बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

Submitted by प्रकाश घाटपांडे on 18 October, 2018 - 03:43

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.

बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये
-मा.श्री रिसबूड
भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत.माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तहेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते.मी है। का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतो :
‘विश्वाचा गाडा आपोआप आपल्या नियमानुसार चाललेला आहे, त्याच्यामागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही.'
‘स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूत आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही.'
वरील दोन्ही विधाने बुद्धिवादी मंडळी अनेकदा करतात.मी श्रद्धाळू वगैरे नसलो तरी मला ही विधाने पटत नाहीत.का पटत नाहीत ते सांगतो.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जडवाद' या पुस्तकाचा संदर्भ मी घेत आहे. पृष्ठ ३२ वर त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, अचेतन व अजीव द्रव्यातून जाणीवयुक्त सचेतन पिंड निर्माण होतो.द्रव्यात प्रथम जीव निर्माण होतो आणि नंतर जाणीव निर्माण होते.पृष्ठ ६३ वर ते म्हणतात की, ‘विश्वाच्या गतिस्थितीला परमात्म्याची गरज नाही. कारण प्राण्याच्या व मनुष्याच्या देहात पृथक् चैतन्य वस्तू आहे याला कोणतेच प्रमाण उपलब्ध होत नाही.या चैतन्य वस्तूवरूनच विश्वचैतन्याची ‘उत्पत्ति' होते. (उत्पत्तीऐवजी ‘कल्पना उत्पन्न वाचावे असे शुद्धिपत्रात म्हटले आहे)
अणूंच्या गर्भात चेतना तर असतेच म्हणून त्यांना अचेतन म्हणता येत नाही. अणू अजीव, जाणीवविरहित असतात इतके खरे. सृष्टीच्या नियमानुसार अणूंचे मॉलीक्यूल बनतात व हे मॉलीक्यूल विशिष्ट तहेने एकत्र जमले की तिथे तत्पूर्वी नसलेला जीव निर्माण होतो. शास्त्रीबुवांचे प्रतिपादन असे आहे की, जीवसृष्टीची पुढची पायरी म्हणजे चेतन सृष्टी. चेतन म्हणजे जिच्या ठिकाणी बुद्धी किंवा जाणीव आहे अशी सृष्टी. (जाणीव हा शब्द महत्त्वाचा आहे) जीव व नंतर जाणीव निर्माण होण्याची क्रिया सृष्टिनियमानुसार आपोआप होते असे त्यांचे म्हणणे आहे. हा त्यांचा युक्तिवाद आपण पुढे नेऊ.
गर्भाशयात असलेली एक सजीव पेशी. ती दुस-या एका पेशीशी संयोग पावते व मग तिचे विभाजन सुरू होते.एकाचे दोन,दोनाचे चार असे होता-होता लाखो पेशी --सर्व अगदी एकसारख्या - जमून एक पुंज तयार होतो. या पुंजात जीव आहे पण जाणीव नाही असे समजायचे.
