माझी व्हिएन्ना यात्रा - सिंहावलोकन - ३

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भाग १ : http://www.maayboli.com/node/6559
भाग २ : http://www.maayboli.com/node/6789
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

येताना मी ठरवून आलो होतो की शक्य झाले तर मोझार्ट च्या गावी, साल्त्झबर्ग ला जाऊन यायचे. त्याची एखादी कन्सर्ट ऐकून यायची. तसं आता ती व्हिएन्ना मध्ये पण ऐकता येते म्हणा.. मी आलो तेव्हा व्हिएन्ना मध्ये कडाक्याची थंडी होती. कामाशिवाय बाहेर पडायचे नाही असे ठरवूनच ठेवले होते मी. व्हिएन्ना मध्ये ही हालत तर साल्त्झबर्ग ला काय होईल असा विचार करुन या वेळी तिकडे जायचे मी रहित केले. अर्थातच माझी थोडी निराशा झाली होती. पण मग ती कसर काही अंशी भरुन काढता येईल असा दुसरा पर्याय मला सापडला... ऑपेरा..

व्हिएन्ना हे ऑपेरा साठी प्रसिद्ध आहे. लोक दुरदुरुन तेवढ्यासाठी येथे येतात आणि त्याचा आनंद घेऊन तृप्त होऊन परत जातात. ऑपेरा हा प्रकार तसा आपल्याला नवीन नाही.. मी लंडन ला असताना बर्‍याच वेळेला असा एखादा ऑपेरा दाखवत असायचे आणि त्या वेळी हे आता सर्वसामान्य वाटणारे लोक अचानक चिमटा काढल्यासारखे का ओरडताताहेत किंवा काय म्हणायचं आहे ते सरळ न सांगता उगाच हेल काढत एकच वाक्य तासभर कशाला बोलताहेत... असले विचारही मी केलेले आहेत.. पण मनात एक सुप्त इच्छा होतीच की असा एक तरी ऑपेरा पाहिला पाहिजे..

एक दिवस सहज माझ्या जर्मन सहकार्‍याला माझी इच्छा बोलून दाखवली आणि त्याने लगेच मला कोणते शो बघ पासून कोणते खास नाहीत, कोणते value for money आहेत/नाहीत ही सगळी माहिती द्यायला सुरुवात केली. महिनाभर कोणते प्रयोग आहेत यांची यादी पण माझ्यासाठी काढून आणली. मी हा विचार केल्यापासून सलग ४ दिवस एकदम हाऊसफ़ुल प्रयोग होते. सरतेशेवटी एका प्रयोगाला जायचा मी निर्धार केला आणि ऑपेरा थिएटर पाशी जाऊन पोहोचलो.

new_opera_theatre_-_operstaat.jpg

इथे २ ऑपेरा थिएटर्स आहेत. आता सगळे ऑपेरा प्रयोग नवीन सभागृहात होतात आणि जुन्या सभागृहात फक्त कन्सर्ट्स होतात. थिएटर पाशी गेलो आणि पहिला अडथळा समोर आला, तिकिट मिळवण्याचा. तो प्रयोग, शुक्रवारी असल्याने खूप गर्दी होती आणि खिडकीवर तिकिटे शिल्लक नव्हती. प्रथम ग्रासे... म्हणतात ना अगदी तसे झाले. आयरीश माणसे बीअर मध्ये माशी पडली तर ती काढून टाकतात आणि बीअर पितात असे विनोदात वाचले होते, तशी, घासात आलेली माशी काढून टाकता येईल का याची चाचपणी मी चालू केली. तेथे चौकशी केल्यावर कळले की बरीचशी तिकिटे ही एक कंपनी विकत घेते आणि नंतर तीच ती तिकिटे चढ्या भावाने विकते. हे ऑपेरा थिएटर सरकार च्या मालकीचे आहे. ही कंपनी पण सरकारी अखत्यारीत येते. सरकारी कंपनी असं करत असेल यावर माझा विश्वासच बसेना..पण त्यांनी 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' असं म्हणत माझ्यापुढे दुप्पट किंमतीला लावलेले एक तिकिट धरले. आयुष्यात कधीही काळ्या बाजारात काहीही न घेतलेला माणूस मी.. आता कोणी ताठ कण्याचे म्हणा नाहीतर कणाहीन, आम्हां मध्यमवर्गीयांना काळा बाजार म्हटलं की धडकी भरते. असं तिकिट घेणं तत्वात बसत नाही पासून ते कोणीतरी आणि त्यातही पोलिसाने पाहिलं तर, पर्यंत सर्व विचार डोक्यात येऊन जातात. तसेच त्यावेळी पण झाले. शेवटी विचारांती when in rome... म्हणत तिकिट घेतले, अर्थात त्या आधी ती जागा कोठे आहे हे त्या माणसाने मला किमान ५ वेळा दाखवले असेल. त्याच्या पवित्र्यावरुन नंतर अजून एकदा विचारलं तर तो मला जागेवर सोडायला येईल की काय अशी मला शंका पण आली.

