भूतबाधा?

Submitted by किल्ली on 31 October, 2018 - 10:44

कामाचा प्रचंड लोड उपसत व ऑफिसच्या बदलत्या वेळा सांभाळत आकाश दमून जायचा. कधी रात्रपाळी, तर कधी अर्धा दिवस अर्धी रात्र अशी वेळ गाठावी लागे. उशिरा घरी येणे नेहमीचेच झाले होते. जनसामान्यांची संध्याकाळ म्हणजे त्याची ऑफिसला जायची वेळ असे. शेजाऱ्यापाजाऱ्यांना तो क्वचितच दिसे. त्यामुळे त्याची आजूबाजूच्या लोकांशी फक्त तोंडओळख होती. पण कामाच्या अनियमीत वेळा ही एक गोष्ट सोडली तर काम, पगार आणि कंपनी चान्गली असल्यामुळे ही कंपनी सोडण्याचा सध्या तरी त्याचा काही विचार नव्हता. एकंदरीत त्याचं बरं चाललं होतं. लग्नबिग्न झालेले नसल्यामुळे कधीही आलं गेलं तरी वाट पाहणारं आणि कारण विचारणारं कोणी नव्हतं. ह्या गोष्टीमुळे त्याला एकटं वाटत असे.

एके रात्री आकाश ऑफिसातून दमूनभागून घरी आला. उशिरा आल्यामुळे तो जिथे राहत असे त्या इमारतीचे गेट बंद झाले होते. सगळी कुलूपं जवळच्या लॅच कीज वापरून उघडत शेवटच्या मजल्यावरच्या त्याच्या फ्लॅटवर पोचला. आत जाऊन दिव्यांची बटणं दाबली तसे घर प्रकाशाने उजळून निघाले आणि त्यालाही बरे वाटले. रात्रीचे २:३० वाजले होते. आकाश रात्रीचे जेवण बाहेरूनच करून आलेला असल्यामुळे थेट झोपायला गेला. आज त्याला काही केल्या झोप येत नव्हती. त्याने मंद आवाजात गाणी लावली. घरात जास्त सामानसुमान नसल्यामुळे आवाज घुमत होता. तो आवाज असह्य झाल्याने त्याने गाणी बंद केली. दिवे आधीच मालवलेले असल्यामुळे आता त्याच्या सोबतीला फक्त अंधार आणि शांतता होती. अस्वस्थ वाटल्यामुळे तो उठला आणि त्याने एक दिवा लावला. वाटणार नाही म्हणून. तसे पाहता त्याला ह्या वेळेची सवय होती पण आज चित्त थाऱ्यावर नव्हते. आकाशच्या मते कोणत्याही अस्वस्थतेवर मत करण्याचा प्राथमिक उपाय म्हणजे चहा! तो स्वयंपाकघरात गेला. तिथे स्वतःसाठी एक कप चहा बनवला आणि खिडकीत असलेल्या sitting area मध्ये येऊन बसला. त्याने खिडकीबाहेर बाहेर पाहिले. त्याच्या त्या खिडकीतून मोकळी जागा दिसत असे. त्या मोकळ्या जागेवर काही झुडुपे आणि गवत उगवलेलं होतं. आज तिथे एक तात्पुरता शेड उभारलेला दिसत होता. "बहुतेक इथे बांधकाम सुरु करणार आहेत वाटते." असे मनाशी बोलून आकाश चहाचा कप ठेवण्यासाठी उठला. रात्रीच्या त्या शांततेला चिरत अचानक एक कुत्रा जोरजोरात विव्हळल्यासारखे भुंकू लागला. तसा आकाश दचकला. पण त्याने स्वतःला सावरले. कुत्रंच भुंकतंय ना, लागलं असेल कुठेतरी. जाऊ दे, असं पुटपुटत तो बिछान्यावर पहुडला. झोपेने जणू असहकार पुकारला होता. नंतर कधीतरी त्याला झोप लागली.

