझ्या फार आवडीची होती. होय, होती असंच आता म्हणावं लागेल. हा चित्रपट पाहिल्यानंतर 'कालिया' ह्या नावाची मी इतकी धास्ती घेतली आहे की परवा दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रमांची सूची बघताना अमिताभ बच्चनच्या "कालिया"चं नाव वाचून मी इतका घामाघूम झालो की तीर्थरूपांना नाकाला (माझ्या!) कांदा लावावा लागला. मी असं का बोलतोय ते शोधून काढायलाही कोणी हा चित्रपट पाहू नये म्हणून लगेच खुलासा करतोय - ह्या चित्रपटाच्या सुरुवातीला असं सांगितलंय की कालियामर्दनानंतर कालिया सर्पाने मानवी रुपात देवाची माफी मागितली आणि तेव्हा मानवाला इच्छाधारी सर्पांच्या अस्तित्वाबद्दल कळलं. त्याच्या ह्या एका गुन्ह्यापायी शोलेतल्या गब्बरसारखं 'तेरा क्या होगा कालिया' असा जाब त्याला तमाम हिंदी चित्रपटरसिकांनी विचारायला हवा. असो. तर आता कथा नामक लक्तराच्या चिंध्या.

सुरुवातीलाच आपल्याला एक तरुण सैरावैरा पळताना दिसतो. ह्याच्यामागे इच्छाधारी नाग लागले असावेत अशी माझी समजूत झाली. पण नाही. एक गरुड अचानक त्याच्यावर हल्ला करायला येतो. तो तरुण आपला कसाबसा बचाव करायचा प्रयत्न करत असताना अचानक गोळी झाडल्याचा आवाज येतो. ही गोळी झाडलेली असते विजयने. बिचारा गरुड मरून पडतो. तो तरुण आपले प्राण वाचवल्याबद्दल विजयचे आभार मानायला येतो. विजय त्याला तू ह्या जंगलात काय करतो आहेस म्हणून विचारतो तर तो तरुण हे जंगल माझं घर आहे असं म्हणतो. आता तो विजयला तू इथे शिकार करायला आला आहेस का म्हणून विचारतो. विजय म्हणतो की मी इच्छाधारी सापांवर एक पुस्तक लिहितोय. (खरं तर जंगलात ३-४ सफारी करून पण कधीकधी अख्खे वाघ-सिंह दिसत नाहीत मग इच्छाधारी नाग कसे दिसतील आणि दिसले तरी ते इच्छाधारी आहेत हे कसं कळणार?). लगेच तो तरुण सांगतो की करोडो सापांत एखादाच साप आपल्या १०० वर्षांच्या तपस्येनंतर इच्छाधारी बनतो. उद्या अमावास्येच्या रात्री तो नागिणीला भेटायला येईल, आपल्याजवळचा मणी काढेल आणि मग त्या प्रकाशात ती नाच करेल (एव्हढं सव्यापसव्य करायच्या ऐवजी हे पौर्णिमेला का नाचत नाहीत?). हे ऐकून विजय त्याला 'तू हे स्वत: पाहिलं आहेस का' म्हणून विचारतो (बरोबर आहे. माझे बाबा म्हणतात ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये). ह्यावर तो तरुण 'तुम्ही माझे प्राण वाचवले आहेत तेव्हा तुम्हाला मदत केलीच पाहिजे' असं म्हणून त्याच्या समोर चक्क आपलं रुप बदलून नाग होतो. नाग झाल्यावर त्याने मानवी रुपात घातलेले कपडे कुठे जातात ते मात्र मला समजलं नाही. खरं तर ते जमिनीवर पडायला हवे होते, नाही का?

तेव्हढ्यात विजयला त्या नागाने मानवी रुपात जेव्हढे कपडे घातलेले असतात त्यापेक्षा थोडे जास्त (पण तरी तोकडेच!) कपडे घातलेली एक तरुणी एका झाडाजवळ उभी असलेली दिसते. ती गाऊ लागते. ही त्या नागाची इच्छाधारी नागिण. (तिच्याकडे पाहून हिने १०० वर्षं तपस्या वगैरे केली असेल असं काही मला वाटलं नाही.) मग नाग पुन्हा मानवी रुपात येतो आणि दोघे मिळून (आम्हाला शाळेत असताना स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आणि बालदिनाच्या आधी कवायतीची करावी लागायची तशी) अमावास्येच्या रात्री करायच्या नाचाची रंगीत तालीम करतात. विजय तर एव्हढा डोळे फाडफाडून बघत असतो की मला हा काही वेळाने फुललेल्या लाह्या आणि शीतपेयांची बाटली घेऊन येऊन तिथे बैठक मारणार अशी खात्री पटली होती.

