दोन चवी एक चूल (ग्रीस ३)

Submitted by Arnika on 4 October, 2018 - 14:27

“तुझी खास माणसं ग्रीसमध्ये असताना तू अनोळखी घरी राहून काम का करत्येस? हवं तिथे फिर, हवं तितकं लिही, पण आमच्याच घरी राहा.” अरिस्तेयाचे बाबा म्हणाले. अरिस्तेयाशी दहा वर्ष मैत्री असूनही मी भलत्याच गावात जाऊन राहायचं ठरवलं ते त्यांना रुचलं नाही. त्यांच्या घरी राहायला मी एका पायावर तयार झाले असते! का नाही आवडणार एकामागोमाग एक संग्रहालयं, शहरं, दऱ्या-डोंगर आणि भग्न वास्तू पालथ्या घालायला आणि दिवसाच्या शेवटी प्रेमाने आपली वाट बघणाऱ्या चार माणसांमध्ये परत यायला… पण सुरेख निसर्ग, इतिहास आणि जेवण जगात सगळ्याच देशांना मिळालंय. तिथल्या सावलीच्या बाहेर उडी मारली तरच त्या निसर्गाला ताजेपणा येतो, इतिहासाला चव येते आणि जेवणाला जिवंतपणा येतो. हाताशी काम असलं की दिवस बेताल होत नाही. शिवाय कबूल केलं-न केलं तरी मला हे जाणवायला लागलं होतं की आपल्या माणसांमध्ये राहून, एकेकटीने प्रवास करून, सवयीच्याच भोवतालात वावरून नकळत स्वतःच्याच आवडीनिवडी आणि पद्धती नको तितक्या महत्त्वाच्या वाटायला लागतात. अनोळखी घर आणि माणसं असतील तेव्हा तो साचा कितपत वितळतोय हेही मला बघायचं होतं.

माणसं स्वच्छ, प्रेमळ आणि कष्टाळू असली की माझ्यासाठी पुरेसं आहे या विचाराने मी दीमित्राचं, आमच्या मालकिणीचं, घर निवडलं. खाण्यापिण्याच्या बाबतीत माझी खरंच तक्रार नसते त्यामुळे मला फारशी चिंता वाटत नव्हती. अमुक एका पद्धतीचंच जेवण हवं, तमक्या भाज्या आवडतच नाहीत असं माझं होत नाही (सेहत का राज़), पण स्वयंपाक करतेवेळी आणि जेवणाच्या वेळांच्या बाबतीत शिस्त नसली की माझं डोकं फिरतं. वेळेवर आवरत नाही म्हणून दुपारचं जेवण अडीच वाजता आणि रात्रीचं दहा वाजता अशी सवय ज्या घरी असते तिकडे मला वेड लागायची वेळ येते... आता ज्याला माझा एकमेव हट्ट म्हणता येईल तोच माझ्या आणि दीमित्राच्या घरातला सगळ्यात मोठा फरक निघालाय. घ्या. मोडा साचे!

काम सकाळी लवकर सुरू होऊन दोन वाजता संपतं, त्यामुळे अडीचशिवाय जेवणाचा विषयच नसतो. ते झट्कन जमलं. पण रोज रात्री नऊ-दहा वाजवूनच तोंडात घास जाणार हे मला जमेना. दिवसभर काम झाल्यावर रात्रीचं जेवण एकटीने जेवायची मुभा मी आठवड्याभरानंतर मागितली आणि सात वाजता सगळ्यांचा स्वयंपाक करून लवकर जेवायला लागले.

सिक्यामध्ये स्वयंपाक करण्यासारखं सुख नाही! या घरात कडधान्य, गव्हापासून बारीक रव्यापर्यंत सगळे प्रकार, ग्रीसमध्ये होणारा गोल-गोल तांदूळ, त्यांचे नेहमीचे मसाले, ताज्या भाज्या आणि हंगामी मेवा हवा तेवढा असतो. सिक्याच्या भाजीबाजारात तीन तास सहज काढता येतील असा देखणा प्रकार आहे तो. इतक्या वेगळ्यावेगळ्या आकाराच्या शेंगा मिळतात की मी स्वतःलाही शेंगेसारखी म्हणायला कमी करणार नाही! कुठलाही मासा असो, त्याला अंगची चव आहे. जरासं मीठ आणि जरासं आंबट एवढ्यावर जेवण गाजवतील असले दोडके, फरस्बी आणि सिमला मिरच्या मिळतात. एवढी चव घेऊन उपजलेल्या भाज्या मला आजवर फक्त कोल्हापुरात खाल्ल्याचं आठवतंय.

इथलं खाणं साधं म्हणजे किती साधं! रोजच्या जेवणात दही, एखादी तळून ठेवलेली चीजची लादी, ताजा पाव, पालकाचे समोसे, ग्रीक सॅलड, आणि भात/दलिया/मासा/पास्ता असा एकच मोठा पदार्थ. कधीतरी टोमॅटो-दोडक्याची भजी असतात. कोलंबी आणि फेता चीजचा रस्सा असतो. टेबलवर मध्यभागी असोले अक्रोड आणि सगळ्यांसाठी ठेवलेला अडकित्ता असतो. गोड म्हणून दाट मध आणि अंजीर. तिखटा-मिठाच्या पदार्थावर चांगली अर्धी वाटी लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल आणि बाल्सामिक व्हिनेगर असतं. पदार्थ संपत आला की लुसलुशीत पावाचे तुकडे त्या तेल-लिंबात बुडवून खायला लहान मुलांच्या रांगा लागतात. आणि यांचा क्रिथाराकी नावाचा गव्हल्यांसारखा पास्ता मी जन्मभर रोज खाऊ शकेन इतका दैवी आहे!