लवकरच मग असा एक क्षण येतो की त्या क्षणी त्या पुंजातली कुठली तरी एक पेशी ठरवते की मी डोळा हे इंद्रिय बनवणार. हे तिला आपोआपच निसर्गनियमानुसार समजते ! मग ती पेशी दुभंगते व तिची दोन अधुके-दोन्ही एकसारखीच होतात.त्यांतल्या एका अर्धकाला कळते की आपल्याला डावा डोळा व्हायचे आहे. दुस-याला कळते की आपल्याला उजवा डोळा व्हायचे आहे. मग त्या पुंजात कशी कोण जाणे,पण एक मध्यरेषा ठरवण्यात येते व त्या रेषेच्या डावीकडे एक अधुक सरकू लागते व उजवीकडे दुसरे अर्धक सरकू लागते. हेसुद्धा
आपोआप होत असते ! त्या दोन अर्धकांना हे ठाऊक असते की त्या काल्पनिक मध्यरेषेपासून किती दूर जाऊन थांबायचे. त्याप्रमाणे ती थांबतात.यामुळे चेहरयावरची सिमेट्री साधणार आहे हे त्यांना ठाऊक असते - आपोआपच ठाऊक असते. कारण तिथे जाणीव नाही !
मूत्रपिंड, कान, फुफ्फुसे, किडन्या, वृषण, हात, पाय हे सगळे जोडीजोडीचे अवयव बनवणाच्या पेशी याप्रमाणेच आपल्या कार्याला प्रारंभ करतात. या सर्वांना डावी बाजू कोणती व उजवी बाजू कोणती याचे भान असते आणि त्याबरोबरच सिमेट्रीचेही भान असते. हे भान त्यांना आपोआप येते. जाणिवेचा इथे काही संबंध नाही ! सृष्टिनियमानुसार ही सर्व मांडणी आपोआप होते. प्रत्येक अवयवाच्या पेशीच्या अर्धकांचा एकमेकांत काहीही संपर्क नसता त्यांना सिमेट्रिकल मांडणी कशा तहेने होईल हे आपोआप समजत असते ! कसलीही जाणीव नसताना हे आपोआप समजते ! |
एक डोळा' नावाचे इंद्रिय. त्याच्या घडणीसाठी शेकडो प्रकारच्या पेशी लाखांनी बनवायच्या;त्या योग्य जागी बसवायच्या,सप्त रंगांच्या तरंगांची लांबी ओळखू शकणारे शंकू व शलाका लाखावारी बनवून त्यांची व्यवस्थित मांडणी रेटिनावर करायची ही कामे करण्यासाठी लागणारे आराखडे डोळा बनू पाहणा-या पेशीच्या जीन्समध्ये आलेले असतात. संपूर्ण मनुष्यदेह बनवण्यासाठी लागणारे अब्जावधी आराखडे गर्भाशयातल्या फलित पेशीच्या क्रोमोझोम्सवर असतात, पण त्यांतून डोळ्यांसाठी आवश्यक तेवढेच आराखडे सॉर्ट करून डोळा-पेशीमध्ये घालण्याचे ज्ञान किंवा जाणीव कुठे वावरत असते ? डावा डोळा व उजवा डोळा यांची रचना एकसारखीच असते पण मांडणी कशी आरशातल्या प्रतिबिंबासारखी असते. ही अशी मांडणी करण्याचे भान नेमके कुठे असते ? सिमेट्री राखण्याची जाणीव कोण सांभाळते ? या सगळ्या अॅब्स्टरॅक्ट आयडियाज जर जीन्स सांभाळत असतील तर त्यांच्यात 'जाणीव' नाही हे कसे म्हणता येईल? जाणीव काय किंवा स्मृती काय,एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गर्भस्थ पेशीपुंजात या दोन्ही गोष्टी नाहीत, सर्व काही आपोआप होते या म्हणण्याचा अर्थ तरी काय?
‘आपोआप सर्व काही घडते हे उत्तर ज्योतिषी लोकांच्या सोयीचे आहे. शनीची पीडा कशामुळे होते ? तर ती आपोआप सृष्टीच्या नियमानुसार होते, असे उत्तर ते देतील तर तेही आता मान्य करावे लागेल !
सजीव पिंडाची वाढ पूर्ण होत आली की तिथे जाणीव आपोआपच निर्माण होते. असे शास्त्रीबुवा म्हणतात. पण पृष्ठ ५६ वर त्यांनी दुसरा सिद्धान्त सांगितला आहे तो असा की, संपूर्ण अभावातून सत् वस्तू उद्भवत नाही.एक सत् वस्तू दुसया कोणत्या तरी सत् वस्तूचीच बनलेली असते.
