माझी सैन्यगाथा (भाग १६)

Submitted by nimita on 10 November, 2018 - 12:57

आज बऱ्याच दिवसांनंतर, म्हणजे ऑलमोस्ट दीड महिन्यानंतर हा पुढचा भाग लिहायला घेतलाय. सर्वप्रथम या दिरंगाई बद्दल खूप मोठ्ठं 'सॉरी'...पण गेले काही दिवस सणवार आणि बाकी सोशल ऍक्टिव्हिटीज् मधे इतकी व्यग्र होते, त्यामुळे गाथा लांबणीवर पडत गेली.असो.. आता नमनाला घडाभर तेल वाया न घालवता मूळ मुद्द्यावर येते.

बऱ्याच दिवसांपासून माझ्या काही वाचक मित्र मैत्रिणींकडून सातत्यानी एक फर्माईश होते आहे- आणि ती म्हणजे- त्यांना armed forces मधले प्रोटोकॉल्स, एटिकेट्स वगैरे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. तेव्हा आता या आणि पुढच्या काही भागांत त्यांची ही मागणी पूर्ण करायचा प्रयत्न करते.

आमच्या लग्नानंतर नितीन वेळोवेळी मला आर्मी मधल्या प्रोटोकॉल्स आणि एटिकेट्स बद्दल सांगतच होता पण मी सुद्धा माझे डोळे आणि कान कायम उघडे ठेवून माझ्या सभोवतालच्या माणसांचं वागणं बोलणं अगदी लक्ष देऊन बघत होते.त्यामुळे मी लवकरच या लाईफ मधे रुळले.

खरं म्हणजे हे जे लिखित आणि अलिखित नियम आहेत ना ते सगळे अगदी साधे, सोपे आणि लॉजिकल आहेत हो !

म्हणजे बघा ना....जर एखादा कार्यक्रम किंवा एखादी पार्टी अटेंड करायची असेल तर त्यासाठीचा ड्रेस कोड ठरलेला असतो -अगदी कपड्यांपासून ते फुटवेअर पर्यंत! आणि त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेखही केलेला असतो. कार्यक्रमाचं स्वरूप फॉर्मल आहे का सेमी फॉर्मल...का informal, casual....त्या प्रमाणे निमंत्रण पत्रिकेत खाली ड्रेस कोड चा उल्लेख असतो...उदाहरणार्थ ''lounge suit',' 'combination', 'open collar' वगैरे. अर्थात, हे ऑफिसर्स करता लागू असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ladies नी सुद्धा प्रसंगानुरूप कपडे घालणं अपेक्षित असतं.. साधारणपणे कुठल्याही फॉर्मल कार्यक्रम किंवा पार्टी मधे साडी हे सर्वमान्य परिधान आहे. पण असा काही नियम नाही हं! सलवार कमीज किंवा evening gowns वगैरे ही घालतात बऱ्याच जणी.. पण स्त्रियांकरता एक नियम मात्र नक्की आहे....त्यांचे कपडे हे निदान 'neck to knee' असणं आवश्यक आहे.

यात थोडं अजून सविस्तर सांगायचं झालं तर 'mess function' आणि 'पार्टी' यात ही फरक आहे. Mess function हे खूपच फॉर्मल असतं, त्याचं स्वरूप पूर्णपणे ऑफिशियल असतं. आणि यासाठी ऑफिसर्स चे ठरलेले mess dresses असतात..Blue patrol, White patrol, 6B वगैरे.

मुख्यत्वेकरून सगळे नियम हे ऑफिसर्स करता असतात, स्त्रियांच्या बाबतीतले सगळे नियम मात्र अलिखित, अध्याहृत (but mostly in line with the officers).

जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचं किंवा पार्टीचं invitation card घरी येतं ना तेव्हा त्यात स्पष्टपणे लिहिलेलं असतं..Officers to be present at ...

Ladies are cordially invited.

मोस्टली, फॉर्मल कार्यक्रमांमधे किंवा फॉर्मल मेस फंक्शन अथवा पार्टीज् मधे मुलांना यायची परवानगी नसते. अशा वेळी ज्यांची मुलं लहान असतात त्या स्त्रियांनी तो कार्यक्रम अटेंड केला नाही तरी चालतं.

वर उल्लेख केलेल्या ड्रेस कोड मधे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत...

फॉर्मल कार्यक्रमांत लाईट कलरचा शर्ट आणि डार्क कलरची ट्राउजर ही रंगसंगती योग्य मानली जाते. सॉक्स चा रंग हा ट्राउजर च्या रंगाशी मॅचिंग असला पाहिजे.

त्याचप्रमाणे रुमाल हा शक्यतो पांढरा असावा, पण जर रंगीत असेल तर त्याचा रंग टाय शी मिळताजुळता असावा, पण फक्त रंगच हं... रुमालावर टाय सारखं डिझाइन नसावं.

फक्त कपडेच नाही तर फुटवेअर चे पण काही नियम आहेत बरं का! फॉर्मल कार्यक्रम आणि मेस मधे जाताना काळे किंवा ब्राऊन रंगाचे शूज अपेक्षित आहेत आणि तेही with laces. चप्पल, स्लीपर्स, किंवा स्पोर्ट्स शूज यांना सक्त मनाई.

आता काही सोशल एटिकेट्स बद्दल...

जेव्हा दोन व्यक्ती पहिल्यांदाच एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांची ओळख करून देताना पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात..उदाहरणार्थ:

जर एक पुरुष आणि स्त्री पहिल्यांदा भेटत असतील तर नेहेमी पहिल्यांदा पुरुषाची स्त्रीला ओळख करून दिली जाते.

