वेदांमधील अद्भुत विज्ञान

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 October, 2018 - 01:56

आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे ?

सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.

सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे.

ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात.
तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.

१) कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.

आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे कां ???
२)लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.
३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ?

४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे.

५) बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे सुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ??? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ??? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???

६) मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )

७ ) कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल.
या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत. ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीटीशांना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कॉन्क्रीट ठासून भरले.
आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कॉन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.

८) हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.

मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले.

आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.

१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज:
गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो.

११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.
पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.

१२) आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.

१३) प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे.
मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते.
याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो. आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत.

मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा एक छोटा पांथस्थ आहे. मला स्वतःला प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान असा लढा उभा करण्यात काहीही रस नाही.

पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात...
माझा लेख सर्वत्र प्रसारित करण्यास काहीही हरकत नाही..

वैज्ञानिक विचारसऱणी वर आधारित असलेल्या हिंदू धर्मात माझा जन्म झाला याचा मला अभिमान वाटतो .

*संकलित - साभारः सुन्दर मराठी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय आहे ना त्या काळात इंटरनेट नसल्याने लोकं प्रत्यक्षात काम करत होती. आणि त्यांना ह्या सगळ्या अचाट करणाऱ्या गोष्टी करायला जमले. आज कालच्या विद्वानांचा सगळा वेळ इंटरनेट वर पूर्वीचे लोक कसे हुशार होते ते बाकीच्या लोकांना पटवण्यात जातो त्यामुळे त्यांना असा काही करायला वेळ मिळत नसावा असा एक कयास आहे.

मंगल यानाने वराह मिहीर सिद्धांत वापरला याबद्दल काही लिंक असेल तर देणार का? त्याबद्दल कुतूहल आहे

तसेच वास्को द गामा ने कोणार्क मंदिर उध्वस्त केले याबद्दलही वाचायचे आहे, कुपया त्याचीही अधिक माहिती कुठे मिळेल. अंतरजलावर अधिकृत अशी मिळाली नाही म्हणून विचारत आहे

छान माहिती.

आशुचाम्प, मंगळयान प्रकल्पात समावेश असलेले एक शास्त्रज्ञ आमच्या ऑफिसात आले होते. त्यांनी वराहमिहिराचे नाव घेतले होते का हे आठवत नाही पण त्यांनी मोहिमेची खूप माहिती दिली होती. पृथ्वीवरून निघून मंगळावर जाणे हे चंद्रावर जाण्याइतपत अजिबात सोपे नाही. जाणे शक्य होण्याची स्थिती वर्षात काही ठराविक काळ व त्या काळातही खूप कमी वेळ उपलब्ध असते. त्या वेळेस आपला उपग्रह त्या ठिकाणी हजर असणे आवश्यक असते. आपली स्थिती लो बजेट असल्याने ही नेमकी वेळ गाठण्यासाठी खूप गणिती आकडेमोड करावी लागली हे त्यांनी सांगितले. मला जे कळले शेवटी ते हेच की मंगळावर जायचे तर बरोब्बर उलट्या बाजूने बाहेर पडाल तरच तुम्ही कमीत कमी वेळात तिथं पोचाल. Happy Happy

आकडेमोड करावी लागली असणार याबाबत दुमत नाहीच. मलाया वराहमिहीर संदर्भ कुठे सापडला नाही म्हणून विचारलं.

विज्ञानात अद्भुत असं काही नसतं. विज्ञान केवळ विज्ञान असतं, ते वेदांमधलं वेगळं, क्रिश्चॅनिटीमधलं वेगळं, कुराणातले वेगळं, असं काही नसते. जगभरातल्या पुरातन संस्कृतींमध्ये अनेको प्रकारचे तांत्रिक ज्ञान उपलब्ध होते. आजही देशोदेशींच्या आदिवासींमध्ये ते ज्ञान पाहायला मिळते.