उन्ह अंगावर आल्यावर आकाश उठला तेव्हा ९ वाजून गेले होते. चहा चा कप बाजूलाच होता. कप तर मी ठेवून आलो होतो ना? अशी शंका चाटून गेली पण विसरला असेल म्हणून त्याने कप उचलून किचन मध्ये पाऊल टाकले. डोकं जड पडलं होतं, थंडी वाजत होती. त्याने अंघोळीने फ्रेश वाटेल म्हणून पाणी गरम करायला ठेवले आणि एकीकडे चहा बनवला, चहा सोबत बिस्किटं घेऊन तो खिडकीत येऊन बसला. सहज चला म्हणून डोकावला तर त्या मोकळ्या प्लॉट वर झाडे, झुडुपे आणि गवत ह्याशिवाय काहीच नव्हते. मग रात्री पाहिलेले शेड कुठे गेले? काढून टाकलं असेल सकाळी कोणीतरी म्हणून त्याने त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. शिवाय झोप अपूर्ण असल्यामुळे असे भास होत असतील असे त्याला वाटले. आज सरळ त्याने ऑफिसला दांडी मारून झोप काढायचे ठरवले. असाही उद्यापासून दिवसाची शिफ्ट सुरु होणार होती. त्याने बरं वाटत नाही असे बॉसला कळवले आणि जवळच्या हॉटेलातून पुलाव आणि पराठे ऑर्डर केले. आता जेवणाचा प्रश्नही मिटला होता. जेवण यायला वेळ होता. जरा डुलकी काढावी म्हणून अंथरुणात शिरला. एरवी हिवाळ्याच्या थंडीत पुरेल असे पांघरूण घेऊनही त्याला आता थंडी वाजत होती. एकदम अशक्त वाटत होतं. तसाच तो झोपी गेला. उंचावरून दाणकन आदळून खाली पडलोय आणि काटे टोचत आहेत असे स्वप्न पडले आणि आकाश दचकून जागा झाला तेव्हा अंधार पडला होता. बाहेर येऊन त्याने दार उघडले तर दारात पार्सल पडलेले होते आणि त्याला मुंग्या लागल्या होत्या. एवढा वेळ कसे झोपलो ह्याचे त्याला नवल वाटले. दिवे लावावेत, म्हणून त्याने बटन दाबले तर दिवे लागेचनात! light गेले असतील असे समजून तो मेणबत्ती शोधायला लागला. मेणबत्ती सुद्धा पेटत नव्हती. चित्रविचित्र घटनांनी नजर झालेल्या आकाशने तो प्रयत्न सोडून दिला. मोबाइलची बॅटरी डेड झाली होती. म्हणजे तोही मार्ग खुंटला होता. आता इतरांच्या घरी light आहेत का ते पाहायला तो खिडकीत आला. दूरवर प्रकाश दिसत होता. पुन्हा त्याचे लक्ष त्या मोकळ्या जागेकडे गेले. तिथे तो शेड दिसला!!! आकाशने त्या शेड मध्ये कोणी असेल तर दिसेल, बाहेर येईल म्हणून ओरडायला सुरुवात केली. पण त्याचा आवाज कंठातून बाहेरच पडत नव्हता. कसलीतरी निर्वात पोकळी निर्माण झालीये असं वाटत होतं. हा सर्व ताण असह्य होऊन थंडीने हुडहुडी भरत असलेला आणि तापाने फणफणलेला आकाश खाली कोसळला.

सकाळी आकाशला जाग आली आणि त्याला एकदम ताजेतवाने वाटले! पोटात अन्नाचा कण नाही, ताप आलाय, थंडी वाजतेय, अशक्तपणा आलाय ह्या अवस्थेत झोपला असताना आजची सकाळ मात्र प्रसन्न, हलकी फुलकी आणि मोकळी वाटत होती. मस्त गुणगुणत आणि शीळ घालत त्याने दार उघडलं, बाहेर खुप लोकं जमली होती. पण कुणीच त्याच्याकडे पाहिलं नाही. असतील आपल्याच तंद्रीत म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. इतक्यात समोर राहणाऱ्या काकूंचा ओळखीचा आवाज त्याच्या कानावर पडला,
"अख्खा दिवस प्रयत्न केल्यानंतर ह्या समोरच्या फ्लॅटचं दार उघडलं. फ्लॅट मध्ये सगळीकडे कुत्र्याचे केस पसरलेत. फरशीवर वाळलेला चहा दिसतोय. सगळीकडचे दिवे चालू आणि फ्लॅट मध्ये कोणीच नाही. कसं झालं बाई, माहित नाही. पण एवढ्या तरुण वयात कुत्रं चावून मुलगा गेला म्हणजे वाईट झालं हो! खालच्या प्लॉटवर काल रात्री बॉडी सापडली. "

कुणाची बॉडी काय माहित असं पुटपुटत आकाश फ्लॅटमध्ये परतला तेव्हा सगळीकडे चहाचे ओघळ, कुत्राचे केस पसरले होते आणि खिडकीतून खाली पाहिल्यावर प्लॉटवरचं कुत्रं जिभल्या चाटत होतं!
------------------------------------------------------------------------------------------
डोक्यात एक कथाबीज होतं, पण त्याचा व्यवस्थित विस्तार करता न आल्यामुळे वेगळंच काहीतरी लिहिलंय.
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आणि काय सुधारणा करता येतील हेही जरुर सान्गा.
मला तर 'कै च्या कै' वाटली. पण काय करणार आता! उतरली स्क्रिन वर!
------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा आली.पण हा प्लॉट(स्वतः मेलेले असणे आणि हे नंतर कळणे, मेल्यावर सर्व तब्येतीच्या तक्रारी लांब होऊन हलके वाटणे(काय हो चमत्कार मधला भुताचा मायग्रेन हा अपवाद) ही कल्पना आता खूप जणांनी वपारली.
नवी भीती द्या.