त्याचप्रमाणे भेटणाऱ्या व्यक्तींपैकी जी जास्त वयस्क आहे तिला दुसऱ्या व्यक्तीची प्रथम ओळख करून दिली जाते.

जर दोन ऑफिसर्स भेटत असतील तर नेहेमी आधी ज्युनिअर ऑफिसर ची सीनिअर ऑफिसर ला ओळख करून दिली जाते.

थोडक्यात काय तर ज्या व्यक्तीला जास्त आदर द्यायचा तिला आधी दुसऱ्या व्यक्तीची ओळख करून द्यायची....आहे ना रोचक माहिती!

आणि अजून एक खास बात...armed forces मधे सगळ्याच स्त्रियांना खूप आदर आणि सन्मान दिला जातो..

जर एखादा ऑफिसर युनिफॉर्म मधे असेल आणि अशा वेळी जर तो एखाद्या लेडीला भेटला, तर तो तिला सॅल्यूट करतो... irrespective of his age and his rank.

त्याचप्रमाणे,एखाद्या फॉर्मल किंवा इन्फॉर्मल कार्यक्रमात जेव्हा एखादी स्त्री त्या ठिकाणी येते, तेव्हा सर्व पुरुष उठून उभे राहतात...आणि जोपर्यंत ती उभी असते तोपर्यंत तेही सगळे उभेच राहतात..

पार्टीमधे जेवणाच्या वेळी पण काही प्रोटोकॉल्स पाळतात…. जर त्या पार्टी मधे मुलांना पण बोलावलं असेल तर सगळयात आधी मुलं जेवायला सुरुवात करतात, त्या नंतर ladies आणि सगळ्यात शेवटी ऑफिसर्स. आणि इथेही रँक ची hierarchy पाळली जाते…. सगळ्यात सिनियर ऑफिसर सगळ्यात आधी आणि ज्युनिअर सगळ्यात शेवटी. स्त्रियांकरता असा काही लिखित नियम नाहीये, पण सीनिअर लेडीज ना आदर आणि सन्मान देण्यासाठी म्हणून इतर ज्युनियर लेडीज त्यांच्या नंतर जेवायला सुरुवात करतात.

Armed forces मधे वक्तशीरपणा ला खूप महत्त्व दिलं जातं. प्रत्येक जण दिलेली वेळ पाळतो. कुठल्याही कार्यक्रमात मुख्य अतिथीला जी वेळ दिली असेल त्याच्या थोडी आधीची वेळ इतरांना दिली जाते, जेणेकरुन जेव्हा प्रमुख पाहुणे येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी बाकी सगळे सज्ज असतात.

पण यात ही अजून एक संकल्पना आहे..ती म्हणजे 'service time' ..म्हणजे दिलेल्या वेळेच्याही पाच मिनिटं आधी हजर राहणे....

अश्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या.... पण त्या पुढच्या काही भागांत सांगते. आज इथेच थांबते..

आणि हो.. पुढचा भागही लवकरच येईल !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिपीन, सगळी माणसेच आहेत. सिविलीयन ऑफिसात सुद्धा एमडी किंवा त्या लेव्हलचा माणूस हाताखालच्या लोकांना इतरांसमोर वाईट शिव्या देताना पाहिलेय.

सैनिक, पोलीस इत्यादी खात्यातिल लोकांवर जास्त ताण असतो. तो असह्य झाल्यावर कधी कधी उद्रेक होतो.

{{{ अजूनही बऱ्याच जणांना असं वाटतं की सैन्यदलातल्या अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या बायका या फक्त पार्टीज् अटेंड करतात, त्यांच्या हाताखाली खूप नोकर चाकर असतात .. सैनिक हे देशासाठी आपला जीव पणाला लावतात। पण त्यांची बायका मुलं मात्र सरकारी घरात राहतात आणि देशभर फिरतात.'}}}

पुण्यातल्या कित्येक भागात - विशेषतः कँपात वर बाण करुन नंबर लिहिलेल्या आर्मी रजिस्टर्ड हिरव्या रंगाच्या जिप्सीतून रंगिबेरंगी कपड्यातील बायका मुले हिंडत असतात. हे नक्कीच स्वतः आर्मी एम्प्लॉयी नसतात तर त्यांचे कुटुंबियच असतात. त्यांच्या दिमतीला मिलिटरी गणवेशातला ड्रायव्हर असतो. हे योग्य आहे काय? ऑर्डरली नावाच्या जवानाला अगदी गुलामासारखे वागविणारे आर्मी ऑफिसर्स पाहिले आहेत. घरातल्या मुलांची शी काढण्यापासून बायकांचे कपडे इस्त्री करण्यापर्यंत काहीही कामे करत असतो बिचारा.

याउलट माझा एक ब्रिगेडिअर मित्र आहे जो खासगी कामाकरिता कटाक्षाने स्वतःची प्रायवेट पासिंग कारच वापरतो. जिप्सी फक्त आर्मीच्या कामाकरिताच.

तेव्हा चांगले वाईट सगळ्या प्रकारचे आर्मी ऑफिसर्स असतात. भारतातल्या शासकीय / बिगरशासकीय सर्व खात्यांमध्ये ज्या प्रमाणात प्रामाणिक व भ्रष्ट लोक आहेत त्याच प्रमाणात आर्मीतही इमानदार आणि बेईमान आहेतच. हे एकच अंग अपवाद कसे असेल?

त्यामुळे चांगल्या ऑफिसर्सना नक्कीच सन्मान देऊ पण केवळ आर्मीत आहे म्हणून घाऊकमध्ये सर्वांचा आदर करणे अपेक्षित नसावे.

धागाकर्त्या ताईंचे लेखन अगदी संयत आणि प्रभावी आहे. त्यांच्या लेखनात कुठलाही गर्व इतर छुपा हेतू जाणवत नाही. केवळ प्रामाणिकपणे माहिती देण्याच्या हेतूने केलेले लेखन जाणवते.