त्यापुढल्या दृश्यात दिसते एक वाढदिवसाची मेजवानी. तिथे एक तरुणी चिठ्ठी घेऊन येते. ही विजयची प्रेयसी असते. त्याचे ५ मित्र आळीपाळीने त्याने पाठवलेली चिठ्ठी वाचतात आणि लगेच त्याच्याकडे जायला निघतात. तो त्यांना 'अजी म्या इच्छाधारी साप पाहिला' हे परोपरीने सांगतो पण ते हसण्यावारी नेतात. आणि तेव्हढ्यात त्यांना एक गाणं ऐकू येतं. इच्छाधारी सापांच्या जगात मानवी जगाइतके प्रतिभावान गीतकार नसावेत कारण ते एकच गाणं चित्रपटभर पुन्हापुन्हा म्हणत होते. लगेच सगळेजण विजेऱ्या घेऊन बाहेर पडतात (नागमण्याचा उजेड नागिणीला नाचताना जमिनीतले खड्डे, इतर साप वगैरे दिसावेत इतपतच पडत असावा).

तर हे लोक बाहेर जाऊन बघतात तर काय? नागीण एकटीच मानवी रुपात नाचत असते (म्हणजे तिला अंधारात दिसत असावं). त्या नागालाही काय दुर्बुद्धी सुचते काय माहित. दोन पायांवर चालत नाहीतर पायाविना सरपटत यायच्या ऐवजी सुपरमॅनसारखा हवेतून उडत येतो. मित्रांपैकी एकाला, किरणला, वाटतं की हा नाग ह्या तरुणीला चावणार म्हणून तो गोळी झाडतो ती त्या नागाला लागते. झालं! तो नाग मेला आहे का नुसता जखमी झालाय ह्याची शहानिशा न करता विजय म्हणतो की त्याला शोधा आणि जमिनीत पुरा म्हणजे नागिणीला त्याच्या डोळ्यांत आपली छबी दिसणार नाही (नागिणीला नागिण रुपात हात नसले तरी मानवी रुपात हात असतात त्यामुळे ती नागाला खणून काढून छबी पाहू शकते हा मुद्दा कोणीच उपस्थित करत नाही) नाहीतर ती बदला घेतल्यावाचून राहणार नाही. (हे ज्ञान त्याला नक्कीच पुस्तकातून मिळालं असणार. वाचाल तर वाचाल!)

इथे तो नाग नागिणीच्या बाहुपाशात (हे लिहिताना कसंसंच होतंय!) प्राण सोडताना म्हणतो की १००० रात्री मी ह्या सुहागरात्रीची वाट पाहत होतो. आता एव्हढ्या प्रतीक्षेनंतर ती रात्र आली होती तेव्हा जे काय करायचं ते लगेच करायचं सोडून हा नाचत का बसला होता देव जाणे! मग लगेच नागिण त्याच्या डोळ्यांत सगळ्यांच्या छबी पाहून त्याच्या हत्येचा बदला घ्यायची प्रतिज्ञा करते.

विजयने ह्या बदला प्रकरणाबद्दल सांगितलं असल्याने सगळे मित्र सावध असतात. विशेषकरून किरण. रात्री तो झोपलेला असताना अपेक्षेप्रमाणेच त्याच्या खिडकीवर टकटक होते. बाहेर ती नागिण असते. हा मारे तिला सांगतो की मी तुला ओळखलंय. पण ती आपण एक गारुडी असून त्या नागानेच आपल्याला कैद करून ठेवलं होतं अशी लोणकढी मारते. आजपासून 'तुम्हीच माझे स्वामी' असं तिने म्हटल्यावर किरण पाघळतो आणि तिला खोलीत घेऊन येतो. मात्र खोलीतल्या आरश्यात तिचं प्रतिबिंब त्याला सापाचं दिसतं. तो दचकतो पण नागिण त्याला दंश करून आपल्या सूडनाट्याला सुरुवात करते. सकाळी मित्रांना किरणचा मृतदेह मिळतो. (ह्या सगळ्या गडबडीत इच्छाधारी सापाच्या मानवी रूपाचं प्रतिबिंब मात्र सापाचंच असतं ही गोष्ट किरण विजयला सांगू शकत नाही त्यामुळे त्याच्या आगामी पुस्तकात ही माहिती समविष्ट होऊ शकणार नाही ह्याचं मला मनस्वी दु:ख झालं)