असो. तर, तिकिट मिळाले. आता पुढे थिएटर च्या दाराशी उत्सुकतेने वाट बघणे चालू झाले. खेळण्यांच्या दुकानात कधी आत जायला मिळेल याची लहान मुले जितक्या आतुरतेने वाट बघतील तितक्याच आतुरतेने मी तेथे उभं राहून वाट बघत होतो. अखेरीस थिएटर चा दरवाजा उघडला आणि मी आत शिरलो. बाहेरुन असं गूढ वाटणारं थिएटर एकदम अचानक स्वागतोत्सुक वाटायला लागलं. अजून मुख्य सभागृहात सोडायला सुरुवात झाली नव्हती त्यामुळे तेथे थोडेफ़ार फोटो काढून झाले. या ट्रीप मध्ये मी अगदी ते मंगोलियन वंशाचे लोक हिंडतात ना टुरीस्ट म्हणून, त्यांच्यासारखं करत होतो. हातात कॅमेरा चालू ठेवूनच हिंडायचं. दिसलं दृश्य, काढ फोटो. दिसली इमारत, काढ फोटो. एका प्रौढ बाईने तर अगदी दुकानाच्या पाट्या पण सोडल्या नाहीत हो.. पाटीपाशी जायचं, कॅमेरा तिरका, क्लिक केलं आणि झालं.. तर मी पण जे फोटो काढलेत त्यातले काही इथे टाकायचा प्रयत्न करतो, उरलेले कोठेतरी वेब वर टाकेन.

तर, एकदाचं मुख्य सभागृह उघडलं आणि मी माझ्या जागेवर जाण्यासाठी जिना चढायला सुरुवात केली. मला आयत्या वेळी तिकिट घेतल्याने पडणारी किंमत आणि उपलब्ध जागा यांचं गणित जमवून त्यातल्या त्यात एक छान जागा मिळाली होती. गॅलरी मध्ये पहिल्या रांगेत बसणार होतो आणि माझ्यापुढे मोकळी जागा असणार होती. वरती जाताना मध्येच एक buffet room लागते. इथे नावाप्रमाणे खरोखरच खाण्याचा कार्यक्रम असतो, फक्त कलाकारांसाठी. या खोलीचे वैशिष्ठ्य असे की दुसर्‍या महायुद्धात जेव्हा हे थिएटर पूर्ण उध्वस्त केलं गेलं त्यावेळी २ च खोल्या वाचल्या, ही त्यापैकी एक. या नंतरच्या मजल्यावर सुद्धा छतावर उत्तम चित्रे काढलेली होती. एकूणच फोटो काढण्याचा मोह आवरणे कठीण होते.

