नव्या घरी नवं राज्य (ग्रीस ८)

Submitted by Arnika on 12 November, 2018 - 07:18

थंडीच्या पहिल्या लाटेबरोबर सिक्याचा हमरस्ता मिटला. गजबजलेलं गाव एका रात्रीत ओसाड झालं किंवा माझी निघायची वेळ जवळ आल्याने मला तसं वाटायला तरी लागलं. भरल्या बॅगेसमोर सिक्याच्या घरचे सगळे घोटाळायला लागले. यासोनासने स्वतः माझ्या बॅगेत बसून बाहेरून चेन लावायचा प्रयत्न करताना हात चेमटून घेतला. तशीही रडारड व्हायचीच होती; यासोनासला एक निमित्त तरी मिळालं.

मी अथीनाला यायला निघाले. हिवाळ्याचा एक महिना इथल्या एका कुटुंबाकडे राहून त्यांना इंग्लिश शिकवण्यासाठी राखून ठेवला होता. अर्निका दोन-तीन तासांवरच असेल अशी समजूत घातल्यावर आरियाद्नी शांत झाली. माझ्या बसचा दरवाजा बंद होईस्तोवर यासोनास “अनीना आग़ो” म्हणजे अथीनाला मला यायचंय असं ओरडत होता. दीमित्रा-कोस्तीसने माझं सामान शिवनेरीत चढवलं आणि आरियाद्नीने ड्रायव्हरला मला चुकीच्या गावाला न्यायला सांगितलं (जो काही शाहरुख़ ख़ान स्टारडम वाटून गेला ना मिनिटभर!).

आता अथीना. उन्हाळ्यातल्या फोटोकाढू पर्यटकांची गर्दी ओसरल्यावरची हिवाळ्यातली अथीना. इथल्या नव्या घरी कामाचे तास कमी पण सांभाळायला माणसं जास्त. मी साउंडप्रूफ सिक्यामधून अशांत अथीनाच्या घरात आल्ये. हे ‘कोक्कीनू’ कुटुंब ग्रीसच्या जुन्या, धार्मिक कुटुंबांपैकी एक आहे. आई-बाबा आणि सात मुलं – चार मुलगे, तीन मुली – अथीनाच्या हिंदू कॉलनीत एका जुन्या घरी राहातात. जेवायला बसण्याआधी देवाचं नाव घेतात. कोणीही घराबाहेर जात असलं की आईसमोर उभे राहिल्याशिवाय जात नाहीत. ती त्यांच्या कपाळासमोर हवेतच ख्रिस्ताचा क्रूस काढते.

मी घरी आलेलीच नको होते या सात मुलांना! आधी एक अमेरिकन मुलगी येऊन गेली तिचा यांना वाईट अनुभव आला म्हणे. ती सतत फोनमध्ये डोकं घालून बसायची आणि घरातल्यांशी घुम्यासारखी वागायची. बाहेरच्यांनी येऊन घरी राहावं आणि पोरांनी त्यांच्यांकडून इंग्लिश शिकावं ही पोरांच्या आईची हौस आहे. त्यांची धुसफुस आधीच सांगितली होती मला त्यांच्या आईने.

यांच्या तिघी मुली माझ्याशी अगदी हसून बोलतात. मुलांपैकी सगळ्यात लहान स्तेल्योस खूप बोलतो. मुलींशी बोलणं अजिबातच कूल नसतं हे अजून त्याला कळलेलं नाहीये. मोठा आंगेलोस वीस वर्षांचा आहे. मुलींशी बोलणं पुन्हा एकदा कूल झालंय त्याच्यासाठी, त्यामुळे तो फार आदबीने वागतो. मधल्या टीनेजर मुलांच्या, म्हणजे कोझ्मास आणि ओरेस्तिसच्या, वाटेला जायचं नाही असं मी ठरवलंय. पण ते माझ्याबरोबर पटापट इंग्लिश शिकतील म्हणून त्यांची आई त्यांना सारखी माझ्याशी बोलायला लावते. भाषेबद्दल वाटणं मी समजू शकते, पण साधा कांदा इकडून तिकडे दिल्यावर त्या मिसरुड फुटलेल्या मुलांना जबरदस्तीने “थेन्किऊ” आणि “ग़ुएलकम” म्हणायला लावण्यासारखा मूर्खपणा नाही! बरं मी सोळा वर्षांची असतानाही सोळा वर्षांच्या मुलांना आवडू शकले नाही तर एकोणतीस वर्षांची असताना काय विचारता...