सैनिक, पोलीस इत्यादी खात्यातिल लोकांवर जास्त ताण असतो. तो असह्य झाल्यावर कधी कधी उद्रेक होतो.
Submitted by साधना on 14 November, 2018 - 16:20

असा ताण सहन करता येणार्‍या माणसालाच सैन्यात भरती करायला हवे. कारकुनाला राग येणे आणि सैनिकाला राग अनावर होणे यात फरक आहे. एकाच्या हातात लेखणी आहे तर एकाच्या हाती बंदूक. संयम सुटून हातातल्या वस्तुचा दुरुपयोग घडल्याची उदाहरणे अनेक आहेत.

दे शुड बी इव्हन थँकफुल असा मॅडमच्या प्रतिसादात होते. आता तो एडिट केलेला दिसतो. त्यास उद्देशून लिहीले होते.
फोर्सेस बद्दल क्रुतज्ञता व प्रेम मालिका वाचायच्या आधी पासूनच होते व ते कायमच आहे. बेस्ट विशेस.

अमा, होय, मी सोहा च्या कंमेंट वर लिहिलेल्या प्रतिसादात तसं म्हटलं आहे..आणि तुम्ही म्हणताय तसं एडिट नाही केलेलं. माझं ते वाक्य अजूनही आहे. जर मी चुकून एखादं वाक्य लिहिलं तर त्याबद्दल सरळ माफी मागते... ते delete किंवा एडिट नाही करत! Happy
तुम्हांला सैनिकांबद्दल मनापासून आदर आहे जे वाचून खरंच खूप समाधान वाटलं.

बिपीन चंद्र जी,
सर्वप्रथम माझे लेखन तुम्हांला भावलं हे वाचून बरं वाटलं. धन्यवाद!
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्या रँकचा गैरवापर करणारे काही ऑफिसर्स किंवा आपल्या हाताखालच्या जवानांना exploit करणारे काही ऑफिसर्स आणि त्यांच्या फॅमिलीज मी पण पाहिल्या आहेत. पण तुमच्या ब्रिगेडियर मित्रा सारखे तत्वनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ सैनिक आणि त्यांची तितकीच तत्वनिष्ठ बायकामुलंही मी अगदी जवळून बघितली आहेत. माझ्या स्वतःच्या घरी माझ्या नवऱ्याचा batman हा दिवसातून फक्त दोन वेळा येऊन माझ्या नवऱ्याचा युनिफॉर्म तयार ठेवून जायचा.. आम्ही आमच्या मुलींना लहानपणापासून हेच सांगितलं होतं की," ते आपले नोकर नाहीयेत, तेही बाबांसारखेच सैनिक आहेत.'
आमच्यासारखीच अजूनही बरीच कुटुंबं आहेत.
त्यामुळे सगळ्यांना एकाच तराजूत तोलणं कितपत सार्थ आहे.
अजून एक गोष्ट...जर एखादा ऑफिसर किंवा जवान काही गैर काम किंवा दुरव्यवहार करताना पकडले गेले तर त्यांच्या वर योग्य ती कारवाई केली जाते.. आणि तेही अगदी promptly..याचीही बरीच उदाहरणं आहेत.
शेवटी एक मात्र जरूर लिहावंसं वाटतंय....Human rights violation चा मुद्दा मांडणारे लोक तेव्हा कुठे असतात जेव्हा सैनिकांवर दगडफेक होते, त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांच्याबरोबर हातापाई केली जाते.... आणि स्वतःच्या हातात शस्त्र असूनही तो सैनिक काहीही न बोलता, न करता चुपचाप सगळं काही ऐकून घेतो.

आर्म्ड फोर्सेसबद्दल सामान्य मध्यमवर्गीय मनात एक आदरयुक्त, रोमँटीक कुतूहल असते, परत भारतीय समाजातील वैगुण्यांपासून फक्त भारतीय लष्करच अस्पर्ष्य आहे असेही अनेकांना वाटते ज्यामुळे असे लेख कौतुकले जातातच.
लेखातल्या सार्‍या लष्करी प्रोटॉकॉल्समध्ये मला तरी जोरदार कलोनिअल हँगओव्हर दिसतो, पण त्याला इलाज नसावा.
असो, संयत उत्तरांबद्दल धागाकर्तीचे अभिनंदन केलेच पाहिजे असे वाटले, त्याच बरोबर काही इतर प्रतिसाद वाचून मात्र 'चाय से ज्यादा किटली गरम' या उक्तीची आठवण झाली.

{{{ असो, संयत उत्तरांबद्दल धागाकर्तीचे अभिनंदन केलेच पाहिजे असे वाटले}}}

जोरदार अनुमोदन.

कामाच्या गडबडीत इथे काही लिहिता आले नाही. काही प्राथमिक संकल्पनांविषयी लिहितो. लोकांना विचार करायला प्राथमिक माहिती मिळेल या हेतूने काही माहिती देतोय. कमी जास्त असेल तर माझीच चूक असू शकेल.

भारत माझा देश आहे म्हणजे नक्की काय?
१९४७ आधी भारताची मालकी ब्रिटिशांकडे होती. मालकी याचा अर्थ सगळी जमीन आणि त्यावरची सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती हि ब्रिटिश सरकारची होती. हि मालकी ब्रिटिशांनी बंदुकीच्या जोरावर मिळवली होती. देश स्वतंत्र होताना ब्रिटिशांनी व त्यावेळेच्या नेत्यांनी असं ठरवलं कि सत्तेचे हस्तांतर होताना निवडणूक होतील आणि निवडून आलेली लोकं संविधान लिहितील व त्यानुसार काम केले जाईल. तसं संविधान लिहिले गेले आणि त्यात देश किंवा राष्ट्र हि संकल्पना मानली गेली आणि त्याची मालकी एकत्रितरित्या या देशातल्या सगळ्या लोकांना दिली गेली. याला लोकशाही म्हणतात. त्यानुसार देशातल्या प्रत्येक माणसाला काही हक्क दिले. त्याबदल्यात त्यांची काही कर्तव्ये मानली गेली.