intermediate_hall1.jpg

शेवटी सभागृहात पोचलो आणि काय विचारता... डोळ्यांचं पारणं फिटलं.. चित्रात, दूरदर्शन वर पाहिलेलं सभागृह प्रत्यक्षात इतकं भव्य दिव्य आणि झगमगतं होतं की बास.. यापेक्षा अजून काही नको अशी अवस्था झाली.
auditorium.jpg

ज्यांना कल्पना नाही त्यांच्यासाठी, साधारण अर्धवर्तुळाकार सभागृह असते, वर्तुळाचा व्यास असतो तेथे व्यासपीठ असते आणि ते सगळ्या बाजूंनी पूर्ण दिसेल अशी मांडणी केलेली असते. या अर्धवर्तुळात ३ - ५ मजले असतात आणि त्यात बसण्याची व्यवस्था केलेली असते. व्यासपीठाच्या खाली सर्व वादक बसतात आणि त्यांच्या पुढे सर्वात महाग तिकिटे ज्यांच्याकडे असतात असे लोक. ही तिकिटे २०० युरो पासून चालू होतात आणि अगदी ५ युरो पर्यंत उपलब्ध असतात. सर्वात स्वस्त तिकिटे असणारे लोक उभे राहतात, चक्क ३ तास उभे राहतात. हे लोक त्यातले दर्दी आणि नियमित येणारे असतात. त्यांना तो ऑपेरा बघण्यापेक्षा ऐकण्यात जास्त रस असतो, आणि म्हणून ते स्वस्त तिकिटे काढून जमिनीवर बसतात (जिथून काही दिसत नाही) आणि कान भरुन ऐकतात. खरे कानसेनच म्हणायचे ते !

ubhe_prexak.jpg

तर असे वेगवेगळ्या रांगांमधले, मजल्यांवरचे लोक हळू हळू यायला लागले. प्रामुख्याने प्रौढ आणि वयस्क लोकांचा भरणा होता आणि त्यातले बरेचसे एकदम सुटाबुटात होते. बायका इव्हिनींग गाऊन घालून नटून आल्या होत्या. मी येऊन बराच वेळ झाला तरी माझ्याशेजारी कोणीच आलं नव्हतं. मी ऑपेरा ला आलो आहे ही बातमी बाहेर फुटली की काय असा विचार करत होतो तेवढ्यात एक सुकन्या माझ्या शेजारच्या खुर्चीवर स्थानापन्न झाली. ती पडद्याच्या विरुद्ध बाजुला बसल्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही, पण तिने जेव्हा कॅमेरा, दूर्बिण अशा गोष्टी बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा ही कोणीतरी खुपच हौशी दिसते आहे असं वाटून मला तिच्याविषयी आदर वाटायला लागला. तसा मला हे दूर्बिण प्रकरण घेऊन बघणार्‍या लोकांबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे. एका हाताने (उदा. ऑपेरा सारखे ठिकाण) किंवा दोन्ही हातांनी (टेनिस, क्रिकेट सामना) ती धरायची, त्यातून सारखे फ़ोकस करत बसायचे आणि पुन्हा मान हलवत, दूर्बिण हलवत बॉल दिसतो का ते पहात राहायचे. मला सांगा, नदाल किंवा इव्हानेसेविच सारख्या लोकांनी केलेली सर्व्ह कशी बघणार हो दूर्बिणीतून ? नुसत्या डोळ्यांनी ती बघेपर्यंत बॉल गायब झालेला असतो आणि हे असं बघायचं ? म्हणूनच हे ज्यांना जमतं अशा लोकांबद्दल मला आदर आहे आणि एवढे बोलून मी माझे दूर्बिण आख्यानाचे चार शब्द संपवतो Happy

