आरत्यांमध्ये जादाचे शब्द घालून म्हणायची प्रथा कोणी व कधी सुरु केली?

Submitted by Parichit on 19 September, 2018 - 06:05

पुण्यात आल्यापासून गणेशोत्सवात एक गोष्ट अनुभवली आहे. इथे श्री गणेशाची आणि इतर आरत्या थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हटल्या जातात असे माझे मत आहे. मूळच्या आरती मध्ये काही जादाचे शब्द घातले गेले आहेत. जसे कि उदाहरणार्थ...

जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती
जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी

अजून अशी अनेक उदाहरणे आहेत. मूळ आरतीमध्ये "जय देव जय देव जय मंगल मूर्ती" इतकेच आहे. लहानपणापासून तितकेच वाचत व म्हणत आलो आहे. पुण्यात मात्र त्याला "हो श्री मंगल मूर्ती" असे जोडतात. प्रथम प्रथम हे सगळे ऐकून गम्मत वाटली. पण नंतर नंतर चीड येऊ लागली. त्याच अर्थाचा दुसरा शब्द पुन्हा का म्हणायचा? हा आचरटपणा कोणी व का केला असेल? मुख्य म्हणजे हे पुण्यातच जास्त आहे. कोल्हापूर सांगली सातारा भागात हे ज्यादाचे शब्द म्हणत नाहीत (असे माझे निरीक्षण आहे). तिकडे अजूनही मूळ आरत्याच जशाच्या तशा म्हंटल्या जातात (मुंबई व इतर महाराष्ट्राचे माहित नाही). काही प्रश्न मनात आले:

१. हे नसतेउद्योग कोणी, कधी व का केले असतील?
२. केवळ स्वत:चे अस्तित्व व वेगळेपण दाखवण्याकरिता एखाद्या आरती पुस्तकाच्या लेखकाने/प्रकाशकाने तर हे केले नसेल?
३. एखाद्या मूळ लिखाणामध्ये बदल करणे ह्याला कॉपीराईट भंगाचा गुन्हा म्हणतात. इथे तो लागू होत नाही का?
४. इथे तर अधिक शब्दांची भर घालणाऱ्या महाभागाने काहीही कारण नसताना सरळ सरळ द्विरुक्ती केली आहे. व ऐकताना तो थेट मूर्खपणा आहे हे जाणवते. जसे कि...

ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावसी लवलाही
आरती ओवाळू भावार्ती ओवाळू तुज कर्पूर गौरा

का रे बाबा? फक्त भक्ता लागी पुरेसे वाटत नाही का तुला? फक्त आरती ओवाळू म्हणून मन भरत नाही का तुझे?
महिषासुरमर्दिनी शब्द असताना पुन्हा त्याच अर्थाचा दैत्यासुरमर्दिनी म्हणावा असे तुला का वाटले असेल?

थेट मूर्खपणा वाटतो आणि विशेष म्हणजे लोकांनी कुणीही ह्या घुसडवणूकीला विरोध किंवा आक्षेप नोंदवलेला दिसत नाही. चालते का असे काहीही केले तर? चालत असेल तर मी तर म्हणतो करणाऱ्याने इतकेच बदल का केले असतील? अखंड आरतीच नवीन लिहायची ना. उदाहरणार्थ:

देवी दैत्यी सागर मंथन पै केले हो घुसळण पै केले |
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले हो जळजळ जे उठले |
तें त्वां असुरपणे प्राशन केलें हो गिळंकृत केले |
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले हो फेमस झाले |

का? काय हरकत आहे? आहे कुणाची हरकत?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

असा प्रश्न विचारण्यामागील उद्देश कळेल का???
<<

परीक्षेत प्रश्नाखाली उत्तर लिहिण्याऐवजी "या प्रश्नाचा उद्देश कळेल क्वाय" असे लिहून येत होतात का?

उत्तर येतंय का तुम्हाला ? उत्तर जाणून घेणे हा प्रश्नांचा उद्देश असतो, इतकं साधं कळत नाही का?

