कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

Submitted by प्रकाश घाटपांडे on 30 May, 2013 - 03:39

Risbud
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद पुस्तकाच्या प्रकाशनावेळी
डावी कडून डॉ नरेंद्र दाभोलकर, कै. माधव रिसबूड, ज्योतिर्विद नंदकिशोर जकातदार, लेखक प्रकाश घाटपांडे

माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'.
किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला.

डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले.

"राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे."
फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला.

रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले.
नाडी भविष्य आणि रिसबूड

त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत.

शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे?

श्रद्धेचा दुसरा भाग

श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला.

पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका
अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक.

शेवटचा लेख
फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो.

( पुर्वप्रकाशित मनोगत दिवाळी २००७)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. >> ज्योतिषाच्या वाटेला न जाण्यासाठी, किंबहुना त्याचा किळस येण्यासाठीं, केवळ हा एकच मुद्दासुद्धां माझ्या मते पुरेसा आहे ! कोणत्याही प्रस्थापित शास्त्रालाही १००% खात्रीलायक पुरावा असल्याशिवाय एकाही आयुष्यावर असा छाप मारण्याचा अधिकार असणं घृणास्पद ठरावं मग तथाकथित ज्योतिषशास्त्राचं काय घेवून बसायचं !!

आमच्या बाजूच्या ऑफिस मध्ये एक मुलगा कामाला होता, त्याची गर्लफ्रेण्ड त्याला भेटण्या साठी रोज त्याच्या ऑफिसमध्ये यायची. जवळपास ३ वर्षे हा प्रकार चालू होता. एकंदरीत चांगल चाललं होत. आणि त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं सुध्दा. पण अचानक त्या मुलाला कुठून दुर्बुद्धी झाली कोणास ठावूक. प्रेमवीर साहेबांनी मुलीची पत्रिका बनवून घेतली ज्योतिषाकडून. आणि व्हायचे तेच झाले, मुलीला मंगल होता.

त्या दोघांचे जोरदार भांडण झाले आणि तेही ऑफिस च्या बाहेर. प्रेमवीराने तिच्यावर हात सुद्धा उगारला, आणि तिला ढकलून दिले, अगदी संपूर्ण ऑफिस staff च्या समोर. त्याला कामावरून काढून टाकण्यात आले.

एक चांगलं नात निर्माण होता होता त्याला अर्ध्यावरच पूर्णविराम मिळाला.

<<तेच ते लेखन एका स्थळावरून दुसरी कडे... मग तिसरी कडे मग अति शिळे झाल्यावर येथे!>>
लेखन शिळे होत नसते असे मी मानतो. वाचकवर्ग मात्र बदलतो. आता ज्यांनी प्रथमच हे लेखन पाहिले आहे असा वर्ग मायबोलीवर असणार आहे. ज्यांनी हे लेखन पुर्वी वाचले आहे त्यांना परत ते न वाचण्याचा पर्याय उपलब्ध असतो. प्रतिसाद न देण्याचाही पर्याय उपलब्ध असतो. काही ठिकाणी पुनरावृत्ती हा दोष असतो तर काही ठिकाणी तो पुनर्प्रत्ययाचा आनंद देतो. अर्थात हे व्यकिसापेक्ष आहे. व्यक्ति तितक्या प्रकृती! असो!

सूनटून्या अत्यंत वाईट घटना मला तर वाटते त्या मुलीला मंगळ नाही आडवा आला, ज्योतिषी आडवा आला. ती कुंडली आडवी आली. इतके लोक कुंडल्या बघून सारे गुण जुळवून लग्न करतात तरी घटस्फोट का होतात? लग्न टिकवण्यासाठी आवश्यक असते एकमेकांवरचे प्रेम विश्वास. पण हल्ली तरुणांचा प्रेयसिपेक्षा ज्योतिषांवर जास्त विश्वास बसत चाललाय. काय होणार आपल्या देशाचे?नको हा प्रश्न विचारायची पण भीती वाटते लगेच कुणी ज्योतिषी यायचा उत्तर द्यायला.

@" कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे." >>> अत्यंत आशयपूर्ण तुलना...