तीळ, अख्खे मसूर, छोले वगैरे यांच्या जेवणात छान भाजून घेत नाहीत त्यामुळे पदार्थ खमंग लागत नाहीत. न भाजलेल्या, न भिजवलेल्या डाळींच्या उसळी नि कोशिंबिरी अगदीच बेसिक लागतात. न भाजलेल्या तिळाची चिक्की मरणाची चामट होते. छोल्याचे दाणे पाण्यासकट अख्खेच्या अख्खे ओव्हनमध्ये तीन-तीन तास शिजवण्यात आणि त्यांच्याबरोबर आत टाकलेल्या भाज्यांचा लगदा होण्यात काय हशील आहे? एरवी हुशार आणि खवय्या असलेल्या देशाने या बाबतीत (न भाजलेली) माती कशी काय खाल्ली आहे काय माहीत!

बाजारातली बारकी वांगी बघून मला एक दिवस आमटीची तल्लफ आली. इथे सहज न मिळणारे पदार्थ शोधत फिरायचं नाही हे माझं ठरलं होतं. गूळ-आमसूल नाही, गोडा मसालाही नव्हता. मग अंजिराचं आगळ गोड म्हणून वापरलं आणि लिंबाचा रस आंबट म्हणून. आज महिना झाला… आठवडा बाजारानंतर वांगी आली की तशीच आमटी करायची पद्धत पडल्ये इथल्या घरी. हल्ली मुगा-तांदुळाची खिचडी होते. उपमा, उकड, बाकी भाज्या आणि बटाट्याच्या काचऱ्याही हिट झाल्या आहेत. मासे-बिसे मी गपगुमान ग्रीकच पद्धतीचे करते. वाटण करून नि मसाले वापरून एवढ्या कष्टाने समाजप्रबोधन नकोच कसं!

गेल्या शनिवारी अकरा माणसांचं रात्रीचं जेवण होतं. पट्टीचे समोसे, दाल तड़का, पुलाव आणि कोशिंबीर केली होती. कौतुकाने जेवून वर डबे घेऊन गेली मंडळी. कार्यघरासारखं स्वयंपाकघर मला एकटीला मिळालं होतं, त्यात केवढीतरी घमेली-पातेली, लोखंडी काविलथे, वाडगी हाताशी होती. वीस-बावीस वर्षांनी नवीन भातुकली मिळाल्यासारखी पुन्हा पुन्हा सगळी भांडी हाताळून पाहिली. तळव्यावर सुऱ्यांची धार फिरवून पाहिली.

तर आमच्या मुदपाकखान्यात सगळं आलबेल आहे. कोकणातल्या मुलीने सहा आठवडे नारळाशिवाय काढलेत इतकंच काय ते गालबोट...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

खुप छान. ग्रिक पद्धतीचे जेवण बनवायला कुठे शिकलात तुम्ही? पालकाचे समोसे, टोमॅटो-दोडक्याची भजी हे नक्की कसे करतात/ दिसतात?

खूप आवडतंय लिखाण
केवळ कोकणातल्या मुलीलाच 'असोले' अक्रोड हा शब्द्प्रयोग सुचू शकतो.
असेच वेगवेगळे अनुभव घेत रहा, लिहित रहा, आम्हालाही कळवत रहा

आपल्या माणसांमध्ये राहून, एकेकटीने प्रवास करून, सवयीच्याच भोवतालात वावरून नकळत स्वतःच्याच आवडीनिवडी आणि पद्धती नको तितक्या महत्त्वाच्या वाटायला लागतात. अनोळखी घर आणि माणसं असतील तेव्हा तो साचा कितपत वितळतोय हेही मला बघायचं होतं. >>>
खूप आवडलं हे वाक्य

पालक समोसे बाबात उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा लेख ही छान.खाण्यावर अजुनएक डीटेलवार लेख पण अपेक्षित आहे. Wink

'असोले' अक्रोड>>>>>> असोले म्हणजे वरच्या आवरण न सोललेले/काढलेले.इथे अक्रोड कवचासहित आहेत, म्हणून असोले.

नारळाशिवाग? अरेरे.. .. फारच हाल. ह. घ्या.

पण , काय नाही होते सवय. सगळ्यात उत्तम आरोग्य असलेले लोकं आहेत असे वाचलेय.

नेहमीप्रमाणे मस्त!!!

फोटो पाहिजेत पण ह्या लेखांमधे, खुमारी अजून वाढेल त्यानी >> + १२३

झकास्स आणि चवीष्ट लिखाण !
जरासं मीठ आणि जरासं आंबट एवढ्यावर जेवण गाजवतील असले दोडके, फरस्बी आणि सिमला मिरच्या मिळतात. >> दोडके अगदी आपल्यासारखे मिळतात ? फोटो टाका अलाऊड असेल तर.

Pages