पूर्वीच्या काळी करमणुकीची साधने उप्लब्ध नसल्याने १०-१० आरत्या सावकाश म्हणणे , त्या वाढवणे असे प्रकार स्वगतार्ह असावेत. त्याबरोबरच समाजजीवन , समाजात जास्त मिसळणे प्रचलित असल्याने सामूहिक आरती ( विशेशकरून पुण्यातल्या वाड्यांत) चालत असत . मग खिरापती वाटणे , विविध गुणदर्शानाचे कार्यक्रम असे गणपती उत्सवाचे सामाजिक रूप असे. त्यामुळे मैत्रेयी म्हाणतात तद्वत यात कोणताही वाइट उद्देश असेल असे वाटत नाही. उलट जास्ती वेळ गणेश - आदि देवतांच्या स्तुतीपठणात रममाण होणे हे आनंददायी होते.

आरत्यांमधे घातलेले 'मनाचे श्लोक' रसभंग करतात हे मान्य आहे, पण ह्याचा प्रादेशिकतेशी संबंध नाही. दुसरं म्हणजे ह्यात 'मुर्खपणा', 'आचरटपणा' इतका टोकाचा वेडेपणा सुद्धा नाही वाटत. आरती जशी आहे, तशी म्हणावी हे मान्य आहे >>> + १२३

असा प्रश्न विचारण्यामागील उद्देश कळेल का???
Submitted by विक्षिप्त_मुलगा on 19 September, 2018 - 22:42

मी असे विचारले कारण संबंधित आयडीचे आत्तापर्यंतचे अनेक धाग्यांवरचे (विशेषतः धार्मिक) प्रतिसाद पाहिले असता खवचटपणे दिलेले प्रतिसाद जास्त असतात. धाग्यात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर गप्प रहावे ना माणसाने! कीबोर्ड आहे म्हणून तो बडवून काहीतरी प्रतिसाद दिलाच पाहिजे असा काही मायबोलीचा नियम नाही!

शाळेत सामान्य विज्ञानाच्या परीक्षेत 'लिंबाच्या रसात अनुक्रमे लाल व निळा लिटमस पेपर बुडवला तर त्यांच्यावर काय परिणाम होईल?' असा प्रश्न विचारला असेल तर सरळ उत्तर लिहाल की 'लिटमस पेपर लाल आणि निळ्या रंगाचेच का असतात असा उलट प्रश्न कराल???'

असो, यापुढे या धाग्यावर संबंधित आयडीकडून येणाऱ्या शेरेबाजीला मी उत्तर देत बसणार नाही. उगाच माझ्यामुळे धागा भरकटायला नको!

अहो संबंधित आयडी Lol

माझ्या प्रतिसादाबद्दल बोलावेच, अशी तुम्हाला कुणी जबरदस्ती केली आहे का? उगंच येऊन अंगाशी झट्या द्यायच्या हा उद्योग कशाला? मी काय लिहितो ते माबो धोरणाबाहेर असेल, तर जे काय करायचे ते अ‍ॅडमिन बघून घेतील.

अन धाग्यातल्या प्रश्नाला मी विचारलेल्या प्रतिप्रश्नाचे काय करायचे ते धागाकर्ते बघून घेतील. मधेच तुम्ही का उड्या मारताहात? स्वतः अंगावर यायचे अन मग नंतर
>>
असो, यापुढे या धाग्यावर संबंधित आयडीकडून येणाऱ्या शेरेबाजीला मी उत्तर देत बसणार नाही. उगाच माझ्यामुळे धागा भरकटायला नको!
<<
ही असली टिनपॉट शेरेबाजी करायची.

Lol मज्जाय!

भांडू नकारे.
देवाचा धागा आहे.
भाण्डायला वेगळे स्पेशल धागे आहेत Happy Happy

हे बसले आहेत आरत्यांचे ताट घेऊन. Proud Light 1 पण लग्नात म्हणली जाणारे विनोदी मंगलाष्टके कधी कान देऊन ऐकलीत का? तुफान करमणूक करतात. अगदी " नवरदेव आले तिकडुनी नी करवल्या बसल्या दबा धरुनी " ही अशी किंवा मग " आपण इथे का जमलो आहोत " अशी मंगलाष्टके जाम करमणूक करतात. हे असे अनेक किस्से वाचले होते.