आपण कर का भरतो?
देशावर सरकारची पर्यायाने आपलीच मालकी असल्याने देशातील जमीन आणि साधनसंपत्ती चा उपभोग घेण्याच्या बदल्यात प्रत्येक नागरिकाला कर द्यावा लागतो. आणि हा कर किती भरावा लागतो तर साधारणपणे ज्या प्रमाणामध्ये तुम्ही देशाच्या उपभोग घेता त्या प्रमाणात. हे प्रमाण कसा ठरते तर तुमच्या उत्पन्नावरून किंवा तुम्हाला मिळणाऱ्या सोयींच्या प्रमाणात किंवा तुमच्या खरेदी विक्रीच्या प्रमाणात. जो जितका जास्त उपभोग घेईन तो तितका कर भरतो.

आम्ही कर भरतो...
आजकाल कर भरतो हे एक कारण फार ऐकायला मिळतं. यात आपण जो कर भरतो तो सेवा आणि सुविधा बनून आपल्यालाच परत मिळतो. यात रस्ते पाणी वीज संरक्षण शिक्षण असा सगळं येतें. जर बजेट पाहिलं तर असा दिसेल कि उत्पन्नाचा काही भाग देश जनकल्याण योजनांवर खर्च करते. हा खर्च केला जातो कारण आत्ता जे नागरिक कर भरत नाही त्यांना शिक्षण व इतर सुविधा मिळाव्या जेणेकरून त्यांची उत्पन्न क्षमता वाढून ते कर भरतील आणि पर्यायाने भविष्यात सगळ्यांचा फायदा होईल. एक प्रकारचं डिलेड ग्रॅटिफिकेशन आहे हे.

कराच्या बदल्यात तुम्हाला काय मिळते?
कराच्या बदल्यात सरकार तुम्हाला तुमच्या वित्त आणि जीविताची हमी देते. म्हणजे तुम्हाला कोणी मारणार नाही आणि लुटणार नाही याची हमी. कुठे कोणी फसवणूक केली तर सरकार मध्यस्ती करून तुम्हाला न्याय मिळवून देते.

सैन्य कसा काम करते?
तुम्हाला कोणी मारू किंवा लुटू नये म्हणून तुमचा संरक्षण करावा लागते. संरक्षणाचे दोन प्रकार आहेत अंतर्गत आणि बाह्य. यातील बाह्य सरंक्षणाचे काम सैन्य करते. अंतर्गत रक्षणाची जबाबदारी त्या त्या राज्याच्या पोलिसांची असते. भारतीय सैन्य हे लोकनियुक्त सरकारच्या ताब्यात असते. सरकारला संरक्षण मंत्रालय तर्फे सैन्याला आदेश देता येतात.

अफसा म्हणजे काय?
ज्या राज्यामद्धे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था ठेवू शकत नाही तिथे लोकनियुक्त सरकार कायदा करून सैन्याला ती जबाबदारी देते. यात ज्या लोकांवर आपल्याला नियंत्रण ठेवायचे आहे ते लोक आपल्याच देशाचे नागरिक असल्याने त्यांना कारवाई करून मारून टाकता येत नाही. सैन्य असेही दुसऱ्या देशाचे जरी असले तरी नागरिक मारत नाही. यापुढे जाऊन दुसऱ्या देशाच्या सैनिकांना द्यायच्या वागणुकीचे पण आतंरराष्ट्रीय कायदे आणि संकेत आहेत. अफसा किती काळ ठेवायचा हे परिस्थिती नुसार ठरते.

सैन्य कसा ठरवते हल्ला करायचा का नाही ते?
सैन्य सरकार ला वेगवेगळे अहवाल देते आणि त्यावर सल्ला हि देते. उदाहरणार्थ कारगिल मध्ये घुसखोरी झालीये. त्यावरून संरक्षण मंत्रालय आदेश काढते. थोडक्यात भारताची तमाम जनता अप्रत्यक्षरित्या सैन्याला आदेश देते कि शत्रूला मारा.

कारवाई कशी केली जाते?
सैन्याचे स्वतःचे कायदे आणि तत्व आहेत त्यानुसार ठरते कारवाई कशी करायची. हे सगळे कायदे आणि तत्व हजारो वर्षांच्या लढायांच्या अनुभवातून आणि संशोधनातून बनलेली आहेत.

शिस्त आणि शिष्टाचार का महत्वाचे?
निमिताजींनी याचं एका प्रतिसादात उत्तर दिलाय त्यावर मी तरी काही अजून सांगू शकत नाही.

सैन्याला मान का?
निमिताजी यांनी लिहिलेले बाकी लेख वाचले तर तुमच्या लक्षात येईन कि सामान्य नागरिक आणि एक सैनिक यांच्या आयुष्यात फार फरक आहे. आपल्याला वाटते लढाई चालू नाही म्हणजे सैन्य निवांत बसले आहे. एका सैनिकाच्या आयुष्यात असलेले ताण तणाव हे बाकी नागरिकांच्या आयुष्यातल्या ताणतणावांचा प्रमाणात फार मोठे आहेत. त्याबरोबर त्याचा कुटुंबही ह्या सगळ्यातून जात असतं. अशा प्रकारचा आयुष्य निवडण्यासाठी वेगळेच धाडस लागते आणि अश्या सैनिकांची पती म्हणून निवड करण्यासाठी देखील. निमिताजींची कहाणी वाचली कि हा संघर्ष किती खडतर आहे हेच दिसतं. आपण सहवेदना ठेवली तर कळू शकते कि हे किती अवघड आहे.

सैन्याविषयीच्या आदराचे संस्कार का करायचे?
आपल्या देशात हि अशी खडतर नोकरी करणे अनिवार्य नसताना नाही सैनिक हे काम स्वेच्छेने करतात. आपल्या देशात सैन्यात सेवा अनिवार्य केली पाहिजे म्हणजे प्रत्येकाला याची जाणीव राहील. तुमच्या सैन्याचे मनोबल वाढवणे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

सैन्य प्रश्नातीत आहे का?
नाही पण काळानुसार त्यात बदल केले गेलेत आणि केले जातात. तुम्ही व्यवस्थित माहिती घेतली तर त्यात बदल केले जाऊ शकतात. पूर्ण माहिती किंवा अभ्केयासाशिवाय आपण प्रश्न केले तरी त्यातून निष्पन्न काह ी होत नाही.

हे सगळं पुस्तकी आहे आणि जग असा चालत नाही. या सगळ्याची माहिती करून काय फायदा? आपण यात काय करू शकतो?
प्रत्यक्षात या सगळ्या संस्था आणि व्यवस्था आणि त्यातली लोकं कोणाचा लक्ष नाही हे पाहून प्रोसिजर हळू हळू पाळायचा कमी करतात. आपण सगळी लोकं या देशाचे मालक असल्याने यावर लक्ष ठेवणे हे आपले काम आहे. आणि हे लक्ष ठेवण्यासाठी हा सगळा कारभार कसा चालतो हे माहिती व्हावी म्हणून हा सगळा खटाटोप.

आम्ही निवडून दिलेले सरकार काय करताय हे आम्हाला कसा कळणार?
सरकार https://data.gov.in/ आणि इतर बऱ्याच प्रकारे वेगवेगळी माहिती जाहीर करते. माहितीचा अधिकार ह्या कायद्याचा पण उपयोग करू शकता. हि माहिती देणारी एक दोन विश्वसनीय वृत्तपत्र किंवा इतर माध्यमामध्ये हि माहिती मिळू शकते.

आम्ही यात बदल कसा करू ?
मतदान करताना विचार करून.

हे सगळं का करायचा?
हे सगळं करायचा कारण तुमच्या आयुष्याची उरलेली वर्षे सुखात जावी म्हणून. यात ज्येष्ठ नागरिकांना माफी आहे. त्यांनी नाही केले तरी चालू शकते. ज्यांना मुलं आहेत त्यांनी तुम्हाला जसा या जगाचा आनंद घेता आला तसा तुमच्या मुलांनाही घेता यावा म्हणून करा. या पलीकडे जाऊन आपल्याला हा देश जसा मिळालाय त्यापेक्षा चांगला किंवा आहे तसा तरी पुढच्या पिढीकडे द्यावा म्हणून हे सगळं करायचा.

हे सगळे बदल फार हळू हळू होतात...
सध्याच्या व्हाट्सअँप आणि इन्स्टाग्राम च्या काळात लोकांना सगळे लगेच पाहिजे असते. पण हे सगळे बदल हळू हळूच होतात. यात एक दोन माणसांमध्ये बदल करायचा नसून १३० कोटींच्या देशात ज्यामध्ये इतकी विविधता आहे तिथे करायचा आहे. त्याला वेळ हा लागतोच. पण हळू हळू कासव चालीने बदल होतो हे नक्की. नागरिक सजग असतील तर थोडा वेग नक्की वाढू शकतो.

तर हे दोन शब्द.

बाकी निमिताजी आपल्याच शेतात उड्या मारणाऱ्या आपल्याच मोकाट गाढवाला काठीने न हाकलता कान पकडून बाहेर काढायचा तुमचा संयम सैन्याच्या शिष्ठाचार आणि शिस्तीची जाणीव करून देतो. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि इतर जगातही आपला सैन्य काम करू शकतेय याचा रहस्य हेच असावा.

<<< एखादं काम जर systematically, as per procedure केलं तर ते यशस्वीरीत्या आणि खात्रीशीर पूर्ण होतं... जे तर जगजाहीर आहे.. आपल्या दैनंदिन व्यवहारात पण आपल्याला याचा पदोपदी प्रत्यय येतो..
हेच social आणि professional पातळीवरही लागू पडतं.. मग त्याला तुम्ही ब्युरोक्रसी म्हणा, प्रोटोकॉल म्हणा किंवा अजून काही....The fact remains the same.. >>>

तुमचा सर्वांचा प्रोटोकॉल आणि चेकलिस्ट बद्दल गोंधळ होतोय, असे दिसतेय. तुम्ही वर जे म्हणताय, व्यवस्थित काम करण्याबद्दल ते पायलट पण करतात चेकलिस्टप्रमाणे आणि सेफ्टी ऑफिसर पण करतात. पण प्रोटोकॉल म्हणजे the official procedure or system of rules governing affairs of state or diplomatic occasions. थोडक्यात ठरवून दिलेली पद्धत प्रश्न न विचारता करा. उदा. हे बघा. Don't clap, you are in uniform: Army chief to officers याला काही कारण असेल किंवा नसेल, पण हे असे चालत आले आहे, त्याचे पालन करा प्रश्न न विचारता. याला म्हणतात बाबूगिरी किंवा ब्यूरोक्रसी आणि मला या अशा प्रोटोकॉलबद्दल सुचवायचे होते.