किरणच्या मृत्यूमुळे आपल्याही जीवाला धोका आहे हे बाकी मित्रांना कळून चुकतं. त्यातल्या एका मित्राची, राजेशची, आई गंगा भोपाली नामक गारुड्याला (हा बहुतेक शोलेतल्या सुरमा भोपालीचा कुंभमेळ्यात हरवलेला जुळा भाऊ असावा. अगदी त्याच्यासारखाच दिसत आणि बोलत होता) घेऊन येते. तो कुठलातरी साप पकडून हीच ती इच्छाधारी नागिण म्हणून तिच्याकडून पैसे उकळतो. अर्थात इच्छाधारी नागिण त्याच्या प्रेयसीचंच रूप घेऊन आलेली असल्याने त्याचाही जीव घेते.

आता मात्र हवालदिल झालेले मित्र थेट एक साधूबाबा गाठतात. आधी तर तो त्यांना मदत करायला नकारच देतो कारण त्याच्या मते नागाची काही चूक नसताना त्याला मारणं हा गुन्हा होता. (आणि विजयने गरुडाला मारलं त्याचं काय? अमिरोंका खून खून. गरीबोंका खून पानी?) मग तो त्याच्या अनेक वर्षांच्या तपस्येचं फळ म्हणून बनवलेली 'ओम' ची लॉकेटस त्यांना घालायला देतो जेणेकरून नागिण त्यांच्याजवळ येऊ शकणार नाही.

साधूबाबाने दिलेल्या लॉकेटचा काही उपयोग होतो का ती नागिण आपला बदला घेण्यात यशस्वी होते? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायलाही हा चित्रपट कोणी पाहू नये असं माझं स्पष्ट मत आहे.

पात्रयोजना:

दिवाळी किंवा गणपतीच्या दिवसांत कोकणात जाणाऱ्या एस. टी. ला व्हावी तशी माणसांची भाऊगर्दी ह्या चित्रपटात झालेली आहे. पैकी इच्छाधारी नागाच्या भूमिकेत जितेंद्र आहे (त्याचा उल्लेख श्रेयनामावलीतAbove all Jeetendra असा केलेला आढळतो). पहिल्या १०-१५ मिनिटांतच तो गोळीला बळी पडत असल्याने त्याला फारसं काही करून दाखवायची संधी मिळालेली नाहीये. अर्थात तसंही इच्छाधारी नागाने मानवी रुपात नेमकं कसं वागणं अपेक्षित आहे हे कोणालाच ठाऊक नसल्याने त्याच्यावर टीका करता येत नाही. इच्छाधारी नागिणीची प्रमुख भूमिका रीना रॉय ह्या अभिनेत्रीने निभावलेली आहे. बदला घेणे हे नाग निधन पावलेल्या इच्छाधारी नागिणीचे मुख्य जीवितकार्य असल्याने सदैव डोळे मोठे करून रागीट चेहेर्‍याने वावरणे आणि बळी मिळवायला तोकड्या कपड्याला पूरक असे हावभाव करणे हे निकष मानले तर भूमिकेला न्याय दिला आहे असे मानायला जागा आहे. ह्या भूमिकेतून तशीही फार दर्जेदार अभिनयाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे.

विजय ह्या तिसऱ्या महत्त्वाच्या भूमिकेत सुनील दत्त आहे. त्याने (आणि काही इतर पुरुष पात्रांनीही) अकारण लांब केस ठेवण्याचं काय कारण होतं आणि त्याने ही भूमिका का स्वीकारली असावी हे मला खूप विचार करूनही उमगलं नाही. इतर भूमिकांत अनिल धवन (किरण), विनोद मेहरा (राजेश), योगिता बाली (राजेशची प्रेयसी रीटा), सुलोचना (राजेशच्या आई), रेखा (विजयची प्रेयसी सुनिता), गंगा भोपाली (जगदीप), प्रेमनाथ (साधूबाबा), फिरोझ खान (विजयचा मित्र राज), संजय खान (विजयचा मित्र सुरज), कबीर बेदी (विजयचा मित्र उदय), रणजीत, अरुणा इराणी, प्रेमा नारायण आणि मुमताझ (राजची प्रेयसी राजकुमारी) अशी मांदियाळी आहे. मुमताझच्या नामोल्लेखासोबत श्रेयनामावलीत Her Last Film असे शब्द होते. तिने हा चित्रपट केला नसता तर बरं झालं असतं असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं.