तर त्या कन्येने अशा सगळ्या गोष्टी समोर मांडल्या आणि ती सरसावून बसली. प्रत्येक खुर्चीच्या समोर इंग्लिश आणि जर्मन भाषांतर दाखवणारा एक छोटा डबा होता. ते बघितल्यावर माझी उरलीसुरली शंका दूर झाली. तसं शंका येणारच की हो..एकतर हे ऑपेरा वाले काय बोलतात / गातात ते कळणार नाही, आणि त्यात मला इटालियन कळत नाही ना.. म्हणजे आनंदच आहे अशी माझ्या मनात कोठेतरी बोचणी होती..पण तो भाषांतरकार पाहिल्यावर मला बरं वाटलं.

bhaashaantarkaar.jpg

त्या माझ्या शेजारणीच्या दुसर्‍या बाजुला एक जपानी मुलगा आणि त्याच्या शेजारी व्हिएन्नाला शिकणारी एक विद्यार्थिनी येऊन बसले. खुर्चीला टेकताक्षणी त्या विद्यार्थिनी ने त्या मुलाशी संभाषणाचा प्रयत्न चालू केला. तिचं कोणतंही वाक्य किमान २ वेळा परत सांगितल्याशिवाय त्या मुलाला कळत नव्हतं आणि त्यांचा संवाद ऐकणं मनोरंजक होऊ लागलं होतं. त्या मुलीने प्रत्येक रांगेकडे बोट दाखवून कोणत्या रांगेला किती तिकिट असतं याची इत्थंभूत माहिती त्या मुलाला पुरवली. दर थोड्या वेळाने तो कुठेतरी शुन्यात बघायचा, तो एखाद्या रांगेकडे बघतोय असं वाटून ती लगेच 'अय्या, या रांगेत ना..' असा आवाजात भाव आणून बहुमोल माहिती (हो, तीच , तिकिटाच्या किंमतीबद्दलची) पुरवायची.. समोर तो भाषांतरकार होता म्हणून ठीक आहे नाहीतर मी तिला पूर्ण ऑपेरा चं भाषांतर विचारायला कमी केलं नसतं..

vaadyavruda.jpg

तर अशा रितीने बराच वेळ गेला आणि सभागृह पूर्ण भरले. सगळे वादक आपापल्या जागेवर येऊन बसले. पडदा वर गेला आणि अचानक खाली बसलेले सगळे लोक उभे राहिले. पाहिले तर संगीत दिग्दर्शक येत होता. त्याने येऊन हातातली काठी अलगद मोरपिस फिरवावं तशी फिरवली आणि व्हायोलीन ची एक हलकी मंजुळ धून हॉल मध्ये गुंजली...

क्रमशः..

प्रकार: 

आकाराच्या कमाल मर्यादेमुळे काही फोटो थोडे अस्पष्ट आहेत. त्याबद्दल माफ करा.

व्वा! अफलातून वर्णन! Happy मस्तच
फोटोमुळे मजा आली
दुर्बीण, वेळेनुसार एक हात वा दोन हात वापरणे.... Lol
बर, पण त्या कन्येचा फोटो काढलास की नाही????? (नाही??????? अरे रे, दुर्दैव आमचे Proud )
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

मिलींदा सहीच रे. फोटोने मजा आणली. Happy रोमांचकारी का काय म्हणतात ना तस्साच अनुभव असेल ना हा?

सहीच!! हे फोटोज काय सुंदर आहेत! खूप उत्सुकता लागली आहे आता.. अर्थात ऑपेरा मलाही झेपण्यापलिकडचा वाटातो, पण तरी तुला कसा वाटला ते वाचायला आवडेल!

छानच फोटो अन वर्णनही.. ऑपेराचं सविस्तर वर्णन लवकर येऊ द्या.. Happy

वा, छान झाले आहे वर्णन. ऑपेराबद्दल येऊदे लवकर.

