आरत्यांमध्ये जादाचे शब्द घालून म्हणायची प्रथा कोणी व कधी सुरु केली?

Submitted by Parichit on 19 September, 2018 - 06:05

पुण्यात आल्यापासून गणेशोत्सवात एक गोष्ट अनुभवली आहे. इथे श्री गणेशाची आणि इतर आरत्या थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हटल्या जातात असे माझे मत आहे. मूळच्या आरती मध्ये काही जादाचे शब्द घातले गेले आहेत. जसे कि उदाहरणार्थ...

जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती
जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी

अजून अशी अनेक उदाहरणे आहेत. मूळ आरतीमध्ये "जय देव जय देव जय मंगल मूर्ती" इतकेच आहे. लहानपणापासून तितकेच वाचत व म्हणत आलो आहे. पुण्यात मात्र त्याला "हो श्री मंगल मूर्ती" असे जोडतात. प्रथम प्रथम हे सगळे ऐकून गम्मत वाटली. पण नंतर नंतर चीड येऊ लागली. त्याच अर्थाचा दुसरा शब्द पुन्हा का म्हणायचा? हा आचरटपणा कोणी व का केला असेल? मुख्य म्हणजे हे पुण्यातच जास्त आहे. कोल्हापूर सांगली सातारा भागात हे ज्यादाचे शब्द म्हणत नाहीत (असे माझे निरीक्षण आहे). तिकडे अजूनही मूळ आरत्याच जशाच्या तशा म्हंटल्या जातात (मुंबई व इतर महाराष्ट्राचे माहित नाही). काही प्रश्न मनात आले:

१. हे नसतेउद्योग कोणी, कधी व का केले असतील?
२. केवळ स्वत:चे अस्तित्व व वेगळेपण दाखवण्याकरिता एखाद्या आरती पुस्तकाच्या लेखकाने/प्रकाशकाने तर हे केले नसेल?
३. एखाद्या मूळ लिखाणामध्ये बदल करणे ह्याला कॉपीराईट भंगाचा गुन्हा म्हणतात. इथे तो लागू होत नाही का?
४. इथे तर अधिक शब्दांची भर घालणाऱ्या महाभागाने काहीही कारण नसताना सरळ सरळ द्विरुक्ती केली आहे. व ऐकताना तो थेट मूर्खपणा आहे हे जाणवते. जसे कि...

ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावसी लवलाही
आरती ओवाळू भावार्ती ओवाळू तुज कर्पूर गौरा

का रे बाबा? फक्त भक्ता लागी पुरेसे वाटत नाही का तुला? फक्त आरती ओवाळू म्हणून मन भरत नाही का तुझे?
महिषासुरमर्दिनी शब्द असताना पुन्हा त्याच अर्थाचा दैत्यासुरमर्दिनी म्हणावा असे तुला का वाटले असेल?

थेट मूर्खपणा वाटतो आणि विशेष म्हणजे लोकांनी कुणीही ह्या घुसडवणूकीला विरोध किंवा आक्षेप नोंदवलेला दिसत नाही. चालते का असे काहीही केले तर? चालत असेल तर मी तर म्हणतो करणाऱ्याने इतकेच बदल का केले असतील? अखंड आरतीच नवीन लिहायची ना. उदाहरणार्थ:

देवी दैत्यी सागर मंथन पै केले हो घुसळण पै केले |
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले हो जळजळ जे उठले |
तें त्वां असुरपणे प्राशन केलें हो गिळंकृत केले |
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले हो फेमस झाले |

का? काय हरकत आहे? आहे कुणाची हरकत?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या प्रतिसादाबद्दल बोलावेच, अशी तुम्हाला कुणी जबरदस्ती केली आहे का? उगंच येऊन अंगाशी झट्या द्यायच्या हा उद्योग कशाला? मी काय लिहितो ते माबो धोरणाबाहेर असेल, तर जे काय करायचे ते अ‍ॅडमिन बघून घेतील.

हा प्रतिसाद लैच आवडल्या गेला असल्याने साठवून ठेवण्यात येत आहे. सिनेमात स्टॉक सिन वापरतात त्यानुसार ही स्टॉक कॉमेंट गरजेनुसार वापरणेत येईल जाहीर करतो. कॉपीराईटचा आक्षेप घेतल्या जाणार नाही अशी आशा आहे.

व्यत्यय Happy
मलापण एक सुद्धा आरती पूर्ण पाठ नाही. (लाहणपनी एक दोन असतीलही पाठ पण त्यातले सगळे शब्द बरोबर असतील याची खात्री नाही. ) या उलट घरात सगळे धार्मिक, सगळ्या आरत्या नीट आणि भक्तिभावाने म्हणत, म्हणतात. मला आठवले ते कडवे आले की मी जरा सूर मिसळतो. आणि कुणी भलतेच चुकीचे शब्द म्हणत असेल हसू आवरतो.

