काय दडलंय यावर्षीच्या दिवाळी अंकांत ( २०१८ )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 3 November, 2018 - 03:41

हा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.

आपण कुठले दिवाळी अंक वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.
दिवाळी अंकांविषयीचा कुठलाच मुद्दा इथे वर्ज्य नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनंजय, चंद्रकांत चाळले. धनंजयमधली तुमची कथा वाचली, आवडली. बाकी दोन्ही अंकांत विशेष काही वाटले नाही.
मौज आणलाय. मस्त वाटतोय.
लोकसत्ता व कालनिर्णय बरे वाटले, घ्यायला हवेत.

अक्षरमधले मी टू वरचे लेख वाचले. लोकसत्ता आलाय घरी. मुंमग्रंसंत शनिवारी जाईन.

माझ्याकडे ललितचा ऑक्टोबरचा अंक आहे. त्यात "यंदाच्या दिवाळी अंकांत काय काय वाचाल?" हा रविप्रकाश कुलकर्णींचा लेख आहे. वेळ झाला की त्यातल्या नेहमीपेक्षा वेगळ्या वाटलेल्या अंकांबद्दल लिहितो.
यंदा पुल, सुधीर फडके आणि गदिमा यांचं जन्मशताब्दी वर्षं असल्याने अनेक अंकांत या तिघांवर लेखन आहे.

आंतर्जालावरचे अंक वेगळे, छापील वेगळे. बुकगंगावर पुस्तकांचे प्रिव्ह्यु असतात, तसे दिवाळी अंकांचे असतात का कल्पना नाही.
पण वृत्तपत्रांतून थोडक्यात माहिती येतेत.
मी म्हटलंय त्या ललितच्या अंकात अनेक दिवाळी अंकांच्या जाहिरातीही आहेत.

नवल वाचतेय. मायबोलीकर अश्चिगची कथा चांगली आहे पण त्यातली गणिती संकल्पना डोक्यावरून गेली.

दोन खून कथा आहेत, खिळवून ठेवणाऱ्या असल्या तरी मूळ परदेशी असावे असे वाटले. गूढकथा फारशा आवडल्या नाहीत. चातुर्यकथा चांगल्या आहेत. एकूण बॅलन्स नीट साधलाय.

अंक एकूण ठीकठाक वाटला.

मोहना जी आवाज मधील तुमची कथा वाचली. आवडली.
कथेच्या सुरवातीच्या व शेवटी आडनावात मासिकाने काही घोळ घातला आहे का?

पाथफाईंडर, कथा वाचलीत ह्याचा आनंद झाला धन्यवाद. माझ्याकडे अजून अंक आलेला नाही त्यामुळे कल्पना नाही गोंधळ त्यांनी घातलाय का मी :-). त्यांना पोलिस कोणत्या देशाचा आहे याबाबत स्पष्टता हवी होती म्हणून काही बदल केले होते पण नक्की काय गोंधळ झाला आहे त्याची कल्पना नाही.

कथेच्या सुरवातीला तुमचे आडनाव प्रभुदेसाई-कुलकर्णी असे दिले आहे तर शेवटी प्रभुदेसाई-जोगळेकर असे बरोबर दिले आहे.

ऑनलाईन फ्री दिवाळी अन्क वाचायला मिळतील का कुठे? एका दिवाळी अन्काबद्दल वाचल होत मागच्या वर्षी माबोवर किव्वा कुठेतरी. पण आता त्या अन्काच नावच आठवत नाही. Uhoh

विनय, काय करतात तुमच्या बाबतीत? माझं प्रभुदेसाईचं बदलून प्रभूदेसाई करतात. दोन आडनावं लावते ती लांबलचक म्हणून एकाला उडवतात :-).

भु चं भू हा टायपिंग ऑटो करेक्ट असेल.
गुगल च्या ऑटो करेक्ट ने माझ्या बऱ्याच शब्दांचं मनातलं डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंग बिघडलंय.

mi_anu हो. मलाही तसंच वाटलं होतं. संपादकांना विचारल्यावर त्यांचं म्हणणं की व्याकरणाच्या नियमाप्रमाणे प्रभुदेसाईतला ’भु’ दीर्घ पाहिजे. आडनाव छापून झालं होतं त्यामुळे पुढच्यावेळेला ’भु’ च ठेवा कारण लिहायला लागल्यापासून माझं आडनाव असंच लिहायला शिकवलं आहे असं कळवलं.

