काय दडलंय यावर्षीच्या दिवाळी अंकांत ( २०१८ )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 3 November, 2018 - 03:41

हा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.

आपण कुठले दिवाळी अंक वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.
दिवाळी अंकांविषयीचा कुठलाच मुद्दा इथे वर्ज्य नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मौजेमधिल अश्विन पुंडलिक यांचा 'मुंबै गं नगरी बडी बाका', मिलिंद बोकिलांचा 'माणसांनी हरवलेली माया' हा माया संस्कृतीवरचा लेख उत्तम. व्यक्तिचित्रांपैकी नरेन्द्र चपळगावकरांनी रेखाटलेले संसदीय बंडखोर हे समाजवादी नेते मधू लिमये यांचे व्यक्तिचित्र व आण्णा आणि मी हे श्री. वि. कुलकर्णी यांचे आलोक कुलकर्णींनी रेखाटलेले व्यक्तिचित्र फार आवडले. अंक सॉलिडच आहे. कथा मात्र सो सो वाटल्या. कविता मौजेला साजेश्या.
परिसंवाद सवडीने वाचेन.

काय दडलंय यावर्षीच्या दिवाळी अंकांत ( २०१८ )>>>कॉफी दडलिये सांडलिये प्रत्येक पानावर
तिन वाचले, वात आणलाय कॉफीने..
प्रत्येक कथेत वाफाळलेली कॉफी, गरमा गरम कॉफीचे घुटके... वैताग वैताग झालाय..
चहाचं वावडं आहे का..की चहा कोणी घेतच नाही हल्ली.. मग चहावला लाखो कसे काय कमवतो (तो न्युज मध्ये होता काही दिवसांपुर्वी)
आणि कथा तर इतक्या सेम सेम होताहेत की शेवटचा आणि लास्ट पॅरा वाचला तरी चालेल.
I wonder if there is AI code for the short stories in marathi, or all the authors are from same mold Happy

कुठले तीन वाचलेत अग्निपंख?>>जत्रा, मेनका, नवल.
धनंजय घ्यायचा होता पण मी गेलो तेंव्हा अक्षरधाराचा स्टॉक संपला होता. (आणि इतर बरेचसे चांगले अंकही संपले होते.)

अक्षरगंध वाचला. या अंकात दिवाळी अंकासाठी लिहून घेतलेलं साहित्य कमीच असतं. पूर्वप्रकाशित साहित्य पुन्हा छापतात किंवा आत्मचरित्र, चरित्र इ.चा आधार घेऊन काही लिहिलेलं असतं.
शकुंतला परांजपे, ज्योत्स्ना भोळे, प्रभा अत्रे आणि सुधा जोशी (गोवा नुक्ति संग्रामातल्या सत्याग्रही) यांच्याबद्दल लेख आहेत. ज्योत्स्ना भोळेंवरचा लेख त्यांच्या कन्येने लिहिला आहे. त्यातून नवं काही कळलं. सुधा जोशींबद्दल आधी वाचलं नव्हतं. प्रभा अत्रेंवरचे लेख वाचता आले नाहीत.
पुल, सुधीर फडके, गदिम या तिघांच्य जन्मशताब्धी वर्षानिमित्त त्यांच्याबद्दलचे लेख पुन्हा छापलेत.
विश्राम बेडेकरांबद्दलचे लेख जास्त भारावून गेलो टाइप असल्याने त्यातून काही मिळालं नाही. टिळक-आगरकरांबरचा त्यांचा लेख इंटरेस्टिंग आहे.

मराठी पुस्तकजगताबद्दलचा एक परिसंवाद की लेखमाला वेळेअभावी वाचता आले नाही.

हंस वाचतेय.धागाकर्त्याची गोष्ट सुरेख आहे.अनिल पाटील यांचा 'आत्मयज्ञाच्या अग्नीशिखा'हा लेख वाचनीय आहे.बाकी कथा ठीक वाटल्यात.

महा अनुभव वाचायला घेतलाय.मायबोलीकर प्रीति छत्रे उपसंपादिका आहेत.
रत्नाकर मतकरींची कथा आवडली. विवियन मेयर आणि तिच्या (तिला) शोधाबद्दलचा नितिन दादरावालांचा लेख चांगला आहे, पण शैली इंग्रजी वाक्य समोर ठेवून अनुवाद केल्यासारखी आहे. एके ठिकाणी संयुक्तिक म्हटलंय (सयुक्तिक हवं) .
अनिल अवचटांचा लेख नजरेखालून घातला. त्याला पास.

महाअनुभवमधला कोलकात्याच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेवरचा लेखही सुरस आहे. विवियन मेयरवरचाही छानच आहे.