कोझ्मास आणि ओरेस्तिस खरोखर हुशार आहेत... शाळेच्या अभ्यासात बेसुमार हुशार आहेतच, पण एरवीही तल्लख बुद्धीचे आहेत. अशा मुलांना फक्त इंग्लिश येत नाही म्हणून या वयात जबरदस्तीने आईने कोणाशीतरी बोलायला लावणं कितपत बरोबर आहे मला समजत नाहीये. मी उगाच काहीतरी “काय रे, मग तुला गणित आवडतं का?” वगैरे विचारत बसणार नाही असं त्यांच्या आईला आधीच सांगून टाकलंय. मग आम्ही एकत्र स्वयंपाक करतो. त्यानिमित्ताने इंग्लिशमध्ये बोलणं होतं आणि एकमेकांची तोंडं बघत बडबड ऐकावी लागत नाही. मला कितपत जमलंय, त्यांना कितपत पटलंय, फायदा कितपत होतोय कुणास ठाऊक?

सात-आठ वर्षांपूर्वी ग्रीसची अर्थव्यवस्था कोलमडली त्यावेळी लोकांचे पगार एकेका रात्रीत तीस-चाळीस टक्क्यांनी कमी झाले. एवढी मुलं असलेल्या या कुटुंबाला त्याचा किती चटका बसलाय हे मला दर दिवशी दिसतंय. या आई-बाबांना पहिल्यापासूनच माहीत होतं की आपल्याला अख्खं गोकुळ घरात हवंय. शिवाय लोकांनी टाकलेल्या मांजरी, शहरात हरवलेले कुत्रेही आपल्या आवारात वसवायला त्यांना आवडतं. ज्या मुलांच्या घरची परिस्थिती बरी नाही अशी मुलंही आपापल्या आई-वडिलांचा पुन्हा जम बसेपर्यंत यांच्या घरी वस्तीला असतात. सध्या युगांडाचा एक मुलगा यांच्याबरोबर राहातो. सात खोल्या, तीन गॅलऱ्या, एक बाथरूम, दोन प्राणी आणि अकरा माणसं. या घरातल्या आरडाओरड्याची कल्पना ज्याची त्याने करावी.

कसं वाढवत असतील आई-बाबा या वयाच्या मुलामुलींना? किती शंका, किती दमणूक, किती जबाबदारी... बरं हे सगळं कधी संपणार त्याचाही अंदाज नाही! खिचडीसारखं दमानं घ्यायला लागत असणार हे सांभाळणं-शिकवणं. वेळच्या वेळी योग्य गोष्टींना फोडणी देऊन एकदा झाकण टाकलं की फक्त धीर धरायचा. प्रत्येक शीत कसं शिजतंय बघत ढवळत बसलो तर पिठलंच होईल नाहीतर...

अथीनालगतच्या एका खेड्यात कोक्कीनूंचं मोठं घर आहे. पुढेमागे केवढंतरी शेत आहे. त्यात पूर्वी कोंबड्या, बकऱ्या, ससे, कुत्रे सगळे पाळलेले होते. ते सोडून यांना आठ वर्षांपूर्वी अथीनाच्या जुन्या बंगल्यात यावं लागलं. सहा मुलं होती आणि कोक्कीनू आईला अजून एक बाळ हवं होतं. पंचेचाळिशीत नाहीच होऊ शकलं बाळ तर अनाथालयातून डाउन्स सिंड्रोम असलेलं एक बाळ ती दत्तक घेणार होती, पण तिच्या मनाप्रमाणे तिला सातव्यांदा दिवस राहिले.