विनय, काय करतात तुमच्या बाबतीत?
>> माझं यावर्षी एका अंकात संजय खंडागळे आलंय, गेल्या वर्षी तर चक्क वीणा खंडागळे आलं होतं Lol

कुठल्या दिवाळी अंकातील "राशी भविष्य" फर्स क्लास्स आहे! Lol
तोच अंक विकत घ्यावा म्हणतोय. बाकी धनंजय/कथाश्री/मौज्/लोकसत्ता हे वाचनीय वाटतायत इथल्या आणि बाकी ठिकाणच्या प्रतिक्रियांवरुन.

बुकगंगा वरून झी उत्सव नात्यांचा दिवाळी ईबुक स्वरुपात अंक खरेदी केलाय. अनिल अवचट, मोहन जोशी, प्रशांत दामले, निवेदीता जोशी यांचे लेख पाहून घ्यावासा वाटला. मोहन जोशींचा लेख चांगला वाटतोय.

मुक्त शब्दचं संपादकीय "शेवाळाखालचे कुजलेले पाणी" दिनकर मनवर यांच्या पाणी कसं अस्तं? या कवितेसबंधाने झालेल्या गदारोळावर आणि त्यानिमित्ताने सध्या चालत असलेल्या अस्मितेच्या राजकारणावर भाष्य करतं.
ही कविता मराठीच्या काही प्राध्यापकांना आक्षेपार्ह वाटली ही माहिती माझ्यासाठी नवी आणि धक्कादायक आहे.
स्त्रीकडेही आपण ती विशिष्ट समुदायाची स्त्री म्हणून पाहतो, हेही संपादकीय अधोरेखित करतं. याला मराठा क्रांतिमोर्चाचाही संदर्भ असावा.
आणखी कोणत्या दिवाळी अंकांनी या प्रकरणाची दखल घेतलीय का, हे पाहायला आवडेल.

मीना कर्णिक यांचा डॅफने अ‍ॅन गलिझिया या माल्टामधल्या पत्रकारावरचा लेख वाचताना गौरी लंकेश यांची आठवण येत राहिली.

ललितमध्ये वाचून संस्कृति दिवाळी अंक मागवला. मराठी भाषा समृद्ध करणार्‍या साहित्यकृतींची ओळख करून दिली गेली आहे. गाथा सप्तशती ते कविता महाजन असा मोठा पट.

धनंजय अर्धा वाचून झाला. आतापर्यंत सागर कुलकर्णी, मेधा मराठे, निलेश मालवणकर (बोबो), रवींद्र भयवाल, सुनील जावळे, शिरीष नाडकर्णी यांच्या कथा अधिक आवडल्या

धनंजयमधील अनिल पाटील यांचा 'आत्मयज्ञाच्या अग्निशिखा' हा लेख खूप आवडला. स्वातंत्र्यसंग्रामातील माहिती नसलेल्या इतिहासावर आधारित जबरदस्त लेख आहे हा. पॅरिसवरून स्वातंत्र्य सैनिकांनी मागवलेल्या २० बंदुका व २०० काडतुसे यांचा प्रवास, इंग्रजांनी शिकारी कुत्र्यांसारखा घेतलेला त्याचा मागोवा. त्यातील अजूनही गायब असलेली एक बंदूक, जिचं काय झालं हे लेखकांनी शोधलं ! वाचनीय, देशभक्तीने ओतप्रोत भरलेलं आहे.

इंग्रज दरबारी उभ्या राहिलेल्या खटल्यातील एक साक्षीदार ( वामन जोशी उर्फ दाजी ) लेखकांच्या मामींचे काका होते हे विशेष! दाजींनी अंदमानला सावरकरांसोबत काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, अंदमानच्या फलकावर त्यांचे पाहिले नाव आहे

Pages