चित्रपट - मंटो

Submitted by मुग्धमानसी on 30 September, 2018 - 10:10

"माझं लेखन एका आरशासारखं आहे. आता तुमचाच चेहरा विद्रूप असेल आणि तुम्ही आरशाला दोष द्याल तर..... मी काय करू शकतो?"
...........

’स-आदत हसन मंटो’.
मला इथं कबूल करायचंय आणि हे कबूल करताना मला अत्यंत लाजही वाटतेय की हे नाव मी ’मंटो’ हा चित्रपट पाहण्यापूर्वी ऐकलेही नव्हते. मला फार फार खेद आहे या गोष्टीचा. आणि तरीही याचा आनंदही आहे की या चित्रपटानं मला एका अभूतपूर्व लेखकाची, व्यक्तीमत्त्वाची, त्याच्या मनस्वी अस्तित्वाची आणि त्यानं अंतराळात कोरून ठेवलेल्या अनंत अदृष्य प्रश्नांची जाणीव करून दिली. या चित्रपटाने मला कुठलेही समाधान दिले नाही उलट एक ठसठसणारी अस्वस्थता दिली. कशाचेही उत्तर दिले नाही पण माझ्या स्वत:च्या काही प्रश्नांना तासून टोकदार केले. जिवंत केला

मला आठवला मला बसलेला एक धक्का. काही काळापूर्वी.
मी वाचलेल्या पुस्तकांविषयी मी फारशी कुणाशी चर्चा करत नसल्याने असेल... मला त्या पुस्तकांविषयीचे सार्वत्रिक मत समजलेले नव्हते. आणि मला ते जाणून घेणे तितकेसे आवश्यकही वाटले नाही. मी व्यक्तिश: जे अनुभवले ती अनुभूती माझ्यासाठी फार मोलाची होती. कुणाहीसोबत वाटावीशी वाटू नये इतकी. आणि आजूबाजूला तसे उत्कट वेडसर कुणी नसणे हेही आलेच.
यातील काही पुस्तकांनी अक्षरश: मला घडवले. मला आकार दिला, अंदाज दिला, आधार दिला. माझ्यावर उमटलेल्या त्या साहित्यकृतींचा, कलाकृतींचा ठसा मिटवणं निव्वळ अशक्य आहे. केवळ पुस्तकंच नव्हेत तर असे काही चित्रपट, चित्रं, संगित.... अशी एक माझी माझी यादी आहे ज्याच्या जोरावर मी सांगू शकते की मी आत्ता जी आहे त्यातून हे सारे वजा करा... जे उरेल तो निव्वळ एक गर्भ आहे!
आणि असेच केंव्हातरी जेंव्हा अश्या संकेतस्थळांवर वावरताना लक्षात आले की त्याच पुस्तकांविषयी दुसर्‍या टोकाची मते असणारी लोकं आहेत. आणि अशी लोकं खूप जास्त प्रमाणात आहेत! ती पुस्तकं त्यांना केवळ ’आवडली नाहीत’ एवढेच नव्हे तर ओंगळ, घाण, विकृत, निकृष्ठ, किळसवाणी, दुर्बोध वगैरेही वाटली हे मला अत्यंत धक्कादायक होते! किती धक्कादायक हे मी कदाचित इथे शब्दांत सांगू शकणार नाही. या सार्‍यावर मी किती विचार केला आणि स्वत:ची आकलन क्षमताही किती पातळ्यांवर तपासून घेतली याला सीमा नाही. मी स्वत:च तर विकृत नाही ना? मी मनोरुग्ण तर नाही ना?
पण मग मी पुन्हा ती पुस्तके, त्या कलाकृती आठवल्या. त्यातले मला भिडलेले, मी टिपून ठेवलेले सारे उतारे पुन्हा वाचले. आणि मन ठाम झाले की मला हेच आवडते. मी इथेच असू शकते. मी अशीच असू शकते. विकृत असो वा विक्षिप्त.... हे माझे माझे घर आहे. माझे माझे विश्व आहे! हीच मी आहे!

माझी ही सारी धारणा ’मंटो’ पाहिल्यावर आणखी गडद झाली. स्थिर झाली. प्रत्येक दु:खाला आनंदाची किनार वगैरे असायलाच हवी का? संपूर्ण मन:पटल व्यापून उरणारं दु:ख प्रत्यक्ष समोर वाढलेल्या ताटात मात्र आंबट लोणच्याएवढं किंवा मिठाच्या खड्याएवढं तोंडीलावण्यापुरतंच असावं असं का वाटतं? संपूर्ण मूत्रिमंत दु:ख सामोरं दिसल्यावर - तेही एका परक्या त्रयस्थ आयुष्याच्या संदर्भात - ते आपल्याला ओंगळ आणि सहन न करता येणारं का वाटतं? (त्याचवेळी हेही कदाचित जाणवतं ही हे आणि हेच वास्तव आहे. असू शकतं. बहूदा असावंच. - हेच अंगावर येत आणि नाकारावंसं वाटत असेल.)