गीते:

लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांनी ह्या चित्रपटाला संगीत दिलं आहे असं श्रेयनामावलीत नमूद केले आहे. पण पूर्ण चित्रपट पाहूनही मला फक्त 'तेरे संग प्यार मै नही तोडना' हे नाग-नागीण (पुन्हापुन्हा) गात असलेलं एकच गाणं लक्षात राहिलं आहे. हे गाणं एव्हढं अजरामर आहे की कलर्स वाहिनीवर आलेल्या 'नागीन' ह्या इच्छाधारी नागांवरच्या मालिकेच्या तिन्ही मोसमांत हेच गाणं पार्श्वसंगीतात वापरण्यात आलेलं आहे. इच्छाधारी नाग-नागिण असलेच आणि त्यांच्यात लग्नं होत असलीच तर तिथेही वऱ्हाडी मंडळी जंगलात ह्याच गाण्याच्या तालावर 'नागिन डान्स' नाचत असतील ह्याची मला खात्री आहे.

कथानकातल्या त्रुटी आणि अनुत्तरित प्रश्न वगैरे:
/** चित्रपट पाहायचा असल्यास कृपया हे सदर वाचू नये (खरं म्हणजे कशाला पाहता?) */

नाग एका गोळीत स्वर्गवासी होतो. पण नागिणीला एकही गोळी लागत नाही. ती कोणाच्याही शरीरात आपला आत्मा घुसवू शकते. अदृश्य होऊ शकते. निदान नागलोकात तरी स्त्रियांना एव्हढ्या शक्ती आहेत हे पाहून मला भरून आलं. बाकी प्रश्न येणेप्रमाणे:

१. इच्छाधारी नागांचे कपडे शिवून द्यायला जंगलात शिंप्यांची वानवा आहे का? का (माझ्या लाडक्या पु,लं.चे शब्द वापरायचे तर) इच्छाधारी नागिणी नवऱ्याच्या सदरयासाठी आणलेल्या कपड्याच्या गारुड्याच्या पुंगीला खोळी शिवून नवऱ्याला उघडा टाकतात?

२. नागरुपात असताना आंघोळ करता येत नाही म्हणून मानवी रूप धारण केल्यावर इच्छाधारी नाग-नागिणी धबधब्यात डुंबून त्याचा वचपा काढतात का? ते मानवी रुपात असताना काय खातात?

३. राजेश आणि रीटा ज्या नाचाच्या स्पर्धेत भाग घेतात त्यात लोक साप चावल्यासारखे का नाचत असतात?

४. एका अनोळखी तरुणीला गुंडाच्या तावडीतून सोडवल्यावर उदय तिला थेट आपल्या घरी का आणतो? तेही बायको माहेरी गेली असताना? 'बायकोच्या कपाटातली कुठलीही साडी घे' असं तिला सांगितल्यावर ती नेमका 'शादीका जोडा' घालून येते तेव्हा किमान आश्चर्याचे भाव चेहेऱ्यावर दाखवावेत असं कबीर बेदी ह्या अभिनेत्याला का वाटत नाही?

५. एका सुंदर स्त्रीने ‘भय्या' म्हटल्यावर सदगदित झालेल्या सह्रदय माणसाच्या भूमिकेत रणजीत ह्या अभिनेत्याची योजना करावी ही चमकदार कल्पना कोणाच्या डोक्यात आली असावी?

६. साधुबाबाने 'ओम' ची लॉकेटस आधीच का बनवून ठेवलेली असतात? 'ओम' पाहिल्यावर जवळ न यायला नागिण काय भूत-पिशाच्च आहे?

७. ती राजकुमारी आपल्या नियोजित वराला भेटायला येताना ट्रान्झीस्टर का घेऊन येते? त्याला नाचून का दाखवते?

८. इच्छाधारी नागांच्या चित्रपटात नेहमी आधी नागच का शहीद होतो?