असे जर आहे तर मूळच्या मॉलिक्यूलमध्ये जीव नव्हता, तो नंतर निर्माण झाला किंवा मूळच्या पेशी-पुंजांत जाणीव नव्हती,ती नंतर निर्माण झाली हे म्हणताना तो जीव किंवा जाणीव कोणत्या सत् वस्तूतून निर्माण झाली हे नेमकेपणाने सांगायला हवे. जिवाचा आणि जाणिवेचा मूलस्रोत कोणता? या सत् वस्तू आपोआप सृष्टिनियमानुसार निर्माण होतात' हे या प्रश्नाचे उत्तर नव्हे. एका पेशीपासून प्रारंभ करून संपूर्ण मनुष्यदेह बनवण्याच्या प्रक्रियेत जाणीव या चीजेचा काहीही संबंध नाही.सर्व काही आपोआप होते हे म्हणणे म्हणजे एकतर्हे चा सांप्रदायिक
आग्रह आहे असे म्हणण्यावाचून पर्याय नाही.
माझे म्हणणे असे की, प्रत्येक वेळी अशी न पटणारी उत्तरे देत बसण्यापेक्षा, एकदाच हे मान्य करावे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता असून तिचा अंश सजीवात असतो.या सत्तेला मी ईश्वर,आत्मा वगैरे कसलेच नाव देत नाही.निसर्गातलीच ती एक एंटिटी आहे,बस्स,एवढेच !
दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जाणीव आहे तिथे स्मृतीही आहेच म्हणून स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदू, हे अव्याप्तीचा दोष असलेले विधान ठरते असे माझे म्हणणे आहे. ।
भूत-भविष्य जाणणे कुणालाही शक्य झालेले नाही व होणार नाही असे विधान मी करणार नाही. अमुक गृहस्थ भूत-भविष्य जाणतात असा बोलबाला आपण पुष्कळदा ऐकतो.मी अशा तीन व्यक्तींची परीक्षा घेतली.एकालाही माझे भूत-भविष्य जाणता आले नाही.(जन्मकुंडलीचा संबंध यात खरोखरी काहीच नसतो, पण तसा थोडासा देखावा हे लोक करतात) माझा हा अनुभव माझ्यापुरता खरा आहे. दुस-या कुणाला निराळा अनुभव आला नसेलच हे मी कशावरून ठरवायचे?
जरी भूत-भविष्य जाणण्याची क्षमता कुठे, कुणात असलीच तरी ती त्या व्यक्तीपुरती असणार. त्या क्षमतेचे शास्त्र बनवून त्याचा प्रसार करणे शक्य नाही - जसा फलज्योतिषाचा प्रसार होत आहे. माझे उद्दिष्ट फलज्योतिषाचे अंतरंग एक्स्पोज करणे एवढेच आहे. भविष्य ‘जाणणायाला’ फलज्योतिषाची किंवा दुस-या कुठल्याच शास्त्राची गरज असू नये हा मुद्दा ध्यानात असू द्यावा.
-------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही काही झेपले नाही. लेख टंकताना वा कॉपी पेस्ट करताना चुका झाल्या आहेत का? शेवटचे वाक्य वाचून तर जामच बुचकळ्यात पडलो
भविष्य ‘जाणणायाला’ फलज्योतिषाची किंवा दुस-या कुठल्याच शास्त्राची गरज असू नये हा मुद्दा ध्यानात असू द्यावा.
जाणणायाला म्हणजे काय? ते अवतारणात असले तरी काय समजेना. कुठल्याच शास्त्राची गरज असू नये म्हणजे काय? भविष्य जाणण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का शक्य असले तरी ते करू नये का शास्त्राची गरज नसून ते आपोआप समजणार आहे?