फार तर ३-४ आरत्यांपर्यंत पेशन्स टिकतो
पिसौ मध्ये एक फेमस दत्त मंदीर आहे.ते सिनीयर सिटीझन भक्तीभावाने मॅनेज करतात.
एकदा हौसेने आरती चालू होणार म्हणून थांबले.त्यांनी बाप्पा,शंकर्,दुर्गा,दत्त,साईबाबा,विठ्ठल्,नंतर साईबाबा विथ हिट हिंदी साँग (पंख होते तो उड आती रे),नंतर स्वामी समर्थ असे बरेच काही काही म्हटले.मला आरती पूर्ण करुनच जायचे होते.पण शेवटी शेवटी 'आता पुरे' असे झाले.

> पिसौ मध्ये एक फेमस दत्त मंदीर आहे.ते सिनीयर सिटीझन भक्तीभावाने मॅनेज करतात. > कुणाल आयकन जवळचं का? आत गेले नाही कधी. प्रसाद असतो का? काय? कधी? Lol

आरत्यांमधे नसले, तरी आरतीच्या धाग्यावर झिल तोडणे झालेले पाहून अंमळ गम्मत वाटली.

बिचं, कॉपीराईटचा आक्षेप नक्कीच घेण्यात येईल.

***

झिल तोडण्यावरून आठवले.

कुण्या गावात भजनसंध्या अ‍ॅरेंज केलेली. मुख्य गायीकाबाई तर पोहोचल्या, पण साथीदारांची गाडी फेल झाल्याने वेळेवर पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे गावकरी मंडळींनी गावात अनायसे उपलब्ध असलेल्या लोककलाकारांना साथीला बसण्याची विनंती केली.

भजन म्हटले तरी शेवटी गाणेच ते. गण-गौळण देखिल कृष्णभक्तीच आहे वगैरे लॉजिक.

कार्यक्रम सुरू झाला.

बाईंनी सुरुवात केली..

ब्र्हमा विष्णू आणि महेश्वर...
सामोरे बसलेऽ

मला हे

दत्तगुरू दिसलेऽ

कोरस :

अग बाई हिला
दत्तगुरूऽ दिसलेऽ

हो तेच ते,ज्याच्या समोर रंगलेला पंजाब आहे.
प्रसाद काहीतरी नॉमिनल असावा. आठवत नै.
मस्त वाटतं तिथे गेल्यावर.पण आरती अटेंड करणार नाही असा कानाला खडा लावलाय.

बिचं, कॉपीराईटचा आक्षेप नक्कीच घेण्यात येईल. }}}

राजुडी,

कॉपीराईटची नोंद दाखवावी लागेल अन्यथा आक्षेप फाट्यावर मारण्यात येईल.

>>बाईंनी सुरुवात केली..

ब्र्हमा विष्णू आणि महेश्वर...
सामोरे बसलेऽ

मला हे

दत्तगुरू दिसलेऽ

कोरस :

अग बाई हिला
दत्तगुरूऽ दिसलेऽ<< Biggrin Biggrin Biggrin

कासारवाडीत नदीकाठी दत्त मंदीर आहे तिथे दत्त जयंतीला प्रसादाचे जेवण असते.काहीतरी वरण भात वगैरे.एकदा खाल्लेय.
छान आहे ते मंदीर.
मला जिथे दंडाला हात लावून्/खांद्यावर हात ठेवून स्वयंसेविका चला पुढे म्हणत नाहीत अशी सगळ्या दैवतांची मंदीरं आवडतात.
पुढे चला वाल्या ठिकाणी मी मूर्तीला नमस्कार करते, मनातली भावना सांगायचं विसरुन जाते.

राजुडी,

कॉपीराईटची नोंद दाखवावी लागेल अन्यथा आक्षेप फाट्यावर मारण्यात येईल.
नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 21 September, 2018 - 13:35
<<

यालाच विनाकारण येउन झट्या घेणे म्हणतात.

यालाच विनाकारण येउन झट्या घेणे म्हणतात.
नवीन Submitted by आ.रा.रा. on 21 September, 2018 - 14:21

याला जर झट्या घेणे म्हणत असतील तर अशा झट्या राजुडीने माझ्या अनेक प्रतिसादांवर आणि धाग्यांवर घेतल्याचे मी सप्रमाण दाखवून देऊ शकेन.

