मायबोली गणेशोत्सव २०१८ _ संयोजन _अनुभव

Submitted by किल्ली on 14 October, 2018 - 12:18

आमच्या पुण्यातल्या घरी गणपती बसत नाहीत. त्यामुळे मी माबोवरच्या ऑनलाईन गणेशोत्सवाची अगदी घरी गणपती बाप्पा येणार ह्या भावनेने वाट पाहत होते. येणार येणार म्हणत असतानाच तो दिवस आला! माबो प्रशासनाने संयोजक मंडळात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांची नावे मागवली होती आणि सहभागी व्हा असे आवाहन केले होते. अधाशासारखं मी त्या बाफवर पहिला प्रतिसाद देत माझं नाव नोंदवून घ्या अशी विनंती केली. आपली मंडळात निवड होईल की नाही ह्याबद्दल मी साशंक होते ह्याबाबतीत पुढे काय करायचे ते न समजून फक्त वाट पाहणे हातात असल्यामुळे विसरून गेले. एके दिवशी वेमा ह्यांचा 'गणेशोत्सव मंडळ २०१८ मध्ये स्वागत' असा धागा प्रकाशित झाला आणि त्यांनी ह्या वर्षीच्या तसेच मागील वर्षीच्या ग्रुपचे सभासदत्व दिले. पटापट सगळी अनुभवाची पाने वाचून काढली. तरी पुढे काय करायचे ते समजेना. एकीकडे 'स्वागत' धाग्यावर मंडळातील कार्यकर्त्यांची ओळख परेड चालू होती. खरेच, अगदी वैविध्यपूर्ण कोशल्ये असणारी मंडळी टीमध्ये आली होती.

गणेशोत्सव संयोजन मंडळ २०१८ :
१. किल्ली (पल्लवी: आयटी अभियंता)
२. अतरंगी (मनोज: व्यवसाय )
३. अभ्या (अभिजीत: ग्राफिक डिझायनर, व्यवसाय)
४. आसा (आबासाहेब: मेकॅनिकल अभियंता , असिस्टंट मॅनेजर)
५. शाली (पद्मनाभ: मेकॅनिकल अभियंता, व्यवसाय)
६. अक्षय: (मेकॅनिकल अभियंता)
७. दीवः दीपक
८. प्राजक्ता शिरीन
९. प्रीती
१०. चिमु

गप्पा सुरु झाल्यावर असे लक्षात आले की सगळेच कार्यकर्ते नवीन आहेत आणि कोणालाही संयोजनाचा अनुभव नाही. मग ह्या परिस्थितीत काय करावे बरे अशा विवंचनेत असताना वेमा देवाप्रमाणे धावून आले आणि त्यांनी बेसिक गोष्टी समजावून सांगितल्या. अक्षय ह्यांचा प्रतिसाद आला आणि असे समजले की त्यांनी २०१७ च्या मंडळात काम केले आहे आणि त्यांना संयोजनाचा व्यवस्थित अनुभव आहे. आता कुठे आम्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

ओळखी झाल्यानंतर आम्ही कोणते उपक्रम आणि स्पर्धा घ्यावात ह्यासंबंधी कल्पना सुचवायला सुरुवात केली. कल्पना तर बऱ्याच सुचत होत्या पण त्या अमलात आण्याव्यात का? हा मुख्य प्रश्न पडला होता. कारण एकच, 'रिस्पॉन्स'. माबोकरांना काय आवडते ह्याचा विचार करून जास्तीत जास्त सोपं आणि तरीही नवीन असं काहीतरी शोधण्याकडे मंडळाचा कल होता. आतापर्यंत सगळी चर्चा माबोवरच्या संयोजनाच्या खाजगी पानावरच होत होती. सगळ्यांना ह्या पानावर एकाच वेळी येणं कठीण असल्यामुळे, कामास वेग यावा आणि मन्डळाचा एकमेकांबरोबर संवाद वाढावा ह्या हेतूने 'कस्काय ग्रुप'(whatsApp) ची स्थापना झाली. इथून पुढे सगळी चर्चा तिथेच होणार होती. कस्काय ग्रुप मध्ये अवांतर नको आणि तसे झाल्यास कान पकडण्यासाठी म्हणून Light 1 वेमा ह्यांना सुद्धा समाविष्ट करण्यात आले. अर्थात सगळेच उत्साही असल्यामुळे तशी वेळ आली नाही. Proud