पूर्वी अशा पद्धतीचाच धागा लिंबुभाऊंनी काढला होता की.
https://www.maayboli.com/node/28829

डिझायनर मंगलाष्टके आणि डिझायनर पाळणे हे दोन्ही डेंजर विनोदी प्रकार असतात.(फक्त हे आपल्या आई/साबा/आत्या/मावशी यांनी आपल्या फंक्शन साठी रचले असल्यास ते छान असतात. Happy )
मुळात बारसे आणि लग्न या दोन्ही मध्ये लहान बाळ, नव्या आया आणि अजून न झालेले नवे नवरा बायको हे सगळे इतक्या वेगळ्या मूडात असतात की कोणीही ही डिझायनर काव्य मन लावून ऐकत नाही. बॅचलर जवळपास ची प्रेक्षणीय स्थळे टापत असतात.बायका साड्या दागिने बघत असतात.लग्न झालेले पुरुष 'जेवण मिळायला किती वेळ आहे' याचा अंदाज घेत असतात.टोचणार्‍या फंक्शनल कपड्यात अवघडलेली लहान मुलं आईबाबांच्या डोक्याला भुंगा लावून घरी जाताना खेळणं किंवा घरी गेल्यावर टिव्ही टाईम पक्का करत असतात.

<<<मी असे विचारले कारण संबंधित आयडीचे आत्तापर्यंतचे अनेक धाग्यांवरचे (विशेषतः धार्मिक) प्रतिसाद पाहिले असता खवचटपणे दिलेले प्रतिसाद जास्त असतात. >>>
हे खरे असले तरी (मी पण असलेच प्रतिसाद जास्त देतो), पण
<<उत्तर जाणून घेणे हा प्रश्नांचा उद्देश असतो, >>
हे या ठिकाणी जास्त महत्वाचे आहे. कारण जर आरत्यांबद्दल चर्चा असेल तर या प्रश्नाचे उत्तर पाहिजेच.
<<आरत्या ओवाळायची प्रथा कुणी सुरू केली असावी?>> यात मला काही खवचटपणा दिसत नाही. (खवचट काय हे माझ्याइतके कुणालाच माहित नसावे)
मलाहि या प्रश्नाचे उत्तर कळले तर बरे वाटेल.

>>देवी दैत्यी सागर मंथन पै केले हो घुसळण पै केले |
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले हो जळजळ जे उठले |
तें त्वां असुरपणे प्राशन केलें हो गिळंकृत केले |
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले हो फेमस झाले | << सर्वच अ‍ॅडिशन्स जाम भारी आहेत हे Rofl

मला वाटते हे सर्व 'आम्हीच कसे हुशार्/अतिहुशार/ श्रेष्ठ' अथवा 'तुम्ही कसे अडाणी/मठ्ठ्/यडच्याप' हे दाखवण्याच्या नादात आरत्यांचे फुळ्ळं पाणी करुन टाकले असणार..!! मला पण आमच्या घरी अथवा पै-पाहुण्यांकडे अशा विचित्र आरत्या म्हटलेलं आज्जिबात स्मरत नाही..!

आमच्या घरी अथवा पै-पाहुण्यांकडे
<<
घुसळण पै केले म्हणजे पावण्याच्या काठीने साप मारल्या सारखं पावण्याकडून घुसळून घेणे असा अर्थ आहे का Lol

प्रस्तुत धाग्याचे लेखक, हे आरत्यांचे मालक आहेत, देवाचे मालक आहेत की लोकांच्या मनातल्या भक्तिभावाचे मालक आहेत? स्वतःला समजतात तरी काय? आचरटपणा मूर्खपणा असे शब्द लोकांच्या भक्तिभावासाठी वापरणे कोणत्या अधिकाराने करत आहात लेखकराव? आपल्या दहाबायदहाच्या बाहेर खूप मोठी जनता आणी दुनिया आहे. अंड्यातून बाहेर आल्यावर बावचळून जाऊन किरकिर करणे थांबवा आणि हा आरत्या म्हणायचा आचरटपणा, मूर्खपणा कुणी सुरु केला ते सांगा... तुम्ही इतकी चिडचिड करत आहात तर तुमचाच काहीतरी त्यात हात असावा असे जाणवत आहे केलेल्या त्राग्यावरुन... आता सांगाच. साधा नमस्कार करुन तोही मनातल्या मनात देवाला भजता येत असतांना टाहो फोडून आरत्या म्हणायचा आगावूपणा, नसते उद्योग कुणी सुरु केले...?