९. चित्रपटाच्या शेवटी जोडीतील उरलेला साथीदार मरणाच्या दारात असताना त्याला आपला आधी गेलेला जोडीदार आकाशात का दिसतो? मग ते जोडपं ढगातच गेलेलं का दाखवतात? नेमकं त्या वेळेस लख्खं उन्ह पडलं असेल तर काय?

१०. विजय लिहित असलेलया पुस्तकाचं शेवटी काय होतं?

११. कुंपणावर पडून नागिण शेवटच्या घटका मोजत असताना विजय तिला 'जिंदगी और मौतकी सरहदपर खडी तुम क्या महसूस कर रही हो?’ असला बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचे पत्रकार विचारतात तसा तद्दन फालतू प्रश्न का विचारतो?

१२. १०० वर्षांच्या तपस्येनंतर नागांना इच्छाधारी होता येत असेल तर अश्या नाग आणि नागिणीच्या आईवडिलांना सून आणि जावई शोधायला किती जंगलं पालथी घालायला लागत असतील?

अवांतर:

हा भयावह चित्रपट The Bride Wore Black नावाच्या पुस्तकावर बेतलेल्या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन बनवला आहे आणि त्याच्या तमिळ, तेलुगु आणि कानडी भाषेत आवृत्त्या निघाल्या आहेत म्हणे. केरळात साक्षरता अधिक असल्याने कोणी ह्या फंदात पडले नसावेत.

अंतिम मत:

हा चित्रपट पाहून इच्छाधारी प्राणी ही कल्पना माझ्या डोक्यात एव्हढी पक्की झाली की रात्री स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेल्यावर झुरळ दिसला तरी त्याला मारायची छाती होत नाही. न जाणो तो इच्छाधारी झुरळ निघाला आणि त्याची इच्छाधारी झुरळीण त्याच्या डोळ्यातली माझी तसबीर बघून माझा बदला घ्यायला आली तर? Uhoh तस्मात कोणी हा चित्रपट पाहू नये.

तरी इच्छाधारी नागांवरचा एखादा चित्रपट पाहायचाच असा हट्ट असल्यास 'मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा' हे अजरामर गाणं असलेला 'नगीना' हा चित्रपट (स्वेटर घातलेला ऋषी कपूर सहन करायची मनोमन तयारी करून) पाहावा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol भारी जमलाय. हा नागिन तर नगीना मध्ये कोण होतं? सापांच्या पिक्चरनी ऊत आणला होता खरा पण त्यामुळेच आपल्याला त्यांच्या कौटुंबिक जीवनाची ओळखही झाली. Wink

स्वप्ना, भन्नाट लिहिले आहेस गं

ह्या पिक्चरचे तुफान आकर्षण होते तेव्हा... इच्छाधारी नाग नागीण खरे वाटायचे...

मी कसा कोण जाणे हा पिक्चर लागला असतानच थेट्रात पाहिला आहे. मला नाग साप सोडा कोणतेही क्रीपी क्रॉली आजिबात आवड त नाहीत .भीतीच आहे. पण हा पिक्चर बघितलेला. तेरे संग प्यार में गाणे एकदम भारी वाटले होते.
अजून एक तेरा मेरा मेरा तेरा मेरा तेरा तेरा मेरा मिल गया दिल दिलसे आजकी महफिलसे असे एक गाणे आहे. ह्यात
स्क्रीन वर अर्धे अर्धे दिलाचे स्क्रीन्स येउन मिळतात हा इफेक्ट फार भारी वाटलेला. रीना रॉ यचे फार पिक्चर येत तेव्हा.
जितू प्ण काही ही रोल करत असे. असे सापाचे वगैरे आरामात. कुठे ही तीच संवाद फेक तेच अ‍ॅक्टिंग. रानी और लाल परी सिनेमात एक सिंड्रेला ची कथा आहे त्यात तो प्रिन्स व नीतु सिंग सिंड्रेला आहेत.

छान लेख अजून श्रीदेवीचा नागिन , नगिना व ओरिजिनल नागीन मन डोले मेरा तन डोले बाकी है.

रिना रॉयच्या बोलक्या डोळ्यांवर मी फिदा आहे. त्यामुळे हा सिनेमा किती ही वेळा बघू शकते. ते गाणे माझे आवडते गाणे आहे Happy

मला पण आव्डायची ती. फार स्टारी नखरे नव्हते. सरधोपट रोल्स. गाणी थोडा व्हॅम्पिश पणा. मॉडर्न पण परवीन झिनत इतकी नाही. मेरे सांसो को जो मह का रही है हे गाणे छान आहे रीना रॉय वरचे. बदलते रिश्ते सिनेमा.