या चित्रपटात मधून मधून ’मंटो’च्या काही कथा संक्षिप्तरूपात दाखवलेल्या आहेत. या माध्यमातूनही त्या इतक्या जिवंतपणे अंगावर येतात की बघताना अंगावर काटा येतो. श्वास कोंडतो. अधांतरातून वास्तवात धाडकन कोसळल्यागत वाटतं. प्रत्यक्ष लिखित स्वरूपात त्या कथा कशा असतील हे जाणून घेण्याचा मोह आवरता येत नाही. या कथा ज्या पद्धतीने मुख्य कथानकात म्हणजेच ’मंटो’ च्या व्यक्तिगत आयुष्यक्रमात पेरलेल्या आहेत त्याला तोड नाही! तसे करणे याशिवाय हा चित्रपट प्रभावी बनणे शक्यही नव्हते. कारण ’मंटो’ आणि त्याच्या कथा हे काही भिन्न नव्हतेच. त्याच्या जगण्यातून आणि असण्यातूनच जन्माला आलेल्या त्या कथांनी त्याचे आयुष्य जिथवर असू शकत होते तिथवर नेले. आणि त्याच्या या कथांनीच त्याच्या मनस्वी असण्याला अखेर संपवले.
हा चित्रपट पाहिल्यानंतर मी ’सआदत हसन मंटो’च्या संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या सगळ्या लघुकथा वाचल्या. मंटो प्रामुख्याने लिहितो वेश्यांवर आणि फाळणीच्या काळ्या कालखंडावर. दोन्ही दु:खांची जात मला सारखीच वाटते. आपण न केलेल्या चुकांची, अधिकार नसलेल्या व्यक्तींकडून, न समजणार्‍या कारणांसाठी आणि अमानवीय पद्धतीने मिळालेली शिक्षा.... आणि त्यांच्या न मिटणार्‍या अथांग वेदना!

नवाझुद्दीन सिद्दिकी व्यतिरिक्त इतर कुणीही ’मंटो’ साकारू शकलंच नसतं असं वाटावं इतपत तो त्या भूमिकेत तंतोतंत उतरला आहे. उर्द्रू बोलण्यातला लहेजा आणि ’मंटो’चा मनस्वी रोकठोकपणाही तो अत्यंत सहजपणे समोर आणतो. अत्यंत प्रामाणिक कथानक तितक्याच प्रामाणिकपणे उधृत केल्याबद्दल नंदिता दास यांचे ऋण मानावे तितके कमी आहेत.

फाळणीच्या खोल बिभत्स लाजिरवाण्या कालखंडाला सामोरं गेलेल्या पिढीचं दु:ख आपल्यापैकी कुणीही कधीही समजू शकणार नाही! त्या कालखंडानं विचार, बुद्धि आणि विवेकाला बधीर करू शकणार्‍या एका विषाची ओळख आपल्याला करून दिली आणि पुढच्याही अनेक पिढ्यांना पुरेल इतका विषाद जन्माला घातला! याच फाळणीनं ’मंटो’ सारख्या मनस्वी अतरंगी आणि संवेदनशील लेखकांना एका गडद दु:खाची शाई आणि टोकदार सत्याची लेखणी दिली. ते व्यक्त झाले. ते खरं बोलले. त्यांनी आरसा दाखवला. ते नसते तर ’स्वातंत्र्यलढ्याच्या दैदिप्यमान इतिहासाच्या’ झिंग आणण्यार्‍या देशभक्तीत मश्गूल असण्यार्‍यांना त्यांच्याच त्याच इतिहासाचा हाही चेहरा पाहण्यासाठी कुठलाच आरसा आत्ता उपलब्ध नसला असता! आपण ॠणी असायला हवं... की ते व्यक्त झाले. आपल्याच पुर्वजांनी त्यांच्या वाटेत पेरलेल्या अनंत अडथळ्यांना न जुमानता त्यांनी ते लिहून ठेवलं... जे आपण आणि आपल्याही वंशजांनी वाचणं अत्यंत आवश्यक आहे! कुठल्याही स्वातंत्र्ययोद्ध्याइतकाच या मनस्वी कलाकारांचा सत्यासाठी आणि व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यासाठी घडून आलेला संघर्ष अत्यंत मोलाचा आहे. हा लढा समजून घेणे आवश्यक आहे कारण या लढ्याला आजही अंत नाही!
____________________________________

“देखो यार। तुम ने ब्लैक मार्केट
के दाम भी लिए और ऐसा रद्दी पेट्रोल दिया
कि एक दुकान भी न जली।”
-सआदत हसन मन्टो
_______________________________________

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा सिनेमा पाहायचा आहे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

मंटोचे आयुष्य आणि कथा हे दोन्ही दाखवले असेल तर कमाल आहे, नक्कीच बघायला हवा. मंग दी दाल ऑफ पाकिस्तान!

