झब्बू क्र. ४ - लोककला

Submitted by संयोजक on 19 September, 2018 - 05:53

माणसाला जेंव्हा चाकाचा आणि शेतीचाही शोध लागला नव्हता तेव्हाच त्याने कलेचा शोध लावला होता. जेथे माणूस आहे तेथे कला आहेच. खरंतर 'कला' हे माणसाच्या 'असण्याचे' लक्षण आहे असं म्हटलं तर वावगे ठरु नये. माणूस जसजसा प्रगत होत गेला, त्याची कलाही प्रगत होत गेली. कित्येक नवनविन गोष्टी आल्या, आणि गेल्या देखील. पण कला आणि माणूस यांच्यातले नाते मात्र काळागणीक वाढत गेले, दृढ होत गेले. हळू हळू माणूस पोटामागे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात विखुरला गेला. कालांतराने त्याच्या रंगरुपात फरक पडला. जगण्याच्या शैलीत परिसरानुसार बदल होत गेला. माणसांच्या कळपाचे रुपांतर समाजात झाले. मग प्रत्येक समाजाने आपापल्या संस्कृती निर्माण केल्या, दैवतं निर्माण केली. मानवाच्या या सगळ्या प्रवासात त्याची कलाही त्याच्या सोबत बदलत गेली, बहरत गेली. प्रत्येक समाजाच्या संस्कृतीची ओळख जशी त्यांच्या जीवनशैलीवरुन व्हायला लागली तशीच ती त्यांच्या कलेनेही ओळखली जाऊ लागली. या कलांचे साधारण स्वरुप हे त्या त्या संस्कृतीत उपलब्ध असणारे साहित्य, भौगोलीक परिस्थिती, आणि समाज एकसंध राखण्यासाठी केलेले नियम यावर आधारीत असे होऊ लागले.

स्त्रियांची जात्यावरची ओवीगीते, कांडपगीते, बाळाला जोजवण्याची गीते किंवा सणासुदीची क्रीडानृत्ये व तत्संबद्ध गीते, उत्सवातील नृत्यनाट्ये , देवतोपासनेचा अविभाज्य भाग म्हणून केली जाणारी विधि- विधाने, विधीचा भाग म्हणून काढली जाणारी चित्रे, घडवली जाणारी शिल्पे, रांगोळ्या, मूर्तिकरण या सर्व कला पारंपरिक लोकजीवनाचा अविभाज्य भाग असतो. तर अशा या लोककला तुमच्या गावात, परिसरात, आजुबाजूला असतील किंवा तुम्ही पर्यटनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातील लोककला पाहील्या असतील, आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या असतील. तर या लोककलांसाठीच आपला हा उपक्रम आहे. तुम्ही टिपलेले या लोककलांचे क्षण तुम्हाला येथे पाठवायचे आहेत. मग काढा आपले संगणकावरचे जुने फोल्डर आणि शोधा असे फोटो. तुमच्याही आठवणी ताज्या करा लोककलांच्या आणि मायबोलीकरांनाही त्यात सामिल करुन घ्या.
मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय चवथा झब्बू "लोककला" म्हणजेच तुम्ही पाहिलेल्या, अनुभवलेल्या लोककलांचे प्रकाशचित्र.

IMG-20180919-WA0001.jpg

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा-

Group content visibility: 
Use group defaults

कीर्तन - रामजन्म सोहळा
IMG_20180325_122507.jpg