ह्या ओपेरापासुन ५ मि. च्या अंतरावर आमचे विद्यापिठ आहे. मी पण दोन ओपेरा पाहिले (ऐकले). अगदी ते क्षण परत अनुभतेय अस वाटतय मला. ह्याच ओपेराच्या समोर आपली Indian Embassy आहे. ओपेराच्या समोरुन, आजुबाजूच्या सगळ्या गल्याबोळ्यांतून बर्‍याचदा रात्रीचे खुप भटकलोय आम्ही. पुन्हा कधीही व्हिएन्नाला जायची, रहायची संधी मिळाली तर मी ती बिलकुल सोडणार नाही.
तुझे सगळे लिहुन होईस्तोवर ईकडे प्रतिक्रीया द्यायची नाही असे ठरवले होते पण लिहायचा मोहच आवरेना.

मस्तच. फोटो आणि वर्णन दोन्ही.

मिलिंदा! सहि लिहतोयस.. ऑपेराचे फोटो पाहुन 'दिल चाहता है ' आठवला.

>>>हॉल मध्ये गुंजली...

बाकी लेखन छान .. पण गुंजली?!

सहीच लिहीतोयस मिलींदा. हा भाग पण आवडला.

धन्यवाद सर्वांना !
क्ष, काय बरं लिहू त्या ऐवजी ? Happy
नलिनी, काही त्रुटी असतील तर दुरुस्त केल्यास तरी चालेल. हा माझा काही शोधनिबंध नाहीये Happy

पुढच्या भागाला किंचित वेळ लागेल असं दिसतंय. परतीचा निम्मा प्रवास झालाय. असो. पुन्हा एकदा हे वाचल्याबद्दल धन्यवाद Happy

>> आणि व्हायोलीनच्या सूरांची एक हलकीशी मंजूळ लकेर हॉलमध्ये उमटली
>> आणि जणू काही ते मोरपीस आपल्याच अंगावरुन फिरावं तसे हॉलमध्ये व्हायोलीनचे मंजूळ स्वर उमटले
>> आणि एखादं फूल अचानक हलकेच उमलावं तसे व्हायोलीनचे स्वर गर्भगृहात उमलले

अनपेक्षितपणे असे सूर ऐकू येतात तेव्हाचा माझा अनुभव जसा असतो त्यावरून हे शब्द दिले आहेत. तुझा अनुभव बहुधा वेगळा असेलही आणि तो शब्दांत पकडणं मला शक्यही नाही. पण गुंजले खटकलं (बहुतेक इकडच्या हिंदीमिश्रित कविता -"माझ्या जिद्दीला कंटाळून" वगैरे- वाचून थोडं मन हुळहुळं झालं असण्याची शक्यता आहे)
असो.

क्ष, खटकण्याचे एक कारण म्हणजे हा शब्द फारसा वापरात नाही आणि म्हणुन सवईचाही नाही!
विजापुरच्या गोलघुमटात गेलास तर सप्तप्रतिध्वनि ऐकु येतात, पण तिथे वा एखाद्या शन्कराच्या मन्दिराच्या गाभार्‍यात आवाजाचे जे प्रतिध्वनी निर्माण होऊन परिणाम जाणवतो, त्यास सर्वसाधारणतः आवाज "घुमला" असे म्हणतात, व हा शब्द बराचसा प्रचलित आहे! Happy
गाज, गुन्ज, गुन्जणे, (अगदी गुन्जण मावळ देखिल Proud ) हे शब्द प्रचलित नसले तरी भर शान्त सभाग्रुहात एखादि हलकीशी स्वरान्ची लकेर प्रतिध्वनिन्सह किन्वा त्या विना ऐकु येते तेव्हा या नेमक्या शब्दाला प्रत्यवाय नाही.
अस आहे की ढोल्/म्रुदुन्ग वगैरेन्चा आवाज घुमेल, तर बासुरी/पावा, शीळ वगैरेची लकेर गुन्जेल Happy

तू दिलेली वाक्येही अर्थाच्या दृष्टीने बरोबर आहेत, पण नेमक्या शब्दयोजनेकरता बरोबर नाहीत!
माझ्या मते मिलिन्दाने वापरलेला शब्द बरोबर आहे! Happy
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

