भुलाबाई

Submitted by @Shraddha on 22 October, 2018 - 15:07

महाराष्ट्रात वेगवेगळे सण वेगवेगळ्या प्रदेशात थोड्याफार फरकाने साजरे होतात. महाराष्ट्रात इतरत्र साजरा होणारा भोंडला, हादगा विदर्भात भुलाबाई च्या रूपात साजरा होतो.
भुलाबाई म्हणजे देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वती कडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रूसुन निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते.
शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात. तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीची मुर्ती स्थापन करतात.
पुजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच. पुर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पुरता मर्यादित झाला आहे.

भुलाबाईची पुजा करून मुली लोकगीते म्हणतात. विशिष्ट लयीत टाळ्या वाजवत ही गाणी म्हटली जातात.
"ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा" म्हणत गाणी सुरु होतात.
भुलाबाई च्या निमित्ताने स्त्रिया आपली सुख दुःख एकमेकींशी वाटतात."अस्सं सासर द्वाड बाई" म्हणतं सासरचे वर्णन करतात तर "अस्सं माहेर सुरेख बाई" म्हणत माहेरच्या आठवणीत रममाण होतात. सासरचे हेवेदावे सांगताना " कशी घेऊ दादा घरी नंदा जावा करतील माझा हेवा, हेवा परोपरी नंदा घरोघरी" म्हणत मनातले सल बोलुन दाखवतात.
सासुरवाशीणीच्या मनातली माहेरची ओढ "कारल्याचं बी पेर ग सुनबाई मग जा अपुल्या माहेरा" म्हणणार्‍या सासुला "कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई आता तरी धाडा ना" या आर्जवातुन आपल्या पर्यंत पोहचते.

माहेरी आलेल्या भुलाबाई ला घ्यायला येणाऱ्या सासरच्या मंडंळींवर ती" चारी दरवाजे लावा ग बाई, झिपरं कुत्रं सोडा गं बाई" अशा आविर्भावात रूसुन बसते.
मग तिचा रुसवा" यादवराया राणी रुसुनी बैसली कैसी, माहेरवाशीणी सुन घरासी येईना कैसी" म्हणत एक एक जण तिला दागिना देऊ करत रूसवा काढायचा प्रयत्न करतो. या सर्वांना नकार देणारी भुलाबाई नवर्‍याने देऊ केलेलं अर्धं राज्य मात्र आपल्याला हवं म्हणते.
भुलाबाई चे डोहाळे" पहिल्या मासी सासु की पुसे सुनबाई सुनबाई डोहाळे कसे" म्हणत कुटुंबातील सर्व सदस्य तिचे डोहाळे पुरवतात.
माहेरवाशीण भुलाबाई बाळंत होते. तिचा बाळंतविडा " साखरेच्या गोण्या बाई लोटविल्या अंगणी भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस" म्हणत अकरा दिवस केला जातो. बाराव्या दिवशी " अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता" म्हणत बारसं केलं जातं. बारशाला दोन मुली हाताचे पंजे एकमेकात गुंफून पाळणा करतात. त्यात बाळाचं प्रतिक म्हणून हळकुंड ठेवतात. आरती झाली की मग खिरापतीचा कार्यक्रम होतो. खिरापत ओळखताना आम्ही 'श्री बालाजीची सासू कांदेखाई' म्हणून मोकळ्या होतो.
आणखी बरीच गाणी थोड्याफार फरकाने म्हटली जातात.
आता भुलाबाई उत्सवाचं प्रमाण कमी झालयं. पण तरीही या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात. गाण्यांमधे भुलाबाईच्या रूपात स्वतः ला बघतात.
जिवनातल्या ताणतणावांचा विसर पडून थोडावेळ तरी आनंद उपभोगता यावं, हाच खरा तर या उत्सवाचा उद्देश.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages