आत्याबाई- व्यक्तिचित्रण

Submitted by mrsbarve on 23 September, 2018 - 23:46

कित्ती कित्ती वर्षे झाली त्या असायला !त्या कधी गेल्या तेही आठवत नाहीय. आठवते ती त्यांची छोटेखानी मूर्ती! ,आत्या आज्जी !आजोबांची बहीण! खूप सुरकुत्या असलेला त्यांचा चेहरा ,काटकुळी देहयष्टी,नऊवारी साडी !

शाळेतून घरी आल्यावर आई सांगायची,"बरं का ग,आत्या बाई आल्यात!" आणि आमच्या चेहऱ्यावर हसू पसरायचे.आत्या बाई अशाच वर्षातून एखादेवेळी अचानक माहेरी येत. जवळच्याच एका छोट्या गावात त्या राहत असत.दोन दारुडी मुले,त्रास देणाऱ्या सुना आणि नापास होणारी नातवंडे असा सगळा ,काहीसा निराशाजनकच गोतावळा होता त्यांचा!पण आत्या बाईना त्याची फारशी फिकीर नव्हती. घरात कुठल्यातरी कोपर्यातली अडगळ म्हणून वागवलं जायचं त्यांना. मग कंटाळा आला सगळ्याचा कि चार दिवस आमच्या घरी येत आणि राहत. येताना त्यांच्या जवळ गाठोडे असे त्यातून केळीचा एखादा घड,एखादा बिस्किटाचा पुडा अस ल काही बाही आणायच्या आणि खूप कौतुकाने आम्हा मुलांच्या हातावर ठेवायच्या.

आई दुपारच्या वेळी तांदूळ निवडायला घ्यायची ,तेंव्हा मी पण मदत करते म्हणायच्या आणि निवडलेले तांदूळ ,न निवडलेल्या तांदळात मिक्स करून टाकायच्या.अशा वेंधळ्या,धांदरट! कधी दुपारच्या वेळी आपलं लुगडं शिवत बसायच्या. मग आजोबा त्यांना जाताना नविन लुगडं घेऊन देत. एकेवेळी आल्या तेंव्हा एकदम बॉयकट केलेला केसांचा. आधीच बावळे ध्यान ,तोंडात एकच दात ,तोही पार ओठाबाहेर आलेला. कशी तरी नेसलेली नऊवारी साडी ,तीही चार ठिकाणी शिवलेली! नंतर कळलं कि हा सगळं सुनेचा प्रताप !सासूच्या केसांना तेल पाणी लागते,त्याचा खर्च नको म्हणूं त्या बयेने यांचे केसच कापले. आणि या गरीब गायीने ते कापून घेतेले!

चार दिवस भावाकडे तूप रोटी खाऊन सुखाने त्या परतीच्या वाटेला लागत तेंव्हा समाधानाने जात. एकदा म्हणाल्या ,मला नको नवे लुगडे,सून काढून घेते माझ्याकडून!मला चर्रर्र झालं !

एकदा असाच आत्या बाईचा मुलगा त्यांना सोडून गेला आमच्या कडे ,आत्या बाई आता खूपच म्हतार्या झाल्या होत्या. काही आठवत नसे त्यांना .!आजू बाजूची माणसे आपली आहेत एव्हढाच फक्त त्यांना कळे पण कोण /काय नाते हे त्या पूर्ण विसरत. घरातल्या घरात छान हिंडत फिरत ,पण मधेच त्यांना जाम काहीही आठवत नसे. मग सैर भैर होत ,काही वेळाने शांत होऊन पुन्हा नित्याच्या गोष्टीत मग्न होत. घरातली एकजण आजारी होती तेंव्हा ,आत्या बाई तिच्या डोक्याशी अखंड बसून होत्या. पाण्याच्या पट्ट्या डोकयावर ठेवत होत्या. अंगारा लावत होत्या. पण एव्हढं सगळं करून आपण ते नक्की कोणासाठी करतोय हे त्यांना बिलकुल कळ त नव्हते.

आत्या बाई खूप साध्या भोळ्या आणि काहीशा हरवलेल्या होत्या. आयुश्याच्या संध्याकाळी सुना मुलांच्या कडून त्यांना दुर्लक्षच वाट्याला आले. पण त्यांच्या विरोधात ,किंवा माझं नशीब इत्यादि कधीच ऐ कले नाही !कधीच ! मला आणि भावंडाना जवळ बोलावून "मी तुम्हाला गाणं शिकवते"
म्हणायच्या !आणि त्यांच्या मजेदार आवाजात "भरजरी ग पितांबर " म्हणायच्या !गाणं म्हणतानाचा त्यांचा तल्लीन झालेला चेहरा अगदी छान आठवतो मला !

पुढे थोड्याच वर्षात त्या गेल्याच पोस्टकार्ड आलं !डोळे पाणावले ,आता त्या गोष्टीलाही खूप खूप वर्ष होऊन गेली !

या नंतर फारा वर्षांनी माझी पोर मला म्हणाली "आई मराठी गाणं कुठलं शिकू ?""माझ्या ओठावर आत्याबाईंचं 'भरजरी गं पितांबर" आलं !पोरीने शिकून ते उत्तम सादरही केलं !ते ऐकताना ,पाहताना आत्त्या बाईंची आठवणआलीच !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! सुंदर लिहिलं आहे. पण खुपच थोडक्यात. खुप छान रंगवता आले असते अजुन.
भरजरी पितांबर दिला फाडून हे बहूतेक आज्जीलोकांचे फेव्हरेट असावे. माझी आज्जीही सुरेख म्हणायची.

अशा सुना का वागत असतील ?
आत्याबाई ने आपल्या सासूला त्रास दिला होता का?

खूप छान व्यक्तिचित्रण ! वाईट वाटले वाचून.

चांगले लिहिले आहे, अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. पण आत्याबाईंबद्दल वाईट वाटले.