मी इतके दिवस 'व्याघ्रांबर-फणिवरधर सुंदर मद-नारी' असं समजत होतो. ते म्हणे 'मदन-अरि' असं आहे!
नवीन Submitted by π on 20 September, 2018 - 21:22
》》》
मला आत्ता इथे कळले. Rofl

हा धागा, "मी चुकीची ऐकलेली गाणी" च्या धर्तीवर "लोकांनी चुकवलेल्या आरत्या" वर चाल्लाय.

एक भल्तं क्यूट बच्चू श्लोक म्हणतानाचं व्हॉट्सॅप व्हिडू आहे. त्यात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो हे सगळं बोबड्या आवाजात म्हणून महेश्वरः ला चक्क महेश मामा करून टाकलाय बाळाने. आठवतोय? सापडला तर लिंक देतो.

नमस्कार, मी म्हणतो अश्या आरत्या...अगदी लेखात लिहिले आहे तेच शब्द वापरुन आणि तसेच, त्यामुळे काही लोकांना एव्हडा त्रास होत असेल असे कधी वाटले नव्हते. आता सवय झाली तसे म्हणायची.

आजूबाजूला संकष्टी पावावे ऐकून ऐकून माझ्या बाबांनी एका ज्येष्ठ परिचितांना विचारले असता ते म्हणाले की संकष्ट म्हणजे संकटच. त्यामुळे ते अर्थाच्या दृष्टीने चूक नाही. म्हणतायत तर म्हणू द्या. अर्थ तरी बदलत नाही.
करोमि यद् यद् ऐवजी बरेच जण यद्यम् म्हणतात.
महेशमामाचा व्हिडिओ पाहिला आहे Happy

उटी शेंदुराची - ओटी शेंदुराची

दास रामाचा वाट पाहे सदना - दास रामाचा वाट पाहे सजणा

लवथवती विक्राळा - लवलवती विक्राळा

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती - ओवाळू आरत्या सुरवंट्या येती

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना - लंबोदर पीतांबर फळीवर वंदना

वक्रतुंडत्रिनयना - वक्रतुंडत्रिनेमा

संकटी पावावे - संकष्टी पावावे

दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति - दर्शन म्हात्रे मन कामना पूर्ती

दीप ज्योति नमोस्तुते - दीपक जोशी नमोस्तुते

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा - कायेन वाचा मच्छिन्द्र देवा

मुळात आरती नीट म्हणून देव प्रसन्न होतो का की जादा शब्द घातल्याने नाही होणार?
देवांना मराठी भाषा येते का हा मुख्य प्रश्न आहे. गणपती ट्रान्सलेत करतो मग जादा शब्द पण होऊ दे ट्रान्सलेत, काय फरक पडतो?

जादाचे शब्द घालणारे लोक आरती म्हणताना बाकिच्यांची पंचाईत करतात. >>> Happy हो. आरती सुरू करताना ती कॉम्पॅक्ट फॉर्म मधे की एक्स्टेण्डेड फॉर्म मधे म्हणायची आहे ते आधी विचारून घ्यावे असे नेहमी वाटते मला.

आम्ही पहिल्या दिवशी संध्याकाळी 'मोठी आरती' किती वाजता आहे आणि साधारण किती वेळ चालेल हे लोकांना आमंत्रण करतानाच लिहीतो. मग लोकांना ठरवता येते की तेव्हा यायचे की नाही. त्यात मग 'येई वो विठ्ठले' आणि 'आरती सप्रेम' सुद्धा असते. लहान मुलांना ते लांबलचक तान लावण्यात वगैरे मजा वाटते.

पुलंच्या 'हरितात्या' मधे त्यांचे सावकाश आरती म्हणणे, आणि त्यामुळे त्यांनी 'आरती सप्रेम' सुरू केल्यावर यजमानाने तबक खाली ठेवून हात जोडून उभे राहणे वगैरे आठवले Happy

आम्ही पहिल्या दिवशी संध्याकाळी 'मोठी आरती' किती वाजता आहे आणि साधारण किती वेळ चालेल हे लोकांना आमंत्रण करतानाच लिहीतो. >>>>

तुम्ही अमेरिकेत राहता म्हणून लिहिता, इकडे लिहायची गरज पडत नाही, एकतर कुणी लहान मूल ओरडत येते आरतीला चला म्हणून, नाहीतर टाळाचा आवाज आला की आपणच ओळखून पळत जायचे शेजारी आरतीला व तिथल्या गर्दीत उभे राहून सुरू करायचे.