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण>>>

हे पुस्तक फलज्योतिष विश्वास ठेवण्यालायक आहे की नाही यावर भाष्य करते का? शेवटचा परिच्छेद वाचून नाही यावरच भाष्य करते असा समज झालाय.

लेख वाचून डोके जड झाले. त्यातून अर्थ निघाला तो हाच की सगळे आपोआप होते असे बुद्धिवादी मानतात ते चूक आहे. काहीही आपोआप होत नाही, त्या मागे काहीतरी शक्ती आहे. तुम्हाला आवडत नसल्यास त्याला देव म्हणू नका एवढेच. ज्यांना आवडते त्यांनी त्या शक्तिला देव नाव दिलेय.

आता हे असेच आहे असे रिसबुडांना म्हणायचंय की ही सगळी अफवा आहे, प्रत्यक्षात असे काहीही नाही; तद्वत फलज्योतिष हीसुद्धा अफवा आहे, प्रत्यक्षात असे काहीही नाही असे त्यांना म्हणायचंय?

याचा संबंध फलज्योतिष्याशी कसा लागतो हे कळले नाही. किंवा यामुळे बुद्धिवादी पंथ कसा बनतो हे कळले नाही.

साधारण असल्या गहन विषयांच्या चर्चेत असेच गोल गोल भाष्य केलेले असते, ज्यातून (माझ्यासारख्या) सामान्य बुद्धीच्या लोकांना ठोस असे काही कळत नाही हा माझा नित्याचा अनुभव आहे.

मी असे गृहीत धरतो की रिसबुडांविषयी माहिती देणारा लेख प्रथम वाचला आहे.
टवणे सर, जाणणार्‍या असे पाहिजे . त्याचा अर्थ असा कि भविष्य जाणणे जर शक्यच असेल एखाद्याला तर त्याला फलज्योतिष किंवा अन्य अशा शास्त्रांची गरज नाही.
साधना, रिसबूड हे कठोर फलज्योतिष चिकित्सक होते . फलज्योतिष विश्वासार्ह नाही हे सांगण्यासाठी अंतरंग दाखवणे हे कार्य होते
आपल्याला ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकात त्याचा उहापोह पहायला मिळेल.

त्या शक्तीला ( देव म्हणा हवे तर..किंव्हा निसर्ग शक्ती फरक काही पडत नाही ) जाणून घेणे म्हणजे एक हत्ती आणि सात आंधळे..
त्यातील एक तुम्ही तर एक मी.. संपूर्ण हत्ती कुणी पाहिलाय ?

घाटपांडे, मी तुम्ही उल्लेखलेला लेख वाचला नाही. तुमचे ज्योतिषकडे... यातले थोडे फार वाचले आहे.

त्याचा अर्थ असा कि भविष्य जाणणे जर शक्यच असेल एखाद्याला तर त्याला फलज्योतिष किंवा अन्य अशा शास्त्रांची गरज नाही.>>>>

का गरज नाही? ज्याने पुस्तक लिहिलेय तोच केवळ कुठल्याही शास्त्राशिवाय त्याच्या पुस्तकात काय लिहिले हे जाणू शकेल. त्याच्याव्यतिरिक्त कुणाला ते माहीत करून घ्यायचे तर कसलातरी आधार लागणारच. त्याप्रमाणे ज्योतिषी फलज्योतिषाशास्त्राचा आधार घेऊन भविष्य सांगतात.

मी ज्योतिष समर्थक नाही पण मी ते शास्त्र नाकारतही नाही. ज्योतिषी त्याच्या कुवतीनुसार अंदाज वर्तवतो. ज्याने शक्य तितक्या पेरम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स लक्षात घेतल्या, तितके त्याचे अंदाज अचूक. माझा अभ्यास नाही पण आलेल्या अनुभवांवरून हे मत तयार झाले आहे.

रिसबुडांना त्यांचे भूत अचूक सांगू शकणारा ज्योतिषी भेटला नाही याचे आश्चर्य वाटले. कारण बहुतेकांचा अनुभव भूत बरोबर सांगितले हाच असतो. याला परत तेच कारण, भूत काय आहे याविषयी ज्योतिषी अंदाज वर्तवतो. आपण त्याच्या 4 अंदाजांपैकी 1 मान्य करतो व आपल्याला वाटते की 100 टक्के खरे सांगितले. जे भुताबाबत तेच भविष्याबाबत. एखाद्याचा अंदाज निघतो अचूक.

मी त्यांचे पुस्तक वाचले नाही त्यामुळे अजून काही बोलणे उचित नाही. त्यांचा अभ्यास निश्चितच भरपूर आहे. त्यांनी जे लिहिले ते मला नीटसे कळले नाही हा माझा दोष.