<<< Armed forces मधे ऑफिसर ची रँक(स्टार्स) बघून त्याची पत ठरत नाही....याउलट त्याची पत बघून, परखून मग त्याला त्याची रँक दिली जाते. >>> हे मान्यच आहे. पण त्याच्यावरून ठरवायचे की कुणी कधी जेवायचे, हे जरा अति आहे. तुमच्या मते ते कदचित योग्य असेल, पण कॉर्पोरेट जगात सी.ई.ओ. ने रांगेत सर्वांबरोबर उभे राहून जेवण करताना किंवा स्वतःची कॉफी स्वतः बनवून घेताना बघितले आहे. असो.

तुमच्या संयमित स्वभावाबद्दल आदर आहे. धन्यवाद.

<<< लेखातल्या सार्‍या लष्करी प्रोटॉकॉल्समध्ये मला तरी जोरदार कलोनिअल हँगओव्हर दिसतो, पण त्याला इलाज नसावा. >>> आगाऊ यांच्या या मताशी सहमत. मला पण हेच म्हणायचे होते.

@रश्मी
वैयक्तिक शेरेबाजी करण्याअगोदर सॅम माणेकशॉ यांच्याबद्दल थोडा अभ्यास करा अशी नम्र विनंती. आंतर जालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे.
ता.क. माझा सख्खा मामा सैन्यात होता आणि भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष लढला होता (आता तो हयात नाही).

माझ्या मते सैन्यात जे प्रोटोकॉल पाळले जातात त्याचा उगम ब्रिटिश सैन्यातून आला आहे.
भारतीय सैन्य किंवा भारतीय लोक पहिल्या महायुद्धाच्या आधीपासून ब्रिटीश ऑफीसर च्या खताखाली काम करत आले आहेत आणि तीच कमांड आणि प्रोटोकॉल बरेच अंशी अद्यापही पाळले जातात.
आणि शिष्टाचार हा तर ब्रिटिश लोकांची खासियत आहेच

जाता जाता आपल्या देशांमधले ९०% कायदे ब्रिटिशांनी बनवलेले जसेच्या तसे स्वीकारलेले आहेत. उरलेले १०% हे ब्रिटिशांनी घालून दिलेल्या नियमानुसारच बनवले आहेत . १९४७ साली शून्यापासून सुरुवात करायला वेळ, लोकं आणि पैसे दोन्ही नव्हते. देश जसा जसा पुढे जातोय आणि गरज पडेल तसे ते कायदे बदलले जातात.

प्रोटोकॉल (शिष्टाचार) म्हणा,कल्चर म्हणा किंवा रिच्युअल म्हणा कुठल्याही फ्रॅटर्निटीला तिचे एकसंध अतित्व टिकवून ठेवण्यासाठी ते पाळणे अति आवश्यक आहेत. त्याने दोन ऊद्देश साध्य होतात
१. शिस्तपालन २. एकध्येयवाद

सैन्यातील लिखित/अलिखित चालीरीती आणि कॉर्पोरेट जगतात तुलना होऊ शकत नाही. कॉर्पोरेट विश्वात जीवनमरणाचे प्रसंग निभवायचे नसतात आणि निर्णय घ्यायला / पारखायला तुलनेत बराच जास्त वेळ हाताशी असतो.
आपल्याच नाही तर आपल्या देशबांधवांच्याही जीविताचं उत्तरदायित्त्व, तेही अटीतटीच्या प्रसंगी उत्तमरीत्त्या निभावायचं असेल तर सैन्य हे एखाद्या वेल-ऑइल्ड मशीनप्रमाणे - ज्या मशीनचा प्रत्येक भाग, नटबोल्टसुद्धा आपल्या जागी नेमकं काम करेल अशा पद्धतीने- चालायला हवं. त्यासाठी शिस्त आणि आज्ञापालन याला पर्याय राहात नसावा. आणि ती शिस्त अंगी बाणण्यासाठी अशी अगदी जेवणाखाण्याच्या प्रसंगीसुद्धा अधिकारांची उतरंड (हायरार्की) पाळणं आवश्यक ठरत असावं असं माझ्या जुजबी वाचनावरून मला वाटतं.

सैन्य, तिथलं खडतर आयुष्य आणि तिथली शिस्त या संदर्भात दीनानाथ मनोहर यांची रोबो कादंबरी अस्वस्थ करते.
ही कादंबरी इ साहित्य वेब साईट वर विनामूल्य उपलब्ध आहे.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/robo.pdf

<<< कॉर्पोरेट विश्वात जीवनमरणाचे प्रसंग निभवायचे नसतात >>>
ऑ? एखाद्या हॉस्पिटल मधील सर्जन माहीत आहे का जो लायनीत उभा राहातो? माहीत नसेल तर डॉ. हेनरी मार्श यांचे "Do No Harm" पुस्तक वाचा एकदा.

हायझेनबर्ग आणि स्वाती_आंबोळे या दोघांना +१. हा योग एकाच धाग्यात/विषयात सहसा येत नाहि... Proud

माझ्या मते सैनिकी खाक्या कलोनियल हँगओवर असेल तर रेल्वेज प्रमाणे या बाबतीतहि ब्रिटीशांचे आभार मानायला हवेत. हा हँगओवर इथे तर वारंवार दिसतो; अगदि एखाद्या फ्लाइटमध्ये युनिफॉर्म्ड पोरगेलेसा तरुण जेंव्हा चढतो तेंव्हा पायलटचं भाष्य आणि सहप्रवाश्यांचं डिमिनर खुप काहि सांगुन जातं...

"भारतीय नागरिकांचा, घास रोज अडतो ओठी.." हि भावना केवळ युद्धकाळातच बाळगली जाउ नये, हे सांगण्याची वेळ यावी हे क्लेषकारक आहे...