बाळाला काहीतरी व्यंग किंवा त्रास असण्याची दाट शक्यता आहे असं बाळ पोटात असल्यापासूनच डॉक्टरांनी आई-वडिलांना सांगितलं होतं. स्कॅन दाखवले होते. पण दोघांनाही गर्भपात मान्य नव्हता आणि ‘शक्यता’ म्हणजे खात्री नव्हे, असं स्वतःला समजावून त्यांनी ख्रीसाला जन्म द्यायचं ठरवलं. सातव्या महिन्यात जन्मलेलं ते बाळ दोन दिवसही जगणार नाहीसं वाटत होतं. एकेक दिवस तग धरत ख्रीसाने दोन आठवडे काढले तेव्हा कुठे डॉक्टरांना वाटलं की ही जगू शकेल. नियतीची गणितं म्हणावी की काय कोण जाणे, ख्रीसाला डाउन्स सिंड्रोम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पन्नाशी जवळ आलेली असताना कशातून गेले असतील ते आई-बाबा... डाउन्सबद्दल ऐकून त्यांनी हातपायच गाळले. तेव्हा चर्चमधले पापूली (प्रीस्ट) धावून आले. म्हणाले, “तुम्ही घेणार होतात ना डाउन्स असलेलं बाळ दत्तक? देवाने हाकेला ओ दिली आहे असं समजून हिला सांभाळा; तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही”.

त्यावर ही आई जे काही म्हणाली ते माझ्यासमोर प्रामाणिकपणे सांगायला किती हिंमत गोळा केली असेल तिने... “दुसऱ्याचं मूल दत्तक घेऊन वाढवण्यात किती मोठेपणा आहे. त्याने समाजात माझ्याबद्दलचा आदर किती वाढला असता हो! स्वतःच्याच बाळाची काळजी घेण्याला कर्तव्य म्हणतात; त्याबद्दल कोण कौतुक करणार आमचं?” एकीकडे आईबाप हतबल झाले होते पण बाकी सहा भावंडांना डाउन्स सिंड्रोमची काहीच पडलेली नव्हती. तीही मुलं लहानच होती, पण ख्रीसाला चाला-बोलायला कोणा शिकवणार, कोण भरवणार, कोण झोपवणार अशा वाटाघाटी आपापसात फायनल करून त्यांनी तिला जीवापाड जपलं.

पहिले दोन महिने आई कायम त्या बाळाला बाबागाडीत झाकून ठेवायची. कोणी भेटायला यायला नको नि काही प्रश्न विचारायला नकोत. तेव्हा अकरा वर्षांच्या असलेल्या ओरेस्तिसने मात्र एकदा उघड्याबंब ख्रीसा बाळाला टोपी घातली, आणि तिला खांद्यावर घेऊन अशा काही ऐटीत तो गावभर फिरला की लोक वळून वळून दोघांकडे कौतुकाने बघायला लागले. “माझ्याइतकी सुंदर बहीण कोणाचीच नाही अशा माजात फिरला तो गावभर. आणि त्याच्याकडे बघून आम्ही आईबाप ढसाढसा रडलो. त्या दिवसापासून पुन्हा कधीच लाज नाही वाटली आम्हाला.” कोक्कीनू आई मला मेणबत्तीच्या उजेडात सांगत होती. वय आणि समजूत आईबाबांना जे शिकवू शकले नाहीत ते ओरेस्तिसला नुसत्या प्रेमाने शिकवलं होतं असं म्हणत होती.