आरारा, तो अनूभव ( भजनसंध्येचा ) मध्यंतरी आशा भोसले यांनी टिव्हीवर सांगीतला होता. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला, त्यांनी आशाताईंना कार्यक्रमाच्या आयत्या वेळेत सांगीतल की कोरस देणारे कलाकार आज बाहेरगावी गेलेत. तेव्हा आशाताई म्हणाल्या की ठीक आहे, तुमच्या ओळखीत कोणी भजनी मंडळातल्या बायका वगैरे असतील तर बघा. पण त्यांना नेमक्या तमाशापटातीलच बायका गावल्या. आशा ताईंनी त्या बायकांना सांगीतले की माझ्या मागुन थोडा कोरस द्या. पण या बायका तमाशापटातील आहेत हे त्यांना माहीत नव्हते. गाणे सुरु केल्यावर मग हंगामा झाला.

अहो किस्सा रंगवायला अ‍ॅडिशन करावी लागते . मग त्या आशातै असल्या म्हणून काय झाले ?

अमानवीय धागे वाचत चला....

मी पण हा दत्तगुरु दिसले किस्सा वाचला आहे कोणत्यातरी पुस्तकात.

बँडवाल्यांनी वाजवलेल्या आरत्या पण भारी असतात. कॅलरोनेट वर सुखकर्ता दुखहर्ता सुरू करायच्या आधी सगळे ब्रास आणि खुळखुळा वाजवणारे आधी फुल्ल कल्ला करतात, आवाज घुमावतात आणि मग एकदम शांतता आणि त्यानंतर फक्त क्लरोनेटवाला आरती सुरू करतो.

एक पिढी मागच्या लोकांकडून ऐकले आहे की राम कदम फार भारी क्लरोनेट वाजवायचे. उरुसाच्या ताबुताला तर दरवर्षी राम कदम वाजवत न्यायचे.

मला ' ओवाळू आरती मदनगोपाळा' ही आरती खूप आवडते. त्यातले ते ' श्यामसुंदर गळा' लावून धरताना जर सोबत तालात वाजणारे टाळ असतील तर झिंच्याक झिन झिन, झिन च्याक झिन झिन मजा येते. झांजा व्यवस्थित वाजवल्या तर खरेच एक नाद गुंजतो. पण बरेच वेळा भलत्याच शब्दावर खण्णकरून झांज आदळते. प्रत्येकाची सम वेगळी वेगळी असते. मग ' ठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी' म्हणताना ' ठो' वर टाळ्यांचा कडकडाट आणि झांजांचा खणखणाट होतो.

......गौरीच्या नैवेद्याच्या मटणाचा घमघमाट सुटलेला असावा,....
नवीन Submitted by व्यत्यय on 21 September, 2018 - 10:27
>>>>
माझ्या माहितीत सिकेपी समाजात ही प्रथा असते. बाकी सगळे घासफूस वाले.

आपण घरी गणपती आणायचा का?
हा बालसुलभ प्रश्न नास्तिक बाबांनी "गप्पे" या एका शब्दात सोडवला होता.

Rofl

अहो ते गाणे सोलोच आहे, पण या बायका आशाताईंमागे स्टेजवर होत्या ना. आशाताई म्हणाल्या की आधी ईशस्तवनाने मी सुरुवात करते, मग कार्यक्रम सुरु करु. पण या बायकांना ती सवय असल्याने त्यांनी लगेच कोरस धरला. ( सॉरी काल हे लिहायचे राहुनच गेले, आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद)

आरत्यांच्या अ‍ॅडिशन्सनी ठेच लागते खरी, पण यात खास पुणेरी पद्धत वगैरे काही नसावं. आम्ही कोल्हापूर भागातून मुंबईत आलो तेव्हा या अ‍ॅडिशन्स प्रथम ऐकल्या होत्या. तेव्हाच्या आमच्या सोसायटीत बहुतेक सर्व मंडळी कोकणातली होती.

तेव्हा आम्ही `युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, हो पाटावरी उभा' अशी गमतीगमतीत एक अ‍ॅडिशन तयार केली होती. Lol

सर्वांनी सर्वांच्या घरी जाऊन आरत्या म्हणायच्या ही पद्धतही मुंबईत आल्यावरच पाहिली.

आरत्या गाताना तो एक जोश असतो, ती आळवून आळवून म्हणण्याची धुंदी असते एक प्रकारची. लोकसंगीतच ते तसे पाहिले तर. त्यामुळे गैर नाही वाटत.
Submitted by maitreyee on 19 September, 2018 - 18:21

---> असहमत आहे या व अशा प्रकारच्या मतांशी. आरती हे भजन किंवा गझल नव्हे. भजन एकजण म्हणतो व (कैकदा) इतर त्याला साथ देतात. लोकसंगीत अशाच प्रकारचे. इथे गायनाला मोकळीक असते हे मान्य. गायक आळवून आळवून हवे तसे आलाप गिरक्या घेत प्रसंगी मनाचे शब्द घालून गातो. इतर सगळे ऐकत असतात. पण आरती हे समूहाने एकत्र म्हणायचे स्तुतिगीत आहे. त्यामुळे तिथे शिस्त हवी. राष्ट्रगीत सुद्धा याच प्रकारात मोडते. जयजयकार आहे दोन्हीकडे. सर्वजण राष्ट्रगीत म्हणत असताना कोणीतरी उपटसुंभाने वेगळाच सूर लावला:

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता हो नशीबविधाता

तर ह्या व्यक्तीच्या कानाखाली एक साण्णकन ठेऊन द्यावी असे इतरांना वाटणार नाही का?