बाकि तुमच्याकडे वाचलेला त्यांचा १ लेख अठवला. जबरीच माणूस होता हा! Happy

हा लेख पूर्वीही वाचला होता. दादांचे काम मोठे होते माहितीये. पण परत परत तोच लेख टाकण्यापेक्षा तुम्ही काय काम करत आहात याविषयी लिहिलेत तर जास्त बरे.

<<पण परत परत तोच लेख टाकण्यापेक्षा तुम्ही काय काम करत आहात याविषयी लिहिलेत तर जास्त बरे.>>
आम्ही त्यांचे कार्य नवनवीन लोकांपर्यंत वेळोवेळी / सातत्याने पोहोचवण्याचे कार्य करीत आहोत. एवढे केले तरी आम्हाला त्यात समाधान आहे. बाकी आम्ही खुप ग्रेट असे आम्हाला म्हणायचे नाही.आम्ही सर्वसामान्यच आहोत.

मला जेवढे दादा माहिती होते त्यावरून त्यांना विषय लोकांपर्यंत पोचवणे, जनजागृती हे महत्वाचे वाटत असे. स्वतःचे नाव वा कर्तुत्व पोचवणे हे नाही.
त्यामुळे दादांच्यावरचा त्रेतायुगात लिहिलेला लेख दर काही वर्षांनी वेगवेगळ्या संकेतस्थळांवर मांडण्यापेक्षा त्यांचे विचार मांडले जाणे, त्यावर चर्चा होणे हे खरंतर त्यांचे काम पुढे नेल्यासारखे होईल.
असे मला वाटले. असो.

या लेखात दिलेल्या रिसबूडांच्या पुस्तकाच्या लिंका पुर्वी च्या मनोगतातील लेखात नव्हत्या.तेव्हा त्याचे डिजिटायझेशन केले नव्हते. जिज्ञासूंना ती पुस्तके आता वाचता येतील. प्रबोधन/ विचार प्रसार यात त्याच त्याच गोष्टी पुनःपुनः सांगायच्या असतात. कारण एक वाचक वर्ग असा असतो कि त्यांच्यासाठी ही माहिती नवीनच असते. जुन्या वाचकांच्या कदाचित विस्मृतीत गेलेला असू शकतो किंवा पुनर्वाचनाने आकलनाची नवी दृष्टी त्याला मिळालेली असू शकते. समजा तसे नसेल तर दुर्लक्ष करण्याचा पर्याय खुला असतोच. रेडिओवर तीच तीच गाणी पुनःपुनः लागत असतात. कुणी पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतो तर कुणी स्टेशन बदलतो वा रेडिओ बंद करतो. अनेक लेखकांची तीच तीच पुस्तके पुन:पुन्हा छापली जात असतात. पुस्तके ज्यांना आवडतात ते पुन्हा वाचतात तर काही लोक ती रद्दीत टाकतात. रद्दीतील पुस्तके घेउन पुन्हा ती कुणी तरी वाचतो.
एखादी लेख / पुस्तक थेट पुढ्यात आणी सहज पणे आले तर ते वाचली जाते असा आमचा अनुभव आहे.

घाटपान्डेजी हा लेख प्रथमच वाचला. व नवीनच माहीती मिलाली. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्याचे महत्व आहेच. तुम्ही लेखन करीत जा बिनधास्त छनपैकी. इथे वेगवेगळया संकेत स्थळांवर तेच तेच लिखाण करणारे बरेच आहेत .त्याना काही बोलायचे नसते इथे. लिहा लिहा इथं काय कोंच्या बाचं भ्या नाही.