राज Lol
आय नीड टु रीथिंक माय पोझिशन नाऊ! Proud

जोक्स अपार्ट, उपाशी बोका यांनी दिलेल्या हॉस्पिटलच्या उदाहरणावर खरंच विचार करते आहे. Happy

>>उपाशी बोका यांनी दिलेल्या हॉस्पिटलच्या उदाहरणावर खरंच विचार करते आहे<<

चूकिचं उदाहरण आहे ते, या कांटेक्स्ट मध्ये. हे म्हणजे क्रिकेट आणि गॉल्फमध्ये समानता शोधण्यासारखं आहे - दोन्हित बॉल आणि बॅट (क्लब) चा वापर केला जातो म्हणुन...

जीवनमरणाचा प्रश्न असणे हे तर पोलिसांबद्दलही खरे आहे. एखाद्या हिंसक मोर्चाला नियंत्रित करायला गोळीबाराचा आदेश द्यावा तर मोर्चातील काही लोकांचे प्राण जाणार. गोळीबार न करावा तर मोर्चातील काही लोकांकडून इतरांचे प्राण जाणार. अशावेळी तो निर्णय अतिशय कमी वेळेत घ्यायचे प्रेशर पोलिस अधिकार्‍यांवरही असते.

प्रोटोकॉल चा एका मर्यादे बाहेर उदो उदो झाला तर मूळ उद्दिष्टापेक्षा प्रोटोकॉल जास्त महत्वाचा होउन जातो. आर्मी मधे असलेले बॅट्मॅन वा सेवादार हे असलेच एक उदाहरण. मुळात ब्रिटिशांकडून आपण घेतलेली ही पद्धत आज ब्रिटन मध्येही नाही. आपल्याही नेव्ही वा एअर फोर्स मधेही नाही. पण आर्मी मध्ये अजूनही टिकून आहे. संसदीय समिती कडून वारंवार विचारणा होउनही केवळ अधिकार्‍यांच्या प्रतिष्टेसाठी ही पद्धत अजूनही आहे. सैनिक पदाचे पूर्ण प्रशिक्षण घेतलेले व सैनिकाइतकाच पगार घेणारे लोक घरची कामे करणे, मुलांना शाळेत सोडणे अशी कामे करतात तो अपव्ययच नाही का ? अर्थात अशा लोकांना नीट वागवणारे चांगले अधिकारेही असतीलच पण मुळात हे पद्धतच कालबाह्य म्हणून बंद का करू नय ?

संयत प्रतिसादाबद्दल लेखिकेचे पुन्हा आभार.

राज Lol
माझ्या प्रतिसादावर लगेच प्रतिसाद येणार ही अपेक्षा ह्यावेळीही फोल ठरली नाहीच.. मी आपला दिलगिरी वगैरे शब्द दिसतो का ते भिंग घेऊन शोधत होतो. Proud

पण हे प्रोटोकॉल लष्कर स्पेसिफिकच आहेत असे मला वाटत नाही, त्यांचे कॉज नोबल असल्याने त्यांच्या प्रोटोकॉलबद्दल आपल्याला अप्रूप वाटते ईतकेच. कुठल्याही संगंठित प्रयत्नाला धेय गाठण्यासाठी ते अस्तित्वात असणे अत्यावश्यक असतेच. मग लष्कर असो , कॉर्पोरेट असो, कॉलेज फ्रॅटर्निटी, सीक्रेट सोसायटी, की ऑर्गनाईझ्ड क्राईम (ह्या धाग्यावर ऊल्लेखाबद्दल.. सॉरी फक्त ऊदाहरण म्हणून बघा तुलना म्हणून नाही).
नियम म्हणजे नियम.. शिस्त म्हणजे शिस्त... ऑर्डर म्हणजे ऑर्डर... हो त्यांची तीव्रता आणि चालढकल वगैरे क्षेत्रानुसार बदलेल.

कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला फ्रॉम जापान वाया अमेरिका वाया यूरप टू भारत असे गेलात तरी तीव्र ते सौम्य होत जाणारे प्रोटोकॉल दिसतील.

हे असे का ते तसे का, समजून घ्या वगैरे डिलेमे आपल्यासारख्या रमतगमत जगणार्‍या लोकांसाठी.. बाकींच्यासाठी प्रेटी मच.. 'वॉक द लाईन'.
एकध्येयवादाने बाकी ईंटरफिअरिंग फॅक्टर्स आपोआप निकालात काढले जातात त्यामुळे रँडम वागणे/जगणे टाळता येते... आपण ते टाळू शकत नाही.

अहो उपाशी बोका, मी, वै. शेरेबाजी का केली हे तुम्हीच नीट वाचा. लेखिकेने वरील लेखात कुठेही गर्विष्ठ सूर लावलेला नाही, तरी त्याला ब्युरोक्रसी म्हणून संबोधल. तुमचा मामा जसा सैन्यात होता तसे माझे नात्यतले दोघेही भाऊ आर्मीतच होते. त्यांच्याकडुनही बरेच काही ऐकले आहे. त्यातल्या एकाला तर राष्ट्रपती पदक पण मिळाले आहे उत्तम सेवेसाठी.

तुम्ही दुखावला असाल तर सॉरी, पण तुमचे लिखाण पण मला नाही आवडले. ते पूर्ण सैन्याला हिणवण्यासारखे वाटले. आजकाल सैन्याचे नाव काढले की लोकांना फार राग येतो. पण एकदा सियाचीन सारख्या ठिकाणी राहुन बघावे, नुसते ट्रेकिंग साठी नाही. लोक आजकाल दुसर्‍याच्या फंदात पडत नाहीत, पण हे जवान मनाचा दगड करुन अतीरेक्यांशी मुकाबला करतात.