समुहाने एकत्र काम करत असताना जे ठरवले आहे सर्वांनी तेच करा. तिथे कुणी स्वत:चे वेगळेपण दाखवण्याची गरज नसते. किंबहुना अशी वृत्ती टीमवर्कला घातकच असते. म्हणूनच अशा लोकांचा मनस्वी राग येतो ते त्यांच्या ह्याच वृत्तीसाठी. आरतीच्या निमित्ताने काही लोकांची हीच वृत्ती उफाळून येते. मग असले प्रताप घडतात. मी इतरांपेक्षा वेगळा व शहाणा असे वाटत असेल तर घरात एकट्याने म्हणत बस आरती. वरती एका प्रतिक्रियेत सोसायटीचे उदाहरण दिले आहे ते अगदी योग्य आहे. सोसायटीच्या गणपतीला आरती म्हणताना ज्याला वर्षभर कोण कुत्रे सुद्धा विचारत नाही अशा मनुष्याच्या हातात माईक येतो. आणि मग तो कोकलून कोकलून आरती म्हणताना स्वत:चे अस्तित्व दाखवण्याच्या नादात अशा करामती करतो. आमच्या इथे परवा एक गृहस्थ (कोणी विचारत नाही तरीही पुढे पुढे करणारा चिडका म्हातारडा होता) हातात माईक असूनही ओरडून ओरडून गात होते. आरती ओवाळू भावार्ती ओवाळू आणि कसली कसली आरती ओवाळू. कोकलत गायचे सुरु होते. चुकीचे गीत ते हि बेसुऱ्या भसाड्या आवाजात. ते ऐकणे अक्षरश: असह्य झाले होते. सगळ्या आरत्या झाल्यावर ह्याला धाप लागली. घालीन लोटांगण संपत आले तसे दहा-बारा किलोमीटर पळून आल्यासारखी याची अवस्था झाली होती. चेहरा घामाने थबथबलेल्या अवस्थेत. आवाज फुटत नव्हता. तरीही जीभ बाहेर काढून आरती सुरूच. आता हा जाग्यावरच गचकतो का काय असे वाटून गेले. आळवून आळवून म्हणण्याची धुंदी वगैरे काही नाही. केवळ आपले अस्तित्व दाखवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड!

मला हे
दत्तगुरू दिसलेऽ
कोरस :
अग बाई हिला
दत्तगुरूऽ दिसलेऽ
Submitted by आ.रा.रा. on 21 September, 2018 - 13:12

--> हाच विनोद पंधरा वीस वर्षापूर्वी मी वेगळ्या गाण्याच्या संदर्भात ऐकला होता. गायिकेने गायला सुरवात केली

"मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश"

कोरसवाले तमाशाच्या गाण्यांना साथ देणारे होते. त्यांनी लगेच सूर ओढला,

"हिच्या गं बाई, मागं हुबा मंग्येस...."

झिल तोडण्यावरून आठवले.
कुण्या गावात भजनसंध्या अ‍ॅरेंज केलेली. मुख्य गायीकाबाई तर पोहोचल्या, पण साथीदारांची गाडी फेल झाल्याने वेळेवर पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे गावकरी मंडळींनी गावात अनायसे उपलब्ध असलेल्या लोककलाकारांना साथीला बसण्याची विनंती केली.
........
बाईंनी सुरुवात केली..
ब्र्हमा विष्णू आणि महेश्वर...
सामोरे बसलेऽ
मला हे
दत्तगुरू दिसलेऽ
कोरस :
अग बाई हिला
दत्तगुरूऽ दिसलेऽ
Submitted by आ.रा.रा. on 21 September, 2018 - 13:12

https://www.youtube.com/watch?v=NatnPoRX0DU (पूर्ण व्हिडीओ पाहायचा नसल्यास १४:५३ पासून पुढे पहा!!!)

मला पण साईबाबा इविनिन्ग आरती पूर्ण येते. पण कोणी म्हणायलाच बोल वत नाही.

एकदा हपिसात नव्या डिपार्ट मेंट उद्घाटन व पूजा होती. तेव्हा साधी सुखकर्ता दु:खहर्ता म्हण त होते सर्वांबरोबर तर शेजारी उभे असलेले
यंग पाखरू म्हणे अय्या म्याम तुम्हाला येते पूर्ण आरती?! तेव्हा मला एकदम जक्ख म्हातारी असल्याचे फील आलेले. Wink

Pages