सिनेमा पहायला गेलो होतो पण सिनेमा उतरवला होता. कशामुळे हे समजले नाही. बुकमायशो मधे तर दर्शवत होते. बघूयात आता नेफ्लि किंवा प्राईमवर.

ओघवतं आणि प्रभावी लिहीलंय.
थोडक्याच कथा वाचल्यात मंटोंच्या काय जबरदस्त व्यक्त होतो. बघणारच हा चित्रपट.

हा सिनेमा पाहायचा आहे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.>>>>>. +१
यूट्यूबवर ही पाकिस्तानी सिरियल पाहिली.तीही छान आहे.सरमद खूसटने, मंटो मस्त साकारला आहे.
https://youtu.be/af4RGYMsPT0

मंटोंच्या कथा मीही वाचल्या नाहीयेत पण जाणून घ्यायची इच्छा मात्र आहे. लेख प्रचंड आवडला। तुमच्या वाचनाबद्दल जे जे काही लिहिलंय ते अफाट आहे. पिक्चर बघेनच आणि मग लिहिते परत। नेहमीसारखच सुंदर लेखन।

मायबोलीकर विशाल कुलकर्णी यांनी मंटोची पुढील कथा अनुवादित केली आहे. कथा तुम्हाला नक्की अस्वस्थ करेल वाचल्यावर .
खोल दो
https://www.maayboli.com/node/35073
पुढील लिंकवर मंटोंच्या अनुवादित कथा विषयी माहिती आहे. देवकी व टवणे सरांचे प्रतिसाद पहा.
https://www.maayboli.com/node/41038?page=38

"माझं लेखन एका आरशासारखं आहे. आता तुमचाच चेहरा विद्रूप असेल आणि तुम्ही आरशाला दोष द्याल तर..... मी काय करू शकतो?" +११
ह्या लेखातुन तुमच्या भावना अगदी नेमकेपणाने व्यक्त झाल्यात

विशाल ह्यानी अनुवादित केलेली गोष्ट वाचली तेव्हा अन्गावर काटा आला होता..
फाळणीच्या वेळेस झालेल्या प्रकारान्ची वर्णने रात्र रात्र झोपु देत नाहीत, इतके ते विदरक सत्य आहे

या धाग्याशी अवांतर तरी,एक पुरानी कहानी असं यू ट्यूबवर टंकून पहा मंटोच्या कथा आहेत.फार सुरेख आहेत.

मंटो जबरी आवडतो. पण म्हणूनच त्याच्यावरचे चित्रपट किंवा अनुवाद बघावे, वाचावे वाटत नाहीत. अश्या माणसाला आणि त्याच्या कलाकृतींना कुणी चिमटीत नाही पकडू शकत.

लिहू कि नको म्हणत होती पण आता लिहावच म्हटल..
चित्रपट पाहून आली..एक नवाज सोडला तर सर्वच गोष्टी खटकतात पिच्चरमधे.. मला खटकल्या..
मंटोच्या कथा वाचल्यायत.. चित्रपटात आलेल्या पाचही वाचल्या आहे.. त्या निव्वळ कथा जेवढ्या सुन्न करुन जातात त्याच्या कित्येक पट वाईट्ट या कथांच चित्रपटातलं प्रेझेंटेशन आहे..
त्याला लोकांसमोर आणणे हे आव्हान होतं पण ते पेलताना निव्वळ एक नवाजच नाही तर त्याच्यासारखे १० नवाज हवे होते.. तुम्ही निवडत असलेले छोटे छोटे पात्र सुद्धा प्रामाणिक वाटायला हवे जे मला तरी वाटले नाही.. मंटोलिखित त्या पाचही कथा इतक्या कमी फुटेज देऊन गुंडाळल्या आहे कि बस रे बस..
चित्रपट बर्‍याच अंशी फसला हे मला तरी वाटलं.. बाकी एकदा नक्कीच बघु शकतो. पण निव्वळ मंटोवर आहे, नवाजने मंटो सादर केला आहे, नंदिता दासचा पिच्चर आहे म्हणुन तो चांगलाच असेल अश्या भाबड्या आशेने जाऊ नये.