आमच्या गावी आरतीची वेगळी पद्धत आहे. गावातले आरती मंडळ घरोघरी एकेक आरती करत फिरते. प्रत्येक घरात कुठलीतरी एकच आरती म्हटली जाते. सोबत तबला वगैरे आणून जोरात ओरडून केलेल्या आरतीत कोण कुठले शब्द म्हंतोय हे कळत नाही. घरातल्या लोकांकडे त्यांच्या मागे उभे राहून ते जी आरती म्हणतात ती पुटपुटणे व करून ठेवलेला प्रसाद त्यांना देणे एवढेच काम राहते.

आरतीत घुसडले गेलेले जादाचे शब्द आरतीची लय बिघडवतात हेमावैम. आपण लयीत आरती म्हणत असतो व अचानक कुणी ज्यादाचे काही बोलून आपल्याला गडबडवते. घुसडवणारे काही थांबत नाहीत, आपल्यालाच स्वतःला सावरून घ्यावे लागते.

मला आवडते आरती करणे, देव मानणे, दिसल्या देवाला नमस्कार करणे, मनातल्या मनात, प्रत्यक्ष हात जोडून, जसे जमेल तसे. माझे रोजचे चालणे फिरणे श्वास घेणे या सगळ्याचे विज्ञानाच्या दृष्टीतून स्पष्टीकरण देता आले तरी हे सगळे कधी बंद पडेल हे कुठलेही विज्ञान सांगू शकत नाही. हा जो अज्ञात प्रदेश आहे याची भीती वाटत आलीय माणसाला. ती भीती कमी व्हावी किंवा तिकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून हा सगळा कल्लोळ निर्माण करून ठेवलाय हेमावैम. मलाही त्या कल्लोळात भाग घेऊन आनंदी व्हायला आवडते.

हो माझ्या लहानपणी चाळीत तसेच होते. एकापाठोपाठ एक घरात आरती सुरू व्हायची आणि सगळे तिकडे जायचे. मग आम्ही कधी कधी आरती पूर्ण व्हायच्या वेळेस प्रसादापुरतेही जायचो Happy कोणाच्या घरी किती मोठी आरती असते वगैरे सगळे माहीत असायचे.

अमेरिकेत लिहावे लागते कारण येणारे लोक घराच्या आजूबाजूचे आवाज ऐकून येणारे नाहीत. तसेही थोडे आहेत पण बाकी बरेचसे लांबून ड्राइव्ह करून येणारे. मग आरतीला तेथे असलेले मनापासून त्याकरता आलेले असावेत म्हणून वेळ वगैरे लिहायचे.

पण काही आरती बहाद्दर लोक असतात, त्यांना प्रचंड कुठल्या कुठल्या आरत्या माहीत असतात, म्हणजे अगदी ज्ञानदेव, दशावतारच नाही तर , कुठलेसे बाबा, गुरू, अगदी कोणीही
आणि आज अमुक अमुक दिवस आहे, त्यामुळे तमुक तमुक आरतो म्हणू असा आग्रह धरतात,
मग बाकीच्यांची गोची होते Wink

गेली काही वर्षे " मोठी आरती" करताना आरत्यांची पुस्तकांची पाने दुमडुन खुणा करून ठेवल्यात, तितक्याच म्हणायच्या, नो गोंधळ

>>>आज अमुक अमुक दिवस आहे, त्यामुळे तमुक तमुक आरतो म्हणू असा आग्रह धरतात,>>> बाकी मी बराचसा अश्रद्ध असलो तरी असे लोक आणि लांबलचक आरती मग त्यात गोंदवलेकर महाराजांच्या दोन तीन, आरती भुवनसुंदराची, सद्गुरू मातेची आणि फा म्हणतोय तशा पोरांना आवडणाऱ्या Wink ताना घेऊन दशावताराची असा सगळा साग्रसंगीत भंपकपणा प्रचंड आवडतो.