मौज दिवाळी अंक वाचतोय. आवडला.
आख्यान हातगाडीचं हा वृषाली मगदूम यांचा लेख त्रासदायक आहे.
लुआंग प्रबांग - मनिषा टिकेकर . सुरुवातीच्या जरा जास्तच सविस्तर वर्णनाला कंटाळून पुढचा भाग नजरेखालून घातला. ही आणि ही माहिती मिळाली.
मधू लिमयेंवरचा लेख वाचला.
वाजपेयींवरच्या लेखाच्या शेवटी "एकाही दिवसाची सुटी न घेता...." असं स्तवन आहे.
करीसा ना कित्साव हा शेफ श्रीरंग भागवत यांचा लेख वाचताना मायबोलीवरच्या एका लेखाची की कथेची आठवण झाली. (गेल्या वर्षी सद्दामच्या इराकमधले अनुभव यांनीच लिहिले होते का?)
मी वैज्ञानिक का व कसा झालो? हा परिसंवाद वाचायचा आहे. तीन कथा आणि एक दीर्घकथाही इंटरेस्टिंग असतील असं संपादकीयातल्या ओळखीवरून वाटतंय
एकंदर अंक पूर्ण वाचण्यासारखा वाटला.

भरत, कथा, कविता भागदेखिल उत्तम आहे. हृषीकेश गुप्ते, सानीया यांच्या कथा चांगल्या आहेत.
मला मुंबई नगरी गं बडी बाका आणि आलोक कुलकर्णींचा श्री. वि. कुलकर्णींबद्दलचा लेख हेदेखिल आवडले.

पुंबा + १
आम्हाला अकरावीत मराठीला श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या डोह पुस्तकातला ' मनातल्या उन्हात' नावाचा धडा होता. ती विलक्षण शैली प्रेमातच पाडणारी होती. ते पुस्तक मला कुठे मिळालं नाही वाचायला. त्यांच्या मुलाचा हा लेख वाचून जाणवलं की ती व्यक्तीच विलक्षण होती.
हृषीकेश गुप्तेची कथाही मस्तच! त्याची ' दीपावली' मधली कथा मात्र नाही आवडली!

डोह आहे माझ्याकडे. मला अभ्यासाला त्यातले काही लेख होते. अभ्यासायचं असूनही प्रचंड आवडलं.

डोह मिळेल का दुकानात?>>>बुकगंगावर आहे>> +१ डोहबरोबर सोन्याचा पिंपळ पण घ्या, तेही सुंदर आहे.

बुकगंगावर आहे>> अरे वा! धन्यवाद
डोहबरोबर सोन्याचा पिंपळ पण घ्या, तेही सुंदर आहे.>> धन्यवाद मॅगी Happy

नुकताच यंदाच्या ‘लोकमत’ दिवाळी अंकातील द.कोरिआबद्दलचा लेख वाचला. त्यांच्या सोल या राजधानीची लोकसंख्या आहे १.१० कोटी. तरीही तिथे अंगावर येणारी गर्दी वा कलकलाट नाही. याचे कारण दीर्घकालीन नियोजन व अंमलबजावणी.

त्यातले ठळक मुद्दे:
१. अनेक कार्यालये व उद्योग दूरच्या शहरांत जाव्यात यासाठी करसवलती आणि प्रोत्साहन दिले.
२. मेट्रोची सुसज्ज आणि कार्यक्षम व्यवस्था. लोक ही वापरतात कारण:
a) खाजगी वाहन पार्क करायचे शुल्क जबरी आहे व
b) taxi सेवा मरणाची महाग आहे.

सोलची लोकसंख्या मुंबईशी तुलना करण्याजोगी असल्याने हे आशियाई उदाहरण भावले.

पुरुषस्पंदनचा अंक वाचला. सोशल मीडियावरचा परिसंवाद बोअर झाला. नवीन काही मिळालं नाही.
मुक्त लैंगिक जीवनाचं घाबरवणारं चित्रण करणार्‍या कथांचा एक पॅटर्न होऊ घातलाय. त्यात जवळच्या नात्यातल्या व्यक्तींना एकमेकांसमोर आणून त्या क्षणावर कथा संपवायची.

मौजमधला मिलिंद बोकीलांचा माया संस्कृतीबद्दलचा लेख वाचला. फारच छान आहे. युरोप आणि आशिया खंडांमध्ये विकसित झालेल्या संस्कृतींशी काही संबंध न येता स्वतंत्रपणे विकसित होऊनही माया संस्कृतीतल्या काही काही संकल्पना, संकेत, प्रथा, प्रेरणा ( आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे वेध वगैरे) आपल्या सिंधू संस्कृतीशी किंवा ग्रीक संस्कृतीशी अनेक बाबतीत साम्य दाखवणाऱ्या होत्या हे रोचक आहे. लिहिण्याची पद्धतही मस्तच.

बोकीलांनी या वर्षी प्रवासवर्णनं/परदेशी संस्कृतींबद्दलच लिहिलंय का? दीपावली - अंगकोरचे स्मितहास्य

माहेर दिवाळी अंकातला चिन्मय दामले यांचा लेख वाचला. त्यांच्या आतापर्यंतच्या (मी वाचलेल्या) लेखनापेक्षा हा लेख पूर्णपणे वेगळा वाटला. विषय, घाट .
हर्मायनीकडे होता तो टाइम टर्नर त्यांच्याकडे आहेच. शिवाय पेन्सिव्ह ( एक्स्टर्नल हार्ड डिस्क सारखी)ही आहे, याची खात्री पटली.

Pages