धन्यवाद रॉबीनहूड, इथे प्रतिक्रिया देणार्‍यांपैकी बहुसंख्यांनी हा लेख पहिल्यांदाच वाचला होता असे सकृतदर्शनी दिसते.त्यामुळे लेख टाकण्याचे चीज झाले असे मी मानतो. सर्व प्रतिक्रिया अनुकूलच आल्या पाहिजेत असे मी मानत नाही. जो देगा उसका भला जो नही देगा उसका भी भला! व्यक्ति तितक्या प्रकृती असणारच.
सप्टेंबर २००८ चा अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र चा ज्योतिष विशेषांक पाहिला अन माधव रिसबुडांची आठवण तीव्रतेने झाली. माधव रिसबुड २००३ साली निवर्तले.हा लेख खरं तर मी अंनिस वार्तापत्राच्या एका दिवाळी अंकासाठी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबुडांनी ज्योतिष चिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठीकाणी वकीली केली होती. अंनिस चे हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख वार्तापत्राच्या संपादक मंडळाने नाकारला. कारण म्हणे त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होते. मनोगतच्या संपादकांना तसे विरोपाद्वारे मी कळविले होते. अंनिस वार्तापत्राने हा नाकारलेला लेख मनोगत च्या दिवाळी २००७ च्या अंकात जालावर प्रसिद्ध झाला आणि ख-या अर्थाने रिसबुडांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे वाटले
रिसबूड माझे गुरुतुल्य जेष्ठ मित्र असल्याने कदाचित त्यांच्याबाबत मी अधिक संवेदनशील असू शकतो. मी ज्यांना आदरणीय मानतो त्यांना इतरांनी ही आदरणीय मानले पाहिजे असा माझा कधीही आग्रह नसतो.

बाकि सर्व लेख वाचला, त्यात नविन काहीच नाहीये! Happy असो प्रचाराचा प्रयत्न तर चान्गला आहे, शुभेच्छा!
शेवटच्या परिच्छेदातील हे वाचताना......
>>>>> काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो. <<<<<
आठवले, की मी ज्या जोतिषविद्यालयात शिकत होतो तिचे संस्थापक, अन अर्थातच माझे "गुरू"स्थानि असलेले कै. श्री. काकासाहेब अवचट यान्नी १९९० मध्ये अशाच एका भेटीत त्यांचे स्वतःच्या मृत्युचे भविष्य सान्गितले होते की पुढील सिहंस्थ ते पाहु शकणार नाही. त्यानन्तरचा सिहंस्थ लागायचे काही दिवसच आधी त्यान्चा मृत्यु झाल्याची छोटीशी बातमी पेपरमधे वाचली.
तुलना करायचा हेतू नाही, पण ती होतेच, तेव्हा, कोण कुठे स्वतःचा कोणता लेख शेवटचा की अजुन कितवा हे देखिल सान्गू न शकणारे अन तरीही ज्योतिषाबद्दल खरेखोटे ठरवू पहाणारे, अन कुठे आमचे ज्योतिषी भविष्यवेत्ते "गुरू" जे स्वतःचा मृत्यु अमुक सिहंस्था आधीच होणार हे ठामपणे सान्गून तसेच प्रत्यक्षात घडून येणे.
या माझ्या गुरून्नीच याच भेटीत मला माझे आयुष्यात पुढील वीस वर्षात घडणार्‍या अत्यंत महत्वाच्या अनपेक्षित घटनान्बद्दल अत्यंत स्पष्ट शब्दात सान्गितले होते, ते जसेच्या तसे घडले. आयुष्यातील या बाबी खाजगी स्वरुपाच्या असल्याने त्या उघड करता येत नाहीत, पण यामुळेच ज्योतिषशास्त्र विरोधकान्चे मात्र चान्गलेच फावते हा माझाही एक सल आहे. असो.

तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा Happy

>>>" कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे." >>> उत्कृष्ट वर्णन.

समाजातील पुरोगामी लोक साथ देत नसल्याने निराश होत प्रत्येक वेळी रिसबूड सर ठरवीत कि हा आपला शेवटचा लेख. पण समाजसुधारणेची तीव्र तळमळ असल्यानेच ते पुन्हा लेख लिहित ह्याला म्हणतात समाजाची खरी काळजी. भोंदू ज्योतीश्यांकडून नाडला गेलेला समाज बघून असे समाजसुधारक कितीही निवृत्त व्हायचे ठरवले तरी होवू शकत नाहीत हे दिसून आले. समाजाला आज अशाच विद्वान लोकांची गरज आहे.

तुमच्या पुढील लेखनास वरवरच्या नाहीत मनापासून शुभेच्छा