छान लिहिलंय.
मंटोच्या कथा कुठे वाचता येतील?

एक कलीग गेला होता बघायला, त्याच्या भावाने म्हणे परस्पर आॅनलाईन तिकीटे काढली, कोणालाच मंटोविषयी काहीही माहिती नाही. थिएटर रिकामं होतं आणि एसीमध्येे छान झोप लागली असं म्हणाला तो. त्याचं जाऊदे पण वृत्तपत्रात खूप चांगलं वाचलं मी चित्रपटाबद्दल. नवाज ही भूमिका जगला आहे आणि ईतरांबद्दलही चांगलं लिहीलं आहे. मी फक्त नाव ऐकलंय मंटोचं तर आधी त्याच्या कथा वाचेन आणि मग कुठे आला आॅनलाईन तर बघेन. वर दिलेल्या सर्व लिंकसाठी सगळ्यांचे आभार.

माबो आणि मिपावर आलेल्या मंटोच्या अनुवादित कथा वाचल्या आहेत.
लेख आवडला.
टिनाचा प्रतिसादही रोचक आहे.

> मी वाचलेल्या पुस्तकांविषयी मी फारशी कुणाशी चर्चा करत नसल्याने असेल.......... हे माझे माझे घर आहे. माझे माझे विश्व आहे! हीच मी आहे! > खासकरून हा परिच्छेद जास्त आवडला. तुम्ही पुस्तकांविषयी कोणाशी चर्चा करत नाही हे कळलं पण तरी ती कोणती पुस्तकं असतील ब्वा? याची उत्सुकता आहे. यादी दिली तर फार आनंद होईल.

अ‍ॅमी>> ती कोणती पुस्तकं असतील ब्वा? >>> आमी नाई ज्जा ब्वा. Lol Lol Lol
माफ करा मला तुमची थट्टा करायची नाही. पण त्या पुस्तकांची यादी मी इथं दिली तर सगळा धागा ’मंटो’ सोडून भलतीकडेच वाहू लागेल अशी शंका नव्हे तर खात्री आहे म्हणून त्या पुस्तकांची यादी मी इथं देत नाही.

दत्तात्रय साळुंके>>> तुम्ही दिलेल्या लिंक्स वाचल्या. विशाल कुलकर्णींनी खरच फार सुंदर भाषांतर केलेय मंटोच्या कथांचे. धन्यवाद ही लिंक दिल्याबद्दल.

टिना, तुमचा प्रतिसाद वाचून खरंतर मला तुमचा हेवा वाटला. तुमची मंटोच्या कथांशी जुनी ओळख आहे. माझी ती नव्हती याचे वैषम्य आहेच. कदाचित म्हणूनच या चित्रपटात त्याच्या कथांची जी संक्षिप्त ओळख घडून आली ती मला प्रमाणाबाहेर भिडली. चित्रपटातल्या ३-५ मिनिटांत बंदिस्त केलेल्या कथा मूळ लेखनाइतक्याच प्रभावी असणं शक्य नव्हतंच. पण लेखात म्हटल्याप्रमाणे त्या पाहून माझं मूळ कथा मिळवून वाचाव्याच या विषयीचं कौतूहल वाढवलं. हे या चित्रपटाचं मोठं यश मानायला हरकत नाही. शिवाय पुस्तके वाचणारे सारेच अश्या चित्रपटांचे दर्शक असतातच असे नाही. किंवा काही रसिक फक्त चित्रपटांचे चाहते असतात. पुस्तक वाचनाशी फारशी ओळख वा आवड नसणारे. अश्या सर्वांपर्यंत मंटो पोचावा हे या चित्रपटाचे श्रेय आहे.

आजवरच्या भारतीय चित्रपटांच्या इतिहासात कुणाला ’सआदत हसन मंटो’ या माणसावर चित्रपट काढायला हवा हे सुचलेले मलातरी आठवत नाही. हे सुचणे, ते अमलात आणणे आणि जितक्या प्रभावीपणे ते समोर आणता येऊ शकते तितक्या प्रभावीपणे ते लोकांसमोर आणणे हेच मला फार कौतूकास्पद वाटले. नंदिता दास यांचे मला ऋण मानावे वाटले ते यासाठीच. बाकी ’मंटो’ सारखा भव्य दिव्य विषय २ तासांत पडद्यावर समजावून सांगणे अवघड नव्हे अशक्यच आहे. त्याची फारतर ओळख करून देता येते, आणि ते या चित्रपटाने केले आहे असे मला वाटले.