छोट्या दोस्तांसाठी रंगपेटी हा उपक्रम हा सर्वात आधी निश्चित झाला. पुढचा नंबर होता पाकृ स्पर्धेचा! उपासाचे पदार्थ बनवायचे, तेही खूप कॉमन असणारा साबुदाणा आणि वरई वगळून असं ठरलं. अतरंगी मात्र सॅलडचे खंदे समर्थक होते(आहेत, राहतील Happy Light 1 ). त्यांनी सॅलड स्पर्धा ठेवूयातच असे सुचवले.एक थीम 'आऱोग्यदायी' आणि दुसरी 'उपास असूनही खादाडी' अश्या variety वाल्या थॉट प्रोसेसने पाककृती स्पर्धा फायनल झाल्या.

ह्याचप्रमाणे बरीच खलबतं करून व्यक्तिचित्रण, माझ्या मते ह्या स्पर्धा ठरवण्यात आल्या. माबोकरांना सल्ले द्यायला आवडतात हे तर वैश्विक सत्य आहे. हे झालं तर असं होईल, ते केलं असत तर बरं झालं असतं वगैरे., ह्या तथ्यास अनुसरून माझ्या मते ही स्पर्धा ठेवली होती.

सर्व स्पर्धांच्या आणि उपक्रमाच्या नियमांवर चर्चा करून मसुदे लिहिण्यात आले. तसे पाहता 'मसुदे लिहिण्यात आले' हे फक्त एक वाक्य आहे पण ह्या वाक्यामागे बरीचशी कृती दडली आहे हे मंडळालाच माहित! खरे तर मसुदा म्हणजे स्पर्धा/उपक्रम ह्यांची पूर्ण नियमावली असते. त्यात भाग घेण्यासाठी लागणाऱ्या माहितीचे क्रमवार विवेचन केलेले असते. त्यामुळे मसुदा हा संयोजन मंडळाचा आणि माबोकरांच्या संवाद घडवून आणण्याचा मार्ग म्हणता येईल.

प्रकाशचित्रे म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय! झब्बूचा खेळ आपण दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी ठेवला. त्यात सगळ्यांनी मिळून विषय ठरवले.
'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ' ह्या संत तुकारामांच्या उक्तीला अनुसरून साहित्यप्रेमी माबोकरांसाठी शब्दांचा खेळ ठेवण्यात आला. नेहमीचाच आणखी एक लोकप्रिय उपक्रम म्हणजे 'एसटीवाय'. ह्यात संयोजकांनी दिलेल्या अर्धवट कथेला वाचक एकेक करून पूर्ण करतात. त्यासाठी विविध शैलीतील कथा लिहून घेतल्या आणि वाचकांना पूर्ण करण्यासाठी दिल्या गेल्या.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत गणेशोत्सवाची मजा वाढवणार होती ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 'टीझर्स'! अभिजीत ह्यांनी सुंदर सुंदर पोस्टर्स आणि बाप्पाची आरास बनवून गणेशोत्सवाची शोभा कैकपटीने वाढवली. त्यांना साथ देत, तितक्याच समर्थपणे शाली ह्यांनी पोस्टर्स, प्रशस्तिपत्रे आणि रिक्षा फिरवण्यासाठीच्या जाहिराती बनवल्या.

वेळोवेळी धागे काढणे, ते सार्वजनिक करणे, वेमा /ऍडमिन ह्यांच्याशी संपर्क करणे आणि ईतर तांत्रिक बाबी ह्यात ईतर सर्वांच्या मागे लागून काम करून घेणे हेही आलं बरं का Light 1 ) अक्षयने व्यवस्थित हाताळल्या.