डेक्कन क्वीन मधून प्रवास केल्यासारखं वाटलं. गाडी सुरू झाली, मग सावकाश घाट आणि बोगद्याचं थोडं गूढ वातावरण आलं आणि काही समजे पर्यंत प्रवास संपला पण! व्यवस्थित विचार करून उतरव ना कथा! इतकी घाई करायची काय गरज आहे किल्ली? असो. पुलेशु! Happy

छान लिहिले आहे किल्ली.. आवडली
>>>आकाश म्हणजेच मेलेला कुत्रा का?>>> कुत्रा मेला नाही..आकाशच मेला आहे कुत्रा चावून

जमलीये.
अजुन विचार करुन सावकाश उतरव परत.
कुत्रा खरा होता म्हणुन शेडचं काय ते लक्षात आलं नाही.

मस्त.
तू वाईट लिहीत नाहीच पण तू म्हणालीस तसा गोंधळ मात्र आहे.
वर अनुने म्हटलं तेच परत म्हणतो.
नवी भीती दे

अनु & गुगु +१
लहानपणी झी हाॅरर शो पहायला भिती वाटायची. आता "अतीपरीचयात अवज्ञा" झाले आहे.
दरवेळी नवीन ड्रग्ज लागते नाहीतर किक बसत नाही

खूप विस्कळीत वाटली कथा पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे सुधारणा सुचवण्याचा प्रयत्न करणार...
अगदी 'कै च्या कै' वाटली नाही हे पण खरं! कथाबीजात दम नक्की आहे.

बोकलत, अनामिका, संजय भावे, पाफा, गुगु, शाली, दिनकरा ,Namokar, कोमल, चिमण, च्रप्स, उमानु, VB, सस्मित, शाली तुम्हा सर्वान्चे अनेकानेक धन्यवाद!
कथाबीज तसेच ठेवुनही कथा रीराईट करण्याच्या विचारात आहे, बघू जमली तर!!

तुमच्या सुचनांबद्दल खुप आभार!

मला वाटलं की तुमच्या डोक्यात दोन वेगवेगळी कथाबीजे आहेत आणि त्यांचा गुंता झाल्यामुळे कथा नीट फुलत नाही आहे.
१) मृत आत्मा डिनायलमध्ये असणे - आत्म्याचा आपण मेलो आहोत यावर विश्वास बसत नाही.
२) कथानकाच्या भूगोलात अमानवी शक्तीचे वास्तव्य आहे.

या दोहोंना एकत्र आणणे शक्य आहे पण त्यासाठी काही नियम ठरवून घ्यावे लागतील. उदा. तो कुत्रा, तो ठराविक दिवशीच हल्ला करतो का? इतके दिवस तो कुठे होता? तो त्या विशिष्ट फ्लॅटमधील व्यक्तिवरच हल्ला करतो का त्याच्या हल्ल्याची इतर काही ट्रिगर कंडिशन आहे? इ. इ.

प्रेरणा हवी असेल तर जुन्या आहटमध्ये (१९९७-९८) मध्ये एक या धाटणीचा एपिसोड आहे. तसेच पॅरानोईआ एजंट नावाची एक अप्रतिम अ‍ॅनिमेटेड सीरिज आहे, तिचा एक सबप्लॉट या धाटणीचा आहे. दोन्ही चांगले संदर्भ आहेत.

कथानकाच्या भूगोलात अमानवी शक्तीचे वास्तव्य आहे.>> हे डोक्यात होतं हे नक्की
तुमच्या डोक्यात दोन वेगवेगळी कथाबीजे आहेत आणि त्यांचा गुंता झाल्यामुळे कथा नीट फुलत नाही आहे.>>>> बरोबर
नेमकं हेच सम्जत नव्हतं की काय गडबड झालीये, निदर्शनास आणोन दिल्यबद्दल खुप आभार पायस Happy
तुमच्या सुचनेबरहुकुम व व्यवस्थित विचार करुन, कथासुत्र मांडण्याचा प्रयत्न करीन म्हणते Happy

धन्यवाद जुई Happy
अजून अफलातून जमेल भयकथा. >>> नक्कीच प्रयत्न करते तसा जुईबाई _/|_

किल्लीबाई छान आहे कथा...जशी आहे तशीच छान आहे...
कधी कधी असाच होत...डोक्यात एक घोळत असत आणि लिहताना वेगळच कागदावर उतरतं...
लिहीत राहा आणि पोस्ट करत राहा...छान लिहितेस