त्या सहा भावंडांना ख्रीसाला सांभाळताना बघून रोज एकदातरी गलबलतं. माझ्या भावंडांसाठीही मी असंच असायला हवं हे रोज शंभरदा मनात येऊन जातं. ख्रीसाच्या शाळेसाठी त्यांना गाव सोडून शहरात यावं लागलंय. इथे मोकळीक नाही, मोठं घर नाही, हौस-मौज नाही, खरेदी नाही, बाहेर खाणं-पिणं नाही आणि हुंदडणं नाही... पैसे पुरावेत म्हणून इंजिनियर वडील दोन नोकऱ्या करतात. दिवसाला पाच तास झोपून मग अकरा जणांचा स्वयंपाक करून पुन्हा कामावर जातात. आई एका शाळेत ग्रीक साहित्य शिकवते आणि मुलांना सांभाळून शिक्षणक्षेत्रात मास्टर्स करत्ये. ख्रीसामुळे किती बदलली या सगळ्यांची आयुष्य! पण ते काय म्हणातात माहित्ये? बरं झालं देवाने ख्रीसाला आमच्याकडे पाठवलं. नाहीतर ही मंदी, कमी पैसे आणि देशाची वाईट अवस्था याचाच बाऊ करत बसलो असतो आम्ही.

कामात न गेलेला आईबाबांचा सगळा वेळ ख्रीसाच्या मागे जातो. बाकी मुलांना आईबाबा फार कमी मिळतात. ख्रीसा स्वावलंबी होईस्तोवर आणि कदाचित त्यानंतरही सगळ्यांच्या जिवाला घोर असणारच आहे. शिवाय ख्रीसाची चिडचिड, तिच्या वाटचं दुखणं आणि त्रास तिलाच सहन करायला लागणार ही वेगळी गोष्ट. मोठा सिगरेट पीत नसेल ना, धाकटा एकटा पडत नसेल ना, मधलीचा अभ्यास झाला असेल ना, छोटीच्या वेण्या सुटल्या नसतील ना… आईची चक्र सतत फिरत असतात. तिला एका क्षणाचाही आराम मिळत नाही. हे सगळं बघून मला सारखं वाटतं की ख्रीसा पोटात असतानाच डाउन्सची कल्पना होती तरीही गर्भपात का केला नसेल? तसं केलं असतं तर आज यांचं जगणं सुकर झालं नसतं का?

गेल्या रविवारी यांचा राष्ट्रीय सण होता म्हणून आमच्या कुटुंबाची गावभर वरात होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी १९४० साली इटलीला ग्रीसच्या काही भागांत सैन्य तैनात करायचं होतं आणि ग्रीसवर कब्जा करायचा होता म्हणे. इटलीच्या मागणीला नाही म्हणालात तर आपलं युद्ध होईल असा खलिता आला आणि पंतप्रधानांनी “हे युद्ध आहे तर!” असं म्हणून मुस्सोलीनीला हकललं. २८ ओक्टोबरचा हा दिवस ग्रीसमध्ये ‘नाही दिवस’ म्हणून साजरा करतात. रस्त्यांवर शोभायात्रा निघतात, जोरदार घोषणाबाजी चालते... कितीही वेगळा देश बघायला जा. कुठे काय ओळखीचं सापडेल सांगता यायचं नाही!