ह्यावर्षी आम्हाला जाणवलेल्या काही बाबी आणि सुधारणा करण्याजोग्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:
१. स्पर्धा ठरवताना नियम सोपे असावेत हाच नेहमी सयोजकांचा प्रयत्न असतो, असावा. नियम सोपा ठेवण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्तीत जास्त सदस्यांना भाग घेता यावा. यावर्षी आमची संयोजक टीम "माझ्या मते" हा उपक्रम समजवायला कमी पडली किंवा आम्हाला जे मांडायचं होतं ते निट सर्वांपर्यंत पोचवता आलं नाही. परिणाम, एकही प्रवेशिका आली नाही. ही फक्त एक नोंद आहे, पुढील वर्षीच्या संयोजक मंडळाला काम करताना उपयोगी येईल.
२. पाककृती स्पर्धा हा गणेशोत्सवाचा मुख्य भाग आहे म्हणायला हरकत नाही. सगळ्यात जास्त किस ह्याचे नियम ठरवताना पडतो. पाककृतीला कधी खुप प्रवेशिका येतात तर कधी अगदीच बोटावर मोजण्याइतक्या. पण हा भाग गणेशोत्सव मध्ये हवाच.
स्पर्धांसाठी तयारीला वेळ मिळावा म्हणून त्या आधी जाहीर कराव्यात.
३. रिक्षा फिरवण्या बाबत
मायबोलीच्या नविन आवृत्ती मध्ये जास्तीत जास्त जण ग्रुपमध्ये नविन हा पर्याय वापरत असल्याने संयोजन ग्रुपमधले धागे सर्वांना दिसत नाहीत. ह्यावर टेक्निकली काहीही पर्याय नाही. संयोजन ग्रुप हा संयोजक मंडळापुरता असल्याने इतरांना त्या ग्रुपमधील धागे दिसत नाहीत. ह्यासाठी उपाय:
- वेबमास्तर किंवा ऍडमिन यांना सांगून आलटून पालटून हेडर मध्ये धागे ठेवावेत.( हेडर मध्ये २ पेक्षा जास्त धागे ठेवता येत नाहीत म्हणून आलटून पालटून)
- सतत वाहत्या बाफ वर रिक्षा फिरवत राहणे.
- बरेचजण ह्या वाहत्या बाफचे सदस्य नसतात तेव्हा त्याला उपाय म्हणून आपली मायबोली ग्रुप मध्ये सर्व स्पर्धेची लिंक असलेला धागा काढून पब्लिक करावा.
४. नेहमीचे यशस्वी बाफ
- स्पर्धेव्यतिरिक्त रोजच्या रोज खेळता येईल असे खेळ ठेवावेत.
- झब्बू हा लोकप्रिय प्रकार असला तरी त्याची लोकप्रियता ही काय विषय दिलाय त्यावर अवलंबून आहे. झब्बू ठेवताना सहज फोटो उपलब्ध होतील असे विषय ठेवल्यास प्रतिसाद मिळेल/मिळतो.
- यंदा STY ह्या उपक्रमास ह्यावर्षी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.ह्याची कारणे शोधून त्यावर विचार व्हायला हवा.

कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गरज असते ती टीमवर्कची! सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून, मिळून काम करण्याची!
आम्हाला सगळ्यांना टीममध्ये काम करताना खुप मजा आली, पडद्यामागे चर्चा झडल्या, गप्पा रंगल्या, प्रसंगी वादविवादही झाले. मायबोलीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्षात एकदाही एकमेकांना न भेटता गणेशोत्सवाचे संयोजन पार पाडता आले. अशा ह्या आधुनिक, सर्वव्यापक गणेशोत्सवात संयोजक म्हणून काम करावयास मिळाले हे मी माझे भाग्य समजते. जे काही थोडंफार काम केलंय ते सर्व बाप्पाच्या चरणी अर्पण!

गणपती बापा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली, छान लिहीलाय अनुभव. काही वर्षांपूर्वी यातून गेल्यामुळे, वाचताना बर्‍याच वेळेला "अगदी अगदी" असे झाले.

छान मांडला आहे अनुभव. प्रथमच एखाद्या उपक्रमात भाग घेऊन तो यशस्वीरीत्या पार पाडण्यात एक वेगळाच आनंद असतो.