लिम्बूटीम्बू,
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत इतर भाषांचा प्रभाव पडून शब्दयोजना बदलते खरी. शिवाय अमुक एक शब्द मराठी(च) आहे किंवा नाही ही चर्चा संभवत नाही कारण ही तशी बरीच अर्वाचीन भाषा आहे.
असो.
मला "व्हायोलीन ची एक हलकी मंजुळ धून हॉल मध्ये गुंजली" हे "व्हायोलीनकी एक हलकीसी धून हॉलमें गूँजी / गूँज उठी" चं शब्दश: भाषांतर वाटलं म्हणून हा प्रपंच!

क्ष, तुझी शन्का बरोबर/सहाजिकच आहे, पण हे हिन्दीचे भाषान्तर नाही Happy

तुझा मिलिंदाच्या लेखणीवर अगदी "आत्मविश्वास" म्हणण्याजोगा विश्वास दिसतोय Happy

>>> तुझा मिलिंदाच्या लेखणीवर अगदी "आत्मविश्वास" म्हणण्याजोगा विश्वास दिसतोय Lol
माझा माझ्या निरीक्षण अन परिक्षणावर जास्त "आत्मविश्वास" आहे रे भो! Proud
(तसही मिलिन्दा सहसा चूकणार नाहीच! हुषार हे तो! Happy
अन मी नविन अस्ताना सलामीसलामीलाच ज्या निवडक लोकान्शी माझ्या "सलामी झडल्या" त्यातला तो एक तेव्हान्चा मॉडरेट्टर हे भो! त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा, नाही का? Proud )
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

अगदी . निळ्या शाईतले मिलिंदाचे फटके आठवतात हो Happy
बाकी गाज, गुन्ज, गुन्जारव हे शब्द तसे प्रचलित आहेत आणि वापरण्यात देखील.

खरं तर मला असं विचारायला नको. पण रहावलं नाही. नं. ३ च्या फोटोमधे असं कोळीष्टकं लागल्या सारखं काय दिसतं आहे? (माझी आपली एक शंका.)
- सुरुचि

छान लिहिलंय मिलिंदा... पुढचं लिहा लवकर... Happy

नं. ३ च्या फोटोमधे असं कोळीष्टकं लागल्या सारखं काय दिसतं आहे? >>>> पडदा आहे तो. त्याच्या पाठीमागे स्टेज आहे.

छान लिहितोयस मिलिंदा. Happy
लवकर लिही पुढचे भाग.

मिलिंदा
तुझ्या लेखातल्या फोटोला जाळी-जळमटं लागायला लागलीत, लेखालाही लागतील फार दिवस असाच ठेवलास तर, तेव्हा लवकर पुढचा भाग लिहायला घे Proud

मी पण लेख पूर्ण वाचल्यावरच प्रतिक्रीया देणार होते पण फोटो इतके सुंदर आहेत कि थांबणं शक्यच नाही. लेखसुध्दा मस्तच. ढ्गाई सुंदरीनी पोषाख बदलला तर माझ्यापण लक्षात येतं. या भागात ढ.सुं. चा एकदाही उल्लेख आला नाही असं व्हायला नको म्हणुन इथेच लिहीलं. Happy

खुप दिवसांनी इकडे फिरकले आणि हा खाऊ दिसला! मस्स्स्स्त लिहितोयस. मजा येतेय वाचायला.

सुंदर लिहिलयं, मज्जा आली... पुढचं कधी लिहिणार आहात?

अश्विनी, भाग ४ पण लिहून झाला आहे. असेल इथेच कुठेतरी.
पुढच्या भागाबद्दल कोणी विचारायच्या आत धूम ठोकतो Happy

मी दररोज येऊन पुढचा भाग दिसतो का ते शोधतेय. कुणाला दिसला की मला कळवा.

Pages