बाहेर दंगल चालू झाली तर सुरक्षीत ठिकाणी पळण्याची तयारी आपली असते, पण त्याच दंगलीशी/ दंगलखोरांशी यांना मुकाबला करवा लागतो. जमेल हे आपल्याला? अहो साधा अ‍ॅक्सिडेंट झाला तरी लोक तिथुन पळ काढतात, मग मुकाबला फार लांबची गोष्ट. फार विचीत्र वाटते लोकांची सैन्याप्रती भावना बघुन.

उपाशी बोका जी,
माझ्या मते कॉर्पोरेट जगातले ceo आणि सैन्या मधले सिनियर ऑफिसर्स....यांच्या कामाचं स्वरूप वेगवेगळे आहे. एका CEO चं त्याच्या subordinates बरोबरचं नातं हे फक्त ऑफिस hours पर्यंत मर्यादित असतं. पण सैन्यातले अधिकारी आणि जवान हे 24×7 एकत्र असतात . मी आधी म्हटल्याप्रमाणे Armed forces is one big family. It's home away from home for the soldiers. आणि म्हणूनच त्यांच्यातलं समीकरण आणि कॉर्पोरेट जगातलं समीकरण यांची तुलना करणं फारसं योग्य नाही.
एक CEO त्याच्या हाताखालच्या लोकांकडून efficiently काम करवून घेतो.. त्यासाठी त्यांना motivate करतो.
तसं पाहिलं तर एक सैन्याधिकारी पण हेच करतो...त्याच्या juniors ना त्यांचं काम करायला motivate करतो.
पण यात दोन्ही मध्ये एक मोठ्ठा फरक लक्षात घेण्यासारखा आहे, आणि तो म्हणजे....सैनिकांना त्यांचे प्राण पणाला लावण्यासाठी motivated ठेवावं लागतं.
अजून एक गोष्ट...आपल्या employees बरोबर रांगेत उभं राहून जेवण घेणं किंवा कॉफी पिणं ही गोष्ट कौतुकास्पद आहे यात शंका नाही. यावरून त्यांच्या नात्यातली जवळीक दिसून येते.. पण म्हणून ज्युनिअर ऑफिसर्स च्या आधी प्लेट उचलणारा सिनियर ऑफिसर आपल्या रँक चा गैरफायदा घेतोय, किंवा त्याला त्याच्या जुनीअर्स ची काळजी नाही असा अजिबात होत नाही.
युद्धात किंवा तत्सम आणीबाणीच्या प्रसंगात जेव्हा जीवनमरणाचा प्रश्न असतो, तेव्हा सगळ्यात पुढे उभा राहून, बाकी जुनीअर्स ना प्रोटेक्ट करत स्वतःच्या छातीवर हसत हसत गोळ्या झेलणारा हा च सिनियर ऑफिसर असतो. अंतर जालावर अशी उदाहरणं पण बरीच सापडतील.
मी सुरुवातीच्या एका भागात लिहिल्याप्रमाणे सिनिअर्स नी जेवणासाठी प्रथम प्लेट उचलणं ही त्यांच्या बद्दलचा आदर व्यक्त करण्याची एक पद्धत आहे..
आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या परिवारात आपण ही आपल्या वडील माणसांचा आदर करताना अशा बऱ्याच कृती करत असतो.

निमिता जी, तुम्ही ज्या शांतपणे प्रत्येक कमेंट ला उत्तर देता त्याबद्दल तुम्हाला हॅट्स ऑफ...
लेख आवडला...पुढचा भाग कधी ?

धन्यवाद स्मिता , मला वाटतं की प्रत्येकाला आपलं म्हणणं , मत सांगायचा हक्क आहे...'आपल्याला पटत नाही म्हणून एखादी गोष्ट किंवा एखाद्याचे विचार हे चूक आहेत ' ही धारणा ठेवणं हीच सगळ्यात मोठी चूक नाही का ?
पुढचा भाग लवकरच Happy

माझ्या मते सैन्यात जे प्रोटोकॉल पाळले जातात त्याचा उगम ब्रिटिश सैन्यातून आला आहे. >> +१
सैनिक पदाचे पूर्ण प्रशिक्षण घेतलेले व सैनिकाइतकाच पगार घेणारे लोक घरची कामे करणे, मुलांना शाळेत सोडणे अशी कामे करतात तो अपव्ययच नाही का ? अर्थात अशा लोकांना नीट वागवणारे चांगले अधिकारेही असतीलच पण मुळात हे पद्धतच कालबाह्य म्हणून बंद का करू नय ? >> +१
जीवनमरणाचा प्रश्न असणे हे तर पोलिसांबद्दलही खरे आहे. एखाद्या हिंसक मोर्चाला नियंत्रित करायला गोळीबाराचा आदेश द्यावा तर मोर्चातील काही लोकांचे प्राण जाणार. गोळीबार न करावा तर मोर्चातील काही लोकांकडून इतरांचे प्राण जाणार. अशावेळी तो निर्णय अतिशय कमी वेळेत घ्यायचे प्रेशर पोलिस अधिकार्‍यांवरही असते.>> +१.
संयत प्रतिसादाबद्दल निमिता यांचे मनापासून अभिनंदन. त्यांचा हा लेख सोडल्यास बाकी सर्व लेखन मला आवडलेले आहे.
पण तरीही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. भविष्यकाळात एखाद्या राष्ट्राचं बळ हे केवळ त्याच्या सैनिकी सामर्थ्यावर ठरणार नसून, जागतिक अर्थकारणातले त्या राष्ट्राचे योगदान ही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आत्ताही थोडीफार तशीच परिस्तिथी आहे. असे असताना देशातले नागरिक सैनिकांचा सतत उदोउदो करतील अशी अपेक्षा बाळगण चुक नाही का?

Pages