आधुनिक विज्ञान म्हणजे नास्तिकांचे धार्मिक मंडळींची देवावरिल श्रद्धा पुसून टाकण्याची चळवळ आहे असे जगातले सर्व धार्मिक पाखंडी पसरवत असतात, त्यासाठी असे गोंधळात पाडणारे दावे आणि अर्धसत्य 'आम्हाला आधीच सगळे माहित होते' च्या थाटात मिरवले जातात. आम्हाला आधीच सगळे माहित होते, तरिही आम्ही बघा कसे धार्मिक आहोत, धर्म कवटाळून आहोत, म्हणजे आम्ही म्हणतो तेच सत्य, आम्ही करतो ती पुर्वदिशा असा समज पसरवणे. हे करुन फायदा काय तर धार्मिक बेवकूफांची बहुसंख्येत असलेली डोकी ह्यांच्या ताब्यात राहतात त्यामुळे.

आधुनिक विज्ञानाला काय फक्त हिंदुत्ववादी सिरफिर्‍यांचा विरोध नाही, कमि आधिक प्रमाणात सर्व्च धार्मिक मुखंडांचा राहिलेला आहे. त्याचे कारण हेच आहे की विज्ञान समजले तर प्रश्न विचारायचा शोध जनसामान्यांस लागेल. त्यातून मग ह्यांची दुकाने बंद होतील.

आधुनिक विज्ञान म्हणजे प्रयोग करुन निष्कर्ष मांडणे. छद्मविज्ञान म्हणजे निष्कर्ष मांडून त्यास सोयिस्कर असे पुरावे शोधणे, नसतील तर तयार करणे, तर्कांची मोडतोड करुन आपले निष्कर्ष योग्य ठरवणे. धर्माधारित विज्ञान (इतका विरोधाभासी शब्दप्रयोग नसेल) हे दुसरे तिसरे काही नसून केवळ आपली दुकाने बचावण्यासाठी चाललेली तडफड आहे.

लेख संकलित साभार असल्याने लेखकाचे आभार मानत नाही.
तसंच लेख वाचून उद्भवलेल्या शंका लेखकाला विचारण्यातही अर्थ नाही.
पण लेखाच्या शीर्षकात वेद आणि पहिलेच उदाहरण कुतुबमिनारचे हे वाचून भिरभिरायला झालं.
वेदांचा रचनाकाळ कोणता आणि लेखातल्या स्थापत्य आदि कला आणि तंत्रांची उदाहरणं कोणत्या काळातली?

मग कुणि भारतीय विद्वान हे जुने वेदातील ज्ञान नि नवीन (पाश्चिमात्यांनी प्रचलित केलेले) विज्ञान याची काही उपयोगी सांगड घालून काही विधायक प्रगति करतील का?

भारतीय म्हंटले कारण भारतीयांना वेद, उपनिषदे समजण्याची शक्यता इतर कुणाहि पेक्षा जास्त आहे असे आपले मला वाटते.

आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात...
<<
लेखक महोदय,

आपली "मती" वापरून आपण या ज्ञानसागरातले नक्की कोणते थेंब मिळवलेत ते जरा सांगा.

सोबतच, ज्यांना जुने ज्ञान = कचरा वाटते, त्यांना हिंदू असल्याची लाज वाटते, हे कसे, ते सिद्ध करा.
"पाश्चिमात्य" ज्ञान म्हणजे नक्की काय? तुम्ही ज्या आयटी कंपनीत गुलामाची नोकरी करता तेच का?

तुम्ही खरे हिंदू असल्याची लाज वाटणारे, म्हणून इन्फेरिऑरिटी काँप्लेक्स अ‍ॅग्रेसिवली डील करणारे, "हिदुत्ववादी", वेद अन प्राचीन ज्ञानातली शून्य माहीती असलेले, मूर्ख श्रद्धाळू लोकांना मूर्ख बनवून तुंबडी भरण्यात इंटरेस्ट असलेले मठ्ठ असावेत असा माझा शास्त्रीय निष्कर्ष आहे.

खरे तर इथे लिहिणार नव्हतो कारण धागाकर्त्याने ज्ञानसागरातले मोती आधीच उचलले असल्याने त्यांच्या ओंजळीत जागा नसणार अशी शंका मनात आली. पण वाचणार्‍यांपैकी काही रिकाम्या ओंजळीचे असतील त्यांच्यासाठी.