मला पण आव्डायची ती. फार स्टारी नखरे नव्हते. सरधोपट रोल्स. गाणी थोडा व्हॅम्पिश पणा. मॉडर्न पण परवीन झिनत इतकी नाही. मेरे सांसो को जो मह का रही है हे गाणे छान आहे रीना रॉय वरचे. बदलते रिश्ते सिनेमा.

{{{ मुमताझच्या नामोल्लेखासोबत श्रेयनामावलीत Her Last Film असे शब्द होते. तिने हा चित्रपट केला नसता तर बरं झालं असतं असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. }}}

या लास्ट फिल्म नंतरही मुमताझ ने आंधिया नावाचा एक अतिभिकार सिनेमा केला होता. त्यात वास्तवात मुख्यमंत्रीपदाची हौस पूर्ण न झालेला शत्रुघ्न सिन्हा मुख्यमंत्री बनला होता. विश्वजीतचा सुपुत्र प्रसन्नजीतने आपल्या उपस्थितीने विश्वजीत हा त्याहून कमालीचा सुसह्य अभिनेता असल्याची जाणीव करुन देऊन पितृॠण फेडले होते.

https://www.youtube.com/watch?v=4nCHClwOZGI

प्रसन्नजीत आणि मुमताझचा वरचा सीन पाहून नागिन हाच मुमताझचा शेवटचा चित्रपट ठरला असता तर किती बरे असे खटणेंना वाटेल.

{{{ घटका मोजत असताना विजय तिला 'जिंदगी और मौतकी सरहदपर खडी तुम क्या महसूस कर रही हो?’ असला बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचे पत्रकार विचारतात तसा तद्दन फालतू प्रश्न का विचारतो? }}}

१९७६ साली असले २४ तास रतीब घालणारे बातम्यांचे चॅनेल्स आणि हा घीसापीटा प्रश्न विचारणारे पत्रकार यांचा उदय झाला नव्हता तेव्हा हा प्रश्न या सिनेमात विचारला जाणे ही ओरिजिनल आयडिआ असावी. या सिनेमातल्या सीनवरुनच आजच्या २४क्ष७ न्यूज चॅनेल्सना ह्या प्रश्नाची कल्पना सुचली असावी अशी शक्यता आहे.

नागिण तर फक्त रीनाच असते मग शेवटी रीनासोबत रेखाही अशीच जमिनीवर लोळत सरपटत मारामारी का करते?

भाहारीही झालंय लेखन.
आवड्लं.
<<<<<एव्हढ्या प्रतीक्षेनंतर ती रात्र आली होती तेव्हा जे काय करायचं ते लगेच करायचं सोडून हा नाचत का बसला होता देव जाणे!>>>> Lol

<<<<<इच्छाधारी नाग-नागिण असलेच आणि त्यांच्यात लग्नं होत असलीच तर तिथेही वऱ्हाडी मंडळी जंगलात ह्याच गाण्याच्या तालावर 'नागिन डान्स' नाचत असतील ह्याची मला खात्री आहे.>>>> हे भारी आहे.
<<<<एका सुंदर स्त्रीने ‘भय्या' म्हटल्यावर सदगदित झालेल्या सह्रदय माणसाच्या भूमिकेत रणजीत ह्या अभिनेत्याची योजना करावी ही चमकदार कल्पना कोणाच्या डोक्यात आली असावी?>>>>> Lol
सगळे प्रश्न भारी.

धम्माल लिहिलंय स्वप्ना। Happy
तू ती मालिका पाहिलीस तर काय म्हणशील, तीच गं, ज्यात नागीण designer साड्या घालून मस्त फिरत असते आणि व्हिलन बाई मोठ्या टिकल्या लावत असते, ज्यात सगळे प्राणी इच्छाधारी असतात, त्या मालिकेचे ३ सीजन्स आलेत, रन्गीबेरन्गी वाहिनीवर आनि वूटवर पाहता येते . अजून बरंच काय काय आहे त्यात, मस्त विनोदी म्हणून पाहिल तर तुफान करमणूक १००% Lol
By the way, ते झुरळाच लिहिलेलं आवडलं Rofl

Lol Lol लॉल.

> मित्रांनी खूप आग्रह केला. माझ्याच्याने मोडवला नाही.> असले मित्र असतील तर शत्रूची गरजच पडणार नाही!