यावर्षी आमची संयोजक टीम "माझ्या मते" हा उपक्रम समजवायला कमी पडली किंवा आम्हाला जे मांडायचं होतं ते निट सर्वांपर्यंत पोचवता आलं नाही. परिणाम, एकही प्रवेशिका आली नाही. >> ही कल्पना अर्धी कच्ची आहे हे सांगायचा प्रयत्न केला होता. ती पुन्हा चर्चा करून स्पष्ट करावी असे ही सुचवले होते.. कल्पनेत काय बदल करता येईल त्याची उदाहरणे सुद्धा दिली होती. पण बहुधा मंडळ आपल्याच कल्पनेच्या प्रेमात बुडाले असल्याने त्यातला फोलपणा दाखवून सुद्धा त्यांनी तो लक्षात घेतला नाही. Wink
त्यात पुन्हा "किती सोपी कल्पना आहे, आम्हाला तर कळाली. प्रश्न विचारून उगीच पिसे का काढता?" वगैरे प्रतिक्रिया देणार्‍या आरंभशूर लोकांनी लिहायच्या नावाने मात्र अपेक्षेप्रमाणे शंख केला तो केलाच. Lol

आराशी पासून ते प्रमाणपत्रा पर्यंत, यावेळचे ग्राफिक्स डिझाईन मात्र अतिशय सुंदर होते.

यशस्वी उपक्रमाबद्दल मंडळाचे अभिनंदन. लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्द्ल अनेक आभार. वेळ काढून उपक्रम घडवून आणल्या बद्दल मंडळातील सगळ्यांचे कौतूक वाटते आहे.

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि धन्यवाद. माझा सहभाग फार नसला तरी अशा वेळेस माबोवर तयार होणारे उत्सवी वातावरण आवडते.

"माझ्या मते" करता मला लिहायचे होते पण गडबडीत असल्याने तो फोकस मिळाला नाही. त्याची व्याख्या loosely defined असणे हा प्रॉब्लेम होता असे वाटत नाही. मला वाटत नाही की त्याच्यामुळे प्रवेशिका आल्या नसतील. इतर काही कारणे असू शकतील. संयोजकांना "माझ्या मते" म्हणजे नक्की काय लिहायचे आहे असे इतरांकडून प्रश्न आले का कल्पना नाही.

व्यक्तिचित्रणातील लेख आवडले. रिक्षा फिरवण्याच्या बाबतीत संयोजक मंडळ कमी पडले वगैरे असे अजिबात वाटले नाही. ठळकपणे गणेशोत्सवाशी संबंधित बाफ दिसत होते सतत.

तर एकूण छान झाला गणेशोत्सव.

पहिल्यांदा आराशीच्या कौतुकाबद्दल धन्यवाद मंडळी,
मिपावर इतकी वर्षे बॅनर आणि अंकांची मुखपृष्ठे केल्यानंतर मायबोलीवर(जरी सदस्य खूप आधीपसून असलो तरी) ग्राफिक डिझाईन करण्याची हि पहिलीच वेळ.
ग्राफिक डिझायनिंग ह्याच व्यवसायामुळे आणि अनुभवामुळे काम करणे कठीण वाटले नाही पण नेमकी माझ्या व्यवसायातील व्यग्रतेची हिच वेळ असल्याने डेडलाईनची थोडी अडचण जाणवली. अर्थात ह्याचा अंदाज होताच. सर्व काम फोटोशॉपमध्येच पार पडले. प्रत्येक संस्थळाची एक प्रवृत्ती असते, माबोकरांना माझे काम आवडेल का नाही हि धाकधुक होती पण जे झाले त्याचे कौतुक झाले. शाली, किल्ली, अक्षय आदि संयोजक मंडळीनी वेळोवेळी मदत करीत, पाठपुरावा करीत आणि सूचना करीत जो मैत्रीचा पूल बांधला त्याबद्दल धन्यवाद.
अ‍ॅमी, फारेण्ड, हाब सारख्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी कामाची पावती दिली, भरुन पावले.
धन्यवाद.

धन्यवाद शुगोल, अभ्या..., द्वादशांगुला, राया, हायझेनबर्ग, फारएण्ड , गोल्डफिश, शाली, समाधानी, दक्षिणा Happy
_/\_