वेद, वेदातले 'विज्ञान', उपनिषदे, मग तिथून महाकाव्ये, आयुर्वेद, खगोलशास्त्रातली व गणितातली प्रगती हे बरेचदा वैदिक नावाखाली कोंबण्यात येते. ते अनेक शतकांच्या प्रवासाचे ज्ञान आहे. तसेच ते हिंदू धर्माचे न म्हणता हिंदू (सिंधू) संस्कृतीचे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
मनुष्याच्या (होमो सेपिअन) इतिहासात अनेक खंड-उपखंडांवर कित्येक संस्कृती उन्नत झाल्या व लयासदेखील गेल्या. या प्रत्येक संस्कृतीने ज्ञानसागरात भर घातलेली आहे. हिंदू(सिंधू) संस्कृतीच्या या वारश्याचा अभिमान नक्की असावा मात्र 'लॉटरी/चान्सने' जन्माला आलेल्या व वाढलेल्या एखाद्या धर्माचा वा संस्कृतीचा वृथा अभिमान असणे वा हीच एक संस्कृती महान असणे असे म्हणणे स्वतःला ज्ञानविहिरीत कोंडून घेण्यासारखे होईल.
गणित, तत्वज्ञान विषयात ग्रीक संस्कृतीने मोठी प्रगती केली होती. पायथागोरस, युक्लिड तसेच प्लेटो, सॉक्रेटस प्रभृती आपल्या परिचयाच्या असतात. आज वैज्ञानिक दृष्टिकोण वा प्रगतीला फटकून राहणार्‍या समाज अशी प्रतिमा असलेया मुस्लिम धर्मियांनी या ज्ञानसागरात सातव्या ते अकराव्या शतकात घातलेली भर थक्क करणारी आहे. जर उत्सुकता असेल तर जिम अल-खलिलीचे 'पाथफाइन्डर्स - द गोल्डन एज ऑफ अरेबिक सायन्स' वाचावे. तसेच जोनाथन लिओनचे 'द हाउस ऑफ विस्डम' हे अरेबियन संस्कृतीच्या वैज्ञानिक तसेच सामाजिक/राजकीय /सांस्कृतिक प्रगतीबद्दल. याच संस्कृतीच्या वैज्ञानिक/वैचारिक अधोगतीचे एक मुख्य कारण मानले जाते अल गझाली या धर्ममार्तंडाने धर्माला रुढींच्या व कर्मकांडांच्या चौकटीत जखडून टाकणे. अरब संस्कृतींच्या वैचारीक प्रगतीचा त्यानंतर वेगाने र्‍हास झाला. हे रुढी/कर्मकांडात जखडणे धार्मिक अभिमान गर्वात बदलला की सुलभतेने करता येतं. मध्ययुगातल्या 'रानटी/अप्रगत' समजात जेव्हा रेनेसान्स झाले व धर्माच्या/संस्कृतीच्या बंधनांना आव्हान देत समाज आधुनिक ज्ञानाच्या मार्गावर धावू लागला तेव्हा युरोपीन संस्कृतींनी हनुमान झेप घेत 'प्रगत हिंदु संस्कृती व इतर अनेक संस्कृतींना आपले गुलाम बनवले'. लेनर्ड म्लॉडिनॉव यांचे अपराइट थिंकर्स हे पुस्तक मनुष्यप्राण्याच्या वैज्ञानिक प्रगतीच्या संपूर्ण इतिहासाचा एक उत्तम पण संक्षिप्त आढावा घेते. त्यांचेच दिपक चोप्राबरोबर को-ऑथर केलेले वॉर ऑफ द वर्ल्डव्यु हे पुस्तकदेखील आवर्जून वाचण्यासारखे आहे असे दिसते. मी संपूर्ण वाचलेले नाही, धावती नजर फिरवलेली आहे. यात एक भाग म्लॉडिनॉवनी लिहिला आहे तर एक भाग चोप्रांनी. छद्मवैज्ञानिक विचार व तर्काच्या कसोटीवर खणखणीत वाजणारा वैज्ञानिक विचार यातला ढळढळीत फरक दोघांनी लिहिलेल्या भागातली काही पाने वाचली तरी लगेच लक्षात येतो.