'आणि सुपरस्टार जितेंद्र' का Wink

ते लांब केस, कल्ले, मोठा काळा गॉगल, लेदर जॅकेट, बेलबॉटम वगैरे हिप्पी कल्चरची देन असावी.

बाकी शेपशिफ्टर्स कमी कपडे का घालतात हे जाणून घ्यासाठी ट्वायलाईटमधल्या वेअरवूल्फना बघा.

तू ती मालिका पाहिलीस तर काय म्हणशील, तीच गं, ज्यात नागीण designer साड्या घालून मस्त फिरत असते आणि व्हिलन बाई मोठ्या टिकल्या लावत असते, ज्यात सगळे प्राणी इच्छाधारी असतात, त्या मालिकेचे ३ सीजन्स आलेत,>>>>

पहायला सुरुवात केली होती ही मालिका. नाही पाहवली. बाय द वे, ह्यात नागिणिचा सगळा costume ethnic असतो. पादत्राणे बाकी stilettos.

खास लिहीलयस!!
यावर जुन्या मायबोलीवर कोणीतरी लिहीलय किंवा तुच एखादा नियम वगैरे टॉपिक काढून लिहीलयस.

"तेरे इश्क का मुझपे हुआ ये असर है"
यातली आशा भोसलेची कमाल.
मला माहित नव्हतं हे गाण कुठल्या नटिवर चित्रित झालेलं कुठल्या चित्रपटातल गाण आहे?
ऐकताना फक्त रेखा आणि रीना रॉय आठवल्या.
पाहिल्यावर थक्क झालो या दोघीच गाण्यात आहेत.

या चित्रपटाबद्दल बोलायच तर त्याकाळातली सॉफ्ट पोर्न फिल्म होती. दाखवायचं बरच होत पण हिंमत नव्हती आणि सेन्सॉर ने कात्री चालवली असावी.
हि बदला घ्यायला आलेली नागिण इतकी आसुसलेली का असते. कदाचित तू म्हणतेस तसं करायला हव ते सोडून नाचत बसल्याचा परीणाम.
अनिल धवन कडे येते तेच
प्रेमा नारायण बनून येते तेच..
योगिता बाली बनते परत तेच...
विनोद मेहरा योगिता बालीचा सिन तर चिपनेसचा कळस आहे.
खुप संयमितपणे लिहायचा प्रयत्न केला.

स्वप्ना, भारी लिहिलेस.

बादवे, अरमान कोहलीचा 'जानी दुश्मन' बघितलास का? त्यातला इच्छाधारी नाग 'टेक्नोसॅव्ही, कराटेचे नॉलेज असणारा आहे. Proud

सायो, नगिना मध्ये श्रीदेवी आणि ऋषी कपूर. ह्याच्या दुसर्‍या भागात श्रीदेवी आणि सनी देओल होते. चित्रपटाचं नाव निगाहे.

अमा, बाप रे! ओरिजिनल नागिन मधला पिचपिच्या डोळ्यांचा टॉपलेस प्रदीपकुमार बघायची माझ्यात हिंमत नाही Happy

किल्ली, त्याच 'नागिन' मालिकेचा उल्लेख केलाय मी. सीझन २ मध्ये टिकल्या लावणारी सुधा चंद्रन होती. आताच्या सीझनमध्येही तो इच्छाधारी नाग, म्हणजे जोधा अकबरमधला अकबर, टॉपलेस वावरलाय. तसंच इच्छाधारी गरूड पण आहेत. नशीब ह्या चित्रपटाच्या वेळी तो फंडा नव्हता. नाहीतर त्या मारला गेलेल्या गरुडाची बायको विजयला मारायला निघाली असती. Proud

गुगु, पुरुषांना साधारण तीच भाषा कळते असा विचार ह्यामागे असावा.

सूलू, पाहिलाय. भ या ण!

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

जोधा अकबरमधला अकबर, टॉपलेस वावरलाय>> रजत टोकस त्याचं नाव, त्यची संवाद्फेक करण्याची पद्धत डोक्यात जाते
सीजन १ थोडातरी बरा होता, बाकीच्यंबद्दल न बोललेलच बरं Proud
सीजन २ मध्ये अदा खान आधी काळी नागिण असते, नन्तर ती रन्गीत होते, मग लाल होते , मग तिला पन्ख येतात..
कहर आहे