आम्ही पुण्यात लेखक वि. ग. कानिटकरांच्या शेजारी राहत होतो. त्यांच्या घरची आरती म्हणजे धमाल असायची. त्यांचे एक थोरले बंधू खूप वयस्कर होते, पण 'येई वो विठ्ठले..' ही आरती एकदम जोशात म्हणायचे (बाकी कुणालाच ती पाठ नसे. मग ते एकटे सगळी कडवी म्हणायचे आणि बाकी सगळे ध्रुवपदाला जोरात कोरस लावायाचे). शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणताना पण 'आविक्षितस्य कामप्रे ......' इत्यादी ठिकाणी आवाज लांबवायचे. मग आम्ही लहान पोरे पण त्यांच्या आवाजात आवाज मिसळून ते म्हणायचो. मध्येच श्वास संपला तरी उगाच चढाओढ म्हणून पुन्हा श्वास घेऊन सूर लांबवत बसायचो. मोठ्या लोकांची हसून हसून पुरेवाट. पुलंचं हरितात्या ऐकताना अगदी हीच आरती डोळ्यासमोर येते माझ्या.

>> हो माझ्या लहानपणी चाळीत तसेच होते. एकापाठोपाठ एक घरात आरती सुरू व्हायची आणि सगळे तिकडे जायचे.

सेम पिंच. आमच्या चाळीतल्या त्या लहानशा खोल्या. खोलीतली पत्र्याच्या पट्ट्या पट्ट्या असलेली खाट फोल्ड करुन गणपतीसाठी जागा केली जायची. आरती करणारे निम्म्याहुन जास्त लोकं बाहेरच उभे राहुन आरती करायचे. एकजण छोटं ढोलकं वाजवत मस्त ताल धरायचा. आम्ही बच्चे कंपनी टाळ कुटत सगळ्यात पुढे उभे. तेव्हा आरत्यांची छापील पुस्तके नसल्याने जे कानावर पडतंय तेच अंदाजाने बोलायचं त्यामुळे संकष्टी पावावे बोलताना आपण काही चुकतोय हेच माहीत नव्हतं. घालिन लोटांगण म्हणताना ओळीच्या पहिला शब्द मोठ्याने म्हणुन नंतर तोंडातल्या तोंडात काहीतरी बोला ही ट्रिक लहानपणीच शिकली. अजुनही "कायेन वाचा" च्या नंतर काय म्हणायचं असतं हे माहीत नाही. Lol डायरेक्ट करोनी यद्न्म ओरडुन पुन्हा पुटपुटायचं Proud चणे-फुटाणे, पेढे असला प्रसाद आवडायचा. कोणी फळांचा तुकडा हातावर ठेवला की बाहेर येउन गुपचुप फेकुन द्यायचो. प्रसाद गटारात टाकल्याने काहीही वाकडं होत नाही हे नकळत्या वयात प्रॅक्टिकली शिकलो. आपण घरी गणपती आणायचा का? हा बालसुलभ प्रश्न नास्तिक बाबांनी "गप्पे" या एका शब्दात सोडवला होता. Proud पण अर्थातच बाहेर मित्रांच्या घरी जाउन काहीही करायला पुर्ण मुभा होती. नमस्कार कर म्हणुन जसं घरुन सांगितलं गेलं नाही तसं नमस्कार करु नकोस हे पण कधी सांगितलं नाही. न आवडणारा प्रसाद फेकुन देउन माझं मीच शिकत मतं बनवत गेलो.
माझ्यासाठी गणेशोत्सव हा खुप नॉस्टॅल्जिक करणारा सांस्कृतिक/कौटुंबिक अनुभव असतो. मस्त २०-२५ जवळच्या ओळखितले लोक आरतीला असावेत, रंगात येउन एकमेकांकडे बघत हसत आरती व्हावी, गौरीच्या नैवेद्याच्या मटणाचा घमघमाट सुटलेला असावा, लांबलचक ताना व्हाव्यात, निढळावरी करं..... म्हणताना कोण जास्त वेळ श्वास टिकवुन ठेवतोय याची स्पर्धा लागावी, पोरासोरांनी टाळ कुटावेत आणि या सगळ्या कल्लोळात आपणही फळीवर वंदना म्हणत तल्लिन होउन जावं....

Pages