संस्कृतिचा वृथा अभिमान व धर्मावर श्रद्धा प्रगत समाजाला/राष्ट्राला लयास कशी नेते याचे आजची अमेरिका एक बास्केट केस उदाहरण ठण्याची दाट शक्यता आहे. काळच ते सांगेल.

मला या संदर्भात एक कायमच पडत आलेला प्रश्न हा की जरी मानले की हे सर्व पुढारलेपण आपल्या समाजात एके काळी होतं असा जो दावा केला जातो तो आपल्याच लोकांनी का पुढे आणला नाही.

नुसतं आमच्याकडे हे होतं, विमान होतं, अणुबॉंब होता आणि अजून वरती जे ज्ञान उधळले आहे ते सगळं. आपल्या लोकांना हे पुढे का नेता आले नाही.
कुठलाही रिसर्च करायला लागणाऱ्या तीन गोष्टी - वेळ, पैसा आणि चिकाटी. या तिन्ही गोष्टींची भारतात काही कमतरता आहे असे वाटत नाही. मग हे का झाले नसेल

अजून एक मुद्दा:
>>>
तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.
>>>>
तुम्ही सुरुवातीला लिहिले की तुम्हाला विज्ञानाबद्दल चर्चा करायची आहे. पण तुम्ही पुढे जे सगळे लिहिले आहे ते प्रामुख्याने तंत्रज्ञान वा कारागिरी आहे. तंत्रज्ञान वा कारागिरीसाठी त्यामागचे विज्ञान माहिती असण्याची गरज नसते. म्हणून तुम्ही दिलेल्या उदाहरणांची चर्चा करण्यात काही अर्थ नाही असे माझे प्रांजळ मत आहे.

चुंबकाचे दोन विरुद्ध धृव एकमेकांना आकर्षित करतात व विरुद्ध धृव दूर करतात याचा वापर करून अधांतरी खांब उभा करणे ही कारागिरी/तंत्रज्ञान झाले. पण हे आकर्षण व अनाकर्षण का आहे, चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय आणी त्याची समिकरणे मांडणे हे वैज्ञानिक करतो. ग्रहगोलांची स्थिती माहिती निरिक्षणातून करणे ही एक प्रकारची कारागिरी आहे. त्यांची भविष्यातली स्थिती नक्की करण्यासाठी गणिते मांडणे ही त्यापुढली एक पायरी. पण हे ग्रह अंडाकृती ऑर्बिटमध्ये का फिरतात, त्यांचा एकमेकांवर काय परिणाम होतो याचे गणित मांडणे हे आणि ते ज्ञात विश्वात कसे लागू होते याची समिकरणे मांडणे व ती प्रयोगातून सिद्ध करणे हे विज्ञान झाले.

इथल्या जाणकारांनी माझे काही चुकले असेल तर योग्य व्याख्या / उदाहरणे द्यावीत.

या संदर्भात डॉ. जयंत नारळीकरांचा रविवार सकाळ पुरवणीतील लेखही वेगळी द्रुष्टी देणारा होता.
"भारतीयांना विमान फार पूर्वीच ठाउक होते" या नेहमीच्या आवडीच्या दाव्या संदर्भात ते म्हणतात कि जे वेदातल्या श्लोकांचे पुरावे दिले जातात त्यात तथ्य शोधता येत नाही. कारण या विमानाचे कोणतेच वस्तुनिष्ठ वर्णन आढळत नाही , जसे की याची रचना , त्याच्या उडण्या संदर्भातली वस्तुनिष्ठ स्थितीचे विवेचन , त्याचा आवाज , त्याचा वेग , उड्डाण घेतानाचे - उतरतानाचे विवेचन..... त्यामुळे ही फक्त (कवि) कल्पनाच मानावी लागेल.
अजून एक संदर्भ वाचनात आला. तो असा कि इ.स. १८९५ च्या सुमाराला शिवकार तळपदे या मराठी मनुष्याने वेदातील वर्णनावरून विमानाचे design आणि एक model ही बनवले होते परंतू ते उडविण्यात त्याला दुर्दैवाने कुठलेही यश मिळवता आले नाही. याची इतिहासात नोंदही आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Shivkar_Bapuji_Talpade

<< १३. प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत>>
ही मंदिरे मुद्दामून ठरवून अशी बांधलेली आहेत का? त्यामागची काही भूमिका होती का ? या वैषिष्ठ्या बद्दल काही लिखित संदर्भ सापडला आहे का ?