टिना, तुमचा प्रतिसाद वाचून खरंतर मला तुमचा हेवा वाटला. तुमची मंटोच्या कथांशी जुनी ओळख आहे. माझी ती नव्हती याचे वैषम्य आहेच. कदाचित म्हणूनच या चित्रपटात त्याच्या कथांची जी संक्षिप्त ओळख घडून आली ती मला प्रमाणाबाहेर भिडली. >> आदरार्थी नकोच.. तू मी चालेल..
जुनी ओळख म्हणनार नाही मी.. फारफारतर ५ ६ वर्ष झाली असणार..
तुम्ही मंटोच्या कथा वाचायला घ्याच.. इथे काहीजण लिंक देऊ शकेल त्यांची.. मी मराठीत वाचायचा प्रयत्न केला होता पण मग मित्रांनी सांगितल कि त्याला हिंदी वा उर्दूत वाचावं आणि मलाही तेच जास्त भावलं.. चित्रपट पाहण्याच्या बाबत माझा एक फार दर्दी मित्र आहे, त्याला मंटो माहिती नव्हता पण एकंदर पात्रांच्या अभिनयाबद्दल आणि अधेच मधे येणार्‍या त्याच्या त्या कथांच्या प्रेझेंटेशन बद्दल त्याचेही तसेच मत झाले.
पाच कथांमधे सर्वात जास्त निराशा कुणी केली तर "खोल दो" या कथेने.. माझा मुडच गेला ती बघुन..

टीना, मंटो करायचा म्हटल्यावर खोल दो कथा दाखवणं आवश्यक ठरलं असेल, आणि ती दाखवायची म्हटल्यावर आपल्या सेंसाॅरशी प्रामाणिक राहून कशी दाखवायची- हाही प्रश्न पडला असेल.
खोल दो फार इंटेंस आहे, आणि ती इंटेंसिटी पडद्यावर आली नसेल, तर ते दिग्दर्शकाचं अपयश , हे मान्यच आहे. पण मग या निमित्ताने मंटोचं माध्यमांतर होऊन तो पुस्तकातून कसा का होईना पडद्यावर आला हे भारीच झालं असं म्हणायचं.

मानसी, मस्त भारी लिहिलंयस. Happy

छान परिक्षण.
मंटो बद्दल अजिबातच काही माहित नव्हतं. पहिल्यांदा विशाल ने केलेला 'खोल दो' चा अनुवाद वाचला होता. शेवट वाचताना काटा आला अंगावर. त्यानंतरही अनेक दिवस परत काही वाचलं नाही. सिनेमा येतोय समजल्यावर गुगुलून पाहता, खालच्या लिंक वर हिंदी मधे मंटो च्या लघुकथा, दीर्घकथा वगैरे सापडल्या. मूळ लेखन वाचताना बरेच जड आणि प्रथमच वाचण्यात आलेले शब्द पाहून अडखळल्यासारखं झालं, पण कथेच्या ओघात ते पचनी पडत गेलं. जबरदस्त लेखक !
https://rekhta.org/manto?lang=hi

> माफ करा मला तुमची थट्टा करायची नाही. पण त्या पुस्तकांची यादी मी इथं दिली तर सगळा धागा ’मंटो’ सोडून भलतीकडेच वाहू लागेल अशी शंका नव्हे तर खात्री आहे म्हणून त्या पुस्तकांची यादी मी इथं देत नाही. > माफी वगैरेची गरज नाही Happy इथे नाही तर वेगळा धागा काढून लिहा.

नसेलच काढायचा तरी ठीक आहे. पण ती पुस्तकं आवडणारे इतरही थोडेबहुत लोक असतील, तेदेखील 'आपण विकृत आहोत का?' अशा विचारात पडले असतील, बहुसंख्यांच्या ( कि ठणाणा करायची जास्त क्षमता असलेल्यांच्या?) आवाजमुळे त्यांचा आवाज कोणाला ऐकूच जाणार नाही....अशा कारणांसाठी नावं विचारत होते.

मंटोबद्दल फार छान लिहलय.दोन तीन वर्षांपूर्वी किरण येलेंनी केलेला त्यांच्या 'खोल दो'या कथेचा अनुवाद वाचनात आला आणि मंटो यांची कथाकथन करण्याची अनोखी शैली समोर वीज चमकून जावी तशी अवाक करुन गेली. मंटोतला नवाजुद्दीनचा अभिनय पण आकर्षणाचा विषय आहे.

धन्यवाद भुईकमळ.
अमा, रुमाल टाकून कुठे गायब झालात? तुमच्या प्रतिसादाची वाट बघतेय.

Pages