नाही-दिवशी शोभायात्रेच्या आधी आम्ही गावातल्या चर्चमध्ये गेलो. चांगला तासभर आरत्या आणि कीर्तन चालू होतं. वेळ लागेल म्हणून मला बसायला स्टूल आणून देत होतं कोणकोण, पण लहानपणापासूनचं प्रॉग्रॅमिंग ना... मंत्रपुष्पांजली झाल्याशिवाय खाली कसं बसणार! मी ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स नसल्याने मला प्रसादाचा पाव घ्यायची परवानगी नव्हती. धुपाऱ्यातून पापूलींनी जळता ऊद फिरवला तेव्हा गुडघ्यावर बसून कोक्कीनू आईबाबांनी डोकं टेकलं. एरवी किंचाळत फिरणारी सहा पोरं शांतपणे माना खाली घालून उभी राहिली. ख्रीसा आईपाशी येऊन गुडघे टेकून बसली आणि पापूलींनी आणलेल्या धुरावरून हात फिरवून तिने माझ्या कपाळावर क्रूस काढला. पापूलींना म्हणाली अर्निकालाही आशीर्वाद द्या. मग डोळे मिटलेले असताना अचानक माझ्या मांडीवर येऊन बसली आणि मला गालावर पापी दिली. तिच्यावेळी आईने गर्भपात का केला नसेल असा विचार येऊन गेल्याची आठवण मला खायला उठली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्निका ग अर्निका...किती गोड लिहितेस ग...
प्रत्येक लेखाच्या शेवटचं वाक्य वाचुन हमखास डोळ्यात पाणीच...
जीयो !!!

सुरेख! Happy

>>> बरं झालं देवाने ख्रीसाला आमच्याकडे पाठवलं. नाहीतर ही मंदी, कमी पैसे आणि देशाची वाईट अवस्था याचाच बाऊ करत बसलो असतो आम्ही.

यावरून गा़लिबचा शेर आठवला:

ग़म अगर्चे जाँ-गुसिल है, पे कहाँ बचें के दिल है
ग़मे इश्क़ गर न होता, ग़मे रोज़गार होता!

अर्निका...तुम्ही त्यांच्याकडे रहायलाच होत्या का?
की फक्त इंग्लिश शिकवायला?
असं कुणी टीचर ला ठेवून घेतं का?
आणि डाउन्स सिंड्रोम असलेलं मूल दत्तक घेण्याची कल्पना तरी किती भयावह आहे! खरंच असा विचार कुणी करेल का?
आणि जर आधीच कळलं तर (आणि आधीची ५-६ मुलं असतांना!), कुणीही नॉर्मली गर्भपाताचाच निर्णय घेईल...................
अगदी योग्य निर्णय असेल तो...बाळाच्या दृष्टीनेही! जरा ऑड वाटलं.....

@अंकु, फोटोत यासोनास आहे. सिक्यामधल्या दीमित्राचा मुलगा.
@आंबट गोड, इकडे खूप जण शिक्षकांना घरी राहायला बोलावतात, म्हणजे ते धडे आणि स्वाध्याय सोडून संभाषणातून भाषा शिकता येते.
गर्भपात यांच्या धर्माला मान्य नाही म्हणून त्यांनी कधीच तो पर्याय निवडला नसता. आहे हे वेगळंच, पण खरंय आता...

आतापर्यन्तचे सग्गळे भाग वाचले. सगळेच अतिशय आवडले. किती सुंदर, समृद्ध, परिपक्व आयुष्य जगताहात तुम्ही. आणि लेखणीतूनही ताकदीने उतरवताहात . वाचकांनाही समृद्ध करताहात. इतक्या लहान वयात इतकी समज, परिपक्वता आणि आयुष्याकडे हसत खेळत पाहाण्याची वृत्ती कुठून आली तुमच्याकडे?
आमचा दंडवत घ्यावा!

खूपच सुंदर गं ! छान अनुभवसमृद्ध आणि परिपक्व लेखन ! >>>>> +99999

अतिशय सुंदर लेखन अर्निका!
आधीचे भाग प्रवासवर्णन असेल अशा गैरसमजुतीने नव्हते वाचले. पण गेल्या २ दिवसांत हे सर्व भाग सलग वाचून काढले. तुमची लेखनशैली खरंच एखाद्या नावाजलेल्या लेखीकेच्या तोडीस तोड आहे. (हे तुम्ही खरंच प्रसिद्ध लेखीका नाही असे समजून म्हणतोय...तसे नसल्यास क्षमस्व. Happy )
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!