लेखातील सर्व मंदिरांच्या निर्मात्यांबद्दल , शिल्पकारांबद्धल नितांत आदर आणि कौतुक आहेच ,
परंतू असे स्थापत्यातले अद्भुत नमुने संपूर्ण जगभर आढळतात. उदा. इजिप्त मधले पिरॅमिड्स , माचू-पिचू आणि असे कित्येक ....

हे सगळं जशास तसं कस्काय नावाच्या अनमोल माहितीसागरातील एक नौकेत विराजमान असताना वाचलं होतं

१२) आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही.

---- तुम्ही चाखलेले एक दोन थेंब प्राचीन ज्ञान सागराचे होते की प्राचीन वारुणीचे ते जरा कन्फर्म करुन घ्या देवा.

कसंय की आपण ज्यांच्यासमोर फेकतोय त्यांच्याबद्दल तुम्हाला खात्री असते की हे कुठे जातायत शोधायला, मग बिंधास फेका....

असो... घ्या हे खरे खुरे ज्ञानकण. फुकट आहेत, गुगलची मेहरबानी. गुगल चे नाव googolplex ह्या आकड्यावरुन ठेवण्यात आले होते.

https://faculty.math.illinois.edu/~castelln/prillion_revised_10-05.pdf

१) कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.

आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू अज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे कां ???

कृती : हे ज्ञान वापरून मोठ मोठे खांब बनवावेत. ते आडवे करावेत आणि त्याला चाके लावावीत असे अजूनही तुमच्या लक्षात आलेले नाही का ? कमाल आहे. या आडव्या केलेल्या खांबांना पुढे गजगामिनीचलित्र जोडले की ही लोहखांबगाडी चालू होते. आडव्या खांबाचा अक्ष जमिनीला समांतर केल्यास आभाळाकडे जी बाजू येते तिच्यात दोन खड्डे केले की बसण्यासाठी जागा तयार होते. आता आधुनिक तंत्राद्वारे खांबात खोदकाम यंत्र वापरून आतले लोह काढतात व आत एक पोकळी तयार करतात. यात चार खुर्च्या ठेवतात. यालाच आधुनिक अज्ञान सेडान कार म्हणते. यात एक मोठी स्क्रीन असते व तीवर रस्त्यात येणारे अडथळे दिसतात. खांबगाडी कशालाही ठोकली तरी तीस काहीच होत नसल्याने लोक आपोआपच ब्रेक्स मारून जागच्या जागी थांबत असल्याने खांबगाडी ट्रॅफिक जाममधूनही अलगद निघते. तीस सिग्नलचा अडथळा होत नाही. गजगामिनीचलित्र अर्थात दोन गज पुढे व दोन मागे असल्याने त्यांच्या पृछारंभास्थानी जो सेन्सर बसवलेला असतो त्यास दोन तांब्याच्या तारा असतात. उजवीकडे वळायचे असल्यास कंट्रोल पॅनेलचे उजवे बटण दाबले की उजवी तार गरम होऊन विवक्षित स्थानी गजास दाहस्पर्श होऊन तो उजवीकडे वळते.

हेच ते आपले प्राचीन ज्ञान.

ही इज धिस टवणे/ळे ? व्हाय ही इज टेकींग शंका ऑन अवर प्राचीन ज्ञान ? धिस इज -हायनॉक्युलस इन द होल कॉण्टेस्ट ऑफ हिप्पोपोटॅमस ऑफ दि युनिव्हर्स आणि डायव्हर्सिटी ऑफ परंपराज नाडा इन संस्कृतीज पायजामा.

Pages